बदलते रंग- भाग ३
"नाही!नाही! गीताविषयी असा विचार करू नको! तुला इतक्या मुली दाखवल्या;पण शेवटी मला भीती वाटत होती तेच घडले. तुला तुझा हा निर्णय बदलावा लागेल."त्या किती
घाबरल्या आहेत हे त्यांच्या स्वरावरूनच कळत होते.अक्षयला काय बोलावे हेच कळत
नव्हते.आईच्या या प्रतिक्रियेची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती.शेवटी त्याने प्रश्न केला,
आई! गीतामध्ये कोणती कमतरता आहे? सुंदर, सुशिक्षित, संस्कारी- कोणालाही आवडेल
अशी आहे ती!तुझा विरोध कशासाठी आहे?"मुलाने स्पष्टपणे कारण विचारताच निशाताईंची
मान खाली गेली."मला ती आजही प्रिय आहे.पण तिच्या पत्रिकेत काहीतरी दोष आहे.अनेक
ठिकाणी तिचे लग्न पत्रिकेसाठी मोडले आहे. तू एकुलता एक मुलगा आहेस आमचा !
विषाची परीक्षा नाही बघायची मला!"त्या म्हणाल्या लाडक्या मुलाचे मन मोडताना त्याना
किती दुःख होत आहे हे त्यांच्या डोळ्यातून बरसणा-या अश्रुधारांवरून स्पष्ट होत होते.
आता बाबांना बोलल्याशिवाय राहवेना," पण तिच्या अंगातले गूण न पाहता पत्रिकेतले
गूण पहाणारे लोक वेडे आहेत असं तूच म्हणाली होतीस नं? अचानक् तुझे विचार कसे बदलले? तो पुरोगामीपणा वरवरचा होता काय?" " हे पत्रिकेचं काय प्रकरण आहे?"
ध्यानीमनी नसताना पत्रिकेचा विषय आल्यामुळे अक्षय गोंधळून गेला होता. "अरे!
एक दिवस गीताच्या आईने मैत्रीण म्हणून हिच्याकडे मन मोकळे केले; आणि ही तेच मनात धरून बसली.तेव्हा मारे आधुनिक विचारांची आहे असे दाखवत होती ;पण खरे
सांगू?हे आचार-विचार मनात कुठेतरी दडून बसलेले असतात. आधुनिक विचार कृतीत
आणायची वेळ आली की फणा काढतात.अग! गीता चांगली मुलगी आहे.अक्षयची निवड
अगदी योग्य आहे.तू नको ते विचार मनात आणू नको."बाबा निशाताईना समजावण्याच्या
स्वरात म्हणाले. नेहमी शांत असणा-या उमेशचा आवाज आज चढला होता.
"तुम्ही काही म्हणा पण मला विषाची परीक्षा घ्यायची नाही." निशाताई निर्धाराने म्हणाल्या.
त्यांच्या निग्रही चेह-याकडे पाहून अक्षयने ओळखले की त्या काही समजून घेण्याच्या
मनःस्थितीत नाहीत.शेवटी त्याने तोडगा सुचविला,"आई! त्या मुलांची पत्रिका जमली नाही
म्हणून माझीही जमणार नाही असे नाही.आपल्याकडे काहीही विपरीत घडले की स्त्रीला
दोष लावायची पद्धत आहे;हे काही योग्य नाही.पण तुझ्या मनात शंका आहे म्हणून मी उद्या
दोघांचीही पत्रिका माझ्या मित्राकडे,विनयकडे घेऊन जातो त्याने काँप्यूटरमध्ये हा पत्रिकांच्या
गुणमेलनाचा प्रोग्रॅम टाकलाय. तू काही काळजी करू नको. सर्व काही तुझ्या मनासारखे
होईल." मुलाच्या आश्वासनाने निशाताई निर्धास्त झाल्या.
अक्षय मात्र झाल्या प्रकाराने भांबावून गेला होता. मधले तीन चार महिने तो दूर
असल्यामुळे गीतापासून दुरावला होता.जेव्हा मुंबईला ट्रान्सफर मिळाली तेव्हा मार्गातील सर्व
अडसर दूर झाले असे त्याला वाटले होते पण आता हे नवीनच विघ्न त्याची वाट रोखून उभे
होते.त्याला आता दैवाच्या हातातील खेळणे झाल्यासारखे वाटत होते.आता त्या दोघांच्या
प्रेमाचे भवितव्य दोन पत्रिकांवर अवलंबून होते
दुस-या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून अक्षय विनयकडे गेला.त्याच्याकडे त्यांचा
काॅलेजचा मित्र विकीही आला होता.विकी घरचा श्रीमंत पण लहानपणापासूनच अतिलाडांनी
बिघडलेला मुलगा! ड्रिंक घेणे, सिगारेट हे नाद त्याला काॅलेजमध्ये असल्यापासूनच होते.
सतत पार्ट्या,पिकनिक याशिवाय तर त्याला आयुष्य अळणी वाटत असे. आज तो सुद्धा
त्याची पत्रिका मेधाच्या पत्रिकेशी जुळतेय की नाही हे पहायला आला होता हे पाहून अक्षयला
आश्चर्य वाटले.त्याच्या एकूण व्यक्तिमत्वाशी हे विसंगत होते. मेधाशी त्याची काॅलेजमध्ये
असल्यापासून मैत्री होती.त्याच्या गोड बोलण्यामुळे असेल किंवा श्रीमंतीच्या रुबाबामुळे
असेल, त्याच्या दुर्गुणांकडे तिचे लक्ष जात नव्हते."निदान मेधासारख्या चांगल्या मुलीशी
लग्न झाल्यावर हा सुधारू दे! "अक्षय मनाशी म्हणाला.पत्रिका जुळल्याचे विनयने सांगताच
विकी खुश झाला."दोघेही लग्नाला नक्की या. मी इन्व्हिटेशन पाठवेनच.आता मला उशीर
होतोय.बाय!"म्हणून तो निघाला.
आता विनय अक्षयकडे वळला."बोल! काय महत्वाचं काम होतं तुझं? घरी सगळे ठीक
आहेत नं?तुझं ऑफिस कसं चाललंय?"त्याने आपुलकीने विचारले.
"सगळं ठीक आहे. पण मी वेगळ्याच कामासाठी तुझ्याकडे आलो आहे.माझं एका
मुलीवर प्रेम आहे पण आई म्हणतेय की पत्रिका जमली तरच लग्नाला परवानगी
देणार.मी तिची पत्रिका घेऊन तुझ्याकडे आलो आहे पण मनाशी ठरवलं आहे की काही
झाले तरी तिच्याशीच लग्न करेन." अक्षयने कैफियत मांडली. पत्रिका त्याच्याकडे देताना
गीताच्या डोळ्यांमध्ये दिसणारी आर्तता तो विसरू शकत नव्हता.अनिश्चिततेच्या जाणिवेने
तिच्या हाताला कंप सुटला होता डोळ्यांमध्ये पाणी तरळले होते.आईच्या जागी मानलेल्या
निशाकाकूंकडून तिने अशा वागण्याची अपेक्षा केली नव्हती.
"मी तुला ती मुलगी कोण आहे हे सुद्धा विचारणार नाही.पण जर तुझा निश्चय पक्का
असेल तर तू मला तुमच्या पत्रिका दाखवूच नको.जर पत्रिका जमल्या नाहीत तर उगाचच
मनात संशय ठेऊन तुझ्या वैवाहिक आयुष्याला सुरवात होईल.त्यापेक्षा पूर्ण आत्मविश्वासाने
जीवनाची वाटचाल कर. तुमचं एकमेकांवरचं प्रेम तुम्हाला कणखरपणे एकमेकांना साथ
देण्याची प्रेरणा देईल." विनयने त्याला मित्रत्वाचा सल्ला दिला.
खरे म्हणजे त्याच्या बोलण्याने अक्षयच्या मनावरील ताण हलका झाला.पण कुतुहल
म्हणून त्याला विचारल्याशिवाय रहावेना."तिला तू जवळून ओळखतोस. आमच्या बिल्डिंगमध्ये रहाणा-या गीताशी लग्न कराचंय मला. पण तू ज्योतिषशास्त्र मानतोस,अनेकाना सल्लाही
देतोस.तू मला पत्रिका न बघण्याचा सल्ला द्यावास याचे आश्चर्य वाटते."तो विनयला म्हणाला.
" खरे तर ज्योतिषशास्त्र हे सुद्धा एक परिपूर्ण शास्त्र आहे.भविष्याची वाट सुखकर व्हावी
यासाठी याची मदत होते.पण हे शास्त्र माणसांच्या स्वभावाशी आणि चारित्र्याशी निगडीत
आहे. विकीचेच उदाहरण घे! जर त्याने स्वैर वागणे सोडून दिले नाही, घर आणि कुटुंबाचे
महत्त्व जाणले नाही तर तो मेधाला सुखी करू शकेल का? अशा लग्नांमध्ये पत्रिका जमली
आणि म्हणून त्यांचा सुखी संसार झाला असे होत नाही.आपली सुखदुःखे ब-याच अंशी
जशी परमेश्वरी इच्छेवर अवलंबून असतात तशीच आपल्या हातून होणा-या चांगल्या-
वाईट कर्मांवरही अवलंबून असतात.लग्न जमवण्यापूर्वी पत्रिका पहावी असे माझे प्रामाणिक
मत आहे पण जर दोघांमधे प्रेम असेल आणि एकमेकांशिवाय जगणे अशक्य वाटत असेल
तर मात्र पत्रिका जमवण्याच्या फंदात न पडलेले बरे!" विनयने अक्षयला समजावले.
" पण आईला हे सर्व नाही पटणार! तिला हल्ली मानसिक ताण सहन होत नाही.
त्यामुळे तिला दुखवायला मला नाही आवडणार! मग हे जमणार कसे?तिला समजावणे एवढे
सोपे असते तर तुझ्याकडे कशाला आलो असतो?" अक्षयने आपली व्यथा सांगितली.
"तू काही काळजी करू नको.मी उद्या काकींना फोन करून सांगतो की लग्न ठरवायला
हरकत नाही.त्यांना कसे सांगायचं ते माझ्यावर सोड आणि लग्नाच्या तयारीला लाग! तुझ्या
दोस्तीसाठी इतकं तरी करायलाच हवे. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे.आणि गीता खरंच
चांगली मुलगी आहे.मी चांगली ओळखतो तिला!" विनयने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवत
आश्वासन दिले.त्याचे आभार मानून अक्षयने त्याचा निरोप घेतला.
दुस-या दिवशी दुपारी विनयने त्याच्या घरी फोन केला.निशाताईंनी फोन उचलला."काकी
मी विनय बोलतोय! अक्षय आहे का?"तो म्हणाला."अक्षय ऑफिसला गेलाय.काही अर्जंट काम
होतं का?"उमताईनी विचारले.
"काल तो पत्रिका देऊन गेला होता; त्याविषयी बोलायचं होतं." विनय म्हणाला.
"पत्रिका जुळतायत का?" नीताताईनी विचारले.त्यांच्या स्वरात काळजी डोकावत होती.
"काळजी करण्याचे काही कारण नाही काकी,सर्व काही ठीक आहे.अक्षयची निवड अगदी
योग्य आहे. तुम्ही आता लग्नाच्या तयारीला लागा." विनय म्हणाला."अक्षय आला की मला
फोन करायला सांगा."
निशाताईंनी फोन ठेवला.त्यांच्या मनावरचे मोठे ओझे उतरले होते.जरी त्यानी वरवर नाराजी दाखवली असली तरी पत्रिका जमाव्यात अशी त्यांचीही इच्छा होती.यानंतरच्या
घटना वेगाने घडल्या.काही दिवसांतच अक्षय आणि गीताचे लग्न झाले.गीता निशाताईंची
पुर्वीपासूनच लाडकी होती आता सून म्हणून घरी आल्यावर तिला त्यांची भरभरून
माया मिळू लागली .ती सुद्धा त्यांची मुलीप्रमाणे काळजी घेऊ लागली.घर सुखा-समाधानाने
भरून गेले. चार वर्षे गेली.त्यांच्या मुलाचा सिद्धेशचा वाढदिवस त्यानी थाटामाटात साजरा
करण्यचे ठरविले.त्यावेळी विनयलाही बोलावलं होतं.घरातले प्रसन्न वातावरण, सगळ्यांच्या
चेह-यावरील आनंद पाहून विनयचे कुतुहल जागे झाले.तो अक्षयला म्हणाला," तुला मी
तुझ्या लग्नाच्या वेळी लव्ह मॅरेज आहे तर पत्रिका बघू नको असं सांगितलं होतं.पण मला
तुमच्या दोघांच्याही पत्रिका पहायच्या आहेत.इतका सुखी संसार करणा-या जोडप्याच्या
पत्रिकांचा मला अभ्यास करायचा आहे. मला असं वाटतं की तेव्हाही तुमचे गूण
नक्की जमले असते " तो आता विसरलेला विषय परत उकरून काढतोय हे पाहून
अक्षयच्या अंतर्मनात धोक्याची घंटा वाजू लागली. " ते सर्व आता विसरून जा. उगाच
नकोत त्या गोष्टी घरच्यांसमोर यायला नकोत.आईला जर काही कळलं तर पहिला
गुन्हेगार तू असशील;माहीत आहे नं? त्यापेक्षा यापुढे ' तेरी भी चुप मेरी भी चुप ' विसरू
नको. योग्य वेळ आली की मी आईला सांगणारच आहे.पण आता तू काही घोळ घालू
नको आणि यातले काही गीतालाही कळता कामा नये.तिलाही आईला खोटे सांगून लग्न केले
हे आवडणार नाही.ती उगाच मनाला लावून घेईल."त्याने विनयला दटावले.
बोलता बोलता विनयला विकीची आठवण आली ,"विकी आणि मेधाचे गूण मात्र खरंच
जमले ! आता पिकनिक पार्ट्या सर्व विसरून मेधा आणि छोट्या ऋचामधे पूर्ण गुंतून गेलाय.
आश्चर्यकारक बदल झालाय त्याच्यात! "मित्राचा सुखी संसार पाहून त्याला किती आनंद झाला
होता हे त्याच्या स्वरांवरूनच कळत होते.
आतापर्यंत नेहा काँप्यूटर इंजिनीयर झाली होती. सुंदर आणि सुस्वभावी असली
तरी शेंडेफळ असल्यामुळे थोडी हट्टी होती त्यामुळे तिला मनासारखा जोडीदार शोधायला
थोडा वेळ लागण्याची शक्यता लक्षात घेऊन काही दिवसांनी घरात नेहासाठी स्थळे
बघायला सुरवात झाली.उमेशच्या एका मित्राने एक चांगला मुलगा सुचवला होता.परदेशातून
शिकून आलेला,स्मार्ट सुनील घरात सगळ्यानाच आवडला होता. ते कुटुंब नेहाला पाहून
गेले त्यानंतर दोन दिवसानी उमेशचे मित्र आले.थोडे अस्वस्थ दिसत होते.शेवटी जड शब्दांत
म्हणाले,"नेहा त्याना पसंत होती पण पत्रिका जमत नाही,त्यामुळे नाइलाज आहे असं
म्हणाले सुनीलचे वडील!" यावर निशाताईंची प्रतिक्रिया अक्षयला अनपेक्षित होती.
"हे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे लोक इतके अंधविश्वासू कसे असू शकतात? काय
उपयोग यांच्या शिक्षणाचा?बरं झालं आधीच कळलं. अशा बुरसटलेल्या विचारांच्या घरात
लग्न नाही ठरलं तेच बरं झाले."त्या तावातावाने बोलत होत्या.उमेशने मिश्किल हसत
अक्षयकडे पाहिले.अक्षय अवाक् होऊन आईकडे पहात होता.बहूधा तो विचार करत असावा
की आईचा खरा चेहरा कोणता?
- END-
************