तिजोरी - प्रकरण 14 (शेवटचे प्रकरण) Abhay Bapat द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तिजोरी - प्रकरण 14 (शेवटचे प्रकरण)









प्रकरण १४

त्या नंतर बरोब्बर आठ  दिवसांनी ग्वाल्हेर- बंगलोर एक्स्प्रेस, बंगलोर रेल्वे स्टेशनच्या प्लॅट फॉर्मला लागली आणि त्यातून  अथांग अहुजा खाली उतरला. स्टेशन  बाहेर पडताच रिक्षावाल्यांचा गराडा त्याच्या भोवती पडला. बाहेर येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांच्या

“ साब रिक्षा चाहिये क्या?” म्हणून सगळे मागे लागत होते. काय करावं याचा विचार करत असतांना एका रिक्षा चालकाने

“हॉटेल चाहिये क्या” अशी ‘अॅड-ऑन’ ऑफर दिली आणि अथांग मोहात पडला.

“ कौनसा अच्छा है हॉटेल है?” अथांग नं विचारलं.

“ इधर तो बहोत सारे हॉटेल है, आपका बजेट बोलो, ये टुरिस्ट सिटी है” त्याच्या हातातील बॅग रिक्षात ठेवत ड्रायव्हर म्हणाला.

“ बजेट का प्रोब्लेम नही लेकीन रेल्वे में मेरी पर्स से मेरा आय कार्ड गुम  हुआ है आते समय.रूम मिलेगी क्या उसके सिवा?” अथांग ने विचारलं.

“ तो ये बंदा काय के लिये है ? मै खुद रिसेप्शन  आकर आपको रूम मिलवा दुंगा.मेरा पैसा आप बाद में दे दो.” हा रिक्षावाला चांगलाच तयारीचा होता.अथांग लगेच तयार झाला. हातात रोख पैसे खूप होते पण शहरात आल्यावर टेकायला काहीतरी आसरा हवा ना! पुढचं पुढे बघू.

सिग्नेचर इन नावाच्या हॉटेल बाहेर रिक्षा थांबली आणि रिक्षावाला त्याची बॅग घेऊन खाली उतरला. रिसेप्शन च्या मुला जवळ जाऊन कन्नड भाषेत काहीतरी बोलला.  

“आपका नाम बताव ये सब को.” रिक्षा ड्रायव्हर अथांगला  म्हणाला.अथांग ने बसल्या जाग्यावरून  अथांग अहुजा म्हणून ओरडून सांगितलं. रिसेप्शनिस्ट ने अथांग कडे बघितलं आणि मान डोलावली. रिसेप्शनिस्ट ने त्याला  एक दिवसाचे पैसे अॅडव्हान्स द्यावे लागतील म्हणून सांगितलं. अथांग ने लगेच पेमेंट करून टाकलं.

“ हो गया आपका काम, साब.”  रिक्षा ड्रायव्हर म्हणाला.  “ साईट सीइंग करना है तो फोन करो, ये लो मेरा कार्ड.” अथांग ने त्याचे आभार मानून कार्ड घेतलं.ठरलं की फोन  करतो म्हणाला.

रूम मध्ये गेल्यावर त्याने प्रथम गरम शॉवर घेतला.कपडे बदलले. साडे एकोणीस तासाचा प्रवास करून तो थकला होता. आडवं झाल्य- झाल्या त्याला झोप लागली.  उठल्यावर पाहिलं तर  दुपारचे साडेबारा झाले होते. बापरे !  चार तास झोपलो आपण !  तो उठला आणि बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आला.आता खाली जेवायला जायचं कि इथे रूम मध्ये मागवायचं याचा विचार करता करता शेवटी खाली डायनिंग हॉल मध्ये जाऊ असा विचार करून लिफ्ट ने खाली उतरला.

रेस्टॉरंट मध्ये आल्यावर मेनुकार्ड वर नजर फिरवून काय मागवावे याचा विचार करण्यात काही वेळ गेला त्याचा.कुठेही गेल तरी त्याच त्याच भाज्या. शेवटी   खबरी मासे  आण म्हणून ऑर्डर केली.जवळ जवळ तीन साडेतीन वर्षात त्याला हे मासे खायला मिळाले नव्हते.हा खास नागपुरी मेनू होता. वेटर ने डिश आणून ठेवली आणि त्याचं लक्ष डायनिंग हॉल च्या दाराकडे गेलं. एक जोडपं आत येत होतं. अगदी नवोदित वाटत होतं. ती तर जेमतेम २१-२२ वयाची आणि तो साधारण पंचविशीचा असेल.हनीमूनर्स असणार.त्याच्या मनात आलं. आपण सांझी बरोबर केलेल्या रोमान्स च्या आठवणी जाग्या झाल्या.

सांझीने आपल्यावर तिजोरी उघडण्यासाठी कशी मोहिनी घातली होती हे आठवलं.शेवटी तिजोरीतल्या पन्नास लाखासाठी तिची ही सारी धडपड चालू होती.....शेवटी .. त्याच तिजोरीने तिचा घात केला.तिचा जीव घेतला आणि तिच्या शिवाय किती जणांचा? दोघांचा की तिघांचा?

सर्वात प्रथम पलाशचा. त्याला अपघाताने गोळी लागली असं भासवून तिने त्याची हत्याच केली होती.

त्या तिजोरीने घेतलेला दुसरा बळी कोण?  त्याच्या मनात आलं आणि तो हसला.

कोण?

वज्र की अथांग?

आपण त्या दिवशी  मेलो असतो तर  आज इथे नसतो. त्याच्या मनात आलं आणि त्या दिवशीचा संपूर्ण प्रसंग त्याच्या डोळ्या समोरून एखादा फ्लॅश बॅक  सरकवा तसा सरकला.

तिजोरीतल्या पैशांच्या मोहामुळे अथांगची बुद्धी फिरली होती.  प्रथम त्याने सांझीचा जीव घेतला. अर्थात स्वत:ला वाचवण्यासाठी त्याला ते करणं भागच होतं.आपल्या जीवा-भावाच्या मित्राला, वज्रला तिथेच मरायला मोकळा सोडून  तो पैशाचं गाठोड घेऊन बाहेर पडला होता.कार मध्ये बसत असतानाच वज्रने अथांगला गोळी घातली.

तीन गोळ्या. दोन गोळ्यांनी त्याचे दोन्ही पंजे निकामे केले.आणि तिसरी थेट डोक्यात....

आरपार.....

तिथेच गाठोडं हातातून निसटून पन्नास लाख खाली पडल्याची शेवटची जाणीव त्याला मरण्यापूर्वी झाली होती.

आता आपण जगणार नाही या भावनेने  वज्रने स्वत:च्या डोक्यावर बंदूक टेकवली कारण  जर जिवंत  राहिला असता, आणि जर आत येणारा माणूस त्याचा  जीव वाचवू शकला असता, तर त्याच्यासाठी काही भविष्य नव्हतं. वज्रने सांझीला मारलं नाही यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. जेव्हा पलाश घोषचा मृतदेह सापडेल, तेव्हा वज्रने त्यालाही मारले नाही यावरही कोणी विश्वास ठेवणार नाही. मृत्यूची वाट बघणे म्हणजे वेदनेचा डोंब सहन करणे, नकोच ते ! या विचाराने वज्र ने शांतपणे रिव्हॉल्व्हर ची नळी आपल्या डोक्याला लावली होती.

त्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला हे पैसे  पलाश चे आहेत, ते  असे बेवारस पडून देऊन उपयोगी नाहीत. आपणच त्याचा वापर योग्य प्रकारे करू या विचार सरशी त्याची जगण्याची उमेद वाढली.या पैशांचा विनियोग काहीतरी लोकोपयोगी कामाला झाला पाहिजे.त्यासाठी आपल्याला जगायला हवं. पण कसं?

“तू तुझ्या मरणाने इथेच मर.” असं अथांग का म्हणाला? आपण खरंच मरणार आहोत? मरणार असूं हे पैसे सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करून मगच मरू.  प्रयत्न तर करू.

जगलो आणि सापडलो तर नागपूर जेल नक्की.......

आणि अचानक त्याला ‘ती’ जाणीव झाली.

जो मेला आहे तो वज्र द्विवेदी आहे. अथांग नाही.इन्स्पेक्टर चटर्जी जेव्हा इथे वज्र ला शोधायला आला तेव्हा त्याच नाव शीर्ष सहानी आहे असं त्याला सांगण्यात आलं होतं. वज्र ला वाचवण्यासाठी  तेव्हा अथांग इन्स्पेक्टर चटर्जी समोर शीर्ष  सहानी नावाने सामोरा गेला होता. इन्स्पेक्टर चटर्जीने खऱ्या वज्र ला कधीच बघितलं नव्हतं त्यामुळे अथांग हाच शीर्ष सहानी आहे असं गृहीत धरून तो बोलला होता.सांझीने सुद्धा अथांग हाच शीर्ष सहानी असल्याची पुष्टी दिली होती. तसे ते दोघे उंची, अंगाचा वर्ण, केसांची स्टाईल, मिशी ठेवण्याची पद्धत या निकषावर सारखेच होते.आता खरा अथांग मेला आहे तर आपण मेलेला माणूस वज्र आहे पण तो  शीर्ष सहानी  नावाने इथे राहत होता अशी बातमी पसरवून आपण अथांग या नावाने आयुष्य चालू करू शकतो. इथून मुंबई, बंगलोर  सारख्या गजबजलेल्या शहरात जाऊन आरामात लपून राहू शकतो.तिथे कुणाला ओळखू येणार नाही आणि अथांगचं क्रिमिनल रेकोर्ड नसल्याने त्याला  कोणी अटक करायला येणार नाही.

हे सगळ करायचं तर जगलं पाहिजे. आपल्या छातीत होणाऱ्या वेदानावर उपचार व्हायला हवा.

अथांग ने आपल्या छातीत गेलेली गोळी काढली असं त्यानं आपल्याला सांगितलं आणि आपण त्यावर विश्वास ठेवला. पण गोळी काढता कशी आली त्याला, डॉक्टरांकडे न जाता? तो काही यातला तज्ज्ञ नाही. म्हणजे शक्यता आहे की गोळी आत शिरलीच नसावी.बरगडीला वगैरे चाटून गेली असावी आणि आपण जखमे पेक्षा घाबरून बेशुद्ध झालो असणार. आपल्याला आत्ता ज्या वेदना होत आहेत त्या मृत्यू देणाऱ्या नाहीत हे अचानक त्याला जाणवलं आणि हायसं वाटलं. नशिबाने या घटने नंतर कोणतेही वाहन पंपावर आल नव्हतं.

वज्र ने तिथून उठून प्रथम पैशाचं गाठोडं ताब्यात घेतलं.आणि गाडीत ठेवलं.त्याची नजर अथांग कडे गेली.डोक्यात मागून घातलेली गोळी पुढून बाहेर पडताना चेहेरा छिन्नविछिन्न झाला होता. नेम चुकलेल्या दोन गोळ्यांनी दोन्ही पंजे फाटले होते.थोडक्यात मेलेला माणूस वज्रआहे कि अथांग हे समजायला वाव नव्हता.पोलिसांकडे कैद्यांचं जे रेकॉर्ड असतं, ते हाताचे ठसे आणि चेहेऱ्याच्या खुणा. इथे हे दोन्ही रेकॉर्ड नष्ट झालं होतं. आपण जगलो तर अथांग म्हणून पुढील आयुष्य जगायचं त्याने नक्की केलं.

अथांगचं आणि सांझीचं प्रेत हलवण्याची सुद्धा गरज नव्हती. कोणी दरोडेखोराने धाब्यावर हल्ला करून सांझी ला ठार मारलं आणि तिजोरी उधडून त्यातले  पैसे घेऊन पोबारा करत असतांना  त्यांना वज्र पंपा जवळ पाठमोरा दिसला आणि दरोडेखोरांनी त्यालाही मागून गोळी घातली असाच सीन तो उभा करणार होता.

आधी बरं व्हायला हवं! पुन्हा त्याच्या मानाने घेतलं

आपल्या वेदना सहन करत त्याने गाडी चालू केली. मागच्या महिन्यात पलाश एका मिटिंग जाणार होता तेव्हा सांझीला तिजोरी उघडून दिली कि पळून जायचा प्लान करताना त्याने जवळच्या एका छोट्या रानात निवडुंगाच्या झुडपात वेषांतर करण्याचं सामान त्याने ठेवलं होतं त्या दिशेने गाडी हलवली.आधी वेषांतर केलं आणि वाटेत एका पब्लिक फोन बूथ वरून इन्स्पेक्टर चटर्जी ला फोन लावला.

“ मी एक ट्रक वाला बोलतोय.आत्ता मी पेट्रोल भरायला ‘जरा विसावा’ वर आलो होतो.तिथे भयानक काहीतरी घडलंय. दारात  तिथे काम करणारा शीर्ष सहानी नावाचा नोकर गोळी लागून मरून पडलाय. बंगला उघडा आहे आणि दारात एक बाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्ये. बहुतेक ती पंपाच्या मालकाची बायको आहे.तुम्ही इथे लगेच या. बहुतेक मोठा डाका पडलाय इथे. इथे अजून काही कार वाले पण आलेत. त्यातला एक जण म्हणतोय  की मेलला माणूस शीर्ष सहानी नाव सांगायचा पण तो खरं म्हणजे नागपूर जेल मधून पाळलेला कैदी वज्र द्विवेदी होता. काहीतरी मोठा लोचा आहे.  ”  फोन कट केला. त्या नंतर वज्र गाडी घेऊन जवळच्या गावाकडे निघाला.एका साध्या डॉक्टरच्या दवाखान्या समोर त्याने गाडी थांबवली.आपली जखम दाखवली.

“ हे जरा गंभीर दिसतंय. गोळी लागल्ये का बंदुकीची? पोलिसांना कळवायला लागेल.”

“ अहो गोळी लागल्ये कि घासून गेल्ये बघून सांगा.मी रस्त्याच्या कडेला उभा राहून जरा मोकळा होत होतो, तिथे एक माणूस हातात  छर्याची बंदूक घेऊन कुत्रांना मारत होता. एका कुत्राने  त्याला हूल देताना माझ्या अंगावर उडी मारली पण गोळी त्याला न लागता मला लागली.पण बहुदा चाटून गेली. ” वज्र म्हणाला.

डॉक्टरने जखम नीट तपासली. “गोळी चाटून गेल्ये.आत नाहीये, पण  रक्तस्त्राव खूप झालाय.वेळेवर  मलमपट्टी औषध का नाही केलं?”

वज्र ने त्याला काहीबाही कारण सांगितलं. की घरगुती उपाय केले पण उतार पडला नाही म्हणून आलो  डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं, काही गोळ्या लिहून दिल्या.जखमेवर बँडेज बांधलं.

आता वज्रला जरा फ्रेश वाटलं. तिथून त्याने सरळ रेल्वे स्टेशन ला जायचं ठरवलं.पण ही कार नेता आली नसती कारण पोलिसांनी एव्हाना तपास सुरु केला असेल तर पलाश ची गाडी ते शोधतीलच. या डॉक्टरच्या दवाखान्याजवळ ती दिसली तर संशय येईल म्हणून त्याने ती तिथून चार पाच किमी लांब नेऊन लावली, गाडीतले पैसे काढले  आणि रिक्षा करून स्टेशन गाठलं. रिक्षा करताना सुद्धा गाडी लावलेल्या जागे पासून दूर जाऊन केली.

स्टेशन वर आल्यावर त्याला संघ मित्रा एकसप्रेस मिळाली. साडे एकोणीस तासांनी तो बंगलोरला पोचला होता. आपण फोन वरून दिलेल्या टिप नुसार पोलिसांनी आता तपास चालू केला असेल आणि शीर्ष सहानी म्हणजे वज्र द्विवेदी दरोड्यात मेल्याचं त्यांनी अनुमान काढलं असेल, आता आपल्याला नि:शंकपणे अथांग नावाने इथेच सेटल होता येईल असा विचार वज्र ने केला.

“सर, आपलं जेवण मांडलंय.” हॉटेलच्या वेटरने त्याला तंद्रीतून वास्तवात आणलं. भानावर येत वज्र ने समोरच्या माशावर ताव मारायला सुरुवात केली.

त्याला मगाशी दिसलेलं ते जोडपं त्याच्या समोरच्याच टेबल वर बसलं होतं.कुजबुजत्या आवाजात ते एकमेकांशी बोलत होते आणि घास भरवत होते.

तिचं जेवण त्याच्या आधी संपल म्हणून ती उठली आणि वॉश बेसिन पाशी गेली. पण बहुदा तिला अजून काहीतरी भरावयाची इच्छा त्याला झाली आणि त्याने तिला हाक मारली.

“ कृतज्ञता ! एक मिनिट ये न इथे.”

कृतज्ञता ! नागपूर जेल मधून सुटल्यावर आपल्याला मदत करणारी, आपल्याला जातांना नोटांचं बंडल देणारी त्यावरच्या पहिल्या नोटेवर कृतज्ञता असे शब्द लिहिणारी आणि  एक आकडा, बहुदा फोन नंबर लिहिणारी हीच तर नसेल?

अरे तशीच दिसते आहे पण मोठी झाल्ये. होणारच. तेव्हा ती अठरा एकोणीस वयाची होती. आपण तीन वर्षे पलाश सोबत होतो. आता ही लग्नाच्या वयाची झालीच असणार. आणि  कृतज्ञता हे फार क्वचित ठेवलं जाणारं नाव आहे. नोटेवर लिहिलेले कृतज्ञता हे शब्द म्हणजे मदत या अर्थाचे नसतील आणि हे तिचं नाव असेल तर हीच ती मुलगी.

हिला ओळख द्यायलाच हवी. हिच्यामुळेच आपल्याला तिथून पळून जायला मदत झाली.पण तिने पोलिसांना कळवल तर?

वज्र ने तिला  एवढाच सांगितलं होतं कि न केलेल्या गुन्ह्या साठी मला सजा झाली होती पण मी निसटलो. आणि ती तेव्हा काय म्हणाली होती ते वज्रला आठवल.’शत्रूवर सुद्धा या जेल मध्ये जायची वेळ येऊ नये.’ असं काहीतरी ती म्हणाली होती.तिला या जेल ची कशी काय माहिती होती एवढी?

अरे या सर्वात तिने आपलं नाव त्यावेळी विचारलं नव्हतं, मी ही सांगितलं नव्हत हे त्याला आठवलं.

“कृतज्ञता ” तो थेट तिच्या जवळ जाऊन म्हणाला. ती भांबावली.वज्र ने आपल्या खिशातून तिने दिलेली आपलं नाव लिहिलेली नोट काढली.

“ ही ओळखतेस तू?” त्याने विचारलं. तिच्या चेहेऱ्यावरचे भाव पटापट बदलले.

“ तू... .. तुम्ही...ते...” असं ती पुटपुटत राहिली.

“ हो मीच. अथांग अहुजा. तुला भेटलो होतो.खरं म्हणजे दैव योगाने तू मला भेटलीस.मला मदत केलीस. आता मी इथे नोकरी  बघतोय. मध्यंतरी माझ्या आयुष्यात खूप उलाढाली झाल्या आहेत.पण हातात चार पैसे आहेत.  पण त्यावर माझा हक्क नाही ते दुसऱ्या कुणा भल्या माणसाचे आहेत.मी हे सर्व पैसे कुठल्यातरी सामाजिक संस्थेसाठी दान करायच्या विचारात आहे. मी एखाद्या ठिकाणी नोकरी शोधून उर्वरित आयुष्य निवांत घालवणार आहे. ”

तिच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

“ तू इथे कशी काय? हनिमून ला आली आहेस?” वज्रने विचारलं.

“ नाही माझं सासर इथलंच आहे. हे माझे मिस्टर वेधस भूपाल. आमचं लव्ह मॅरेज आहे. इथे त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे.” तिने ओळख करून दिली.

वेधस भूपाल ने त्याला शेक हँड केला. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग तो म्हणाला,
“ मिस्टर अथांग, तुमची हरकत नसेल तर माझ्याच हॉटेल मध्ये तुम्ही मॅनेजर म्हणून याल का? तुम्ही आत्ता कृतज्ञता शी बोलत होतात तेव्हा तुमच्याकडे असलेले  पण तुमच्या मालकीचे नसलेले पैसे तुम्ही  सामाजिक कार्यासाठी वापरणार आहात असं म्हणालात ना, या वरून तुमचा प्रामाणिकपण मला भावला. मला अशाच स्टाफची गरज आहे.” वेधस म्हणाला.

“ वेधस एक एन.जी.ओ पण चालवतो. तुरुंगात गेलेल्या कैद्यांच्या कुटुंबासाठी, त्यांचा सर्व खर्च तो करतो.” कृतज्ञता म्हणाली.

“ खरं म्हणजे एन.जी.ओ मी नाही तर कृतज्ञताच चालवते.” वेधस म्हणाला.

“ पण याची कल्पना वेधस ला सुचली.” कृतज्ञता म्हणाली.   “  तुमच्या सारखाच न केलेल्या गुन्ह्याची सजा हा भोगून आलाय. नागपूर जेल मधून.” ती म्हणाली.

नागपूर जेल बद्दल तिला एवढी माहिती कशी आणि त्या बाबत ती एवढी हळवी का होती या दोन्ही प्रश्नांची उत्तरं वज्रला मिळाली होती.

त्याने वेधस ची ऑफर स्वीकारली. पलाश कडून आणलेले पन्नास लाख वेधस च्या एन.जी.ओ ला देणगी द्यायचं त्याने ठरवून टाकलं

समाप्त.