Gharant books and stories free download online pdf in Marathi

घरटं

घरटं

मनोजला काहिही करुन आज दुपारी दोनच्या आत पुण्याला पोहोचायचं होतं. त्याला दोन वाजता एका कंपनीत मीटिंग अटेंड करायची होती. त्या कंपनीबरोबर तो एक मोठं बिजिनेस डील करणार होता. मनोजचा बिजिनेस झपाट्याने वाढत होता. मिटींग संपल्यावर तो येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणार होता. त्याच्या एका लांबच्या भावाला तिथे ऍडमिट केलं होतं. त्याचा तो भाऊ अतिशय हुशार होता. पण कॉलेजच्या मुलांनी त्याच्यावर रॅगिंग केल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. रात्री अपरात्री उठून तो ओरडायचा. घरी कोणी आलं कि लपून बसायचा. घरात कोणाशीच बोलायचा नाही. त्याच्या चेहेऱ्यावर कायम घाबरल्यासारखे भाव असायचे. त्याने कॉलेजलाही जाणं बंद केलं होतं.

मनोजला हुशार मुलांचा कायम राग यायचा. ही मुलं स्वार्थी आणि एकलकोंडी असतात असं त्याचं मत होतं आणि तसा त्याला अनुभव सुद्धा आला होता. मनोज कायम म्हणायचा, नुसतं पुस्तकी हुशार असून काय उपयोग, तुमचं मन कमजोर असेल तर आयुष्यात तूम्ही काहिच करु शकणार नाही. कमजोर मनाच्या लोकांची मनोजला कीव यायची. मनोज शाळेत, कॉलेजमध्ये असताना एक एव्हरेज मुलगा होता. पण आज तो जे काही होता ते त्याच्या मेहनतीमुळे होता. मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरवर आज तो एक यशस्वी उद्योजक होता.

कुठेही बाहेरगावी जायचे तर मनोज नेहमी त्याच्या कारनेच जात असे. पण त्याची कार नेमकी सर्विसिंगला दिल्यामुळे त्याला आज बसनेच जावं लागणार होतं. मनोजने सकाळी साडेसात वाजता स्वारगेटची बस पकडली. कितीतरी दिवसांनी तो बसने प्रवास करत होता. लहान असताना बसच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यावर मनोजला कायम प्रश्ण पडे की ही रस्त्याच्या कडेची झाडं बसबरोबर कशी कांय पळतात? पण ते पाहून त्याला फार गम्मत वाटे. मनोज कधी कधी भूतकाळात रमून जाई. त्याला वाटे, लहाणपणी किती बरं होतं, ना कसलं टेन्शन, ना कसली चिंता. पैशाचा तर विचारही कधी मनात यायचा नाही. जे मागेल ते वडिल आणून द्यायचे. एखाद्या डिशचं नुसतं नांव घेतलं की आई बनवुन द्यायची. आणि मग तो मनातल्या मनांत जगजीत सिंहांची 'वो कागजकी कशती, वो बारिशका पानी' ही गजल गुणगुणत असे.

नाश्त्यासाठी गाडी खंबाटकी घाटाच्या अलीकडे एका हॉटेलपाशी थांबली. मनोज आपल्या विचारात इतका मग्न होता कि वेळ कसा गेला त्याला कळलंच नाही. नाश्टा करुन झाल्यावर मनोज सिगारेट ओढत हॉटेलबाहेर उभा होता. आपल्या मनातलं टेन्शन आणि काळजी सिगारेटच्या धुरातून वाहून जातंय असं त्याला वाटे. सिगारेट ओढून त्याचं मन खरंच हलकं व्हायचं. पण ही मनःशांती थोडाच वेळ टिकायची. आज सिगारेट ओढायची नाही असं तो गेलं वर्षभर रोज स्वतःशी ठरवयाचा, पण व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. त्याला खोकल्याचा त्रास सुरु झाला होता. या क्षणभंगुर मनःशांतीसाठी तो स्वतःच्या शरीराचं वाटोळं करत होता. त्यालाही हे कळत होतं पण तो हतबल होता.

गाडी तिथून पुढे निघाली. खंबाटकी घाटापाशी येताच मनोजला अचानक गाढ झोप लागली. तो शरीराने जरी बसमधे असला तरी त्याचं मन भटकत होतं.

मनोज रस्त्यावरून चालला होता. आपण कुठे आहोत हे त्याला समजत नव्हतं. रस्ता पूर्ण मोकळा होता. दुपारची वेळ होती. उन्हानं रस्ता तापला होता. आजूबाजूला छोटी छोटी घरं होती व त्या घरांच्या खिडक्यांवर पक्ष्यांची घरटी होती. मनोजला पाहताच ते पक्षी जोरजोरात ओरडत होते. मनोजला हे काय चाललंय काहीच कळत नव्हतं. तो नुसता चालत होता. मनोज एका घरापाशी आला. त्याला पाहून त्या घराच्या खिडकीवरच्या घरट्यात बसलेले पक्षी बाहेर आले आणि मनोजकडे पाहून जोरजोरात ओरडायला लागले. मनोजला तो आवाज असह्य होत होता. तो अवाज ऎकून त्या घरातून दोन माणसं बाहेर आली आणि त्यांनी मनोजचे हात धरले. त्या माणसांनी मनोजला समोरच्या एका छोट्या खोलीत न्हेलं. त्या खोलीला खिडक्या नव्हत्या. तिथे आजून काही लोक आले आणि मनोजला शिव्या देऊ लागले. थोड्या वेळानंतर ते लोक निघुन गेले. त्यांनी बाहेरून दार लावुन घेतलं होतं. खोलीत पुर्ण अंधार झाला. खंबाटकी घाटात जसा अंधार होता तसा. मनोजने मोबाईल मधला टॉर्च ऑन केला. खोली पुर्ण रिकामी होति. पण एका कोपऱ्यात दोन पक्षी बसले होते. ते पक्षी मनोजकडे बघुन ओरडू लागले. मनोजने त्यांना हाकलण्यासाठी उठायचा प्रयत्न केला, पण त्याच्या अंगातली शक्तीच गेली होति. त्याला हलताच येईना. त्या पक्ष्यांनी जवळंच पडलेला कापूस आणि झाडाची काडी चोचीत धरली आणि मनोजच्या डोक्यावर घरटं बनवायला चालु केलं. मनोजला काहीच करता येत नव्हतं. त्याचे हातच हालत नव्हते. पक्ष्यांचा घरटं बांधून पुर्ण झालं. पक्षी घरट्यात जाउन बसले. मनोजने पुर्ण ताकद लावून त्याचा हात उचलायचा प्रयत्न केला. खुप वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याचा एक हात उचलला गेला आणि त्याने हाताने त्याच्या डोक्यावरचं घरटं पाडलं. मनोजला जरा बरं वाटलं. थोडा वेळ ते पक्षी शांत बसले, पण पुन्हा ते ओरडायला लागले. पुन्हा त्यांनी कापुस आणि काड्या चोचीत धरून मनोजच्या डोक्यावर घरटं बनवायला चालु केलं. आता मनोजचा संयम संपला होता. त्यानं त्या मादीला हातांत घेतलं आणि दुसऱ्या हाताने तिचं मुंडकं पिरगाळलं आणि तिचा खेळ खलास केला. हे पाहुन तो नर पक्षी एकदम आक्रमक झाला आणि मनोजच्या डोकयावर चोचीने टोचू लागला. मनोज जोरांत किंचाळला.

मनोजचा आवाज ऎकून कंडक्टर धावत आला. मनोजला आता सगळीकडे पक्षीच दिसत होते. कंडक्टर आणि इतर प्रवाशांच्या जागीसुद्धा त्याला पक्षी दिसत होते. कंडक्टर जवळ येताच मनोज अजून जोरात 'वाचवा वाचवा' असं ओरडू लागला. कंडक्टरने मनोजला धरलं आणि शांत करायचा प्रयत्न केला. इतर काही प्रवासीही मनोज जवळ आले पण मनोज आता आक्रमक झाला आणि त्याने कंडक्टरला ढकलले. मनोजच्या डोक्यावरचा तोल गेला होता. बसमधले प्रवासी म्हणजेच पक्षी आपल्याला चोंचीने टोचत आहेत असं त्याला वाटत होतं. त्याला प्रवाशांनी धरून ठेवलं होतं.

बस आता स्वारगेटला पोहोचली. कंडक्टरने आधिच येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलला करुन मनोजबद्दल संगितलं होतं. हॉस्पिटलची गाडी स्वारगेटपाशी येउन थांबली होती. मनोजला त्या गाडीत न्हेलं व बेडवर झोपवून हॉस्पिटलच्या स्टाफनी त्याचे हातपाय बांधले. मनोजला अजुनही सगळीकडे पक्षीच दिसत होते. तो सारखा किंचाळत होता. 'वाचवा वाचवा' असं ओरडत होता. गाडी हॉस्पिटल पाशी पोहोचली. दोन वॉर्डबॉय मनोजला एका खोलीत घेउन आले. तिथे त्याला खाटेवर झोपवले व त्याचे हात पाय बांधले. शेजारच्याच खाटेवर मनोजला एक पक्षी बसलेला दिसला. त्या पक्ष्याच्या चेहेऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. तो पक्षी मनोजचा वेडा भाऊच होता.

***

मनोजचा फोन वाजला आणि तो जागा झाला. त्याने फोन कट केला आणि एकटक खिडकीतून बाहेर पाहु लागला. त्यांचं पुर्ण शरिर घामाने डबडबलं होतं. आज पुन्हा त्याला ते भयानक स्वप्न पडलं होतं. त्या पक्ष्यांनी तर त्याला पार भंडावून सोडलं होतं. आता तर ते त्याच्या समोरच होते. पडलेलं घरटं परत बांधायला त्या पक्ष्यांनी सुरुवात केली होती. ते पक्षी मनोजचा पिच्छाच सोडत नव्हते.

मनोजचं त्याच्या व्यवसायात, कामात देखिल लक्ष लागत नव्हतं. तिथेही त्याला वेगवेगळे भास व्हायचे. खिडकीत पक्षी बसलेत आणि आता ते आपल्याकडे पाहतायत. ते आता आपल्यावर हल्ला करतील, चोंचीने टोचून टोचून आपल्याला मारून टाकतील असं त्याला सारखं वाटायचं. एकदिवस आपण वेडे होणार अशी त्याला भिती वाटायची.

आज त्याला खरच पुण्याला बिसनेस मिटिंग साठी जायचं होतं. पण त्या विचित्र स्वप्नामुळे त्याला जागच आली नाहि. आणि जेंव्हा जाग आली तेंव्हा नऊ वाजून गेले होते. पण अजूनही मनोज भानावर आला नव्हता. तो अजूनही खिडकीबाहेर त्या पक्ष्यांकडेच एकटक पहात होता. त्याला परत भास होत होते. हळु हळु त्याच्या चेहेऱ्यावरचें भव बदलत होते. तो भीतीमुळे कावराबावरा झाला. ते पक्षी आपल्याकडेच येत आहेंत असं मनोजला वाटलं आणि त्याने डॊळे गच्च मिटून घेतलें. आता मनोजला जोक्यावर टोचल्यासारखं वाटु लागलं. त्याने दोन्ही हातांनी डोकं धरुन ठेवलं आणि वेदना असह्य झाल्यामुळे तो जोरांत किंचाळला. मनोजची भिती खरी ठरली होती. तो आता खरंच वेडा होण्याच्या मार्गावर होता.

खरंतर या सगळ्याची सुरुवात कांही महिन्यांपुर्वी झाली होती. एक दिवस मनोज त्याच्या खोलीत पुस्तक वाचत होता. त्याच्या खोलीच्या खिडकित दोन पक्ष्यांनी घरटं बांधलं होतं. सतत त्या पक्ष्यांची चिव चिव चालु असायची. त्यामुळे मनोजला त्यांचा खुप त्रास व्हायचा. बरेच दिवस मनोजने सहन केलं, पण त्या दिवशी मनोजला त्या पक्ष्यांची कलकल असह्य झाली आणि त्याने काठीने त्या पक्ष्यांचं घरटं पाडलं. त्यानंतर मनोजला त्या पक्ष्यांचे भास व्हायला सुरुवात झाली. आता तर परत त्या पक्ष्यांनी घरटं बंधायला सुरुवात केली होती. जसं जसं घरटं बांधुन होत होतं मनोजचं मन दृश्य जगापासून दूर जात होतं. आता थोडयाच दिवसांत मनोजची त्याच्या भावाशी भेट होणार होती.

- निरंजन कुलकर्णी

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED