Maya Mahajaal books and stories free download online pdf in Marathi

माया महाजाल - mazya ghatasfotache event management

माझ्या घटस्फोटाचे इव्हेंट मॅॅनेजमेंट

अनिरुद्ध बनहट्टी

माझं चिंकीशी लग्न होऊन जेमतेम वर्ष झालं असावं; पण एव्हाना आम्ही दोघे अगदी एकमेकांना ओचकारून-बोचकारून जीव नकोसा करायला लागलो होतो, तशी चूक जेवढी चिंकीची होती, तेवढी माझी तसली तरी थोडीफार होती, हे मला मान्य होतंच ! कारण चिंकी पडली एकुलती एक श्रीमतं बापाची लाडावलेली मुलगी. आणि मी पडलो जरा मॉडर्न विचारांचा अन् फारसा श्रीमंत नसलो तरी हाय्यर मिडल क्लासमधला, अन् ज्याचे प्रॉस्पेक्ट अत्यंत ब्राइट्ट आहेत असा एक कूल, जेन-नेक्स्ट तरुण ! त्यामुळं मग आम्ही परस्पर संमतीनं वेगळं व्हायचं ठरवलं. अर्थात विथ म्युच्युअल कन्सेंट ! आणि मग आमच्या रिलेशनशिपमधलं टेन्शन सगळं खलास झालं. पुन्हा आमचं छान जमायला लागलं. भांडणं कमी झाली. एक दिवस - म्हणजे रात्री - असंच आम्ही प्रेम वगैरे करून झाल्यावर जरा रिलॅक्स झालो होतो, तेव्हा चिंकी म्हणाली, “टंपू, मी किनी सहाव्वीत होते नं, तेव्हाच ठरवलं होतं, की मला किनै निदान पाच-सहा लग्नं तरी करायचीच आहेत म्हणून !”

“रिअली चिंकी ? अमेझिंग !”

“हो, आता परवाच माझ्या एका आत्याच्या सातव्या लग्नाला आपण गेलो होतो नं, सन एन् सँड हॉटेलात, ती माझी लहानपासूनची रोल मॉडेल आहे!”

“ओ हो ! पण माझं तसं काही नव्हतं. मला तुझ्याशी लग्न झाल्यावर मग या मल्टिपल लग्नांमधली. गंमत लक्षात आलीय!”

“याऽऽ! माय ऑँट सेज की अफेयर्स म्हणजे किती मेसी प्रकार असतो ना ! लुक अ‍ॅट द स्कँडल ! ते स्कँडल, ते प्रेस इंटरव्ह्यूू. ते पार्टीजमध्ये जाऊन पब्लिकसमोर भांडणं, ओरडणं ! नोऽऽऽ! त्यापेक्षा डिव्होर्स म्हणजे कसं, अगदी क्लीन कट असतं!”

“हो ना ! आपलंच पाहा ना !”

“एकदा डिवोर्स ठरल्यावर किती छान चाल्लंय ना आपलं!”

“तेच तर ! परवा कॉस्मोमध्ये वाचलं ना मी ! ती रायटर होती ना, तिनं आपल्या तीन एक्स-नवर्‍यांबरोबर एकाच वेळी अफेअर कसं सुरू ठेवलं, अन् त्याच वेळी आणखी एक बॅचलर कसा पटवला, त्याची इतकी मस्त स्टोरी लिहिली होती हाऊ फनी !”

“रिअली ? उद्या दे मला तो कॉस्मो. मी पण वाचतो!”

“ओऽऽ! आयॅम् सो सॉरी ! तो जॉर्ज वांशिग्टननं चावून चावून फाडून टाकला ! मी फेकला कचर्‍यात तो !”

“चलता है ! बट जॉर्ज वॉशिग्टन हॅज गुड टेस्ट हं!”

“हो ना ! आहेच तो माझा प्रेश्शस ! रामुकाकांसाठी आपण मराठी पेपर आणि मॅगझिन्स घेतो नं, त्यांना कधी तोंडसुद्धा लावत नाही तो ! फक्त ‘एल’ आणि ‘कॉस्मो’ खातो!”

“ठीकै. चला, झोपूया आता. उद्या सकाळी आठच्या फ्लाइटनं पॅरिसला जायचंय मला. गुडनाइट! मममुवा !”

“गुडनाइट ! मममुवा!”

आम्ही गालाला गाल घूसन एअर किस केलं आणि झोपलो. जॉर्ज वॉशिंग्टन क्षणभर बेडरुमच्या दाराशी येऊन ‘भोऽऽभोऽऽ’ करून चिंकीला. ‘गुडनाइट’ करून हॉलमधल्या त्याच्या रगवर जाऊन पडला. जॉर्ज वॉशिंग्टन म्हणजे चिंकीचा बुल्डॉग - म्हणजे ‘पग’ - तो ‘हच’ जाहिरातीत असायचा ना, तसला !

चारपाच दिवसांनंतरचीच गोष्ट. मी जहांगीर आर्ट गॅलरीपाशी उभा होतो. माझा मित्र पारस मुंढवे याच्या चित्र-प्रदर्शनाचं आज उद्घाटन होतं. पण उद्घाटकच गायब झाला होता. त्यामुळे पारस चांगलाच टेन्शनमध्ये आला होता. इंग्रजी शिवीसारखी एम.एफ. अशी इनिशिअल्स असलेला एम.एफ. घुसेन नावाचा अनवाणी चालून प्रसिद्धी मिळवलेला एक चित्रकारण उद्घाटनाला येणार होता.

पारस मोबाइलवर कुणाशी तरी बोलत होता. त्याचा कॉल संपल्यावर मी पारसला म्हटलं.

“काय झालं ? येतोय का तो एम. एफ.?”

“नाही नं ! काल त्याला काही लोकांनी पिटलं म्हणे. काहीतरी देवी-देवतांची अश्‍लील चित्रं काढली म्हणून ! तर तो इतका घाबरला की परदेशातच पळून गेला !”

“हो ! मी पण ऐकलं होतं त्याच्याबद्दल. खूपदा मार खाल्लाय त्यानं. पण आधी पळून नव्हता गेला कधी!”

“हो नं ! पण ठीकै, अजून अर्ध्या तासात होईल उद्घाटन !

‘लाइटनिंग इव्हेंट मॅनेजमेंट’ची रश्मी माझ्या ओळखीची आहे, ती ‘फॅब इंडिया’ तून एक शबनम पिशवी आणि नाटकाचं सामान मिळतं, तिथून एक दाढी घेऊन एक भाडोत्री चित्रकार तयार करून आणतेय. त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या ऑफिसात असे ऐन वेळी रोल करणारे काही जण जयारच असतात. त्यातला एक खप्पड गाल असलेला आर्टिस्टिक टाइप तयार करून आणतेय ती ! चल, तोपर्यंत आपण ‘सामोव्हार’ मध्ये रशियन आम्लेट खाऊ!”

मी पारसकडे पाहिलं. गुबगुबीत चेहरा, तुकतुकीत गाल, थुलथुलीत ढेरी. तो स्वतः बिल्कुल आर्टिस्टिक टाइप दिसत नव्हता. पण सध्या त्याला पेंटिंगचा किडा चावला होता नं ! अन पैसा भरपूर ! मग काय, लगेच तो फेमस झाला चित्रकार म्हणून !

आणि आजकाल मॉडर्न आर्ट वगैरे निघाल्यापासून तर फेमस पेंटर बनणं अगदी सोपं झालंय ! पारसनं तर धमालच केली होती ! आपला वशिला वापरून लंडनच्या ‘सोथ बी’च्या लिलावात आपली पाच पेंटिंग्ज पाठवली. अन् लंडनला स्थायिक झालेल्या त्याच्या आते-मामे-भावाच्या थ्रू त्यातली तीन दहा दहा हजार पौंडांना खरेदी करवली ! हे तीस हजार पौंड अर्थात् पारसनं आपल्या त्या आते-मामे दूरच्या नातेवाइकाला पाठवले होते. पण त्याचा परिणाम गमतीदार झाला ! चित्रकलेच्या समीक्षकांनी अचानक पारसच्या कलाकृतींची स्तुती केली, आणि काय आश्‍चर्य ! त्याची उरलेली दोन पेंटिंग्ज वीस-वीस हजार पौडांना जेन्युइनली विकली गेली ! म्हणजे पारस कला जगतात पेंटर म्हणून, आर्टिस्ट म्हणून फेमस तर झालाच, शिवाय बोनस म्हणून त्याला दहा हजार पौंड फायदा झाला. पैशाकडे पैसा येतो, हेच खरं असावं!

मी ‘सामोव्हार’च्या दाराकडे तोंड करून बसलो होतो, आणि माझ्यासमोर दाराकडे पाठ करून पारस बसला होता. अगदी लक्षपूर्वक आम्लेटचा एक तुकडा गुंडाळून, त्यात काटा रोवून मी तो खाण्याकरता तोंडापाशी आणला, आणि समोर पाहिलं, तर माझं तोंड तसंच उघडं राहिलं. ऑम्लेट काट्यावरचं थिजलं. ‘सामोव्हार’चं दार मला एखाद्या चित्राच्या चौकटीमध्ये नवचित्रकलेसारखं चित्र नव्हतं, तर एखाद्या बिकिनी वॉलपेपरवर असते तशी गुलाबी हॉट पँट, त्यावर जाड काळा चामड्याचा पट्टा त्यावर ज्यात एक हिरा अडकवलाय अशी नाजुक बेंबी, आणि त्यावर निळसर रंगाची चिंधी बांधल्यासारखा डिझायनर टॉप, आणि त्यावर अगदी निरागस चेहरा अन् मोठे डोळे असलेली एक अगदी फे्रश दिसणारी तरुणी उभी होती. तिनं आमच्या टेबलावरच्या पारसला पाहिलं. आणि मान डोलावून ती थेट आमच्या टेबलापाशीच आली.

“हाय पारस !” ती पारसच्या पाठीवर एक मजबूत थाप मारीत म्हणाली. पारसच्या हातातला काटा त्याच्या हनुवटीवर टोचला, आणि तो “ओय ओय!” करीत तिच्याकडे वळला.

“ओ होऽ ! रश्मी !” पारस हनुवटी चोळीत म्हणाला.

ती त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली, आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, “हा ‘मॅडम तुसॉद’ मधला पुतळा कुणीआणलाय जहांगीर आर्ट गॅलरीत?”

त्याबरोबर मी भानावर येऊन झापड मिटलं आणि तिला “हॅलो !” केलं.

“हा माझा मित्र टंपू ऊर्फ अनिल गडबडे. हा आय.टी. इंजिनियर तर आहेच; पण कविता सुद्धा करतो. याची ‘लाइमरिक’ एकदा ‘प्लेबॉय’मधे छापून आली होती!”

“वाऽवा! पण हा तसा प्लेबॉय टाइप वाटत नाही. अर्थात तू देखील आर्टिस्ट टाइप कुठं वाटतोस म्हणा!” त्याच्या पाठीत आणखी एक धपाटा घालून त्याला कॉफीचा स्प्रे समोरच्या खुर्चीवर उडवायला भाग पाडून खदाखदा हसत रश्मी म्हणाली. बरं झालं, मी पलीकडे बसलो होतो. त्याच्यासमोर नव्हतो. मग दोन-तीन मिनिटांनी ठसका देणं थांबवून पारसनं ओळख करून दिली, “टंपू, ही रश्मी साखरे, ‘लाइटनिंग इव्हेंट मॅनेजमेंट’ची फाउंडर आणि प्रेसिडेंट. मग?”

तो रश्मीला म्हणाला, “झाली का माझ्या ‘इव्हेंट’ची मॅनेजमेंट?”

“होऽ! आणलाय ना उद्घाटक; त्याला आत सोडलंय, अन! तू कुठे दिसला नाहीस, म्हणून वाटलं की तू नक्की ‘सामोव्हार’ मध्ये चरत असणार ! म्हणून इथे आले!”

“बरं, काही खाणार का ?”

“नको, नको ! गॅलरीच्या आता शिरल्याबरोबर समोर तुझे जे चित्र दिसलं त्यानं भूकच गेली माझी!”

“हो!” मी रश्मीला दुजोरा दिला.

“फारच धक्कादायक आहे ते चित्र ! मलादेखील पाहिल्याबरोबर मळमळायला लागलं होतं ! ते पिवळ्या धमक रंगावर जांभळे ठिपके असलेलं, आणि मध्ये मठ्ठ रेड्याचं डोकं दिसतंय? तेच ना?”

“हो, तेच ! पण मला मध्ये रेडा नाही, माकड दिसतंय ! पिवळ्या धमक आणि जांभळ्या रंगानं बर्बटलेलं ! शीऽऽ ! याऽऽक्”

“हो ना ! आय अ‍ॅग्री इम टोटो,” मी म्हणालो.

“काय रे, पारस, नाव काय आहे त्या चित्राचंत्र”

“रोमँटिक मिस्टी मॉर्निंग!”

“बाप रे!” रश्मी म्हणाली.

“अरे होऽऽ !” ती एकाएकी काही तरी आठवून म्हणाली, “अरे, दोन चित्रामध्ये तुझी उलटी सही वरच्या कोपर्‍या दिसली मला ! मी सगळ्या अरेंजमेंट चेक करीत होते ना, तेव्हा ! चला, चला लवकर ! आपण आधी आत जाऊन ती चुकून उलटी लावलेली चित्रं सरळ करू या. आणि मग उद्घाटन करू पटकन ! माझ्या आर्टीस्टला आणखी दोन रोल्स करायचे आहेत आज !”

“ओके !”

“चला !”

आम्ही मग दोन्ही उलटी लावली गेलेली चित्रं सरळ केली, गुलाबी रिबिनीच्या पुढच्या मोकळ्या भागात ऑर्टिस्टिक लोकांची बरीच गर्दी जमली होती तिथे गेलो. कॉर्डलेस माइक हातात घेऊन रश्मीनं ‘इव्हेंट’चा ताबा घेतला. गर्दीत पत्रकार, एवढंच काय, मुख्य टिव्ही चॅनेलचे चक्क चार व्हिडिओ कॅमेरावाले पण थांबलेले होते ! वा ! पारसनं प्रसिद्धी यं.णेची सोय चांगली केली होती ! टिव्हीवर दिसण्याचा चान्स घ्यावा म्हणून मीदेखील पारसच्या खांद्याला खांदा लावून समोर गेलो.

“आजचे आपले उद्घाटक आहेत श्री. रामण्णा तडवेलकर!”

रश्मीनं आणलेल्या भाडोत्री खप्पड छरमाडानं एक दुबळा हात हलवला.

“त्यांची ‘फ्लाइट ऑफ थर्ड मूनस्टोन’ ही कलाकृती प्रसिद्ध आहे, आणि त्या कलाकृती प्रसिद्ध आहे, आणि त्या कलाकृतीवर लिहिलेली अनिरुद्ध यांची

अगदी थोड्या दगडांत

संपली माझी नक्षी

उरलेल्या कातळाचा

आभाळात उडाला पक्षी

ही कविता देखील प्रसिद्ध आहे. तसंच या कवितेचं बनहट्टी नावाच्या वात्रट लेखकानं केलेलं

दोन ओळी लिहीपर्यंत

स्टुडिओत पोचली टॅक्सी

दोन मिनिटांत गाणं तयार

मी तर आनंद बक्षी !

हे विडंबन देखील फार गाजलं होतं. पण या सगळ्याची सुरुवात या रामण्णांनी केली होती. मग रश्मीच्या दोन सुंदर असिस्टंट्सनी रामण्णाच्या हातात एक शॅपेनचा मॅग्नम दिला, अन् रामण्णानं एक्स्पर्ट बोटांनी बूच उडवून फसफसणारी शॅपेन त्याच्या भोवती जमलेल्या पेज थ्री क्लाउडनं वर केलेल्या फ्लूट्समध्ये, म्हणजे निमुळत्या चषकांमध्ये भरली. मग त्याच्या हातात कात्री देण्यात आली. तेव्हा त्यानं रिबिन कापली आणि तो चाळीस-पन्नास जणांचा घोळका आत शिरून शँपेनचे घोट घेत ते प्रदर्शन पाहायला मोकळा झाला. - अशी ही माझी रश्मीशी झालेली पहिली भेट ! मी ताबडतोब तिच्या प्रेमात पडलो होतो. अन् मला माहीत नव्हतं की लवकरच तिचा अन् माझा अगदी जवळचा आणि प्रोफेशनल संबंध येणार आहे म्हणून !

***

“डार्लिंग, घरी कधी येणारेस ?”

“हाय काय, निघालोच. पंधरा-वीस मिनिटांत येईन. कां बरं?”

“मग मी हिला थांबवते. ही रश्मी साखरे. आपल्या सेपरेशन पार्टीच्या अरेंजमेंटसाठी आलीय!” चिंकी फोनवर म्हणाली आणि मी उडालोच ! पारसच्या चित्रप्रदर्शनाला पाच-सहा दिवसच झालेले होते. आणि मी खूप वेळा रश्मीच्याच विचारात गुंग होत होतो. अन् आता तीच रश्मी साखरे आपल्यासमोर बसलीय असा चिंकीचा फोन आला होता. मी घाईघाईनं घरी परत आलो.

‘तीच ती !

अर्थात पार्टीच्या अरेंजमेंट्स-इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सगळं ऐकून तीच ती असणार हे मला माहीत होतंच ! पण तरीही प्रत्यक्ष रश्मीला तिथे बसलेली पाहून माझी जीव भांड्यात पडला. मला एकदम उत्साही आणि मस्त वाटलं, दिवसभराच्या कंटाळवाण्या कामाचा थकवा आणि ताण कापरासारखा उडून गेला ! राइट क्लिक करून मग ‘रिफ्रेश’ केल्यावर काँप्युटर स्क्रीन जसा थरारतो, तसा मी अंतर्बाह्य थरारलो आणि ‘रिफ्रेश’ झालो !

“ओहोऽ ! टंपू ! मला माहीत नव्हतं, तू असशील म्हणून !” गडबडे आडनावावरून कदाचित लक्षात आलं असतं; पण तुझ्या बायकोनं....”

इथे तिनं चिंकीकडे हात केला.

“...तिचं नाव चिंकी फुटाणे सांगितलं, त्यामुळे-”

त्यावर चिंकी इंग्रजीत म्हणाली, “मी कधीच बदललं नाही माझं नाव लग्नानंतर! कारण मी इच्छिते करू लग्न अनेकदा ! कशी शकते मी लक्षात ठेवू इतकी सगळी आडनावं?”

“हो ना !” रश्मीनं दुजोरा दिला. “नाही तरी लग्नानंतर नाव-आडनाव बदलणं म्हणजे अगदी रानटी प्रथा आहे ! अगदीच मिडल क्लास ! सो डाउनमार्केट ! टंपू, समजा, उद्या कुणी कुला जबरदस्ती केली, की बाबा रे, आजपासून तुझं नाव बदललं, आजपासून तुझं नाव जॉर्ज वॉशिंग्टन झालं ! तर तुला कसं वाटेल?”

“भोऽऽ भोऽऽ !” मी रश्मीच्या अंगावर भुंकलो आणि मला कसं वाटेल ते दाखवलं.

त्यासरशी रश्मी दचकून मागं सरकली.

“गंमत करतोय ग तो ! माझ्या डॉगीचं नाव जॉर्ज वॉशिंग्टन आहे ना, म्हणून ! बऽरं ! ते जाऊ दे ! लेट अस डिस्कस - अबाउट द ‘ब्रेक अप’ पार्टी !”

“याऽऽ !”

“मला तर ही ब्रेक-अप पार्टीची आयडियाच आवडली नाहीय !” मी म्हटलं.

“नो नो नो नो!” रश्मी म्हणाली. “इट्स नीडेड !” आवश्यकता असते त्याची. अन् आमच्या ‘लाइटनिंग इव्हेंट मॅनेजमेंट’ ची तर स्पेशालिटी आहे ब्रेक-अप पार्टीज म्हणजे तुमचं पोस्ट-ब्रेक-अप लाइफ खूप स्मूथ होतं आमच्या इव्हेंट मॅनेजमेंटमुळे!”

“बाप रे !” मी म्हटलं.

“याऽऽ !” चिंकी म्हणाली, “शिवाय माझ्या स्टेटसप्रमाणे मला राहिलं पाहिजे ना ? नाही तरी आमच्या डिवोर्सला एक कारण म्हणजे या टंपूला आपलं स्टेटस सांभाळता येत नाही हे आहेच ! चक्क ड्रायव्हरबरोबर गप्पा मारतो हा !”

“या - या - आय विल लुक इंटु इट ! तुमच्या दोघांचे लाँग इंटरव्ह्यू मी घेणारच आहे. त्यावरच मेन इव्हेंट प्लॅनिंग होईल !” रश्मी म्हणाली.

मग तारीख, वेळ, ठिकाण वगैरे ठरवण्यासाठी चर्चा सुरू झाली, आणि आमच्या ब्रेक-अप पार्टीची रूपरेषा आखली जाऊ लागली.

“आता चिंकीला आवडत नाही, म्हणजे ज्या ज्या गोष्टी तू बंद केल्यास त्याची आपल्याला एक लिस्ट करायची आहे,” रश्मी म्हणाली.

तिनं चिंकीची एकटीची स्वतंत्र मुलाखत घेतली होती, आणि तशीच माझी ही मुलाखत ती घेत होती.

“अं...” मी आठवायचा प्रयत्न करायला लागलो. पण काही आठवेच ना !

“सकाळी उठण्यापासून सुरू कर ! म्हणजे आठवेल.” रश्मीनं मार्ग सुचवला.

“हां !” मला लगेच आठवलं, “मला सकाळी दात घासताना घसा साफ करून व्यवस्थित गार्गलिंग केलं की दिवसभर स्वच्छ स्वच्छ वाटतं.”

“बरं, मग?”

“पण त्या प्रोसेसमधे फार भयानक, चित्रविचित्र आवाज येतात. ते चिंकीला बिल्कुल चालत नाहीत. त्यामुळे मी ते बंद केलंय. त्यामुळे अनेक दिवस मला फ्रेशच वाटलं नाहीय.”

“अरेरे ! चिंकीनं सांगितलं तुला तुझं घशाचं व्हॅक्यूम क्लीनिंग बंद करायला?”

“हो, आधी सांगितलं, अन् तरीही मी विसरून जायचो तेव्हा तिनं एकदा तिच्या मोबाइलवर ते सगळे चित्रविचित्र आवाज रेकॉर्ड करून मला ऐकवले. तेव्हा मी इतका चकित झालो ! माझा विश्‍वासच बसेना, की ते चित्रविचित्र आवाज इतके... अं... इतके... अं... इतके... आपलं... इतके... अं... चित्रविचित्र वाटत असतील म्हणून ! मग मी अगदी शरमून जाऊन ते बंद केलं.”

“हां ! व्हेरी गुड!” रश्मी काही तरी आपल्या डायरीत नोंदून घेत म्हणाली. इतक्यात माझ्या मनात एक कल्पना आली, आणि रश्मीला विचारलं, “आणि रश्मी, तू?”

“म्हणजे?”

“म्हणजे तू करते का गार्गलिंग आणि घसा साफ वगैरे, सकाळी ब्रश करताना?”

“अरे ! काही विचारू नकोस ! मला सुद्धा सकाळी घसा साफ केल्याशिवाय ताजंतवानं वाटतच नाही. उलट आमच्या घरी ती सगळे जण कलाकारच आहेत ! बाबा किराणा घराण्याचे, त्यांचा सकाळचा ‘घसा राग’ 15-20 मिनिटं तरी चालतो. मग आईचं सुगम संगीत, मग माझी हिंदी गाणी टाइप गार्गलिंग आणि मग माझा भाऊ, कॉलेजमधला, त्याचं रॅप - अशी रोज सकाळी तासभर तर आमच्याकडे ‘घसा मैफिल’च असते ! अरे, पण हे काय ? मी मुलाखत घेतेय तुझी, तू माझी नाही !”

“ओ ! सॉरी !”

“बरं, अजून पुढं ?”

“पुढं... अं... हां ! रविवारी मला ब्रश वगैरे न करता सगळे रविवारचे पेपर्स घेऊन सगळी क्रॉसवर्ड्स वगैरे सोडवून, सगळे जोक्स, कॉमिक स्ट्रिप्स, पिक्चरचे रिव्ह्यूज वगैरे वाचून मग साडेदहा-अकराला ब्रश करायचं असतं; पण चिंकीमुळं ते बंद केलं !”

“ओ!” नोंद करून घेत रश्मी म्हणाली,

“तू दर रविवारी सोडवतोस क्रॉसवर्ड्स?”

“हो !”

“मग आत्ता जो रविवार गेला ना, त्यातल्या म.टा.मधलं सोडवलंस?”

“हो! जरा कठीण होतं यावेळी !”

“तेच तर ! मला दोन शब्द आलेच नाहीत !”

“क्लू आठवतायत का?”

“अं...हं... आठवलं-

रे सरपटणारा प्राणी घुसला थाटात - म्हणून जागा बदलणे ? हा पाच अक्षरी शब्द होता !”

“हां - थारेपालट !”

“थारेपालट ? कसं काय ?”

“रे, सरपटणारा प्राणी - म्हणजे रे - पाल - ते ‘थाट’ मध्ये घुसलं - म्हणजे या आणि ट यांच्यामध्ये ‘रे-पाल’, आणि पूर्ण शब्दाचा अर्थ जागा बदलणे !”

रश्मीनं माझ्याकडे आदरानं पाहिलं.

“आणि दुसरा ?” मी विचारलं.

“अं...” ती आठवीत म्हणाली.

“हां... गुजराती आडनावाच्या मुलीची रात्री कसून तपासणी” हा शब्द चारअक्षरी होता.”

“हात्तिच्या ! - शहानिशा. शहा हे गुजराती आडनाव. रात्रीला समानार्थी मुलीचं नाव निशा. अर्थात पूर्ण शब्द शहानिशा. त्याचा अर्थ कसून तपासणी !”

ती माझ्याकडे अत्यादरानं पाहायला लागली. मला माझ्या चेहर्‍याच्या मागं दोनचार तेजोवलयं चढल्याचा भास झाला.

शेवटी एकदाची ती मुलाखत संपली. आपल्या नोट्स पाहत रश्मी म्हणाली.

“आता उद्या अगदी सकाळपासून तू चिंकीशी लग्नामुळं बंद झालेल्या सगळ्या गोष्टी करायला लागायचं ! तुमच्या ब्रेक-अप पार्टीला अजून पाचेक दिवस आहेत. त्यामुळं होतं काय, की ब्रेक-अपनंतरचा ट्रॉमा कमी होतो.”

“काय कमी होतो?”

“ट्रॉमा”

“अच्छा, अच्छा ! ट्रॉमा !”

“हं बरं, ही पाहा ही लिस्ट. सकाळी खूप आवाज करून गार्गलिंग करणे - पायजम्याऐवजी लुंगी घालणे. चहात बिस्किटं बुडवून बुडवून खाणे. किटलीतला मचूळ चहा न पिता स्वतः ‘अमृततुल्य’ मधल्या स्पेशल, गुलाबी चहासारखा चहा दोन मोठ्ठे मग भरून करणे आणि पिणे. हापूस आंब्याचे ‘डायसेस’ करून किंवा कासव करून बारक्या फ्रूट फोर्कनं न खाता सिंकपाशी उभं राहून चार-पाच हापूस आंबे एका वेळी माचून आणि कोयी चोखून, चेहरा-हात वगैरे बरबटून घेऊन खाणे. संडासला जाताना हेडफोन लावून...”

“अरे हो हो !” मी तिला थांबवीत म्हटलं, “मला वाचून कशाला दाखवतेयस हे सगळं ? मला तर माहीत आहे ना सगळं !”

“नाही, अजून काही राहिलं असलं तर आठवावं म्हणून !”

“ती लिस्ट दे मला. मी अ‍ॅड करीन काही आठवलं तर !”

“ओके!” ती म्हणाली,

“मी ऑफिसला पोचताच हा कागद स्कॅन करून मेलनं पाठवते. कारण तुमच्या इव्हेंटच्या फाइलला हा ठेवावा लागेल, ओरिजिनल !”

“ओके !”

“ओके, बाय ! तुझी ई-मेल आयडी आहे माझ्याकडे !”

“बाय !”

***

दुसर्‍या दिवशी मी मस्तपैकी खाकरून खोकरून, घशात हात घालून, टंगक्लीनर वापस्न चित्रविचित्र आवाजचं रेकॉर्ड ब्रेक केलं. मग चिंकी चहा घेत बसली होती, त्यातला न घेता चक्क किचनमध्ये घुसलो आणि दचकलेल्या रामूकाकाला, रामूकाका, तेरी मांका साकीनाका ही यमकबद्ध शिवी देऊन त्याला बाजूला केलं आणि फ्रीजमधून आलं, दूध वगैरे जमा करून मस्तपैकी चहा पत्ती उकळून उकळून शिजवून फर्मास चहा केला.

बाहेर चहाचे दोन मोठे मग घेऊन आलो, तर चिंकीनं पण स्वातंत्र्य उपभोगायला सुरूवात केलेली दिसली ! ती मस्त हॉलमध्ये दिवाणाखर चेहर्‍यावर चिखलासारखं दिसणारं काही तरी थापून डोळ्यांवर काकड्या लावून पडली होती. अशा प्रकारे आम्ही आमचं लग्नाआधीच स्वातंत्र्य उपभोगत चार दिवस मजेत घालवले. रश्मी येत होतीच. रोजच. तिची आणि माझी चांगली गट्टी जमायला लागली होती. आणि मग सरते शेवटी ती ब्रेक-अप पार्टीची संध्याकाळ उगवली !

***

सगळे उच्चभ्रू लोक त्यांच्यात आता मी देखील मोडत होतो - स्कॉच रिचवून खात-पीत-नाचत होते. मग रश्मीनं तिचं ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ सुरू केलं. माइकचा ताबा तिनं घेतला. संगीत बंद झालं. मग पार्श्‍वसंगीत म्हणून ‘व्हाय-डिड-यू-ब्रेऽऽक माय हर्ट व्हाय-डिड-वी-ड्रिफ्ट‘अपार्ट’ आणि तत्सम गाणी सुरू झाली. मग रश्मीनं एक मस्त सेंटीसेंटी घोळदार भाषण ठोकलं.

“...अ‍ॅज गुड फ्रेंड्स दे मेट,

...अ‍ॅज गुड फ्रेंड्स दे आर

पार्टिंग वेज...”

असं सांगत तिनं आम्हांला पाचारण केलं. त्या फाइव्ह स्टार हॉएलच्या कॉन्फरन्स रुममध्ये मध्यभागी तयार केलेल्या स्टेजवर आम्ही गेलो.

मग आम्ही आधी रिहर्सल केलेला एक लहानसा डान्स केला, आणि शेवटी कॅमेरा रिव्हर्समध्ये चालवल्यासारखं अ‍ॅक्टिंग ‘अन् डू’ केल्यासारखा मी गुडघ्यांवर बसलो. तिच्या बोटातूनं अंगठी काढली, ती डबीत ठेवून उभा राहून डबी खिशात ठेवली.

पार्श्‍वसंगीत सुरूच होतं ः

- यू गो युवर वे

आय विल गो माइन

मेक अ ब्रँड न्यू स्टार्ट !

इट्स टाइम फॉर

अ चेंज ऑफ हार्ट !

चिंकीनं देखील माझ्या बोटातली अंगठी काढून घेतली. संगळ्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या. ‘टीना टर्नर’चं “वॉक आउट द डोअर डोंट लुक अराउंड नाऊ - आय डोंट लव्ह यू एनिमोअर... आय विल सर्व्हाइव आय विल सर्व्हाइव”

जोरजोरात सुरू झालं. पुन्हा सगळे डान्स करायला लागले.

एक मादक मदनिका येऊन माझा हात धरून मला चिकटली.

चिंकीसमोर झुकून एक तरण्याबांड हँडसम हंकनं “मे आय?” म्हणून तिचा हात हातात घेऊन नाचायला सुरूवात केली, आणि पार्टी चांगलीच रंगायला लागली. नाचता नाचता माझं लक्ष काँफरन्स हॉलला जोडून असलेल्या गोल बाल्कनीकडे गेलं. तिथे हातात एक ग्लास घेऊन कठड्यावर रेलून एकाकीपणे खाली पाहत रश्मी उभी होती. मी माझ्या मदनिकेची क्षमा मागून बाल्कनीकडे गेलो.

“रश्मी!” मी तिच्याजवळ जाऊन म्हटलं, “एनी प्रॉब्लेम?”

“नोऽ” ती पोकळ हसून म्हणाली, “नथिंग!”

“तरी पण-”

“नाही, आता आजच्यानंतर आपली भेट नाही ना होणार ! प्रत्येक इव्हेंटच्या शेवटी जरा असा सॅड फील येतोच ना ! क्लायंटबरोबर इंटिमेट आठवडाभर घालवलेला असतो ना !”

मी आश्‍चर्यानं रश्मीकडे पाहतच राहिलो. “रश्मी, “मी धीर करून विचारलं, “तू लग्न कां नाही केलंस अजून?”

“अरे, इतक्या ब्रेक-अप पार्ट्या आम्ही अरेंज केल्यात ना. त्यामुळे लग्नावरचा माझा विश्‍वासच उडाला !”

“ऑ। उलट ब्रेक-अपमुळे तर एकापेक्षा जास्त - खूप लग्नं करता येतात ! म्हणजे चिंकीचं असं म्हणणं आहे !”

“आणि तुझं काय म्हणणं आहे?”

रश्मी माझ्याकडे वळून थेट माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली. आणि मग गेले पाच दिवस मी जो विचार करीत होतो तो क्रिस्टलाइज होऊन मी झपकन खिशातनं चिंकीच्या बोटातून काढलेली दीड-दोन लाखाची सॉलिटेअरची अंगठी काढली, आणि ती रश्मीसमोर धरून तिच्यापुढं गुडघे टेकून बसलो आणि म्हणालो,

“रश्मी, विल यू मॅरी मी ?”

बराच वेळ मी माझ्याकडे बघत राहिली. मग अंगठीसाठी आपला हात पुढं करत खळाळून हसत म्हणाली, “यस ! टंपू, यस ! पण एका अटीवर !”

“कुठल्या ?”

“आपल्या लग्नाचं इव्हेंट मॅनेजमेंट मी करणार !” रश्मी म्हणाली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED