माझ्या गावातील आठवणी A P DHANDE द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या गावातील आठवणी

माझ्या गावातील आठवणी

प्रा. डॉ. अश्विनीकुमार पंजाबराव धांडे

मनोगत

वाचकहो, आपण नेहमीचे जीवन जगतांना कधी-कधी थकून जातो आणि कंटाळवाणे वाटायला लागते व आपले मन आपल्या लहानपणीच्या जीवनात डोकावते. अशा वेळेस जे लहानपणी जीवन जगलो त्याचा एक चलचित्रपट मनात नकळत सुरु होतो परंतु जेंव्हा वास्तवातले पुन्हा जीवन सुरु होते तेंव्हा हा चित्रपट आठवणींच्या पडद्याआड जातो. तो कायमचा स्मुर्तीतून निघून जाऊ नये या साठी लो कायम स्वरूपी लिहून ठेवणे हे चांगले असते. त्याच अनुषंगाने माझ्या लहानपणीच्या आठवणी या पुस्तकात लिहल्या आहेत.

जीवनात अशा काही व्यक्ती मिळतात कि त्यांनी केलेल्या मायेचा वर्षाव आपल्या मनात त्यांची कायम आठवण ठेवून जातो. ती व्यक्ती जिवंत असो अथवा मृत पण आपल्या मनात सदैव ती आठवणीरूपात सतत राहते. अशीच माझी माहुलीची दादी. आता दादीला मरुन ५ वर्ष झाले तरी त्यांच्या आठवणींचा ठेवा माझ्या मनात आहे. कॉलेज मध्ये कामे नसतांना मला दादीबद्धल लिहावेसे वाटले व मनातल्या आठवणींचा ठेवा सहजच लोकांनी वाचावा म्हणून लिहायला घेतला कि जेणेकरून त्या आठवणी मला पुन्हा उजाळा देता येईल.

आपला

प्रा. डॉ. अश्विनीकुमार पंजाबराव धांडे, १९, मोहन कॉलनी,

कॅम्प रोड, अमरावती (महा. ) ४४४६०२

महत्वाची सुचना : पुस्तक वाचतांना कृपया पहिले टीप वाचणे कि जेणेकरून तुम्ही पुर्णपणे आनंद घ्याल.

माझ्या गावातील आठवणी

वाचकहो, सप्रेम नमस्कार. (e-sahaty /पुस्तके /गद्य/ आठवण)

माझे गाव दर्यापूर तालूक्यातील माहोली(धांडे). हे गाव दर्यापासून सहा किलोमीटर अंतरावर दर्यापूर-आसेगाव मार्गावरचा पहिला थांबा. थांब्यापासून सुमारे पश्चिमेस सहा फर्लांगअंतरावर. जेव्हा मला समजायला लागले म्हणजे सात वर्षाचा असतांना तेंव्हा मी पहिल्यांदा आईवडिलांसोबत अमरावतीवरून माहोलीला गेलो. अंधुकअस आठवते कि सुमारे दुपारी दोन वाजता आम्ही अमरावतीवरून दर्यापूरला निघालो व साधारण तीन साडेतीन वाजता दर्यापूरला पोहचलो. त्यानंतर वडिलांनी दर्यापूर स्थानकावर चौकशी केल्यावर कळले कि आसेगाव मार्गे जाणारी गाडी संध्याकाळी आहे. त्यामुळे स्थानकावर थांबण्याखेरीज मार्ग नव्हता. त्यावेळेसचे दर्यापूर स्थानक म्हणजे फक्त दोन बसेस थांबण्याइतकी जागा. ना फलाट किंवा मोकळी जागा. अगदी मुख्य रस्त्याच्या कडेला एकामागेएक अशा बसेस थांबत कारण त्याकाळी वर्दळ/वाहतूक अतिशय किरकोळ असायची.

शेवटी दिवेलावणीला आम्ही घरी पोहचलो व पाय ठेवताच मला आवाज आला 'कायले आला रे आशीन?तुले काय निवत धाडला होता?' मी चमकून पहिले तर एका खिडकीतून दादी मिश्किलपणे माझ्याकडे पाहत विचारात होती. एकदम हसू व मिष्कीलपणाचे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. अशा रीतीने दादीची माझी गावातली पहिली भेट. नंतर आई दादी बाबा वैगरे बोलत बसले व काही वेळाने मला काठी बडवीत कोणीतरी आल्याची चाहूल लागली तर माझे आप्पा (तात्या) आले होते. त्यांनी शांतपणे काठी कोपऱ्यात ठेवली व प्रेमाने माझी विचारपूस करू लागले. अशातच रामदास काका, रमाकाकू, विनूकाका, सुनंदा बेबी आत्या आले. नंतर आम्ही सर्व चौकातल्या घरात गेलो गप्पा गोष्टी रात्रीचे जेवण करून झोपी गेलो. तात्या व नाना आप्पा घराच्या गच्चीवर झोपत होते. माझ्या आजोबांचे नाव होते बाबाराव पाटील तर नाना आजोबांचे होते गंगाधर पाटील. दोघे भाऊ म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी असे गाव मनात होते व खरोखर तसेच होते. हे गावच मला नवीन होते त्यामुळे मला तिथले काहीच माहित नव्हते. सकाळी उठल्यावर एक माणूस पाण्याचे पिपे (टिप) हौदात टाकत होता तेव्हा विनुकाकांनी त्याला दौलत भाऊ म्हणून हाक मारली तेव्हा मला कळले कि ते दौलत भाऊ आहे. ते घरीच सालाने काम करीत असत.

सकाळी दूध पिल्यावर दादी मला अंगणातून दुसऱ्या दारातून जातांना दिसली व मी सहज तिच्या मागे गेलो तर दादीने म्हटले कि चल तुला गायवाडा दाखवते. हा गायवाडा घराच्या बाजूला घरापेक्षा खालच्या अंतरावर होता. मी पाहिले तर काय!आत तीन चार गाई व दोन तीन म्हशी बांधल्या होत्या तसेच काही वासरे देखील खुट्याला बांधले होते. जवळच वाळलेल्या पराटीचा खूपमोठा ढिग एकमेकांवर रचून ठेवला होता. गायवाड्यावर एक खोली होती त्यात कडबाकुटार भरलेले होते. एकंदरीत गायवाडा हा बऱ्यापैकी मोठा होता. आमचे घर गावात सर्वात उंच असल्याने अक्खा गाव हा नजरेत भरायचा. अशातच सहज मी घराच्या मागच्या बाजूला गेलो तर खाली जवळच एका देवळाचा बऱ्यापैकी भाग व त्याला अगदी जवळूनच जाणारी S आकारात नदी वाहत होती. देवळाच्या परिसरात बरेच मोठे वृक्ष होते. या सर्व गोष्टी मी लक्ष्यात ठेवून घरी आलो व दादीला विचारले तर तिने सांगितले कि ती चंद्रभागा नदी आहे व ते शंकराचे देऊळ आहे. अशा तऱ्हेने नदीशी माझी ओळख झाली नंतर अनेक किस्से माझ्या आणि नदीबाबत घडले ते नंतर येतीलच. त्या नंतर मी वर माडीवर गेलो तर पहिले तिथेदेखील दोन खोल्या होत्या आणि अतिशय शांत वातावरण होते. देवळाजवळची चंद्रभागा नदी दुरवरुन S आकारात वाहत होती अगदी दुरपर्यंत वाहत होती. वरून पूर्ण गाव दिसत होता. दोन खोलींपैकी एकीत काही गाद्या, उशा वैगरे होते तर दुसरीत काही भांडे, गडवा, पाण्याचा माठ, ताट, बरण्या (तिखट, मीठ वैगरे ठेवलेल्या).

हे सर्व पाहून झाल्यावर मी खाली आलो व काकांना विचारले तर त्यांनी हसत सांगितले कि एक खोली फक्त मटन करायची आहे व दुसरी झोपायची. त्यावेळेस काही मटण वगैरे समजले नाही पण

लगेच मला याचा प्रत्यय आला. इकडे मी समोर जाऊन पाहतो तर दादी जुन्या घरात स्वयंपाक करत होती व मला सांगू लागली कि आपले घर हेच आहे कारण आप्पा आम्ही दोघे म्हणुन येथे राहतात तर ते सहा म्हणुन तेथे तरी दोन्ही घरे एकमेकांची आहे. नंतर आम्ही जेवण करून मी परत झोपी गेलो. संध्यकाळी उठुन मी खिडकीतुन पाहत असतांना खिडकीच्या समोर मला घरे दिसत होती व साधारण माझ्याच वयाची काही मुले खेळात होती. त्याच ओट्यावर काही मोठी माणसांच्या गप्पा गोष्टी सुरु होत्या. दादीनी उठून खिडकीतून पाहून बंड्या या नावाने आवाज दिला व मला म्हटले जा तो पुंडकर मास्तरचा बंड्या आहे त्याचाशी खेळ. पंजाबराव पुंडकर गुरुजी(मास्तर)हे शिक्षक होते व ते जवळच कान्होली या गावातील शाळेत होते पण ते गावात पुंडकर मास्तर याच नावाने ओळखले जात. मी धावतच तिथे गेलो आणि येथेच माझी आणि बंड्या ओळख झाली व त्या दिवसापासून तो माझा ते आजपर्यंत एकदम जवळचा मित्र बनला आहे. बंड्याचे खरे नाव शरद पण त्याला सर्व बंड्याच म्हणत. तसेच त्यांचे भाऊ राजू, गजूदादा विलास दादा, राम, श्याम असे हे सहा भाऊ त्यापैकी राम व श्याम याचा जन्म काही वर्षानंतर झाला. बंडूचे घर देखील खूप मोठे होते. समोर ओसरी, मध्ये एक खोली, खोलीतूनच छोटासा स्वयंपाकघरात जाण्यासाठीचा पायरीवजा दरवाजा, खोलीच्या एका बाजूला दुसरी मोठी खोली, त्यात बंगळी, या खोलीतूनच आत पुन्हा दुसऱ्या खोलीत साठी दरवाजा, मागे मोठे आंगण, वरती आणखी कडबाकुटार ठेवण्यासाठी मोठी खोली, अंगणा लगतच स्नानगृह, आंगण्याच्याच विरुद्ध बाजूला काही अंतरावर शौचालय, काही अंतरावर गुरे ढोरे बांधलेली. म्हणजे एकंदरीत बरेच प्रशस्त. खेळात वेळ कसा निघून गेला हे मला कळलेच नाही रात्र झाली व दादीनी आवाज दिला तेव्हा कुठे मला भान आले पण आता घरी जायचे तर रस्त्यात अंधार. मी दादीला ओरडून सांगितले तेंव्हा ओट्यावरील एका माणसाने मला घरी पोहचून दिले व त्याने दादीला विचारले हा व्हाय कोण ? दादी म्हटली 'माह्या नातू, मधुचं पोरग '( बाबांचे नाव पंजाबराव उर्फ मधुकरराव व गावात मधू ह्याच नावाने ओळखले जातात. )नंतर दादीने मला सांगितले ह्या अशोक तुया काका. अशोक काका हे अगदी घराच्या बाजूलाच राहत. ते तिघे भाऊ(अशोक, हनुमंतराव व रमेशराव) व तिघी बहिणी आशा ताई, उषा ताई व मीना ताई. रामभाऊ आप्पा हे त्यांचे वडील व रमेशची माय म्हणजेच दादी हि आई. गावात त्या रमेशची माय म्हणूनच ओळखल्या जात. त्या रात्री मी दादीजवळच अंगणात खाटेवर झोपलो. वर मस्त आकाश चांदण्यांनी बहरले होते अशातच कधी झोप लागली हे कळले नाही. नंतर दोन तीन दिवसांनी आई बाबा निघून गेले व मी तिथे जवळपास एक महिना थांबलो . या एका महिन्यात बरेचसे मित्र बनले त्यापैकी आठवत असलेले म्हणजे अजमत , मुन्ना, राधेश्याम, बाल्या, विकास, पिंट्या, सुनीलमोहोड, पिंटू, गजा, दिनेश, राजा, गोम्या, रवी, धांडे, बाल्य हरणे, प्रभाकर मोहोड व इतर अनेक शिवाय थोडे मोठे जसे, राजु, गाजू, विकास दादा पुंडकर, बाळूकाका हरणे, सुभाष, बाळू दादा हरणे, सुभाष, बाळू काका, अशोक, हनूकाका धांडे, व मोठे माणसे म्हणजे रामभाऊआप्पा, देशपांडे आप्पा, त्यांची दोन मुले, पुंडकर काका, मधुकर लहाने, रहिमतुल्लाहखान, पुंडलिक काका, अण्णा देशपांडे, पलू महाराज, भाऊसाहेब आप्पा, दिगंबर आप्पा, शालिकराम आप्पा, छोटू भाऊ, बाईजी, राधेश्याम भट्टड मोहिनी भट्टड हे मारवाडी कुटुंब वगैरे. इतर अनके जे माझ्या स्मरणातुन गेलेले.

दिवस भर मी बंडूच्या घरी किंवा आमच्या घरीच असायचो. सकाळी ऊन आल्यावर खेळणे, नदीवर पोहायला जाणे, तिथल्याच नदीजवळच्या जागेत कधी गिल्लीदांडू, डाबडुबली, कंचे कधी नदीतील मासे पकडणे असे खेळात असू. दुपारी बंडूच्या घरी बंगळीत झोके घेणे, बैठकित बसून काही जे मिळेल ते वाचणे असे चालायचे. दुपारी मात्र दादी रोज जेवायला न चुकता रामभाऊ आप्पा/रमेशची माय किंवा पुंडकर काकांकडे कडे ताट व जेवायचे सामान घेऊन जायची तेव्हा मी देखील हमखास सोबत असायचो आणि त्यानंतर तेथेच झोप व्हायची. असे करत करत दिवस निघून गेले अमरावतीला जायचा दिवस आला. ओळखीचाच कोणीतरी अमरावतीला काही कामानिमित्य चालले होते त्यांच्या सोबत मी परत आलो पण मनाने मात्र माहोलीतच होतो. सारखी माहोलीचीच आठवण यायची पण काही दिवसांनी विसरलो. आता कयी येशीन ? या प्रश्नाला पुढच्या उन्हाळ्यात हे उत्तर देऊन आलो.

त्या नंतर पुढच्या उन्हाळ्यात मला माहोलीला जात आले नाही पण दादीच आमच्या घरी आल्या. मग काय ! मजाच मजा. इकडे शाळेला सुट्ट्या लागल्या नंतर काय दादी आणि मी. उन्ह्याळात आम्ही सर्व म्हणजे आई, बाबा, वैशू, दादी हे बाहेर अंगणात पलंगावर झोपत असू. संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत माझे मुलांबरोबर कधी लपाछपी, कधी क्रिकेट तर कधी कंचे चालायचे गिल्ली दांडू, पतंग हे मौसमी खेळ त्या त्या मोसमातच खेळले जायचे. नंतर सर्व घरासमोरच्याच मैदानात बसून गप्पा करीत असू. यात राजेश टांक, अनिल, संजय उमप, स्वाती काळे, संध्या सोनटक्के प्रशांत बोपर्डीकर वगैरे असायची. नंतर घरी येऊन हातपाय धुणे, जेवण व्हायचे. दादी सोबत माझ्या बाईमावशी ज्या आईची बहीण होत्या त्यादेखील आमच्यातच राहत असत, त्यांच्या गप्पा, कधी चौसर(एक बैठा खेळ) असे सुरु असायचे. त्यातलापहिला पो आणि दुसरा पो हे शब्द ऐकले कि मी मनमुराद हसत होतो कारण मलापोहा शब्द माहित नव्हता पण त्याचा उच्चार ऐकलं कि मला हसू आवारात नसे.

नंतर पुन्हा दिवाळीच्या सुट्टीत माहोलीला गेलो. बस मग काय नेहमीचीच दिनचर्या सुरु. थंडीचे दिवस असल्याने लवकरच रात्र व्हायची. रात्री घरातच दादीच्या गोष्टी ऐकून झोपणे. कधी श्रावण बाळ, कधी, कधी हिरण्यकश्यपूच्या भक्त प्रल्हादाची, सटवाई-बरम्या जे नवीन जन्मलेल्या बाळाचे भविष्य लिहिणाऱ्या देवांची, कधी रामायण तर कघी महाभारतातील गोष्टी. पुष्कळदा मी दादीला उन्हाळ्यात रात्री बाहेर झोपतांना आकाशातील दिसणाऱ्या ताऱ्यांबद्धल विचारायचो तर दादी बुढीच खटलं, सप्तऋशी, आकाशात स्थिर असणाऱ्या अढळपद मिळविलेल्या ध्रुवताऱ्याबद्धल, मच्चीन्द्रनाथ, गोरखनाथ वगैरे नाथांबद्धल अशा तिला माहित असलेल्या कथा सांगायची. क्वचितच तुटणार तारा दिसायचा तर मी लगेच दादीला विचारायचो, तसेच बऱ्याचदा एखादा तारा अगदी एकटा असाच जातांना दिसायचा त्याबद्धल , चांदण्याबद्धल असे अनेक प्रश्न विचारायचो तर मला दादीला माहित असलेल्या माहितीनुसार मला सांगायची. या नंतर मला याचा उपयोग पुस्तके लिहितांना झाला.

दर गुरुवारी दर्यापूरला बाजार असे. हा बाजार नंतर आमच्या गावात दर मंगळवारी सुरु झाला. आप्पा दर गुरुवारी बाजाराला जायचे व येतांना भात्क्त (खाऊ) आणायचे त्यातली एक पुडी वीनूकाकाकडे तर एक आमच्याकडे द्ययाचे. हा खाऊ म्हणजे छान म्हणजे पापडी, बारीक शेव, कसले तरी छोटे दाणे, शेंगदाणे याची मिसळ असायची. चिवडा व पेढे. मग दादी पुरवून पुरवून मला दयायची. याची चव मला इतकी आवडायची कि अजुनही मला तोच चिवडा व पेढे आवडतात. नंतर गावातच बाजार सुरु झाल्याने मी देखील बाजारात चक्कर टाकायचो. हा बाजार आमच्या पुऱ्यातच(घरांच्या समुहाच्या परिसरात) गोपाळपुरी लगत रिकाम्या जागेत भरायचा. यात सर्वच म्हणजे भाजीपाल्या पासून ते आरसे डबे, बांगड्या, ते एकाकडेला मटणाचे दुकाना पर्यंत असायचे. मी ते पाहत पाहत सांध्यकाळी नदीत पोहायला जायचो. मित्रमंडळी देखील सोबत असायची. नदीत जाऊन मनसोक्त डुंबणे, लहान अथवा मोठया डोहाच्या टेकडीवर जाऊन डोहात उडी मारणे हे चालायचे.

दुपारी झोपुन झाल्यावर दादी घरी येऊन चहा करायची व माझ्यासाठी दुध. मी तिथेच बसला असायचो व चहा आणि दुध सोबतच व्हायचे. एकदा मी दादीला म्हटले मला पण चहा पाहिजे. दादीला माहित होते कि माझी आई मला चहा अजिबात देत नव्हती पण दादीने मला कोणाला न सांगण्याच्या अटीवर थोडासा चहा दिला. मग मला तो रोजच लागायला लागला. एकदा दादीने चहा देण्यास मनाई केली तेव्हा मी दादीवर रागवून बाहेर पळून गेलो. दादीने मला खूप शोधुन नंतर मी तिच्या दृष्टीस पडलो व तिने मला घरी नेऊन चहा दिला.

एकदा संध्यकाळी नदीत पोहत असतांना दुरवर भुवनाच्या आखरात १०-१२ गाईंचा कळप चरताना दिसला. बंड्याला मी विचारले त्या गाई कोणाच्या?तर त्याने सांगितले त्या कोणाच्याच नाही तर देवगाई आहेत. मी म्हटले चला पकडू या वर त्याने सांगितले त्या पकडू देत नाही अन हात जरी लावायचा प्रयत्न केला तर मारायला मागे धावतात. या वर मी चूप बसलो.

बाराही महिने वाहणारी नदी असल्यामुळे दर उन्हाळ्यात नदीकाठी असलेल्या रेतीत खरबुज, टरबुज , काकडया याच्या वाडया लागायच्या. मग कधी वाडीत जाऊन लहान असल्यामुळे एखाद खरबुज किंवा टरबुज मागत असे. पुष्कळदा घरीच आलेल्या माणसाकडून एका पायलीच्या बदल्यात दादी या पैकी खरबूज/टरबुज घ्यायची. अशा प्रकारे खाण्याची काहीच कमतरता नसायची. नदीच्या दुसऱ्या बाजुला भुवनाचे मोठे आखर होते. त्याच बाजुला वर मोठया डोहाच्या वरच्या बाजुला कुंभाराचे कौल बनवायचे काम चालायचे, ऊन्हाळ्यात ते कळशी, घागरी, मडके वगैरे बनवत व सर्व गावात ह्याच कळश्या, घागरी, मडके वगैरे विकत. त्यानंतर पहिल्यांदा मी गावात उंट पहिले. उन्हाळ्यात राजस्थानामधून काठेवाडी लोक गावाजवळच्या परिसरात मुक्कामी असत व गावातील लोक त्यांना स्वतःच्या शेतात रात्री मुक्कामी ठेवत जेणे करून जनावरांनी टाकलेली विष्ठा शेतातच राहुन सेंद्रिय खत तयार होत असे असा हा कार्यक्रम दर उन्हाळ्यात चाले . नदीवर ते लोक संध्याकाळी पाणी पिण्यास जनावरांना आणत. एकदा घराच्या चौकात झोपलो असतांना सहजच नजर नदीकडे गेली. जेंव्हा रामभाऊ आप्पाचे घराच्या अंगणाचा दरवाजा उघड असे तेंव्हा चौकातुन नदी सरळ दिसे. तेंव्हा ते प्राणी माझ्या नजरेस पडले . मी लगेच दादीला आश्चर्याने विचारले ते काय दिसते तर दादी म्हटली ते उंट आहे. मी उंट फक्त पुस्तकात पाहिले होते. लगेच नदीकडे मी धाव घेतले व जिवंत उंट तेंव्हा पहिल्यांदा पहिला.

नेहमीच पोंगापंडित, बुढीके बाल, आईसकांडी, आरसे डबलेवाले गावात चक्कर टाकून जात. विनूकाकाकडे कपडे घरी नेऊन परत धुऊन आणन्या करिता गोदावठठीन यायची. अगदी घराच्या अगदी खालच्या बाजुला मधुकर लहाने हे आपल्या कुटुंबासहित राहत. त्यांची आई पिसा आजी किंवा पिसाबाई होत्या. त्यांचे मुलं अमोल, दिपा हे देखील सहा अथवा एक वर्ष असतील.

बऱ्याच वेळा गावात दवंडी होत असे. दवंडीवाला व त्याचा सोबती येऊन दवंडी पिटत. दोन भोंगे व एक वाजविणारा येऊन ग्रामपंचायत मधील सभेची, टाकीला पाणी येणार नाही किंवा काही महत्वाच्या घडामोडी प्रत्येक भागात येऊन ओरडून सांगत. असे ते गावभर फिरत. दवंडीवाले आले कि काही लहान मुले त्याच्या मागे फिरत. मराठी गाण्याची आवड मला गावातच निर्माण झाली. गावात लग्न असले कि अगदी सकाळीच भक्त गीते, भावगीते लागत. जसा जसा सूर्य वॉर चढत असे तेंव्हा मराठी चित्रपटाची गाणे लागत. त्यात बन्या बापू, दादा कोंडके व इतर मराठी गाणे लागत. हि सर्व गाणी मला मनापासून आवडत. त्यातल्या त्यात दादा कोंडकेंची. ती सुरु झाली कि गच्चीवर येत असे व मन लावून गाणी ऐकत असे सोबतच म्हणत असे. त्यातही एक शक्कल मी काढली होती. मामांकडे त्यावेळी रेकॉर्ड प्लेअर होते. रेकॉर्ड कशी लावावी हे मी नेहमी पाहत असे व हेच अनुकरण मी गाणे ऐकतांना करत असे.

मोठा बांबू घेऊन गच्चीच्या दोन भिंतीवर ठेवायचा. रेकॉर्ड संपत असे तेंव्हा काही वेळ नवीन रेकॉर्ड लावतांना लागायचा. त्या वेळेस काही वेळ तो बांबू एका भिंतीवरून काढायचा व अंदाज घेऊन पुन्हा भिंतीवर ठेवायचा म्हणजे रेकॉर्ड बदलल्याचा मला आनंद मिळत असे व नवीन गाण्याप्रमाणे त्या गाण्यावरच माझे गाणे सुरु व्हायचे. नंतर मला पुन्हा नवीन कल्पना सुचली . मातीचा रेकॉर्ड प्लेयर, सोबतच मातीचेच दोन मोठे स्पीकर, दोन्ही स्पिकरला दोरा ज्याचे एक टोक स्पीकर व एक रेकॉर्ड प्लेयर मध्ये घुसवले असायचे . नंतर मातीचीच दोन तीन रेकॉर्ड त्यावर छोटे छिद्र करायचो. रेकॉर्डप्लेयरला देखील मधात छोटी काडी व त्याच्या बाजूला धांड्या च्या पेरकुंडापासून बनवलेली पिन. गाणे सुरु करतांना पिन मातीच्या गोल तबकडीवर ठेवायची व संपली काढुन पेरकुंडावर ठेवायची जो पर्यंत नवीन गाणे लागत नाही. तर असा हा खेळ चालायचा.

नंतर क्रिकेट. आमच्याच गायवाड्यात मी सवंगगाड्यांबरोबर क्रिकेट खेळायचो. हा खेळ तिथे कोणालाच माहित नव्हता. अगदी बॅट, बॉल, स्टंप, षटक व इतर गोष्टी समजावून गारीचा (मोठा कंचा) बॉल, लाकडाची झिलपी (फळी) व तुरीच्या झाडाचा मुळाजवळचा जाड भाग हे स्टंप. मग चार रन, षटकार, एक, दोन धावा असे करून वेळ मजेत घालवायचो. दुपारी अनेकदा वाळलेल्या तुरटीच्या फांद्यांपासून बंडी, कमची (कापलेला बांबू ) व मध्ये मातीचे चाक असलेले गाड (आज प्लास्टिकचा खेळ ), बैल असे करून देखील वेळ काढायचो व नंतर पाच वाजले कि नदीवर पोहायला जाणे. हा असा कार्यक्रम असायचा. उन्हाळ्यात दुपारी दादी तिच्या शेजारणी सोबत कणकेच्या शेवाळ्या, मणी, पापडा असे करत बसायची त्या वेळी मी देखील अनेक वेळ तिथेच असायचो.

अशाच एका उन्हाळ्यात जेंव्हा मी दहा-बारा वर्षाचा असेल तेंव्हा विनूकाकाचे लग्न ठरले. माझ्या होणाऱ्या काकू थोडे दूर काकडा या गावी असलेल्या श्री मधुकर राव बोन्डे यांची मुलगी होत्या. हा खटला बराच मोठा होता. जवळपास तीन भावांचे कुटुंब एकत्र राहत होते. अतिशय मोठा वाडा , गाई , म्हशी, गडी माणसं यांचा बराच मोठा राबता होता. जवळपास दोनशे-अडीचशे एक्कर जमीन सर्व भावानं मिळून असावी. अतिशय नावाजलेला व श्रीमंत खटला होता. प्रकाशमामा, उमेशमामा व सुहासमामा असे जे अशी काकूंच्या भावांची जी नावे मला आठवतात ती मी लिहिली.

इकडे माहोलीत जवळपास दोन महिन्यापासून पत्रिका छापणे, लिहणे व पोष्टात टाकणे, बँड, मंडप, स्वयंपाकी ठरवणे सुरु झाले. नंतर सादारणतः लग्नाला २०-२२ दिवसांपासून पाहुणे येणे सुरु झाले. पूर्ण घर, चौक, वरच्या खोल्यामध्ये पाहुणे मंडळीपरिवारासहित आली होती. उन्हाळ्याचेच दिवस असल्याने सर्व पुरुषमंडळी हवेशीर गच्चीतच झोपत. रोज वापरायला लागणारे पाणी नदीवरून दोन ड्रम भरून घरचाच कोणीतरी माणूस बंडी घेऊन सतत आणत असे. पुष्कळदा मी देखील बंडीवर जात असे कारण नदीवर जातांना रस्ता खूप उताराचा असल्याने आमच्या भागाला वळसा घालून दुरून नदीवर जावे लागे . टेकड्यांचे गाव असल्याने बंदीतून छोटे छोटे टेकडे चढतांना आणि उतरतांना मजा वाटायची. मग नदीत छोट्या डोहावर बंडी उभीकरून बकेटीनी पाणी ड्रमात भरत असे. ड्रम भरले कि वापस.

इकडे माझ्या रामदास काकांचे मुलं छोटू, भारती, इसापूरच्या बेबी आत्याचे गाजू, प्रशांत , छाया ताई, माया ताई , पुसदचे बाप्पू , आत्या, बंडू, बेबी व बऱ्याच नातेवाईकांनी घर भरुन गेले. माझ्या आईला आणायला विनू काका गेले. ते ज्यादिवशी येणार होते त्या दिवशी मी आईची वरच्या खोलीत खिडकीत बसून आईची वाट पाहत होतो. मला घडयाळ जरी नाही तरी अंदाजे बस येण्याची वेळ माहित होती. सुरवातीलाच सांगितल्याप्रमाणे आमच्या गच्चीतून गावाचं नाही अक्खा दुरवरचा जवळपास तीन किलोमीटरचा प्रदेश दिसायचा. जशी बस मला स्टॅण्डवर थांबली दिसली तेंव्हा आईला येतांनाच पिवळ्या साडीत ओळखले. आईला पाहून जे घरातून पळत सुटलो कि एखाद किलोमीटर वर आईला पाहूनच थांबलो. हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आजही जशाच्या तसा उभा राहतो. त्यावेळेस गोदा वठठीन, नारायण म्हाली, शत्रूमामा( स्वयंपाकी) हे देखील नेहमी काम करणारे येत व काही तरी धान्याच्या रूपात मोबदला घेऊन कामे करीत.

देवकुंडी भरायचा दिवस मला चांगलाच आठवतो. रामभाऊ आप्पा ज्यांचे आमच्या अगदी घरालाच लागून घर होते त्यांच्या अंगणात देवकुंडी भरण्यात आली. सकाळी उठल्यावर वाजंत्रीचे सूर कानी पडले उठून जातो तर काय अगदी व्यवस्थित कपड्यांमध्ये वाजंत्रीवाले वाजवत होते . हि त्या प्रदेशातली अगदी गाजलेली 'श्रावण बँड पार्टी ' होती. अगदी कडक वाजवीत होते. नंतर गावाच्या वेशीवर असलेल्या मारुतीला पाटी (नैवेद्य/जेवण) नेणे झाले. नंतर पुसटसा आठवते ते गाडीत बसुन काकड्याला जाणे. पाहुण्यांची व्यवस्था गावातच मांडव टाकून केली होती. जवळच जमीन असल्याने पाहुण्यांना उसाचा रस त्यांच्याच कडे ऊस व गुऱ्हाळ असल्याने पाहिजे तितका जाऊन घेता येत होते. या नंतर मात्र काही आठवत नाही. एकदम आठवते ते रजनी काकू पुन्हा माहेरी जाऊन सासरी पहिल्यांदा आल्या. येतांना त्यांनी पेढे व चिवडा आणला होता. त्यात वैशू आणि भारतीची माझी काकू म्हणून चढाओढ. या नंतर काहीच आठवत नाही.

त्यानंतर जवळपास दिड-दोन वर्षांनी जेंव्हा परत माहोलीला असतांना मी विनुकाकासोबत दहिगाव (रेचा) तालुका अकोट, जिल्हा अमरावती येथे गेलो. हे गाव सातपुड्याच्या डोंगररांगात वसले होते. येथे श्री दासतीर्थ महाराज यांच्या नवीन तयार होत असलेल्या आश्रमाकरिता कौले न्यायाचे होते. काकांनी गावातीलच कुंभाराकडून कौले घेतली व बहुतेक साखरे यांचा ट्रॅक्टर सांगितला. माहोली ते दहिगाव हे अंतर ७० किलोमीटर असावे. साधारणतः दहावाजता ट्रॅक्टर घरी आला . सोबत ट्रॅक्टरचा मालक आता त्याचे नाव मला नाही आठवत, त्याचा एक सोबती, विनुकाका व मी ट्रॅक्टरवर बसुन अकोट मार्गे दहिगावला निघालो. खेडे गावात पहाटेला झाकट हा शब्द आहे. तर दादी, आप्पा व गावातले सर्व लोक हाच शब्द म्हणत कदाचित त्यांना सकाळ/पहाट हा शब्द माहीतच नसावा आणि आजही तोच शब्द वापरला जातो. दादीने जेव्हा मला म्हटले उद्या झाकटीत उठजो तेंव्हा मी विचारले कि झाकट म्हणजे केंव्हा तर दादी म्हणाली लय सकाळी तेंव्हा मी समजलो व झाकटीत उठलो आणि तयारीला लागलो.

उन्ह्याळ्याचे दिवस असल्याने विशेष अशी हिरवळ रस्त्याला नव्हती. थोडीफार रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, एखाददुसर शेतातलं झाड, बाई-माणसं तुरळक वर्दळ अशी काय ती होती. अकोट बस स्टॅन्ड वर चहा फराळ होऊन साधारणतः दिड वाजता दहिगाव लागले. जसे महाराजांच्या आश्रमाकडे जाऊ लागलो तशी तशी झाडे झुडपं दिसायला लागली आणि समोरच सातपुड्याची पर्वतरांगा. हे पाहुन मला आश्चर्य वाटले कारण असाच पर्वत मी मोर्शीला मामांकडे पाहायचो. तेंव्हा मला काकांनी सांगितले कि हाच पर्वत मोर्शीला देखील आहे. तिथे पोहचल्यावर दासतीर्थ महाराजांना पहिल्यांदाच मी पहिले. अगदीउंच, अंगात भरलेले व एक साध धोतर आणि उघडाबंब पण चेहेऱ्यावर एक तेज. नमस्कार चमत्कार होऊन महाराजांनी आम्हाला सर्वांना आश्रमात नेले व नंतर आम्ही तिथेच जेवण करुन जंगलात फिरायला निघालो.

पुष्कळ अंतर फिरल्यावर आमच्या लक्ष्यात आले कि अचानक आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेले व विजा देखील चमकत होत्या. आम्ही लगेच मागे फिरलो व कसेबसे न ओले होता आश्रमात पोहचलो. अचानक आश्रमात पोहचल्यावर पाऊस वेगाने व जोरानेसुरू झाला. जवळपास अर्धातास थैमान घातल्यावर पावसाचा जोर जरा कमी झाला तेंव्हा काकांनी म्हटले 'चला आता निघू'. तेंव्हा आम्ही रिकाम्या ट्रॅक्टरमध्ये बसलो. जातांना बाहेर आल्यावर महाराज आकाशात एकदिशेला बोट दाखवून म्हणाले 'आता येत नाही या इकडून निघून जाईल'. माझे या कडे लक्ष्य नव्हते पण जातांना काका गोष्टी करतांना म्हणाले कि खरोखरच ज्या दिशेने पाऊस निघून जाईल असे महाराज म्हणाले त्याच दिशेने पाऊस निघून गेला. आश्रम सोडून काही अंतर पार केले तर त्या ठिकाणी पावसाचा मागमूसही नव्हता. जिकडे तिकडे कोरडे उन्हाळ्याचे वातावरण होते. अशातच काही अंतरावर एक गुरुजी भेटले. औपचारिक रामराम झाला. काही अंतर गेल्यावर ड्रायव्हरने सांगितले या मास्तराने आपली बायको महाराजांच्या सेवेकरिता ठेवली आहे. नंतर आम्ही नेहमीच्या रस्त्याने न येता अकोट-अंजनगाव मार्गे संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस घरी पोहचलो.

आमचे गाव अतिशय धार्मिक आहे. येथे सर्व देव/देवता यांचे मंदिरे आहेत. अगदी आमचे कुलदैवत भवानी माता जे देऊळ गावातच म्हणजे अगदी थोडे दूर गावाच्या एका टोकाला. थोडे दूर साखरे वस्तीत मोठी गोपाळपुरी, तिकडून आमच्या वस्तीत येतांना थोड्या खोलगट भागात देवीचे मंदिर , नंतर आमच्या वस्तीत येतांना महादेवाचे उंचावर देऊळ, समोर गोपाळपुरी, त्याच समोर गणपतीचे मंदिर, गावात येतानाच हनुमानाचे देऊळ असे व इतर जे आठवत नाही असे अनेक. गोपाळपूरी मध्ये विठ्ठल मंदिर, त्याला लागुनच मोठे पक्के आच्छादन, त्याच्या समोरच चारही बाजुने रेती टाकलेले मैदान, डाव्या बाजुला बगिच्यात जाण्यासाठी जरासे मोठे दार त्यातुन बगिच्यात प्रवेश करता येत होता. एका बाजूला विहीर, मोठे अगदी खालपर्यंत पारंब्या आलेले वडाचे झाड आणि अगदी जवळुनच वाहणारी चंद्रभागा नदी. नदीला बाराही माहीने भरपुर पाणी असे.

गावातील सर्वच लग्न गोपाळपुरीला होत. इतर वेळेस बहुतेक हिवाळ्यात काकड आरती, सप्ता, किर्तन -भजन व इतर धार्मिक कार्यक्रम चालत. एकदा अशीच गावात गोपाळपुरी जवळच्या नदीच्या काठा जवळ पात्रात 'अमर ज्योती सर्कस'आली होती. जवळपास महिनाभर सर्कस मुक्कामी होती. रोज संध्यकाळी घोड्या समोर बँड वाजवीत सर्कसवाले खेळ सुरु होण्याचा प्रचार करीत हिंडत व संध्याकाळी गावातली लोक अगदी लहानग्यांपासून ते वयस्क सर्कसीला हजेरी लावत. आजूबाजूच्या खेड्यातील जशी नरदोडा, कान्होली येथुन देखिल लोक येत. सर्कशीत सर्व प्राणी, सायकल चालवण्याचा थरार, ध्वनिफितीवरील नाच, विदूषकांच्या गमती अशी भरपुर तीन तास करमणुक असे.

गावातुन दोन वेळेला पंढरपूरला पालख्या निघतात. पहिली कार्तिक महिन्यात आणि दुसरी उन्हाळ्यात आषाढी एकादशीला. ह्या पालखी सोबत गावातील अनेक लोक अनवाणी पंढरपुरला जातात. मोठा उत्सव पालखी निघण्यापूर्वी देवळात असतो. यात अखंड हरिनाम सप्ताहभागवत, हरिपाठ, भजन-किर्तन असे कार्यक्रम चालतात. सर्व गाव भक्तीभावात विलीन होते. हे सर्व मी लहानपणी अनुभवले व आता क्वचितच जाणे असल्याने मी या गोष्टीला मुकलो.

या नंतरच हिवाळ्याच्या सुरवातीला किंवा मधात गावात यात्रा भरते. यात अनेक आसपासच्या गावातील लोक आपले दुकाने थाटून बसतात. अगदी अनेक प्रकारचे म्हणजे पेपरमिंटच्या विविध गोळ्या, पुंगी, खेळणे, गाय, बैल, शेतीउपयोगाचे अवजारं, लहान मुलामुलींचे कपडे, स्त्रीयांचे बांगड्या, बिन्द्या , नकली दागिने या प्रकारच्या अनेक वस्तू विकणारे असत. नंतर एका विशिष्ट दिवशी चार चार बासे उंचीवर मांडव टाकल्या जायचा. मग त्यावर चढुन लोकांकडे प्रसाद फेकायचे जो अतिशय भक्तीने लोक गर्दी करून गोळा करायचे. यात्रेतच कुस्तीचे सामने भरत. हे सामने नदीच्या दुसऱ्या काठावर असलेल्या फतेपुरीच्या मोठया आखरात भरत. मी तिथे असतांना विनुकाकांनी देखील सामने प्रायोजित केले होते.

शुक्रवारला गावाजवळच्याच गावात म्हणजे कान्होलीला देखील बाजार असे. दौलत भाऊ दर शुक्रवारी संध्याकाळी त्या गावातुन मटण आणत . एकदा मी त्यांना विचारले कि मी तुमच्यासोबत येऊ का?तर त्यांनी उत्तर दिले तईले (दादी)पुस. गावात दादीला 'तई' म्हणजे ताई असे सर्व म्हणत. दादीने परवानगी दिल्यावर मी दौलतभाऊ सोबत निघालो. कान्होलीला जायला नदी ओलांडावी लागे. पहिल्यांदा नदी ओलांडली, नंतर फतेपुरीच आखर, नंतर जरासे मोठे जंगल व शेवटी कान्होली व परत महोली. असा हा जवळपास २ किलोमीटरचा जाण्या-येण्याचा प्रवास असावा.

मध्यंतरी रामदास काका दर्यापुरला स्थायिक होण्यास निघून गेले. पहिले सांगितल्याप्रमाणे दर्यापूस हे केवळ सहा किलोमीटरवर होते. तेथे प्रथम काकांनी स्वतः साठी खोली घेतली. आप्पांसोबत एकदा मी खोलीवर गेलो. काका पटवारी असल्याने तेथुनच त्यांना नोकरी करणे सोयीस्कर पडे. जाऊन येऊन ते शेतीकडे लक्ष देत. हळुहळू त्यांनी 'कापुस संकलन व प्राक्रिया'(. काढलेल्या कापसापासून कापसाच्या गाठी बनविण्याचा उद्योग. )या जागेत घर घेतले व रमाकाकूंसोबत मुलांसहित राहू लागले. काकांची चार मुले मोठा देवेन्द्र, मधला किशोर, त्यानंतर मुली भारती व वर्षा. यांची वये उतरत्या क्रमाने आहेत. काका खास मटण बनिवणारे. आता दर्यापूरला जर मी गेलो तर कधी कधी मटणाचा योग येतो. मंटी कश्याप, आप्पा कोतवाल हे माझे तेथील क्रिकेट खेळणारे मित्र.

दर्यापूरला केवळ बस स्थानकच नाही तर एक रेल्वे स्टेशन देखील होते. शकुंतला एक्सप्रेस हि छोटी अरुंद तीन डब्ब्यांची गाडी लोखंडी रुळावरून मुर्तिजापूर ते परतवाडा या दरम्यान धावत असे. यावर दर्यापूर येथे एक इंग्रजांनी बांधल्याकाळातला चंद्रभागानदीवर लोखंडी पूल होता. खालून दुथडी भरून वाहणारी नदी व भोवती फक्त शेती असे मस्त व करमणारे वातावरण असायचे तसेच नदी बाराही महिने वाहणारी असल्यामुळे तेथे केंव्हाही जायला मजा यायची. तसेच बसस्थानका जवळच रेल्वे स्टेशन असल्याने मी देखील माझ्या भावांसोबत तेथे जात असे. येथुन थोडया दुर (२ कि. मी. ) अंतरावर अपघाताने मेलेल्या व्यक्तीच्या शरीराची चिरफाड होत असे तेवहा पुष्कळ गिधाडे, घारी वगैरे मांसाहारी पक्षी आकाशात घिरट्या मारीत असत. एकदा असेच आम्ही दुपारच्या वेळी तिथे गेलो असता एक चेहऱ्याने उग्र, लाल डोळे असणारा माणुस घरात काही तरी मोठ्या सुरीने कापत असलेला पहिला. त्याला पाहून आम्ही सर्व जे पळालो ते थेट घरीच थांबलो.

दर्यापूरला काकांच्या घरापासून रेल्वे पुलाच्या बरेचसे अंतर दुर नदीच्या एका बाजूला आशा-मनीषा देवीची मंदिर होते. येथे नवरात्रांत यात्रा भरत असते. देऊळ देखील एकांतात आहे . बरेचदा आम्ही तिथे भटकायला जायचो.

माझी मावशी व काका दर्यापूर व कोकर्ड्याला शिक्षक होते. त्यांचे राहणे १०-१५ वर्ष दर्यापूरलाच सांगळुदकर नगर येथे होते. येथे देखील मी मोठा झाल्यावर अनेक दिवस मुक्कामी जायचो.

काका, मावशी, त्यांच्या मुली शिल्पा, स्वाती मुलगा अभिजित यांच्या सोबत मनसोक्त फिरायचो. जवळच मोठे पाण्याने भरलेले डबके होते. तेथे पाण- कोंबडया आणि विविध पक्षी असायचे. त्यांची धनुष्यबाणाने शिकार करायचा प्रयत्न करायचो. उन्हाळ्यात गच्चीवर झोपणे चालायचे.

दर्यापूर-माहोली हा सहा किलोमीटरचा बंडी, छकडे क्वचित S. T. असा प्रवास होता. आता हाच प्रवास सायकल, मोटरसायकल, ऑटो या द्वारे होतो पण लहानपणी याच सोयी होत्या. एका उन्हाळ्यात माहोलीला असतांना मी चार किलोमीटरवरील लेहगाव येथे दुपारी भर उन्हात गेलो. काय तर फक्त रेल्वे स्टेशन व गाव पाहायचे. तेव्हा पायीच जावे लागायचे. शेवटी एकटाच निघालो. मस्त आजूबाजूची शेत, क्वचित दिसणारे माणसे असे करून शेवटी लेहगावला पोहचलो. लहानसे स्टेशन, तुरळक लोक, पोंगपंडित, गोळ्या, बिस्कट, बिड्या विकणारे, बसलेले असे पाहायला मिळाले. नंतर संध्याकाळी घरी आलो.

आई व बाबा माहोलीला आले कि अनेकदा माझे कापुसताळणीला जाणे होत असे तसेच प्रत्येक लग्नात आम्ही तेथे जात असू. कापुसताळणी हे गाव माहोली पासून अदमासे ५० किलोमीटर आहे. तेथे जायचे म्हणजे पूर्वी शकुंतला एक्सप्रेस किंवा बंडी, छकडे हेच साधने होती. कापूसतळणीला माझ्या वडिलांची बहीण म्हणजे माझी आत्या होत्या. त्यांचे पती म्हणजे भाऊराव चिमणाजी चोरे. आत्याचा चांगले मोठेजात घर, मध्ये मोकळी जागा पुन्हा मोठी बैठकखोली, मधात आंगण असा थाट होता. घरासमोर पुन्हा प्रशस्त मोकळी जागा, त्यात विहीर, पुढे गायवाडा, घराला मोठे प्रशस्त किल्लेवजा दरवाजे असा थाट होता. आत्याला मुले नानाकाका, सुभाष व एक मुलगी असे होते. आत्याची मुले बंडू, राजू व मुलगी नलिनी हा सर्व परिवार तेथे राहत असे. पहिल्यांदा रेल्वेने आम्ही गेलो. गाडीला कोळशाचे इंजिन असल्याने व मी खिडकीत बसलो असल्याने सर्व चेहरा गाडीतून उतरल्यावर धुराने काळा दिसत होता. न्यायला स्टेशनवर दोन छकडे आलेच होते. दुतर्फा चांगली बहरलेल्या तुरीची झाडे पाहून हर्षोउल्हासीत होऊन मी दुतर्फा रांगांमधून पायीच छकड्याचा मागे चालत होतो. शेवटी आत्याच्या घरी पोहचलो. दुसऱ्या दिवशी बंडू, राजू, बिट्टिताई यांची ओळख झाली व समवयस्क आमची मैत्री लगेच जमली.

येथेही खूप खेळलो व अनेक गावातीलच जुन्या मंडळींना पाहता आले जसे आठवणारे देऊळ व त्यातील भट आणि अजून इतर पण अस्पष्ट. गावातूनच बसस्टॅन्डवर जायला रास्ता होता. तिथे असेच काहीतरी विकणारे पोर, पण बिड्या विकणारे काही. येथे विशेष सांगायचे म्हणजे ख्रिश्चनांनी त्यांची अनुयायी बनविलेला आदिवासी, बौद्ध व इतर मागास समाज लक्ष्यात घेण्याजोगा होता. खूपदा कापुसताळणीला गेल्यावर मला इसापूर, काकडा येथे जायला मिळाले. इसापूर, काकडा हे कापुसतळणी वरून साधारण ५ किलोमीटर व इसपूर ते काकडा हे १ किलोमीटर इतके आहे. बाबांसोबत एकदा दुपारी सायकलनी आम्ही दोघेही गेलो. येथे माझी बेबी आत्या राहत होती त्यांचे पती डॉ. नानासाहेब रामराव ठाकरे. त्यांचे दोन मुले गजू, प्रशांत व मुली छाया आणि माया. आमच्या वयात फक्त काही महिने किंवा वर्ष इतकाच फरक असल्याने यांच्याशी लगेच गट्टी जमली. या गावात देखी अनेकदा नंतर गेलो.

जवळपास १९८० च्या दरम्यान बाबांनी अमरावतीत मोहन कॉलनीत घर बांधायला काढले. त्यावेळेस नाना आप्पा आमच्याच घरी म्हणजे घर बांधायच्या वेळेस मोहन कॉलनीत राहत असत. आता म्हातारपणामुळे ते व तात्या दोघेही थकले होते. असेच दहाएक वर्ष गेल्यावर ते पुन्हा माहोलीत रहावयास गेले. जवळपास १९८८ ते १९९० चा काळ असावा. दिवाळीला दोन दिवस बाकी असतांना बाबा ऑफिसमधून आले व आईला सांगितले कि दुपारी नाना आप्पा वारले व लगेच सर्वांना गावाला जायचे आहे.

गावाला पोहचल्यावर दुसऱ्या दिवशी अनेक नातेवाईक, पाहुणे आले. मी पाहिलं तर तात्या घराजवळच्या पायरीवर सुन्नपणे गलितगात्र बसून होते. जवळपास एक ते दिडच्या सुमारास चंद्रभागेच्यातिरी भुवनाच्या आखरात त्यांना अग्नी देण्यात आला. माझा हे सर्व पाहण्याच्या पहिलाच प्रसंग होता. नंतर सर्व झाल्यावर व इतर कार्यक्रम म्हणजे दहावा दिवस, तेरवी, गोड जेवण वगैरे हळूहळू घर रिकाम होत गेल. या नंतर सहा महिन्यांनी तात्या गेल्याचा निरोप मिळाला. पुन्हा तसाच प्रसंग. लोक बोलतांना बोलत शेवटी दोघेही एकमेकांसोबतच गेले एक उत्तरायण तर एक दक्षिणायन आणि खरोखरच तात्या मकरसंक्रातीच्या एक दोन दिवस नंतर तर नानाआप्पा दिवाळीत गेले.

आता गावात काका विनू राहतात तर रामदासकाका दर्यापूरला. दादी अमरावतीला येऊन जवळपास १९९९ ला अमरावतीच वारली. अश्याप्रकारे माझ्या एका पिढीतील लोक वारले पण त्यांनी केलेले प्रेम, संस्कार हे कायमचे मनात आठवण ठेऊन आहेत व म्हणून आठवणींना उजाळा देण्यासाठी हे पुस्तक लिहायला घेतले.

तर असे हे आठवणीतील गाव व याच आठवणी मी मनात जपून ठेवल्या. जेव्हा सांगाव्या वाटल्या तेंव्हा पुस्तक रूपाने आपल्यासमोर ठेवल्या. अतिशय समृद्ध असे मला बालपण, कुमारावस्था व तारुण्यात मला लाभले. आता माझ्या मुलाला हे मिळावे असे मला वाटते पण आता शक्य होत नाही. तरीही त्याच्या पुणे- अमरावती, माहोली दर्यापूर असा वर्षातून जाऊन त्याला मिळवून द्याचा प्रयत्न करतो. मला जाणीव आहे कि वडिलांचे बालपण हे त्यांच्या मुलाला कधीच मिळत नसते पण त्यात मुलाला त्याच्या दृष्टीने माझ्या बालपणीचा काळ त्याच्या बालपणात जागवायचा प्रयत्न करतो.

तसे तर धांडे या कुटुंबाच्या समूहातील आता बऱ्याचशा लोकांनी शेती, नौकरी , व्यवसायात, कलेत स्वताःला सिद्ध केले आहे व नवीन तरुण मंडळी करतात आहेत . त्यापैकी काही येथे देत आहे. व्यवसायाने काही नामांकित डॉक्टर, वकील, शेतकरी तर काही लेखक, स्वताःचा व्यवसाय, राजकारण करीत आहेत तर काहींनी कलेत नाव कमावले आहे. माझ्या नातेवाईक कुटुंबातील तरुण मुले तबला, गायन यात देखील आहेत.

वाचकांनी आपला पुस्तकाबद्धल अभिप्राय येथे कळवावा.

(मोबा.) ९८२२४०६९६७, इ-मेल : ashwpict @yahoo. com

टीप: पुस्तकातील काही चित्रे Google images वरून जे माझ्या आठवणींशी मिळते जुळते होते त्यावरून घेतले आहेत व (G ) असे दाखविले आहेत बाकी सर्व चित्रे खरे आहेत.