अ मिटिंग - विथ मिस्टर वाघ Suraj Gatade द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अ मिटिंग - विथ मिस्टर वाघ

"अ मिटिंग"
- विथ मिस्टर वाघ!

लेखक - सूरज काशिनाथ गाताडे.

1.

मिस्टर वाघचे घर. दिवस... दिवस असूनही त्याचे घर अनाकलनीय गूढ शांततेत वसलेलं असल्यासारखे वाटते. का कोणास ठाऊक; पण वाटते...

आत, माजघरात मिस्टर वाघ लँडलाईनवर बोलत होता...

मिस्टर वाघ : हा इन्स्पेक्टर, सुजित प्रभाकर यांच्या केसमध्ये वापरण्यात आलेलं मर्डर वेपन तुम्ही माझ्या घरी घेऊन येऊ शकता?

पलीकडून इन्स्पेक्टरचा आवाज...

इंस्पेक्टर: काय झालं मिस्टर वाघ? कारण केस तर आधीच क्लोज झाली आहे. मग तुम्ही ती परत रि-ऑपन का करू इच्छिता?

मिस्टर वाघ: सुजित यांच्या पत्नी काल माझ्याकडे येऊन गेल्या. मी या केसची फेर तपासणी करावी अशी त्यांची इच्छा आहे. मला वाटतं तुम्हालाही आनंद होईल. तुम्ही दोघे खूप चांगले मित्र होता...

इन्स्पेक्टर: हो नक्कीच. पण मी आत्ता सुट्टीवर आहे. पण मी एक कॉन्स्टेबल पाठवतो.

मिस्टर वाघ: प्लिज, शक्य असेल, तर तुम्हीच या. काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्यायत.

इन्स्पेक्टर: अं... ओके. मी अर्ध्या तासात पोहोचतो.

मिस्टर वाघ: ठिकाय. वाट बघतोय.

इन्स्पेक्टर येईपर्यंत मिस्टर वाघ दोघांसाठी चहा बनवू लागला. इतक्यात डोअर बेल वाजली. वाघ दरवाजा उघडण्यास गेला.

मिस्टर वाघ इंस्पेक्टरला सोफ्याकडे घेऊन आला. मध्ये टी-पॉयवर बरीच कागदं, काही फोटो विखुरलेले पडले होते.
मिस्टर वाघ: प्लिज बसा.
इन्स्पेक्टर: हो. थँक्स. (बसला) हे घ्या तुमचं मर्डर वेपन.
इन्स्पेक्टरने पॉलिथिन बॅगमध्ये गुंडाळलेला हथोडा टी-पॉयवर ठेवला.
मिस्टर वाघ: (हथोडा हातात घेतला) माझं?
इन्स्पेक्टर: म्हणजे, तुम्ही मागवलेलं.
मिस्टर वाघने स्मित केलं. आणि काळजीपूर्वक त्या हथोड्याचं निरीक्षण करू लागला.
मिस्टर वाघ: (आठवल्या सारखे) आह! मी विसरलोच होतो. (उठला) एक मिनिट.
इन्स्पेक्टर: काय?
मिस्टर वाघ: मी आपल्यासाठी चहा केला होता. घेऊन येतो.
वाघ हथोडा खाली ठेऊन किचनमध्ये गेला.

किचनमध्ये, मिस्टर वाघ गॅस स्टोव्हपाशी आला. तो चहा कपांत ओतून बाहेर घेऊन गेला.

बाहेर, मिस्टर वाघ ट्रे टी-पॉयवर ठेवला. इतक्यात, इन्स्पेक्टर टी-पॉयवरील कागदं घेऊन पाहत बसलेला होता. मिस्टर वाघने ट्रे टी-पॉयवर उर्वरित कागदांवर ठेवला.
इन्स्पेक्टर: (कागदांमध्ये पाहत) काल पासून बरेच पुरावे गोळा केलेत की तुम्ही?
मिस्टर वाघ: काल पासून नाही. तुमच्या सोबतच इन्वेस्टीगेशन करत असताना तुमच्याकडच्या पुराव्यांच्या कॉपीज माझ्याकडे घेतल्या होत्या त्याच आहेत या.
इन्स्पेक्टर: (कागदं खाली ठेवली) ओह!
मिस्टर वाघ: (अंगुलीनिर्देश करत) प्लिज ते पेपर्स साइन करा.
इन्स्पेक्टर: (एक फाईल हाती घेतली) कोणते हे?
मिस्टर वाघ: हो.
इन्स्पेक्टर: का?
मिस्टर वाघ: ते माझ्या रेकॉर्डसाठी आहे. त्यात लिहिलंय, की तुम्ही मला महत्त्वाचे पुरावे हाताळण्याची व पर्सनल इन्वेस्टीगेशन करण्याची परवानगी देत आहात. उद्या मला काही प्रॉब्लेम्स नकोत म्हणून.
इन्स्पेक्टरने पहिले पण वाचले. आणि दुसरे वाचण्यासाठी पान पलटले...
मिस्टर वाघ: (खोचकपणे) सगळं वाचणार आहात?
इन्स्पेक्टर: (हसला) नाही. फक्त नजर टाकतोय.
मिस्टर वाघ: प्रत्येक पुराव्यासाठी वेगळं ऍग्रिमेंट आहे.
इन्स्पेक्टरने त्यावर सही केली.
मिस्टर वाघ: प्लिज, शेवटच्या ब्लँक पेजवर पण सही करा.
इन्स्पेक्टर: का?
मिस्टर वाघ: ते हथोड्यासाठी डॉक्युमेंट बनवायचं राहिलंय. तुम्ही सही करा. मी नंतर कॉन्टेन्ट त्यावर टाइप करीन.
इन्स्पेक्टर: ठिकाय.
त्याने ब्लँक पेजवरही सही केली.
मिस्टर वाघने इन्स्पेक्टर समोरील चहामध्ये शुगर फ्रीचे थेंब सोडले.
इन्स्पेक्टर: ते कायाय?
मिस्टर वाघ: (स्मित करत) शुगर फ्री. तब्येतीला चांगलं असतं.
इन्स्पेक्टर: मी साखरच घेईन.
मिस्टर वाघ: (टी-पॉयवरील एक फोटो हाती घेतला) ठिकाय. शुगर क्यूब्स डायनिंग टेबलवर आहेत. तुम्ही स्वतः घ्याल?
इन्स्पेक्टरने होकारार्थी मान हलवली आणि डायनिंग टेबलकडे गेला.
इन्स्पेक्टर: बाय द वे; तुम्हाला कशाबद्दल बोलायचं होतं? काही लीड सापडलीय का?
इन्स्पेक्टर शुगर क्यूब्सची बरणी घेऊन परत सोफ्याकडे आला. दरम्यान मिस्टर वाघ हथोडाही हाती घेऊन फोटो व हथोडा दोन्ही एकत्र नीट पाहत होता.
इन्स्पेक्टरने 2 शुगर क्यूब्स त्याच्या चहात टाकले आणि तो चहा ढवळू लागला.
मिस्टर वाघ: नथींग स्पेशल. मला या हथोड्याचं निरीक्षण करायचं होतं. पण हा हथोडा बदललाय. या हथोड्यानं खून झालाच नाहीये.
इन्स्पेक्टर: (गोंधळून) तुम्हाला म्हणायचंय काय?
मिस्टर वाघ: (वर इन्स्पेक्टरकडे पाहीले) तुम्ही आणलेला हथोडा सुजित यांना मारण्यासाठी वापरलाच गेला नाही!
इन्स्पेक्टर: तुम्ही हे कसं म्हणू शकता?
मिस्टर वाघ: (फोटो दाखवत) सोप्पंय. इथे, तुमच्या फोटोग्राफरने पंचनाम्याच्या वेळी काढलेल्या फोटोतला हथोडा वेगळा आहे.
इन्स्पेक्टरने फोटो हाती घेतला.
फोटोमध्ये - रक्ताने माखलेला हथोडा रस्त्यावर पडलेला होता. रात्रीच्यावेळी काढलेला फोटो होता तो.
थोड्या वेळाची शांतता... मिस्टर वाघनेच ती शांतता भंग केली...
मिस्टर वाघ: (भाव क्रूर झाले) इन्स्पेक्टर, तुम्ही चुकीचा हथोडा का आणलात? तुम्ही काही लपवू तर पाहत नाहीत ना माझ्यापासून?
इन्स्पेक्टर: (थोडा हादरला. त्याने चहाचा कप ओठांपासून दूर घेतला) क... काय म्हणायचं कायाय तुम्हाला?
मिस्टर वाघ: (मोकळेपणे हसला) रिलॅक्स! चेष्टा करतोय. प्लिज, चहा घ्या.
इन्स्पेक्टर: (नि:श्वास सोडत) हा... मिस्टर वाघ. प्लिज, प्लिज; असं मला घाबरवत जाऊ नका...
मिस्टर वाघ पुन्हा हसला. चहाचा घोट घेतला. पेपर्स पाहू लागला. इन्स्पेक्टरही शंकीत नजरेने मिस्टर वाघकडे पाहत चहाचा घोट घेत होता.
आणि काही वेळाने अचानक त्याला अस्वस्थ वाटायला लागले.
इन्स्पेक्टर: (गुदमरत) का... मिस्टर वाघ... मी... का...
मिस्टर वाघ: (ओठांचा कप बाजूला घेतला. पेपर्स टी-पॉयवर फेकले) अपराध्याला शिक्षा झाली पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला?! तुम्ही खुनासाठी वापरण्यात आलेल्या हथोड्यासारखा दुसरा हथोडा घेऊन आलात तावडे! तुम्हाला वाटलं माझ्या लक्षात येणार नाही! इतकं मूर्ख समजता मला तुम्ही? पण हा तुमचा मूर्खपणा आहे! असो; यावरूनच सिद्ध होतं, की तुम्ही सुजित यांच्या मृत्यूबद्दल काही तरी लपवू पाहताय. तुम्ही माझ्यावर संशय घेतलात. तुम्हाला वाटलं, मी शुगर फ्रीईच्या निमित्ताने तुमच्या चहात विष टाकतोय की काय. म्हणून तुम्ही तो चहा नाकारलात. हो ना? हं! पण मी शुगर फ्री मध्ये नाही, तर शुगर क्यूब्समध्ये विष मिसळलं होतं. शुगर क्यूब्स मी तुम्हाला स्वतःला घ्यायला सांगितलं आणि शुगर फ्री घातलेला चहाही मी स्वतः घेतला म्हणून क्यूब्स बद्दल तुम्हाला शंका आली नाही. विषाची तुमची शंका तुमच्या लेखी मोडीत निघाली आणि तुम्ही स्वतः आपल्या चहात विष घालून घेतलं आणि ते पिलातही तावडे!
मिस्टर वाघने क्रूर स्मित केले. इन्स्पेक्टरचा हात त्याच्या रिव्हॉल्वरकडे गेला... पण मिस्टर वाघ जराही न घाबरता पुढे बोलला...
मिस्टर वाघ: तुझा वेळ वाया घालवू नको तावडे! तुझ्याकडे फक्त १५ मिनिटं आहेत. यावेळेत जर तुझी ट्रिटमेंट झाली, तरच तुझा जीव वाचू शकतो...
इन्स्पेक्टर: ब... बास्टर्ड...
इन्स्पेक्टरने धडपडत पण गडबडीने मिस्टर वाघचे घर सोडले.
गाडी गेल्याचा आवाज मिस्टर वाघला ऐकू आला व तो मागे रेलून बसला. शांतपणे डोळे मिटून घेतले.

2.

रात्री लँडलाईन वाजला. मिस्टरने वाघ येऊन फोन घेतला.
कॉन्स्टेबल: हॅलो सर, गांधीनगर पोलीस स्टेशनमधून कॉन्स्टेबल पाटील बोलतोय. इन्स्पेक्टर तावडे एक्सिडेंट मध्ये मरण पावलेत. त्यांची गाडी अवजड ट्रकला थडकली. उद्या सकाळी सात वाजता त्याचे अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिस्टर वाघ: (खिन्नपणे) माहिताय. माझ्या घराजवळच घडलंय हे. सॉरी फॉर युअर लॉस पाटील. माय कंडोलेन्सेस. मी असेन तिथे उद्या. (रिसिव्हर खाली ठेवला) तर तो स्वतःला वाचवू शकला नाहीच. तसा तो वाचवू शकणारही नव्हताच! कारण त्याच्याकडं त्याहीपेक्षा खूपच कमी वेळ शिल्लक होता. (गालातल्या गालात हसला) मी वेळे संबंधी त्याला खोटं बोललो होतो. गाडी चालवताना त्याची शुद्ध हरपली. आणि त्याच्या गडबडीने त्याला मृत्यूच्या दाढेत ओढले!

3.

मिस्टर वाघने शुगर क्यूब्स चहात घातले.
मी: (घाबरत) म... मला शुगर फ्री चालेल...
मिस्टर वाघ: (हसला) घाबरू नको. यात काही नाही!
मी: (संकोचत) मग... इन्स्पेक्टर तावडेंच्या शुगर क्यूब्समध्ये काय होतं?
मिस्टर वाघ: (कपातील चहा ढवळत माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला) पोटॅशियम सायनाईड!
मी: सायनाईड का? तुम्ही पकडले जाल... तावडे त्यांच्या मृत्यू आधी तुम्हाला भेटायला आलेले ना? त्यांचा एक्सिडेंट पण तुमच्या घराजवळच झाला... त्यामुळं तुम्हाला सस्पेक्ट करणं सोपं आहे... नाही...
मिस्टर वाघ: (मोठयाने हसला) तर तुला माझी काळजी वाटते. माझी कोणीच काळजी करत नाही सूरज. तू पहिला माणूस आहेस. पण मी तुला खात्री देतो, काळजी करण्यासारखं काही नाही. पोलीस माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत.
मी: (गोंधळून) कसं?
मिस्टर वाघ: (स्मित केले) घे. चहा घे!
त्याने कपबशी माझ्याकडे दिली. मी गोंधळलेल्या मनःस्थितीतच त्याच्या हातून कपबशी घेतली. त्याने एक पत्र माझ्या समोर धरले. मी कपबशी टी-पॉयवर ठेवली व ते पत्र हातात घेऊन पाहू लागलो. ते पत्र म्हणजे तावडेच्या सुसाईड नोटची झेरॉक्स प्रत होती!
मी (अधिकच गोंधळून) पण कसं?
मिस्टर वाघ: (कपटी स्मित करला) आठवतंय? त्यानं स्वतःच तर सही केली. एका ब्लँक पेपरवर. मी फक्त सुसाईड नोट टाईप करून प्रिंट केली त्यावर.

माझा चेहरा भावना रहित होता.
मी: (गोंधळून मिस्टर वाघकडे पाहिले) तर, पोलिसांनी अटॉप्सी ऑपरेट केली नाही?
मिस्टर वाघ: (हुंकार सोडला) त्यांना गरजच नव्हती. कारण तावडेचं मरण क्रिस्टल क्लियर होतं. तो एक्सिडेंटमध्ये मेला होता. त्यामुळे त्याला विष दिलं असेल असा कोणाला संशयच आला नाही.
मी: पण जर त्यांनी अटॉप्सी केली असती, तर?
मिस्टर वाघ: (निष्काळजीपणे) तर काय? त्यांना सायनाईड सापडलं असतं.
मी: आणि तुम्ही पोलिसांच्या हातात असता...
मिस्टर वाघ: (पुढे झुकला) तुला खरंच असं वाटतं?
सूरज: तुम्हाला म्हणायचं कायाय?
मिस्टर वाघ: (मागे सरकला. रेलून छताकडे पाहत) मी आधीच तावडेच्या सुसाईड नोटची ओरिजल कॉपी कमिश्नरला पाठवून दिली आहे. त्यामुळे, (माझ्याकडे झुकला) त्यामुळे जरी त्यांना सायनाईड मिळाले असते, तरी त्यांनी हाच विचार केला असता, की त्याने आत्महत्या करण्यासाठी स्वतःच ते सायनाईड खाल्ले आहे. त्यामुळे माझ्यावर काहीच आलं नसतं. त्याचा एक्सिडेंट विष खाल्ल्यानेच झाला. बहुधा तो गाडी चालवताना बेशुद्ध पडला असेल, किंवा मेलाच असेल! पण तो एक्सिडेंट मध्ये गेलाय असे वाटल्याने अटॉप्सीचा प्रश्नच नव्हता. आत्महत्येसाठीच त्याने त्याची गाडी ठोकली असाच निष्कर्ष काढण्यात आला. मी पाठवलेली सुसाईड नोट ही माझ्यासाठी परफेक्ट एलबाय आहे! पोलिसांना माहिती आहे, की तावडे मला भेटायला आला होता, पण कोणी माझ्यावर संशय नाही घेऊ शकत!

4.

मिस्टर वाघ पुस्तक वाचत बसला होता. त्याचा मोबाईल वाजला.
मिस्टर वाघ: बोला कमिश्नर.
कमिश्नर: (पलीकडून) तुम्ही पाठवलेली सुसाईड नोट मिळाली. पण तुम्हाला ती कशी मिळाली?
मिस्टर वाघ:  इन्स्पेक्टर तावडे भेटायला आले, तेव्हा जाताना त्यांनी मला एक सिल्ड् इन्वेलोप दिला. मी सांगेन त्यावेळी उघडा म्हणाले. म्हणून मी पाहिलं नाही. तावडेच्या मृत्यूची बातमी आल्यावर मी तो उघडून पाहिला, तर आत ते पत्र होते. मला माफ करा सर, जर मी तो इन्वेलोप आधीच उघडून पहिला असता, तर कदाचित... हे असं झालं नसतं...
कमिश्नर: नाही. नाही. मिस्टर वाघ! प्लिज स्वतःला ब्लेम करू नका. यात तुमची काहीच चूक नाही...

5.

मी: (स्तब्ध) तुम्ही नेहमी माझ्या डोक्याचा भुगा करता...
मिस्टर वाघ खळखळून हसला. आणि त्याने चहाचा घोट घेतला.
मी: पण सायनाईड का? ही तुमची स्टाईल नाही.
मिस्टर वाघ: (स्मित करत) कारण सायनाईड हे बहुज्ञात आणि सहज उपलब्ध होणारं विष आहे. जर मी माझं स्पेशल टेक्निक किंवा ड्रग वापरलं असतं, तर ते संशयास्पद ठरलं असतं. त्याचा एक्सिडेंट झाला नसताच, तर त्याचे पोस्टमार्टम झाले असते. आणि त्याला मारण्यासाठी विशेष ड्रग वापरलंय हे समजलं असतं, तर त्याच्या आत्महत्येची चिट्ठी पाठवून देखील काही उपयोग झाला नसता. त्याचा खून झाला असेल, या शक्यतेवर विचार झाला असता. आणि ते माझ्यासाठी अवघड झालं असतं. पण सायनाईड कॉमन ड्रग असल्यानं माझ्यावर संशय येईल असं घडणार नव्हतं!
मी: पण आता तावडे एक्सिडेंटमध्ये मेला होता, त्यामुळे तुम्हाला त्याची सुसाईड नोट कमिश्नरना पाठवण्याची गरज नव्हती. मला नाही वाटत, की त्यांनी तुमच्यावर घेतला असता...
मिस्टर वाघ: चुकतोयस तू. मला ते करणं गरजेचंच होतं. कारण मी तसं केलं नसतं, तर पोलिसांनी त्याच्या मृत्यूचं इन्वेस्टीगेशन केलं असतं. मला ही केसच उभी राहू द्यायची नव्हती!
मी: पण तुम्ही इन्स्पेक्टरना मारलं का?
मिस्टर वाघ: (चहाचा घोट घेत) मी सुसाईड नोट मध्ये कारण मेंशन केलं नाही का?
सूरज: (पत्रात पाहत) हो! पण यात लिहिलंय, की त्यांनी सुजित प्रभाकरना जीवे मारले होते. आणि याचा अपराधबोध झाल्यानं त्यांनी आत्महत्या केली... (मि. वाघकडे पाहत) पण, हे खरंय?
मिस्टर वाघ: (गंभीर झाला) अगदीच खरंय!
त्याने त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ प्ले करून माझ्याकडे दिला. ते एक सीसीटीव्ही फुटेज होते.
फुटेजमध्ये, रात्र - इन्स्पेक्टर तावडे सुजितच्या डोक्यात हतोड्याने वार करत होता.
ते दृश्य खूप विदारक होतं. मी अस्वस्थ झालो आणि व्हिडीओ बंद करून मोबाईल टी-पॉयवर ठेवला.
मी: हे... हे खूप भयानक आहे... पण का... त्यांनी सुजित यांना का मारले?...
मिस्टर वाघ: सुजित प्रभाकर हा पण एक पोलीस ऑफिसर होता. त्याने तावडेला 375 सेक्शन अंडर अरेस्ट वकरण्याचा प्रयत्न केला होता.
मी: (स्तब्ध) म्हणजे; रेप?
मिस्टर वाघ: (होकारार्थी मान हलवली) तावडेने दारूच्या नशेत १८ वर्षांच्या एका अनाथ मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. सुजित त्याच्या बरोबरच होता. दोघे पिऊन घरी येत असतानाचा हा सगळा प्रकार. समोरून येणारी मुलगी पाहून तावडेचा तोल ढळला. सुजितने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तावडे ऐकेना. दोघांमध्ये मारामारी झाली. आणि यातच तावडेनं सुजित प्रभाकरला ठार मारलं. त्यानं त्या मुलीला पण मारून टाकलं, कारण ती या घटनेची आय विटनेस होती. शिवाय त्याच्या कुकर्माची बळीही. तावडेनं असा सिन सेट अप केला, की सुजितनं त्या मुलीचा विनयभंग केल्यानं तिनं त्याला मारलं. आणि लोकलज्जेनं व लोकापवादाच्या भीतीनं स्वतः पण आत्महत्या केली.
मी: (घाबरलेला, स्तब्ध) हेल! एवढं सगळं तुम्हाला कसं माहीत?
मिस्टर वाघ: मला इतके दिवस ओळखत असूनही तुला खरंच अजूनही असा प्रश्न पडतो? तू मला विचारतोयस सूरज! (माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून) मित्च्च! ऐक! प्राथमिक तसापावेळी मी सुरुवातीपासून या केसमध्ये पोलिसांमार्फतच काम करत होतो. मी सगळ्यांत आधी म्युनिसिपाल्टी कंट्रोलरूममध्ये जाऊन रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजेस पाहिले. आणि प्रकार माझ्या लक्षात आला. तावडेने जेव्हा त्या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती रहात असलेल्या अनाथाश्रमातला  १० वर्षांचा एक मुलगा तिच्या सोबत होता. मदतीसाठी तो तेथून धावला. तावडे पोलीसच असल्यानं त्या मुलानं ही घटना कोणत्याच पोलिसाला सांगितली नाही. मी त्या मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्याच्याकडून ही काही विशेष माहिती मिळाली. सुजित मर्डर केसच्या इन्वेस्टीगेशन टीमचा इंचार्ज तावडेच असल्याने सीसीटीव्ही फुटेज स्वतःहुन गोळा करून ते नष्ट करणं त्याला शक्य नव्हतं. म्हणून सीसीटीव्हीचा विषयच त्याने इन्वेस्टीगेशन टीम समोर काढला नाही. केस निवळल्यावर ती कलेक्ट करून नष्ट करावीत असा त्याचा विचार होता. त्याचा हा निर्णय माझ्या पथ्यावर पडला आणि मी ती सगळी फुटेजेस मिळवली व त्याचे रेकोर्ड्स नष्ट केले. केस मिटवल्यावर जेव्हा तावडे फुटेजेस पाहण्यासाठी म्युनिसिपाल्टी कंट्रोलरूमला गेला, तेव्हा त्याला त्यावेळची घटना तिथे रेकॉर्ड झालेली आढळली नाही. त्यामुळे तो थोडा निर्धास्त झाला. 
मी गप्प झालो होतो. हा प्रकार माझ्यासाठी मोठा धक्का होता.
मिस्टर वाघ: (पुढे बोलला) बाय द वे, तू एक प्रश्न विचारायचा विसरलायस? काय आता तुझं काम पण मीच करायचं का?
मी: (गोंधळून) कोणता?
मिस्टर वाघ: तावडेनं सुजितला मारण्यासाठी हथोडा कोठून मिळवला हे तुला जाणून घ्यायचं नाही?
मी: हो. मी विसरलोच. कोठून?
मिस्टर वाघ: इमर्जेन्सी मध्ये कामी येतील म्हणून सुजितच्या गाडीत काही टूल्स असायची. त्यातलाच तो हथोडा.
मी: म्हणजे त्यावेळी त्यांच्याकडे गाडी होती?
मिस्टर वाघ: हो आणि तेही विदाऊट ड्राइव्हर. पिऊन गाडी चालवण्याच्या विचारत होते ते. आणि म्हणूनच दोघांचंही मरणं गरजेचंच होतं!
मी: तुम्ही खरंच खूप क्रूर आहात! माणसांना मारण्यात तुम्हाला मजा येते. नाही?!
मिस्टर वाघ: तसं म्हण हवं तर, पण माझ्या नजरेत, मी फक्त गुन्हेगारांना शिक्षा करतोय! (तो मागे रेलला) तुला माहितेय? सायनाईडने मृत्यू कसा होतो? सायनाईड जीवंत सेल्सना ऑक्सिजन पोहोचू देत नाही. आणि परिणामी पोईसन्ड् व्यक्तीचा मृत्यू होतो!
मी: मी तुम्हाला गॉड ऑफ डेथ म्हणतो, ते काही खोटं नाही...
मी फ्रीज होऊन त्याच्याकडे पाहत होतो.  टी-पॉय वरचा माझा चहा थंड होत होता. मिस्टर वाघ शांतता भंग करत क्रूरपणे हसू लागला...
भीतीने मी मात्र गार झालो होतो... इतका गार, की थंडगार मण्यार माझ्या पायाला रेंगाळून गेला, पण तेही मला जाणवलं नाही, आणि त्या विषारी मण्यारला पण जाणवलं नाही, की मी कोणी जीवंत प्राणी आहे...

समाप्त!