फ्लाईट: ८०४ - 3 Dr Phynicks द्वारा विज्ञान-कल्पनारम्य मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फ्लाईट: ८०४ - 3

प्रकरण ३

------------------

कालचक्रात उडी 




एटीसी रूमच्या फुटलेल्या काचेच्या खिडक्यांमधून पावसाचा थंड वारा आत येत होता, पण आतलं वातावरण गोळ्यांच्या ठिणग्यांनी आणि बारुदाच्या वासाने होरपळून निघालं होतं. संपूर्ण विमानतळाची वीज गायब झाल्यामुळे फक्त विजांच्या अंधुक प्रकाशातच शत्रूंच्या हालचाली दिसत होत्या. काळे कपडे घातलेले हल्लेखोर अत्यंत क्रूरपणे पुढे सरकत होते. त्यांच्या ऑटोमॅटिक गन्समधून निघणाऱ्या गोळ्या भिंतींना आणि कॉम्प्युटर स्क्रीन्सना छिन्नविच्छिन्न करत होत्या.

"विक्रम! उजव्या बाजूने कव्हर घे!" समरजीत अंधारातच ओरडला. त्याने एका खांबाचा आडोसा घेतला आणि समोरून येणाऱ्या एका हल्लेखोराच्या डोक्यात अचूक गोळी झाडली. तो हल्लेखोर तिथेच कोसळला.

दुसऱ्या बाजूला, डॉ. फिनिक्स एका मोठ्या लोखंडी कपाटाच्या मागे जमिनीवर बसले होते. त्यांच्या छातीशी त्यांनी ती जुनी चामड्याची डायरी आणि ते प्रगत काळे यंत्र घट्ट पकडून ठेवले होते. त्यांचे हात थरथरत होते, पण डोळ्यांत भीतीपेक्षा आपल्या संशोधनाला वाचवण्याची जिद्द जास्त होती.

"समरजीत! हे लोक साधे दरोडेखोर नाहीत!" डॉ. फिनिक्स ओरडले. "हे 'ब्लॅक ओमेगा' चे एजंट्स आहेत! एका आंतरराष्ट्रीय गुप्त संघटनेचे भाडोत्री सैनिक. त्यांना हे यंत्र हवं आहे!"

"त्यांना काहीही हवं असू दे डॉक्टर, माझ्या जिवंतपणी मी त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही!" समरजीतने आपल्या पिस्तुलातील शेवटच्या काही गोळ्या चालवत उत्तर दिले. त्याने विक्रमकडे पाहिले, जो एका टेबलाच्या मागे लपून गोळीबार करत होता. "विक्रम! मेडिकल विंग सुरक्षित आहे ना? तिथे माझे बाबा आहेत!"

"सर! बॅकअप फोर्स तिथे पोहोचली आहे. त्यांनी प्रवाशांना सुरक्षित तळघरात हलवलं आहे!" विक्रमने ओरडून सांगितले.

पण तितक्यात एक मोठा स्फोट झाला. हल्लेखोरांनी एटीसी रूमच्या मुख्य गेटवर 'फ्लॅशबॅंग' ग्रेनेड फेकला होता. एका तीव्र प्रकाशासह आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने समरजीतचे डोळे क्षणभर दिपले आणि कानात फक्त साय-साय आवाज येऊ लागला. त्याचा समतोल बिघडला. याच संधीचा फायदा घेऊन तीन हल्लेखोर डॉ. फिनिक्स यांच्या दिशेने धावले. त्यांनी डॉ. फिनिक्स यांना कॉलर धरून उभे केले आणि त्यांच्या हातातील यंत्र आणि डायरी हिसकावून घेतली.

"थांबा!" समरजीतने स्वतःला सावरत अंधारातच एका हल्लेखोराच्या पायावर गोळी मारली. तो ओरडत खाली पडला, पण दुसऱ्या हल्लेखोराने डॉ. फिनिक्स यांच्या कानशिलाला गन लावली.

"हात वर कर, ऑफिसर!" हल्लेखोरांच्या प्रमुखाचा थंड आवाज गुंजला. "एक जरी पाऊल पुढे टाकलंस, तर या म्हाताऱ्याचा मेंदू भिंतीवर असेल. पिस्तूल खाली टाक!"

समरजीत थांबला. त्याचा श्वास जोरात चालत होता. त्याला माहीत होते की जर डॉ. फिनिक्स यांना काही झाले, तर विमानाचे आणि त्याच्या वडिलांचे रहस्य कायमचे संपून जाईल. त्याने हळूच आपले पिस्तूल जमिनीवर टाकले.

"शाब्बास," प्रमुख हसला. "आम्हाला फक्त हे यंत्र आणि डायरी हवी होती. आणि हो... हा म्हाताराही आमच्यासोबत येईल, कारण सॅटेलाईटचा अंतिम कोड कसा वापरायचा हे फक्त याच कुजलेल्या डोक्यात लपलं आहे."

ते डॉ. फिनिक्स यांना ओलीस ठेवून मागे सरकू लागले. समरजीत हताशपणे पाहत होता. पण त्याच वेळी, बाहेरून लष्कराच्या आणि सीबीआयच्या स्पेशल कमांडोजच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. विमानतळाच्या धावपट्टीवर सर्चलाईट्स फिरू लागल्या. शत्रूंना कळून चुकले की त्यांचा पळापळाचा मार्ग बंद होत आहे.

"लवकर चला! हेलिकॉप्टर रनवे ४ वर येत आहे!" प्रमुखाने आपल्या माणसांना आदेश दिला. ते डॉ. फिनिक्स यांना घेऊन जिन्यावरून खाली धावले.
समरजीतने एक क्षणही वाया न घालवता जमिनीवर पडलेले आपले पिस्तूल उचलले आणि तो त्यांच्या मागे धावला. "विक्रम, कमांडोज घेऊन रनवे ४ कडे ये!" तो ओरडला.

धावपट्टीवर पाऊस अजूनही कोसळत होता. एका बाजूला ते रहस्यमय 'फ्लाइट ८०४' विमान उभे होते, आणि त्याच्याच बाजूला शत्रूंचे एक काळे हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते. समरजीत धावतच तिथे पोहोचला. विजांच्या प्रकाशात त्याला दिसले की हल्लेखोर डॉ. फिनिक्स यांना हेलिकॉप्टरकडे ओढत होते.

समरजीतने धावपट्टीवरील एका फायर ब्रिगेडच्या पाण्याच्या टँकरचा आडोसा घेतला. त्याने नेम धरला आणि हेलिकॉप्टरच्या टेल रोटरवर (मागच्या पंख्यावर) दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागताच हेलिकॉप्टरमधून ठिणग्या उडाल्या आणि पायलटचा ताबा सुटला. हेलिकॉप्टर जमिनीवर घसरत गेले आणि एका मोठ्या धक्क्यासह थांबले.

या गोंधळाचा फायदा घेऊन डॉ. फिनिक्स यांनी स्वतःला हल्लेखोराच्या पकडीतून सोडवले आणि ते धावपट्टीवर चिखलात पडले. समरजीत धावत पुढे गेला. त्याने डॉ. फिनिक्स यांना हाताला धरून उठवले आणि त्यांना विमानातील आपत्कालीन जिन्याच्या मागे सुरक्षित जागी आणले. शत्रूंचे उरलेले दोन एजंट्स अजूनही त्यांच्यावर गोळीबार करत होते, पण तितक्यात विक्रम आणि सीबीआयचे कमांडोज तिथे पोहोचले. त्यांनी शत्रूंना चारी बाजूंनी घेरले आणि गोळीबारात त्या दोन्ही हल्लेखोरांचा खात्मा केला.

समरजीतने डॉ. फिनिक्स यांच्या हातातील ती चामड्याची डायरी आणि काळे यंत्र सुरक्षित असल्याचे पाहिले. त्याचे श्वास वेगाने चालत होते. "डॉक्टर, तुम्ही ठीक आहात ना? यंत्र सुरक्षित आहे ना?"

पण डॉ. फिनिक्स यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा एकही भाव नव्हता. उलट, त्यांचे डोळे विमानाकडे पाहत अत्यंत भीतीने विस्फारले होते. त्यांच्या हातातील मनगटी घड्याळ विचित्र प्रकारे उलटे फिरत होते.

"समरजीत... वेळ संपत आली आहे," डॉ. फिनिक्स थरथरत्या आवाजात म्हणाले. "माझं घड्याळ बघ... इथे 'टाईम डिस्टॉर्शन' वाढतंय. विमानाची ऊर्जा २०२६ च्या वातावरणाशी टक्कर घेत आहे. जर आपण पुढील काही मिनिटांत काही केलं नाही, तर हे विमान आणि यातील सर्व प्रवासी... तुझे वडीलही... हवेतच विरघळून जातील! त्यांच अस्तित्व काळाच्या पडद्याआड कायमचा नष्ट होईल!"

"पण डॉक्टर, आपण कोड डिक्रिप्ट का नाही करू शकत?" समरजीतने विचारले. "तुम्ही म्हणालात ना की २०२६ चा सुपरकॉम्प्युटर एरर दाखवतोय. त्या 'टाईम लूप पॅराडॉक्स'चा नक्की अर्थ काय आहे? मला नीट सांगा!"

डॉ. फिनिक्स यांनी समरजीतचा हात घट्ट धरला. पावसाचे पाणी त्यांच्या तुटलेल्या चष्म्यावरून ओघळत होते. त्यांनी अत्यंत गंभीर आणि वैज्ञानिक भाषेत स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली:
"समरजीत, नीट समजून घे. १९९१ मध्ये जेव्हा मी तो डार्क मॅटर सॅटेलाईट लॉक केला, तेव्हा मी त्याचा मुख्य सोर्स कोड या यंत्रात आणि डायरीत टाकला. पण भूतकाळातून भविष्यकाळात येताना, काळाच्या बोगद्यात म्हणजेच वर्महोल मध्ये एक वैज्ञानिक अघटीत घडलं. विज्ञानाचा नियम आहे की कुलूप कुठेही नेलं तरी उघडता येतं, पण त्या कुलूपाची मुख्य चावी आणि त्याची अंतर्गत यंत्रणा अजूनही १९९१ च्या वेळेतच उघडी आहे! म्हणजेच, जोपर्यंत आपल्याला १९९१ मधील प्रक्षेपणाची 'लाइव्ह फ्रिक्वेन्सी' मिळत नाही, तोपर्यंत २०२६ चे कितीही प्रगत क्वांटम कॉम्प्युटर्स वापरले, तरी हा कोड कधीच डिक्रिप्ट होणार नाही!"

"म्हणजे?" समरजीतचे डोके चक्रावले.

"विज्ञानाच्या सोप्या भाषेत सांगायचं तर, तू कुलूप २०२६ मध्ये उघडू शकतोस, पण त्या कुलूपाचं मुख्य तोंड अजूनही १९९१ च्या वेळेतच अडकलेलं आहे! तिथली लाईव्ह वेव्हलाईन मॅच झाल्याशिवाय हा डेटा कॉम्प्युटर स्वीकारणारच नाही. हाच तो 'टाईम लूप' आहे ज्याने आपल्याला बांधून ठेवलं आहे. जर आपल्याला तो विनाश थांबवायचा असेल, तुझ्या वडिलांना आणि या प्रवाशांना जिवंत ठेवायचं असेल, तर यावर फक्त एकच उपाय उरला आहे..." डॉ. फिनिक्स विमानाकडे पाहत म्हणाले.

"कोणता उपाय, डॉक्टर?" समरजीतने विचारले.

डॉ. फिनिक्स यांनी ती डायरी आणि ते काळे यंत्र समरजीतच्या हातात दिले. "हे विमान आणि हे यंत्र घेऊन... आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळात, म्हणजेच १७ जून १९९१ च्या त्याच रात्री जावं लागेल! थेट त्या प्रक्षेपण केंद्रावर जाऊन, तिथल्या लाईव्ह फ्रिक्वेन्सीचा वापर करून हा कोड डिक्रिप्ट करावा लागेल आणि ते प्रक्षेपण थांबवावं लागेल! इतिहास बदलल्याशिवाय भविष्य सुरक्षित होणार नाही!"

समरजीत स्तब्ध झाला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. भूतकाळात जाणे? १९९१ मध्ये? जिथे त्याचे वडील तरुण होते, जिथे तो फक्त ३ वर्षांचा होता.

"पण डॉक्टर, विमानात बसून भूतकाळात कोण जाणार? प्रवाशांची अवस्था तर गंभीर आहे," समरजीतने विचारले.

डॉ. फिनिक्स यांनी समरजीतच्या डोळ्यांत पाहिले, जिथे एक प्रचंड निर्धार लपला होता. "विमान चालवण्यासाठी पायलटला शुद्धीवर आणण्याइतकी ऊर्जा या यंत्रात आहे. पण तिथे जाऊन ती लढाई लढण्यासाठी, शत्रूंचा सामना करण्यासाठी आणि इतिहास बदलण्यासाठी एका अशा माणसाची गरज आहे ज्याचा या कथेशी थेट संबंध आहे... समरजीत, हे काम फक्त आणि फक्त तूच करू शकतोस!"

तितक्यात, धावपट्टीवर उभ्या असलेल्या फ्लाइट ८०४ च्या इंजिनमधून अचानक एक तीव्र निळा प्रकाश बाहेर पडला. विमानाभोवती हवेचा एक प्रचंड मोठा विळखा तयार होऊ लागला. काळाचे चक्र पुन्हा एकदा फिरण्यास तयार होते.

समरजीतने विमानाकडे पाहिले. त्याचे वडील तिथे तळघरात बेशुद्ध होते. जर तो गेला नाही, तर त्याचे वडील कधीच जागे होणार नव्हते. आणि जर तो गेला, तर तो थेट ३५ वर्षे मागे जाणार होता.

"मी तयार आहे, डॉक्टर," समरजीत अत्यंत खंबीर आवाजात म्हणाला. "मी माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या देशासाठी या कालचक्रात उडी घ्यायला तयार आहे!"

तो विमानाचा जिना चढू लागला. पण तितक्यात, अंधारातून एका जखमी झालेल्या हल्लेखोराने (जो जमिनीवर पडला होता) आपले पिस्तूल उचलले आणि थेट समरजीतच्या दिशेने गोळी झाडली...

ठाक....!

गोळीचा आवाज पावसाच्या गडगडाटात गुंजला. विमान टेकऑफ करणार की नाही?