बायजेची आशा Shabdbhramar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बायजेची आशा

"बायजा तू लय भाबडी आशा ठिवती बघ. तुझा धाकला तुला खायाला कोर चतकोर भाकर देतो ते बघ कि.. तुला पडत्यात बंगल्याची सप्नं... आगं तुझ्या थोरल्यानी तुझं नाव टाकून जमाना झाला. कशाला तुला बोलावतील बंगल्यात ऱ्हायला." तिच्या गावातली तिच्या वयाची अनसुया बायजाच्या दारात बसून रडणाऱ्या बायजाला सांगत होती.

तिच्या थोरल्या मुलाचा मुलगा तिचा नातू अभिजित मोठा ऑफिसर झाला होता. शहरात मोठा बंगला बांधला होता त्याने. असं कळलं होतं तिला. लहानपणी गावाकडेच जन्मलेल्या आणि दहा वर्ष आजीसोबत राहिलेल्या आपल्या आजीलातो म्हणायचा,
"आज्जे!! मी नां मोठा ऑफिसर व्हणार आणि शहरात बंगला बांधणार." 

वीस वर्षानी त्याने त्याचे शब्द खरे केले होते. वीस वर्षापूर्वी बायजाचा नवरा वारल्यावर तिच्या थोरल्या मुलाने घरात भांडून वाटण्या करुन घेत स्वतःचे शेत विकून टाकले. स्वतःचा भाग विकून तो जो शहरात निघून गेला तो परत गावी आलाच नाही. त्यामुळे तिनेही तिच्या त्या नातवाला बघितले नव्हते. तिला कधीच तिच्या थोरल्या मुलाने परत विचारले नाही. त्यामुळे तिचा पहिला नातू आता दिसतो कसा हेही तिला माहित नव्हते.

धाकट्याने पण स्वतःच्या आणि बायकोच्या नावावर कागद करुन घेत तिथला बायजाचा अधिकार संपवला होता. धाकट्याची मुले त्यांच्या आईने सतत भरवल्यामुळे म्हातारीला अडचण मानत होती. त्यांच्या लेखी ती आहे नाही काही फरक नव्हता. आलेल्या अधिकारामुळे धाकटी सुन सतत म्हातारीचा तिच्या नातवांसमोर पानउतारा करत. बायजाला तो कोंडमारा अगदी असह्य होऊन गेला होता. तिला तिथं कोणाबद्दलच आस्था उरली नव्हती. मानाने त्या घरात लग्न करुन आलेली बायजा स्वतःच्याच घरात अपमानाने पिडली गेली होती. तिचं स्वतःच असं आता काहीही उरलं नव्हतं तिथं.

पण तिला एकच आशा उरली होती. थोरल्या पोराचा मुलगा. तिचा पहिला नातू. तो लहानपणी तिच्याजवळ राहिल्यामुळे त्याला तिचा आणि तिचा त्याला विशेष लळा होता. त्या भरवशावर तिला आशा वाटत होती कि तो नातू आपल्यासाठी कधीतरी इकडे येईल. विचारपूस करेल कदाचित.. कदाचित.. आपल्याला घेऊन ही जाईल. अशी भाबडी स्वप्ने उराशी बाळगून ती त्याची मधेच आठवण काढत.

आणि अचानक दोन दिवसापूर्वी धाकट्याला थोरल्याचा फोन आला. स्वतःच्या श्रीमंतीचा बडेजावं मिरवत त्याने आपल्या मुलाने शहरात मोठा बंगला बांधल्याचे आणि तो सरकारात मोठा ऑफिसर झाल्याचे धाकट्याला ऐकवले. अभिने बांधलेल्या बंगल्याची वास्तुशान्त असल्याचे कळवत त्याला यायचे आमंत्रण सुद्धा दिले. पण यात त्याने त्याच्या आईला आणण्याबद्दल काहीही सांगितले नव्हते. घरात चर्चा होतं असताना बायजाने ते ऐकले आणि एक शेवटचा आशावादी प्रयत्न म्हणून तिने धाकट्याला लाज सोडून विचारले, " मी यु का रं संग? "

तशी सगळी तिच्याकडे पाहू लागली. 
"लई दिस झालं आभिला नाय पाहिला. एकदा भेटली असती." एवढंच तिने विचारलं.

" त्यो तुला आणण्याबद्दल मला काय म्हणला नाय.त्याला आदल्या दिवशी फोन करुन इचारतो तुला आणायचं का? उगं आगावपणा मी नाय करायचा. त्यो हा म्हणला तर बघू. " एवढंच तो म्हणाला.

त्यावरून सुद्धा तिच्या सुनेने. ताशेरे ओढलेच.
" खरंतर तिकडचं निवून ठुलं पाहिजे हिला. आपल्या मढ्यावर ब्याद बसवलीये... मोठा बंगला हायतर हिला एखादी खुली द्या नायतर सयपाक घरात झोपवा म्हणावं. कशाला मरुस्तवर आपल्याला करायला लावलंय थेरडीच. " असं अद्वा तद्वा बोलत म्हातारीला ऐकू जाईल या भाषेत तिने नवऱ्याला सुनावले." 
आधारहीन बायजाला मेल्याहून मेल्यागत झालं होतं. पण आशेचा एक किरण अजूनही दिसत होता. अभिजित तिचा नातू.

जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी बायजाने मनाचा हिय्या करत मुलाला विचारले.
"उचलला नाय त्यानं फोन. दोनदा केलेला. बघू त्याचा आला तर इचरतो." असं खोटं कारण देत त्याने तिला टाळले.

तिच्या काळजात चर्रर्र झालं. शेवटची आशाही मावळली. आपला जीव आता कुणाच्याही उपयोगाचा नाही. अगदी स्वतःलाही त्रासच देत आहे असंच तिच्या मनात पक्क झालं. म्हातारी मलूल होऊन गेली. 

दुसऱ्या दिवशी सगळे आवरून निघाले. हिला एकटीला घरात ठेऊन. बायजाबद्दल नां कोणाला कणव होती नां फिकीर. ती काय जेवेल कशी राहिलं. दोन दिवस तिची काय सोय. काहीही न सांगता ती गेली. बायजाच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. पदर डोळ्याला लावत ती दारात उभी असतानाच अनुसया आली आणि तिच्याशी बोलताना बायजाने इतिवृत्तांत ऐकवला. अनुसया तिला काही वेळ समजावत बसली आणि संध्याकाळी परत येते म्हणून निघून गेली.

घरच्यांनी, स्वकीयांनी आणि शेवटी अपेक्षा धरून बसलेल्या दैवानेही नाकारलेल्या बायजाने शेवटी आता फक्त मरणाकडून अपेक्षा धरली होती. कि ते तरी लवकर यावं. पण असं कसं ते तरी येईल...कि आपणच त्याला जवळ करावं. या विचारात असताना तिच्या मनात आलं संपवून टाकू हे लाजिरवानं जीनं. नको आपला भार कोणाला. घरामागे असलेल्या मळ्यातली विहीर तिला आठवली. पाणी कमी होतं. पण तिच्यासाठी पुरे होतं. पोहऱ्याच्या जागेतून सहज उडी घेता येणार होती. थोडयावेळ गटांगळ्या मग सगळ्या दुःखाचा अंत होणार होता.

ती घरामागे गेली. शंभर पावलांवरचा प्रवास तिच्या दुःखाचे निर्दालन करणार होता. विहिरी पर्यंत रडत पोहोचलेल्या बायजाला आतले पाणी दिसत होते. समोर असलेल्या शेतावरच्या कुलदेवतेच्या छोट्या देवळीला तिने लांबून हात जोडले आणि ती पुढे जाणार होती तितक्यात.

"आज्जे!!" असा भारदस्त आवाज तिला ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले तर एक उंचपुरा गोरा देखणा युवक तिच्याकडे बघत चालत येत होता.
ती थांबली.

तिला समजत नव्हतं कोण आहे ते.

"वळखलं नाय आज्जे?" जवळ येऊन हसत बोलणाऱ्या त्या युवकाचे स्मित आणि त्याचे डोळे तिने पाहिले. ते तिच्या ओळखीचे होते. वीस वर्षांपूर्वीची ओळख अजून तिच्या मनात तशीच होती. तिने त्याला ओळखले.

"आभि?!!" ती रडत ओरडली. अभिने आजीला प्रेमळ अलिंगन दिले होते.

****

" माझी येळ आलेली नव्हती, माझा नातू यनार व्हता अनुसये.." अभिच्या चकचकित मोठ्या पांढऱ्या कारमध्ये बसून बाहेर उभ्या असणाऱ्या अनुसयेच्या हाताला धरून बायजा सांगत होती.

बायजा आता अभिकडे शहरात राहणार होती. तिचा आशावाद खोटा नव्हता हे अनुसयेला पटलं होतं.

-शब्दभ्रमर 🍁🍁