ती घरची CEO Trupti Deo द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती घरची CEO

ती घरची CEO

कंपनी बंद होते…कधी बंद पडते. तर कधी कंपनी दुसऱ्याला चालवायला दिली जाती.

नवीन मॅनेजमेंट येतं… सिस्टीम पुन्हा कार्यरत होते.
एखादा मालक कंपनी विकतो… दुसरा येतो, काम पुन्हा सुरू होतं.
पण घर?
घर बंद झालं… तर काय?
घराच्या कामाला दुसरं मॅनेजमेंट मिळतं का?
किंवा कुणी तरी ‘हिअरिंग प्रोसेस’ घेऊन "मी आता हे घर सांभाळतो" असं सांगतो का?

ही गोष्ट आहे अर्जुन आणि मुक्ताची.

अर्जुन – एक यशस्वी उद्योजक. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची कंपनी – “आशा टेक्नोलॉजीज” चालवणारा. दरवर्षी टर्नओव्हर वाढवणारा, गाठभेटी, प्रेझेंटेशन, टारगेट्स यांत रमणारा. त्याच्या वेळापत्रकात ‘घर’ नावाचा कॉलम नव्हताच.

आणि मुक्ता? ती त्याची बायको. ‘नोकरी करतेस का?’ असं कोणी विचारलं की ती हसत म्हणायची – “हो, घरातली करते!”
पण समाजाच्या भाषेत ती ‘गृहिणी’ – म्हणजे काही न करणारी, फक्त घरात बसणारी, ‘फ्री’ असणारी.

मुक्ताचं आयुष्य म्हणजे न संपणारं टाइमटेबल…
सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरा झोपेपर्यंत, स्वयंपाक, भांडी, मुलांचं अभ्यास, त्यांच्या प्रोजेक्ट्स, किराणा, कामवाली बाईचं मन सांभाळणं, सणवार, वृद्ध सासूसासऱ्यांचं औषधपाणी…
सगळं तिनं स्वतःवर घेतलं होतं.घरात किती ही आधुनिक सुविधा असला तरी, मॅनेजमेंट रिचार्ज. तिच्या कडे होते.


अर्जुनचं तिच्यावर प्रेम होतंच, पण त्याला हे सगळं "सोपं" वाटायचं.
एकदा तर वादात चिडून तो म्हणाला होता –
“तू तर गृहिणी आहेस… तुला काय समजतं व्यवसायाचं, टेन्शन काय असतं ते?” कंपनीची CEO आहे

त्या दिवशी मुक्ता गप्प राहिली.
कारण तिनं जाणलं होतं – शब्दांनी सगळं समजावत नाही, अनुभव लागतो.

आणि अनुभव आला… फार लवकर.

कोविड नंतरच्या काळात अर्जुनची कंपनी अडचणीत आली.
क्लायंट गेले, प्रोजेक्ट्स थांबले, कर्ज वाढलं.
शेवटी एक दिवस निर्णय घेतला गेला – “कंपनी विकावी लागेल…”

अर्जुनच्या डोळ्यांत पाणी आलं.
तो CEO होता… १०० लोकांची जबाबदारी घेणारा.
पण आज, तो स्वतःचं नाव कंपनीच्या मालकीतून कट करतो होता.

कंपनी नवीन मालकानं घेतली.
काही दिवसातच काम पुन्हा सुरू…
नवीन टीम, नवीन रिपोर्ट्स, नवीन टारगेट्स.
सगळं पूर्ववत.
अर्जुन फक्त बाहेरून बघत राहिला.

“कंपनी कोणीही चालवू शकतो…” हे पहिलं सत्य त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्ट झालं.

पण अजून एक अनुभव बाकी होता.

अर्जुन अजून या धक्क्यातून सावरलेला नव्हता, तेव्हाच मुक्ताला आजारापण आलं. तिचा ताप कमी होत नव्हत्ता.
दहा दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं.
त्या दहा दिवसांत अर्जुनने स्वतः घर सांभाळायचं ठरवलं…

पहिल्या दिवशी त्यानं मुलांची शाळा चुकवली – कारण टिफिन तयार नव्हता.
दुसऱ्या दिवशी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकले, पण डिटर्जंट टाकणं विसरला…
तिसऱ्या दिवशी शिर्‍यात...चुकन मीठ . टाकलं…
गॅस संपला ते लक्षातच आलं नाही…
मुलांना वेळच्या वेळी औषधं द्यायची विसरला…

सकाळपासून रात्रीपर्यंत काहीतरी विस्कळीत…
कामवाली बाईपण म्हणाली –
“मुक्ता बाई नाहीयेत म्हणून घरचं घर वाटत नाही!”

तेव्हा अर्जुनला कळलं –
कंपनी चालवायला टीम लागते…
पण घर चालवायला – "ती" लागते.

त्या दिवशी त्याचं लक्ष गेलं –
घरात सगळ्या गोष्टी सहज चालत होत्या, कारण कोणीतरी न बोलता चालवत होतं.
ते बटण कोण चालवत होतं?
मुक्ता.

मुक्ता हॉस्पिटलमधून परत आली.
थकलेली, पण हसरी.

तिनं उंबरठा ओलांडताच भिंती जणू हसल्या…
तिनं पहिलं वाक्य म्हटलं –
“काय केलंय रे घराचं! भिंती पण गप्प झाल्या आहेत…”

अर्जुन थरथरत्या हातानं तिचा हात धरत म्हणाला –
“गप्प नव्हत्या ग… त्या रडत होत्या!
मुक्ता, तू गेल्यापासून हे घर घर राहिलंच नाही…
मुलं उदास होती… मी गोंधळलेलो…
आणि मी CEO होतो… लोकं हाताळायचो… पण हे घर माझ्या हातून चालेना.”

अर्जुनचा गळा भरून आला…
आणि तो म्हणाला –

“मुक्ता…
मध्यंतरी मी तुला म्हणालो होतो –
‘तू तर गृहिणी आहेस… तुला काय समजतं व्यवसायाचं?’

पण आज मला उमगलं –
तूच या घराची CEO आहेस.

तुझ्या अनुपस्थितीत हे घर चालवलंच जात नाही!

कंपनी कोणीही चालवू शकतो…
पण घर…?
घर चालवायला – ‘ती’ लागते.

ती – घरची CEO!”**



त्या दिवशी अर्जुन पहिल्यांदा मुक्ताच्या हातात घेतला.


कंपनी चालवता येते, घर नाही…
कारण घराची सूत्रं मनगटाने नव्हे, मनाने धरावी लागतात.
आणि ते मन – ती असते!


त्या रात्री अर्जुन गच्चीत उभा होता.
सहज मागे पाहिलं, तर मुक्ता हलक्या पावलांनी आली.
हातात चहाचे दोन कप. एक त्याच्यासाठी.
तिचा हात त्याच्या हातात ठेवत ती म्हणाली –
"कंपनी म्हणजे फायली, योजने, मिटींग्ज…
घर म्हणजे हळूवार लक्ष, न बोलता समजणं, आणि प्रत्येकासाठी स्वतःला विसरून जगणं.
घर चालवायला प्रेम लागतं – आणि ते कुठल्याही MBA मध्ये शिकवलं जात नाही!"

अर्जुन तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला –
"हो मुक्ता… कंपनी कोणीही चालवू शकतो.
पण घर… ते चालवायला ‘तू’ लागतेस.
कारण घर म्हणजे ‘तुझा’ श्वास आहे… आणि तुझ्याविना, हे फक्त एक निर्जीव ठिकाण!"

मुक्ता हसली, आणि म्हणाली –
"कंपनी ही संस्था असते अर्जुन, ती पैसे, मिटींग्ज, फायलींवर चालते…
घर ही भावना असते. ती हृदयावर चालते.
म्हणूनच कंपनी दुसरा चालवू शकतो… पण घर?
ते फक्त 'बाई'च चालवू शकते – कारण तिचं अस्तित्वच त्यात मिसळलेलं असतं!"

"कंपनी विकू शकतो, पण घराचा आत्मा कुणालाही विकता येत नाही!"




शेवटी, हसऱ्या चेहऱ्याने, मूक नजरेतून आदर व्यक्त करत,,
ती – घरची CEO! तिचं घर तीच सांभाळू शकते!

सौ तृप्ती देव 



ही कथा ‘ती’च्या मन:स्वास्थ्याला, तिच्या श्रमांना, तिच्या अस्तित्वाला एक ओळख देणारी आहे.
ती स्वयंपाक करेल किंवा नाही, बाहेर जाईल किंवा नाही, ती "नोकरी" करत नसेल… पण ती एक व्यवस्थापक आहे… एक संयोजक आहे… एक CEO आहे.

सौ तृप्ती देव 
भिलाई छत्तीसगड