रुहि - एक सांगीतिक प्रवास Suraj Gatade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रुहि - एक सांगीतिक प्रवास

 



रुहि, एक चाइल्ड प्रॉडजी. अगदी लहानपणापासून तिने संगीतात प्राविण्य मिळवलं आहे. संगीत तिचा प्राण आहे आणि ती स्वतः संगीताचा आत्मा आहे. 
संगीत क्षेत्रात ऊंची गाठणं, एक चांगली गायिका होणं, एवढंच तिचं स्वप्न आहे. तिचा ध्यास आहे, फक्त आणि फक्त संगीत... 
या क्षेत्रात मिळणारा पैसा, नांव, प्रसिद्धी, लोकप्रियता अशा गोष्टींशी तिला काही देणं घेणं नसतं. तिची आस्था फक्त संगीतावरच असते. तरी लहान वयातच ती आपल्या गानकौशल्यानं प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली असते. पण एवढ्यावरच तिला थांबायचं नसतं. संगीतातील हर एक गोष्ट शिकणं, स्वतःमध्ये ते भिणवणं व आपल्या स्वरांवाटे ते सर्व व्यक्त करणं एवढंच तिचं लक्ष्य असतं. 
पण कदाचित नियतीला हे मान्य नसतं. एक दिवस गाताना तिच्या गळ्याला त्रास होतो. तिची तपासणी  केल्यानंतर कळतं, की तिला थ्रोट कॅन्सर (घशाचा कर्करोग) आहे...
आणि आता हा तिचा आजार तिला तिच्या स्वप्नापासून दूर ठेवणार असतो... तिच्या घशातील ट्यूमर काढण्यासाठी ऑपरेशन करावं लागणार असतं. पण एकदा का हे ऑप्रेशन झालं, की मग तिचे वोकल कॉर्ड्स (स्वरतंतू) कायमचे निकामी होणार असतात आणि यामुळे ती गाण्याला कायमची मुकणार असते. जर ऑपरेशन झाले, तर ती भविष्यात कधीच गाणं म्हणू शकणार नसते. घशातील ट्यूमरमुळे तिला ऑलरेडी स्वासनाचा त्रास चालू झालेला असतो. वरच्या सुरात गाण्याची क्षमताही ती गमावून बसलेली असते. ऑपरेशन तर गरजेचं असतं; पण जर गाणंच जर नसेल, तर जगून तरी काय उपयोग? त्यापेक्षा जोपर्यंत जगू; तोपर्यंत गात राहू! असं ती ठरवते आणि ती ऑपरेशन करून घेण्यास नकार देते. 
ती आपलं गाणं चालूच ठेवते. तिची अवस्था अधिकच क्रिटिकल होत जाते. तिनं लवकरात लवकर ऑपरेशन करून घेतलंच पाहिजे असं डॉक्टर तिच्या आई-वडिलांना सुचवतात. 
आई-वडिलांच्या खूप विणवणी नंतर ती ऑपरेशनला तयार होते. पण तिची एक अट असते, ऑपरेशन नंतर तिला कोणीही गाण्यापासून रोखणार नाही! मग भलेही तिच्या सोबत काहीही होवो...!
ती ऑपरेशनसाठी तयार होते आहे हे पाहून पुढील परिस्थितीला कसं हाताळावं हे नंतर बघू असा विचार करून तिचे आई-वडिल तिला तसे वचन देतात व तिची विनंती मान्य करतात. 
ऑपरेशन होते. काही दिवसांच्या विश्रांती नंतर ती आपला रियाज पुन्हा चालू करते. तिचे रेकॉर्डिंग्स् पूर्वी सारखे चालू होते, पण अजूनही तिला गाण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असतात. पण ती हार न मानता जिद्दीने आपले काम करत असते. आपल्या गळ्याची ती पुरेपूर काळजी घेत असते...
आणि एक दिवस; नियती पुन्हा तिची हिंमत तोडण्याचा प्रयत्न करते. ऑपरेशन नंतर रुहीचा पहिला लाईव्ह कॉन्सर्ट होणार असतो. तिचा खूप मोठा चाहतावर्ग तिला शुभेच्छा देण्यासाठी व ऑपरेशन नंतरचं तिचं पहिलं गाणं ऐकण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं एकवटलेला असतो. आणि कॉन्सर्टपूर्वी एकटीच गाण्याचा सराव करत असताना तिचा आवाज बसतो. आपला शेवट जवळ आला असल्याचं तिच्या लक्षात येतं. पण चाहत्यांप्रती आपलं पहिलं कर्त्तव्य आहे असं ठरवून त्यांची इच्छा मोडायला नको म्हणून ती आई-वडिलांना किंवा कोणालाही आपल्या तब्येतीविषयी काही न सांगता तब्येत ठिक नसताना ती गायला सुरुवात करते...
गाणं गात असताना अचानक तिचा आवाज जातो. ती बधिर होते. तिची नजर वर शून्यात गुंतते. आणि अचानक सगळा परिसर अदृश्य होतो. वाजत असलेल्या कोणत्याही वाद्याचा आवाज तिला ऐकू येईनासा होतो. ना तिला प्रेक्षकांचा आवाज कानी पडत असतो... सगळीकडे पांढराशुभ्र प्रकाश पसरलेला असतो फक्त... त्या प्रकाशाकडे पाहतच तिच्या ओठांवर समाधानाचं स्मित विसावतं आणि ती स्टेजवरच कोसळते. 
बॅग्राऊँडला डॉक्टरांचा आवाज: "ऑपरेशन नंतर तिने आपल्या घशाची काळजी घेतली नाही, तर ती जास्तीत जास्त वर्षभरच जगू शकेल..."
प्रेक्षकांचा गोंधळ... तिचे आई-वडिल, ऑर्गनाइजर्स, प्रेक्षक स्टेजवर धावतात... प्रेक्षकांचा गोंधळ हळू-हळू कमी-कमी होत जावून रुहिचं शांत व समाधानानं भरलेलं सूंदरसं गाणं त्या गोंगाटाची जागा घेतं. आणि पडदा काळा होतो...
नियतीनं एवढा अन्याय करूनही रुहिनंच शेवटी डाव जिंकलेला असतो. गाणं म्हणतानाच, आपल्या स्वर गंगेनं सरस्वती देवी व प्रेक्षक राजाचा अभिषेक व आराधना करत असतानाच तिनं प्राण सोडलेला असतो... आणि म्हणूनच जाताना तिच्या ओठांवर स्मित तरारलेलं असतं...


समाप्त!



"रुहि" या नांवाचा अर्थ: आत्मा, संगीत स्वर, जे हृदयला स्पर्श करते असे उच्च आध्यात्मिक तत्त्व, अत्यंत प्रिय, उदय, अचानक पुढे येणे, विकसित करणे व विकसित होणे, वाढणे, समृद्ध करणे, वाढवणे, मनुष्याला वरच्या पदावर चढवणे, मन वरच्या पातळीवर नेणे, उभे करणे, उन्नती करणे, अंकुश, अंकुर.
 'एक फूल' असाही या नांवाचा अर्थ होतो. एखादे फूल जसे एकच दिवस जगते, पण जाताना आनंद व सुगंध देऊन जाते. तशीच आहे या कथेची नायिका 'रुहि', जी जाताना आपल्या गाण्याने आनंद पसरवून जाते.
 म्हणून हे नांव व याचा अर्थ आपल्या कथेला खूपच चपखल व मार्मिक आहे.