निर्भया- ६
दीपाने जेव्हा फार्महाउसमध्ये प्रवेश केला, तेव्हा ती भोवतालची भिंत आणि उंच वृक्षांनी वेढलेला विस्तीर्ण परिसर पाहून दचकली होती. तेव्हापासूनच तिची नजर बाहेर पडण्याचा एखादा दुसरा मार्ग शोधत होती.
या बंगल्याच्या मागच्या बाजूला एका जागी भिंत तुटलेली आहे, मागच्या दाराने बाहेर पडून तिथून बाहेर निसटता येईल, हे जेव्हा ग्लास आणायला किचनमध्ये गेली, तेव्हा तिच्या लक्षात आलं होतं. ही भिंत मागच्या दारापासून अगदी कमी अंतरावर होती. ते तिघे बसले होते, त्या जागेवरून ती जागा दिसत नव्हती. ते गप्पांमध्ये दंग आहेत याची खात्री करून दीपाने आत जाऊन पर्स घेतली. बाहेर निसटण्यापूर्वी एकदा त्यांचं लक्ष आपल्याकडे तर नाही; हे पहाण्यासाठी तिने समोरच्या दाराआडून बाहेर त्यांच्याकडे नजर टाकली आणि तिचे पाय भितीने जमीनीला खिळले. ते तिघेही तडफडत होते! पोट धरून विव्हळत होते! त्या तिघांचा श्वास कोंडू लागला होता. ती धावत त्यांच्या जवळ गेली आचके देताना ते तिघे तिच्याकडे पाहू लागले..त्यांना अचानक तडफडताना पाहून ती घाबरली होती. तिची विचारशक्ती थांबली होती. काही क्षणांत त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यांना तिघांची अवस्था पाहून दीपाच्या डोळ्यासमोर अंधारी आली,आणि ती तिथल्याच एका खुर्चीवर बसली.
ती शुद्धीवर आली, तेव्हा ते तिघेही निपचित पडले होते. तिच्या लक्षात आलं, की इथून लवकरात लवकर निघालं पाहिजे. त्यांचे सैतानी विचार तिने ऐकले होते, त्यामुळे त्यांची अवस्था बघून तिला जराही वाईट वाटत नव्हते. पण भितीने तिचा घसा सुकला होता. निघण्यापूर्वी थंड पाणी पिण्यासाठी तिने आइसबाॅक्स उघडला. तोंडाला लावून त्यातलं पाणी ती पिणार, तोच तिचं लक्ष आत गेलंं. बर्फ वितळून झालेल्या पाण्यात एक पाल तरंगताना पाहून दीपा मागे सरकली. स्वतःला सावरत कशीबशी गेटकडे धावली. लटपटणा-या पायांनी कशीबशी किक मारून स्कूटर स्टार्ट केली. काही वेळातच ती मालाड पूर्वेतील तिच्या घरी होती. पुढे अनेक दिवस त्यांचे तडफडणारे, आणि नंतर निपचित पडलेले देह तिला सतत नजरेसमोर दिसत होते. घेरी आली नसती, तर त्यांना थोडी तरी मदत करता आली असती; अशी टोचणीही मनाला लागत होती पण त्यांच्या कर्मांचे फळ म्हणून देवानेच त्यांना ही शिक्षा दिली, असं तिच्या मनाला ती समजावत होती.
***
तीन तरुण एकाच वेळी तीन तरूण मृतावस्थेत सापडणं, हे पोलिसांच्या दृष्टीनेही एक मोठे कोडं होतं. जवळच्या आइस-बाॅक्समध्ये पाल तरंगताना दिसली; पण हे कोणी मुद्दाम केलं होतं, की अपघात होता, हे समजयला काही मार्ग नव्हता. नाही म्हणायला पावसामुळे झालेल्या चिखलात स्त्रीच्या सँडलचे ठसे दिसले. ते पंचनाम्यात नमूद करण्यात आले. पण ते फार्महाऊस मालाडच्या लोकवस्तीपासून दूर असल्यामुळे तिथे कोण आलं गेलं- हे कोणी सांगू शकत नव्हतं. महेश एका लोकप्रिय नेत्याचा भाऊ असल्यामुळे ही हाय प्रोफाईल केस होती. त्यामुळे पोलिसांनी कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते तिघेही श्रीमंत घरातील बिघडलेले तरूण होते आणि ते तीन मित्र सतत एकत्र असायचे, याव्यतिरिक्त अधिक माहिती त्यांना मिळू शकली नाही. त्या तिघांच्या घराबाहेरील आयुष्याविषयी गुरुनाथ आणि त्यांची पत्नी विशेष माहिती देऊ शकले नाहीत. कुठे जाता-येताना वहिनीला सांगून जायची त्याला कधी गरज वाटली नव्हती. नागेश आणि हरजीत त्याचे शाळेपासूनचे मित्र होते, ते घरीही येत जात असत, त्यामुळे दोघांना ती ओळखत होती, पण इतर कोणाला तो भेटत असे, कुठे जात असे... या प्रश्नाची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती. पोलिसांनी फार्महाऊसच्या आजूबाजूच्या दुकानदारांकडे, रिक्षावाल्यांकडे आणि टॅक्सी चालकांकडे चौकशी केली. पण तिथे असलेल्या स्त्रीविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही. पी. एम. रिपोर्ट्मधे 'पालीच्या विषाने मृत्यू' -असं कारण आल्यावर हा अपघात असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला, आणि तसा शेरा लिहून फाईल बंद केली.
***
काही दिवसांनी दीपाने राकेशला फोन केला आणि भेटण्याची विनंती केली. पूर्वीची मैत्री स्मरून त्यानेही भेटण्याचं कबूल केलं. ती दोघं त्यांच्या नेहमीच्या आवडत्या ठिकाणी भेटली.
"राकेश! झाल्या प्रसंगामुळे माझ्या आईला आणि नितीनला प्रत्येक ठिकाणी अपमान सहन करावा लागतोय. जे झालं त्यात त्या दोघांची काय चूक आहे? पण नातेवाईकांनी माझ्याबरोबर त्या दोघानाही जवळ जवळ वाळीत टाकलंय म्हण ना! मला माहीत आहे की, माझं शरीर आणि मन दोन्हींमध्ये पत्नीची कर्तव्ये पार पार पाडण्याची क्षमता नाही. पण माझी तुला विनंती आहे, की आपण दोघं केवळ उपचार म्हणून - जगाला दाखवण्यासाठी लग्न करूया. म्हणजे लोकांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. काही दिवसांतच मी पूर्वीसारखी होईन याची मला खात्री आहे." जगात मानाने जगलेल्या आईला आणि निरागस नितीनला आपल्यामुळे खाली मान घालावी लागते, याचं तिला किती दुःख होत होतं हे एखाद्या संवेदनशील माणसाला, बोलताना दीपाच्या डोळ्यात भरून आलेल्या डोळ्यांवरून समजलं असतं. पण राकेश संवेदना हरवून बसलेला स्वार्थी माणूस होता. तो म्हणाला,
" मी तुला आधीच सांगितलं आहे, की तुझ्याशी लग्न करणे मला शक्य नाही. माझे आई बाबा जुन्या वळणाचे आहेत. ते म्हणतात, " मुलीचं चारित्र्य काचेप्रमाणे असते काच एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. मुलीच्या चारित्र्याचंही तसंच आहे. तू कौमार्य गमावलं आहेस. जुन्या विचारांचे माझे आई-बाबा तुला सून म्हणून कसं पसंत करतील?"
" पण त्या दिवशी रात्री फिरायला जाण्याचा आणि एकांत जागी जाऊन बसण्याचा हट्ट तुझाच होता, हे तू त्यांना सांगितलं नाहीस का? लवकर निघण्यासाठी तुला समजावण्याचा, मी किती प्रयत्न केला, पण तू लक्ष दिले नाहीस. जे काही घडलं त्याला तू सुद्धा जबाबदार नव्हतास का?" दीपा कळवळून म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
" हे जरी खरं असलं तरीही आज जी परिस्थिती आहे, ती आपण नाकारू शकत नाही. त्यांची तरी काय चूक आहे?" राकेश तिची बाजू समजून घेण्याऐवजी जणू आईबाबांना पुढे करून स्वतःचे मुद्दे तिच्यासमोर ठेवत होता.
" तू तुझ्या आई-बाबांना समजावून सांगू शकत नाहीस का? तू खंबीर राहिलास, तर ते अडकाठी आणणार नाहीत. तुझ्यावरच्या प्रेमाखातर ते नक्की आपल्या लग्नाला परवानगी देतील. त्यांची समजूत घालण्याचा तू थोडाही प्रयत्न करणार नाहीस का?" तिने काकुळतीला येऊन विचारलं.
"त्याचा काहीच उपयोग होणार नाही याची मला खात्री आहे.माझे आई-बाबा तुला सून म्हणून पसंती देणार नाहीत. तेव्हा तुझ्या मनात जर आपले कधी लग्न होईल अशी आशा असेल, तर ती सोडून दे!" राकेश ठासून म्हणाला. आई-बाबांचे निमित्त करून तो स्वतःचेच विचार सांगतोय, हे दीपाच्या लक्षात आलं होतं, परंतु तिने त्याला मनोमन पती मानलं होतं. तो तिच्यावर किती प्रेम करत होता हे ती विसरू शकत नव्हती. " मी जर पराभव मान्य केला, तर राकेश मला कायमचा दुरावेल. जर राकेशला परत मिळवायचं असेल, तर त्याला धक्कयातून सावरायला थोडा वेळ द्यायला हवा. कधी ना कधी त्याच्या माझ्यावरच्या प्रेमाची सरशी होईल, आणि त्याचे विचार बदलतील. पुर्वी त्याने माझं प्रेम मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केलाय; आता त्याच्या माझ्यावरच्या प्रेमाची आठवण करून देण्यासाठी, मला प्रयत्न करावा लागेल." दीपा अजूनही आशावादी होती. आईसाठी ती हे अग्निदिव्य करायला तयार झाली होती, आणि आपल्या प्रेमाने आपण राकेशला परत मिळवू याविषयी तिच्या मनात शंका नव्हती. ती राकेशला म्हणाली,
"मी तुला मनोमन माझा पती मानला आहे, जर तुझ्या आई - बाबाना आपलं लग्न मान्य नसेल, तर लग्न न करता आपण एकमेकांशी एकनिष्ठ राहू या. चालेल तुला?"
तिचा हा प्रस्ताव म्हणजे राकेशसाठी पर्वणी होती. तो क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला,
" जर तुझी तयारी असेल, तर माझी काही हरकत नाही."
नाहीतरी असामान्य सौदर्य लाभलेल्या दीपाला कायमचं गमावावं, असं त्यालाही वाटत नव्हतं. गेलं वर्षभर दीपाची आठवण त्याला अस्वस्थ करत होती. तिला भेटावं असं त्याला अनेक वेळा वाटत होतं. पण तिच्याशी लग्न करून त्याला स्वतःचं आयुष्य दुःखी करायचं नव्हतं.
राकेशच्या स्वार्थी स्वभावाचे अनेक पैलू अजून दीपासमोर यायचे होते.....
***
contd. ..part. 7