निर्भया - ९ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

निर्भया - ९

                                       निर्भया- ९
        निर्मलाबाईंनी-  दीपाच्या   आईने    दरवाजा उघडला.  समोर   पोलीसांना   पाहून  त्या   थोड्या घाबरल्याच! 
       "काय झालं? तुम्ही- कशासाठी आला आहात साहेब?" तिने चाचरत विचारलं.
"मी  इन्स्पेक्टर  सुशांत पाटील. दीपा  इथेच रहाते नं? तिला जरा  बोलावून  घ्या."
"काय झालंय साहेब?" निर्मलाताईंनी विचारलं. त्यांचा आवाज थरथरत होता. 
" एका केसच्या संदर्भात  तिच्याशी  बोलायचं  आहे. "  सुशांत  म्हणाले. त्यांच्या स्वरात  पोलिसी   जरब   नव्हती , त्यामुळे निर्मलाताईंची भीती  थोडी कमी झाली.
   " ती झोपली आहे."  त्या  म्हणाल्या.
  " इतक्या उशिरा  पर्यंत?"  इन्स्पेक्टर   आश्चर्याने उद्गारले.
    "माझी  मुलगी - दीपा, रात्री   उशिरा   येते. ती  अंधेरीच्या 'अपोलो हाॅस्पिटल'मधे नर्स आहे. रात्री  घरी  यायला उशीर  होतो, आणि सकाळी उशीरा   उठते. तुम्ही बसा! मी तिला उठवते." असं म्हणून  निर्मलाताई  आत  जायला   निघाल्या.  सुशांतने त्यांना थांबवत  विचारलं, 
"काल दीपा किती वाजता घरी आली?" ती लिफ्टने  खाली येऊन परत  राकेशच्या घरी  गेली असावी,  हा संशय सुशांतच्या मनात होता. 
 " ती  आली तेव्हा मला  झोप लागली होती.  अकराच्या सुमारास  मला झोप  लागली, त्यानंतर        ती घरी आली. त्यामुळे मी नक्की वेळ सांगू शकत नाही. पण तुम्ही तिला विचारून खात्री करून घ्या." निर्मलाताईंनी लपवाछपवी न करता सत्य सांगितलं.
  इन्स्पेक्टर  पाटील सोफ्यावर बसले आणि हॉलचे  निरीक्षण करू लागले. हाॅल अत्यंत   छान सजवलेला होता. घरची परिस्थिती चांगली  दिसत होती. अभिरूचीही चांगली  होती.  भिंतीवर एका सुंदर  मुलीचा  फोटो लावलेला होता. त्यांची  त्या फोटोवरून नजर हटेना." किती सुंदर आहे! कोण   असेल  ही  मुलगी!"  ते विचार करू लागले. हीच  दीपा  असेल  का?  इतक्या  सोज्वळ   चेह-याची मुलगी राकेशच्या फ्लॅटवर त्याला भेटायला  जाते, इतक्या रात्रीपर्यंत तिथे रहाते---कसं शक्य आहे?
        थोड्याच वेळात निर्मलाताईंनी त्यांच्यासाठी चहा  आणला." ती   उठली   आहे. तयार  होऊन येईलच थोड्या वेळात!" त्या म्हणाल्या. इन्स्पेक्टर पाटील चहा  पिऊ  लागले. " छान  चहा  बनवला  तुम्ही!" ते निर्मलाताईंना म्हणाले. " खूप दिवसांनी आलं घातलेला घरचा चहा प्यायला मिळाला." ते मनापासून    म्हणाले. 
     "मुंबईत  एकटेच  रहाता  वाटतं ! तुमचं  कुटुंब कुठे  असतं?" निर्मलाताईंनी  चौकशी  केली. खरं म्हणजे  एवढा   रुबाबदार  इन्सपेक्टर   विवाहित  आहे, की  नाही, हे  त्यांना  जाणून  घ्यायचं  होतं. राकेशबरोबर दीपाचं लग्न  मोडल्यात  जमा होतं. त्यामुळे इतका देखणा तरूण दिसल्यावर त्यांच्या  मनात  आशा  पल्लवित   होणं  साहजिक   होतं. अर्थात  हे  सोपं नाही,  हे  त्यांचं अंतर्मन  जाणत       होतं. 
      "माझे आई बाबा कोल्हापूरला असतात. शेती सांभाळतात.  मी  नोकरीनिमित्त  मुंबईला  रहातो." एकलकोंडं आयुष्य जगणा-या सुशांतला त्यांच्याशी कौटुंबिक गप्पा मारताना आनंदच होत होता. आणि समोरच्या माणसाशी मोकळेपणाने  बोललं, तर ती व्यक्तीही हातचं  राखून न  ठेवता केसच्या संदर्भात  उपयोगी पडणा-या ब-याच महत्वाच्या गोष्टी सहज बोलून जाते, याउलट जर  पोलिसी शिस्त दाखवली तर समोरचा माणूसही गात्र आकसून घेतो, आणि तोलून-मापून बोलतो हा अनुभवही  त्यांना होता.
"तुम्हाला कधी आल्याचा चहा प्यावासा वाटला, तर नक्की  आमच्याकडे   या."    निर्मलाताई  एकीकडे विनोद  आणि दुसरीकडे आमंत्रण देण्याच्या स्वरात म्हणाल्या. केसची    चौकशी  करायला    आलेल्या विक्रांतना  सरळ सरळ  आमच्याकडे  ये  जा, असं सांगायला  त्यांना  संकोच   वाटत   होता. पण   तो मनमोकळा  तरूण  इन्सपेक्टर  त्यांना   मनापासून  आवडला होता.  खुनासारख्या   गंभीर  गुन्ह्यामध्ये  दीपाला  संशयित   मानलं   जातंय    याची  त्यांना  कल्पना  नव्हती.. नाहीतर  ते आपल्या घरात परत यावेत असं त्यांना कधीही वाटलं  नसतं. राकेशच्या   घरून  तडकाफडकी  लग्न कसं  मोडलं   होतं,  हे   त्या   विसरल्या   नव्हत्या;    पण    मनाचे    मनोरे रचण्यापासून कोणाला कोणी थांबवू शकतं का?
                          
       पोलीस आले आहेत असं  आईने  सांगितलं, तेव्हा दीपाने ओळखलं की सरबताने काम  चोख बजावलंय. पोलिसांना सर्व काही सांगून टाकायचं, आणि त्यांच्या स्वाधीन व्हायचं  असं तिने  ठरवलं, आणि बाहेरच्या  खोलीत  जायला  निघाली. पण तेवढ्यातच  तिला काॅलेजला  जायला   निघालेला  नितीन  दिसला. तो तिच्याकडे   येऊन   म्हणाला, "ताई!  महत्वाची परीक्षा  आहे. 'बेस्ट  आॅफ लक'     दे  मला!"  तो   दीपाला  म्हणाला.  तिने   त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला,आणि बाहेर  जाता-जाता थबकली, आणि विचार करू लागली,
"आज तरी पोलिसांना काही  सांगता  कामा  नये. नाहीतर  याचं   मोठं  नुकसान  होईल. हा परिक्षा    देऊ  शकणार  नाही. मी  गेले  काही  दिवस ज्या गोष्टीसाठी - नितीनच्या   शिक्षणासाठी,  अट्टाहास  केला,  तो  निष्फळ  होईल नाहीतरी  पोलीसांच्या तपासात सत्य  समोर येईलच. फक्त काही दिवस  जातील. तोपर्यंत याची  परीक्षा  संपलेली  असेल. त्यांनी शोधून काढलं नाही, तरी  मी त्यांना  सत्य   सांगेन. पण आज  नको." 
  तिने  हॉलमध्ये प्रवेश   केला.  इन्स्पेक्टर  सुशांत  तिच्याकडे  पाहतच  राहिले.  फोटोपेक्षाही  अनेक  पटींने ती सुंदर होती. चेह-यावर  सात्विकतेचं तेज होतं.    राकेशला   त्याच्या  फ्लॅटवर लग्नाअाधीच भेटणारी सवंग मुलगी  कशी  असेल---  याचं  चित्र त्यांच्या डोळ्यासमोर होतं. निर्मलाताईंचा निष्कपट स्वभाव  पाहिल्यावर,  "यांची  मुलगी  अशी असणं कसं शक्य आहे?"--- असा प्रश्न त्यांना पडला होता. पण दीपाचा शांत- सोज्वळ चेहरा पाहिल्यावर मात्र आपला तिच्याविषयीचा ग्रह चुकीचा होता याविषयी त्यांची खात्री झाली. 
      " मला  यांच्याशी  थोडं  बोलायचं  आहे."  ते   दीपाच्या आईला म्हणाले. आई उठून आत   गेली. दीपा समोरच्या  खुर्चीवर  बसली.
   "साहेब! काय काम  काढले  तुम्ही? काय बोलायचंय  तुम्हाला? हाॅस्पिटलमधे काही झालंय का?" तिने विचारलं.
 तिचा चेहरा इतका  निर्व्याज- भोळा भाबडा  दिसत होता इन्स्पेक्टरना तिला  प्रश्न  विचारण्यास संकोच वाटू लागला.
   "तुम्ही काल  रात्री गोरेगावला  गेला होतात का?
  " होय! राकेशने  मला  तिथे  बोलावलं होतं. अधून-मधून आम्ही तिथेच भेटतो. आमचं प्रेम आहे एकमेकांवर!  दोघांच्याही  घरून आमच्या लग्नाला परवानगी होती. लग्न करायचं ठरलं होतं."  दीपाने   निःसंकोचपणे उत्तर   दिले. पण  तिची मान खाली होती.
" तुमचं लग्न झालेलं दिसत नाही. लग्न पुढे  ढकललं  का?" सत्य वदवून घेण्यासाठी  सुशांतने  विचारलं.
      " आमचं  लग्न   काही   कारणास्तव  मोडलं. पण  तरीही  एकमेकांची  साथ  सोडायची   नाही,    असं अाम्ही ठरवलं  होतं. आठवड्यातून   एकदा आम्ही त्याच्या घरी भेटत  होतो. कृपया हे माझ्या आईसमोर  बोलू   नका.   तिला  यातलं  काहीही   माहीत   नाही." दीपा म्हणाली. 
    " ते  का  मोडलं? हे थोडं  वैयक्तिक आहे, पण विषय निघाला म्हणून विचारलं." सुशांतनं न रहावून चौकशी  केली. त्याला  आता  कुतुहल वाटू लागलं होतं. या  सुंदर  मुलीशी    ठरलेलं   लग्न   कोणीही  सहजासहजी  मोडणार  नाही. काय  कारण झालं असेल? 
   " त्याच्या   आई-वडिलांनी आमचे  लग्न मोडलं. " दीपा  म्हणाली.  तिच्या  आवाजात त्यांच्याविषयी    रोष नव्हता, तर  हताशपणा  होता     
      "लग्न मोडण्याचं काही मोठं कारण असेल नं? " 
  सुशांतने विचारलं. 
        "ते  तुम्ही  त्यांनाच  विचारलं तर बरं होईल!" दीपा   म्हणाली.  तिच्यावर   ओढवलेला   प्रसंग स्वतःच्या तोंडून त्या तरूण इन्सपेक्टरना सांगणं तिच्या जिवावर आले. 
     इन्सपेक्टर मात्र  थोडेसे  बुचकळ्यात  पडले. राकेशच्या  वडिलांनीही लग्न  मोडण्याचं कारण सांगणं टाळलं होतं." या गोष्टीचा छडा  लावलाच पाहिजे ! एवढं   मोठं    काय   सिक्रेट   अाहे,  ते  शोधायलाच हवं. कदाचित् त्यातच  या    केसची   पाळंमुळं लपलेली असतील." ते मनाशी म्हणाले.
"  पण  इथे कसल्या चौकशीसाठी आला  होतात,      ते  तुम्ही सांगितलंच  नाही. हाॅस्पिटलमध्ये  काही   झालंय  का? माझ्या मोडलेल्या लग्नाची चौकशी  करायला तुम्ही नक्कीच आला नसणार." दीपाने  कडवट  हसून विचारलं. जणू  काही  ती   तिच्या भूतकाळातील  वाईट  आठवणींवर हसून पडदा   टाकू पहात होती.
   "काल मी अर्धा दिवस सुट्टी घेऊन  निघाले होते. त्यामुळे नंतर काही झालं असेल तर मला  माहीत  नाही.
"हाॅस्पिटलमध्ये काही झालं नाही.राकेशचा काल  रात्री  खून  झालाय."  दीपाकडे  शोधक   नजरेने बघत सुशांत म्हणाले.तिची प्रतिक्रिया पहाण्याचा  प्रयत्न ते करत होते. ती काही बोलली नाही. पण   तिच्या डोळ्यात पाणी  तरळताना त्याला  दिसलं. तिच्या  डोळ्यात   पाणी  आलं   होतं   राकेशची     कटु   वचनं  आठवून! पण    सुशांतचा  वेगळाच समज   झाला.   त्याला   राकेशवरच्या    तिच्या  प्रेमाची  ती ग्वाही वाटली.  
       "मी  निघेपर्यंत चांगला होता तो! मी निघाले तेव्हा   मित्राशी   फोनवर  बोलत   होता. त्याच्या आवडीचं सरबत मी त्याला  बनवून  दिलं, आणि  तेव्हाच सुरेशचा- त्याच्या  मित्राचा   फोन  आला,  मला घरी यायला  खूप  रात्र होणार  होती,  म्हणून    मी    निघाले.   काय    झालं   त्याला?"  दीपाच्या आवाजात  कंप   होता. आपण   खोटं   बोलतोय,    हे   या  इन्सपेक्टरना लगेच  कळेल या भीतीने ती कावरीबावरी झाली    होती. पण सुशांतना वाटलं, अचानक्  एवढी  मोठी  बातमी  कळल्यामुळे ती हादरून गेली आहे, त्यामुळे ती थरथरतेय!
      "त्याच्यावर विषप्रयोग झाला. अत्यंत जहाल  विष त्याच्या पोटात गेलंय. कोणाला  मदतीसाठी बोलवायचीही संधी  मिळाली नाही  त्याला.तुम्ही तिथून   कधी   निघालात?"   तिच्याकडे   तीक्ष्ण नजरेने पहात त्याने विचारलं.
       "मी दहा वाजता निघाले. तो थांबण्याचा खूप आग्रह करत होता. थोडा अस्वस्थ  होता तो!  पण मला  घरी  यायला उशीर व्हायला नको म्हणून मी निघाले. आता  असं वाटतं की  मी  थांबायला हवं होतं." दीपा  पश्चात्तापाच्या स्वरात म्हणाली.
"कशासाठी  इतका अस्वस्थ  होता राकेश? त्याची आई  तर  म्हणत  होती,  की   तो  आनंदी स्वभावाचा तरूण   होता! अचानक् काही  झालं     होतं का?" वरवर  सहज बोलताना, तपासासाठी   काही धागा मिळतो का, हे सुशांत पहात होते.
      "त्याच्या मनाविरुद्ध त्याचे आई-वडील त्याचं लग्न ठरवत होते. आणि तो मात्र " वाटेल ते झालं  तरी,  तुझ्याशिवाय दुस-या  मुलीशी लग्न करणार नाही " ; असं  म्हणत  होता. पण  त्याच्या  घरून त्याच्या  लग्नाची तारीखही  नक्की  केली  होती.  त्यामुळे खूप दुःखी होता." दीपा अंतःकरणापासून राकेशचं जे  रूप  पाहू  इच्छित  होती; ती  तिची  इच्छा जणू शब्दरूप घेत होती.
तिचं  बोलणं  ऐकून, " राकेशने  निराशेच्या भरात आत्महत्या तर  केली  नसेल?" हा विचार सुशांतच्या मनात मूळ धरू लागला होता.
      " ठीक आहे! पण  या केसचा छडा लागेपर्यंत तुम्ही  मुंब‌ईबाहेर   जाऊ  नका.  तुम्ही  काल रात्री   राकेशबरोबर   होतात. त्यामुळे  पोलीसांचा संशय  बळावेल असं  काही  करू नका.गरज पडली  तर तुम्हाला   पोलीस   स्टेशनला   यावं  लागेल."  ते दीपाला म्हणाले. त्यांनी राकेशच्या आईशी एकदा बोलायचं ठरविलं.
दीपाच्या  घरून   निघून , विक्रांत   पोलीस  स्टेशनला आले. "राकेशविषयी  आसपास  काही चौकशी केली का?" त्याने मानेंना विचारलं. 
"होय साहेब! चॊकशी चालू आहे. पण अजून विशेष  काही  हाती  लागलं  नाही. पी.एम. रिपोर्ट उद्या मिळेल तेव्हा काही धागा मिळेल. शिवाय तो ग्लासही लॅबमधे पाठवलाय. तो रिपोर्ट संध्याकाळी मिळणार आहे.आज फक्त जबाब नोंदवायचे काम केलं आहे.  सध्यातरी यामागील एकमेव संशयीत   त्याला नेहमी भेटायला जाणारी ती मुलगी, दीपाच वाटतेय." मानेंनी त्यांचं मत सांगितलं. 
"आपल्याला इतक्या लवकर निष्कर्ष काढून चालणार  नाही. अजून तपास बाकी आहे." सुशांत  म्हणाले.  त्यांच्या डोळ्यासामोर  दीपाचा निरागस चेहरा  आला  होता. "तो जिथे नोकरी  करत होता,  त्या  कंपनीत  चॊकशी    करा. त्याच्या जवळच्या मित्रवर्गाशीही  थोडं  बोलून  घ्या. काही  ना काही   धागा नक्की सापडेल." त्यांनी मानेंना तपासासाठी सूचना दिल्या. 
   "इतके सगळे पुरावे असूनही दीपाच दोषी आहे, या आपल्या मताशी साहेब सहमत का होत नाहीत?" हे प्रश्नचिन्ह मानेंच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होतं.
                ******   contd.... part- 10