भाग २
रात्रीचे साडेअकरा वाजले होते.
खोलीत फक्त टेबल लॅम्पचा पिवळसर प्रकाश होता. शर्वाणी लॅपटॉपसमोर बसली होती. स्क्रीनवर कालच्या निरीक्षणांच्या नोट्स होत्या.
एकामागून एक कैद्यांची नावं. त्यांच्याबद्दलच्या नोंदी.
वागणं.
बोलणं.
प्रतिक्रिया.
सगळं व्यवस्थित.
तिची नजर खाली सरकत गेली. आणि एका नावापाशी येऊन थांबली.
कैदी क्रमांक ४१२ — सरताज सिंग
पानावर फारसं काही नव्हतं. तीच गोष्ट तिला खटकत होती.
दिवसभरात तिने दहा-बारा कैद्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
पण सर्वात जास्त वेळ तिच्या डोक्यात कोण राहिला होता?
तो.....जो एक शब्दही बोलला नव्हता.
शर्वाणी खुर्चीत मागे रेलली. ज्याच्याशी एक वाक्यही बोलणं झालेलं नाही...त्याच्याबद्दल एवढा विचार का करायचा? तिने लॅपटॉप बंद केला.
पण झोपायला गेल्यावरही तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तेच दृश्य आलं.
खिडकीतून येणारा उजेड.
पुस्तक धरलेला हात.
आणि काही क्षणांसाठी सावलीतून बाहेर आलेली ती उंच आकृती.
दुसऱ्या दिवशी सकाळी युनिव्हर्सीटीमध्ये
शर्वाणीने फाईल टेबलवर ठेवली. समोर बसलेले प्राध्यापक देशमुख काही कागद तपासत होते. क्रिमिनॉलॉजी क्षेत्रातलं मोठं नाव. विद्यार्थ्यांमध्ये कठोर पण न्यायी म्हणून प्रसिद्ध. काही क्षणांनी त्यांनी चष्मा काढला आणि खुर्चीत रेलले.
"तर मग... पहिली भेट कशी झाली?"
शर्वाणीने फाईल उघडली.
"अपेक्षेप्रमाणे."
"म्हणजे?" त्यांनी फाईल हातात घेत विचारलं.
"बहुतेक कैदी बोलायला उत्सुक होते. काहींना स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं होतं. काहींना स्वतःची बाजू मांडायची होती. काही जण तर मी विचारण्याआधीच उत्तरं द्यायला लागले."
देशमुख सर हसले.
"माणसाला स्वतःची कहाणी सांगायला आवडते."
"हो."
"आणि तुला काय आढळलं?"
शर्वाणी काही क्षण विचारात पडली.
"एक गोष्ट विचित्र वाटली."
"काय?"
"एक कैदी आहे."
"हं."
"क्रमांक ४१२."
देशमुख सरांच्या चेहऱ्यावर काहीच बदल झाला नाही.
"नाव?"
"सरताज सिंग."
शर्वाणीने फाईल पुढे सरकवली. देशमुख सरांची नजर पानावर फिरली.
वय.
शिक्षा.
गुन्हा.
काही क्षण खोलीत शांतता पसरली.
"हा?"
"हो."
"काय विशेष?"
"तो बोलत नाही."
देशमुख सरांनी फाईल बंद केली.
"असं अनेकदा होतं."
"मला माहीत आहे सर."
"मग?"
शर्वाणीने खुर्चीत बसण्याची ठेवण बदलली.
"तो फक्त बोलत नाही असं नाही."
"मग?"
"जसं त्याने सगळ्यांनाच नाकारलंय."
देशमुख सर तिच्याकडे पाहत राहिले.
"थोडं स्पष्ट सांग."
"काल जवळपास दहा मिनिटं मी त्याच्या बॅरेकसमोर उभी होते."
"हं."
"त्याने वर बघितलंही नाही."
"कदाचित दुर्लक्ष केलं असेल." देशमुख सर तिला वास्तव सांगत होते.
"तसं वाटलं असतं तर मी हा विषय काढला नसता."
देशमुख सरांच्या भुवया किंचित उंचावल्या.
"म्हणजे?"
"त्याला माझी उपस्थिती जाणवत होती."
"कसं कळलं?"
"पुस्तक वाचताना हाताची पकड बदलते. शरीराची ठेवण बदलते. आवाजांवर प्रतिक्रिया बदलते."
ती थोडी थांबली.
"तो सगळं पाहतोय, सगळं ऐकतोय... पण प्रतिक्रिया द्यायची नाही असा निर्णय घेतलाय."
देशमुख सर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले.
"शर्वाणी."
"यस सर?"
"संशोधनात सर्वात धोकादायक गोष्ट कोणती असते माहिती आहे?"
"पूर्वग्रह?"
"नाही."
ती गोंधळली.
देशमुख सर थोडे पुढे झुकले.
"कुतूहल."
"कुतूहल?"
"हो."
शर्वाणी काही बोलली नाही.
"जे कैदी सतत बोलतात त्यांच्याबद्दल संशोधक फारसा विचार करत नाही."
देशमुख सर म्हणाले.
"पण जे काहीच बोलत नाहीत... ते संशोधकाच्या डोक्यात घर करतात."
त्यांनी फाईलकडे बोट दाखवलं.
"जे लोक काहीच बोलत नाहीत त्यांच्याबद्दल आपण निष्कर्ष काढतो... आणि बहुतेक वेळा ते निष्कर्ष चुकीचे निघतात."
"मी तसं करत नाहीये सर."
"अजून नाही."
देशमुख सर हसले.
"पण काळजी घे."
शर्वाणी शांत बसली.
सर खुर्चीत मागे रेलले.
"त्या माणसाच्या शांततेचा अर्थ शोधायचा प्रयत्न करू नकोस."
"का?"
"कारण शांततेला शंभर अर्थ असू शकतात."
ते काही क्षण थांबले.
मग म्हणाले,
"पश्चात्ताप."
"राग."
"अपराधीपणा."
"अहंकार."
"निराशा."
"किंवा..."
त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं.
"किंवा?"
"काहीच नाही."
शर्वाणीची नजर त्यांच्या चेहऱ्यावर खिळली.
देशमुख सर पुन्हा फाईल उघडत म्हणाले,
"तुझं काम त्याला समजून घेणं नाही. त्याचं निरीक्षण करणं आहे."
त्यांनी फाईल तिच्याकडे परत दिली.
"लक्षात ठेव."
"हो सर."
"तो तुझा विषय आहे. उत्तर नाही."
देशमुख सरांचा आवाज शांत होता.
शर्वाणीने फाईल हातात घेतली.
पण केबिनच्या बाहेर पडताना तिच्या मनात एकच विचार घोळत होता.
जर सरताज सिंग एक कैदी असेल...तर त्याच्याबद्दल विचार करणं थांबवणं इतकं कठीण का वाटत होतं?
दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा जेलमध्ये होती.
लोखंडी दरवाजे, किल्ल्यांचे आवाज, गज, भिंती.....काल पाहिलेलं सगळं तसंच. पण आज तिला ते थोडं कमी अनोळखी वाटत होतं.
"आलात मॅडम?" जेलर हसत म्हणाले.
"हो."
"संशोधन चांगलं चाललंय?"
"हो. काम तर सुरु केलंय."
"तुमच्याबरोबर आज हवालदार जाधव असतील." जेलर तिला म्हणाले.
"चालेल." शर्वाणी
हवालदार जाधव आणि ती दोघं कॉरिडॉरमधून पुढे चालत राहिले.
आज शर्वाणी अधिक बारकाईने निरीक्षण करत होती.
फक्त उत्तरं नाही. तर उत्तरं देताना चेहऱ्यावर उमटणारे भाव.
डोळे.
हातवारे.
शरीराची हालचाल.
काही कैदी बोलताना सरळ डोळ्यात बघत होते.
काही नजर चुकवत होते.
काही खोटं बोलताना नकळत दुसरीकडे बघत होते.
माणूस शब्दांपेक्षा शरीराने जास्त बोलतो...हे तिने पुस्तकात वाचलं होतं.
आज ती ते प्रत्यक्ष पाहत होती.
एक कैदी सतत स्वतःला निर्दोष म्हणत होता. पण प्रत्येक वेळी प्रश्न बदलला की त्याचं उत्तर बदलत होतं.
दुसरा कैदी पश्चात्ताप व्यक्त करत होता. पण त्याच्या आवाजात दुःखापेक्षा स्वतःबद्दलची कीव जास्त होती.
दुपार जवळ आली. शर्वाणी नोटबुकमध्ये काही नोंदी करत बसली होती.
आणि नकळत तिची नजर पुन्हा त्या दिशेने गेली.
हाय सिक्युरिटी विंग.
तो तिथेच होता...त्याच जागी.....त्याच पद्धतीने.
जसं कालपासून तो हललाच नव्हता.
पुस्तक.
हात.
उजेड.
शांतता.
कधी कधी माणूस जितका जास्त स्थिर दिसतो...तितकाच आतून तुटलेला असतो....हा विचार अचानक तिच्या मनात आला.
"मॅडम?" जाधव आवाज आला.
"हो?"
"ह्या बाजूला या."
ती पुन्हा कामात गुंतली.
काही वेळानंतर ती एका कैद्याची मुलाखत घेत होती. वय चाळिशीच्या आसपास. डोळ्यात एक विचित्र चलाखपणा. सुरुवातीला तो व्यवस्थित बोलत होता. प्रश्नांना उत्तरं देत होता. पण हळूहळू शर्वाणीच्या लक्षात आलं...तो उत्तरांपेक्षा तिच्याकडे जास्त लक्ष देतोय.
"तुम्हाला तुरुंगात आल्यावर सर्वात मोठा बदल कोणता जाणवला?"
तिने विचारलं.
तो हसला, "स्वातंत्र्याची किंमत समजली."
शर्वाणीने नोंद केली. पुढचा प्रश्न विचारला.
काही मिनिटांनी तो म्हणाला, "मॅडम... तुम्ही रोज येणार आहात का?"
शर्वाणीने वर पाहिलं, "संशोधन पूर्ण होईपर्यंत."
तो पुन्हा हसला. त्या हसण्यात काहीतरी होतं...जे तिला आवडलं नाही.
"मग आमचंही बरं होईल."
जाधवांच्या कपाळावर आठ्या आल्या, "सरळ उत्तर दे रे."
"साहेब मी सरळच बोलतोय", तो पुन्हा हसला.
"मॅडम रोज आल्या की वातावरण जरा बदलतं."
कॉरिडॉरमध्ये क्षणभर शांतता पसरली. शर्वाणीला अशा गोष्टी नवीन नव्हत्या.
कॉलेजमध्ये...कॉन्फरन्समध्ये....रस्त्यावर.
अशा नजरा आणि अशा वाक्यांना ती अनेकदा सामोरी गेली होती.
तिने दुर्लक्ष केलं.
"पुढचा प्रश्न." ती शांतपणे म्हणाली.
पण तो थांबला नाही.
"खरं सांगू मॅडम?" त्याने गजांना टेकत विचारलं.
"तुम्ही इथे संशोधनासाठी येता पण जीव आमचा वेडावतो हो. आमचंच संशोधन सुरु होतं."
जाधवांचा संयम संपला."बस! तोंड सांभाळून बोल." त्यांनी त्याला चांगलंच फैलावर घेतलं. तो खांदे उडवत विचित्र हसला.
शर्वाणीने पेन खाली ठेवलं. मुलाखत संपवली.
आणि तेव्हाच...काहीतरी तिच्या नजरेत आलं.
समोरच त्या कोठडीत....
सरताज
त्याच्या हातातलं पुस्तक बंद झालेलं होतं.
शर्वाणी काही क्षण तशीच थांबली. तिची नजर त्याच्या हातावर गेली.
उजव्या हाताची मूठ आवळलेली होती.
इतकी घट्ट...की हातावरच्या शिरा ताणलेल्या स्पष्ट दिसत होत्या.
त्याच्या बोटांमधले सांधे कडक झालेले जाणवत होते.
तो अजूनही काही बोलला नव्हता.
त्याने वर बघितलं नव्हतं.
तो उठला नव्हता.
पण त्या मुठीत...काहीतरी होतं.
राग?
तिरस्कार?
अस्वस्थता?
शर्वाणीला समजलं नाही.
काही सेकंद गेले.
तो कैदी अजून काहीतरी बोलत होता.
जाधव त्याला झापत होते.
पण शर्वाणीचं लक्ष तिकडे नव्हतं. तिची नजर सरताजवर होती.
मग...हळूहळू...त्याची मूठ सैल झाली. त्याने पुन्हा पुस्तक उघडलं.
आणि जणू काही घडलंच नव्हतं अशा शांतपणे वाचायला सुरुवात केली.
क्षण संपला....पण शर्वाणीच्या मनात मात्र तो क्षण अडकून राहिला.
मुलाखत संपली. नोट्स पूर्ण झाल्या. दिवस संपत आला. संध्याकाळी ती बाहेर पडत होती. निघताना तिची नजर पुन्हा एकदा त्या बॅरेककडे गेली.
तो अजूनही वाचत होता.
त्याच शांततेत....त्याच एकाग्रतेने.
पण आता तिला एक गोष्ट सतावत होती.
फाईलमध्ये लिहिलेलं होतं...
बलात्कार आणि खून
आणि आज...
एका स्त्रीबद्दल घाणेरडं बोललं गेल्यावर अबोल पण प्रतिक्रिया देणारा एकमेव माणूस तोच होता.
का?
तिने स्वतःला समजावलं....कदाचित योगायोग असेल. कदाचित तिचा गैरसमज असेल. कदाचित काहीच अर्थ नसेल.
पण संशोधकाचं मन प्रश्न विचारणं थांबवत नाही. घरी पोहोचल्यावर तिने नोटबुक उघडलं.
सरताजच्या पानावर नवीन नोंद केली.
निरीक्षण :
आज पहिल्यांदा भावनिक प्रतिक्रिया दिसली.
प्रतिक्रिया स्वतःशी संबंधित नव्हती.
कारण अज्ञात.
शर्वाणी बराच वेळ त्या ओळींकडे बघत राहिली.
आणि मग खाली अजून एक वाक्य लिहिलं.
"कधी कधी एखादा माणूस बोलत नाही म्हणून तो काही सांगत नाही असं नसतं."
तिने पेन बंद केलं.
पण तिला कल्पना नव्हती...
आज सरताज सिंगने पहिल्यांदा तिच्याशी संवाद साधला होता.
शब्दांनी नाही.
उत्तरांनी नाही.
फक्त...
त्या आवळलेल्या मुठीने.
To be continued......
********************