# आयुष्य
आयुष्य आपल्या हातात नसतं; ते आपल्या कर्मात असतं. जितकं मोठं बक्षीस हवं असेल, तितकंच शुद्ध आचरण महत्त्वाचं असतं. माणसाचं आयुष्य हे एखाद्या चमत्कारासारखंच असतं. फक्त स्वतःप्रती आणि सर्व सजीवांप्रती शुद्ध भाव असणं महत्त्वाचं आहे.
आयुष्यात जे काही येतं ते ठरलेलं असतं; पण ते कसं स्वीकारायचं, त्यातून काय शिकायचं आणि कितपत अनुभव घ्यायचा, हे आपल्या हातात असतं. तेच तर अनुभव असतात.
आयुष्य हा एक असा प्रवास आहे की जसा जन्मताना आपण कोऱ्या कागदासारखे येतो, तसंच जातानाही व्हायचं असतं. अनुभवांची शिदोरी सोबत असते, पण मनावर कोणत्याही गोष्टीचं ओझं नसावं.
आयुष्य हलुवार, संथ, शिथिल, सहज आणि लवचिक असावं. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत लवचिक राहता आलं पाहिजे. कारण जे वाकतं ते तुटत नाही, आणि जे परिस्थितीशी जुळवून घेतं तेच पुढे जातं.
माणूस जिथे आहे, ज्या परिस्थितीत आहे, तिथेच स्वतः सूर्य बनू शकतो. सूर्य कधी प्रकाश देण्यासाठी प्रयत्न करत नाही; तो फक्त असतो, आणि त्याचा प्रकाश आपोआप सर्वत्र पसरत राहतो. तसंच जीवन जगता आलं पाहिजे. स्वतःमध्ये इतकी स्थिरता आणि शांतता असावी की आपल्या अस्तित्वातूनच इतरांना आधार, उब आणि प्रकाश मिळावा.
इथे जपून ठेवण्यासारखं खरंतर काहीच नाही. फक्त आपल्या अस्तित्वामुळे किती जणांच्या चेहऱ्यावर आनंद फुलू शकतो, किती गरजू लोकांना आपण निस्वार्थ भावनेने मदत करू शकतो, हे महत्त्वाचं आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो —
"माझ्यामुळे कोणाला काय मिळालं?"
कोणाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं का? कोणाला आधार मिळाला का? कोणाच्या दुःखात आपण थोडेसे सहभागी झालो का? याच गोष्टीत खरं समाधान दडलं आहे.
माणूस म्हणून माणुसकी जपली पाहिजे. वेळात वेळ काढून आठवड्यातून निदान एकदा तरी एखाद्या रुग्णालयाला, एखाद्या आश्रमाला भेट द्यावी. पूर्ण दिवस नाही जमला तरी दोन तास तरी द्यावेत. तिथल्या गरजू लोकांशी, रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी आपल्या सहवासातून, शब्दांतून आणि कृतीतून जोडून घ्यावं. मुलांनाही या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे.
जेवढं होईल तेवढं देत राहायचं... हा नियम कधीच एकटं पडू देणार नाही. मग आपल्याजवळ काय आहे ते द्यावं. माणसाजवळ द्यायला बरंच काही असतं. साधं चेहऱ्यावर हसू जरी दिलं तरी खूप आहे... पण माणसाने नेहमी द्यायलाच शिकावं. हा नियम जर असेल तर आयुष्यात कशाचीही कमतरता नसते.
हल्ली खूप आयुष्य बदलले, पण आपण बदलायचं कशाप्रकारे, हे आपल्याच हातात आहे.
आयुष्यात जितकं सुख अनुभवायचं, तितकंच दुःखही अनुभवायचं असतं. फक्त सुखाच्या मागे धावत राहता येत नाही आणि दुःखापासूनही कायम पळता येत नाही. म्हणून सुखालाही धरून ठेवायचं नाही आणि दुःखालाही धरून ठेवायचं नाही.
असं जीवन जगायचं, ज्यात कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसावी. कारण सुख असो वा दुःख, लाभ असो वा हानी — काहीही कायमचं नसतं.
समस्या जितकी मोठी असेल, तितकंच तिचं समाधानही कुठेतरी असतंच. फक्त त्या परिस्थितीत संयम ठेवता आला पाहिजे. घाई, भीती आणि अस्वस्थतेपेक्षा स्वतःकडे लक्ष ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं.
आयुष्य सजगतेने, समतोलाने आणि नियमाने जगायचं असतं. काहीही घडलं तरी, "मी आहे; मी खंबीर आहे; मी डगमगणार नाही," ही समज स्वतःला देत पुढे चालत राहायचं असतं.
"आयुष्य" हे नावच किती सुंदर आहे... आणि ते प्रत्यक्षातही तितकंच सुंदर आहे. फक्त कोणत्याही गोष्टीला धरून ठेवण्याचा हट्ट किंवा अट्टाहास नको. मग ती गोष्ट पैसा असो, संपत्ती असो, माणसं असोत किंवा नाती असोत.
शेवटी, बाहेर काय घडतंय यापेक्षा आपल्या मनात काय घडतंय, हेच जास्त महत्त्वाचं असतं.
इथे धरून ठेवायचं असेल तर फक्त आपल्या श्वासावरचं लक्ष धरून ठेवायचं.
कारण शेवटी एक प्रश्न उरतोच —
**"नक्की घेतो का आपण आपल्या श्वासाकडे लक्ष?"**
बहुतेक वेळा नाही.
आपण जग बदलण्याचा प्रयत्न करत राहतो, पण आपला पुढचा श्वास आत जातोय की बाहेर येतोय, याचीही जाणीव नसते.
ज्याला स्वतःचा श्वास दिसू लागतो, त्याला आयुष्याशी भांडावंसं वाटत नाही. तो आयुष्याला स्वीकारायला शिकतो.
आणि कदाचित हाच आयुष्याचा खरा अर्थ आहे.