असे कसे होऊ शकते? Nagesh S Shewalkar द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

असे कसे होऊ शकते?



* असे कसे होऊ शकते? *
अमेय! अकरा वर्षे वय असलेला आणि इयत्ता पाचवीत शिकणारा हुशार मुलगा! शाळेत अभ्यासासोबत तो इतर सर्व उपक्रमांमध्ये अव्वलस्थानी असायचा. त्यादिवशी सायंकाळी तो दिवाणखान्यात सतत अस्वस्थपणे, अगतिकतेने इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. त्याच्या बाबांची कार्यालयातून यायची वेळ झाली होती. तो त्यांच्या आगमनाची वाट पाहात होता. काय आणणार होते त्याचे बाबा? नवीन कपडे? नवे बुट? चॉकलेट? आईस्क्रीम? की आणखी काही? नाही! यापैकी त्याचे बाबा त्याच्यासाठी काहीही आणणार नव्हते. मग का बरे अमेय त्यांची भेट घेण्यासाठी तळमळत होता. त्यामागचे कारण दुसरे तिसरे कोणतेही नसून बाबांचा भ्रमणध्वनी हे होते. अमेय शाळेतून घरी आल्याबरोबर शाळेत आणि शिकवणी वर्गात सांगितलेला सारा अभ्यास, गृहपाठ पटकन करून टाकायचा. घाईघाईने करत असला तरीही सारे अचूक ,सुवाच्य अक्षरात, स्वच्छपणे करत असे. कुठेही खाडखोड, अक्षरावर अक्षर गिरवलेले नसायचे. सारा अभ्यास झाला की तो बाबांची वाट पाहायचा कारण बाबा घरी आले की, त्यांच्या भ्रमणध्वनीवर अमेयचा कब्जा असायचा. कुणाचा फोन आला किंवा बाबांना कुणाला फोन करायचा असला तरच काही क्षणांसाठी बाबांकडे भ्रमणध्वनी देत असे अन्यथा सायंकाळी सहा ते रात्रीचे नऊ यावेळात तो फक्त मोबाईलचा असायचा. त्यादिवशीही तो बाबांची वाट पाहत असताना नेहमीप्रमाणे बरोबर सहा वाजता बाबांचे आगमन झाले. बाबांना बरोबर आत येऊ न देता अमेयने त्यांच्या खिशात असलेला भ्रमणध्वनी काढून घेतला. तसे बाबा म्हणाले,
"अमेय, मला आत तर येऊ देत. एवढेही मोबाईलचे वेड बरे नाही रे. मला एक सांग..." बाबांना पूर्ण बोलू न देता अमेय म्हणाला,
"शाळेचे, ट्युशनचे होमवर्क झाले. काल झालेल्या मराठीच्या चाचणी परीक्षेत मला पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत."
"व्हेरी गुड!..." तितक्यात तिथे आलेली अमेयची आई म्हणाली,
"अहो, आटपा पटकन. चहा होतोय. आज सोसायटीची महत्त्वाची मिटींग आहे ना?"
"हो ना. नवीन कार्यकारी मंडळ नेमायचे आहे."
"मिटींगला जा पण कोणती जबाबदारी घेऊ नका. आधीच खूप व्याप आहेत."
"नाही. कोणतीही जबाबदारी घेणार नाही..." असे म्हणत अमेयचे बाबा हातपाय धुवायला गेले. काही क्षणात ते परतले. चहाचा कप घेत असताना अमेयने भ्रमणध्वनीवरून नजर न काढताच विचारले,
"बाबा, मोबाईल नेणार नाहीत ना? मिटींगमध्ये तुम्हाला कुणाशी बोलता येणार नाहीच."
"तुझ्याकडे ठेव. कुणाचा फोन आला तर तू उचलू नकोस. आईकडे तर मुळीच देऊ नकोस..." स्वयंपाक घराकडे बघत अमेयच्या बाबा हळू आवाजात म्हणाले.
"बरे. देत नाही..." अमेय बोलत असताना त्याचे बाबा स्वयंपाक घराकडे बघत म्हणाले,
"अग, मी मिटींगला जाऊन येतो..."
बाबा मिटींगला गेले. आई स्वयंपाक करत होती. अमेय भ्रमणध्वनीवरील खेळ खेळण्यात हरवून गेला. थोडावेळ झाला असेल बाबांसाठी कुणाचा तरी फोन येत होता. अमेयने कुणाचा आहे न पाहताच तो कट केला. काही क्षणातच पुन्हा फोन आला. अमेयने तो कट केला. असे सारखे सुरू होते. शेवटी वारंवार फोन येत असताना अमेयने त्यावर नाव पाहिले. कुण्या तरी 'जानू'चा फोन येत होता. फोन उचलावा की नाही या विचारात असताना फोनची घंटी ऐकून आई बाहेर येत म्हणाली,
"अमेय, कुणाचा फोन वाजतोय..."
ते ऐकून अमेय सहज म्हणाला, "अग, कुणाचा तरी जानूचा फोन आहे..."
"जानू? बघू कोण आहे ते..." असे म्हणत आईने अमेयच्या हातातील भ्रमणध्वनी घेतला आणि अमेय मनाशीच हळू आवाजात म्हणाला, 'बाप रे! आलेला फोन आईला द्यायचे तर सोडा पण सांगायचेही नव्हते..." तिकडे अमेयची आई मोबाईल घेऊन आतल्या खोलीत गेली. तिने मोबाईल उचलताना त्याचे 'रेकॉर्डिंग' सुरू केले. मोबाईल ऑन होताच पलीकडून आवाज आला,
"का कट करत होतास रे? माझे फोन कट करण्याची तुझी हिंमत झालीच कशी? बोलत का नाहीस? ती हडळ जवळ होती की काय? एनी वे, उद्या आपण लाँग ड्राईवला जाणार आहोत. लक्षात आहे ना? मी एक सुंदर रिसॉर्ट बुक केले आहे. तुझ्या व्हाट्सअपवर सारे डिटेल्स आणि मॅप पाठवला आहे. आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट. मग तिथून पुढे जाऊया. मग धम्माल करुया. आता पुन्हा फोन करू नकोस. माझा नवरा घरीच आहे. ओके. भेटूया. स्वीट ड्रीम..." म्हणत तिने तिकडून फोन कट केला. अमेयच्या आईने तणतणत त्या फोनवरील व्हाटस्अप सुरु केला आणि जानू या नावाने असलेले सारे संदेश तिने स्वतःच्या भ्रमणध्वनीवर पाठवले. बाहेर येताच अमेयने विचारले,
"आई, किती वेळ ग. माझा खेळ संपत आलाय. कोणाचा फोन होता? जानू म्हणजे कोण ग?"
"अरे, 'संजीवनी' नावाची एक विमा कंपनी आहे. त्या कंपनीतून फोन होता. उगीच बोअर करत होती. बरे, जानू कंपनीचा फोन आला होता हे बाबांना सांगू नकोस हं. घरी आल्यावर बाबा पुन्हा त्या कंपनीत फोन करतील आणि तासभर बोलत बसतील. अमू, तुझ्यासाठी उद्या सुट्टीचे एक सरप्राईज आहे. उद्या आपण दोघे फिरायला जाणार आहोत..."
"खरेच? पण कुठे ते सांग ना..."
"सरप्राईज सांगायचे असते का?"
"बाबा नाही का येणार?" अमेयने विचारले.
"नाही ना रे. बाबांना उद्या एक महत्त्वाची मिटिंग आहे."
"काय बाप्पा! कुठे जायचे म्हटले की, बाबांना नेहमीच मिटिंग असते..." तितक्यात त्याचे बाबा मिटिंग संपवून घरी आले. आल्याबरोबर अमेयजवळील भ्रमणध्वनी घेऊन ते आत गेले...
दुसऱ्या दिवशी सकाळी अमेयचे बाबा लवकरच उठले. अमेयच्या आईला एक महत्त्वाचे काम आहे असे सांगून ते बाहेर पडले. अमेय उठण्याचीही त्यांनी वाट पाहिली नाही. अमेय उठला. दोघांनीही पटापट आटोपले आणि टॅक्सी बोलावून दोघेही निघाले. दोन-अडीच तासांच्या प्रवासानंतर ते एका रिसॉर्टसमोर उतरले. टॅक्सीचे भाडे देऊन ते रिसॉर्टशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले. हॉटेलच्या बाजूला अमेयच्या बाबांची कार त्याच्या आईने ओळखली परंतु अमेयचे तिकडे लक्ष नव्हते. ते हॉटेल, ते रिसॉर्ट पाहून अमेय खूप खुश झाला. तो आनंदाने उड्या मारु लागला. जवळ असलेल्या बागेत जाऊन तो घसरगुंडी खेळू लागला. त्याची आई म्हणाली,
"अमेय, चल ना. नाष्टा करायचा आहे ना?"
"आई, थांब ना ग. खेळू दे ना थोडे." अमेय लाडात येऊन म्हणाला.
"बरे. तू इथेच खेळ. मी वॉशिंगला जाऊन येते. कुठे जाऊ नकोस."
"नाही जात. तू ये..." अमेय तसे म्हणाला आणि त्याची आई हॉटेलच्या दिशेने निघाली. परंतु त्यावेळी चेहरा संतापाने लाल झाला होता. हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. ओठ थरथरत होते. ती हॉटेलमध्ये शिरली. वेटरने तिचे मोठ्या अदबीने स्वागत केले. तिकडे दुर्लक्ष करत तिची नजर संपूर्ण हॉटेलमध्ये फिरत होती. हॉल तसा फार मोठा होता. फिरणारी नजर कोपऱ्यातील एका टेबलवर स्थिरावली. ती त्या दिशेने निघाली. टेबलापासून काही अंतरावर पोहोचताच तिने त्या जोडप्याकडे पाठ करून जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. हॉटेलमध्ये नाष्टा करणाऱ्या सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. तशी ती म्हणाली,
"सॉरी! माफ करा. तुमच्या सर्वांच्या आनंदी क्षणात मी व्यत्यय आणला. पण माझ्या संसाराची राखरांगोळी करून त्यावर स्वतःच्या आनंदाचे, धम्माल मौजेचे ईमले बांधणाऱ्या माझ्या पतीचा आणि त्याच्या विवाहित प्रेयसीचा परिचय तुम्हा सर्वांना व्हावा ही माझी इच्छा आहे. जास्त वेळ न घेता मी 'त्या' जोडप्याचे तुम्हाला दर्शन घडवते..." असे म्हणत ती गर्रकन मागे वळाली. तिला पाहताच तिच्या पतीच्या हातातला नाष्ट्याचा चमचा खाली पडला. तसे अमेयची आई म्हणाली,
"का? घाबरलात? हेच ते माझे जन्मोजन्मीचे साथीदार! दरवर्षी सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना ज्याच्यासाठी करते तोच हाच माझा पती आणि ही त्यांची 'जानू!' सर्वांच्या लक्षात तर आलेच असेल ना..." अमेयची आई बोलत असताना सारे लोक आपापल्या जागेवर उभे राहून भ्रमणध्वनीवर त्या दोघांचे चेहरे, त्यांचे हावभाव, त्यांची प्रतिक्रिया टिपत असल्याचे पाहून त्या दोघांना मेल्याहून मेल्यासारखे झाले. जानूने स्वतःच्या दुपट्ट्याने चेहरा झाकला तर अमेयच्या बाबांनी स्वतःच्या दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेत तिथून काढता पाय घेतला. दुसऱ्याच क्षणी अमेयची आई सर्वस्व गमावल्याप्रमाणे एका खुर्चीवर टेकली. आजूबाजूच्या दोन तीन महिला तिच्याजवळ आल्या. तितक्यात अमेय ओरडत तिच्याजवळ आला,
"आई.. ए आई.. तू इथे का बसलीस? बाबा पण इथे आले आहेत ग. तुला भेटले का? आत्ता की नाही ते कुणाच्या तरी सोबत आपल्या गाडीत बसून गेले. मी खूप आवाज दिले ग पण की नाही बाबा न बोलताच निघून गेले ग..." अमेय तसे बोलत असताना आईने त्याच्या हाताला धरले आणि भरभर चालत हॉटेलच्या बाहेर पडली. योगायोगाने ज्या टॅक्सीने ते दोघे आले होते तोच टॅक्सीवाला तिथेच थांबलेला होता. त्याला बोलून दोघेही त्याच गाडीने निघाले. गाडीत बसताच अमेयची आई गाडीच्या सीटवर डोके टेकवून डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली. अमेयला काय झाले ते समजत नव्हते, कळत नव्हते. त्याचे वयही असे काही समजण्यासारखे नव्हते. काही तरी वेगळे, भयंकर घडले एवढेच त्याला कळत होते त्यामुळे खूप भूक लागूनही तो शांत बसला होता. गाडी पंधरा वीस किलोमीटर अंतर गेली असेल तोच रस्ता जाम झाला होता. मोठा अपघात झाला होता. चालक टॅक्सीतून उतरला. त्याने आजूबाजूला पाहिले. शेजारच्या काही वाहनांच्या चालकाशी, लोकांशी चर्चा केली आणि आतमध्ये बसत म्हणाला,
"ताई, अपघात झालाय. एक कार समोर चालत असलेल्या एका ट्रकवर आदळली. कारचा पार चेंदामेंदा झालाय म्हणे..." तो सांगत असताना हळूहळू वाहने पुढे सरकू लागली. त्यांची कार त्या अपघात झालेल्या वाहनांपासून जात असताना ते दृश्य पाहून अमेयच्या आईने डोळे मिटून घेतले. चालक म्हणाला,
"बाप रे! काय भयंकर अपघात झालाय. एक माणूस आणि एक बाई जागेवरच मृत्यू पावली आहेत."
"दादा, जरा गाडीचा क्रमांक दिसतोय का पहा ना..." अमेयची आई म्हणाली. चालकाने गाडीचा वेग अजून कमी करत गाडीची नंबरप्लेट बघत एक एक अक्षर आणि क्रमांक सांगताच अमेय म्हणाला,
"आई, हा आपल्याच गाडीचा नंबर आहे ना?..." तो तसे म्हणताच अमेयला त्याच्या आईने ह्रदयाशी घट्ट आवळले आणि साश्रू नयनांनी म्हणाली,
"नाही रे. तुला क्रमांक बरोबर दिसला नसेल. बाबा तर कार जोराने पळवत निघाले होते..."
तितक्यात रस्ता मोकळा झाला. तसे अमेयच्या आईने चालकास टॅक्सी बाजूला थांबवायला सांगितली. अमेयला चालकाच्या हवाली करून ती डबडबल्या डोळ्यांनी टॅक्सीपासून थोडी दूर गेली आणि स्वतःला सावरत तिने तिच्या बाबांना फोन लावला. सारी हकिकत सांगताच तिचे वडील म्हणाले,
"तू धीर सोडू नकोस. स्वतः सोबत अमेयला सांभाळ. मी लगेच तिथे पोहोचतो. पुढले सारे पाहतो. तू अमेयला घेऊन घरी जा. त्याला जास्त काही कळायला नको. व्यवस्थित जा. उशीर करु नकोस..." म्हणत तिच्या वडिलांनी फोन बंद करताच ती कारकडे जातांना पुटपुटली,
'बाबा, आधीच खूप उशीर झाला हो. आता आणखी काय उशीर होणार?...' ती टॅक्सीत बसली आणि चालकाने काही न बोलता टॅक्सी भरधाव वेगात सोडली...
नागेश सू. शेवाळकर