Mayeche pankh books and stories free download online pdf in Marathi

मायेचे पंख*****************************मायेचे पंख ************************************

    नेहमीच्या थांब्यावर शाळेची बस थांबली आणि बसमधून म्लान चेहरे झालेली, थकलेली चार - पाच 'फुलपाखरे' उतरली. बसजवळ उभ्या असलेल्या आपल्या माणसांना पाहताच चिमुकल्यांचे चेहरे उजळले,हास्याची एक मनमोहक छटा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटली. परंतु, ते हसणेही त्यांची शारीरिक व मानसिक अवस्था स्पष्ट करीत होते. बसमधून उतरणाऱ्या माधवला त्याची आजी दिसली. दोघांनी एकमेकांना पाहताच आजीने दोन्ही हात पसरले. माधव आजीच्या कुशीत शिरताच त्याच्या पाठीवर, डोक्यावर हात फिरवत आजी म्हणाली, 
"आला ग माय, माझा माधोराजा. किती सुकलय गं माझं बाळ! डबा खाल्ला ना?" 
होकारार्थी मान हलवणाऱ्या पाच वर्षीय माधवला त्याच्या नकळत एक स्फूर्ती मिळत गेली. तो ताजातवाना होत गेला. जणू दिवसभर उन्हात उभे राहून कोमेजलेल्या इवल्याशा रोपट्याला पाण्याचे दोन - चार घोट मिळाल्याप्रमाणे माधव ही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला. आजीचे बोट धरुन तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आला. आजीने कुलुप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला. विस्तीर्ण बैठकीत असलेल्या सोफ्यावर पाठीवरचे 'ओझे' फेकले. कोपऱ्यात जणू त्याचीच वाट पाहात असणाऱ्या त्याच्या कारकडे तो धावतच गेला. कारमध्ये बसताच त्याला प्रचंड आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने कार पळवायला सुरूवात केली. त्यावेळी तो त्या बैठकीचा महाराजा होता. एका तासाने म्हणजे बरोबर सहा वाजता त्याचे आईवडील कंपनीतून येणार होते. 
"माधवा, झाले का तुझे सुरू? आधी हातपाय धुऊन घे. काय खायचे ते सांग आणि मग कार पळव." 
"थांब ना ग आजी. दिवसभर मला कारमध्ये बसायला मिळते का?" माधवने विचारताच आजी म्हणाली, 
"तुला कार खेळायला मी कधी तरी नाही म्हणते का?" 
"बरे बाप्पा!" असे तणतणत माधव न्हाणीघरात गेला. नळाची तोटी चालू करून त्याने हाताच्या ओंजळीत पाणी घेतल्यासारखे केले. ओंजळ चेहऱ्यापर्यंत जाईपर्यंत बरीच रिकामी झाली. तसेच दोन्ही हात चेहर्‍यावर फिरवताच कसाबसा ओला झालेला चेहरा तिथे असलेल्या टॉवेलने खसखस पुसून तो पुन्हा बैठकीत आला. तितक्यात आजी दूध बिस्कीट घेऊन आली. तिने विचारले, 
" हातपाय धुतले ना, शाब्बास! चल. हे सारे संपवून टाक." 
"आजी ग, भूक नाही ना..." असे म्हणत माधवने कार बैठकीच्या दुसर्‍या टोकाला पळवत नेली. आजी आपल्याकडे येत असल्याचे पाहून त्याने कार आजीच्या दिशेने न्यायला सुरूवात केली असल्याचे पाहून आजी थांबली. तिला वाटले, माधव आपल्याकडे येतोय. त्याला इथेच थांबवून घास भरवावा. परंतु, कसचे काय, माधवने आजीच्या जवळ येताच कारला असे जोराने वळण दिले की, डोळ्याचे पाते लवते न लवते अशा वेगाने त्याची कार आजीच्या मागे असलेल्या कोपर्‍यात पोहोचली. आजी आश्चर्याने मागे वळून बघत असताना तिच्या कानावर माधवचे खळाळून हसणे पडले. त्याच्या चेहऱ्यावर 'कसे फसवले.' असे मिश्किल भाव होते. त्या दोघांचा तो शिवाशिवीचा खेळ रंगला. तो खेळ त्या आजी - नातवास नवीन नव्हता. काहीही झाले तरी माधव आजीच्या हाती लागायचा नाही. आजीला त्याच्या कारसोबत भरभर चालताना दम लागायचा, श्वास वर झाल्याची जाणीव होताच मधूनच तिला सोफ्यावर बसून पाण्याचा घोट घ्यावा लागे. ते पाहून माधवला आनंद होई आणि तो आजीला चिडवून म्हणे, 
" हैश्या... आजी हरली. हरली रे हरली, आजी हरली." 
माधवचे खळाळून हसणे, त्याला झालेला आनंद आजीसाठी जणू प्राणवायूचे काम करीत असे. माधवच्या मागे पळताना झालेला त्रास ती क्षणातच विसरून जाई. ताजीतवानी होऊन पुन्हा त्याच्या मागे - मागे जात असे.... 
          त्या दिवशीही माधवने आजीला पळवले, दमवले. ती रडवेली झाली. आजीला खूप दम लागला. तितक्यात दारावरची घंटी वाजली आणि माधवची कार कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. दम लागलेल्या अवस्थेत, नीट बोलता येत नव्हते अशा अवस्थेत आजी दाराकडे निघाली. जाता जाता माधवकडे पाहून बोटाच्या इशाऱ्याने ती म्हणाली, 
'थांब जरा. आईबाबांना तुझे नाव सांगते.' 
स्वतःचे दोन्ही कान पकडून माधवही इशारा करून म्हणाला, 
' सॉरी! सांगू नकोस ना... प्लीज!'   माधवची ती कृती पाहून आजीने हसत हसत दार उघडले. आजीची तशी अवस्था पाहून माधवच्या आईने घाबरून विचारले, 
" आई, काय झाले? तब्येत बरी नाही का? खूप दम लागलाय." 
"दवाखान्यात जायचे का?" माधवच्या बाबाने विचारले. तोपर्यंत थोडा फार दम व्यवस्थित होताच आजी म्हणाली, 
"न.. न.. नको. हा काय माझा डॉक्टर." 
"अच्छा! म्हणजे आजही लाडक्या नातवाने त्रास दिला." 
"आई, काहीही बोलू नकोस. मी कशाला आजीला त्रास देईल? आजीच मला त्रास देते. शाळेतून आल्यावर हात - पाय धू.. हे खाय, ते खा. हे पी, ते पी. नुसती बोअर करते मला." 
"माधव, उगीच काहीतरी बडबडू नकोस. अहो, याला काही तरी सांगा बरे. सारखी किरकिर चालू असते. उर्मटपणे बोलतोय बघा. "माधवची आई म्हणाली. 
" अग, असा त्रागा करू नकोस. त्याचे वय ते काय? हे बघ, त्याचाही विचार आपण करायला हवा. सकाळी गाढ, शांत झोपेत असताना त्याला उठावे लागते. लगेच तयार होऊन घराबाहेर जावे लागते. लेकरू दिवसभर बाहेर असते ग. बसमधून उतरताना त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले ना तर माझेच डोळे भरून येतात. त्यामुळे होते त्याची किरकिर. "
" आई, अहो पण...."
"तुझेही बरोबर आहे. तुम्हालाही सकाळी लवकरच घराबाहेर पडावे लागते. तिथेही का आराम असतो? तुम्हीही थकून भागून घरी येता. तुमचीही चिडचिड होते पण आपणच सांभाळून घ्यायला हवे. घरी आल्यावर त्याचा, तुमचा कुणाचाही मूड जायला नको. आधी सारे फ्रेश व्हा. मी मस्त आले टाकून चहा करते. थांब. काही बोलू नको. आलेच... "म्हणत आजी स्वयंपाक घरात गेली आणि माधव टुणकन उडी मारून आईबाबांच्या मध्ये जाऊन बसला. दोघांचेही हात तत्परतेने त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून फिरत होते. त्या स्पर्शाने तिघांच्या शरीरामध्ये एका वेगळ्याच संवेदनेने प्रवेश केला. थोड्या वेळाने आजी एका ट्रेमध्ये चहा आणि बिस्कीटे घेऊन आली. बैठकीतील प्रेमाचा आविष्कार पाहून तिचे डोळे पाणावले. 
" चला. चला. घ्या. गरमागरम चहा आणि बिस्कीटे" आजी म्हणाली आणि सारे सावरून बसले. प्रत्येकाने चहाचा कप आणि बिस्कीटे उचलली. एक - दोन बिस्कीटे खाऊन होत नाहीत तोच माधव म्हणाला, 
"आजी, बघ. आईबाबांनी हातपाय धुतले नाहीत." 
"अरे, विसरलोच की.." बाबा म्हणाले तशी आजी म्हणाली, 
" ठीक आहे. चालते एखाद्या दिवशी. "
" नाही. हे चिटींग आहे. आजी तू मला शाळेतून आल्याबरोबर हातपाय धुवायला लावतेस. एखाद्या दिवशी नाही धुतले तर मला धपाटा देते...." 
"आजी तुला मारते? खोटे बोलायचे नाही... "
" मारते! मारते!! मारते!!! जा. मी कुणालाच बोलत नाही. तुम्ही सगळे वाईट आहात... " म्हणत माधव रागारागाने हातातील बिस्कीट खाली फेकून आत निघून गेला. ते पाहून बाबा उठत असल्याचे पाहून आजी म्हणाली, 
" थांबा. उठू नका. तुम्ही चहा घ्या. दोन मिनिटात येईल तो. "
" आई, अहो, माधवचा हट्ट वाढत चालला आहे. "
" बरोबर आहे, तुझे. कसे आहे, त्याच्या वयाच्या मानाने त्याला दगदग जास्त होतेय. ह्या बदललेल्या जीवनशैलीची सवय झाली ना की, होईल तो नॉर्मल. मुळात खूप हुशार आहे ग लेकरू.... "आजी बोलत असताना तिथे आलेला माधव म्हणाला,
" बाबा, आइस्क्रीम खायला कधी जायचे? जाऊ जाऊ असेच म्हणता तुम्ही.. "
त्यावर कुणी काही बोलणार की, आजी म्हणाली, 
" माधोराजांचे बाबा, आज आइस्क्रीम खायला नेणार."
"हे... हे.... आइस्क्रीम मिळणार. "
" पण आज आत्ता ताबडतोब गृहपाठ पूर्ण करायचा." आईने बजावले. 
"ओके. माय डियर, आई. थँक्यू आजी! "असे म्हणत माधव आत गेला....... 
          दोन महिन्यांपूर्वी माधवला के. जी. या वर्गात टाकले होते. त्यामुळे त्याची एकूण सारी जीवनशैली बदलली होती. सकाळी लवकर उठून घड्याळाकडे बघत बघत सारे आटोपून तो निघत असे. डोळ्यात झोप असलेल्या अवस्थेत तो शाळेच्या बसची वाट पाहात उभा राहत असे. दिवसभर शाळेत वेगवेगळ्या 
कसरती करत करत सायंकाळी चार वाजता घरी परत येत असे. अशा चक्रव्यूहात अडकल्याने त्याचे बालवयातले स्वातंत्र्य हिरावल्या जात असल्याने तो चिडचिडा झाला होता. विशेष म्हणजे तो आजीवर जास्त चिडू लागला..... 
         आइस्क्रीम खाऊन आल्यानंतर दोन तीन दिवसांनी तो प्रकार घडला..... 
त्या  दिवशी साध्या कारणाने तो आजीवर चिडल्याचे पाहून त्याच्या आईने त्याला मारताच माधव गळा काढून रडत खोलीत जाऊन पलंगावर पडला. थकल्यामुळे, दमल्यामुळे त्याला काही क्षणातच झोप लागली. अधून मधून हुंदके देणे चालू होते. बैठकीतील वातावरण गंभीर झालेले असताना आजी उठली. खोलीत डोकावून ती म्हणाली, 
"झोपलाय. पण, अशांत आहे. हुंदके देतोय...." ते ऐकून माधवची आई आत गेली. माधवला पाहताच तिचे मन भरून आले. त्याच्याजवळ बसून त्याच्या डोक्यावर, चेहर्‍यावर, छातीवर हात फिरवत होती. काही क्षणातच माधव शांत झोपला. थोडावेळ त्याच्याजवळ बसून  त्याची आई बाहेर येऊन म्हणाली,
"आत्ता शांत झोपलाय. जेवलाही नाही. "
" झोपू दे. रात्री उठला तर देईन त्याला खायला. कसे आहे, त्याच्या पाठीवर दप्तराचे ओझे तर तुमच्या मनावर  कामाची धसकी. तिघेही मनाने, शरीराने थकून जाता . त्याचाच परिणाम आहे हा. हेच वय असतं मुलाला उमलू द्यायचे, खेळू द्यायला हवे. नाही याचा अर्थ असा नाही की, त्याच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करायचे..... " आजी बोलत असताना माधवचे बाबा म्हणाले, 
" आई, तुझे बरोबर आहे पण,  मला वाटते परिस्थिती अजून हाताबाहेर जाण्यापूर्वी म्हणजे त्याचा हट्ट अधिक वाढण्यापूर्वी आपण एक साधा प्रयोग करून पाहू या. कदाचित फायदा होईल...! "असे सांगून त्यांनी हळू आवाजात स्वतःची योजना त्या दोघींना व्यवस्थित समजावून सांगितली.........
     दुसऱ्या दिवशी सकाळी माधवला त्याच्या आईने उठवताच माधव म्हणाला, 
" आई, तू? आजी कुठे आहे? "
" आजी खोलीत आहे. उठ लवकर. बस येईल. दप्तर घेऊन आवरून घे. "
" मी का? आजी देईल की. आजी ए आजी ग...." असे ओरडत माधव आजीच्या खोलीत गेला. तिथे त्याची आजी तिच्या साऱ्या साड्या आणि इतर वस्तू एका बॅगेत भरत असल्याचे पाहून माधवने विचारले, 
"आजी, हे काय करतेस? आपण कुठे गावाला जाणार आहोत का? "
" हो. पण एकटी आजी जातेय. "त्याच्या पाठोपाठ आलेले त्याचे बाबा म्हणाले. 
"असे का? मी पण जाणार..." 
"नाही. तुझी शाळा आहे..." 
"मग मला सुट्टी लागल्यावर जाऊ..." 
"नाही. तू आजीला त्रास देत आहेस ना, म्हणून आजी वृद्धाश्रमात जात आहे. "  बाबा म्हणाले. 
" माझ्या मित्राचे... अजितचे आजी-आजोबा तिथेच राहतात. अजित त्याच्या आईबाबांसोबत दर रविवारी त्यांना भेटायला जातो.... "
" आपणही दर रविवारी आजीला भेटायला जाऊ...."त्याचे बाबा सांगत असताना माधव रडवेला होत, ओरडून म्हणाला, 
" ना ss ही.. मी पण आजीसोबत जातो तिकडे. मग तुम्हीच या तिकडे आम्हाला भेटायला... "म्हणताना माधवचे डोळे भरून आल्याचे सर्वांना जाणवले. 
" तिथे मुलांना राहू देत नाहीत. "बाबा म्हणाले. 
" ना.. ही.. म्हणजे... ना.. .  ही. मी आजीलाच जाऊ देत नाही..." असे म्हणणाऱ्या माधवला यावेळी स्वतःचे रडणे आवरता आले नाही. आजीच्या कमरेला घट्ट मिठी मारून रडत रडत तो म्हणाला, 
"आ..जी...आ..जी..ग..नको ना ग, तू जाऊ. थांब ना, ग आजी.. म.. म..मी तुला त्रास देणार नाही ग.. "
" नाही रे बाळा, मी तुला रे सोडून, कशी जाईल बरे...."बोलताना आजीच्याही अश्रूंचा बांध फुटला..... 
========≠========================


          नागेश सू शेवाळकर, 
         फ्लॅट क्रमांक ११०, 
          वर्धमान वाटिका फेज ०१, 
         क्रांतिवीर नगर लेन ०२, 
         संचेती शाळेजवळ, थेरगाव पुणे 
         ४११०३३. (९४२३१३९०७१) 

इतर रसदार पर्याय