Mi Bappa Boltoy books and stories free download online pdf in Marathi

मी बाप्पा बोलतोय

*************************************** मी बाप्पा बोलतोय .....************************* **** **** त्या शाळेतील सारे विद्यार्थी आपापल्या वर्गात शांतपणे बसले होते. आकाशवाणीवरील शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रसारणाची ते मोठ्या आतुरतेने वाट पाहात होते. त्याला कारणही तसेच होते. आठ दिवसांनी महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार होते. त्या अनुषंगाने आकाशवाणीने एका विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे स्वरूप, वक्त्याचे नाव जाहीर झाले नव्हते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची उत्सुकता पसरली होती. प्रसारणाची वेळ झाली. निवेदिकेने फक्त एवढेच जाहीर केले की, 'आता ऐका आपल्या लाडक्या व्यक्तीने केलेले हितगुज....' त्यामुळे मुलांची उत्सुकता अजूनच वाढली, शिगेला पोहोचली. शेवटी एक अत्यंत मधुर आवाज चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मुलांना ऐकू आला.......
" काय करताय बालमित्रांनो? झाली का बाप्पाच्या स्वागताची तयारी? अरे, हो. मी माझी ओळख करून द्यायला विसरलो की, मुलांनो, मी गणपती....गणपती बाप्पा! होय, तुमचा सर्वांचा लाडका, प्रिय, आवडता, मोदक खाणारा असा तुमचा गणपती बाप्पा ! अरे, असे आश्चर्याने काय बघता? आकाशवाणी म्हणजे काय तर आकाशातून बोलणे. आपल्या लाडक्यांंशी संवाद साधणे. पूर्वी कशी आकाशवाणी होत असे. तशीच ही तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या सहाय्याने शोधलेली आकाशवाणी! म्हणून म्हटले, या नवीन माध्यमातून आपल्या आवडत्या बाळ गोपाळांशी संवाद साधूया, मनमुराद गप्पा मारूया.
तुमच्या या धरतीवर तर भलताच उत्साह संचारलेला दिसतोय. काय काय तयारी करीत आहात तुम्ही? ते पाहून केव्हा एकदा गणेश चतुर्थी येते आणि मी तुमच्याजवळ, तुमच्या सोबत मिरवणुकीत सहभागी होतो, नाचतो, गाचतो आणि हो माझे आवडते मोदक कधी खातोय असे झालेय बघा. तुमच्याप्रमाणे मी ही या महोत्सवाची दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो. तुम्ही गायलेली माझी गाणी, भजन, कीर्तन, आरत्या, तुम्ही मोठ्या भक्ती भावाने केलेली पूजा सारे सारे मला अत्यंत आवडते. भक्ती आणि पूजा याांंचा फार मोठा संबंध आहे बरे. पूजा सारेच करतात पण त्यात असणारा भाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. अंतःकरणापासून केलेली पूजा आणि करायची म्हणून किंवा करावी लागते म्हणून केलेली पूजा यात खूप अंतर आहे. जो भाव एक छोटासा तेल किंवा तुपाचा दिवा लावून केलेल्या पूजेत असतो तो आजकाल होत असलेली सजावट, मोठमोठे पुष्पहार, वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई, कर्णकर्कश्श आवाजात वाजणारी गाणी, त्या गाण्यांच्या तालावर होणारे नाच, आरडाओरडा यामध्ये असेलच असे नाही. असले प्रकार एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, आमचे मंडळ-आमचा गणपती तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, सर्वोत्तम कसा हे दाखविण्यासाठी केले जात असावेत कारण अनेक ठिकाणी गणपती मंडळांच्या स्पर्धेचे ही आयोजन केले जाते. स्पर्धा म्हटलं की, हेवेदावे, रुसवेफुगवे आणि पुढे जाऊन वादविवाद ही आलेच. म्हणून म्हणतो कशासाठी एवढी धडपड करता? काय साध्य करायचे आणि काय सिद्ध करायचे आहे हेच मला समजत नाही. तुम्ही हे जे सार्वजनिक ठिकाणी करता ना याचा मला जाम कंटाळा येतो. कधीकधी वाटते प्रुथ्वीवर जाऊच नये. बरे, हे सारे का कमी खर्चात होते ? मुळीच नाही.मग त्यासाठी वर्गणी जमा केली जाते. गरीब असो वा श्रीमंत सारेच राजीखुशीने वर्गणी देतात का? कधीच नाही. श्रीमंतांनी वर्गणी दिली तर फारसा फरक पडत नाही. समुद्रातून लोटाभर पाणी घेतले तर जाणवतही नाही. पण तुम्ही एक म्हण शिकला असाल , 'आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून?' अशीच काहीशी परिस्थिती ही गरिबांची आणि काही मध्यमवर्गीय लोकांची असते. महिनाभर पुरेल अशी जेमतेम शिल्लक असणाऱ्या कुटुंबांंकडून जबरदस्तीने वर्गणी घेतली की त्यांना महिन्याच्या शेवटी पैशाची चणचण भासते. काही महत्त्वाचे काम आले की, त्यांना उसनवारी करावी लागते, कर्ज काढावे लागते हे मला बिलकुल आवडत नाही. माझ्यासाठी कुणा गरिबावर कर्ज काढण्याची वेळ यावी ही बाब माझ्यासाठी अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक आहे. तुम्हाला एक सांगू का, मी आलो की, तुम्ही किंवा तुमच्या घरातील माणसं कुणी एक दिवस, कुणी तीन दिवस तर कुणी दहा दिवस उपवास करता. जेवत नाहीत. केवळ फलाहार करतात किंवा दिवसभर काहीही न खाता सायंकाळी उपवास सोडता ही बाब मला मुळीच आवडत नाही. त्याचप्रमाणे काही लोक दहा दिवस अनवाणी राहतात. चालताना खडे टोचतात, काटे - काच बुडतो, पाय पोळतात हे असले शरीराला त्रास देणारे कोणतेही प्रकार मला सहन होत नाहीत. शुद्ध अंतःकरणाने, मनोभावे केलेली पूजा मला आनंद देऊन जाते. 'दोन हस्तक तिसरे मस्तक' याप्रमाणे दर्शनासाठी येणारे भक्त मला अतिशय आवडतात. तेव्हा बाळांनो, असे काही करु नका. कुणी करीत असेल तर त्याला तसे न करण्याची विनंती करा.
तुम्हाला वाटेल, बाप्पा असे का बोलत आहेत? पण कसे आहे बालमित्रांनो, तुम्ही उद्याचे नागरिक आहात, तुमच्या देशाचे आधारस्तंभ आहात. तुमच्यापैकी अनेकजण भविष्यात एखाद्या गणपती मंडळाचे अध्यक्ष वा पदाधिकारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग काही गोष्टीसाठी तुमच्याशी हितगुज साधणे गरजेचे आहे. मी म्हटल्याप्रमाणे गल्लोगल्लीत माझी स्थापना होते.भव्य, सुशोभित व्यासपीठ तयार केले जातात. आकर्षक सजावट होते.डोळे दिपवून टाकणारी रोषणाई होते. नानाविध कार्यक्रम होतात. या सोबतच सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गाणी वाजवल्या जातात. हा आवाज एवढा कर्कश्श असतो ना माझ्याच कानठळ्या बसतात. अनेक घरातून म्हातारी माणसं असतात, आजारी माणसे असतात झालेच तर छोटी छोटी बालके असतात. त्यांना या कर्णकर्कश्श आवाजाने झोप लागली नाही तर त्यांना खूप त्रास होतो, आजार होतात, असलेले आजार बळावतात. मग हे का कुणी लक्षात घेत नाही? कोणताही सण कुणालाही त्रास न होऊ देता साजरा केला तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आनंद ही गोष्टच अशी असते की, तो दिल्याने-घेतल्याने अजून वाढतो. सारीच मंडळे अशी आहेत असे नाही. बरीचशी मंडळे समाजोपयोगी अनेक खूप छान कार्यक्रम आयोजित करतात.
मला आवडलेला एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 'एक गाव एक गणपती!' किती छान आहे ना! अनेक गावात हा उपक्रम सुरू झाला आहे परंतु फार मोठ्या प्रमाणावर ही कल्पना प्रत्यक्षात उतरली पाहिजे. गावात अनेक मंडळं असली म्हणजे ना गोंगाट तर वाढतोच वाढतो परंतु अनेकांना अनेक मंडळांना वर्गणी द्यावी लागते. हा डबल होणारा खर्च वाचतो. शिवाय एकच मंडळ असले म्हणजे अनेक छान छान कार्यक्रम घेता येतात. जमलेल्या वर्गणीतून समाजासाठी, गावासाठी काही कायम स्वरुपाच्या गोष्टी करता येतात.अनेक गावांमध्ये मंडळाच्या शिल्लक निधीतून रुग्णवाहिकांंची खरेदी करण्यात आली. कुठे गावातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. कुठे शाळेसाठी काही नवीन गोष्टींंची व्यवस्था करण्यात आली. अशी समाजाच्या द्रुष्टीने आवश्यक कामे झाली म्हणजे लोक वर्गणी द्यायला मागेपुढे पाहात नाहीत.
बाळांनो, एक सांगू काय, सध्या माझ्या म्हणजे गणपतीच्या मूर्तींंचे हजारो प्रकार बाजारात येत आहेत. चित्ताकर्षक, मनमोहक अशा अनेक प्रकारच्या, विविध रूपातील मुर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खरे तर मलाही ती सारी रुपे पाहून वाटते की, अरे, मी असा वेश कधी केला होता. त्याचबरोबरीने दिलेले रंग, साजश्रुंगार पाहून मला वाटते हा मीच आहे काय? तुम्हाला एक गंमत सांगतो गेल्यावर्षी परत जातांना मी एक वेगळाच पोशाख करुन गेलो अर्थात ती वेशभूषा करणारे तुमच्यापैकीच कुणीतरी होते. मी सरळ कैलास पर्वतावर गेलो. पार्वती मातेला वंदन केले आणि मला जाणवले की, मातेचे माझ्याकडे लक्षच नाही. मी मातेला विचारले,
"हे माते, आपण कुणाची वाट पाहात आहात काय? " त्यावर माता म्हणाली,
"दुसऱ्या कुणाची वाट पाहणार. माझे लेकरू प्रुथ्वीवर जाऊन आज अकरा दिवस होत आहेत. अजून त्याचा पत्ता नाही. का उशीर होतोय ते भोलेशंकर जाणोत. पण माझा जीव खालीवर होतोय. आजकाल प्रुथ्वीवर केव्हा काय घडेल ते सांगता येत नाही. नेमकी गणपती विसर्जनाची मिरवणूक निघाली की, कुठे तरी काही तरी घडते आणि लोक एकमेकांचे जीव घेतात. दिवाळीला प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके फोडू नयेत ही काळजी आजकाल घेतली जातेेेय पण दिवसाकाठी कुठेतरी बाँबस्फोट आणि बंदुकीच्या गोळ्यांची बरसात होते. त्यात शेकडो माणसे मरतात त्याचे मानवांना काही वाटत नाही. म्हणून काळजी वाटते."
"आपण कोण? कुणाला भेटायचे आहे? महादेव कैलासावर नाहीत. कुठे गेले ते माहिती नाही. गणपती प्रुथ्वीवर गेला आहे. मी त्याचीच वाट बघतेय...."
मातेचे बोल ऐकून मी खो खो हसत सुटल्याचे पाहून माता रागारागाने म्हणाली,
"कोण तू ? असा हसतोस का?" माझे हसणे थांबवून मी म्हणालो,
"माते, तू ज्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहतेस तोच मी..... गणपती ! ओळखले नाहीस?"
एक क्षणभर माझ्याकडे बघत दुसऱ्याच क्षणी माता आनंदाने म्हणाली, " कोण? बाल गणपती तू? आणि हा असा कसा तुझा अवतार?"
असे आहे मित्रांनो, जर तुम्ही दिलेल्या रुपात मला माझी माताच मला ओळखू शकत नसेल तर मग तुमच्या या सजावटीचा, श्रुंगाराला महत्त्व काय? तुम्हाला खरे सांगू काय, तुम्ही जे कोणते मातीचे नवनवीन प्रकार वापरता ना ते मलाही आवडत नाहीत. कसे गुदमरल्यासारखे होते.वेगवेगळ्या रंगामुळे मला श्वास घेणे अवघड होऊन बसते. त्यापेक्षा दोस्तांनो, आपली मातीच बरी. नैसर्गिक बाब मग ती कोणतीही असो तीच चांगली. नैसर्गिक गोष्टींंचा वापर केला की, कुणाला कशाचा त्रास होत नाही. प्रदूषण होऊन रोगराई पसरत नाही. नैसर्गिक माती असते ना, ती पाण्यात पटकन विरघळते आणि प्रदूषण तर मुळीच करत नाही. तेव्हा बालगोपाळांनो निर्धार करा, मातीची मुर्ती करा...
मला माहिती आहे, ही आकाशवाणी ऐकणारांमध्ये मुलीही मोठ्या प्रमाणात आहेत. आज शिकणाऱ्या मुलींचे प्रमाण मोठ्या संख्येने आहे. केवळ शिक्षण घेऊन मुली थांबत नाहीत तर नोकरी, व्यवसाय अशा ठिकाणी स्वतःचा सहभाग नोंदवून फक्त कुटुंबाचाच नाहीतर देशाचा विकास घडविण्यात ही मुली अग्रेसर आहेत. पूर्वीची 'चुल मूल ' ही संकल्पना मोडीत काढून, अबला हा परंपरागत शिक्का पुसून त्या सबला होऊन प्रत्येक ठिकाणी अगदी खेळाच्या मैदानापासून ते थेट अंतरीक्षात त्या झेप घेत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद, अभिमानास्पद अशीच आहे. असे म्हणतात की, 'शिकलेली आई, घरादारा पुढे नेई !' या बाबीसही मागे टाकणाऱ्या मुलींबाबत मी म्हणेन, 'शिकलेली तरुणी, राष्ट्रविकासात अग्रणी!'
बालमित्रांनो, तुमचे वय हे एक प्रकारे स्वप्नाळू. नानाविध स्वप्नं तुम्ही नेहमीच पाहता. मला हे करायचे आहे, ते करायचे आहे. मी मोठेपणी हे होणार, ते होणार. मित्रांनो, स्वप्नं पाहणं काही गैर नाही ती एक नैसर्गिक, साहजिक अशी गोष्ट आहे. मोठमोठी माणसं ही स्वप्नं पाहतात. स्वप्नं जरुर पहा पण स्वप्नात राहू नका. जी स्वप्नं आपण पाहतो त्यातील एक स्वप्न निवडा. ते निवडताना आपली शारिरीक, बौद्धिक क्षमता यांचा प्राधान्याने विचार करा. जे झेपेल, प्रयत्नाने त्यात यश मिळेल असेच ध्येय निश्चित करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घ्या आणि कुटुंबाला परवडेल, ते सहजासहजी आपल्याला स्वप्नपूर्ततेसाठी मदत करतील असेच ध्येय निवडा. कुठलेही स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरवले की, भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवा. 'दे रे हरी, पलंगावरी ' असे कधी होत नाही. जो कष्ट करतो, जीवाचे रान करतो त्यालाच स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो. 'जया अंगी मोठेपण तया यातना कठीण' याप्रमाणे मोठेपण मिळाल्यानंतर ही भरपूर यातना आहेत. पण मी असे सांगेन 'जया हवे मोठेेेपण तयाने प्रयत्न करावे कठीण!' ज्याला मोठे व्हायचे आहे, स्वप्न साकार करावयाचे आहे त्याला अतोनात मेहनत करावी लागणार आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. कमी पडलेला अर्धा- पाव गुण तुमची एखादी संधी गमावू शकतो. मेहनतीने सारे काही प्राप्त करता येते परंतु एखादे वेळी एखादी संधी हुकली म्हणून निराश होऊ नका काय म्हणतात ते डिप्रेशनमध्ये जाऊ नका. जशा आजकाल पावलोपावली स्पर्धा आहेत त्याप्रमाणे भरपूर संधी आहेत. एक संधी गेली तरीही दुसरी संधी नक्कीच चालून येते. म्हणतात ना 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.' हे लक्षात ठेवा.कदाचित उद्या अजून एखादी उत्तम संधी तुमचे दार ठोठावणार असेल म्हणून आज पदरी थोडीशी निराशा,अपयशआले असण्याची शक्यता आहे. स्वप्नपूर्ती झाली नाही म्हणून हातपाय गाळून बसू नका, डोक्यात राख घालून घेऊ नका तर फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा जोरदार झेप घेण्याची तयारी ठेवा. यश तुमचेच आहे.
बालमित्रांनो, गणेशोत्सवाचा 'आनंद द्या, आनंद घ्या.' चला तर मग लागूया तयारीला. मलाही भरपूर तयारी करायची आहे. खूप काही सोबत आणायचे आहे. तुम्हाला भरभरून देण्यासाठी आशीर्वादाची शिदोरी घेऊन यायचे आहे. तेंव्हा भेटूया.... लवकरच.... मजेत रहा. आनंदात रहा. हसत रहा. खेळत रहा.स्वतःला जपा. इतरांना जपा.....
============================== ==============================
नागेश सू. शेवाळकर,
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१
क्रांतिवीरनगर लेन ०२,
संचेती शाळेजवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३ (९४२३१३९०७१)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED