काळी बाहुली - भाग 1 kalyan mhaslekar द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काळी बाहुली - भाग 1

काळी बाहुली

भाग १ वडाखाली सापडलेली बाहुली

पावसाळा नुकताच संपला होता. मातीतअजून ओली होती आणि रस्त्याच्या कडेला असलेले हिरव गवत वाऱ्याबरोबर हळूहळू हलत होतं. दिवसा गाव शांत आणि इतर गावासारखं  दिसायचं, पण दिवस मावळला की गाव अंधारात बुडून आणि गावात एक अनामिक भीती पसरायची. घराबाहेर लावलेले दिवे रात्री बंद व्हायचे जणू दिव्याचा उजेडाने कोणीतरी घर शोधीत येईल . कुत्री एकाच दिशेला पाहून  बेसूर ओरडायची.  गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ कसलीतरी कुजबुज ऐकू यायची,आणि वर झाडावर बसून घुबड रात्रभर ओरडायची ,जणू झाडाखाली कोणी बोलत बसले आहे

त्या वडाच्या झाडाबद्दल गावात जास्त कोणी बोलत नसे किंवा विचारले तरी कोणी त्या झाडाबद्दल माहिती सांगत नसे . पण लहान मुलांना तिकडे जाऊ देत नसत. मोठी माणसंही रात्री त्या रस्त्याने जाणं टाळायची. वडाच्या झाडाखाली एक छोटंसं जुनं देवस्थान होतं. तिथे देवाची मूर्ती नव्हती, फक्त काळा दगड होता. त्या दगडावर वर्षानुवर्षे तेल आणि कुंकू चढवलं गेलं होतं. देवस्थानाच्या मागे जमिनीत एक खोलगट जागा होती. तिथे कायम ओलसर माती असायची.

निखिल जवळपास आठ वर्षांनी गावात आला होता. पुण्यात नोकरीला लागल्यापासून गावाकडे येणं फार कमी झालं होतं. यावेळी आजोबा खूप जास्त आजारी असल्यामुळे तो काही दिवसांसाठी गावात आला होता. गावात आल्यापासून त्याचे मित्र गणेश आणि अमोल त्याच्या कायम त्याच्या सोबत राहत होते

संध्याकाळी तिघेही गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर गप्पा मारत बसले होते. 

अचानक वडाच्या झाडाच्या गप्पा निघाल्या तेव्हा गणेशने वडाच्या झाडाकडे पाहिलं आणि म्हणाला, निखिल अजूनही तुझ्यात पहिल्या इतक धाडस आहे का .निखिल हसला. आणि म्हणाला हो नक्कीच पण अस का विचारत आहे 

गणेशने वडाच्या झाडाकडे बोट दाखवलं. तिथे जाऊन दाखव मग रात्री 12 वाजता.

अमोल लगेच म्हणाला, पण तिथली कोणतीही वस्तुला हात लावायचा नाही किंवा कोणतीही वस्तू सोबत घेऊन येऊ नको

निखिलने दोघांकडे पाहिलं आणि हसत म्हणाला एवढंच  ना मी आजच रात्री तिथे जाऊन येतो.

गणेशचा चेहरा अचानक गंभीर झाला. तो म्हणाला, मजा म्हणून सांगितलं, पण तिथे काही सापडलं तर हात लावू नकोस.

निखिलने त्याच्याकडे पाहिलं.आणि विचारलं काय वस्तू  आहे तिथे.

गणेशने काही उत्तर दिलं नाही. त्याने फक्त वडाच्या झाडाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती.

रात्र झाली तेव्हा निखिलच्या मनात त्या गोष्टीचा विचार पुन्हा आला. त्याला स्वतःलाच समजत नव्हतं की तो का उठला. घरात सगळे झोपले होते. बाहेर पूर्ण शांतता होती. निखिलने मोबाईलची टॉर्च लावली आणि घराबाहेर पडला.गावातून पुढे जाताना त्याला एक गोष्ट जाणवली. नेहमी रात्री कुठेतरी कुत्र्यांचा आवाज ऐकू यायचा. पण त्या रात्री एकही कुत्रं भुंकत नव्हतं जणू ते कोणाला तरी घाबरून कुठेतरी लपून बसले होते. वातावरणात विचित्र शांतता होती तो वडाच्या झाडाजवळ पोहोचला.

मोठ्या वडाच्या फांद्या काळोखात आणखी मोठ्या वाटत होत्या. वारा नव्हता, तरी काही  पानं हळूहळू हलत होती. निखिलने मोबाईलची टॉर्च देवस्थानाकडे वळवली.काळा दगड ओलसर दिसत होता.त्याने दोन पावलं पुढे टाकली.अचानक त्याला मागून एखाद्याने पाय ओढल्यासारखं जाणवलं.निखिल दचकून मागे वळला.तिथे कोणीही नव्हतं.

त्याने स्वतःच्या पायाकडे पाहिलं. गवताच्या वेली पायाला लागल्या होत्या. त्याने त्या बाजूला केल्या आणि स्वतःवरच हसला.तेवढ्यात त्याच्या मोबाईलची टॉर्च दोनदा लुकलुकली.

निखिल थांबला.मोबाईलची बॅटरी जवळपास फुल होती.

तो देवस्थानाजवळ गेला. तिथे जमिनीत काहीतरी काळं दिसत होतं. आधी त्याला ते कापड वाटलं. त्याने काठीने माती बाजूला केली.काळ्या कापडाचा एक छोटासा तुकडा बाहेर आला.

निखिलने तो हाताने ओढला.कापडासोबत मातीचा एक गोळा बाहेर आला.

त्या गोळ्यात काहीतरी अडकलेलं होतं.तो एका लहान बाहुलीचा हात होता.निखिलच्या अंगावर काटा आला.त्याने आजूबाजूला पाहिलं. तिथे कोणीही नव्हतं.

काही क्षण तो तसाच उभा राहिला. मग त्याने माती आणखी बाजूला केली.एक छोटी काळी बाहुली पूर्णपणे बाहेर आली.

बाहुली साधारण एका लहान मुलाच्या हाताएवढी होती. तिचे कपडे काळे होते. चेहरा काळसर आणि विचित्र होता. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिचे डोळे.

तिथे डोळे नव्हते.फक्त दोन खोल काळे खड्डे होते.तिच्या तोंडावर लाल धाग्याने शिवल्यासारख्या रेषा होत्या.निखिलने बाहुली उचलली.ती बर्फासारखी थंड होती.

त्याने लगेच हात मागे घेतला.बाहुली त्याच्या हातातून खाली पडली.

मातीवर पडताना तिचं डोकं एका बाजूला वळलं.निखिल काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला.

त्याला अचानक असं वाटलं की बाहुली त्याच्याकडे पाहत आहे.

तो विचार झटकून त्याने बाहुली उचलली आणि खिशात ठेवली.

घरी परतताना त्याला सतत कोणीतरी मागून चालत असल्यासारखं वाटत होतं. त्याने दोन वेळा मागे वळून पाहिलं, पण रस्त्यावर कोणीच नव्हतं.घराच्या दारापाशी पोहोचल्यावर त्याने खिशातून बाहुली काढली.

त्याच क्षणी घराच्या आतून एक आवाज आला.एखाद्या लहान मुलाच्या पावलांचा आवाज.

टक.

टक.

टक.

निखिल जागच्या जागी थांबला.घरात सगळे झोपले होते.त्याने हळूच दार उघडलं.

आत अंधार होता.

त्याने मोबाईलची टॉर्च लावली. घरात काहीही वेगळं दिसत नव्हतं.

तो आपल्या खोलीत गेला आणि बाहुली कपाटात ठेवली.

कपाट बंद करताना त्याला एक विचित्र वास आला. ओल्या मातीचा आणि जुन्या धुपासारखा वास.

त्याने दुर्लक्ष केलं.

रात्री त्याला बराच वेळ झोप आली नाही.

घड्याळात दोन वाजून सतरा मिनिटं झाली होती.

तेवढ्यात कपाटाच्या आतून आवाज आला.

खररर.

जणू कुणीतरी आतून लाकडावर नखं घासत होतं.निखिल उठून बसला.

पुन्हा आवाज आला.

खररर.

खररर.

त्याने मोबाईलची टॉर्च कपाटावर टाकली.काही क्षण तो तसाच बसून राहिला.मग त्याने कपाट उघडलं.आत काहीच नव्हतं.

बाहुली गायब होती.

निखिलच्या छातीत धडधड वाढली.त्याने खोलीत सगळीकडे पाहिलं.

अचानक पलंगाखालून अगदी हलका आवाज आला.

टक.

निखिल खाली वाकला.मोबाईलची टॉर्च पलंगाखाली गेली.काळी बाहुली तिथे पडली होती.पण आता तिचा चेहरा त्याच्याकडे होता.निखिलने बाहुली बाहेर काढली.

त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या अंगातून थंड शिरशिरी गेली.

जिथे आधी फक्त काळे खड्डे होते, तिथे आता त्या खड्ड्यांच्या आत दोन अतिशय बारीक पांढरे ठिपके दिसत होते.

निखिलने बाहुली दूर फेकली.त्याच क्षणी घराच्या बाहेरून एका मुलीचा आवाज आला.

निखिल.

तो आवाज अगदी स्पष्ट होता.निखिलच्या अंगावर काटा आला.

पुन्हा आवाज आला.निखिल, दार उघड.तो पलंगावरून खाली उतरला नाही.दाराबाहेर कुणीतरी उभं असल्यासारखं जाणवत होतं.

काही सेकंद शांतता होती.

मग दाराच्या खालच्या फटीतून दोन लहान पायांची सावली दिसली.निखिलचा श्वास अडकला.बाहेर उभी असलेली व्यक्ती हलली नाही.मग अगदी हळू आवाज आला.

मला आत येऊ दे.

निखिलने डोळे घट्ट मिटले.पण त्याच वेळी त्याला खोलीच्या मागच्या बाजूने आवाज ऐकू आला.

खररर.

त्याने डोळे उघडले.काळी बाहुली आता जमिनीवर नव्हती.

ती त्याच्या पलंगावर बसलेली होती.आणि तिचे काळे डोळे दाराकडे नव्हे तर निखिलकडे वळलेले होते.

बाहेरची सावली अचानक दारापासून दूर सरकली.

पावलांचा आवाज घराभोवती फिरू लागला.

एक फेरी.

दुसरी फेरी.

तिसरी फेरी.

मग अचानक सगळं शांत झालं.निखिलने थरथरत दाराकडे पाहिलं.दाराच्या बाहेर कोणीच नव्हतं.

पण जमिनीवर पावसाने ओली झालेल्या मातीचे छोटे छोटे ठसे दिसत होते.ते ठसे दारापासून घराच्या आत येत होते.

आणि ते थेट निखिलच्या पलंगापाशी येऊन थांबले होते.निखिलच्या लक्षात एक गोष्ट आली.

तो रात्री घरात आला तेव्हा त्याचे पाय पूर्ण कोरडे होते.मग हे ओले ठसे घराच्या आत आले कसे.आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या ठशांच्या शेवटी कुणाचेही पाय नव्हते.

फक्त काळी बाहुली होती.ती पलंगावर शांत बसली होती.

आणि तिच्या शिवलेल्या तोंडावरचा लाल धागा हळूहळू सैल होत होता

क्रमश: