S books and stories free download online pdf in Marathi

स s चि s न s

** स s चि s न s ** गेली तीस वर्षे जगभरातील आणि विशेषतः भारतीय क्रिकेट मैदानावर 'सचिन सचिन ' हा जयघोष आपण ऐकत आहोत. ही व्यक्ती दिसताक्षणी प्रत्येकाच्या शरीरात एक वेगळाच उत्साह, स्फूर्ती, आनंद, नवचैतन्य, समाधान, ऊर्मी आणि त्याच्या ठायी असलेला आदर, आपलेपणाचा भाव एक वेगळीच आत्मियता अशा अनेकानेक भावना उचंबळून येतात. कोण आहे ही व्यक्ती? क्रिकेटमधून संन्यास घेतला असला तरी हा माणूस आजही आमच्या ह्रदयी कायम वसलेला आहे. खरे तर केवळ सचिन या तीन अक्षरांमध्ये जणू काही सारे ब्रम्हांड सामावलेले आहे.
सचिन रमेश तेंडुलकर या माणसाविषयी खरे तर जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी 'देव' असलेल्या या व्यक्तीबाबतीत काय लिहावे, किती लिहावे, कुठून सुरुवात करावी, कुठे थांबावे असे अनेक प्रश्न मनात दाटून येतात. रमेश तेंडुलकर आणि सौ. रजनीताई तेंडुलकर यांच्या घरामध्ये २४ एप्रिल १९७३ या दिवशी एका पुत्ररत्नाने जन्म घेतला. त्यापूर्वी या उभयतांना नितीन, अजित आणि सविता ही अपत्ये होती. आपण जे चौथे अपत्य जन्माला घालतोय ते मूल भविष्यात केवळ त्याचे स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे नव्हे तर आपल्या भारत देशाचे नाव त्रिभुवनात अजरामर करणार आहे हे त्या मायबापाला काय माहिती असणार ?
२४ एप्रिल १९७३ची दुपार. रमेश तेंडुलकर त्यांच्या पत्नी रजनीताई यांना घेऊन दवाखान्यात गेले होते. नितीन, अजित आणि सविता ही भावंडं त्यांच्या दादा आजोबांसोबत घरीच होती. सारे मिळून जेवायला बसली असली तरी कुणाचेही लक्ष जेवणात लागत नव्हते. प्रत्येकच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, तो म्हणजे 'मला भाऊ होणार की बहीण?' दवाखान्यातून कधी एकदा बाबांचा निरोप येतो याकडे आजोबांसह सर्वांचे लक्ष लागले होते. हाच प्रश्न विचारून ते दादा आजोबांना भंडावून सोडत होते.
"आजोबा, सांगा ना, आम्हाला भाऊ होणार की बहीण ?"
"आजोबा, पण तो कधी जन्माला येणार आहे? किती वेळ वाट पाहावी लागणार आहे?"
"आपण आपल्या भावाचे नाव काय ठेवायचे?"
"आजोबा, तुम्ही भविष्य बघता ना मग सांगा की, बाळ कधी जन्माला येणार आहे?"
दादा आजोबा भविष्याचे जाणकार, अभ्यासक होते. मुलांची प्रश्नावली सुरु असताना अचानक दादा म्हणाले, " अरे, थांबा. काय मस्त योग जुळून आला आहे. याबाळाने जबरदस्त टायमिंग साधलं आहे. आत्ताची जी ग्रहांची स्थिती आहे ना, असा योग शेकडो वर्षात एकदा येतो. अरे, असे पाहता काय तुम्हाला भाऊ झालाय. तुमचा हा भाऊ भविष्यात खूप नाव कमावणार आहे. फार मोठा माणूस होणार आहे. बाळाला पाहायला जातांना थोडे सोने घेऊन जायला हवे. "
दादा आजोबा म्हणाले आणि त्या बाळाने त्यांचे बोल भविष्यात अक्षरशः खरे ठरवले. दादा म्हणाले ते अचूक टायमिंग हे त्या बाळाचे भविष्यात फार मोठे शस्त्र ठरले. त्या अस्त्राच्या आधारे त्याने भल्याभल्यांना नामोहरम केले. 'जन्मलेले बाळ भविष्यात फार मोठी व्यक्ती होईल ' हे दादांचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. 'बाळाला बघायला जाताना थोडे सोने सोबत नेऊ ' असे दादा का म्हणाले असतील ? 'आपला हा नातू स्वतःचे आणि घराण्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिणार, अजरामर करणार' हे त्यांनी जाणले असावे.
रमेश तेंडुलकर यांना मुलगा झाला. भावंडांना एक भाऊच नाहीतर एक सवंगडी मिळाला. भाऊ झाला तसे चर्चांंचे स्वरूप बदलले. आपल्या छोट्या, गोड भावाचे नाव काय ठेवायचे या एकाच विषयावर त्या भावंडांमध्ये चर्चा रंगू लागल्या. त्यांच्यामध्ये एकमत होत नसताना ते त्यांचा वाद आईबाबा, आजोबा यांच्याकडे नेत असत. त्यावेळी 'गाईड' हा चित्रपट खूप गाजत होता. चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. तेंडुलकर कुटुंबातील सर्वांंना गाण्याची आणि संगीताची फार मोठी आवड होती. गाईड सिनेमाचे संगीतकार सचिन देव बर्मन होते. तेंडुलकर यांच्या घरात ती गाणी सतत गायली जात. अगदी लहान मुलेही जमेल तशी ती गाणी गात असत. नेहमीप्रमाणे त्या दिवशी त्या भावंडांमध्ये बाळाचे नाव ठेवण्यावरून चर्चा रंगलेली असताना अचानक कुणी तरी म्हणाले,
"अरे, ऐकाना, मला काय वाटते आपण आपल्या बाळाचे नाव 'सचिन' ठेवूया का?"
"अरे व्वा ! किती छान नाव आहे. चला, आपण आईबाबांना सांगूया." असे म्हणत ते सारे आईबाबांकडे गेले आणि त्यांंच्याकडे बाळाचे नाव सचिनच ठेवायचे असा हट्ट धरला. ते नाव सर्वांंनाच आवडले. थाटामाटात बारसे झाले आणि बाळाचे नाव 'सचिन'असे ठेवण्यात आले. बाळाला सचिन रमेश तेंडुलकर हे नाव मिळाले. लहानपणी सारे खेळताना, खेळवताना, बोलावताना, लाडाने 'सचिन... सचिन..' असा राग आळवत असत तेच नाव काही वर्षांनंतर जगभरातील मैदानावर अधिराज्य करू लागले. ते एक नाव राहिले नाही तर तो एक नारा झाला, रसिकांसाठी एक मंत्र झाला, जयघोष झाला.
अचूक वेळ या तंत्रासह एकाग्रता सचिनच्या जीवनाचा जणू एक मंत्र! ही गोष्ट सचिन लहान असतानाच कुटुंबातील व्यक्तींंच्या लक्षात आली. लहानगा सचिन झोपी जावा म्हणून त्याचे बाबा त्याला कडेवर घेत, त्याची मान खांद्यावर घेऊन घरातल्या घरात फेऱ्या मारत असत. सचिन लवकर झोपी जावा म्हणून ते 'विठ्ठला तू वेडा कुंभार..' हे गाणे म्हणायचे. ते गाणे ऐकत, हाताचा अंगठा चोखत सचिन झोपी जाई. क्रिकेट खेळताना एकाग्र होण्याचे, फटके मारताना सुमधुर संगीत छेडण्याचे बाळकडू सचिनला अशारीतीने मिळत गेले. कानावर पडणारा 'वेडा' हा शब्द जणू सचिनसाठी मंत्र बनत गेला. मैदानावरील प्रत्येक क्षण तो वेडा होऊन घालवत असे.
सचिनचे वडील रमेश तेंडुलकर प्राध्यापक होते. आई विमा कंपनीत काम करीत होती. आईवडील नोकरीला, भावंडं शाळेमध्ये गेली म्हणजे सचिन त्याच्या आजीसोबत घरी एकटाच असे. मुळात सचिन अतिशय खोडकर होता.त्याच्या खोड्यांना आजी कंटाळून जात असे. तिला आठवायचे की, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण लहानपणी असाच खोडकर होता. त्याच्या धिंगाण्याला कंटाळून माता यशोदा श्रीकृष्णाला उखळीला बांधून कामे करायची. तसाच प्रयोग सचिनच्या आजीने आरंभला. सचिनचा एक पाय पलंगाला बांधून आजी स्वतःची कामे आटोपत असे. त्या शिक्षेचा परिणाम भविष्यात सचिनच्या खेळींमध्ये जाणवत होता. फलंदाजी करताना सचिन खेळपट्टीवर स्वतःला बांधून घेतल्याप्रमाणे तास न तास फलंदाजी करीत असे.
यशस्वी होण्यासाठी सुसंस्कार महत्त्वाचे ठरतात. कुटुंब आणि समाज यांच्याकडून जे संस्कार लहानपणी होतात ते भविष्यात फार उपयोगी ठरतात, दिशादर्शक ठरतात. सचिनला त्याच्या कुटुंबाकडून सर्वोत्तम असे संस्कार मिळाले, जणू बाळकडू मिळाले. ते त्याच्या रक्तात भिनल्या गेले. सचिनविषयी बोलताना, लिहिताना, चर्चा करताना देश-विदेशातील लोक म्हणतात की, सचिनचे कुटुंब म्हणजे सद्गुणांची खाण, संस्काराचे विद्यापीठ! सचिनजवळ असलेले निष्ठा, भक्ती, कष्ट, सातत्य, शालिनता, अभ्यास आणि शिकण्याची व्रुत्ती, सर्वस्व झोकून देण्याची आवड, प्रामाणिकपणा, सत्यता, निर्व्यसनी इत्यादी अनेक गुण त्याच्या यशस्वी जीवनाचा गाभा आहेत. उच्च संस्कार अंगी बाणल्या गेल्यामुळे तो कधीच यशाने हुरळून गेला नाही तर तो अधिक नम्र झाला. यश, पैसा, कीर्ती त्याच्यापुढे हात जोडून उभ्या असतानाही त्याचे पाय कायम जमिनीला चिकटून असत....
सचिन लहानपणी जसा खोडकर होता तसाच तो गमत्या आणि विनोदी होता. एकदा तेंडुलकर कुटुंबीय 'माँ' सिनेमा पाहायला शहर वाहतूक बसने जात होते. सोबत सचिन आणि त्याची भावंडंही होती. वाहक प्रवाशांना तिकिटे देत सचिन बसलेल्या आसनाजवळ आला असताना सचिन रमेशरावांना म्हणाला,
"बाबा, पैसे द्या. मी तिकीटे घेतो."
बाबांजवळून घेतलेले पैसे वाहकाकडे देत सचिन म्हणाला, "माँ सिनेमाची तिकीटे द्या."
सचिनचे ते बोल ऐकून आजूबाजूचे सारे प्रवासी हसू लागले. काय झाले, लोक का हसताहेत हे न समजल्यामुळे सचिन गोंधळून गेला. त्याची ती अवस्था पाहून त्याच्या वडिलांनी त्याला सिनेमाची तिकीटे कुठे मिळतात ते समजावून सांगितले. ते ऐकून सचिनही हसू लागला....
यथावकाश सचिनचा शाळेत प्रवेश झाला. सचिन मुळात हुशार होता. शाळेत शिकत असतानाही त्याच्या खोड्या सुरुच असायच्या. वर्गात एखादा नवीन मुलगा आला की, सचिन मित्रांना विचारत असे, " मी याला उचलून आपटू का रे?" सचिनच्या तशा प्रश्नावर त्याचे मित्र हसायचे कारण सचिनची तब्येत किरकोळ अशीच होती.
एकदा सचिन त्याच्या एका मित्राला घेऊन घराच्या गच्चीवर खेळत होता. सचिनच्या बोटाला बांधलेली पट्टी पाहून मित्राने विचारले, " सचिन, तुझ्या बोटाला काय झाले रे ?"
सचिन म्हणाला, " अरे, काल मी गच्चीवर खेळत होतो तितक्यात एक हेलिकॉप्टर माझ्या जवळून गेले. मी त्या हेलिकॉप्टरला हात लावला. त्यामुळे बोटाला मार लागला. "
"जास्त लागले का रे? रक्त खूप आले का?" मित्राने विचारले.
" हो ना. तुला सांगतो,रक्ताची अशी धार लागली ना की, सारी गच्ची माझ्या रक्ताने भरून गेली...." सांगता सांगता सचिन स्वतःच हसत असल्याचे पाहून तो मित्रही हसू लागला....
अशीच दंगामस्ती, खोड्या करीत असताना सचिन क्रिकेटकडे आकर्षित झाला. मोठा भाऊ अजित त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असे. सुरूवातीला सचिन त्यांचा खेळ मन लावून, लक्ष देऊन बघत असे. फलंदाजांने फटकावलेला चेंडू आणून देणे हे काम करीत असताना तो क्षेत्ररक्षणाचे धडे गिरवू लागला. नंतर आपल्या मित्रांसोबत तो वसाहतीमध्ये असलेल्या मैदानावर क्रिकेट खेळू लागला. त्याच्या वयाच्या मानाने त्याच्याकडे असलेली क्रिकेटची समज आणि त्याच्या फटक्यातील विविधता, जोरकसपणा पाहून अजित अवाक होऊ लागला. त्याच्यातील वेगळेपणा, क्रिकेटची भूक, आवड पाहून अजितने वडिलांबरोबर चर्चा केली आणि एक दिवस अजित सचिनला
घेऊन रमाकांत आचरेकर यांंच्याकडे घेऊन गेला. त्याकाळी आचरेकर हे नावाजलेले क्रिकेट शिक्षक होते. सचिनचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट शिकणे सुरू झाले. मनसोक्त खेळायचे, बागडायचे, दंगामस्ती करायची, नाना प्रकारचे हट्ट करून जे पाहिजे ते मिळवायचे असे वय असताना सचिन नामक छोटे बालक क्रिकेटचा अभ्यास करू लागले. त्याचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनखाली तो तास न तास क्रिकेटचे धडे गिरवू लागला. सचिन शिकत असलेल्या शाळेतील त्याच्या वर्गशिक्षिका सीमा दळवी सचिन बाबतीत म्हणतात,
"मुंबईतल्या कोणत्याही मैदानावर क्रिकेटचा सामना असला की, आचरेकरसर शाळेत येऊन सचिनला सोबत घेऊन जात असत. क्रिकेट खेळायला जायचे म्हटले की, सचिन अत्यंत आनंदाने त्यांच्यासोबत जाई. कधीकधी एकाच दिवशी वेगवेगळ्या मैदानावर सामने असत. सचिन न थकता, कोणतीही तक्रार न करता चार- चार सामने खेळत असे. साहजिकच सचिनचा शाळेतील अभ्यास मागे पडत असे. परंतु रिकाम्या वेळी सचिन जास्त अभ्यास करून भरपाई करीत असे. एकपाठी असल्यामुळे त्याला समजून घ्यायला वेळ लागत नसे. अतोनात मेहनत करणे, प्रामाणिकपणा, नम्रता या गुणांमुळे सचिन एका उंच शिखरावर जाऊ शकला."
सचिनची क्रिकेटवरील निष्ठा, भक्ती आणि कोणतेही प्रशिक्षण नसताना त्याने केलेल्या फलंदाजीचे आचरेकरांना खूप कौतुक वाटायचे. सरावाच्यावेळी सचिन फलंदाजीला आला की,आचरेकर त्याच्या
यष्टीवर एक रूपयाचे नाणे ठेवत असत. जो कुणी गोलंदाज सचिनची यष्टी उडवेल त्याला ते नाणे बक्षीस मिळत असे. यामागे आचरेकर यांचा हेतू सचिनने चुकीच्या पद्धतीने फटका मारून बाद होऊ नये हा असे तसाच सचिनला गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांने यष्टीचा वेध घेणारी अचूक गोलंदाजी करावी हाही असणार. परंतु बहुतेक वेळा यष्टी न उडू देणाऱ्या सचिनलाच ते नाणे मिळत असे. एकदा आचरेकरसर अजितला म्हणाले,
"अजित, तुम्ही वांद्रे येथे राहता. सचिनला सरावासाठी शिवाजी पार्कला यावे लागते. सराव झाल्यानंतर दिवसभर शाळा करून पुन्हा सरावासाठी शिवाजी पार्कला यावे लागते. सायंकाळी सराव करून पुन्हा वांद्रे येथील घरी जावे लागते. यामुळे त्याची खूप धावपळ होतेय."
"बरोबर आहे. तो खूप थकतो पण तसे काही बोलत नाही." अजित म्हणाला.
" त्याचे वय आणि त्याची होत असलेली दमछाक पाहून मलाच कसेतरी होते. त्याचा होणारा त्रास टाळायला हवा. त्यासाठी त्याला 'शारदाश्रम ' या शाळेत टाकायला हवे." आचरेकर सर म्हणाले.
"ठीक आहे. मी आईबाबांसोबत बोलतो." अजित म्हणाला.
घरी आल्यावर अजितने सचिनसमोर आईबाबांसोबत चर्चा केली. त्यावर त्यांचे बाबा म्हणाले,
"आपण सचिनला शारदाश्रम शाळेत टाकूया. सचिनची इच्छा असल्यास त्याला शिवाजी पार्कला त्याच्या काकांकडे राहायला जाण्यासाठी हरकत नाही...."
ती सारी चर्चा ऐकणारा सचिन पटकन म्हणाला, "मला क्रिकेट खेळायचे आहे. मी काकांकडे राहतो.
लहानग्या सचिनचा तो निश्चय, आत्मविश्वास पाहून तेंडुलकर कुटुंबीय आश्चर्यचकित झाले....
सचिनचा शारदाश्रम या नामांकित शाळेत प्रवेश झाला. तो शिवाजी पार्क येथे काकांकडे राहायला आला. मिळालेली संधी सचिनने सहर्ष स्वीकारली. त्या संधीचे त्याने सोने केले. लहान वयात त्याने निर्धारपूर्वक घेतलेला निर्णय त्याच्या दूरदृष्टीचा आणि मुत्सद्दीपणाचा द्योतक ठरला. तेंडुलकर कुटुंबियांच्या त्या एका निर्णयामुळे आणि रमाकांत आचरेकर यांच्या शिकवणीमुळे क्रिकेट जगताला एक रत्न, एक हिरा सापडला. काकांकडे राहायला आलेला सचिन सकाळी क्रिकेटचा सराव, दिवसभर शाळा झाल्यानंतर पुन्हा नित्यनेमाने सराव करून घरी परत येत असे.घरी आल्यावर शाळेचा अभ्यास पूर्ण करून तो पुन्हा सरावासाठी सज्ज होत असे. त्याने घराच्या छताला एक चेंडू टांगून ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत त्या चेंडूवर त्याचा फलंदाजीचा सराव सुरु असे. सचिनच्या कठोर सरावाबाबत बोलताना रमाकांत आचरेकर नेहमी सांगतात,
"सचिनच्या फटक्यांमध्ये जी विविधता आहे, द्रुढता आहे ती त्याने भरपूर सराव करून मिळवली आहे. तो नेहमी शिवाजी पार्कच्या मैदानात भर दुपारच्या उन्हात एकच फटका वारंवार मारून सराव करीत असे. कठोर परिश्रमातून त्याने प्रत्येक फटक्यावर प्रभुत्त्व मिळवले आहे. समोरून येणाऱ्या चेंडूसाठी सचिनजवळ दोन प्रकारचे फटके तयार असत."
सचिन तेंडुलकर बाद होऊन मैदानावरून परतल्यावर ज्या चेंडूवर बाद झालाय त्या चेंडूचा बारकाईने अभ्यास करून झालेली चूक शोधत असे आणि सराव करताना तो ती चूक जाणीवपूर्वक टाळत असे. एकदा भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना एका सामन्यात सचिन उजव्या यष्टीच्या बाहेर पडलेला चेंडू खेळताना लवकर बाद झाला. चुकीच्या पद्धतीने बाद झालो याचे त्याला वाईट वाटत होते. दुसऱ्या डावात सचिन फलंदाजीला निघताना सहकाऱ्यांना म्हणाला,
"काळजी करू नका. आज मी उजव्या यष्टीवर पडलेला चेंडू ऑफ साइडला खेळणार नाही."
त्या सामन्यात सचिनने द्विशतक ठोकले. परंतु त्याचा निग्रह बघा, त्याने एकही चेंडू ऑफ साइडला खेळला नाही. तन्मयता, एकाग्रता ही त्याची खास वैशिष्ट्ये होती.
भारतीय क्रिकेट संघात कपिल देव हा महान अष्टपैलू खेळाडू होता. १९८३ ला इंग्लंडमध्ये झालेल्या विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात कपिलच्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून विजेते पद मिळवले होते. कपिलचे एक खास वैशिष्ट्य असे होते की, तो पंजा लढविण्यात तरबेज होता. संघातील एकही खेळाडू कपिलला हरवू शकत नव्हता. सचिन ही गोष्ट जाणून होता. एकेदिवशी सराव संपल्यानंतर सारे खेळाडू निवांत गप्पा मारत बसले असताना अचानक सचिनने विचारले,
"कपिलपाजी, माझ्यासोबत पंजा लढवशील का?" सचिनचा तो प्रश्न पाहून सारेजण हसायला लागले कारण सचिनची शरीरयष्टी तशी किरकोळ होती. सचिनचे आव्हान कपिलने स्वीकारले. कपिल-सचिन यांच्यामध्ये 'पंजालढाई' सुरू झाली. तराजूच्या पारड्याप्रमाणे दोघांचे हात कधी इकडे तर कधी दुसऱ्या बाजूला होत असताना दोघेही जोर लावत असताना शेवटी सचिनने बाजी मारली.
कपिलचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो मैदानावर एका बाजूला उभा राहून मैदानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत चेंडू फेकत असे. त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी तशा चेंडूफेकीचा प्रयत्न केला परंतु कुणीही यशस्वी झाले नाही. ही गोष्ट जाणून सचिनने चेंडू फेकीचा भरपूर सराव केला. एकेदिवशी सारे खेळाडू मैदानावर व्यायाम करीत असताना सचिनने सर्वांंना सांगून मैदानाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत चेंडूफेक केली. ते पाहून कपिलसह सर्वांंना आश्चर्य वाटले.
सचिन जसा मेहनती, कष्टाळू, अभ्यासू होता तसाच तो लहानपणापासून विनोदी स्वभावाचा होता. भारतीय संघात प्रवेश झाल्यानंतरही त्याची समोरच्या व्यक्तीची फिरकी घ्यायची सवय कमी झाली नाही. विविध प्रसंगी तो विनोदाची पेरणी करून धमाल उडवून देई. एकदा भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना संघातील खेळाडू हॉटेलमध्ये थांबले होते. संघात सौरभ गांगुली होता. सारेजण त्याला 'दादा' नावाने संबोधत असत. एकदा सचिन एका सहकारी खेळाडूला म्हणाला,
"चल. आपण दादाची विकेट घेऊया."
असे म्हणून त्या खेळाडूला घेऊन सचिन गांगुलीच्या खोलीत गेला. गांगुली गाढ झोपलेला पाहून त्याने नळाचा पाइप गांगुलीच्या खोलीत सोडून नळ सुरू केला. सौरभ गांगुली झोपेतून उठला आणि त्याच्या लक्षात आले की, खोलीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. रागारागाने तो खोलीच्या बाहेर आला. झालेला प्रकार कुणी केला हे तो विचारत असताना त्याच्या लक्षात आले की, आपल्याकडे पाहून सचिन हसतोय. दुसऱ्याच क्षणी त्याच्या लक्षात सारे काही आले.तो सचिनच्या दिशेने धावला परंतु सचिन त्याच्या हाती लागला नाही.
परदेश दौऱ्यावर असलेल्या त्या भारतीय संघात संजय मांजरेकर आणि विनोद कांबळी हेही होते. सचिन आणि विनोद दोघेही बालमित्र. एकत्र क्रिकेट खेळणारे. शालेय क्रिकेट खेळताना दोघांनी मिळून भागीदारी करताना एक उच्चांक स्थापन केला होता. शिवाय सचिन, विनोद आणि संजय हे तिघेही मुंबईकर! त्यामुळे तिघांची खास मैत्री! त्या दौऱ्यावर विनोद आणि संजय हे हॉटेलमध्ये एकाच खोलीत राहात होत. त्या रात्री सचिन त्या दोघांच्या खोलीत गेला. दोघेही गाढ झोपेत होते. ते पाहून त्या दोघांची गंमत करण्याची लहर सचिनच्या मनात आली. त्याने टुथपेस्ट आणली आणि ती पेस्ट त्याने त्या दोघांच्याही ओठावर फासली. सकाळ होईपर्यंत ती पेस्ट वाळून, कडक होऊन बसली. सकाळी ते दोघेही उठण्यापूर्वी सचिन संघातील इतर सर्वांना घेऊन त्यांच्या खोलीत आला. त्या दोघांची ती अवस्था पाहून सारेजण हसत सुटले....
असाच एक गमतीदार प्रसंग सचिनने दुसऱ्या एका परदेश दौऱ्यावर असताना घडवून आणला. सकाळचा व्यायाम, सराव झाला. दुपारचे जेवण करून सारेजण आपापल्या खोलीत आराम करत असताना कुणीतरी हॉटेलच्या माईकवर म्हणाले,
"भारतीय खेळाडूंंसाठी महत्त्वाची सूचना..... आपल्या हॉटेलमध्ये दोन वाघ शिरले आहेत. घाबरू नका. खोली सोडू नका...."
ती सूचना ऐकून सारे खेळाडू सायंकाळपर्यंत आपापल्या खोलीतून बाहेर पडलेच नाहीत. संध्याकाळ झाली आणि एक-एक खेळाडू सावधपणे बाहेर पडू लागला. हॉटेलच्या स्वागतकक्षाजवळ उभा असलेला सचिन मिश्कीलपणे हसून सर्वांंचे स्वागत करीत असल्याचे पाहून ती करामत सचिनची असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आणि सारेच हसत सुटले.....
सचिन तेंडुलकर मैदान गाजवत सुटला, विक्रमांवर विक्रम करीत राहिला. त्याची लोकप्रियता जणू त्रिभुवनात होती. एकदा एक प्रसंग घडला. ज्यावरून तो कि लोकप्रिय होता याची प्रचिती आपणास येऊ शकेल. पीटर रोबँक हा परदेशी इसम एकदा भारतात आला होता. पीटर सिमला येथून रेल्वेने दिल्लीला जात होता. एका स्थानकावर त्याची रेल्वे थांबली होती. खूप वेळ झाला तरीही रेल्वे सुटत नव्हती. पीटरच्या डब्यातील अनेक प्रवासी कंटाळून काय झाले ते पाहायला म्हणून खाली जायचे परंतु कुणी परत येत नव्हते. ते पाहून कंटाळलेला पीटरही खाली उतरला. काही अंतरावर बरीच गर्दी जमलेली पाहून पीटरही तिकडे गेला. पाहतो तर काय तिथे एका दूरदर्शन संचावर क्रिकेटचा सामना सुरु होता. पीटरने एका माणसाला विचारले,
" काय झाले हो? रेल्वे का सुटत नाही?"
"काही नाही हो. सचिन अठ्ठयाण्णव धावांवर खेळतोय. त्याचे शतक झाले की, सुटेल रेल्वे..." तो माणूस सांगत असताना तिकडे सचिनचे शतक झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला.
" सs चि ss न ss.." असे ओरडत लोक धावत सुटले. गार्डनेही वेगळ्याच जोशात शिट्टी फुंकली आणि 'शिट्टी वाजली, गाडी सुटली' याप्रमाणे त्या रेल्वेने स्थानक सोडल्याचे पाहून पीटर आनंदित झाला असला तरीही रसिक- प्रवाशांचे ते सचिनवरील प्रेम, भक्ती पाहून तो आश्चर्यचकित झाला.
सचिन तेंडुलकरचे चाहते जगभर आहेत. ते सचिनला देव मानतात. सचिनच्या खेळी पाहताना तहानभूक काय परंतु स्वतःचे आजारपणही विसरतात.....
सचिन तेंडुलकर एकदा कसोटी सामना खेळण्यासाठी चेन्नई येथे गेला होता. तिथे त्याला भेटायला सी.व्ही. व्यंकटक्रुष्णन नावाची व्यक्ती आली होती. ते सचिनला म्हणाले,
"सचिन, माझ्या आईचे नाव सरस्वती विद्यानाथन असून ती सत्त्याऐंशी वर्षांची आहे. तिच्याकडे तुझ्या जवळपास सर्वच सामन्यांंची माहिती आणि चित्रफिती आहेत. आई अत्यंत अशक्त आहे. तिला चालता येत नाही. ज्यावेळी तिला असह्य वेदना होतात त्यावेळी ती कोणतीही वेदनाशामक औषधी घेत नाही तर तुझ्या खेळीची चित्रफीत बघत राहते. सचिन, माझी आई सध्या दवाखान्यात आहे. तू तिला भेटायला आला तर तिला खूप आनंद होईल."
वेळ मिळताच सचिन सरस्वतीबाईंना भेटायला दवाखान्यात गेला. खुद्द सचिन तेंडुलकर आपल्या भेटीला आलेला पाहून सरस्वतीबाईंना खूप आनंद झाला. त्या आनंदाने म्हणाल्या,
"सचिन, तुला प्रत्यक्ष पाहून मला खूप आनंद झाला आहे. मी रात्री उशिरापर्यंत जागून तुझी फलंदाजी बघत असते. तू असाच सर्वांंना नेहमी आनंद द्यावा अशी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते..."
"तुम्हाला भेटून मलाही खूप आनंद झाला. मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे." असे म्हणून सचिनने त्यांना नमस्कार केला. स्वतःची स्वाक्षरी केलेली बँट त्यांना भेट दिली. सरस्वतीबाईंनींही सचिनला गणपतीची मूर्ती भेट दिली आणि भरल्या गळ्याने म्हणाल्या,
"तुझी भेट झाली हे माझे भाग्य! तू शतकांचे शतक लवकर करावे अशी माझी इच्छा आहे."
"मी प्रयत्न करीन..." असे म्हणून सचिन जड अंतःकरणाने तिथून निघाला....
१९९९ या वर्षी विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये सुरु होती. त्यावेळी एक दुःखद घटना घडली. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. तेंडुलकर कुटुंबियांवर दुःखाचा पहाड कोसळला. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी सचिन भारतात परतला. अत्यंत शोकाकुल अवस्थेत त्याने वडिलांचे दर्शन घेतले. अंतिम संस्कार पार पडले. विश्वचषक स्पर्धा अर्धवट सोडून आलेल्या सचिनच्या मनात परत इंग्लंडला जावे का नाही हा विचार घोळत होता. कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे, अशा अवस्थेत कुटुंबाला वेळ देणे जेवढे गरजेचे होते तेवढेच इंग्लंडला जाणेही महत्त्वाचे होते. दोन्ही बाबतीत कर्तव्य महत्त्वाचे होते. त्याची द्विधा अवस्था त्याच्या आईने ओळखली. त्या म्हणाल्या,
"सचिन, काय विचार करतोस? तुला इंग्लंडला जावे लागेल. कुटुंबापेक्षा आपल्या देशाला तुझी जास्त गरज आहे. तू आपल्या संघाचा आधारस्तंभ आहेस. तुझ्या बाबांनाही हेच आवडेल. जा. बरे."
आईच्या त्या शब्दांनी सचिनला फार मोठा दिलासा. त्याची सारी तगमग, घालमेल संपली. द्विधा मनःस्थितीतून तो बाहेर पडला. लगोलग इंग्लंडला पोहोचला. लगेच त्याला मैदानात उतरावे लागले. पहिल्याच सामन्यात त्याने दमदार शतक झळकावून वडिलांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही क्षेत्रात काम करताना असलेली निष्ठा, भक्ती आणि त्यासाठी सर्वस्व झोकून देण्याची व्रुत्ती त्या क्षेत्रातील राजत्व, देवत्व त्या व्यक्तीकडे चालत येते. सचिनच्या या व्रुत्तीबद्दल त्याचे गुरु रमाकांत आचरेकर एकदा म्हणाले,
"सचिनसाठी क्रिकेट हा ध्यास आहे. त्याचा श्वासही आहे.त्याला धावांची फार मोठी भूक आहे. ती भूक कधीच संपणार नाही. तो क्रिकेट खेळत नाही तर तो क्रिकेट जगतो. स्वतः जगताना इतरांना खेळाचा अवीट आनंद देतो.डोळ्याचे पारणे फेडणारे क्रिकेट तो खेळतो. क्रिकेटमध्ये सातत्याने होणारे बदल, नवीन तंत्र तो आत्मसात करतो म्हणूनच तो अढळपदी पोहोचला आहे..."
असे असले शतकांचे मनोरे रचले, धावांचे रतीब घातले, अनेकानेक विक्रमांना गवसणी घातली तरीही सचिनला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला. परंतु सचिनने सारे सहन केले. कुणालाही अवाक्षराने उत्तर दिलं नाही. फक्त एकदा अत्यंत संयमी आणि विनयशील शब्दात तो म्हणाला,
"टीकाकारांनी माझ्यावर शब्दरुपी दगड फेकले. मी त्यांंना मैलाचे (धावांचे) दगड (माइल स्टोन) बनवले...."
सचिनच्या वरील उद्गारावरुन त्याचा संयम लक्षात तर येतोच परंतु एका सुविचाराचीही प्रचिती येते....
'ज्या झाडाला फळे येतात त्याच झाडावर लोक दगडं मारतात.'
सचिनचा पहिला कसोटी सामना तो ही पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघासोबत होता. पाकसंघात त्यावेळी इम्रान खान,वकार युनुस, वासिम अक्रम आणि अब्दुल कादिर असे नावाजलेले
गोलंदाज होते. सचिनचे वय त्यावेळी जेमतेम पंधरा वर्षे होते. फलंदाजी करीत असताना वकार युनुसचा एक वेगवान, उसळणारा चेंडू सचिनच्या चेहऱ्यावर आदळला. तो फटका एवढा जोरकस होता की, सचिनच्या नाकातून रक्त वाहू लागले. परंतु सचिन घाबरला नाही, डगमगला नाही, मैदान न सोडता त्याने मैदानावरच उपचार घेतले आणि काही क्षणात तो खेळायला सज्ज झाला. त्यानंतर वकारने टाकलेल्या लागोपाठच्या तीन चेंडूंंना सचिनने अत्यंत आत्मविश्वासाने, धाडसाने सीमापार धाडले. सचिनचे धाडस पाहून जॉन क्लार्क या विचारवंतांच्या एका वाक्याची आठवण येते....
'ज्यांना जखमांची भीती वाटते त्यांनी रणांगणावर कधीच जाऊ नये !'
क्रिकेटचा सामना आणि तोही पाकिस्तानविरुद्ध म्हणजे एक प्रकारे युद्धच असते.........
एक दिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू, दोन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात मिळून तीस हजारांहून अधिक धावा, शतकांंचे शतक इत्यादी अनेक विक्रम नोंदवून सचिन रमेश तेंडुलकर हा विक्रमादित्य १५ नोव्हेंबर २०१३ यादिवशी निव्रुत्त झाला. तब्बल चोवीस वर्षे अविश्रांत क्रिकेट खेळणाऱ्या सचिनने शेवटचा कसोटी सामना संपल्याबरोबर वानखेडे मैदानावरील खेळपट्टीला वंदन करून, तिथली माती कपाळावर लावून भरलेल्या अंतःकरणाने सर्वांंचा निरोप घेतला. सचिनच्या निव्रुत्तीमुळे दुःखी असलेल्या क्रिकेट रसिकांना भारत सरकारने एक अतिशय आनंदाची बातमी दिली. सचिन रमेश तेंडुलकरला 'भारतरत्न' हा बहुमान जाहीर केला. क्रिकेट रसिक आनंदाने न्हाऊन निघाले असताना सचिनने एका मुलाखतीच्यावेळी भारतरत्न या पुरस्काराबद्दल विचारलेल्या प्रश्नाला दिलेले उत्तर आठवले.सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळावा अशी चर्चा सुरू असताना एका पत्रकाराने त्याबाबतीत सचिनला प्रश्न विचारला होता त्यावेळी सचिन म्हणाला की, मी सध्या त्याबाबतीत काहीही विचार करीत नाही. सध्या चांगले क्रिकेट खेळण्याकडे लक्ष देत आहे.अजून चांगले क्रिकेट खेळायचे आहे. पुरस्कार हे सर्वस्व नाही.... नसावे.....
'धीर धरा रे, धीरापोटी असती फळे गोमटी...' याच प्रकारची संयमित प्रतिक्रिया देताना सचिन बिलकुल विचलित वा अगतिक झाला असल्याचे जाणवत नव्हते.
महाशतक झाल्यानंतर सचिनने दिलेली प्रतिक्रिया तरूणांना दिशादर्शक अशीच आहे. तो म्हणाला, "स्वप्न पहा. स्वप्नांंचा पाठलाग करा. हे करताना कठोर परिश्रम करा. यश आपोआप मिळते. विक्रम हमखास घडतात. मी स्वतः इतर कोणतेही नाही परंतु देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी बावीस वर्षे न थकता, न कंटाळता खेळत राहिलो आणि मला स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला..."
भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मात्रुभक्त असलेल्या सचिनने तो पुरस्कार स्वतःच्या आईसोबत भारतातील मातांना अर्पण केला. धन्य ते मात्रुप्रेम! धन्य ती मात्रुभक्ती!.....
॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥ ॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२,
संचेती शाळेजवळ, थेरगाव, पुणे ४११०३३

९४२३१३९०७१

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED