बदलते रंग - भाग २
--------- -------
बोलायला कशी सुरूवात करावी हे अक्षयलाही सुचत नव्हते बाजूच्याच. आइस्क्रीम
पार्लरकडे बघत तो म्हणाला, "हे नवीन आइस्क्रीम पार्लर आहे नं? जास्त गर्दी दिसत नाही.
चल बसू थोडा वेळ." गीताला त्याला नाही म्हणवेना.तिने होकारार्थी मान हलवली."कसा
आहे तुझा नवा जाॅब?" त्याने संभाषण सुरू करण्यासाठी चॊकशी केली."छान आहे.आणि
तुझ्या नोकरीविषयी तर विचारायलाच नको.तू इतका रमलायस की सगळ्यानाच विसरलास."
तिने मनातली खंत प्रकट केली. "मी कोणाला विसरलो नाही पण जबाबदारीचे काम आहे;
त्यामुळे जास्त रजा घेता येत नाही आणि आई-बाबांना तिकडचा प्रदेश पहायची इच्छा होती
म्हणून. रजेत तेच तिकडे येत होते."अक्षय सांगू लागला."दिल्ली अशी किती लांब आहे;की
चार दिवसांसाठीही येऊ शकला नाहीस?" गीताच्या मनातील रुसवा व्यक्त होत होता.
पण अक्षयच्या लक्षात आले होते की तीसुद्धा मनोमन त्याची वाट पहात होती.नकळत
तिने मनातला भाव व्यक्त केला होता. त्यामुळे आता त्याने काही आडपडदा न ठेवता
बोलायला सुरुवात केली,"तसे पाहिले तर यावर्षीही घरच्या सगळ्यांना तिकडे यायचे
होते .यावर्षी सिमल्याला जायचे ठरवत होते पण मीच कुठेही न जाता इकडे यायचे
ठरवले. तुला भेटण्यासाठी मी मुद्दाम इकडे आलो आहे."आता मात्र गीता त्याच्या नजरेला
नजर देत नव्हती. त्याने बोलणे सुरू ठेवले." घरून माझ्यासाठी मुली बघायला सुरुवात
झाली आहे. पण माझ्या मनात फक्त तूच आहेस.आता फक्त तुझा निर्णय मला ऐकायचा
आहे." यावर काय बोलावे हेच गीताला कळेना.इतक्या सरळ सरळ तो असे काही विचारेल
अशी तिने कल्पनाच केली नव्हती."मी..मला.."ती चाचरत बोलण्याचा प्रयत्न करू लागली.
"घाईने निर्णय घेण्याची गरज नाही. विचार करून तुझा निर्णय सांग मी उद्या तुझ्या
ऑफिसमध्ये येतो " अक्षय म्हणाला.तितक्यातच अक्षयचा एक मित्र संदीप त्यांना पाहून
आत आला."या आइस्क्रीम पार्लरमध्ये आम्हाला सगळ्या मित्राना तुझ्याकडून पार्टी हवी
होती आणि तू हिला एकटीलाच काय ट्रीट देतोयस?"तो मोठ्याने हसत म्हणाला."तुम्हाला
पार्टी देण्यापूर्वी हे पार्लर कसे आहे हे बघायला आलो.आता कधी यायचे हे तुम्ही ठरवा."
अक्षय म्हणाला.त्याने संदीपसाठीही आइस्क्रीम मागवले. संदीप आल्यामुळे गीताला मात्र
हायसे वाटले.
दुस-या दिवशी संध्याकाळी अक्षय गीताच्या ऑफिसच्या बाहेर उभा राहिला.त्याला
फार वेळ वाट पहावी लागली नाही.त्याला पाहून फुललेला तिचा चेहरा पाहून त्याला
त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.बाजूच्याच रेस्टाॅरंटमधे ती त्याला घेऊन गेली."काय विचार
केलायस?" तिचे उत्तर माहीत असूनही त्याने विचारले.त्याला तिच्या चेह-यावरचे भाव
बघायचे होते."घरी काका-काकूना माहीत आहे का?आणि माझ्या घरीही सांगावे लागेल."ती
म्हणाली. अप्रत्यक्षरित्या दिलेल्या होकाराची त्याला गम्मत वाटली. तो हसत म्हणाला,
"आई-बाबांची संमती मिळवण्याची जबाबदारी माझी!तुझ्या घरी नंतर सांगूया.माझ्या आईची
तर तू लाडकी आहेस.तिची संमती मी गृहित धरली आहे.बाबासुद्धा नाही म्हणणार नाहीत.
मला खात्री आहे."ती संध्याकाळ त्यांनी भविष्याची स्वप्ने रंगविण्यात घालवली.
दुस-या दिवशी अक्षय त्याच्या आई-बाबाकडे गीताविषयी बोलणार होता. गीता
त्याच्या फोनची अधिरतेने वाट बघत होती.दुपारी लंचच्या वेळी त्याचा फोन आला.
तिला खात्री व होती आई-बाबांची लग्नाला संमती असल्याचे सांगण्यासाठी त्याने फोन
केला असणार.पण तिचा अपेक्षाभंग झाला. तो सांगत होता,"आज सकाळी ऑफिसमधून
फोन आला फाॅरिन डेलिगेट्स येणार आहेत आणि उद्या महत्वाची मीटिंग आहे.मी दुपारच्या
विमानाने दिल्लीला जातोय. मी तुला संध्याकाळी फोन करतो,मग सविस्तर बोलू."त्याने
घरी सांगितले की नाही हे गीताला समजायला काहीच मार्ग नव्हता. ती संध्याकाळची
आणि पर्यायाने अक्षयच्या फोनची वाट बघू लागली.संध्याकाळी त्याचा फोन आला तेव्हा तो
काही बोलायच्या आतच तिने प्रश्नांची सरबत्ती चालू केली,"तिकडे इतर लोक असताना तुझी
रजा का कँन्सल केली?किती दिवसानी तू रजा घेऊन आला होतास!"तिची नाराजी अक्षय
समजू शकत होता. तिच्या बोलण्यातून जाणवणारी सहवासाची ओढ त्याला सुखावत होती.
"हो! पण माझ्या खात्याच्या महत्वाच्या कामांकडे मलाच लक्ष द्यावे लागते. जरा ऐक!
अचानक् इकडे यावे लागल्यामुळे आई-बाबांना तुझ्याविषयी सांगयला वेळ मिळाला
नाही.इकडून फोनवर इतकी महत्वाची गोष्ट सांगणे योग्य नाही.तेव्हा आता मी परत
येईपर्यंत हे आपल्यातच ठेवावे लागेल." त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. यावर
ती म्हणाली "तू तिकडे लांब आहेस म्हणून तुला हे सोपे आहे पण मला रोज सगळ्याना
सामोरे जायचे आहे. माझ्यासाठी हे किती कठीण आहे हे तुला नाही समजणार.
तू परत कधी येतोयस?" तिची मनःस्थिति अक्षयलाही कळत होती. तिला शांत
करण्यासाठी तो म्हणाला,"लवकरच येईन.तू काळजी करू नको."
दोघांचेही रोज फोनवर बोलणे होत होते.त्याचा प्राॅजेक्ट सुरू झाला होता.आणि तो
मार्गाला लागेपर्यंत त्याला रजा घेता येणार नव्हती. अजून २-३ महिने तरी जाणार होते.
गीताच्या घरी परत तिच्या लग्नाचा विषय निघू लागला होता.काही दिवसांपुर्वी तिने
अभ्यासाचे कारण सांगून लग्नाचा विषय टाळला होता. आता काय सबब सांगायची
हे तिला सुचत नव्हते. जर अक्षयविषयी घरी सांगितले तर आई-बाबा निशाकाकू आणि
काकांना सांगतील आणि आपल्या मुलाने आपल्याला विश्वासात घेतले नाही याचे
त्यांना वाईट वाटेल.यासाठी तूर्त घरी काही न सांगणेच योग्य होते.काही तरी सबब
सांगायची म्हणून ती आईला म्हणाली "आई मी आताच तर सर्व्हिसला लागलेय.थोडे दिवस
मला मनसोक्त जगू दे न!""आत्तापासून सुरुवात केली तर वेळेवर लग्न जमेल.आता उगाच
आणखी उशीर नको." आई काळजीच्या स्वरात म्हणाली.
ते दोन महिने गीताला दोन वर्षांसारखे वाटले.ती नको म्हणाली तरी आई-बाबांनी
वरसंशोधनाला सुरुवात केलेलीच होती. आता दाखवून घ्यायच्या त्या नको वाटणा-या
कार्यक्रमाना सामोरे जावे लागतेय की काय याची तिला धास्ती वाटू लागली होती.
पण एक दिवस असा आला की तिच्यासमोरील सर्व प्रश्न सुटले.त्या दिवशी अक्षयचा
फोन आला तेव्हा तो खूप आनंदात होता." एक आनंदाची बातमी आहे. जो प्राॅजेक्ट
मी इथे करतोय तो महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. मुम्बईपासून सुरुवात होणार
आहे आणि त्यासाठी मला मुंबईला ट्रान्सफर मिळतेय." तो सांगत होता. " पुढच्या
आठवड्यात मी मुंबईला येतोय."त्याला किती आनंद झाला आहे हे त्याला न पहाताच
गीताला कळत होते.आता मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत याची तिला खात्री
पटली.आणि तिने देवाचे आभार मानले.पण खरंच त्यांचा मार्ग मोकळा झाला होता?
--- ***** ---
ठरल्याप्रमाणे थोड्याच दिवसात अक्षय मुंबईला आला.मुंबई ऑफिसला रूजू झाला.
एके दिवशी निशाताईनी त्याची परत मुंबईला बदली झाल्याबद्दल सत्यनारायायण करायचे
ठरवले. रविवारचा दिवस ठरविला.त्या दिवशी त्यांनी अगत्याचे निमंत्रण दिले होते उमेशचे
मित्र यशवंतरावाना! यशवंतराव आणि त्यांची पत्नी त्यांच्या मुलीला सायलीला घेऊन
पुजेला आले होते.सायली त्यांची एकुलती एक मुलगी. लाडावल्यामुळे ती किती गर्विष्ठ
झाली होती हे इतक्या कमी वेळातसुद्धा अक्षयच्या नजरेतून सुटले नाही.निशाताईंवर मात्र
तिच्या रूपाची मोहिनी पडलेली दिसत होती.दुस-या दिवशी सकाळी चहा पिताना त्याला
विचारले," कशी वाटली तुला सायली?काल तिला मुद्दाम बोलावलं होतं.दिसायला सुंदर आहे.
चांगल्या कुटुंबातली आहे; शिवाय तुमच्या पत्रिकाही जुळतायत. तुला पसंत असेल तर
लगेच लग्नाची बोलणी करता येतील."असे वाटत होते की अक्षयचा होकार त्यांनी गृहित
धरला होता."आई या विषयावर आपण संध्याकाळी बोलूया का? मला आता उशीर होतोय."
असे घाईत बोलून तो बाहेर पडला.निशाताईंना हे कळत नव्हत की तो प्रत्येक वेळी विषयाला
बगल का देतोय? अक्षय मात्र मनाशी ठरवत होता की आज संध्याकाळी घरी आई-बाबाना
गीताविषयी सर्व सांगून टाकायचे. त्याला मनात आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की
'आई गीताला मुलीप्रमाणे मानते; मग सून म्हणून तिच्याविषयी विचार का करत नाही?'
संध्याकाळी त्याने गीताला फोन केला " आज भेटता येणार नाही. घरी आपल्या
लग्नाविषयी बोलायचे आहे."ऑफिस सुटल्यावर तो सरळ घरी गेला.निशाताई वाट बघत
बसल्या होत्या. त्याचे चहा-पाणी झाल्यावर त्यानी विचारले, "मग सायलीसाठी होकार
कळवायचा की नाही?दुपारी यशवंतरावांचा फोन आला होता."यावर त्याने बाबांकडे पाहिले.
"तू कोणतेही दडपण मनावर ठेवून निर्णय घेऊ नको.तुझ्या मनात जे आहे ते निःसंकोचपणे
सांग.जरी यशवंतराव माझे मित्र असले तरी तुझ्या मनाविरुद्ध काही झालेले मला आवडणार
नाही."त्यांच्या या शब्दांनी अक्षयला थोडा धीर आला.हल्ली निशाताईंची तब्येत ठीक नसे
त्यामुळे तो त्यांच्या मनाविरुद्ध काही बोलायला थोडा घाबरत होता.पण आता त्याला
बाबांचा आधार वाटू लागला.त्याने बोलायला सुरुवात केली."सायली नाही;पण मला एक मुलगी
आवडली आहे आई!खरं तर तुलाही ती आवडते.गीताशिवाय कोणाशी लग्न करायचं नाही असं
मी ठरवलंय.माझा हा निर्णय तुम्हा दोघांनाही आवडेल याची खात्री आहे मला! तू तर तिला
तुझी मुलगी मानतेस.तू तर खुश झाली असशील!" पण निशाताईंनी नकारार्थी मान हलवली.
Contd .....part 3