अभूनव नाय नाय.. अनुभव.. म्हंजी आपण जे काय बगितलं आन ते बघितलेलं लक्षात ठेवलं तर तेला म्हन्तेत अभूनव.. नाय नाय अनुभव.... आजी म्हणती का तिनी लय काय काय बगितलं.. तीला लय अभूनव.. नाय नाय अनुभव हाय.. आमच्या घरात तिचं सगळ्यात मोठी हाय..😇
मी पिकू.. म्हंजी आधी व्हतो..
"आताचा..?!🤔🤐 असू द्या नावात काही नाहीये.. 😁
.. लहान असताना सगळे पिकू म्हणायचे. तेव्हाचा एक अनुभव सांगावा वाटला म्हणून पिकूला ती जबाबदारी दिलीये."
"तं माझा काका.. संतू काका..मला लय आवडाचा..कारण त्यो सायकलवर कुठून बी आणि कितीबी लांबून एका तासाच्या आत यायचा. पण त्योच संतू काका मला सोबत सायकल वर घेतलं कि बऱ्याचदा कुठबी पडायचा.
पडल्यावर स्वतःला अन मला झटकताना संतू काका म्हणायचा,"सायकलवरून तर पडलोय.. कुठं निवडणुकीत पडलोय सगळ्याला कळायला. कोणाला नको कळायला काय यातलं..आपली आपली गम्मत.. काय पिक्या? " मी आपला मान डोलवायचो.🙄
तर मी सात आठ वर्षांचा असतानाची गोष्ट.. संतू काका तवा एका फ्याक्ट्रीत कामाला व्हता. त्याचे मैतर आणि त्यो वांग वांग करीत सायकल मारीत, दर रैवारचे कुठंतरी सायकलवर ट्रीपा काढायचे. नायतर रानात जेवणाची पार्टी कराय जायचे. एकदा मला नुकत्याच कांजिन्या युन गेलेल्या. पाच सहा दिवस घरात बसून मी नुसता रडवेला झालेलो. रैवारी सकाळी संतू काकानी घरात घोषणा दिली कि आज रानात मटण पार्टी करणारेत त्यो अन त्याचे मैतर.. झालं.. संतू काकाचा एक पाय सकाळपासणं माझ्या तावडीत.🫤
" आर वाऱ्यावर नको येऊ.. 🤦♂️
कांजिन्या झालेल्या पोरामाग रानातली भुतं लागत्यात.. 👹
मटणाच्या वासानी कोल्हे लांडगे यतात जवळ. मंग तूला पळता यईल का जोरात.. 🫣
रानात नाय चाललो फ्याक्ट्रित कामाला चाललोय..😥
रद्द झाली पार्टी..😰"
असले एकामागून एक बहाणे काका देत व्हता.😥
पण मी काय पाय सोडेना. मंग काय माझी आजी वरडली त्याला. 😠
"आधी नादावतो आणि मंग टाळायचं बघतो का संत्या..ने पोराला संगं.. फक्त मटण नको खाऊ पिक्या."🫤
मी पुढं नळीवर बसून रानवाऱ्यात हसत व्हतो. आन संतू काका कुंथत सायकल मारीत व्हता. 😁
****
काकाचे मैतर मला बघून जरा बुचकळ्यात पडल्यागत झाले.
संतू काकाला मागणं बखोट धरून एकदोन जणांनी पाठीत गुद्दे पण हाणलेले मी बघितले.😬 पण त्याचे मैतर माझ्याशी लय हसून खेळून व्हते..🥰 मला मजा यत व्हती. त्यांनी मटणाच्या सयपाकाला सुरुवात केली. चूल पेटवायला मी बी काटक्या आणल्या.. 😁
माझ्यासाठी ब्रेड, काकडी, टोमॅटो, चटणीच प्याटीस बनवलं. बारीक शेव.. खारी बुंदी आणि फरसाण बी मिळालं. पण मटण असताना ते आणि कशाला आणलं मला कळना. 🤔 सयपाक झाला. सगळी पंगत बसली. सयपाक करता करता मधनच रवी काका गायब झालेला मी पाहायलेला. नंतर म्हयेश काका.. कवातर संतू काका.. गणा काका..आन राजू काका बी 😬
सगळी आलटून पालटून गायब हुत हुती आणि जरा वेळानी यत हुती. काही यळाने सगळी लईच हसायला लागलीत असं मला कळत हुतं. मी प्याटीस खात बघत होतो. का हसत्यात ते कळत नव्हतं.
गणाकाका तर लईच हासत व्हता. सगळी जेवाय बसली. त्यांचे कायतर गमतीदार बोलणं चालल्यालं.. मला कळत नव्हतं. माझं गोंधळलेलं तोंडं बघून त्यांना आजून हसायला यत व्हतं.
मी जरा चिडलोच.🤨" मायला..!! "
यड्यागत आणि बोबड्यागत पण बरळत होती सगळी. कसला तरी अंबलेला वास बी सुटला व्हता.
गणा काका रश्यातन शोधून काढलेली नळी वढायला लागला तोंडानी. तेवढ्यात रवी काका कायतर बोलला आणि गणा काका नळी वढता वढता फुसफूसत हसायला लागला तशी त्याच्या हातातली नळी गायब. 😱
मला कळलंच नाय कुठं गेली. पण गणाकाकाच्या तोंडाकडं बघतूय तर त्याचे डोळे मोठे झालेले.😵💫😳
त्यो वर बघत व्हता.. मग त्याने गळा धरला सोताचा आणि धापा टाकायला लागला. सोबत पाय बी घासू लागला. त्याच्या पितळीत धूळ उडाली पार.
मंग संतू काका वरडला."नळी गेली रे गण्याच्या नरड्यात!!"
तवर रविकाका गणाकाकाच फजिती झाल्याल तोंड बघून लय मोठ्यांनी आ वासून हसायला लागला. 🤣🤣
त्याला सोताच हासू आवरणा.. संतू काका आन राजू काका धावलं. 😨 त्यांनी गणाकाकाच्या माने पाठीवर गुद्दे हाणले. तशी नरड्यात अडकलेली ती मटणाची पिपाणी गणाकाकाच्या समोर पडली आन त्याचा जीव सुटला. त्याच्या डोळ्यातन पाणी यत हुतं. ती नळी बघून मलां कसतरी व्हत व्हतं. 🤢
रवी काका काय हसायचा थांबेना. गणा काका त्याच्यावर लय चिडला व्हता. त्यानी त्याला बडबड केली. तर रवी काकाला हसायला अजून चिव आला. त्ये आणि जोरात हसायला लागलं. लांब चालत गेलं. सगळी स्थिर झाली. रविकाकाचा हसायचा आवाज ऐकू यत नव्हता. ते परत यायला लागलं. पण जरा इचित्र कायतरी वाटत हुतं. त्याचा हसायचा आवाज येत नव्हता पण चालताना त्याचं तोंडं वर आकाशकडं व्हतं आणि जबडा अख्खा उघडा व्हता. पण त्यो हसत तर नव्हता. मोठाला आ करुन चालत यत व्हता. 😥
" ह्येला काय झालं र." संतू काका गणा काकाला म्हणला.
" व्हय कि असं का तोंडं वाशीत चालतंय? " गणा काका म्हणला.
सगळी त्याच्या जवळ गेली तवा कळलं हसता हसता रवी काकाचा जबडा अडकला. दाभाड खुलं पडलेलं. 😮 रविकाका लय प्रेत्न करीत हुता पण ते खाली यत नव्हतं. हातानी दाबून बघितलं संतुकाका नी तर तो आ sss करुन वरडला. कोणाला काय करता यईना.. मंग ह्या नव्या परिस्थिती मधी सगळीजन
मजा घ्यायला लागली. गणा काका तर लयच. 😁
" तहायचं मला हसत व्हतं. बस आता सगळ्या जगाला हशीत. तोंडात कायबी पडल तवा कळल." जोरात हसत त्यो म्हणला.त्याच्या नरड्याला आता सूर सापडलेला.
" अय गप बसा च्यायला!! हे असं घरी गेलं तर आपल्या पार्टीचं सगळ्यांना कळल कि. " राजू काका हे बोलल्यावर सगळे का गंम्भीर झाले? ते मोठं झाल्यावर मला समजलं 🤭
" आर पण आता करायचं काय? " संतू काका म्हणला.
" इथं रानाच्या त्या बाजूला सोमा वैदू राहतो. चला याला घिऊन तिथं. बघू कायतर करेल ते. " राजू काका म्हणला.
सगळ्यांनी जेवण बांधून घितलं. सायकलवर टांग मारीत रानातल्या वाटानी आमी निघालो. रविकाकाला राजुकाकानी मागल्या क्यारीजवर बसवलेलं. 😁 त्येचा तोंडाचा आ तसाच हुता. त्ये बगुन आता मलां बी हसायला यत होतं. पण मी माझा बी आ तसाच राहिलं असं वाटून मोठ्यांनी हसत नव्हतो. 🤭
काहीवेळाणी एक झोपडं दिसलं. त्याच्या बाहेर काहीजण बसलेले हुते. एका माणसाभवती कोंडाळच घातलं हुतं जणू. त्यो म्हातारा बाबा व्हता. संतू काका म्हणला.." बरं घावलं म्हातारं."😥
आमी सगळी रवी काकाला तोंडं वासल्या अवस्थेत त्या सोमा बाबाकडं घेऊन गेलो. त्यो सोमा बाबा पान बनवित बसला हुता आम्ही सगळी त्या कोंडाळ्यात जमा झालू. आता सगळं कोंडाळ रवी काकाकड बगत व्हतं. काही जणं दबक हसत बी व्हते. रवी काका दिसतच तसा व्हता. आ करुन.
" तोंडाचा आकडा बसलाय काय याचा?" सोमा वैदू म्हणला.
व्हय! दर्शक मान हलवीत रवी काका संतुकाकाच्या व्हय ला दुजोरा देऊ लागला.
"य जरा बगु!" असं म्हणत सोमा वैदूनी त्याला बलीवला. जवळ जात त्याच्या दाभाडाला बोटं दाबली.
" हतं दुखतंय व्हय? " त्यानं इचारलं.
" रवी काकांनी मान डोलावली.
" हम्म.. इलाज अवघड गड्या." असं म्हणत त्यो डोकं खाजवायला लागला."
आयला कात लय झाला पानात कसलं तोंडं भाजतंय. श्या!! नको ह्ये पान आसं म्हणत त्यो रविकाकाच्या जवळ गेला आन एकदम त्याच्या तोंडात पिंक मारणार त्योच रविकाकानी तोंड गपकन मिटलं आणि सोमा वैदूनी त्याच्या बाजूला पिंक मारली.
सगळी जोरात हसायला लागली. जबड्याचे आकडे ताणू ताणू.. एकटा रविकाका सोडून. 😑
तवापासून रविकाका जोरात हसत नाय. 🤭
गणाकाका नळी सोडून मटण खातू.🤒
रानातली पार्टी बंद..😬
संतू काकांनी मला त्याच्या मित्रांत नेणं बंद केलं.. 🤦♂️
मी घरी हा किस्सा ऐकवल्याबद्दल शिक्षा...😬
अभूनव.. नाय नाय अनुभव सगळ्यात मोठा शिक्षक हाय. 🍁🍁
- पिकू... नाय नाय शब्दभ्रमर 😁🍁🍁