फुलं Trupti Deo द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फुलं

गुरुवारची सकाळ होती.

नेहमी प्रमाणे घरात सकाळच्या कामाची घाई होती, पण आजीच्या मनात एकच खंत होती — “अरे, फुलं विसरले! आज गणपतीला मीच.. विसरले? ” कारण मंगळवार आणि गुरुवार आजीचं उपवास.
 त्यामुळे हे दोन दिवस आजीला फुल हवीच असतात. आणि काल ते विसरून गेले फुले मागवायचं.. 


“प्रणव... काल फुलं नाही आणलीस का?”

सारी तयारी झाली होती — गंध, अक्षता, समई, पणती... सगळं ठिकाणी. पण देवमूर्तीसमोर फुलं नव्हती.


प्रणव फ्रिजकडे वळला, "पाहतो गं आई, कदाचित कालचं काही फुलं शिल्लक असेल."


दरम्यान, आजीच्या शेजारी बसलेला नातू विहान टक लावून सगळं बघत होता. फुलं नसल्याने आजीच्या चेहऱ्यावर जे क्षणभर उमटलेलं दु:ख त्याच्या लक्षात आलं.आजीचा चिंतीत चेहरा.


तो सहजच म्हणाला,

“आजी… देवाला रोज फुलंच का पाहिजे? प्लास्टिकची फुलं आहेत की... ती पण तर सुंदरच आहेत. रोज रोज नवीन फुलं नकोत ना? देव तर मोठा आहे ना, समजूतदार...?”


आजी क्षणभर गप्प झाली.

एवढं लहान मूल पण किती मोठा प्रश्न विचारतोय...

ती त्याच्याकडे पहात म्हणाली:


“बघ रे विहान…

तुला जर मी रोज एकसारखी गोष्ट सांगितली, तर कधी कंटाळा येईल का?

तुझा वाढदिवस आला की तुला प्लास्टिकचा केक चालेल का?

तुला शुभेच्छा फक्त मेसेजमध्ये आली तर समाधान होईल का?


प्लास्टिकची फुलं सुंदर आहेत, खरी... पण त्यांच्यात गंध नाही रे!

त्यांच्यात पावसाच्या पहिल्या थेंबांचं सौंदर्य नाही, अंगणात सळसळणाऱ्या वाऱ्याने हळुवार उडवलेली पाकळी नाही.

त्यात श्रम नाही, स्पर्श नाही, आणि मन नाही.”


विहान विचारात पडला... त्याच्या छोट्याशा मनात काही तरी उमगायला लागलं होतं.त्याला पूजा म्हणजे आजीची श्रद्धा. फुलं म्हणजे आजीचं देवावरच प्रेम. आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि घरातल प्रसन्न वातावरण.कळत होत. पण समजतं नव्हतं.


आजीनं त्याच्या हातातलं प्लास्टिकचं फूल घेतलं आणि म्हणाली —

“हे फुलं टिकणारं आहे — वर्षानुवर्षं! पण म्हणून ते विशेष आहे का?

कधी कधी सुकणाऱ्या, विस्कटणाऱ्या गोष्टींचं मोल जास्त असतं. कारण त्यांचं अस्तित्व क्षणिक असलं, तरी त्यांचा भाव अमर असतो.


देवाला फुलं नकोत, पण तुझं जिवंत मन हवंय.

तो उठून गेलास, झाडापाशी गेलास, हळुवार एक फूल तोडलंस, ते अलगद पाण्यानं धुतलंस, आणि प्रेमानं देवासमोर ठेवलंस — हे सगळं करताना तू तुझ्या मनात श्रद्धा ठेवलीस, तीच तर खरी पूजा!"


विहानच्या डोळ्यांत चमक आली.


"आजी… म्हणजे मी जर मन लावून काम केलं, कुणाला खरं प्रेम दिलं, कुणाची मदत केली… तर तीही पूजा होते का?"


आजीच्या डोळ्यांत पाणी आलं.

ती म्हणाली —

“हो रे राजा... हेच तर खरं देवपूजन!

देव रोज नवीन फुलं मागत नाही, तो तर रोज तुझ्या मनातलं खरं सौंदर्य पाहतो.

पण जसं आपण आजपर्यंत त्याच्यासाठी जिवंत फुलं वाहत आलोय, तसं हे संस्कारही पुढे वाहत राहावेत हाच खरा हेतू आहे.”


विहान उठला.

शाळेच्या बॅगेसमोर ठेवलेली बास्केट त्याने उचलली. घराच्या गच्चीत गेला. तिथं आजीनं लावलेली एक छोटीशी चाफ्याची झाडं होती.


एक पांढरं चिमुकलं फूल त्याने हातात घेतलं. तोडताना त्याने सुद्धा खालचं पान हलकेच अलगद हळुवारपणे स्पर्शलं —

जणू परवानगी घेत होती...


दहा मिनिटांनी तो परत आला. हातात दोन चाफ्याची फुलं आणि एक छोटा गुलाब.


“आजीनं सांगितलं… म्हणून नाही,

तर देवासाठी, आणि आपल्यासाठी — रोजच्या सजीव नात्यांसाठी…

हे फुलं आहे माझ्याकडून."


त्याने हसून ती फुलं देवासमोर ठेवली.


आजीने त्याला कुशीत घेतलं. त्या क्षणी तिचं गालावर ओघळणारं पाणी — हीसुद्धा एक फुलासारखीच भावना होती...

शब्दांशिवाय वाहणारी... जिवंत, सुगंधी, आणि प्रेमळ.







"फुलं देवासाठी नसतात, ती आपल्यासाठी असतात — आपली श्रद्धा जिवंत ठेवण्यासाठी.आपल्या अंतःकरणातील जिवंत श्रद्धेचं प्रतीक असतात… आणि ही श्रद्धा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवणं — हाच खरा पूजेसारखा संस्कार असतो!"

पिढ्यानपिढ्या वाहणाऱ्या या भावनांचं आणि संस्कारांचं फुलं हे नुसतं निमित्त असतं.

म्हणूनच — फुलं सुकली तरी चालतील, पण मनातली श्रद्धा कधीही कोमेजू देऊ नका."

फुलं आपल्या मनातल्या भक्तीचा गंध दरवळण्यासाठी असतात."

 तृप्ती देव 

 भिलाई छत्तीसगड