आदि-चेतना Suraj Gatade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आदि-चेतना

"आदि-चेतना" - एक अद्भुत प्रेमकथा

(Fantasy/Love story)

(लेखक: सूरज काशीनाथ गाताडे, स्क्रीन रायटर्स असोसिएशन मेंबरशिप नं.: 21831)

ही कहाणी आहे चेतना नांवाच्या तरुणीची आणि आदिश सोबतच्या तिच्या मैत्रीची... आदिश; एक अनोळखी, चमत्कारीक, सतत चेहऱ्यावर मास्क परिधान करणारा तरुण. चेतना जिचा प्रेमभंग झाला आहे आणि ती आतून पूर्णपणे तुटली आहे. मानसिक आधार व थोडा बदल मिळावा म्हणून ती तिच्या अजोळी येते. आणि एक दिवस एकटीच फिरत असताना जंगलात ती हरवते. ती गोंधळते, घाबरते. बाहेर पडण्यासाठी ती मार्ग शोधू लागते आणि... अचानक सगळे बदलायला लागते. ते जंगल तिला वेगळे, पण खूप सूंदर भासू लागते. रंगीत, प्रकाशमान...

हे बदलेले नवीन जंगल दिसायला स्वर्गातील आनंदवनासारखे असते. ती त्या दृश्याचा आनंद घेत असताना तिला ठेच लागते. आणि समोर तो येतो; चेहऱ्यावर मास्क घातलेला आदिश. चेतना खाली पडत असताना आदिशचा आधार घेऊ पाहते, पण तो तिला खाली पडू देतो... आणि मला स्पर्श करू नको म्हणून तिला सांगून जंगलातून बाहेर पडण्याची वाट दाखवतो. पुढील मग प्रत्येक दिवस ती रोज आदिशला भेटण्यास येऊ लागते.

तिला आदिशला स्पर्श करायचा असतो. ती गुंतली गेलेली असते त्याच्यात. पण... पण आदिशला जर तिचा स्पर्श झाला, तर तो अदृश्य होणार असतो. हे आदिश कडूनच एक दिवस चेतनाला समजलेले असते. त्यांच्या परस्पर संबंधांवर अशी मर्यादा असूनही ते खूप चांगले मित्र बनतात. त्यांचे नाते फूलत - बहरत जात असते...

चेतना पौगंडावस्थेत असते व ती त्या तिच्या उदयोन्मुख प्रेम भावना व त्यांच्या अनिश्चित भविष्याशी एकाचवेळी संघर्ष करण्यास सुरुवात करते. तर आदिश, तरुण वयात असलेल्या चेतनाला स्पर्श करू इच्छित असतो, पण तो करू शकत नसतो.

एक दिवस ते नेहमी सारखेच भेटतात. त्या भेटीत आदिश चेतनाला त्या जंगलातील रम्य, मोहक, सूंदरशा ठिकाणी डेटवर घेऊन जातो. जंगलाला नुकतीच पालवी फुटत असते... सुरुवातीच्या पावसाचे थेंब जंगल न्हावून काढत असतात आणि... त्या संध्या समयी अचानक एक अनपेक्षित घटना घडते...

आपल्याला निराशेच्या खाईतून बाहेर काढणाऱ्या आदिशवर ती जीवापाड प्रेम करू लागलेली असते. हे आदिशला तिच्या डोळ्यांत दिसते आणि मग कसलाही विचार न करता तो भावविभोर होऊन तिला आपल्या मिठीत घेतो. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्याच्या हनुवटीवर एकत्र येऊन मानेवरून खाली ओघळू लागतात आणि तो चेतना मिठीत असतानाच आपला मास्क काढतो. त्याला अर्धाच चेहरा असतो. कसलाच रेखीव आकार नाही. तो चेतनाला आपला चेहरा दाखवत नाही. तिला मिठीत घट्ट धरून ठेवतो. जसे तिला आपल्या पासून विलग होऊच द्यायचे नाही असा त्याने विचार केलेला असतो. हे माहीत असूनही, की त्याला आता जावे लागणार आहे. आणि... आणि, या एका क्षणाचा अचानक मनात उत्पन्न झालेला मोह झुगारून देऊन तो तिच्या मिठीत असतानाच हवेत विरुन जातो. तिच्या दुःखाला अंत राहत नाही. कारण ती आता यापुढे आदिशला कधीच भेटू शकणार नसते. तिलाही आदिशच्या मिठीत त्याच्या सोबतच सामावून जायचे असते. पण तसे होत नाही. आदिश एकटाच हवेत विरुन जातो आणि त्याचा आवाज मात्र परिसरात घुमू लागतो,

"हे सूंदर जंगल तुझी कल्पना मात्र आहे चेतना. मी कधीच खरा नव्हतो. तुझी एक कोरी कल्पना मात्र होतो मी. निराशेतून, भीतीतून बाहेर पडण्यासाठी तुझ्या मनाने तयार केलेले आभासी जग. आणि म्हणूनच तर मला आदिश नांव दिलेस. एक किरण; आशेचा. मी एक कल्पना असल्यानंच मला चेहरा नव्हता. पण बिनचेहऱ्याचं मला तुझ्या समोर यायचं नव्हतं. म्हणून हा मास्क. मी कल्पना जरी असलो, तरी खरे सांगतो चेतना, तुला पाहताक्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तुला तेच हवं होतं ना? कोणीतरी तुझ्यावर प्रेम करणारं. तुझी काळजी घेणारं तुला कोणीतरी हवं होतं. म्हणूनच जेव्हा तू खूप घाबरलीस, तू माझी निर्मिती केलीस. मलाही आयुष्यभर तुला साथ द्यायची होती. म्हणूनच तर मी तुला मला स्पर्श करू देत नव्हतो आणि खूप इच्छा असूनही स्वतःही तुला स्पर्श करत नव्हतो."

"म्हणजे तुला आधी पासून सगळं माहिती होतं! मग का माझ्या सोबत असं वागलास?" ती रडत ओरडते.

"कारण मी तुझ्यावर प्रेम करतो! सुरुवातीला मला चेहरा नव्हता. नंतर नंतर माझा चेहराही आकार घेऊ लागला. माझ्या लक्षात आलं, की तू माझ्यात गुंतत चालली आहेस आणि नकळत तुझ्या कल्पनेला तू सत्याचं रुप देऊ पाहते आहेस. मला हे होऊ द्यायचं नव्हतं. कारण तू कल्पनेत जगलेलं मला चालणार नव्हतं. म्हणूनच माझा चेहरा पूर्ण तयार होण्याआधी मला तुला सोडून जाणं भाग होतं. मी यासाठी तुझी माफी मागतो. प्लीज मला माफ कर.

"चेतना, जेव्हा स्वप्न सत्याला भेटतं, तेव्हा ते विरुन जातं. हं! कधी कधी तुझ्या सारखं सत्य माझ्या सारख्या स्वप्नापेक्षाही इतकं सूंदर असतं, की मग मलाही तुला भेटावसं वाटलंच... म्हणूनच मी तुला मिठीत घेतलं. आता अदृश्य होण्याची माझी वेळ आली होती. तुझ्या पुढे खूप संधी आहेत. सत्य आणि एक सूंदर जीवन बाहेर तुझी वाट पाहतंय. माझ्यासाठी दुःख करणं सोड. पुढं जा... गुड बाय!" आदिशचा आवाज त्याच्या सारखाच विरुन जातो.

चेतना शेवटी आदिशने सांगितल्यानुसार आपलं दुःख विसरून आयुष्यात पुढे जाण्याचा निश्चय करते... ती त्या जंगलातून बाहेर पडते; ती कायमची! मागे वळून पाहिल्यावर चेतनाला दिसते, ते तेच जुने साधारणसे जंगल; जिथे ती पूर्वी हरवली होती. तिने सत्य स्वीकारलेले असते आणि म्हणून तिच्या कल्पनेतील ते जंगल आता गायब झालेले असते.

समाप्त!