Ek Divas photograficha books and stories free download online pdf in Marathi

एक दिवस फोटोग्राफीचा

एक दिवस फोटोग्राफीचा

कालच माझी बीकॉमची थर्ड इयरची परीक्षा संपली. खरंतर मी CA करावं अशी माझ्या आईवडिलांची खुप इच्छा होती. अजुनही आहे. पण माझं मन पुस्तकात रमत नाही त्याला मी तरी काय करणार. माझ्या अठराव्या वाढदीवशी बाबांनी मला कॅमेरा घेउन दिला. सुरुवातीला मला फोटॊ काढायचा खुप कं टाळा यायचा, पण हळू हळू मला आवड निर्माण झाली. आधी मी समोर दिसेल त्या गोष्टीचा फोटॊ काढायचो. जगभरातील प्रसिद्ध फोटोग्राफर्सचे फोटॊ पाहून मी फोटोग्राफी शिकत गेलो आणि आता मी फोटोग्राफीलाच माझं प्रोफेशन बनवायचा विचार करतोय. खरंतर या फिल्डमध्ये कॉम्पिटिशन खुप आहे. पण मला हा धोका पत्करायलाच हवा, कारण रोज दहा ते सहा पर्यंत एखाद्या कंपनीत बसून जॉब करण्यात मला बिलकुल स्वारस्य नाही. मला कांहीतरी वेगळं करायचय.

आता परीक्षा संपल्यामुळे मी मोकळाच आहे. तसं माझं घर कोल्हापुरला आहे. पण परीक्षेसाठी मी पुण्यात आलोय. वडिलांच्या हट्टापायी मी पुणे युनिवर्सिटी निवडली. पेपर तशे ठिकठाकच गेलेत पण पास होईन याची खात्री आहे. इतके दिवस मला परीक्षेमुळे फोटोग्राफी करता आली नाही मात्र आज मी ती कसर भरुन काढणार आहे. आज मी पूर्ण पुणे शहर फिरुन फोटोग्राफीचा आनंद लुटणार आहे.

***

चहा घेउन मी घराबाहेर पडलो. गळयात कॅमेरा अडकवुन मी गाडीवरुन निघालो आणि नेहमीप्रमाणे सिंहगड रोडवरच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो. धायरीच्या फ्लायओव्हरच्या अलीकडे मी थांबलो होतो. सिग्नल केव्हाचाच सुटला होता, पण ट्रॅफिकमुळे गाडया फार हळु हळु पुढे सरकत होत्या. मी कंटाळून इकडे तिकडे पहात होतो तेव्हा मला एक विलोभनीय दृश्य दिसलं. एक फुलपाखरू पुढे उभ्या असलेल्या एका कारच्या आरश्यापुढे स्थिरावलं होतं. त्याच्या मखमली पंखांची हालचाल सतत सुरु होती मात्र तरीही ते आरश्यासमोरून हालत नव्हतं. निळ्या रंगाच्या पंखांवर लाल रंगाचे ठिपके असलेलं ते सुंदर फुलपाखरु आरशात जणुकाही आपलं रुप न्याहाळत होतं. मी पटकन बॅगेतुन टेलिफोटो लेन्स काढुन कॅमेऱ्याला लावली आणि त्या फुलपाखराचा आरशासकट फोटॊ घेतला. जणुकाही माझ्या फोटोचीच वाट पहात असल्याप्रमाणे ते फुलपाखरु मी फोटॊ काढताच उडुन गेलं. दिवसाची सुरुवात छान झाली होती. आता ट्रॅफिक देखील कमी झालं आणि कासवाच्या गतीने पुढे सरकणाऱ्या गाडया परत वेगात धावू लागल्या. मी सारस बागेपाशी पोहाचलो. सिग्नल लागला होता. माझे लक्ष डिव्हायडरकडे गेले. डिव्हायडरच्या बाजुला सिमेंटच्या चौकोनावर एक लहान पोरगं बसलं होतं व त्याच्या समोर त्याची छोटी बहीण बसली होती. ते दोघे एका फाटक्या जुनाट बाहुलीशी खेळत होते. काळसर रंगाच्या त्या पोराच्या अंगात एक मळका बनियान होता. त्या मुलाच्या चेहेऱ्यावरचं निरागस, निर्मळ हास्य पाहुन मला आश्चर्य वाटलं. मी त्या मुलाचा फोटॊ कढला आणि त्याचं ते निरागस हास्य कॅमेऱ्यात कैद झालं. समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे फोटोत छान पॅनिंग इफेक्ट आला होता. या फोटोला नक्कीच ऍवॉर्ड मिळेल असं मला वाटलं. मी माझ्या विचारात इतका मग्न होतो की सिग्नल सुटलाय हे मला कळालंच नाही. मागच्या गाडीवाल्याने जेव्हा पुणेरी भाषेत माझा उद्धार केला तेव्हा मी भानावर आलो आणि पुढे निघलो.

मी गाडी पार्क केली आणि सारस बागेत आलो. गणपतीचं दर्शन घेउन बाहेर आलो. बागेत खेळणाऱ्या मुलांचे काही फोटॊ घेतले. बाकावर बसून एकमेकांशी बोलण्यात मश्गुल झालेल्या प्रेमी युगुलांचेदेखील फोटॊ घेतले. तसेच "आजकालच्या मुलांना लाजाच नाहीत. आपला काळच वेगळा होता" असं म्हणणाऱ्या गंभिर चेहेऱ्याच्या वृद्धांचेही फोटॊ काढले आणि मी एका बाकावर बसलो. मी सहज कॅमेऱ्यातले जुने फोटॊ पहात होतो जे मी कोल्हापूरला असताना काढले होते. प्रत्येक फोटोच्या मागे काहीनाकाही स्टोरी होती. एका फोटोत एक वृद्ध मनुष्य होता व त्याच्या हातात कॅमेरा होता. कोल्हापूरला असतांना मी रोज सकाळी पक्ष्यांचे फोटॊ काढण्यासाठी रंकाळा तलावापाशी जायचॊ. तिथे हे आजोबा रोज यायचे. कॉटनचा साधा शर्ट, पांढराशुभ्र पायजमा, डोकयावर कानटोपी, पांढरीशुभ्र दाढी आणि गळयात कॅमेरा. वय साधारण पासष्ट ते सत्तरच्या आसपास असावं. ते रोज न चुकता ठरलेल्या वेळी रंकाळ्यावर येत असत व तासभर पक्ष्यांचे फोटॊ काढुन परत जात. एकदा मी त्यांना विचारलं , "आजोबा, या वयात सुद्धा तुम्हांला एवढा उत्साह कसा? मी पाहतो तुम्ही इथं रोज फोटॊ काढायला येता. तुम्हाला पाहिलं की माझाही हुरूप वाढतो." ते म्हणाले, "तशी मला पहिल्यापासुनच फोटोग्राफीची आवड. पण पुर्वी वेळही मिळायचा नाही आणि परवडतही नव्हतं. माझा मुलगा US ला होता. सर्व काही ठिक चाललं होतं." अचानक आजोबांचा चेहेरा गंभिर झाला. ते पुढे बोलू लागले, "एक दिवस माझा मुलगा ऑफिस मधुन घरी येत होता. त्याने वाटेत गाडी थांबवली आणि काहीतरी खरेदी करण्यासाठी तो एका मॉलमध्ये गेला. एका माथेफिरुने बंदुक काढली आणि अंदाधुंद गोळीबार केला. एक गोळी माझ्या मुलाला अरविंदला लागली. गोळी थेट छातीत घुसली होती. डॉक्टरांनी खुप प्रयत्न करुनदेखील ते अरविंदला वाचवू शकले नाहीत." एवढे बोलुन ते लहान मुलासारखं रडु लागले. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवुन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होतो. थोडयावेळाने ते रडायचे थांबले व बोलु लागले, "अरविंदनेच मला हा कॅमेरा दिला होता. हा कॅमेरा माझ्यासाठी माझ्या अरविंदाची आठवण आहे." माझ्याशी बोलुन आजोबांचं मन मोकळं झालं होतं. मी आजोंबांचा निरोप घेतला व तिथुन निघालो .

पुढच्या फोटोत शाळेचा युनिफॉर्म घातलेली मुलं होती. एकदा मी कोल्हापुर जवळच्या नागदेववाडी गावातल्या नदीचे फोटॊ काढण्यासाठी गेलो होतो. मी नदीचे फोटॊ वेगवेगळ्या अँगलने घेत होतो. सुर्य मावळत होता व त्याचं प्रतिबिंब नदीच्या स्थिर, निश्चल पात्रावर पडलं होतं. मी फोटॊ घेण्यात मग्न होतो तेवढयात तिथे गावातली कांही मुलं आली. त्यांतला एक मुलगा माझ्यापाशी आला व मला म्हणाला, "नदीचे फोटॊ घेतायसा काय?" मी नुसतं 'हु' म्हंटलं. ते पोरगं म्हणालं "मग आमचेबी फोटॊ घ्या की." मला एकदम हसू आलं. मी त्या मुलांना नदीच्या काठापाशी जाउन उभारायला सांगितलं आणि त्यांचे फोटॊ काढले. फोटॊ पाहून फार खुश झाली ती मुलं .

त्याच्या पुढचा फोटॊ एका फुलपाखराचा होता. एक पिवळया रंगाचं फुलपाखरु फुलातला मध शोषत होतं. मी नागदेववाडी गावातून जात असताना मला हे फुलपाखरु दिसलं. मी कॅमेऱ्याने फोटॊ काढत होतो. एक दोन फोटॊ काढले आणि मी मागे पाहिलं तर तिथे पाच - सहा लोकं जमा झाले होते. त्यांच्यातला एकजण पुढे आला आणि मला म्हणाला, "साप हाय काय तिथं ?" "नाही फुलपाखरु आहे" मी म्हंटलं . हे ऎकून सगळे जण हसायला लागले आणि तोच आगाऊ माणूस म्हणाला, "फुलपाखराचा कशाला फोटॊ काढतायसा?" मला काय बोलावं तेच कळे ना. मी फक्त हसलो आणि तिथुन निघालो .

मी कॅमेरा बॅगेत ठेवला. सारस बागेतली गर्दी आता कमी झाली होती. मी जुन्या आठवणीत इतका रमलो होतो की मी किती वेळ त्या बाकावर बसलो हे माझ्या लक्षातच नाही आलं. आता भूकही खुप लागली होती. सारसबागेतून बाहेर पडुन मी एका हॉटेलात आलो. तिथे जेवून पुन्हा फोटोग्राफी करायला बाहेर पडलो .

स्वारगेट, मंडई, शनिवारवाडा, शिवाजीनगर या भागात फिरुन मी बरेच फोटॊ काढले. वेगवेगळया प्रकारच्या, वेगवेगळया स्वभावाच्या माणसांना मी भेटलो. आता कॅम्पात जाऊन मग घरी परत यायचं असं मी ठरवलं आणि गाडी कॅम्पाच्या दिशेने वळवली. कॅम्पात मी SGS मॉल समोर आलो. मॉल समोरच एक म्हातारा पेरू विकत होता. एवढया उनात उभारून सुद्धा त्याच्या चेहेऱ्यावर हास्य होतं. तो कंटाळलेला किंवा वैतागलेला बिलकुल दिसत नव्हता. मी त्याच्या समोर गेलो आणि त्याचा एक फोटॊ काढला. त्याने माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाला, " पेरु घेनार कारं पोरा? ताजे हायत. पन्नासला किलो देतो." खरंतर मला पेरु घ्यायची इच्छा नव्हती पण मला नाही म्हणता येइना. मी एक किलो पेरु खरेदी केले. त्या म्हाताऱ्याच्या हसऱ्या चेहेऱ्याकडे पाहताच मला सकाळी सारस बागेजवळ पाहिलेला तो छोटा मुलगा आठवला. मी तिथुन निघणार तेवढयात तिथे एक माणुस आला आणि पेरुवाल्याला म्हणाला, "काका चाळीसला किलो द्या की." पेरूवाला त्या माणसाला म्हणाला, "माझीच चाळीसची खरेदी हाय. तुला चाळीसला कसं द्यू ?" तेव्हा तो माणूस निर्लज्जपणे म्हणाला, "चव तर बघु पेरूची." पेरूवाल्याने पेरूचा एक तुकडा त्या माणसाच्या हातावर ठेवला. त्या माणसाने पेरुचा तुकडा तोंडात टाकला व मिश्कीलपणे हासत तिथुन पळाला. पेरुवाला मला म्हणाला, "मगासपसनं चार वेळा येउन गेला हा. घेत तर काय नाय अन निस्तं फुकटचं खाउन जातो." मला त्या माणसाचा राग आला. एक मध्यम वयीन स्त्री मॉलमधून बाहेर आली. तिच्या दोन्ही हातात तीन चार वेगवेगळया ब्रॅण्डच्या पिशव्या होत्या व त्या पिशव्यांमध्ये महागडे कपडे होते. ती स्त्री आली आणि पेरुंकडे पाहून म्हणाली, "कसे दिले हो पेरु?" "पन्नास रुपये किलो" पेरूवाल्याने सांगितलं. "पन्नास फार महाग आहे. तिसला दया. दोन किलो घ्यायचेत." ती स्त्री हातातल्या पिशव्या सावरत म्हणाली. " ताई माझीच खरेदी चाळीसची हाय. तुमास्नी तिसला दिलं तर मला काय मिळल?" पेरुवाला वैतागून म्हणाला. "बरं, द्या पन्नासनी. पण चांगले द्या हा. अगदी पिकलेले देउ नका." पेरुवाल्याच्या चेहेऱ्यावरचं हसु परत आलं. त्याने वजन करुन पेरु पिशवीत टाकले आणि पिशवी

त्या बाईकडे दिली. त्या बाईने कोणालातरी फोन लावला आणि थोडयाच वेळात एक आलिशान कार तिथे आली. ती बाई कारमध्ये बसुन तिथुन निघुन गेली. मी पेरुवाल्याचा निरोप घेउन निघलो आणि घरी परत आलो.

घरी आल्यावर थोडा वेळ विश्रांति घेउन मी कॅमेरा लॅपटॉपला जोडला आणि आज काढले ले एक एक फोटॊ मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर पहात होतो. फोटॊ पहात असताना एका फोटोवर माझी नजर स्थिरावली आणि माझं विचारचक्र सुरु झालं. डिव्हायडरवर बसून आपल्या लहान बहिणीबरोबर खेळण्यात मग्न झालेल्या छोट्या मुलाचा तो फोटॊ होता. काय असेल याच्या भविष्यात? माझ्या मनात विचार आला. कुठं तरी मोलमजुरी करुन आपलं पोट भरणं? रस्त्याचा कडेला बसुन भिक मागणं? की देशी दारू पिउन रस्त्याच्या कडेला लोळत पडणं. अजुन किती दिवस याच्या चेहेऱ्यावरचं ते निरागस हास्य टिकेल?

दुसरा लक्षात राहिलेला फोटॊ SGS मॉलसमोर बसून पेरु विकणाऱ्या म्हाताऱ्याचा होता. आपलं काम तो आनंदाने करत होता. एक प्रकारचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हातात ब्रँडेड कपड्यांच्या बॅगा घेउन त्या खेडूत, गरीब म्हाताऱ्याकडून पेरु खरेदी करताना दहा - वीस रुपयांसाठी घासाघीस करणारी ती स्त्रीही मला आठवली. ती श्रीमंत स्त्री (परिस्थितीने, मनाने नव्हे) आणि तो गरीब म्हातारा पेरुवाला ( परिस्थितीने गरीब पण मनाने श्रीमंत ) हे आपल्या देशात श्रीमंत आणि गरीब यांच्यात वाढत जाणाऱ्या दरीचं जिवंत उदाहरण आहेत.

खरंतर आज मी फोटोग्राफी करायला घरातुन बाहेर पडलो पण परत येताना खुप काही शिकून आलो.

मी परत एकदा सगळे फोटॊ पाहीले आणि लॅपटॉप बंद केला. शेवटी मी त्या हसऱ्या चेहेऱ्याच्या मुलाचा आणि आयुष्यातले कष्ट चेहेऱ्यावर न येउ देणाऱ्या पेरुवाल्याचा फोटॊ पाहीला. पण माझ्या चेहेऱ्यावरचं हसु मात्र कुठल्याकुठे गायब झालं होतं. कारण मला त्या मुलाचं भविष्य आणि पेरूवाल्याचं कष्टाचं, गरिबीचं जीवन दिसत होतं.

लेखक : निरंजन कुलकर्णी

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED