Pivala Rang books and stories free download online pdf in Marathi

पिवळा रंग

प्रवास

बॉसला लिव्हसाठी मेल केला आणि घरी गेल्यावर काय काय करायचं याचा विचार करायला लागलो. पण माझ्या बाबतीत नेहमी असच होतं. घरी गेल्यावर काय करायचं हे मी आधीपासूनच ठरवतो आणि ठरवलेल्यापैकी काहीच न करता अंथरुणावर लोळत वेळ घालवतो आणि जेव्हा निघण्याचा दिवस उजाडतो तेव्हा लक्षात येतं की आपण चार दिवस काहीच केलं नाही. घरातून बाहेर पडायची इच्छा तर नसते, पण करणार काय, ऑफिस मधलं काम तर मलाच करयला लागणार आहे. बॉसला फोन करुन आजारी आहे असं सांगावं आणि अजून एक दिवस घरी लोळत पडावं असा विचारही मनांत येतो, पण मग मी माझ्या मनावर आवर घालतो आणि घरातून बाहेर पडून बसस्टॅण्डवरून परत पुण्याची गाडी पकडतो.

पण आपण कुठे होतो? हा, मी बॉसला लिव्हसाठी मेल केला आणि सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवसांची रजा मागितली. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे सलग चार दिवस घरी म्हणजेच कोल्हापूरला घालवण्याचा माझा विचार होता आणि बॉसनेही यावेळी कोणताही प्रश्ण न विचारता माझी रजा मंजूर केली. तसं मी बॉसला आधिच बोललो होतो की हातातलं काम संपवून जाईन आणि बोलल्याप्रमाणे मी शुक्रवारी रात्रि उशिरापर्यंत थांबून हातातलं काम संपवलं सुद्धा.

शनिवारी सकाळी सव्वा सात वाजता मी स्वारगेटला पोहोचलो. शनिवारी बसेसना गर्दी असते म्हणून मी आधिच रिसर्वेशन केलं होतं. पण आज जास्त गर्दी नव्हती. रिसर्वेशन करायच दुसरं कारण म्हणजे बसच्या बाबतीतलं माझं फुटकं नशीब. जेव्हा जेव्हा मी बसने प्रवास करतो तेव्हा एकतर मला बसायला जागा तरी मिळत नाही किंवा जागा मिळालीच तर अगदि मागची सीट मिळते. पण हे फक्त माझ्याच बाबतित होतं असं नाही , तर आमच्या घरातल्या सगळ्यांचच म्हणजेच माझ्या आई, बाबा आणि भावाचं सुद्धा नशीब माझ्यासारखंच फुटकं आहे.

हा, तर मी बसची वाट पाहत उभा होतो. पंधरा ते वीस मिनिटातच बस आली. पण तेवढ्या वेळात सुद्धा माझ्या मनात कितीतरी विचार येउन गेले. आई - बाबा कसे असतील, घरी गेल्यावर आईला कोणते पदार्थ बनवायला सांगायचे, जवळ पास कुठे फिरायला जायचं, आई नेहमीप्रमाणे व्यायाम करतोस का? असं विचारणार आणि पोट कमी करण्याचा सल्ला देणार तर यावेळी काय सांगायचं हे आणि यासारखे बरेच विचार. पण मला खुप छान वाटत होतं. तब्बल तीन महिन्यांनंतर मी घरी चाललो होतो. इतक्या दिवसांनंतर मी आईच्याहातचं खाणार होतो. आईच्या हातच्या जेवणाची सर बाहेरच्या जेवणाला नाही येत. तुम्ही कितीही महागड्या हॉटेलात जावा पण तिथलं खाउन ते समाधान नाही मिळत जे आईने बनवलेला वरण भात किंवा पिठलं भाकरी खाल्यावर मिळतं.

मी बसमध्ये चढलो आणि माझ्या जागेवर जाउन बसलो. माझ्या शेजारच्या सीटवर कोणीच बसू नये अशी माझी इच्छा होती पण पुढची सीट असल्यामुळे ते काही शक्य नव्हतं. मी खिशातून मोबाईल काढला आणि हेडफोन कानाला लावून गाणी ऐकत बसलो. तेवढ्यात एक गृहस्थ तेथे आले आणि माझ्या शेजारच्या सीटवर बसले. तो माणूस चांगलाच स्थुल होता आणि जणूकाही घरीच खुर्चीवर बसल्याप्रमाणे निवांत जागा व्यापून बसला. मी तर पार चेंगरून गेलो. हातात कसाबसा मोबईल धरून मी अवघडून बसलो होतो.

बस आता स्वारगेटवरून निघाली. अजुनही मी तसाच अंग चोरून बसलो होतो. मनातल्या मनात त्या जाड्या माणसाला आणि स्वतःच्या नशिबाला शिव्या देत होतो. तेवढयात तो माणूस माझ्याकडे वळला आणि भांड्यांवर अक्षरं कोरताना जसा आवाज येतो तश्या आवाजात मला म्हणाला, "दादा, तुम्ही माझ्या जागेवर बसाल का? त्याचं काय आहे, मला जरा मळमळतय त्यामुळे खिडकीपाशी बसलेलं बरं. " मला दुसरा पर्यायच नव्हता. नाहीतर माझा पिवळ्या रंगाचा लकी शर्ट खराब झाला असता. त्या माणसाला मनातल्यामनात चार शिव्या दिल्या आणि मी तिथुन उठलो.

आता माझ्यासाठी केवळ बूड टेकण्यापुरतीच जागा राहिली होती. यापेक्षा मागची सीट मिळाली असती तरी चाललं असतं. मग माझ्या मनांत विचार आला, त्या माणसाला शिव्या देउन तरी काय फायदा आहे. त्याची तरी काय चुक आहे. त्याचा देहच तेवढा आहे त्याला तो तरी काय करणार. पण मग मला आईचे शब्द आठवले, 'काय व्यायाम करतोस की नाही? पोट कधी कमी होणार तुझं.' मी तरी कुठं अगदी बारीक आहे आणि आई सांगते तसा जर मी व्यायाम नाही केला तर काही वर्षात माझीही अवस्था त्या जाड माणसासारखी होईल असा विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला आणि त्या नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला आणि माझ्या नकळत माझी नजर माझ्या वाढलेल्या पोटाकडे गेली. उद्यापासूनच व्यायाम सुरु करायचा असं मी मनोमन ठरवलं.

आज पहिल्यांदा पिवळ्या रंगाने मला दगा दिला होता. पिवळा रंग आपल्यासाठी लकी आहे असा आत्तापर्यंत माझा समज होता आणि तसा अनुभव सुद्धा मला कित्येकदा आला होता. मी जॉबसाठी इंटरव्यूव्हला जाताना सुद्धा पिवळ्या रंगाचाच शर्ट घातला होता आणि मला जॉब मिळालापण. एवढच नाही तर कॉलेज मध्ये असताना मॅथ्सच्या पेपरला मी पिवळ्या रंगाचा शर्ट घालुन गेलो. मी ६० मार्क्सचाच पेपर लिहिला होता अणि मला ६५ मार्क्स मिळाले. मी जर शाळेचा मुख्याध्यापक असतो तर मी युनिफॉर्म सुध्हा पिवळ्या रंगाच ठेवला असता. मी शाळेत असताना जर युनिफॉर्म पिवळ्या रंगाचा असता तर कदाचित मी बोर्डात देखिल आलो असतो. हा विनोदाचा भाग जरी बाजुला केला तरी सांगायचा मुद्दा असा की पिवळा रंग माझ्यासाठी कायमच लकी आहे.

मगाशी मी जे बोलली कि आज पहिल्यांदाच पिवळया रंगाने मला दगा दिला ती जरा अतिशयोक्तीच होती. या आधीही एकदा पिवळ्या रंगाने रंगाचा बेरंग केला होता. गोष्ट कॉलेजच्या दिवसातली आहे. कॉलेजला असतांना मी मधल्या सुट्टीत रोज लायब्ररीत जायचो. तशी वाचनाची आवड मला पहिल्या पासूनच आहे. त्यामुळे जेंव्हा इतर मुलं बहेर जाउन खेळायची तेंव्हा मी लायब्ररीत जाउन वाचायचो. तीही रोज न चुकता लायब्ररीचा यायची. कायम एकटीच असायची. फारशी कुणाशी बोलायची नाही. आली कि रॅक वरून पुस्तक घ्यायची. जराही इकडं तिकडं न पाहता पूर्ण वेळ पुस्तक वाचण्यात मग्न असायची. कांही दिवसांनी माझ्या लक्ष्यात आलं कि ती फक्त जी.ए कुलकर्णींचीच पुस्तकं वाचते. जी. ए माझेही आवडते लेखक आहेत. मग मीच एकदिवस तिला म्हणालो, "जी.ए तुमचेही आवडते लेखक आहेत वाटतं." तिने माझ्याकडे पाहिले आणि केवळ "हो" म्हणाली. मग मी आपण होऊनच तिच्याशी बोलायला सुरुवात केली. बोलायचा विषय जी. एं च्या कथा. मग हळु हळु तीही बोलयला लागली. ती तिच्या आवडत्या कथांबद्दल सांगायची. त्यातल्या बहुतेक सगळ्या कथा जी. एं च्याच असायच्या. कधीतरी माझ्या एखाद्या जोकवर हसायची सुद्धा पण तेही अगदी मोजून मापून. जणुकाही हसल्यावर टॅक्स द्यायला लागतो. आता आमची चांगलीच मैत्री झाली होती. "तुम्ही" ची जागा आता "तू " ने घेतली होती. एखादा दिवस जरी ती लायब्ररीचा नाही आली तरी मला खुप चुकल्या सारखं वाटायचं. मग माझं वाचनातही लक्ष लागायचं नाही. खरंतर मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण तिच्या मनांत माझ्याबद्दल काय आहे हे अजुनही मला नीट समजत नव्हतं. आमच्यात इतकी चांगली मैत्रि होउन देखिल ती काहीशी अलिप्तच असायची. तीला तिच्या घरच्यांबद्दल विचारलं कि ती फारसं सांगायची नाही. इतकया दिवसात तिच्या घरच्यांबद्दल केवळ दोनच गोष्टि मला समजल्या होत्या. एक म्हणजे तिचे वडिल एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतात आणि दुसरी गोष्ट तिची आई गृहिणी आहे. पण मला तिची हीच गोष्ट आवडायची. तिचं कमी बोलणं, तिचं जी. एं च्या कथांमध्ये रमण, तिचं मोजुन मापून हसणं, तिचं सर्वकांही मला आवडायचं. आमच्या मैत्रीला आता बरेंच दिवस झाले होतें. आता मी ठरवलं तिला प्रपोज करायचं . काहिही झालं तरी आज तिला माझ्या मनातलं सांगायचं. मी सकाळी लवकर उठलो. खरंतर मला झोप निट लागलीच नव्हती. दात नेहमीपेक्षा जास्त जोरात घासले. आरश्यात पाहुन तिला काय बोलायचं याचं प्रॅक्टिस केलं. मनांत थोडी चलबिचल होतीच. कपाटातून माझा लकी पिवळा शर्ट काढला. चांगली इस्त्री करुन घातला. पॅण्ट चढवली. बूट पॉलीश केले. मनांतल्या मनांत काय बोलायच याची पुन्हा एकदा उजळणी केली आणि घरातुन बाहेर पडलो. वाटेत फुलवाल्या कडून एक गुलाबाचं फुल घेतलं. खरंतर अशावेळी लाल गुलाब देतात, पण आपल्याला पिवळा रंग लकी म्हणुन मी पिवळा गुलाब घेतला.

मी कॉलेजला पोहोचलो. आज माझं कशात लक्षच लागत नव्हतं. केवळ तिचेच विचार मनांत येत होते. मी लायब्ररीचा आलो. अजुन ती आली नव्हती. मी एक पुस्तक घेतलं आणि वाचत बसलो. हातांत जरी पुस्तक असलं तरी माझं सग लक्ष दाराकडे होतं. ती आली. तिने मोरपंखी कुर्ता घातला होता. त्यांत ती खुप सुंदर दिसत होति. माझ्या ह्रिदयाची धडधड वाढली. मी बॅगेतुन गुलाब कढला आणि तिच्यापाशी गेलो. तोंडातून शब्दच निघत नव्हते. मी तिच्याकडे पहात नुसता उभा होतो. तिने माझ्याकडे पहिले आणि मानेनेच "काय" असं विचारलं. मी बोलायला लागलो, "मला तू आवडतेस. आता तू विचारशील कि तुला माझ्याबद्दल काय आवडतं. तर मला तुझ्या सगळ्याच गोष्टि आवडतात. तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं वाचनात मग्न होणं, तुझं दिसणं, तुझं सगळं काही मला आवडतं. माझ्या कडे सर्व कांही आहे. पैसा, गाडी , माझे आई - वडिल, भाऊ सर्व काही. आता फक्त तुझीच कमी आहे आयुष्यात. मी खुप प्रेम करतो तुझ्यावर. तुला कायम सुखात ठेवीन. होशील माझी?" एवढं बोलुन मी हातातला गुलाब तिच्यासमोर धरला. एवढावेळ गंभीर असलेली ती एकदम हसायला लागली. ती मला म्हणाली, "मुलींना कोणत्या रंगाचा गुलाब द्यायचा हेसुद्धा कळत नाही आणि म्हणे माझी होशिल का?" एवढं बोलुन ती परत हसायला लागली. तिने माझ्याशी बोललेलं हे आत्ता पर्यंतचं सर्वात मोठं वाक्य होतं. ती हसतच तिथुन निघुन गेली आणि आपलं प्रेम किति एकतर्फी होतं याची मला जाणीव झाली.

माफ करा, थोडं विषयांतर झालं. हा, तर आता गाडी कात्रज जवळ पोहोचली. अजूनही मी अस्वस्थ होतो. निर्विकार चेहेऱ्याचा कंडक्टर आला आणि "कुठे जायचय?" असं त्याने मला विचारलं. मी मोबाईलमधून इ - तिकीट कंडक्टरला दाखवलं. कंडक्टरने त्या जाड्या माणसाला विचारलं तसा तो त्याच्या त्या भांडयांवर कोरताना होणाऱ्या आवाजाप्रमाणे विचित्र आवाजात बोलला, "एक सातारचं तिकिट द्या." कंडक्टर निर्विकारपणे म्हणाला, "गाडी साताऱ्यात जात नाही. तुम्हांला हायवेला उतरायला लागेल." हे ऎकून मी इतका खुश झालो की तो जाड माणूस काही बोलायच्या आत जागेवरून उठलो. कंडक्टर पुन्हा म्हणाला, "मागून सातारची गाडी येतीय. हवंतर तुम्ही इथे उतरून त्या गाडीत चढू शकता." तसा तो माणूस उठला. कंडक्टरने बस थांबवली. तो माणूस बसमधून बाहेर पडला. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि निवांत खिडकीपाशी जाउन बसलो. माझ्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून तो निर्विकार चेहेऱ्याचा कंडक्टर सुद्धा पहिल्यांदाच हसला आणि मी माझ्या पिवळ्या रंगाच्या शर्ट वरुन एकदा नजर फिरवली.

लेखक - निरंजन कुलकर्णी

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED