अपेक्षांचं ओझं parashuram mali द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपेक्षांचं ओझं

अपेक्षांचं ओझं

कुठे गेला होतास?

आई रागारागाने संजयला म्हणाली.

खेळायला गेलो होतो.

संजयने आईला घाबरत,घाबरत सांगितले.

किती वेळा सांगितलंय,त्या मवाल्यांच्यात खेळायला जाऊ नको म्हणून,तरी तुला कळत नाही का?

तुला बोर्डिंगलाच घालायला हवं,त्याशिवाय तू सुधारणार नाहीस.

हो चालेल मला,मीही तुझ्या दररोजच्या कटकटीला कंटाळलेलो आहे.

संजय रडत रडत आईला म्हणाला.

( तेवढ्यात संजयचे वडील कामावरून येतात.)

काय झाल? घरी आल्या आल्या सुरु झालं का रडगान.

वडील रागाच्या स्वरात म्हणाले.

अहो, किती वेळा सांगितलं याला ऐकायलाच तयार नाही.

आता काय झाल ? वडील म्हणाले.

संजयचं अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाही. दहावीचे महत्वाचे वर्ष सुरु असूनसुद्धा टी.व्ही.पाहणे आणि मवाल्यांबरोबर हुंदडायला जाणे सुरूच आहे.

आई, प्लीज माझ्या मित्रांना मवाली नको म्हणू. जरूर ते गरीब असतील पण मनाने श्रीमंत असलेले ते माझे जिवलग मित्र आहेत.

गप्प बस! पुढे आणखी काही बोलशील तर थोबाड फुटेल.

वडील संजयवर हात उगारत म्हणाले.

( आई – वडीलांच्या अपेक्षांचं ओझं वाढत होत,तसा संजय त्या ओझ्याखाली दबून जात होता.)

संजय उदास होऊन एका झाडाखाली बसला होता. रस्त्याने घाईगडबडीने जाणाऱ्या आणि संजयच्या घराशेजारी राहणाऱ्या दामू काकांची नजर संजयकडे वळली.संजयला उदास आणि दु:खी पाहून दामू काकांना आश्चर्य वाटले.

अरे,संजय इथे काय करतोयस? आणि हे काय तुझ्या डोळ्यात चक्क पाणी!

दामुकाकांना पाहून संजयला गहिवरून आले. संजयने दामुकाकांना घट्ट मिठी मारली.

संजयने घरामध्ये घडलेली घटना दामुकाकांना सांगितली.

काळजी करू नको, घरी येऊन आई-बाबांना सांगेन. असे म्हणून,दामुकाकांनी संजयची समजूत काढली.

दामूकाका हीच संजयचा एकमेव आधार आणि संजयला समजून घेणारी व्यक्ती होती. दामूकाका हे संजयचे जिवलग मित्र होते.सगळी व्यथा संजय दामुकाकांकडे व्यक्त करायचा. संजयला दामुकाकांजवळ व्यक्त झाल्यावर खूप हलके वाटायचे.अध्यात्माची ओढ असणारे दामूकाका संन्यस्त व्यक्ती आणि अनेकांचे मार्गदर्शक होते. सगळे त्यांना प्रेमाने दामूकाका म्हणत असे. दामुकाकांना समाजामध्ये खूप मानाचे आणि आदराचे स्थान होते.

(रविवारचा सुट्टीचा दिवस,संजयच्या घराची बेल वाजते)

कोण आहे? आले थांबा.

संजयची आई घाईगडबडीने येऊन दार उघडते.

अय्या,दामू काका !

अहो, ऐकलं का ? कोण आलय आपल्या घरी?

कोण आलय ? आणि येवढं ओरडायला काय झाल?

अहो बघा तर खरं, कोण आलय ते.

अरे दामू काका! नमस्कार काका..

आज कसा वेळ मिळाला म्हणायचं?

थोडं बोलायचं होत,म्हणून आलो होतो.

अहो,बोलण नंतर पहीला नाष्टा काय करता ते सांगा.

आज माझा उपवास आहे.

मग चहा की कॉफी?

ठीक आहे.चहा चालेल.

चहा घेऊन ये गं.

हो आलेच.

बोला काका काय म्हणताय?

संजय कुठे आहे ?

तो अभ्यास करतोय.

कुठे पण?

या समोरच्या खोलीत.

पण या खोलीला तर कुलूप आहे.

अहो काका ते आम्ही मुद्दामहून लावलय.

का ?

कारण हे त्याच दहावीच वर्ष आहे. तो अभ्यास सोडून त्याच्या मवाली मित्रांबरोबर खेळायला जाऊ नये म्हणून.

हे ऐकून दामूकाकांचा राग अनावर झाला...

तुम्ही माणसे आहात की राक्षस? लहान निरागस जीवाचा असा छळ करताना, तुम्हाला शरम कशी वाटली नाही?

तुमच्या आई-वडिलांनी तुमच्याबरोबर असाच छळ केला होता काय?

पण; दामूकाका मुलांनी अभ्यास नको का करायला? आज आम्ही दोघ नोकरी करतो.समाजामध्ये आम्हाला मान-सन्मान आहे.आम्हालाही वाटत आमच्या मुलालाही असा मान – सन्मान मिळावा,वेगळी ओळख मिळावी.

मान – सन्मान गेला खड्यात. पहिला माणूस बना माणूस;आणि मुलालाही माणूस बनायला शिकवा. दामूकाका म्हणाले...

( इतक्यात संजयची आई चहा घेऊन येते.)

अगोदर चहा घ्या दामूकाका, मग नंतर निवांत बोला. संजयची आई म्हणते...

माफ करा, मला चहा नको. जाण्याआधी एकच आपल्याला बजावतो,तुमच्या अपेक्षांचं ओझ संजयवर लादून असंच क्रूर कृत्य संजयवर करत राहाल तर संजय एक दिवस या जगात नसेल.

दामूकाका, तोंड सांभाळून बोला. संजयचे वडील दामुकाकांवर रागाने ओरडतात...

हो आज खरं बोलतोय, याच गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटतंय कारण सत्य हे खूप कटू असते ते पचायलाही जड जाते. मी जे बोलतोय ते वास्तव आहे; आणि हे वास्तव तुम्हाला स्वीकारायलाच हवं. येतो मी...

(दामूकाका रागारागाने निघून गेले.)

इकडे संजयचे हाल सुरूच होते. बिच्चारा आई-वडिलांच्या रोजच्या कटकटीला वैतागून गेला होता.

आईवडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आणि दबावाखाली एकदाची दहावीची परीक्षा संपून गेली. विज्ञान आणि इंग्रजीचा पेपर अवघड गेला होता; पण संजयने आई-वडिलांना सांगितले नाही.आता मात्र निकालापर्यंत संजयची रुखरुख सुरु राहणार होती.

आई-वडिलांना न सांगता संजय, दामू काकांना भेटायला गेला.संजयने विज्ञान आणि इंग्रजीचा पेपर अवघड गेल्याचे दामुकाकांना सांगितले.पास झाल्यानंतर कला शाखेला प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. दामुकाकाही संजयला आधार देत म्हणाले; काळजी नको करू,सर्व काही चांगल होईल.

परीक्षेचा निकाल जवळ येत होता. तसं संजयला निकालाची धास्ती वाटू लागली होती. संजय खूपच खचून गेला होता. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या अंगात काहीच त्राण राहिलेले नाहीत असं वाटत होत. संजयचे डोळे खोल गेले होते.

एकदाचा निकालाचा दिवस उजाडला.अपेक्षेप्रमाणे विज्ञान आणि इंग्रजीला कमी गुण मिळाले होते. ५५% गुणांनी संजय दहावीला पास झाला होता. आई-वडिलांची ८०% ते ९०% ची अपेक्षा फोल ठरली होती.दोघांनीही निकाल कळताच त्रागा करायला सुरुवात केली. आई-वडिलांचा वाढलेला संताप पाहून संजय पुरता घाबरून गेला.

जा खेळायला त्या मवाली-टपोऱ्या पोरांबरोबर, बघत बसं आता दिवसभर टी.व्ही.शेजारच्या आजितला ९०% मिळाले. शिक त्याच काहीतरी, समाजामध्ये तोंड दाखवायलाही आम्हाला जागा ठेवली नाहीस. संजयची आई संजयला संतापाने म्हणाली. वडिलांनीही आईच्या सुरात-सूर मिसळला, सगळ्या सुख-सोई असूनही, सगळा हट्ट पुरवून, हवं ते देवूनही मस्ती आली आहे याला. सगळ्या गोष्टी मिळत असूनही फायदा करून घ्यायची अक्कल नाही याला. संजयच्या बाबांचा राग वाढत होता...

बाबा मला नाही झेपत. मला नाही जमणार तुमच्या इच्छा पूर्ण करणं,प्लीज नका करू माझ्याकडून अपेक्षा.संजय बाबांचे पाय धरून विनवणी करायला लागला.

व्वा! छान! सकाळ,दुपार,संध्याकाळ चरायला जमत का? मग अभ्यास म्हटल्यावर झेपत नाही. काहीही असो, उद्या शाळेत जाऊन कमी गुण मिळाल्याचा जाब मुख्याध्यापकांना विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. संजयच्या वडिलांमधला क्रूर राक्षस जागा झाला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी संजयचे वडील संजयला घेवून शाळेमध्ये मुख्याध्यापकांना भेटायला येतात.

संजयचे वडील, नमस्कार सर.

मुख्याध्यापक, नमस्कार बोला काय काम काढले?

माझ्या मुलाला इतके कमी गुण कसे मिळाले? याबद्दल मला खुलासा पाहिजे होता. संजयचे वडील मुख्याध्यापकांना म्हणाले.

तसे उत्तर देणे अशक्य आहे; पण एक गोष्ट खरी आहे की, सगळ्या मुलांची कुवत किंवा क्षमता सारखी नसते. आपण सगळ्याच मुलांकडून सारख्याच अपेक्षा करने चुकीचे आणि मूर्खपणाचे ठरेल. तुमचा मुलगा गुणवत्तेमध्ये जरूर कमी पडत असेल पण त्याची शिस्त आणि वागण खूप चांगल आहे. सर्वांचा आदर करणारा विद्यार्थी आहे. तो खेळामध्ये चांगला आहे. त्याने विविध खेळाच्या प्रकारामध्ये जिल्हा आणि राज्य स्थरावर चांगली कामगिरी केलेली आहे. हे तुम्हालाही माहित आहे.

अहो, पण तुम्ही त्याला गुणवत्तेमध्ये का आणू शकत नाही? का त्याला चांगले गुण मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही? संजयच्या वडिलांनी पुन्हा मुख्याध्यापकांना प्रश्न केला.

हे बघा,आमच्याजवळ काही जादूची कांडी नाही.मुलांच्या प्रगतीमध्ये शाळेबरोबर तितकाच सहभाग आणि वाटा पालकांचाही महत्वाचा असतो.प्रत्येक गोष्टीची अपेक्षा ताबडतोब करने बरोबर नाही. आम्हाला थोडा वेळ द्या.

अजून किती वेळ द्यायचा आम्ही तुम्हाला? चार वर्षे झाले हेच पाहतोय मी. काहीच सुधारणा दिसत नाही माझ्या मुलामध्ये. संजयचे वडील म्हणाले...

शाळा म्हणजे काही पिंजरा नाही.मुलांना हसू,खेळू द्यायचं नाही का? त्यांना त्याचं आयुष्य जगण्याचा, एन्जॉय करण्याचा अधिकार नाही का? मुलांना त्यांच बालपण एन्जॉय करू द्या. मुलांचं कौतुक करा, त्यांना शाबासकी द्या, त्यांना हसू द्या,बागडू द्या. तुम्ही तुमच्या लहानपणी मजा - मस्ती केली नाही का? एन्जॉय केला नाही का? का तुम्ही प्रत्येकवेळी संजयची तुलना इतरांशी करता? तुम्ही तुमचं बालपण एन्जॉय केलं.मग तुम्हाला या कोवळ्या जीवांचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार कोणी दिला?

सर,प्लीज इमोशनल ब्ल्यँकमेल करून मुख्य विषयावरून माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. संजयचे वडील म्हणाले.

मी इमोशनल ब्ल्यँकमेल करत नाही. वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडतोय.कधीतरी मुलांसाठी वेळ काढा.त्यांच्याबरोबर बोला,खेळा त्यांच्या समस्या समजून घ्या.फक्त काम आणि पैसा म्हणजे सर्वस्व नाही.मुलांशी भावनिक नात जोडन या वयात त्यांना भावनिक सुरक्षितता आणि आधार देने खूप महत्वाचे आहे. मुले म्हणजे चोवीस तास चालणारे मशीन नाही. मुलांनाही भावना आहेत हे समजून घ्या.

संजयचे वडील काहीच न बोलता रागारागाने संजयला घेवून निघून गेले.

( संजयच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मुख्याध्यापक आणि वडिलांमध्ये चाललेलं वैचारिक युद्ध आणि वडिलांची चुकीची भूमिका यामुळे तो निराश आणि हताश झाला होता. हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते.)

५५% ला विज्ञान शाखेत प्रवेश मिळत नसतानाही संजयच्या मर्जीविरुद्ध वडिलांनी कॉलेजमध्ये वशिला लावून प्रवेश मिळवला. सगळे काही संजयच्या मनाविरुद्ध चालल होत. अपेक्षेप्रमाणे संजयच्या परीक्षेचा निकाल लागला. संजय इंग्रजी आणि विज्ञान या विषयात नापास झाला होता. वडिलांनी संजयला दार झाकून लाथा-बुक्क्यांनी मारलं.

असह्य होणाऱ्या वेदना घेवून घडलेली सर्व हकीकत सांगण्यासाठी दुसऱ्या दिवशी संजय दामुकाकांकडे गेला. दामूकाका घरी नव्हते. संजयने एका कागदावर दामू काकांसाठी एक चिट्टी लिहिली...

दामू काका तुम्ही मला खूप आधार दिला. तुम्ही माझे मित्र झाला. मला प्रत्येकवेळी तुम्ही धीर आणि आत्मविश्वास देत राहिला.त्यामुळेच मी जिवंत राहू शकलो. मी आई – बाबांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही.माझी जगण्याची इच्छा आता संपली आहे. मला माफ करा दामूकाका.

तुमचा लाडका

संजू

अवाजवी अपेक्षांच्या लादलेल्या ओझ्याखाली एकुलता एक मुलगा आई-वडिलांनी कायमचा गमावलेला होता.संजयच्या आत्महत्येची बातमी ऐकून त्याच्या मित्र परिवाराबरोबर संपूर्ण शहर हळहळत होते.

दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर आलेली संजयच्या आत्महत्येची बातमी वाचून दामूकाका सुन्न झाले.

परशुराम माळी

७५८८६६३६६२