जन्म आईने दिला, पण जपलं साऱ्यांनी...
बाबांच्या, दादाच्या, काकांच्या, सर्वांच्याच, आजूबाजूच्यांच्यासुद्धा लाडकीच... मी अशी कोणाची एकटी किंवा फक्त बाबांची नव्हतेच...
जन्म आईने दिला, पण सांभाळलं माझ्या स्वभावाने... म्हणजे सर्व आजूबाजूच्यांनीच...
प्रत्येकाला हेवा वाटायचाच की ती आमचीच असायला पाहिजे...
त्यातच एक वहिनी मला खूप आवडलेली... अगदी मी लहानच होते. पण त्या वहिनी आणि त्यांची ती साडी... मला त्यांच्यात माझी आईच दिसायची. अजूनही डोळ्यांसमोर त्या आणि त्यांची गुलाबी रंगाची साडी नेसलेली प्रतिमा तशीच उभी राहते. खूप जीव लावलेला त्यांनी...
त्या पहिल्याच, ज्यांनी माझं नाव त्यांच्या मुलीला दिलं...
त्यानंतर जशी मी मोठी होत गेले, तशी ही संख्या वाढत गेली...
जन्म झाल्यापासूनच हे नाव मला पूर्ण सोसायटी आणि शेजाऱ्यांनी दिलेलं...
आई म्हणते, "जन्मतःच सर्वांचीच आहेस..."
तसंच काहीसं...
जसं प्रत्येकातला अधुरेपणा माझ्या मनाला हेलकावून टाकत होता...
काही काका-काकूंना मुलंच असत, तर त्यांना मुलीची, त्या मुलांना बहिणीची कमी भासत असे...
हे दुःख की एक मुलगी असती तर...
मग मला बघून त्यांना वाटायचं की हीच आपली मुलगी...
बोलून दाखवत, आणि तसं ते जपतसुद्धा असत...
अगदी मलाही कळत नव्हतं...
पण सर्वच जीव लावत...
कधी घर सोडून कोणाकडे जायला आवडत नसे...
कारण आईचा आदेश — घर सोडून जायचं नाही.
आई येईपर्यंत कोणी बोलावलं तरी बाहेर निघायचंच नाही...
अगदी आजही...
तिचाच आदेश पाळायला आवडतो...
सर्वांना ह्याचं कौतुक वाटत असे...
अभ्यासात अव्वलच होते, त्यामुळे सर्वांच्या आवडीचं केंद्रच बनले...
पण आता तेच माझी भावंडं, मित्र, मैत्रिणी सांगतात,
"तुझ्यामुळे ऐकायला मिळायचं की बघ ती कशी राहते, कसा अभ्यास करते..."
पण तेही आनंदी असत माझ्यासाठी...
मला कोणाला कधी कमी दाखवायचं नव्हतं...faqt होती आणि आहे ... एव्हढच....
मला फक्त माझ्या आई-वडिलांची मेहनत दिसत होती...
हो...
माझ्या आई-बाबांचे कष्ट जास्त दिसत होते...
माझ्या आईची स्वप्नं, जी अजूनही पूर्ण झालेली नाहीत...
पण एक दिवस नक्की होतील...
अजून मी हारलेच नाही....
माहित आहे, वेळ आणि वय ह्याला मी मानतच नाही...
आज कित्येक वर्षांनंतर काही काका-काकूंना भेटले...
त्यांना खूप खुशी झाली...
"कित्येक वर्ष तुझी वाट बघितली," म्हणत,
"तुम्हीच तर आमच्या मुली आहात..."
आणि सुनेला सांगितलं,
"पाया पड, ही तुझी नणंद आहे..."
नाही म्हणू शकले नाही पाया पडण्यासाठी...
जिथे मी स्वतः ह्या प्रथा तोडत आले...
की कोणत्याही सुनेने नणंदेच्या पाया पडायचं नाही...
जर ती नणंद लहान असेल, दीर लहान असेल तर...
पण मी वयाने तिथे मोठी होते.
म्हणूनच नाही, तर त्यांच्या आशा...
त्यांचं एका मुलीप्रतीचं स्वप्न...
त्याला नाही म्हणू शकले नाही...
पण पाया पडायचं फक्त मोठ्यांच्याच...हे मात्र त्यांनाही सांगून आले....
बाकी कोणत्याही सुनेला लहान नणंदेच्या, दिराच्या पाया पडायला लावलेलं मला कधीच पटलं नाही...
पटवून मी घेतलंही नाही...
मोठी भावजय आईच असते...
आईसमान नाही...
ती आईच असते...
माझ्या घरातूनच मी सुरुवात केलेली...
माझ्या लग्नाच्या आधीपासूनच...
माझ्या वहिनी माझ्यासाठी माझी आईच आहेत...
हे त्यांनाही माहित आहे...
आजही माहेरातून पाऊल निघालं की माझी वहिनी जास्त रडते...
शोधते ती त्याच रस्त्यावर, जिथून मी कॉलेजला जायची...
शोधते माझ्या मैत्रिणींमध्ये सुद्धा...
सांगत असते नेहमीच......
असंच कितेकांना मूल नव्हतं...
त्यांचं दुःख तर खूप वेगळं...
सर्वांचीच मी...
एक सर होते...
कॉलेजचेच प्राध्यापक...
त्यांनाही खूप वर्ष मूल झालंच नाही...
ते दोघेही नेहमी लांबूनसुद्धा मला जपत असत...
अक्षरशः त्या काकू तर मिठीत घेऊन रडत...
खूप लहान होते मी...
पण नेहमी वाटायचं,
"ह्यांना मूल व्हायला पाहिजे..."
मनात म्हणायचे,
"ह्यांना मूल होऊ दे..."
काही वर्षांनी सरांचं दुसरं लग्न करून दिलं त्यांच्या पत्नीने...
त्या मला पौर्णिमाच म्हणायच्या...
आणि सरांना मुलगी झाली...
त्यांनी पहिलं नाव तिचं पौर्णिमाच ठेवलं...
ती मोठी झाल्यावर तिलाही सांगितलं...
अजूनही संपर्कात आहेत...
माझं बालपण लिहिण्यासारखं खूप आहे...
अनेक प्रसंग...
अनेक माणसं...
आणि प्रत्येकाने दिलेला एक वेगळाच अनुभव.
शाळेत नेहमीच आदर्श विद्यार्थिनी म्हणून ओळख होती...
अकरावी-बारावीमध्ये तर काही शिक्षक सुट्टीच्या दिवशीसुद्धा क्लास घ्यायचे...
कारण त्यांनी माझ्यातली शिक्षणाची आवड ओळखली होती...
फिजिक्सचे कानिंदे सर...
आयुष्यभर ऋणी राहीन त्यांच्या...
त्यावेळी पुस्तकं सहसा मिळत नव्हती...
पण ह्याच सरांनी पूर्ण लॅब शोधून मला पुस्तकं आणून दिली...
नेहमी विचारायचे,
"लाईट गेल्यावर अभ्यास कसा करतेस?"
आजही ते आठवलं की हसू येतं...
सरांनी प्रश्न विचारला नाही, तर मी तिथेच उभी राहून रडायची...
खूप रडायची...
काही एक फरक पडत नसे... वर्गात किती मुलं आहेत ते...
अरे, नियमित येणारी मीच...
मग मी हात वर केला आणि मला प्रश्नच विचारला नाही, तर झालं...
क्लास ऑफ!
आज आठवलं की हसू येतं...
पण तेव्हा ते माझ्यासाठी खूप मोठं असायचं...
कारण मला शिकायचं होतं...
खूप शिकायचं होतं...
मला तर त्यांच्यात बाबासाहेब आंबेडकर दिसायचे...
आजही दिसतात...
आमची बॅच त्यांची शेवटची होती...
त्यानंतर ते निवृत्त होणार होते...
सांगायचं एवढंच...
मी काही मोठी, महान असं काहीच नाही...
पण एवढं नक्की कळालं...
आपण आपल्या मर्यादेत...
आई-वडिलांचा सन्मान...
मोठ्यांचा आदर...
प्रत्येकाला...
जर स्त्री असेल तर आई...
आणि पुरुष असेल तर बाबांसारखंच बघितलं...
आणि त्यांना त्यांचा मान दिला...
खरंतर द्यावाच लागतो...
त्यांच्या प्रेमाच्या बदल्यात तेवढंच त्यांना आपण देऊ शकतो...
जिथेही होते...
जिथेही असते...
प्रत्येकाच्या घरात खेळले...
आणि नेहमी त्यांच्या मनात घर करून अजूनही आहे...
आईकडे गेले की जेवढ्यांची भेट होईल, तेवढ्यांना भेटून बोलतेच...
आई म्हणतेसुद्धा,
"तू नक्की येते कोणासाठी?"
तशी सर्वांसाठीच...
हे अगदी लहान असतानाच माहित होतं...
काहीही घेऊन जायचं नाही...
आपले शब्द...
त्यातला जिव्हाळा...
हेच त्यांना समाधान देतात...
कोणी जास्त म्हटलं नाहीच...
कारण माझा स्वभाव शांतच होता...
पाहिजे तेवढा...
पण नंतरही शांतच आहे...
लग्नानंतर आयुष्य बदललं...
शांतच होते लग्नानंतरही...
पण पूर्ण फॅमिली...
त्यामधली माणसं...
सर्वच विरुद्ध...
त्यांचे संस्कार विरुद्ध...
पण शेवटी पुनम आहे...
जिला पूर्ण वाशीमकरांनी प्रेमाने जपलेलं...
कशी मागे हटणार...
तिथेही सर्वांची लाडकीच आधीपासून...
जेवढं हे सोपं होतं...
तेवढं सासर सोपं असेल का?
हे पुढच्या भागात नक्की...
आईला म्हटलं,
"आई, सर्वांनी खूप प्रेम दिलं आणि देतात गं..."
तर आई एकच म्हणते,
"तूच त्यांच्याशी चांगली वागत आलीस आणि वागतेस."
नाही पटत हे माझ्या मनाला...
कारण प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतो...
फक्त तो ओळखायला शिकायचं असतं...
ज्या दृष्टीने आपण हात पुढे करतो...
तेच आपल्याला परत मिळत राहतं...
मला घरातूनही खूप प्रेम मिळालं...
सर्वांनीच नेहमी कौतुकच केलं माझं...
आईने नेहमी पंख दिले...
बाबांना नेहमी गर्वच होता...
भावांना माहित होतं,
"हिच्याकडे बघायची गरजच नाही..."
माहेरी माझाच निर्णय असायचा...हे आता कळते ,अगदी वहिनी कोणती पसंद पडली इथपर्यंत.... जिजुंसाठी सुद्धा...जास्त काही नाही...याहीपेक्षा अजून जास्तच मिळालं,आणि दिलंही..सर्वांनीच...
आणि त्यात सर्वांच्या योग्यच असायचं...
लहान होते मी घरात...
पण आई नेहमी प्रोत्साहन देत असे...
बहिणीसाठी कधी बहीण नव्हते...
तर भावासारखीच उभी राहिले...
आजपर्यंत...
आईसुद्धा म्हणते,
"राहावंच लागेल... त्यांचा भाऊ बनून..."
माहित होतं सर्वांना...
पूनम बदलणार नाही...
आणि खरंच...
आजही बदलले नाही...
फक्त थांबली आहे...
मी खरंतर माझ्या ह्या संपूर्ण आयुष्याची ऋणी आहे...
माझ्या आई-बाबांची...
माझ्या सर्व आईंची...
माझ्या सर्व बाबांची...
माझ्या शिक्षकांची...
माझ्या सर्व काका-काकूंची...
आधीपासूनच्या आणि आताच्या सुद्धा...
समोर भेटणाऱ्यांचीसुद्धा...
नेहमी ऋणीच आहे मी...
कारण माझा जन्म...
हेच एक सत्य...
आणि किती गोड असेल हे...
ते ह्या सगळ्या माणसांनी दाखवून दिलं...
जिकडे नजर फिरवली...
तिकडे मायेची माणसं जोडतच गेली...
प्रत्येकाला बोलायचं असतं...
निभवायचं असतं...
पण सुरुवात कशी करू?
काय म्हणतील?
म्हणून अनेक गोष्टी तशाच राहून जातात...
पण...
जे होईल ते होईल...
सुरुवात तर करावीच लागते...
वेळ निघून जातो...
आणि मग सगळं मनातच राहून जातं...
आज प्रत्येकजण मोबाईल घेऊन आम्ही बिझी आहोत असं दाखवतो...
आम्हाला गरज नाही असंही दाखवतो...
"कोण पडेल ह्यात?" असंही म्हणतो...
पण मग जीवन कशासाठी आहे नेमकं?
आपण फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो...
मग शेजारी उभ्या असणाऱ्या माणसाशी का नाही बोलायचं?
लाडके व्हायचं हे मी नव्हते ठरवलं...
ते त्यांनी बनवलं...
पण त्याच्यासोबत जबाबदारीसुद्धा असते...आणि ते मी नेहमी पारपाडण्याची काळजी घेते....