तारीख पे तारीख आणि माझं भविष्य वेटिंगवर
मी धनु राशीची आहे आणि काही दिवसांपूर्वी माझ्याकडून उत्सुकतेपोटी एक मोठी चूक झाली. दुपारी घरातली सगळी कामं आटोपली होती, चहाचा कप हातात होता आणि वेळ घालवण्यासाठी मी मोबाईलवर सहज धनु राशीचं एक पॉडकास्ट पाहायला गेले. बस तो एक व्हिडिओ काय पाहिला माझ्या मोबाईलच्या अल्गोरिदमची जणू मतीच गुंग झाली. त्या अल्गोरिदमला बहुतेक वाटलं असावं की ही बाई आता स्वतःच्या अक्कल हुशारीवर किंवा कष्टावर नाही तर थेट ब्रह्मांडातल्या ग्रह ताऱ्यांच्या आणि ज्योतिषांच्या भरवशावरच जगणार आहे.
तेव्हापासून माझ्या मोबाईलचं डोकं असं काही फिरलंय की विचारूच नका. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलमध्ये नुसता राशींचा सुकाळ झालाय. मोबाईल लॉक उघडला की धनु राशी, युट्युब चालू केलं की धनु राशी, फेसबुकवर गेले की धनु राशी आणि रील्स स्क्रोल करायला लागले की तिथेही गंभीर चेहऱ्याचे ज्योतिषी धनु राशीच सांगत असतात. मला तर कधी कधी संशय येतो की माझ्या मोबाईलमध्ये गुगल कंपनीने अल्गोरिदम नाही तर एखादा पंचांग घेऊन बसलेला जुना ज्योतिषीच कायमचा भाड्याने ठेवायला आणलाय.
आणि या प्रत्येक पॉडकास्टमध्ये बॅकग्राउंडला एकदम रहस्यमय संगीत वाजवून एकच मोठी आणि खळबळजनक घोषणा सुरू असते की धनु राशीवाल्यांनो आता तुमचे वाईट दिवस संपले. तयार राहा तुमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार होणार आहे, प्रचंड मोठा बदल होणार आहे. हे रोज रोज ऐकून माझ्यासारख्या साध्या आणि सरळ गृहिणीच्या मनात आशेचा मोठा फुगा फुगायला लागतो. कारण खरं सांगायचं तर माणसाला अपेक्षा असतातच ना. मलाही माझे कुठेतरी जुने अडकलेले पैसे परत हवे आहेत, मलाही स्वतःचं असं काहीतरी नाव कमवायचं आहे, माझी छोटी मोठी स्वप्नं पूर्ण करायची आहेत आणि मलाही आयुष्यात एक दिवस सगळ्यांसमोर ताठ मानेने आणि अभिमानाने म्हणायचं आहे की हो आता माझा काळ बदललाय, माझी परिस्थिति बदलली आहे.
मग एका पॉडकास्टमध्ये पहिला ज्योतिषी चष्मा नीट करत म्हणाला की येत्या १० तारखेपासून तुमच्यावर देवगुरू बृहस्पतीची म्हणजेच गुरूची प्रचंड कृपा सुरू होईल, भाग्योदय होईल. मी अगदी देवावर श्रद्धा ठेवून १० तारखेची चातकासारखी वाट पाहत बसले. १० तारीख उजाडली. आता गुरू घरात सुख समृद्धी घेऊन येईल असं वाटत होतं. गुरू आला की नाही माहीत नाही पण महावितरणचं वीजबिल मात्र अगदी वेळेवर दारात येऊन हजर झालं.
त्यानंतर दोन दिवसांनी दुसरा पॉडकास्ट समोर आला तो ज्योतिषी म्हणाला की धनु राशीच्या लोकांनो २१ तारखेला ग्रहांची अशी स्थिती आहे की तुमचे जुने अडकलेले सगळे पैसे अचानक कोठूनतरी परत मिळतील. हे ऐकताच माझ्या आशा पल्लवित झाल्या. मी ज्यांनी ज्यांनी आमच्याकडून कधीतरी पैसे उसने घेतले होते त्यांचे नंबर पुन्हा शोधून मोबाईलमध्ये वर सेव्ह करून ठेवले. कोणीतरी स्वतःहून फोन करेल किंवा बँकेचा मेसेज येईल म्हणून मी मोबाईलकडे एवढ्या प्रेमाने आणि आशेने बघत राहिले जणू काही बँक थेट मलाच मेसेज करून लॉटरी लागल्याचं सांगणार आहे. शेवटी २१ तारीख आली. पैसे काही आले नाहीत उलट माझ्या एका मैत्रिणीने मेसेज केला की तृप्ती जरा दोन हजाराची गरज होती संध्याकाळपर्यंत पाठवशील का.
तिसरा ज्योतिषी तर आणखीनच कडक निघाला. तो म्हणाला की या महिन्याच्या शेवटी तुमचं समाजात प्रचंड नाव होईल, कीर्ती पसरेल. मी मनातल्या मनात सुखावले. विचार केला की वा आता गल्लीत, समाजात आपले सत्कार होतील, मुलाखती होतील, कोणीतरी कौतुक करेल. महिना संपला. नाव झालं खरं पण ते कुठे तर शेजारच्या किराणा दुकानाच्या उधारीच्या वहीत सगळ्यात वर मोठ्या अक्षरात.
आता तर माझी परिस्थिती अशी झाली आहे की मी रोज कॅलेंडरच्या तारखांची वाट बघते आणि त्या तारखा मात्र कॅलेंडरवर बसून माझीच मजा बघतात. ५ तारीख, १० तारीख, १५ तारीख, २१ तारीख, २८ तारीख. तारखा बदलतात, महिने बदलतात, व्हिडिओ बदलतात, ज्योतिषी बदलतात पण माझं भविष्य मात्र सरकारी कार्यालयातल्या एखाद्या जुन्या फाईलसारखं कायम पुढील आदेशापर्यंत प्रलंबित असंच राहतं.
पण या सगळ्या गमतीजमती बाजूला ठेवल्या तर या व्हिडिओंनी माझ्या मनात एक गोड लालसा आणि एक सुंदर विचार नक्की निर्माण केला. या सगळ्यातून मला एक खूप मोलाची गोष्ट समजली आहे की गुरू ग्रह आपल्या राशीत येण्यापेक्षा आपण स्वतः वेळेवर कामाला लागणं आणि कष्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण ग्रहांचा प्रवेश कोणत्या तारखेला होईल हे कोणालाच माहीत नसतं पण आपल्या स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांचा प्रवेश आपण रोजच्या रोज करू शकतो.
तरीसुद्धा उद्या सकाळी जर मोबाईलवर एखादा नवीन पॉडकास्ट आला आणि त्याच्या थंबनेलवर लिहिलं असेल की धनु राशीवाल्यांनो उद्या सकाळी ठीक ६ वाजल्यापासून तुमचा सुवर्णकाळ सुरू तर मी काय करणार. मी घरातली सगळी कामं बाजूला ठेवून तो व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण बघणारच. कारण आपल्या भारतातला प्रत्येक सामान्य माणूस हा शेवटी आशेवरच जगतो आणि आम्ही धनु राशीवाले आम्ही तर पुढच्या नवीन तारखेवर जगतो.
थोडक्यात सांगायचं तर स्थिती सध्या अशी झाली आहे की वर ब्रह्मांडात ग्रहांची मीटिंग चालू आहे. गुरू येतोय, शनी जातोय, राहू फिरतोय, केतू वळतोय, तारखा धावतायत. फक्त माझे अडकलेले पैसे आणि माझं ते मोठं यश बहुतेक अजून रस्ता सापडत नसल्यामुळे रस्ता विचारत विचारत गल्लीबाहेरच फिरत आहेत.
या लिहिण्यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा ज्योतिषांवर टीका करण्याचा हेतू नाही. हा सहज माझ्या मनात आलेला आजच्या सोशल मीडियाच्या जगावरचा एक निखळ विनोदी विचार आहे.
सौ तृप्ती देव
कथा आवडल्यास नक्की शेअर करा।