Bhajisamraat books and stories free download online pdf in Marathi

भाजीसम्राट

** भाजीसम्राट **
"अहो, ऐकलत का? भाजी आणायला जाताय का? नाही तर मी जाऊ का? तसे सांगा. मला कुणी खात नाही. ओरडून ओरडून तोंडाला फेस यायची वेळ आली. परंतु तुमच्या कानात माझा आवाज शिरत नाही. सारख आपलं मोबाइल... मोबाइल! वीट आलाय बाई." आतून पद्माचा आवाज आला.
"जातोय. चाललोय. निघालोय. आणि प्रत्येक वेळी तुझे 'तुम्ही जाताय का मी जाऊ?' हे ब्रम्हास्त्र वापरत जाऊ नकोस. नुसती भीती दाखवून दाखवून एखादेवेळी वापरायची वेळ आली तर फुसका बार ठरेल."
"व्वा! ब्रम्हास्त्र काय? फुसका बार काय? काय हो, तुम्हाला काय वाटते,मी बाजारात जाऊ शकणार नाही? माझ्याजवळ हिंमत नाही? भाजी आणू शकणार नाही? मी भाजीचा भाव करू शकणार नाही? मी डरपोक आहे? वेंधळी आहे? बार फुसका ठरणार म्हणजे काय?तुम्हाला काय वाटते, सारे तुम्हीच करु शकता? मोठा तोरा मिरवता बाजार करण्याचा? काय बाजार आणता? ती भाजीवाली जेवढा म्हणेल तेवढा पैसा तिच्या हातावर टिकवून ती टाकेल तेवढेच माप आणि कशीही भाजी घेऊन येता..."
"मला काय वाटते, आपण एखादा मोठ्ठा समारंभ...."
"तो कशासाठी? लॉटरी बिटरी लागली की काय?" पद्माने विचारले.
"तुझे नाव की नाही आपण प्रश्नवंती ठेवू या." मी म्हणालो.
"बारसे करणार माझे? तुम्ही? का हो, तुम्हाला काय वाटले माझे बारसे झाले नाही?माझ्या वडिलांची
तेवढी हिंमत नव्हती? मला काय उकिरड्यावरुन उचलून आणले? चांगला मोठ्ठा कार्यक्रम झाला होता माझ्या बारशाचा. त्या काळात दोनशे पानं उठली होती...."
"खरेच? मग मला कसे बोलावले नव्हते ग?..." असे म्हणत बाजारची पिशवी घेऊन मी हसत बाहेर पडलो. पाठी पद्माच्या हसण्याचा आवाज आला. मनात आले.......
'हे अस्से आहे आमचे. तीन वर्षांपूर्वी संसारात शिरलेले पद्माराणी नावाचे चक्रीवादळ अजूनही घोंघावते आहे. ते केव्हा शमेल आणि सुखाची एक शीतल लहर आमच्या घरात प्रवेश करेल ते देवच जाणे. चला. 'केलीया बायकोपुढे असावे नतमस्तक!' मी एक शब्द बोलायला अवकाश जणू हजारो फटाक्यांची लड तडतड करीत सुटतज....." तितक्यात भाजीबाजार आणि नेहमीची भाजी विक्रेती दिसताच माझ्या विचारला ब्रेक लागला. भाजीवाल्याबाईकडे जाताना पावले काही क्षण रेंगाळली. पुन्हा विचारांचे वादळ मनात थैमान घालू लागले....... काही दिवसांपूर्वी पद्मा माझ्यासोबत भाजी घेण्यासाठी आली होती. मला वाटले, पद्माला नेहमीच्या भाजीच्या दुकानात नेले तर भाजीवालीस पाहून पद्मा पराचा कावळा करेल, संशयाचा महामेरू उभा करेल म्हणून मी शेजारच्या दुकानाकडे निघालो असते एक खणखणीत आवाज कानावर आला,
"वो बबुआ, आज वो दुकान काहे जा रहे हो? अच्छा! अच्छा! समझ गे! आज लुगाई जो साथ मे है। लेकिन कल तो हमारे ही दुकान आओगे ना? कहा जाओगे? रोज थोडेही लुगाई साथ आनेवाली है? एक बात तो बताओ, क्या हमने कभी बासी सब्जी तुम्हारे झोली मे डाली है? कभी पैसा ज्यादा लिया है? फिर क्यूं नाराज हो? बहना, तुम को हम बताते है, यह तुम्हारा मरद है ना, हमेशा मेरेही पास आता है....सब्जी खरीदने! स्वभाव से बडा अच्छा है। कभी रेट पुछता है ना, न कभी सब्जी चून के लेता है। जो मै दूंगी वो ही माल लेता है। मै जो दाम माँगू उतनाही देता है। अरे, देती हूं ना बबुआ।देखते नहघ हमारा रोज का ग्राहक आज हमे छोडकर उधर चला गया। अब आपको, क्या बताऐं कि, हमारा कितना नुकसान हुआ है। ...." ती बडबडत असताना इकडे पद्माचा राग अनावर झाला. ती तणतणत म्हणाली,
"म्हणूनच कोणतेही काम आनंदाने न करणारे तुम्ही भाजी आणायला एका पायावर का पळत येता ते समजले आज. तुमचे सोडा हो. पण ती बाई बघा, किती चवचाल आहे ती. दुकान भाजीचेच आहे की, शीः मला तर बोलवतही नाही. काय फतकल मारून बसलीय. मानेला झटके काय देतीय, डोळे कसे गरगर फिरवते, ओठांचा चंबू करुन कशी मधाळ बोलतेय. पैसे देता-घेता पैसे हातावर टिकवते की शेकहँड करतेय मला तर काही कळत नाही. पदराचे भान नाही. बघा तर पुरुषही सगळे मेले..."
"अग, सगळ्या पुरुषांना काय मारतेस?"
"आधी जरा नट ऐकत जा. उजलली जीभ लावली टाळूला असे वागत जाऊ नका. सारे पुरुष मेले सारखेच. बघा ना, जिथे जिथे बायका दुकान मांडून बसल्यात....भाजीचेच हो. त्याच दुकानावर सारे पुरुष उलथून पडलेत. भाजी विकणारे पुरुष बघा कसे दीनवाणे पाहत बसलेत..."
"नाराज ना हो, बहनजी, वो भी हमारी ही दुकान है। वो हमारी लुगाई है। क्या करें हम, सब मरद उधरही भागते है और तो और , उस के पास कोई बारगेरिंग नही करता। एक्का दुक्का आदमी हमारे पास आता है, तो हम उसे कम दाम बताते हझ, लेकिन फिर भी वह आदमी ऐसी घीसघीस करता है ना, पुछो मत...." दुकानदार बोलत असताना पद्माने निवडून निवडून भाज्या घेतल्या. आम्ही घरी निघालो. रस्त्याने पद्माची अविश्रांत बडबड चालूच होती......
मी भाजीच्या दुकानात पोहोचलो. त्या बाईने नेहमीच्या अदेने माझे स्वागत केले. तिच्या अदांचा मनस्वी आस्वाद घेत मी मला हव्या असलेल्या भाज्या घेऊन घरी परतलो. भाजीची पिशवी ठेवून टीव्ही लावला. बातम्या ऐकत असताना पद्मा मोठी परात घेऊन तिथे येताच मी मनोमन समजलो की, आता नॉनस्टॉप बातम्या ऐकाव्या लागल्या. झालेही तसेच.....
"काय दिवज लावलेत महाराजांनी? कोणत्या दुकानात भाजी घेतली? तसे हा प्रश्न विचारणे निरर्थक
आहे म्हणा. तेवढी सु, नखरेल, ठसक्याची भाजीवाली असताना आमचं हे ध्यान दुसरीकडे भाजी घेईलच कशी? हे दुसऱ्या दुकानात जातो म्हणाले तरी ती बाई यांना जाऊ देईल तर ना...." असे बडबडत पद्माने भाजीची पिशवी परातीमध्ये रिकामी केली. दुसऱ्याच क्षणी वीज कडकडावी तशी पद्मा कडाडली,
"आई ग,माय! काय भाजी आणली आहे हो. हे..हे..हात हात लांब दोडकी कित्ती छान छान पिवळी-पिवळी आहेत हो. छोटी छोटी, हिरवीगार दोडकी तुम्हाला दिसलीच नसतील. हे टमाटे, वाहवा! हे पहिले नासकज, दुसरे तसेच, तिसरे त्यांचा भाऊ. चौथे तर बघा कसे लिबलिब झालेय ते. पाचवे टमाटे... ठीक आहे. याला वाण नाही पण गुण लागतोय. तासा-दो तासात नक्कीच नासू शकते. टमाटे आणले सहा, नासके चार, दोन नासणार नक्की. उरले काय? शून्य! देवा रे देवा! ही भेंडी पहा. वितभर लांब लांब ! कोवळी लहान,हिरवीगार भेंडी लग्न झाल्यापासून खायला सोडा पण पाहायलाही मिळाली नाही...."
"अग, मी काय म्हणतो, एक काम कर ना, या भेंडीमधले दाणे काढून ना त्याचे छान कालवण करतेस का ?" तिची बडबड थांबावी म्हणून मी विचारले.
"काय? भेंडीमधल्या दाण्याचे कालवण? कोणत्या कुकिंग क्लासमध्ये शिकलात हो?"
"हेच ना, तुला कशापासून काय बनवतात हेच माहिती नाही..." असे मी तिला उघड म्हणालो पण लगेच मनात म्हणालो, 'काय बुद्धू बाई आहे, तिला हा साधा विनोदही कळणार नाही.'
"अरे, देवा! ही काकडी आहे की काकडा? अहो, काकडी कशी कोवळी हवी ....."
"तुझ्यासारखी..." मी विनोद करण्याचा प्रयत्न केला.
"ईश्श! काहीही हं..." पद्मा लाजून म्हणाली. मला क्षणभर वाटले की, माझ्या प्रयत्नास यश मिळाले. पण लगेच पद्मा म्हणाली,
"हे बटाटे! किती फळफळून आलेत ना? बघा तर एकूण एक बटाट्याला कोंब आलेत हो. या अशा कुजलेल्या, शिळ्या, नासक्या भाज्या खाऊ घालून मारण्यापेक्षा एकदाच एका क्षणात संपवून टाका संपवून मला. तुमच्या मागची कटकट तरी संपेल. माझी वटवट, बडबड दिसते तुम्हाला पण...बघा. एकदा बघा तर हा पालक बघा. केवढाली मोठ्, जाडच्या जाड पाने आहेत. त्या बाईकडे पालकाच्या पानावर पिवळ्या रंगाची डिझाइन असलेला नवीन वाण मिळतो का हो? ही कोणती भाजी म्हणावी? मेथी का मेथा? ताजी, कोवळी, हिरवीगार मेथी येतच नाही का आजकाल? आता हेच बघा...ही कोथिंबीर? कित्ती छान आहे बरे. कोथींबीरीची ही असली मोठी आणि पिवळी पिवळी पाने मी तरी बाई प्रथमच पाहतज. असली ताजी ताजी कोथींबीर घ्यायला पुरुषांच्या उड्या पडत असतील ना? पुरुष कशाला घेतील म्हणा? ती महामाया बसलीय की? ह्यांचे तिच्या अदांवर, सौंदर्यावर लक्ष आणि तिचे ह्यांच्या खिशावर लक्ष. देईल तो वाण, सांगेल तो दाम....व्वा! काय जोडी जमलीय. मला सांगा, ही वांगी आहेत की टरबूज? किती मस्त निब्बरडग आहेत हो, तुमच्याप्रमाणे निगरगट्ट! एकही वांगे असे, जे मी एका हाताने उचलू शकेल. अर्ध्या अर्ध्या किलोचे एक वांगे नक्कीच असणार. का हो, गाव जेवण द्यायचा विचार नाही ना..." हिची टकळी चालू असताना शेजारच्या मंगलाबाईंनी आमच्या घरात प्रवेश केला. 'सुटलो बुआ एकदाचा!' या काहीशा प्रसन्न अवस्थेत मी निमूटपणे शयनगृहाकडे निघालो. कुणी स्त्री, मग ती कोणत्याही वयाची असो, आमच्या घरी आली की, मी निमूटपणे शयनगृहात जावे....एकट्याने हा अलिखित नियम! मी बेडरूममध्ये शिरलो तरी नेहमीप्रमाणे माझे कान बाहेरच होते. मंगलाबाईंनी घरात शिरल्याबरोबर विचारले,
"भाज्या निवडताय का?" हा प्रश्न म्हणजे बिरबलाच्या कथेतील 'डोळस आंधळ्याप्रमाणे!' त्यांनीच पुन्हा विचारले ,
"कुणी आणल्या हो भाज्या? आमच्याकडे की नाही, मीच आणते भाज्या.अधेमधे कधी ह्यांना भाजी आणायला पाठवले ना तर अशा भाज्या आणून आदळतात... विचारुच नका..."
"आमच्याकडेही तोच प्रकार आहे. म्हणजे नेहमी हेच भाजी आणतात. बघा ना, कशा नासक्या, कुजक्या, शिळ्या, निब्बर भाज्या आणल्यात ते..."
"अहो, या भाज्या तरी बऱ्या. किमान अर्ध्या-मुर्ध्या भाज्या निसून, टिपून, स्वच्छ करून वापरता येतील. पण आमच्या यांनी आणलेल्या भाज्या ना फक्त दहा टक्केच वापरता येतात. त्या ही मी मान, पाठ, कंबर एक करून, कळ लागेपर्यंत निवडून घेते म्हणून तेवढी तरी भाजी हाती लागते. नाही तर चक्क फेकून द्यायच्याच कामाच्या असतात. तुम्हाला सांगते, यांची भाजी खरेदी म्हणजे ना, सागरामध्ये तरी थोडेसे शोधल्यावर मीठाचा खडा सापडेल. परंतु यांनी आणलेल्या भाज्यांमध्ये ना ताजे, टवटवीत, एकसंघ, छोटे, लुसलुशीत असे एखादे पान सापडते का हे अगदी डोळ्यात तेल घालून शोधावे लागते. वर्षानुवर्षे तेच केल्यामुळे ना मला लहान वयातच चक्क चष्मा लागला हो...दूरच्या नंबरचा! 'चाळिशीत चाळिशी लागल्यामुळे चक्क काकू दिसतेय हो. परवा तर अशी गंमत झाली म्हणता. मला होता गुरुवारचा उपवास. तो ही फक्त द्रव पदार्थ घेण्याचा. मी पोथी वाचायला सुरुवात करताना यांना सांगितले की, मंदिरात गेले म्हणजे चांगली, रसरशीत दहा-बारा लिंबं आणा. मोबाइलच्या डबड्याशी खेळताना यांनी केवळ हुंकार भरला. मी पोथी वाचत असताना हे मंदिरात गेले. मंदिरातून आले. फ्रीज उघडले. मला वाटले लिंबं....पण...."
"नक्कीच सारी लिंबं नासकी, काळी पडलेली...."
"अहो, तशी असती ना तरी काही बिघडले नसते हो. काय सांगू तुम्हाला? पोथी वाचून झाल्यावर सरबत घ्यावे म्हणून मी फ्रीज उघडले तर तिथे चक्क अंडी होती...."
"काय? अंडी?" पद्माने आश्चर्याने विचारले.
"होय हो अंडी! यांना आवाज दिला. पहिल्या आवाजात प्रतिसाद देईल तो नवरा कसला? तीन-चार वेळा ओरडल्यावर हे कासवगतीने आले. मी विचारले, लिंबं आणली नाहीत का तर यांनी माझ्याकडे न पाहता मोबाइलवर बोटं चालवत मलाच उलट विचारले की, तू लिंबं कधी सांगितले होते? मला वाटले कोणत्या तरी बुवाने घरातील पीडा दूर व्हावी म्हणून अंडी उतरून टाकायला सांगितली असतील त्यामुळे मी अंडी आणली...." मंगलाबाई सांगत असताना तिथे पोहोचलेली शेजारीन तिथे काय चर्चा चालू आहे हे जाणून न घेता आल्या आल्या म्हणाली,
"ही अशी निसण्याची, टिपण्याची, चिरण्याची कटकट नको म्हणून मी तर बाई, सरळ सरळ 'स्मॉल बास्केट' मागवतज. तुम्हाला सांगते, अशा स्वच्छ, ताज्या, लुसलुशीत आणि महत्त्वाचे म्हणजे स्वस्तात घरपोच भाज्या येतात....."
"त्यादिवशी तुम्ही भाज्या उतरवून घेतल्या आणि लगेच फोनवर त्या स्मॉल का फॉल बास्केटवाल्यास झापत होतात. त्यानंतर दोन-चार वेळा भाऊजींनी बाजारातून भाज्या आणल्या. कारण तुमचे भाजीपुराण म्हणजे भाऊजींची खरडपट्टी ऐकू येत होती म्हणून समजले...."
"मी माझ्याच नवऱ्याला झापत होते ना? पण तुमचे बारीक लक्ष का?"
"मी कशाला लक्ष ठेवू? तुमचा आवाजच एवढा गगनभेदी आहे ना की, नको नको ते कानात शिरते. दिवसभर थोडेच कानात बोळे घालून राहता येते." मंगलाबाई म्हणाल्या.
"अय्या! किती छान भाजी आहे हो. तुम्ही स्वतः जाऊन आमल्यात का?...." तो आवाज ऐकताच मी अतर्बाह्य शहारलो. माझ्या मनात आले,'झाले. डेंजरबाईचे आगमन झाले.' डेंजरबाई! आमच्या शेजारी राहायला आलेली एक षोडशी! रुपाने, पोशाखाने आणि वागायला एकदम कडक! आमच्या समोर राहणाऱ्या छोट्या समीरने स्वतः होऊन तिचे डेंजरबाई असे बारसे केले होते. सुरूवातीला तिच्या पश्चात वापरले जाणारे संबोधन कोण्या तरी 'तीळ न भिजणाऱ्या' जीभेने सोइस्कररित्या तिच्यापर्यंत पोहोचवले. तिने ते फारसे गांभीर्याने घेतले नाही. पुढे तेच नाव सार्थ झाले.
"नाही हो. मी कसचे जाते बाजारात? मला बाई, त्या भाजी मंडईतल्या भाज्यांचा नासका, कुजका वास सहन होत नाही. लगेच मळमळायला होते. ह्यांनीच आणल्यात." पद्माने सांगितले
"खूपच छान आहेत हो. माझा नवरा आणतो त्यापेक्षा हजार पटीने चांगल्या आहेत..."
"असे का? मग नेता का घरी?करता का भाजी? नाही तरी मी फेकूनच देणार आहे..." डेंजरबाईने मी आणलेल्या भाज्यांची पर्यायाने माझी केलेली स्तुती सहन न झालेली पद्मा चिडून म्हणाली.
"नेल्या असत्या हो पण यांनी सकाळीच आणल्यात. सध्या भरपूर भाज्या आहेत.... आपण एक्स्चेंज करु या का?" डेंजरबाईने विचारले.
"काही नको. जिच्या पदरचे तिच्याच पदरी शोभते. एखादे अपवित्र वाण पदरात पडले की, मग गोंधळ उडतो. ...." पद्मा बोलत असताना एक विचार माझ्या डोक्यात विजेप्रमाणे चमकला, 'ही डेंजरबाई एक्सचेंज करायचे म्हणते पण काय? भाजी की नवरा?' तितक्यात माझे लक्ष पुन्हा दिवाणखान्यात सुरु असलेल्या चर्चेने वेधले. डेंजरबाई म्हणत होती,
"एक करता येईल, अर्थात पद्माबाई तुमची परवानगी असेल तर? तुमच्या भाज्यांसोबत भाऊजींना माझ्याही भाज्या आणायला सांगता येतील...." ते ऐकून मी तीनताड उडालो. शरीरात आनंदलहरी थैमान घालत होत्या.
"हो. हो. हे आनंदाने आणतील. यांना आवडते बायकांची सेवा करायला. एक सांगा, तुमच्या नवऱ्याने आणलेल्या भाज्या तुम्ही कधी निरखून पारखून पाहिल्यात का? कधी स्वतः निवडल्यात का? " पद्माने विचारले.
"शी: बाई! किती घाणेरडा प्रकार आहे....भाज्या निवडणे! मला तर बाई किळसच येते. भाजी आणणे, निवडणज, चिरणे, फोडणीला घालणे ही सारी कामे 'हाच' करतो...."
"मग बरोबर आहे. भाज्यांमध्ये असलेले दोष तुम्हाला काय कळणार? मला सांगा,ज्याला दुकानात भाजी घेताना चांगली-वांगली, किडकी-नासकी कळत नाही त्याला तीच भाजी निवडता कशी येणार? जशी आणा, तशीच शिजवावी आणि खावी. यामुळेच तुम्ही या अशा डेंजर आहात हो.." पद्मा म्हणाली आणि नंतरच अनेक क्षण दिवाणखान्यात हास्यसरी कोसळत होत्या....
काही वेळाने आमच्या घरात रंगलेले भाजी आख्यायिका संपली. सर्व बायका आपापल्या घरी जाताच मी लगबगीने दिवाणखान्यात आल्याचे पाहताच पद्मा म्हणाली, "तुमच्यासाठी एका नवीन जॉबची ऑफर आहे... डेंजरबाईचा भाजीपाला आणून देण्याचा!...."
"हुकूम सरआँखोपर! बघ तीच नाही तर सगळ्या बायका मी आणलेल्या भाज्यांचे कौतुक करीत होत्या. फक्त तू तेवढी....."
"त्यांचे काय जाते कौतुक करायला? त्यांना का तुम्ही आणलेल्या भाज्या निवडायच्या, चिरायच्या, शिजवायच्या की गिळायच्या आहेत? मी कौतुक करत नव्हते हे बरे लक्षात आले. मात्र प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याने आणलेल्या भाज्यांच्या नावाने बोटं मोडीत होती हे नाही आले लक्षात?"
"म्हणजे नवऱ्याने आणलेल्या भाज्यांना नाव ठेवणे हा बायकांना लग्नोपरांत मिळालेला हक्क आहे आणि तो त्या शेवटपर्यंत बजावणारच. ते काहीही असो, आज मला समजले, की मी चांगल्याच भाज्या आणतो."
"खरेच मी काय आरती ओवाळू? मी कशाला म्हणा,आत्ताच प्रत्येकीने ओवाळलीच आहे की, आरती! अजून एक-दोनवेळा तुमच्या भाज्यांचा आणि तुमचा कौतुक सोहळा झाला ना तर एखादी बाई....कशाला ती डेंजरबाई तुम्हाला 'भाजीसम्राट' ही पदवी देऊन भर चौकात तुमचा दणदणीत सत्कार करायची हो..."
"तू त्या सत्कार सोहळ्याची अध्यक्षा झालीस तर चार चाँद लागतील. पण एक झाले त्या डेंजरबाईच्या खांद्यावर बंदुक ठेवून का होईना पण तू ही पदवी मला बहाल केली. धन्य झालो. पद्माराणी, आज मी धन्य झालो!"
"अहो, धन्य धनी, हा सारा कचरा बाहेर फेकून द्या. तुम्हीच आणलेल्या आणि डेंजरबाईने नवाजलेला कचरा आहे बरे. निसून निसून कंबरडे मोडले. रात्री हात सुजणार, डोळे दुखणार....." पद्मा म्हणत असताना मी निमुटपणे उठलो. तो सारा कचरा गोळा केला. तेव्हा जाणवले की, खरेच बऱ्याच भाज्या खराब आहेत. शिवाय नासक्या वासाने मलाच मळमळायला लागले होते. तो कचरा फेकत असताना तशा परिस्थितीत मला एक प्रसंग आठवला........
नेहमीप्रमाणे त्यादिवशी मी भाज्या घेऊन आलो. परंपरेनुसार सौभाग्यवतीचे धिक्कारायण सुरु झाले असताना आमच्याकडे आलेला माझा भाचा मला म्हणाला की, भाजी बाजारात गेलास ना की,तू घेत असलेल्या भाज्यांचे फोटो काढून मामीकडे पाठवत जा. तिचे 'नो ऑब्जेक्शन' असे उत्तर आले की, बिनधास्त त्या भाज्या घेऊन घरी यायचे म्हणजे मामीला बोलायला संधीच मिळणार नाही.
त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मी आणि पद्मा सकाळचा चहा घेत असताना पद्मा म्हणाली, "अहो, तो पेपर बाजूला करा आणि जरा ऐका. भ्रमणध्वनी दूर करा. टीव्ही बंद करा. तुमची सारी कामे पटापट उरका. बाजारात जाऊन भाज्या आणा. अहो, मी कालपासून सांगावं- सांगावं म्हणते पण कामाच्या रगाड्यात लक्षातच नाही. आत्तासाठीच भाजी नाही हो."
"आप का हुकूम सर आँखों पर। यूं गया और यूँ आया।"
"अग बाई, काय ही तत्परता, केवढा उत्साह, किती ही स्फूर्ती! हां..आले लक्षात! भाजी आणायची आहे ना. सर्वात आवडते काम. पण सांभाळून बरे...." पद्मा खिजवत असताना मी म्हणालो,
"का ग पद्मा, मी काय म्हणतो,"त्या डेंजरबाईची ऑफर स्वीकारावी का? अग, त्यांना भाजी आणून देण्याची....." मी म्हणत असताना पद्मा खळखळून हसत असल्याचे पाहून मी पुढे म्हणालो,
"आज मी आणलेल्या भाज्या तुला एकशे एक टक्के पसंत पडणार म्हणजे पडणारच. बघच तू..."
"तसे झाले ना तर तुमचा जंगी सत्कार करून भाजीसम्राट हा पदवीदान समारंभ घेईल."
"तू लागच पदवीदान समारंभाच्या तयारीला आणि हो भाजीसम्राट पदवी त्या डेंजरबाईच्या हस्ते प्रदान कर बरे..." असे म्हणत मी बाहेर पडलो.
काही क्षणात मी मंडईत पोहोचलो. तिथले दृश्य पाहून मी भयभीत झालो. माझ्या नेहमीच्या भाजीवालीबाईने एका तरुणाचा गळा पकडला होता. ती जोरजोरात ओरडून म्हणत होती,
"उधार सब्जी लेनी है तो मेरे पास आता है तब शरम नही आती। मेरा पैसा ना देकर उस को पैसे देकर माल खरीदता है।बडा मजा आता है क्या? निकाल मेरा सारा पैसा। ब्याज भी देना पडेगा..."
"ब्याज क्यूं?" तरुणाने अडखळत विचारले.
"किस मुँहसे ये बात पुछता है रे? कान खोलकर सुन ले मेरी बात अगर मेरा पैसा डुबाने की, बात भी सोची ना तो मेरे से गांठ है। चल निकाल...." ती बाई तशी बरसत असताना मी तिथे न थांबता निघालो. तिथून दोन किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या मंडईकडे निघालो. त्या बाईकडे पुन्हा भाजी घ्यायची नाही असा निश्चय करून.
काही वेळात मी त्या भाजीमंडईत पोहोचलो. मी स्कुटी लावत असतानाच एक आवाज आला,
"या. साहेब, या. कोवळी, ताजीतवानी, हिरवीगार भाजी आहे. पुढे जाऊ नका. इथे आल्याबरोबर मी तुम्हाला हेरलय. तुम्हाला प्रथम आवाज दिलाय. तुम्हाला माझ्याकडेच भाजी घ्यावी लागेल. दुसरे कुणीही तुम्हाला भाजी देणार नाही...." मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. ओरडणाऱ्या, मला साद घालणाऱ्या बाईकडे न पाहता मी एका म्हाताऱ्या बाईकडे गेलो असता ती म्हणाली,
"साहेब, तुम्हाला तिच्याकडेच भाजी घ्यावी लागेल. इथला नियमच आहे. जो आधी गिऱ्हाईकाला आकर्षित करेल म्हणजे आवाज देईल तिथेच भाजी घ्यावी लागेल...."
'काय ताप आहे, स्साला! पुन्हा बाईच....' असे पुटपुटत मी त्या बाईकडे गेलो.
"हां. साहेब, या. जमलं आत्ता. बोला. काय काय देऊ?" ती बाई बोलत असताना मी तिच्याकडे न पाहता मला हव्या त्या असलेल्या भाज्या निवडून घेतल्या. तिने सांगितलेले पैसे तिच्या हातावर न ठेवता भाजीच्या टोपलीत ठेवल्या आणि घराकडे निघालो.....
'व्वा! आज मी स्वतः निवडून भाज्या घेतल्या. ती बाई टाकत असलेली भाजी मी बाजूला काढली. आजच्या भाज्या पद्माला नक्कीच आवडेल......' असा विचार मी करत असताना रस्त्याच्या कडेला असलेली नेहमीची बँक दिसताच मला माझ्या मित्राने सांगितलेला किस्सा आठवला.......
माझा मित्र शेखर त्यादिवशी माझ्याकडे आला होता. मीही नुकताच बाजारातून भाजी घेऊन आलो होतो. मी शेखरशी गप्पा मारत असत तिथे आलेल्या पद्माने विचारले,
"भाज्या तर आणल्यात पण बँकेचे काम केलेत का?" मी काही बोलणार त्यापूर्वीच शेखर जोरजोरात हसू लागला. आम्ही दोघेही त्याच्याकडे गोंधळून पाहात असताना स्वतःच्या हसण्यावर ताबा मिळवत म्हणाला,
"अरे, भाजी आणि बँक फार मोठा विनोद घडला. काय झाले, मागच्या गुरुवारी मला जरा जास्तच कामे होती म्हणून भाजी आणायलाआणि सोबत आमच्या दोघांच्या नावावर असलेल्या लॉकरमधील
दागिने आणायला सौभाग्यवती दिमाखात बाहेर गेल्या. भाजी खरेदी करून ती बँकेत पोहोचली. आणि... आणि लॉकरमध्ये दागिन्यांऐवजी चक्क भाजीची पिशवी ठेवून आली..."
"काय? लॉकरमध्ये सोन्याचे दागिने?" आम्ही दोघांनी एकदाच विचारले.....
तो प्रसंग आठवला आणि मी हसत हसत घरी परतलो. मला पाहताच पद्माने विचारले,
"अरे, व्वा! लवकर आलात. मला वाटले बसलात गप्पा मारत....बाईशी! आणल्या का भाज्या?"
"तर मग? तुला सांगतो तुला ती बाई आवडत नव्हती ना म्हणून मी बाईच बदलली...म्हणजे बाजारच बदलला. पार स्टेशनजवळ असलेल्या बाजारपेठेत जाऊन भाज्या आणल्या..."
"अय्या, खरेच! पाहू तर द्या, काय दिवे लावलेत ते...." म्हणत म्हणत पद्माने साऱ्या भाज्या नेहमीच्या परातीत ओतल्या. क्षण-दोन क्षण त्या भाज्या आलटून पालटून पाहताना मध्येच हाताने दाबत माझ्याकडे बघत म्हणाली,
"अहो, तुमच्या माहितीचा कुणी इव्हेंट मॅनेजर आहे का हो? कसे आहे, आज की नाही तुम्ही एकदम ताज्या, कोवळ्या, लुसलुशीत भाज्या आणल्यात हो. म्हणून तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे एक भव्यदिव्य कार्यक्रम ठेवून तुम्हाला 'भाजीसम्राट ही पदवी बहाल करावी म्हणतेय...."
"तू की नाही... काहीही हं..."असे म्हणताना मी लाजलो असल्याचे माझे मलाच जाणवले. लग्नानंतर
पद्मा प्रथमच मी आणलेल्या भाज्यांचे कौतुक करत होती. ते ऐकताना मला स्वर्ग दोन बोटे उरलेला असताना माझी अवस्था त्या गोलंदाजाप्रमाणे झाली. ज्याच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षकाने सूर मारून अवघड झेल टिपावा आणि तितक्यात पंचानी नो-बॉल घोषित करावा त्याप्रमाणे पद्मा कडाडली,
"पहिले पाढे पंचावन्न! भाजीवाली बदलली, पुन्हा बाईच निवडली! तुम्हाला भाजीची पारख नाही हे तिने बरोबर पारखले. पहिलीच बरी होती असेच म्हणायची वेळ! तिथे घेतलेल्या भाज्यांमध्ये थोडी तरी भाजी हाती लागायची. उठा आता. ह्या साऱ्या भाज्या घ्या आणि त्या बाईला भाजीस्नान घालून या....घाला तिच्या डोक्यावर....."
तितक्यात बाहेरून आवाज आला,"भाजी घ्या भाजी...!"
"आली वाटते...." असे बडबडत पद्माने खिडकीतून बाहेर पाहिले आणि झटक्यात मान वळवून म्हणाली,"अहो, तुम्ही नेहमीच्या बाईकडून भाज्या घेतल्या नाहीत ना. म्हणून ती बाई इकडेच आलेय.आग ओकणाऱ्या डोळ्यांनी आपल्याच घराकडे बघतेय हो....." ते ऐकताना मी भीतीने गारठून म्हणालो,
"अ...अग, आता ग कसे? म...मी...लपतो. ती..ती..मला फाडून खाईन ग. मी..मी.. घरात नाही. सांग तिला...." मी घाबरून बोलत असताना पद्माचे मजली हास्य कानावर पडताच तिचा खट्याळपणा माझ्या लक्षात आला आणि दुसऱ्याच क्षणी सावरुन मी तिच्या हसण्यात सामील झालो.........
नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED