किनारा Shabdbhramar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किनारा

"ह्याचं असं भरतं बघून मग मला ही भरतं येतं.. असं वाटतं ना कि तो बाहू पसरून आपल्याकडे धावत येतोय.. मग मी नुसतीच माडासारखी उभी नाही राहू शकत.. सुटते धावत... हा.! आता शरीराने कमी खरंच...पण मनाने जास्त ओढली जाते." हे सांगताना तिच्या डोळ्यात अथांग रत्नाकर पसरला होता.

"तुझं हे वेड मला नवीन नाही.. हज्जारदा यावर आपलं बोलणं झालंय. पण मी विचारायचा राहत नाही अन तू सांगायची." तो तिची समुद्राकडे लावलेली नजर निरखीत म्हणाला.

" तसं तर माझं कोणतंच वेड तुझ्यापासून लपलेलं नाही. जे होतं ते तुला सांगून अक्षरशः मोकळी झालीये मी. खूप हलकं हलकं वाटतं मला. जे स्वतःशी बोलले असेल त्याच्याच जवळपास मी तुझ्याशी बोललीये."  ती मोकळा श्वास भरत म्हणाली.

" आपल्याला भेटायला उशीर झाला असं नाही वाटत, नाही??"त्याने विचारले.

"अरे..!! त्याचं कारण हेच कि इतकी वर्ष आपण ऑनलाईन कॉन्टॅक्ट मध्ये होतो पण आपलं आयुष्य आपल्या दोघांनाही अदृश्य नव्हतं. एकमेकांच्या शब्दातून आपण ते अक्षरशः जगलोय. तू माझी दैनंदिनी झालेला आणि मी तुझी." ती हसत म्हणाली.

" तू मनात काहीतरी आदरार्थी मानमरातब घेऊन माझ्याशी बोलायला आलीस तो पहिला दिवस.. आणि त्यानंतर आपण जे फुटलो एकमेकांसमोर त्याचा ओघ आता वयं सरत आली तरी अटत नाहीये. " तो जुन्या आठवणीत रमत म्हणाला.

" मला तेव्हा एकदाच बोलायचं होतं.. कुतूहल म्हणून.. पण कसं कोन जाणे.. आपलं नातं घट्ट होत गेलं. तू माझ्या आणि मी तुझ्या पॅटर्न शी एकरूप झाल्यामुळे बहुतेक!! " ती म्हणाली.

"आज आपण पहिल्यांदा भेटलो.. पण फक्त मुर्तपणी एकमेकांसमोर असण्याचा काय तो आनंद आपल्याला वाटला. बाकी सारं.. सहज.. सवयीचं. हा क्षण कित्येक वेळा गप्पामधूनच जगलो आपण. खरं कधी होईल असं वाटण्याची शक्यता विरळच होती.. नाही?" त्याने विचारले.

" कारण आपली आयुष्य खूप समांतर होती. आपण स्वतःच्याच नाही तर एकमेकांच्या संसारांची पण पाश बंधने स्वीकारून बसलो होतो. एकमेकांच्या हित अहित काळज्या सर्व काही जपलं रे आपण आपल्या मैत्रीत. म्हणून हा क्षण लांबला. पण तू तुझ्या नेहमीसारख्या जड शब्दात मूर्त वैगरे म्हणालास त्याचा आनंद तुझ्यापेक्षा मलाच जास्त आहे. माझं माकड खरंच बघायचं होतं मला." ती मिश्किलपणे म्हणाली.

तिरक पाहत तोही हसत होता.

"एक थोडं गंभीरपणाने सांगू?...आपल्या भेटीच्या आधी पर्यंत नं मला वाटत होतं कि तुझं आणि माझं नातं चंद्र पृथ्वी सारखं राहिल कदाचित.. दुरून.. एका स्थिर अंतरावरून.. मी माझी कक्षा सोडायचा नाही आणि तू तुझी. पण जीवन फार अचंबित करणारं आहे गं.. आपल्याला चक्क भेटण्याची संधी मिळाली."तो थोडा भावुक होऊन म्हणाला.

"खरंय! आता गळ्यात आधीसारखी जबाबदारीची लोढणी नाहीयेत .. कोणाकडूनच अडवणूक नाही. तुझ्याबद्दल एकदाच बोलले माझ्या मुलींशी .. तर अजून का भेटली नाहीस म्हणून माझ्यावरच ओरडली सगळी.. त्यात जावई सुद्धा सामील.. आणि तुही आलास.. आढेवेढे न घेता .. इतक सहज झालं हे." ती म्हणाली.

" माझं आता एकाकी जगणं वाढलंय.. माझ्या ह्या सवयीमूळ खरतर मी कोणाच्या समीकरणात बसणंच बंद झालोय आता. संवाद एकतर स्वतःशी किंवा तुझ्याशी. माझ्या हिचं आधीसारखंच आजही सामाजिक आयुष्य वृंदावत चाललंय त्यात आपला सहभाग..न के बराबर!" मनाचा बंदिवास शरीराला काबीज करत चालला होता. म्हणलं ह्या सगळ्याचा निरोप घ्यायची वेळ येण्याआधी तुला भेटणं खूप महत्वाचं आहे. माझ्यासाठी सहज नव्हतं पण मी आलो. " तो म्हणाला.

"माझ्यासाठी हा पूर्णत्वाचा क्षण.. तू आलास! बस.. आता ही शेवटची इच्छा होती तीही पूर्ण झाली. उरलेला वेळ असा म्हणून निघून जाईल बघ..." ती छानसे हसत म्हणाली.

" अगं तुझी नातवंडे आहेत कि तुझा वेळ खायला... आणि तुझे व्याही मी म्हणालो तसेच मिळाले आहेत ना...मागे पुढे करणारे !!"

गप्प बस माकडा... काहीही बोलतो तू..

तरतर... लाजलीयेस बघ कसली...

मी लाजतीये.. बोलायला घाबरतात ते दोघे माझ्याशी...

भाव खाणं.. तसंच आहे तुझं.. माणुसघाणी कुठली..

तशी तर तशी.. आपलं असचं आहे..

ऐक ना.. ह्या भेटीचं लिहू ना कुठेतरी...

तूच लिही तू बरा लिहितोस..

तू प्रयत्न कर कि कधीतरी..

नको तू असताना मी नाही.. मला तुला वाचायला आवडतं..

पण आपली भेट लिहणं योग्य वाटेल न तुला.

तूला ते वाक्य आठवतंय का व. पु. चं

हॊ.. आठवतंय ना.. माझ्यासोबत म्हण तुही...

"As you write more and more personal it becomes more and more universal"

- शब्दभ्रमर 🍁🍁