सिस्टिम-विश्वासाला कुलूप
System vishwasala kulup
चार हजार खिशात होते. पण डोक्यात पहिल्यांदा चार हजारापेक्षा मोठा विचार आला होता. सिस्टम बनवायची असते.
त्या रात्री मी वहीत लिहिलं नाही. मी भिंतीवर लिहिलं. लॉजच्या त्या ओल्या भिंतीवर कोळशाने.
नियम 1 - यापुढे कोणाला आयडिया सांगायची नाही. फक्त रिझल्ट सांगायचा.
नियम 2 - तोंडी हिशोब बंद. सगळं लिहून ठेवायचं.
नियम 3 - मी एकटा पुरणार नाही. माणूस लागणारच.
तिसरा नियम सगळ्यात अवघड होता. बीडमध्ये माणूस मिळतो, पण विश्वास नाही मिळत. आणि कालच माझा मित्र विश्वास तोडून गेला होता. त्याने माझी आयडिया चोरली होती. त्या रात्री झोप लागली नाही. डोळ्यासमोर फक्त एकच प्रश्न होता, आता कोणावर विश्वास ठेवायचा?
सकाळी मी चहाच्या टपरीवर गेलो नाही. मी सरळ बस स्थानकावर जाऊन बसलो. माणसं बघत होतो. कोण काम करतंय, कोण फक्त टाइमपास करतंय.
तेवढ्यात एक पोरगा दिसला. माझ्याच वयाचा असेल. अंगावर फाटका शर्ट, हातात एक फडकं. तो एसटीच्या खिडक्या पुसत होता. पण त्याचं पुसणं वेगळं होतं. तो एक खिडकी पुसायचा आणि परत मागे येऊन बघायचा, काच साफ झाली का. कोणी त्याला सांगत नव्हतं, कोणी बघत पण नव्हतं. तरी तो मनापासून करत होता.
मी त्याला हाक मारली. "इकडे ये."
तो घाबरत आला. मी नाव विचारलं. म्हणाला "राम."
मी म्हणालो "दिवसाला किती मिळतात तुला?"
तो म्हणाला "ऐंशी रुपये मिळतात, पण रोज काम नसतं."
मी खिशातून शंभरची नोट काढली. म्हणालो "माझ्याकडे काम आहे. मी रोज शंभर देईन. पण अट एकच, मी सांगेन तेवढंच करायचं. जास्त विचारायचं नाही."
त्याने ती नोट बघितली. त्याच्या डोळ्यात भूक होती, पण लोभ नव्हता. तो म्हणाला "चालेल भाऊ, काय काम आहे?"
मी म्हणालो "उद्या सकाळी भेट, सांगतो."
दुसऱ्या दिवशी मी त्याला एक छोटी वही दिली. आणि तीन दुकानांची नावं दिली. म्हणालो "या तीन दुकानात जायचं. काही बोलायचं नाही. फक्त बघायचं, गल्ल्यावर किती गर्दी आहे. आणि वहीत लिहून आणायचं."
त्याला काही कळलं नाही. पण त्याने प्रश्न नाही विचारला. तो गेला.
संध्याकाळी सहा वाजता तो परत आला. घामाने भिजला होता. त्याने वही माझ्या हातात दिली. त्यात त्याने लिहिलं होतं.
"भाऊ, पहिलं किराणा दुकान - सकाळी 11 ते 12 गर्दी असते, लोक पगार काढून येतात.
दुसरं मेडिकल - संध्याकाळी 4 ते 6 गर्दी, शाळा सुटल्यावर.
तिसरं चप्पलचं दुकान - दिवसभर रिकामं, कोणीच येत नाही."
मी ते वाचलं आणि हसलो. त्या एका पानाने मला पाचशे रुपयांची किंमत असलेली माहिती दिली होती. हाच तर सिस्टमचा पहिला भाग होता. माहिती गोळा करणे.
मी रामला म्हणालो "उद्या परत ये."
मी दुसऱ्या दिवशी त्या तिसऱ्या चप्पलच्या दुकानात गेलो. दुकानदार उदास बसला होता. मी त्याला म्हणालो "काका, तुमचं दुकान चालत का नाही माहिती आहे का?"
तो वैतागला, म्हणाला "तुला काय करायचंय?"
मी त्याला रामची ती वही दाखवली. म्हणालो "तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांसाठी दुकान उघडता. पण तुमच्याकडे येणारा ग्राहक फक्त संध्याकाळी येतो. दिवसभर तुम्ही लाईट बिल घालवता."
तो गप्प झाला. माझ्याकडे बघू लागला. म्हणाला "मग काय करू?"
मी म्हणालो "एक काम करा. सकाळी दुकान बंद ठेवा. फक्त 4 ते 9 उघडा. आणि दुकानाच्या बाहेर एक पाटी लावा - शाळेच्या मुलांसाठी खास सूट."
त्याला आयडिया आवडली. त्याने मला दोन हजार रुपये काढून दिले. म्हणाला "हे घे, तुझी फी."
त्या दिवशी माझ्या खिशात सहा हजार रुपये झाले. चारचे सहा झाले. पण खरा नफा सहा हजार नव्हता. खरा नफा राम होता.
मी लॉजवर आलो. राम बसला होता. मी त्याला पाचशे रुपये दिले. तो म्हणाला "भाऊ, तुम्ही शंभर बोलला होतात."
मी म्हणालो "शंभर पगाराचा आहे. चारशे विश्वासाचा आहे."
त्या दिवशी पहिल्यांदा मला कळलं. बिजनेस म्हणजे एकटा मोठा होणं नाही. बिजनेस म्हणजे अशी माणसं शोधणं जी कोणी बघत नसताना सुद्धा काच मनापासून पुसतात.
मी भिंतीवर चौथा नियम लिहिला. नियम 4 - सिस्टम म्हणजे माणसं. चांगली माणसं हीच सिस्टम असते.
आणि अंतर्मनातला आरसा? त्या दिवशी आरशात मी एकटा नव्हतो. माझ्या मागे राम उभा होता. आणि तो आरसा आता जास्त साफ दिसत होता.
क्रमशः...
पुढच्या भागात - सहा हजाराचे साठ हजार कसे होतील? आणि राम पहिल्यांदा खोटं बोलेल तेव्हा जय काय करेल?
---