कोंदण पर्व एक - भाग 3 Shabdbhramar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोंदण पर्व एक - भाग 3

राम: रामौ रामा: प्रथमा
रामन रामौ रामान द्वितीया...

अशा तर्हेने आमचं संस्कृत अध्ययन सुरु झालं. ती सुभाषिते पाठ करने, रूपं चालवणे. आत्मनेपद, परस्मैपद, उभयपद यातली अंतरे. त्या सुंदर भाषेच व्याकरण बारिकशा क्लिष्ट अशा नक्षीत घडवलेल्या दागिण्यासारखेच क्लिष्ट होते. ते पुस्तक नुसतंच वाचणं म्हणजे सुद्धा जिभेला कवायत होती. तिथं पाठांतर वैगरे डोक्याला ताप होत होता. आणि संस्कृतला पाठांतरशिवाय पर्याय नाही हे माहित होतं. हौसेच रूपांतर जराशा त्रासात झालेलं मी पहिल्यांदा अनुभवत होतो. मला त्याची भीतीच वाटू लागली पहिल्यांदा.
मग नेहमीप्रमाणे मी सुनीशी या विषयावर बोललो.

" सुने संस्कृत घेतलं तर खरं. पण एवढी सोपी, खायची गोष्ट वाटत नाहीये ग. कायच्या काय नियम आहेत त्यां भाषेला. जरा अवघड वाटतंय. आणखी मार्गदर्शन लागणारे बाबा मलातरी. " मी म्हणालो तीला.

" बरं तर बरं मला नेमकं याचं साठी विचारलंस जाडू.
मी पण म्हणणार होते तूला याबद्दल... आपण संस्कृतचा क्लास लावूयात. सायन्स maths ठीक असतं रे. पण ह्या अशा अवघड भाषेचं व्याकरण शिकायला शाळेच्या एका तासात शक्य नाही वाटत मला पण. मी शोधते क्लास थांब." ती म्हणाली.

म्हणजे कमी मार्क पडण्याच्या भीतीचा बागुलबुवा तिला पण सतावत होता. आत्तापर्यन्त आम्ही कधीही ट्युशन लावली नव्हती. पण आता गरज होती. किमान या विषयासाठी तरी.

मग तीने आधीच्या वर्गातल्या मुलांशी चौकशी करुन ट्युशन शोधली. घरापासून साधारण किलोमीटरभर अंतरावर तो क्लास होता. दुपारी शाळेतून आलं की थोडंसं काही खाऊन अभ्यास करुन साडेपाच वाजता क्लास. हे गणित जुळलं. ज्ञानदीप क्लासेस मध्यें आम्ही दोघांनी संस्कृतची ट्युशन लावली. सुनी माझ्या आईला याबद्दल बोलली असल्यामुळे परवानगी न मिळण्याचा वैगरे प्रश्नच नव्हता. शाळेतून आल्यावर एकेमकांसोबत अभ्यास करायचो आणि संध्याकाळी ट्युशनमध्ये डबल रिविजन व्हायची यामुळे आम्हाला जरा आत्मविश्वास वाढल्यासारखे वाटू लागले. त्या वर्गात आमच्या आणि अ तुकडीतल्या वर्गातली मुलं पण होती.

वर्गात हल्ली संस्कृतच्या तासाला सुनी उत्तरे पण देऊ लागली होती. हुशार असल्यामुळे ती ते करणारच हे स्वाभाविक होते. माझंही संस्कृतच डोमेस्टिक फ्लाईट आता डोक्यावरून जात नव्हतं. मला पण गती येऊ लागली होती. पण मी तरीही हात वर करुन उत्तर द्यायची छाती अजूनतरी मला आली नव्हती.

एकदा एका क्रियापदाचे रूप चालवताना सुनीने दिलेल्या उत्तराला सरांनी चूक आहे असे सांगितले. 

"कोण बरोबर उत्तर देऊ शकते?" असं त्यांनी विचारताच एक हात वर आला. सचिनने बरोबर उत्तर देत सुनीला शह दिला होता. तेव्हा तो तिच्या नजरेत आलेला मी बघितला. सुनी पल्लवीशी हलकेच काही कुजबुजलेले पण मी पाहिले. मला बरोबर उत्तर येत होते. पण माझा स्वतःलाच दडपण्याचा स्वभाव आडवा आला. मी बरोबर उत्तर दिल्याचं समाधान सुनीच्या चेहऱ्यावर मला पाहायला मिळालं असतं. पण ती संधी मी गमावली. सुनीने मात्र एक दोन वेळा त्याच्याकडे कटाक्ष टाकलेला मी नोंदवला.

समर नावाचा ब तुकडीत दुसरा तिसरा नंबर काढणारा आणि खेळातही चांगला असलेला एक सचिन सारखाच मुलगा. त्याने सचिनला दिलेलं नेमकं त्याचं वेळचं स्मित अजूनही माझ्या लक्षात आहे. मला अस्वस्थ व्हायचं कारण नव्हतं पण मी झालो. ते कशामुळे त्याचा माग मला त्यावेळी सापडत नव्हता. कशाची तरी पायरी बांधल्या गेल्याची जाणीव मात्र मन सांगत होतं. काहीतरी शिजत होतं. काही ठरवलं जात होतं. गोंधळाचा थर माझ्याही मनावर साचू लागला होता. सचिन काही गोष्टी हेतूपूरस्कर करतो हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं.

एकदा मी ट्युशनवरून येताना सुनीने विषय काढला.
" जाडू तूला तो सचिन माहिते का? सचिन गाडे. "

मी जरा दचकलोच. छोटा खड्डाच पडला पोटात. सुनी त्याच्याबद्दल बोलत होती.
" हो. माहिते कि वर्गातला ह मधून माझ्यासोबतचं आलाय कि ब मध्यें. का ग?" मी म्हणालो.

"अरे काही नाही. आपल्या आणि अ तुकडीतल्या बऱ्याच जणांनी ट्युशन लावलीये आता संस्कृतची पण बघ कि आपण एवढं ट्युशन वैगरे लावून अभ्यास करतोय, आणि तो सचिन बिना ट्युशनचा असून त्याला कितीतरी विषयातलं समजतंय. तो अभ्यास करतोय ते फक्त शाळेतल्या तासावर. मला पल्ली म्हणाली कि त्याच्या घरी त्याला डबे वैगरे पोहोचवायचं कामं असतं. त्याची मामी डबे करते म्हणे. मामा पेंटिंग आणि सुतार कामं करतात. आई गावी असते शेती करते. वडील नाहीयेत त्याला. याला इथे शिकायला मामाकडे ठेवलंय. म्हणजे त्याची परिस्थिती एवढी काही ठीक नाहीये. पण अभ्यासात आणि खेळातपण चांगला आहे. त्याचं विशेष वाटलं मला. परिस्थितीची जाणीव असणारा गुणी मुलगा वाटतोय मला तो." ती म्हणाली.

" होका?! मला इतकं काही नव्हतं माहित त्याच्याबद्दल. एका वर्गात होतो आम्ही, पण मी कधी ओळख करुन नाही घेतली त्याच्याशी. तो इतकी मेहनत घेत आहे हे चांगलं आहे त्याच्यासाठी. आधी एवढा काही पुढे नव्हता तो. पण मागल्या वर्षीपासून सुधारणा आहे. माझ्या नंतर नंबर आणला त्याने." मी मला माहित असलेलं बोललो.

" मेहनत घेणाऱ्यांबद्दल नेहमी आदर ठेवावा असं बाबा म्हणतात. आणि अशी मेहनत करणारा तर नक्कीच पुढे जातो. मला असे बिकट आयुष्यात लढा देणारे लोकं भारी वाटतात. एकदम fighter type. "ती म्हणाली.

" खरं आहे काकांच! पण मेहनत तर तू पण घेतेस. नेहमी पहिली असतेस वर्गात. कौतुक तर मला तुझंपण वाटतंच की. तू पण आहेस की fighter type." मी तीला म्हणालो.

"मी?? जाडू कसंय नां आपल्याला आई बाबा आणि त्यानी दिलेली परिस्थिती आपल्याला बरंच काही सोपं करुन देते. तसं त्याचं नाहीये. अवघड परिस्थितीवर मात करत पुढं चाललाय तो." तीं म्हणाली.

आता माझ्या सूचक मनाचे दोन भाग पडले आणि मला त्रास देऊ लागले. सुनीला त्याच्याबद्दल कल्पना असणं याने मला का फरक पडावा. तो आमच्याच वर्गातला आहे. असू देत कि माहित असलं तर त्याच्याबद्दल असं एक मन म्हणत होतं. आणि दुसरीकडे वाटत होतं कि सचिनची तिच्यावर छाप पडून तिच्याशी त्याची मैत्री किंवा जवळीक वाढली तर..? त्या "तर" चा पण मला त्रास का वाटावा? माझंच काही चुकत असल्याच मला वाटलं त्यावेळी. 

सुनी कितीही स्वतः डॅशिंग असली तरी संवेदनशील होती हे तिच्या इतरांना मदत करण्याच्या सवयीवरून मला चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे वाटला असेल तीला कळवळा. असं वाटलं मला नंतर. सुनीच्या कोणी जवळ येणं म्हणजे माझ्यापासून सुनी दुरावणं असं थोडीच आहे. हे स्वतःला समजावत मी मनाला शांत केलं.

ते कितपत योग्य होतं हे त्यावेळी कोणीच सांगू शकणार नव्हतं. सुनी काहीका असेना सचिनकडून जरा इम्प्रेस झालीच होती. कदाचित तो तिच्याशी ओळख करुन घ्यायला आलाच तर त्याला तिच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे चान्सेस जास्त होतें. सुनीच्या बाबतीत मला इतरांची इतकी काळजी नव्हती वाटतं जितकी सचिनकडून वाटत होती. न जाणो का काहीतरी ठीक वाटत नव्हतं.

आमच्या मैत्रीच्या शांत तळ्यात डुबुक करुन हा खडा पडला. त्याने आणलेला तरंग आता विस्तारत जात संपतो की लाटा आणतो हे येणारा काळ सांगणार होता. सचिनकडून त्याचा हेतू स्पष्ट होईपर्यंत वाट बघावी लागणार होती. मला हेही माहित होतं की सचिनने तिच्या डोक्यात व्यापलेली जागा लगेच काही मोठं स्वरूप धारण करणारं नव्हती.

🍁🍁🍁🍁

तुझं माझ्यासोबत असणं
मला बस आहे.
तुझ्या लेखी माझी दखल 
मला बस आहे.

आपण उद्याचं उद्यावर सोडूयात.
सध्या तुझ्या विचारात
मी आहे एवढंच..
मला बस आहे."

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁