narsinhachi gammat books and stories free download online pdf in Marathi

नरसिंहाची गंमत,

* नरसिंहाची गंमत !*
नरसिंहराव एक सदा हसतमुख, आनंदी, समाधानी, विनोदी, प्रामाणिक, सत्शील, निरोगी असे व्यक्तीमत्त्व! वयाची सत्तरी ओलांडली असली तरीही ना कोणती गोळी, ना कोणते औषध नियमितपणे घ्यायची गरज होती. चष्मा, कानातले यंत्र, काठी असा कोणताही आधार त्यांना घ्यावा लागत नव्हता. एकदम ठणठणीत तब्येत असणारे नरसिंहराव नवीन तंत्रज्ञान, नवनवी येणारी माहिती याची बारकाईने चौकशी करून ते सारे अंगीकृत करत असत. त्यासाठी लहानथोर कुणाचीही मदत घ्यायला, प्रश्न विचारायला त्यांना कमीपणा मुळीच वाटायचा नाही. त्यांच्याजवळ संयम होता त्यामुळे कुणाचीही मदत घेताना ते कसलीही घाई, गडबड करायचे नाहीत. त्या व्यक्तीच्या सवडीनुसार, वेळेनुसार ते त्याच्याकडून माहिती मिळवायचे. मुळात नरसिंहरावांची बुद्धी अत्यंत तल्लख असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट चुटकीसरशी समजावून घेत असत. भ्रमणध्वनीवर ते कायम तत्पर असत. फेसबुक, व्हाटस्अप, मेसेजेंर, ट्विटर या तंत्रज्ञानामध्ये ते मुक्तपणे विहार करत असताना सारे आर्थिक व्यवहार 'डिजिटल' व्यवस्थेच्या आधारे व्यवस्थितपणे करत असत. त्यांचा स्वभाव मुळात विनोदी असल्यामुळे भ्रमणध्वनीवर विविध पोस्ट टाकताना, इतरांच्या पोस्टना उत्तर देताना ते त्यास विनोदाची फोडणी देत असत त्यामुळे ते या सर्व माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. एखादे दिवशी त्यांनी नवीन पोस्ट टाकली नाही, कुणाच्या पोस्टला उत्तर दिले नाही तर अनेक जण त्याबाबत चौकशीवजा संदेश टाकत असत.
नरसिंहरावांना नित्य पर्यटनाची आवड असल्यामुळे ते कायम फिरतीवर असायचे. कधी कधी सहकुटुंब सहलीवर जायचे. त्या आठवड्यातही ते सहकुटुंब एका पर्यटन स्थळी गेले होते. तिथे भ्रमणध्वनीला अधूनमधून रेंज मिळत होती. त्यादिवशी सकाळी सकाळी ते उठले. सवयीप्रमाणे आधी भ्रमणध्वनी तपासला. आलेल्या संदेशांना गमतीदार, तर काही संदेशांना खरमरीत उत्तर देताना त्यांनी नेहमीप्रमाणे स्वतःची एक म्हटलं तर अत्यंत भयानक, म्हटली तर विनोदी अशी एक पोस्ट टाकली. त्यांनी तो मजकूर पोस्ट केला न केला की तिथली रेंज गेली. भ्रमणध्वनीसह नरसिंहराव 'आऊट ऑफ कवरेज' झाले आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. नरसिंहराव अनेक व्हाटस्अप समुहात होते, वैयक्तिक व्हाटस्अपवर आणि फेसबुकवर त्यांचे असंख्य मित्र होते. ज्याने तो मजकूर वाचला त्याने कोणतीही शहानिशा न करता नरसिंहरावांचा तो मजकूर धडाक्यात शेअर करायला सुरुवात केली. 'उपर से आया, भेज दिया।' असा सरकारी बाणा जणू! त्या पर्यटनस्थळी ते दोघेच नवरा बायको गेलेले असल्यामुळे अनेक नातेवाईक, मित्रमंडळ, परिचित त्यांचे दोघांचेही भ्रमणध्वनी लावण्याचा प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे 'आम्ही फक्त फिरायला जातोय. आठ दिवसांत परत येतो' असा मजकूर सर्वत्र टाकून आणि जवळच्या लोकांना भ्रमणध्वनीवरून कळवून ते निघाले होते त्यामुळे ते दोघे कुठे आहेत हे कुणालाही समजत नव्हते, माहिती नव्हते. ही पण नरसिंहरावांची स्वतःची अशी आगळीवेगळी ओळख (स्टाईल) होती. अनेकदा ते एकटेच भ्रमंतीवर जायचे पण पत्नीलाही ठिकाणा सांगायचे नाहीत. पण सतत संपर्कात राहायचे, रेंजमध्ये असल्याने कुणीही संपर्क करु शकायचे. पण यावेळी मात्र त्यांचे ठिकाण माहिती नसल्यामुळे आणि त्या दोघांचेही फोन आउट ऑफ असल्याने सारे चिंतेत पडले. त्यातच एक मजकुर सातत्याने फिरत असल्यामुळे फार मोठा गोंधळ उडाला होता. होय! तो मजकुरच तसा एखादा बॉम्ब कोसळावा असाच होता. एकानंतर एक अशी शेकडो जणांनी फॉरवर्ड केलेला, शेअर केलेला तो मजकुरच तसा होता. तो मजकुर म्हणजे नरसिंहरावांनी सपत्निक आत्महत्त्या केल्याची बातमी होती. वाचाणारांसाठी, ऐकणारांसाठी तो एक फार मोठा धक्का होता. नरसिंहरावांचा स्वभाव पाहता, त्यांची विचारसरणी पाहता, त्यांचे इतरांना मार्गदर्शन करण्याची वृत्ती बघता एकूण त्यांचे सामाजिक स्थान पाहता ते आत्महत्त्येसारखी टोकाची भूमिका घेतील यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. परंतु सातत्याने त्याच त्याच मजकुराचे होणारे रवंथ बघता विश्वास ठेवणे भाग होते. नाइलाज होता. विशेष खातरजमा न करताही एकदा विश्वास बसला की, मग सुरू होतो पुढला प्रवास! अशा बातम्यानंतर घटनेनंतर सुरू होतो शोकसंदेशांचा पाऊस! नरसिंहराव यांच्या सपत्निक आत्महत्त्येनंतर सामाजिक माध्यमांवर अक्षरशः शोकसंदेशांच्या महासागराला भरती आली. जो तो एक-दुसऱ्याच्या शोकसंदेशाला स्वतःचा शोकात्मक मजकूर जोडून पुढे पाठवत होते.
'असे कसे घडले? काही तरी बिघडले असणार? त्याशिवाय नरसिंहरावांसारखा माणूस असे आत्मघातकी पाऊल नाही उचलणार!'
'काहीही घडले असले तरीही नरसिंहरावांकडून अशी पेक्षा नव्हती.'
'पण नेमके घडले तरी का?'
'ते सध्या तरी कुणाला माहिती नाही. त्यांनी कुणाला कळवले असले तरीही ते सामायिक का होणार आहे? कारण तर असणार. मला सांगा, कुणाच्या जीवनात कटकटी, दुःख, भांडणतंटा नाही? जर या प्रपंचातील अडचणींना कंटाळून प्रत्येक जण जर असाच विचार करु लागला तर हा संसार निर्मुनष्य होईल हो.'
'अगदी बरोबर आहे. बरे, नरसिंहराव ना सुनेजवळ राहात होते, ना जावयाजवळ राहात होते. दोघेच दोघे राहात होते ना मग असा काय डोंगर कोसळला...'
'अहो, ज्या कारणासाठी मुलगा किंवा मुलगी यांच्याजवळ राहात नव्हते त्याच कारणाने उग्र रुप धारण केले असणार.'
'म्हणजे भांडण पैसा, इस्टेटीच्या संदर्भात होते की काय?'
'तर मग दुसरे काय असणार? नरसिंहरावांजवळ भरपूर पैसा आहे. ते राहतात त्या इमारतीचे बघा ना. कशी पॉश सजवली आहे ती. मला सांगा, म्हातारपणी एवढ्या सोयीसुविधा कशाला हव्यात?'
'ते मात्र आहे. जावाई म्हणे सारखे पैसे मागत होता. मुलालाही पगार तसा फार नाही म्हणे. त्यामुळे कुणाला एक पै न देता हे दोघे इथे वेगळे रहात होते.'
'हेच ते. मला सांगा, जर पोटची मुले दुरावत असतील तर काय चाटायचे त्या पैशाला?'
'हो ना. आता काय वेळ आली बघा. दूर कुठे तरी अज्ञात स्थळी जाऊन मृत्युला स्वतः तर कवटाळले पण बायकोचाही खून केला.'
'बायकोचा खून? असे कसे म्हणता तुम्ही?'
'खून नाही तर काय?त्या माऊलीने का स्वेच्छेने मरण पत्करले असणार का? नरसिंहरावांनीच दबाव टाकून बायकोला आत्महत्त्येला प्रवृत्त केले असणार. म्हणजे दुसऱ्या शब्दात खूनच की.'
'अरे, बाप रे! 'दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण' असेच झाले की.'
'हो ना. इतरांना किती ज्ञान सांगत होते...'
'सांगत होते? अहो, आडवे पाडून ज्ञान पाजत होते असे म्हणा. त्यांचा विनोदी मजकुर म्हणजे चक्क म्हातारचळ लागल्याप्रमाणे असायचा.'
'साठी बुद्धी नाठी म्हणतात ते हेच. अगदी बाष्कळपणा असायचा. काही वेळा तर चक्क कमरेखालचे विनोद असायचे हो.'
' नरसिंहरावांचा एक विनोद वाचून माझी बायको तर मला म्हणाली होती की, ह्या अशा पोस्ट टाकणारे तुमचे मित्र असुच कसे शकतात. यांना ताबडतोब 'अनफॉलो करा. ब्लॉक करा. फेसबुकवरीलच मित्र आहेत ना मग तर झाले. जीवाभावाचे, लहानपणापासूनचे, कार्यालयातील मित्र असतील तर गोष्ट वेगळी. त्यांना तोडून टाकणे थोडे अवघड जाते पण कधीच तोंड न पाहिलेल्याला इसमास मित्र तरी कसे म्हणायचे हो? अशा मित्रासोबतचे संबंध तोडायला काहीच हरकत नसावी.' पण मीच हो म्हणत ती वेळ मारून नेली. पुन्हा बायकोला नरसिंहरावांची एकही पोस्ट दाखवली नाही.'
'माणूस ज्ञानी होता. काही वेळा तर खूप छान मजकूर टाकायचे. अनेक वेळा त्यांचा मजकुर वाचून माझे अनेक प्रश्न सुटले आहेत. खरे सांगतो म्हणून असा माणूस असा अविवेकी विचार करु शकतो यावर विश्वास बसत नाही, मन मानायला तयार होत नाही.'
'या माणसाला कधीच पाहिले नाही पण समुहावर आलेला त्यांच्या आत्महत्त्येचा मजकुर वाचून अस्वस्थ होतय. कुणीतरी जवळची व्यक्ती दुरावली असेच वाटतेय.'
'खरे आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो एवढीच आपण प्रार्थना करू शकतो.'
'कशाची शांती आणि काय? साध्या, नैसर्गिक कारणाने मरण आले तर शांती मिळते. आत्महत्त्या या मार्गाने मरणाला कवटाळणारे नेहमी अशांत, अतृप्त असतात म्हणे.'
'यांची काय इच्छा असणार आहे. सत्तरी ओलांडली होती. सांसारिक साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या...'
'तरीही अशा मरणाने जाणारा शरीराने जातो पण आत्मा इथेच घुटमळत राहतो. नानाप्रकारे आपली तृप्ती, इच्छापूर्ती करुन घ्यायला पाहतो...'
'म्हणजे भूत होतो असे सरळ सरळ लिहा की. उगाच बिरबलाच्या गोष्टीतील 'पोपटाचे मरण' ही कथा कशाला ऐकवता?'
'कसे असते काही गोष्टी आडवळणाने सांगितलेल्या चांगले असते.'
'का? सरळ सांगितले तर नरसिंहरावांचे भूत तुमच्या मानगुटीवर बसेल की काय अशी भीती वाटते?'
इकडे सर्वत्र अशी साधकबाधक चर्चा रंगलेली असताना तिकडे भ्रमणध्वनीला रेंज मिळत नव्हती म्हणून नरसिंहराव परेशान, अस्वस्थ, बेचैन होते. अगतिकतेने सेकंदा-सेकंदाला भ्रमणध्वनी सुरू करत होते. रेंजची एखादी तरी काडी आलीय का हे बघत होते. मधूनच ते उतरलेल्या हॉटेलच्या बाहेर येऊन हात उंच करून, एखाद्या उंच जागेवर जाऊन रेंज मिळवण्याचा प्रयत्न करत होते. एकदा तर हॉटेलचे लाईट गेलेले असताना, लिफ्ट बंद असलेल्या अवस्थेत चक्क आठ मजले चढून गच्चीवर गेले आणि रेंज आलीय का, फोन लागतोय का हे बघत होते. तेवढे मजले चढून गेल्यामुळे दुसरे दिवशी अंग ठणकतय म्हणून दिवसभर झोपून होते. एके रात्री त्यांच्या पत्नीला जाग आली. पाहतात तर नरसिंहराव शेजारी नाहीत. दोन क्षण त्या घाबरल्या पण लगेच पुटपुटल्या,
'गेले असतील रेंज मिळतील का ते पाहायला. एक वेळ सोबत बायको नसली तरीही चालेल पण तो फोन आणि ती रेंज नसली म्हणजे यांचा जीव जातो. तहानभूक सारे विसरतील. नाष्ट्याच्या ऐवजी सरळ दुपारी दोन वाजता जेवण करतील तेही सतरांदा मागे लागल्यानंतर पण हातात मोबाईल असताना कधी ह्यांनी 'जेवायला वाढ' असे म्हटल्याचे मला आठवत नाही. चला.मोबाईलचे सोडा पण आमचे नरसिंहराव तरी रेंजमध्ये आहेत का नाही ते पहावे लागेल.' असे पुटपुटत नरसिंहरावांची पत्नी खोलीच्या बाहेर आली. लिफ्टने खाली उतरून त्या हॉटेलच्या स्वागतकक्षाजवळ आल्या. पाहतात तर स्वागत करणारी व्यक्ती खुर्चीवर ढाराढूर झोपली होती. या इसमास उठवण्यात काही अर्थ नाही हे समजून त्या हॉटेलच्या बाहेर आल्या. फाटकाजवळ बसलेला संरक्षकही घुरक्या ठोकत होता ते पाहून मनातल्या मनात हसत त्या फाटकाच्या बाहेर आल्या. थोडे दूर जात नाहीत तोच एका झाडावर त्यांचे पती नरसिंहराव चढण्याचा प्रयत्न करत होते. जवळ जाताच त्यांनी आवाज दिला,
"अहो, नरसिंहराव इथे काय करताय?"
"काही नाही ग. रेंज मिळते का ते पाहतोय?"
"कुणाचा अर्जंट फोन येणार आहे का ग?"
"तसे नाही ग. तीन दिवस झाले, जगाशी संपर्क तुटलाय."
"आपण या साऱ्यापासून अर्थात जगापासून शांती मिळावी म्हणूनच कुणाला अगदी पोटच्या पोरांनाही काहीही न सांगता इथे येऊन राहिलोत ना मग ..."
"पोटची पोरं? कुणाचे काही अडणार नाही ग. जी ती आपापल्या संसारात रमली आहेत. तुला एक कविता ऐकवतो ऐक. नुकतीच सुचली आहे मला.
"कविता? तुम्हाला सुचलीय. कविता आठवली असे म्हणाला असता तर समजू शकले असते की, माझ्या नरसिंहाला कुणीतरी कविता नावाची मैत्रीण आहे आणि ती आठवली..."
"काय पण तू? ऐक तरी खरी...
'कुणी असले समोर तर
त्याची कुणाला गरज भासते,
कुणी नसले समोर तर
त्याची कुणाला आठवणही नसते...' आपली ना कुणाला गरज आहे, ना चिंता आहे. अडगळीच्या वस्तुंची का कुणी तुटेल-फुटेल म्हणून काळजी करतात काय? विविध माध्यमातून शेकडो नवीन मित्र जमवलेत आणि या सामाजिक माध्यमाने वेड लावले आहे. यावर काही मजकुर टाकला नाही किंवा कुणाचा काही मजकुर वाचला नाही तर जेवण जात नाही, झोप येत नाही, करमत नाही, काही काम करावेसे वाटत नाही, बेचैन होतो, अस्वस्थता वाढते, चिडचिड होते..."
"बस. बस. मला सारे माहिती आहे. म्हणून नेहमी सांगत होते की, त्या मोबाईलच्या एवढे आहारी जाऊ नका पण माझे तुम्ही पन्नास वर्षाच्या सहवासात कधी ऐकले आहे काय?"
"अग, हे मोबाईल म्हणजे ना एक चक्रव्यूह आहे ग. आत जाणे तसे सोपे आहे पण बाहेर पडणे अत्यंत कठीण आहे, अशक्य आहे..."
"मला सांगता? या.. या.. नरसिंहरावांना काहीही अशक्य नाही हे तुम्ही इतरांना सोडा पण मला हजारदा ऐकवले असेल. मला हेही माहिती आहे की, तुम्ही मनात आणले आणि तुम्ही पोटच्या पोरांपासून पूर्ण नाही पण बरेच दूर झालात. रक्ताच्या नात्यापुढे हा सोशल मीडिया काय चीज आहे, नरसिंहा?"
"व्वाह! क्या बात है, जानू! कितीतरी वर्षांनी तुझ्या तोंडून 'नरसिंहा' शब्द ऐकतोय ग. व्वा! मज्जा आली ग. कानात असे अमृत टाकल्याप्रमाणे, कोकिळेचा स्वर गुणगुणल्याप्रमाणे वाटले ग. तुला आठवते का ग..."
"मला सारे आठवते. या जन्माचे सोडा पण सात जन्म मी तो तुमचा हसरा, आनंदी, लालेलाल झालेला चेहरा विसरणार नाही, ज्या दिवशी मी माझ्याही नकळत तुम्हाला प्रथम नरसिंहा या नावाने बोलावले. पन्नास वर्षे झाली..."
"म्हणजे आपल्या लग्नालाही पन्नास वर्षे झाली म्हणायची?"
"नरसिंहमहाराज, आपण या रेंज नसलेल्या ठिकाणी कशासाठी आलो आहोत?"
"आपली वैवाहिक जीवनाची पन्नाशी पूर्ण करायला... अरे, बाप रे! माय गॉड! मी चक्क..."
"विसरलो. या भ्रमणध्वनीच्या मोहमयी मायेत विरघळल्यावर दुसरे काय होणार?"
"बाईसाहेब, मी कसा विसरेन बरे. घेतली का नाही विकेट तुझी. आपण उद्या सकाळपासून दिवसभर वाढदिवस साजरा करणार आहोत. चल. जाऊया आत..."
"अहो, पण ती माझी सवत आली का?"
"सवत? कोण ग?..." नरसिंहरावांनी गोंधळलेल्या अवस्थेत विचारले. तसे खळाळून हसत पत्नी म्हणाली,
"घाबरलात ना? मी पण एका विनोदी माणसाची बायको आहे म्हटलं. पन्नास वर्षे संसार केल्यानंतर हम भी एखादा ज्योक मार सकते है। अहो, ती रेंजबाई... मोबाईलची रेंज म्हणजे माझी सवत हो..."
"बाप रे! तू पण भारी आहेस ग. चल..." असे म्हणत नरसिंहरावांनी पत्नीचा हात हातात घेतला आणि दोघे आनंदाने आत गेले...
तिकडे नरसिंहरावांच्या मुलाच्या घरी गोंधळ उडाला होता. त्यांची सून नवऱ्याला म्हणाली,
"तू असा स्वस्थ कसा काय बसू शकतोस? अरे, बाबांनी पोस्ट टाकली आहे की, त्यांनी आईंसह आत्महत्त्या केली आहे."
"आत्महत्त्या केलेला माणूस कशी काय पोस्ट टाकू शकतो?"
"म्हणजे? तुला काय म्हणायचे आहे?"
"पोस्टमध्ये बाबांनी काय लिहिले आहे तर आम्ही दोघांनी आत्महत्त्या केली आहे. मेलेला माणूस असे म्हणू शकतो का? त्यांनी असे लिहिले असते की, ते दोघे आत्महत्त्या करणार आहेत तर समजू शकलो असतो की, तशी पोस्ट टाकल्यानंतर ते आत्म..."
"असा रे कसा तू? तू केवळ शब्दछल करत बसणार आहेस की, त्यांचा शोध घेणार आहेस?"
"शोध घ्यायला ते का हरवले आहेत?..."
"तुला परिस्थितीचे मुळीच गांभीर्य नाही आहे. त्या दोघांच्या फोनहून त्यांना ट्रॅप करून ते कुठे आहेत ते तर समजेल..."
"अग, त्यांनी आत्महत्त्या केलीय. मी काय त्यांना स्वर्गात ट्रॅप करू काय?"
"पांचट विनोद, बाष्कळपणा सोडून जरा सिरीयस होशील काय?"
"बाष्कळपणा, पांचटपणा मी नाही तर बाबा करताहेत. सरळसरळ लोकांना आणि विशेषतः आपल्याला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. ज्योक करताहेत ते. कसे आहे त्यांना कसेही करून चर्चेत राहायला, फोकस स्वतःकडे वळवून घेण्याची सवयच जडली आहे. नव्हे ती आता सवय राहिली नाही तर विकृती बनलीय..." मुलगा चिडून बोलत असताना त्याचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर त्याच्या बहिणीचे नाव पाहून पुटपुटला, 'वाटलेच मला. अजून ताईसाहेबाचा फोन कसा नाही आला?' त्याने फोन उचलताच तिकडून आवाज आला,
"कुठे आहेस? तुला कळाले का?"
"ताई, मलाच नाही तर अख्ख्या जगाला कळाले आहे."
"मग काय करायचे ठरवलेस? कुठे कुठे शोधलेस? काही पत्ता लागला का? पोलिसात तक्रार दिलीय का? त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली आहे का?" ताईने प्रश्नांचा भडिमार केला.
"मला काय वाटते, माझ्याशी माझी ताई नाही तर तिच्यातली शिक्षिका बोलतीय. ताई, कुठे शोधावे? एक ठिकाणा आहे का त्यांचा? ते सांगून गेले आहेत का?"
"अरे, त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे ते गेले असतील. नेहमीचे वेगळे असते पण आताचे वेगळे आहे. अरे, त्यांनी आत्महत्त्या केल्याची पोस्ट टाकलीय..."
"ताई, तू शिक्षिका आहेस, तुझ्या तरी एक गोष्ट लक्षात यायला हवी होती की, मृत माणूस मी आत्महत्त्या केलीय अशी पोस्ट टाकू शकेल का?"
"तुझे लॉजिक तुझ्याकडे ठेव. ही ती वेळ नाही. लक्षात घे."
"बरे, सांग. मी काय करु ते?"
"हे बघा. तुम्ही दोघे असा वाद घालू नका. एक मात्र नक्की काही तरी करून त्यांना शोधायला हवे..." नरसिंहरावांची सून म्हणाली...
तिकडे नरसिंहराव बायकोसह हॉटेलमधील खोलीत परतले. पलंगावर अंग टाकता टाकता म्हणाले, "अग, ते काही नाही. आता उद्या इथे आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे छानपैकी जेवण करू आणि निघूया लवकरच. केव्हा एकदा ती ... रेंज भेटतीय असे झालेय बघ." "काय पण ही या वयातील अगतिकता. तीही केवळ मोबाईलवर खेळता येत नाही म्हणून..."पत्नी बोलत असताना नरसिंहराव 'आलोच हं...' असे म्हणत शौचालयाकडे निघालेले पाहून पत्नी हसत म्हणाली,
"अहो, नरसिंहराव आता ती काय तुम्हाला तिथे भेटायला येणार आहे का?"
"अग, नेहमीची सवय लागलीय पण काही सांगता येत नाही बरे. कदाचित येऊही शकते..." असे म्हणत नरसिंहराव शौचालयात गेले. काही क्षणातच त्यांनी भ्रमणध्वनी सुरू केला काय आश्चर्य त्यांची आवडती, जिची ती सातत्याने वाट पाहात होते, जिच्या भेटीसाठी ते तळमळत होते ती रेंज फुलफोर्समध्ये त्यांना साद घालत होती. एकदा त्यांना वाटले असेच 'आली. आली...' असे म्हणत जावे आणि पत्नीला त्यांच्या प्रिय रेंजकुमारीचे दर्शन द्यावे. पण पाठोपाठ दुसरे मन म्हणाले की, 'नको. असे काही नको. बाहेर गेल्याबरोबर ही रेंजबया पुन्हा रुसून निघून गेली तर? त्यापेक्षा एकदाची सापडलीय ना, तर मग घे मनसोक्त उपभोग...' नरसिंहरावांना तो विचार पटला. त्यांनी ताबडतोब भ्रमणध्वनी सुरू केला आणि काय आश्चर्य अडकून पडलेल्या संदेशांचा, मजकुराचा अक्षरशः पाऊस पडायला सुरुवात झाली. पहाटे पहाटे उठून अंगणातल्या डौलदार पारिजातकाच्या झाडाला हलवताच फुलांचा सडा पडावा, मनमोहक सुगंधाने परिसर भरून जावा. अशीच त्यांची अवस्था झाली. त्यांना वाटले, आलेले संदेश आपण आपल्या आत्महत्त्येच्या मजकुरासंदर्भातच असणार. इतके संदेश कुठे पळून जाणार नाहीत ते नंतरही वाचता येतील. त्यापेक्षा एक नवीन मजकुर टाकू या. या विचाराने त्यांनी लिहिले,
'नमस्कार! मित्रांनो, नमस्कार! आज आमच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. पटापट शुभेच्छा द्या बरे. स्वर्ग अजून दोन बोटाच्या अंतरावर आहे. म्हटलं तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घ्याव्यात आणि नंतरच स्वर्गात प्रवेश करावा...' इतका मजकुर लिहून नरसिंहरावांनी तो पोस्ट केला न केला की पुन्हा रेंज गायब झाली. नरसिंहराव बाहेर आले. पत्नीकडे बघत त्यांनी 'विजयी' झाल्याप्रमाणे दोन बोटे उंचावली...
नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED