कोंदण पर्व एक - भाग 1 Shabdbhramar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोंदण पर्व एक - भाग 1

एक पाऊल दिसायचं स्वप्नात
अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात 
गोरी गुलाबी टाच.. अन
नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं...
पाण्याची लहर यायची पाऊल चढायची,
अन ओसरली कि,
सूर्य उगवल्यासारखी टाच उघडी टाकत
तळव्याखालून वाळू ओढून न्यायची...
कित्येक वर्ष ते स्वप्न मी पाहिलंय..
पण.. कधी? ती सोबत असताना.. 
तिने टाकलं मला तेव्हा.. तेव्हा
माझ्या आयुष्यातून बाहेर पडलं ते पाऊल..
आता स्वप्नात फक्त रेतीवरचा खोल ठसा येतो..
पण तो ठसा जातानाचा दिसतोय..
परतीचा नाही.. 
मी वाट पाहतोय आता.. तो परतीचा ठसा उमटण्याची... 
आणि..
पराकाष्ठा करतोय तो परतीचा ठसा उमटेल, तोवर तिच्यासाठी जीव जगवत जगण्याची..

🍁🍁🍁🍁🍁

मनात ओघळलेली ती अक्षरं एका पानावर शिंपडून मी डोळे मिटले... समोर पुस्तकाला टेकून ती लग्नाची एक पानी निमंत्रण पत्रिका उभी होती.. "सुनेत्रा wed's सचिन"

संपलं सगळंच.. एक युद्धभूमी युद्धाचं कारण संपून रिकामी झाली होती... जेते जिंकून जल्लोष करत होते.. 
अन हरलेले..? 
हरलेले मनात गमावलेल्या भावनांरूपी सैन्याच्या पेटलेल्या चितांचा जाळ सहन करत बसले होते... असं मी म्हणावं का??
हे युद्ध होतं??.. कि प्रेम?
प्रेमाला युद्धाचं नाव का द्यावं..?
प्रेमाला समर्पण म्हणतात खरंतर..
Everything is fair in love and war.. असं म्हणणाऱ्यांना मला सांगावं वाटतं कि, 
असं नसतं.. युद्धात असेल.. 
पण प्रेमात सगळंच क्षम्य नसतं..
समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा सन्मान करायचा असतो.. 
त्याचं मन जाणून स्वतःचं वर्तन ठेवायचं असतं... 
मी हे सगळं केलंय, माझं मन साक्षी आहे..
आणि तरी?? तरीही त्या पत्रिकेत त्याचं नाव? का?

मी सुनीला आधीपासून मनात ठेऊन वागत आलोय.
तीला जपत आलोय... 
तीला सतत पाठिंबा देत आलोय..
जीव लावत आलोय..
पण माझ्यात तीला "तो" का नाही दिसला? 

याची कारणमिमांसा करण्याची ही योग्य वेळ आहे??
पण यात मी एकटा कसा काय माझ्या नापास प्रेमाचं विच्छेदन करणार? 
त्यासाठी मला आणखी कोणाचीतरी मदत लागणारच.
कोणी होईल का सामील या विश्लेषणाच्या प्रवासात माझ्यासोबत? 
मला पहायचय? 

🍁🍁🍁🍁🍁🍁

ए जाडू ssss!! 

ती आलेली हाक मागून होती. मी वळलो. सुनी मागणं धावतं येत होती. माझ्या हनुवटीला पट्टी लावलेली असल्यामुळे मला तोंड पसरवून बोलायला किंवा हसायला येत नव्हतं. त्यामुळं कसनुसं हसत मी थांबलो.

" बरंय का हेल्मेटआता? गं बाई केवढं सुजलं होतं. " तिने धापा टाकत विचारलं. 

" हो. बरंय पण तोंड हलवता येत नाहीये जास्त." तिच्या मला नेहमी अप्रूप वाटणाऱ्या पिंगट डोळ्यात झाकत मी म्हणालो.

" किती रे धडपड्या तू.. सरळ चालता येतं नाही का रे तूला. बरं तर बरं मी होते म्हणून.. नाहीतर कितीवेळ खड्ड्यापाशी बसून राहिला असता ती जखम घेऊन? रक्त वहात होतं तरी शुद्ध नाही. असा रे कसा वागतो?" ती म्हणाली.

बरं तर बरं म्हणण्याची तिची लकब माझा आवडता point.. खूप छान उसासा सोडून म्हणायची ती तसं. जणू सगळ्या जगाचा भार घ्यायची. 

झालं असं होतं कि, पावसाळ्याचे दिवस होते. नुकतीच आमची सातवीची शाळा सुरु झालेली. शाळेत जाताना मी चिखलात घसरलो. पण तोल मागे जायच्या ऐवजी पुढे गेला आणि हनुवटी एका दगडावर आपटली. मला मिनिटभर काही सुधरलंच नाही. पडलो होतो ते एक एका मोठ्या खड्ड्यासमोर. त्यात पाणी होतं नशीब घसरून त्यात नाही पडलो. मी त्यात बराच स्थूल होतो. त्यामुळे चपळतेचा आणि माझा काडीमात्र संबंध नव्हता. पण नेमकी सुनी आली तिने मागून पाहिलं कि मी बसलोय ठाण मांडून चिखलात.
म्हणून लगबगीने समोरून येऊन पाहते तर, पुढून माझा शर्ट.. रक्ता-चिखलाने माखलेला.

" आईशपथ जाडू!! किती लागलंय अरे...!!" काळजीभरल्या स्वरात ती म्हणाली. सुनीने स्वतःच्या डोळ्यात पाऊस भरला.

तिने पटकन प्रसंगावधान राखत माझ्या तोंडाला रुमाल दाबून धरला.  लगबगीने मला तसाच धरून गावातल्या चोरघे डॉक्टरांकडे नेला. पावसात धावत, पळत जाऊन माझ्या आईला घेऊन आली. तोवर मला दोन टाके पडले होते. शिवाय तोंडाला सूजही चढली होती. आधीच गोल गोल तोंड त्यात सुजलेलं. सुनी ते बघून खूपच दुखावल्यासारखी दिसत होती.

"डॉक्टर काका बरं होईलना लवकर हे? " सुनी त्यांना विचारत होती. तिची काळजी बघून आईला पण कसतरी वाटत होतं.

तिथून जाताना मात्र...
"गेटर आलेल्या फुटबॉल सारखं दिसतंय तुझं तोंड." मघाच रडू सोडून सुनी हसू दाबत म्हणाली होती. 

तिचा ऊन पाऊस मला काही नवा नव्हता. हसता हसता रडणं आणि रडणं क्षणात सोडून स्वतःला समजावणं मी तिच्याच कडून शिकलोय. माझी मस्करी करणं, माझी काळजी करणं, माझी मदत करणं, माझ्यासोबत हसणं, रडणं, अनुभवणं. सगळं सुनीने आधीपासून केलंय. आम्ही एकमेकांच्या सवयीचे होतो.

माझी शाळा बुडाली... आणि सुनी..?
भिजत भिजत उशिरा शाळेत गेली. तिने सांगितल्या कारणावरून आमच्या माने ताईंनी तिचं कौतुक केलं.

🍁🍁🍁🍁

सुनी आहेच गुणाची.. नेमक्या वेळी काय करायचं तिच्या इतकं भारी मला नाय सुचत.. पण तिच्याकडून मला शिकता भरपूर येतं.

असं नेहमीचं व्हायचं मला संकटात बघितलं की सुनी धावायची. तीला संकटात पाहून मला तसं धावण्याचे प्रसंग तोपर्यंत नव्हते आले जोपर्यंत ती संकटात आली नव्हती. ती संकटात येईलच का पण? तिच्या अवती भवती घुटमळत असणाऱ्या त्रासदायक गोष्टींना पहिल्यापासून मी माझी भीती घालून ठेवली होती. माझं तिच्याकडेही लक्ष होतं आणि त्याच्याकडेही. पण तरीही..

जी अनुरागाची वैयक्तिक भावना तीला पहिल्यांदाच स्फूरली होती. त्या भावनेच्या ओघाचं वळण माझ्या दिशेला आलं नाही. ते गेलं त्याच्याकडे. माझ्याकडे न्याय्य गोष्टी करण्याची मनःशक्ती आहे. म्हणून मी स्वतःला कधीच सुनीवर लादलं नाही. ती मुक्त आणि सुखी तर मीही मुक्त आणि सुखी असणार. तिच्या आनंदात सर्वस्वी माझा आनंद. 
पण कुठवर?? 

ती माझी नसताना हे घट्ट बंधन माझ्याच बाजूने सांभाळणं माझ्यासाठी किती अवघड काम आहे. निरपेक्ष प्रेम असावं मान्य? पण ती हवी आहे असं मन म्हणताना निरपेक्षता बाळगणे म्हणजे विस्तवावरची वाटचाल आहे कळतं.

ती आता आधीसारखी माझ्याकडे येणार नाही, हे सतत जाणवतंय. 
ही काळीज चिरकी यातना का होतीये मला? 
ती तर खुश आहे ना?
मग माझं का दुखतंय?
माझ्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आणि...
जे मी तिच्यात भिनवायला हवं होतं ते त्याने भिनवलं.
जे मी तीला दाखवायला हवं होतं ते त्याने दाखवलं.
जे मी तीला सांगायला हवं होतं ते त्याने सांगितलं.
जे माझं तिने जाणून घ्यायला हवं होतं ते तिनं त्याचंच जाणलं.
म्हणून मला त्रास होतोय का??

मग माझ्यासारखा पाखंडी व्यक्ती मीच ठरेन. 
सावरायला हवंय.. मला स्वतःला.. आता जे होईल ते सहन करत. आता असं वाटतंय कि,
अगदी पहिल्यापासून सुनी सुनी करायची सवय हृदयाच्या प्रत्येक स्पंदणाला लावली नसती तर कदाचित..कदाचित ते इतकं दुखलं नसतं... 

तिच्या डोळ्यातल्या माझ्यासाठीच्या अश्रूना मी मैत्रीतली कणवच समजायला हवं होतं. माझ्यासोबत हसतांना रडताना अनुभवताना मी इतर गोष्टींचा संबंध त्याच्याशी जोडायला नव्हता हवा.जीव जनावराला पण लावला जातो. जीव त्याच्यावर उधळला जात नाही हेच मी समजून घ्यायला हवं होतं. सुनी मी पहिल्याच वेळी स्वतःला थोपवायला हवं होतं.

ते नसते प्रसंग घडतं गेले आणि मी सुनीच्या प्रेमात बुडतं गेलो. पश्चाताप करू कि सुनिसाठी आनंद वाटून घेऊ कळत नाहीये. तीने माझ्या इतर शारीरिक आणि मानसिक जखमाची काळजी नेहमी घेतलीये. पण हा तिनेच दिलेला घाव मी कोणाच्या जीवावर बरा करू मला कळत नाहीये.

🍁🍁🍁🍁

त्यादिवशी शरीरातलं रक्तच नाही,
तर हृदय ही उचंबळून वाहत राहिलं.
जणू तुझ्या काळजी भरल्या काळजाला 
माझ्या काळजाने पहिलं अर्घ्य वाहिलं.🍁🍁

- क्रमशः 

- शब्दभ्रमर 🍁🍁