इच्छा Niranjan Pranesh Kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इच्छा

इच्छा

सदाशिवराव आपल्या दोन खोल्यांच्या घरात नेहमीप्रमाणे महाभारताचं पारायण करत होते. आता शेवट आला होता. कृष्णाने अश्वत्थाम्याला शाप दिला. हे वाचताना खरच अजूनही अश्वत्थामा जिवंत असेल का? असा प्रश्न त्यांना कायम पडायचा. सत्तरी ओलांडलेल्या सदाशिवरावांची जिवंत असेपर्यंत एकदातरी अश्वत्थाम्याला पहायची तीव्र इच्छा होती.

सदाशिवराव पुढे वाचू लागले पण त्यांचं मन अजूनही अश्वत्थाम्यावरच रेंगाळलं होतं. कपाळावर वस्त्र बांधलेल्या, हातात भांडं घेऊन तेल आणि पीठ मागत फिरणाऱ्या अश्वत्थाम्याची उंचीपुरी, बळकट मूर्ती त्यांच्या मनःपटलावर उमटली. त्यांनी परत एकदा वाचायचा प्रयत्न केला पण त्यांचं लक्ष आता वाचनात लागेना. अश्वत्थामा त्यांच्या मनातून जात नव्हता. सदाशिवरावांनी ग्रंथ मिटला व कपाटात ठेवला. त्यांनी चश्मा काढून टेबलावर ठेवला व ते गादीवर आडवे झाले. थोड्याच वेळात त्यांना झोप लागली.

दरवाजाची बेल वाजली वा त्या आवाजामुळे सदाशिवरावांना जाग आली. डोळे चोळतच त्यांनी दरवाजा उघडला. डोळ्यांवर चश्मा नसल्यामुळे सदशिवरावांना अस्पष्ट दिसत होतं. समोर एक भिकारी हातात भांडं घेऊन उभा होता. तो चांगलाच उंच वाटत होता पण तितकाच कृश दिसत होता. त्याच्या कपाळावर एक मळकट कापडाची पट्टी बांधली होती. हा अश्वत्थामा असेल का? सदाशिवरावांच्या मनात विचार आला. कारण त्या भिकाराच्या कपाळावर पट्टी बांधली होती तसेच तो चांगलाच उंच होता. त्याचं शरीर मात्र अतिशय कृश होतं. पण इतकी वर्ष चालून कदाचित तो अशक्त झाला असावा असं सदशिवरावांना वाटलं. आता तो भिकारी साक्षात अश्वत्थामाच आहे अशी त्यांची खात्री पटली. सदशिवरावांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्यांना काहीच सुचत नव्हत. बराचवेळ ते नुसते त्या भिकारयाकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत एकाचवेळी आनंद आणि कुतूहल दिसत होत. त्यांच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. शेवटी कंटाळून तो भिकारी तिथून निघाला. हे पाहताच ते ओरडले. ‘थांब’ एवढा एकाच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर आला. तसा तो भिकारी परत आला. सदाशिवराव आत गेले व एका हातात भांडं व दुसऱ्या हातात तेलाची बाटली घेऊन बाहेर आले. त्यांनी त्या भिकारयाच्या हातातील भांड्यात पीठ टाकले व त्यातच बाटलीतील थोडे तेल ओतले. सदाशिवराव चक्क त्या भिकाऱ्याच्या पाया पडले. भिकारयाने ‘काय वेडा म्हातारा आहे’ अशा नजरेने सदाशिवरावांकडे पाहिले व त्रासिक चेहेरा करून तो तिथून पुढे निघाला.

सदाशिवरावांनी दरवाजाला आतून कडी लावली व ते आत खुर्चीवर बसले. त्यांच्या चेहेरयावरचा आनंद अजूनही कमी झाला नव्हता. खूप वर्षांपासूनची त्यांची अश्वथाम्याला पाहण्याची इच्छा आज पूर्ण झाली होती. आता ते त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना, शेजारी पाजाऱ्यांना, सर्वांनाच अश्वत्थाम्याने दिलेल्या दर्शनाचा प्रसंग रंगवून सांगणार होते. ते खुर्चीवरून उठले व टेलीफोनवरून त्यांच्या मुलाचा नंबर लावला. मुलाने फोन उचलला. पण सदाशिवराव काही बोलायच्या आत त्याने “बाबा मी मिटिंग मध्ये आहे. तुम्हाला नंतर कॅाल करतो.” एवढे बोलून फोन ठेवला.

सदाशिवरावांना स्वस्थ बसवेना. त्यांनी चश्मा घातला, दरवाजामागे अडकवलेला शर्ट चढवला व ते घराबाहेर आले. बाहेर काही अंतरावर एका घरासमोर बरीच गर्दी जमली होती. सदाशिवराव गर्दीच्या दिशेने चालू लागले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी घोळक्यातून आत शिरायचा प्रयत्न केला पण लोक तिथून हलत नव्हते. शेवटी बराच वेळानंतर गर्दी थोडी कमी झाली आणि सदशिवरावांना जागा मिळाली. पण समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. थोड्या वेळापूर्वी त्यांना दर्शन दिलेला अश्वत्थामा म्हणजेच तो भिकारी निपचित पडला होता. त्याचे डोळे खोबणीतून बाहेर आले होते वा तोंड उघडलेलं होतं. सदाशिवरावांच्या संपूर्ण शरीराला कंप सुटला. आता त्यांना तिथे नीट उभही राहता येईना आणि शक्तिपात होऊन ते खाली कोसळले. जवळच उभ्या असलेल्या माणसाने त्यांना पाहिले व सारी गर्दी सदाशिवरावांकडे वळली. दोन जणांनी त्यांना उचलले व त्यांच्या घरी आणले. शेजारीच राहणारा गजानन घरून कांदा घेऊन आला व त्याने कापलेला कांदा सदाशिवरावांच्या नाकाला लावला. कांद्याच्या उग्र वासाने ते शुद्धीवर आले. गजानन आतून पाण्याचा पेला घेऊन आला. पाणी पिल्यावर सदाशिवरावांना थोडं हायसं वाटलं. आता सदाशिवरावांना परत शुद्धीवर आलेलं पाहताच त्यांच्या घरासमोरची गर्दी परत त्या भिकाऱ्याकडे वळली. गजाननने आतून दरवाजा लावून घेतला. सदाशिवराव अजूनही काही बोलत नव्हते. गजाननने त्यांना तो भिकारी कसा मेला ते सांगितले.

तो भिकारी एक बहिरूपी होता. तो रोज वेगवेगळ रूप घेऊन दारोदारी जाऊन भीक मागायचा. तो कधी पोलिसाचं तर कधी डाकुचं रूप घ्यायचा. काही वेळा तर तो अगदी रावणासारख्या पौराणिक पात्रांच देखील रूप घेऊन फिरायचा. आज त्याने अश्वथाम्याचं रूप घेतलं होतं. सदाशिवरावांच्या घरापासून थोडं पुढे गेल्यावर एका लाईटच्या खांबावरून खाली आलेल्या उघड्या वायरवर त्याचा पाय पडला. त्याचे पाय अनवाणी असल्यमुळे त्या वायरमधून जाणारया विजेचा त्याला शॉक लागला. जवळच उभ्या असलेल्या काही लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

निराश मनाने सदाशिवराव ऐकत होते. थोड्यावेळाने “काळजी घ्या आणि काही लागलं तर मला सांगा” एवढे सांगून गजानन आपल्या घरी गेला. आज घडलेल्या या नाट्यमय घटनांचा विचार करत सदाशिवराव गादीवर पहुडले होते. भगवान श्रीकृष्णाच्या शापामुळे दारोदारी भटकणारा अश्वत्थामा, अश्वत्थाम्याचं रूप घेऊन दारात आलेला भिकारी, त्या भिकाऱ्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू या सगळ्याचा विचार करता करता आपली अश्वत्थाम्याला पहायची इच्छा अपूर्णच राहिली याची सदाशिवरावांना जाणीव झाली व प्रत्यक्षात नाही तर कदाचित स्वप्नात तरी अश्वत्थामा आपल्याला दर्शन देईल या आशेने ते झोपी गेले.

समाप्त