चकाकते ते सोने... Nagesh S Shewalkar द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चकाकते ते सोने...

चकाकते तेच सोने!
भर दुपारची वेळ होती. सूर्यदेव डोक्यावर आले असले तरीही उन्हाची तीव्रता मुळीच जाणवत नव्हती. सूर्यकिरणांनी सृष्टीला कवेत घेतले असले तरी धग जाणवत नव्हती. असे वाटत होते की, आलेली किरणे ही सूर्याची नसून चंद्राची आहेत. अशा मोठ्या प्रमाणात थंडी सर्वत्र पसरली होती. गेल्या अनेक दिवसांपासून आलेली थंडीची लाट तळ ठोकून होती.
शहरातील एका नवीन वसाहतीत असलेल्या एका इमारतीत राहणाऱ्या बायका घरातील थंडी टाळण्यासाठी गरम गरम उन्हात बसल्या होत्या.
"अग बाई, काय ही थंडी म्हणावी. स्वेटर, शाल कशानेही आटोक्यात येत नाही....."कुडकुडत, हातावर हात घासत एक स्त्री म्हणाली.
"बघा ना. कहर केलाय नुसता या थंडीने. जानेवारी महिन्यात थंडी वाढते पण एवढी?"
"अहो, तिकडे कुठे तरी कमी दाबाचा की उच्च दाबाचा पट्टा निर्माण झालाय म्हणे...."
"पट्टा कोणताही असो, थंडीने पातळी सोडलीय हे खरे. काम करावे हा विचारच मनात येत नाही."
"असे वाटतेय की, मस्तपैकी दोन -चार रजया अंगावर घ्याव्या नि गरम गरम पडून राहावे.."
"तेवढे कुठले आलय भाग्य बायकांचं..." अशी चर्चा चालू असताना एक जीप येताना दिसली. जीप, कार, मोटारसायकल अशी वाहने त्या परिसरात नवीन नव्हती परंतु येत असलेल्या जीपवरील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जसजशी ती जीप जवळ येत होती तसतसा फलकावरील मजकूर स्पष्ट दिसत होता. फलकावर लिहिले होते,
'जुने सोने द्या, नवीन सोने घ्या. देशातील विविध धार्मिक स्थळी जमलेले सोने देवतांचा प्रसाद म्हणून
विकत घ्या आणि काही दिवसातच चमत्कार बघा...."
गप्पा मारत असलेल्या बायका तो फलक वाचत असतानाच ती जीप त्या जत्थ्याजवळ येऊन थांबली. त्यामुळे त्यांची चर्चा थांबली. जीपबाबत जागी झालेली शंका, कुशंका, कुतूहल जागे होत असताना जीपच्या चालकाने विचारले,
"माधवीताई भाने कुठे राहतात?"
"अगोबाई, ह्याच की, त्या माधवीताई. काय हो सोने घेताय का? "
"घेताय? अहो, त्यांनी ऑलरेडी कालच आमच्या 'तिरुपती ऑनलाइन सोने' या साइटवर दागिने बुक केले आहेत. ते घेऊन आलोय. ताई, देऊ इथे की..."
"घरीच चला. पैसे इथे कुठे आणलेत मी?"
"होय! कॅश ऑन डिलिव्हरी' हे आमचे घोषवाक्य आहे."
"चला. या हो, तुम्ही पण या साऱ्याजणी. बघा तर माझी खरेदी..." असे म्हणत माधवीताई निघाल्या. जीपमध्ये असलेली भलीमोठी बॅग घेऊन तो चालक निघाला. पाठोपाठ एकमेकींना सहेतुक इशारा करीत तिथल्या बायकाही निघाल्या. मिनिटभरात तो सारा जमाव माधवीताईंच्या दिवाणखान्यात पोहोचला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूंनी मैदानात पोहोचल्याबरोबर आपापल्या जागा घ्याव्यात त्याप्रमाणे साऱ्या बायका मिळेल तिथे जागा पटकावून बसल्या. त्या माणसालाही बसायला खुर्ची मिळाली नाही तर माधवीस कुठून मिळणार? शेवटी त्या माणसाने कोपऱ्यातला टी पॉय मधोमध मांडला. हातातली बॅग त्यावर ठेवून तो खालीच बसला. नंतर बॅग उघडून त्यातील 'माधवीताई भाने' या नावाची छोटी पिशवी काढली. ती पिशवी उघडून आतील एक - एक दागिना टी पॉयवर ठेवत म्हणाला,
"ताई, ही आपली एकदाणी, हा चप्पलहार, हा नेकलेस, हे कानातले, हे बाजूबंद, हे कंगण, ह्या...."
"बाई, बाई, माधवीताई, अहो, केवढी ही खरेदी? आम्हाला न सांगता? आमच्यासाठी काही शिल्लक ठेवले की नाही?"
"अहो, बरोबर आहे त्यांचे. अशा मोठ्या खरेदीचा बोभटा करायचा नसतो. हळूच आपल्या जवळच्या लोकांना सांगायचे असते...."
"ताई, सारा माल तपासून घ्या. पैसे कसे देणार? चेक देणार की नगदी? कसे आहे, चेक दिला तर पावती द्यावी लागेल. पावती म्हटलं की मग जीएसटी, टॅक्स अशी भरोभरती करावी लागेल. जवळपास पन्नास-साठ हजार रुपयांचा तुम्हाला भुर्दंड बसेल.."
"अहो, ऑर्डर ऑनलाईन आहे ना, मग तिथे तर नोंद असेल ना?"
"ऑनलाईन ऑर्डर डिलीट करायला असा कितीसा वेळ लागणार? आम्ही माल दिला, तुम्ही तो घेतला चिडीचूप!..."
"किती रक्कम झाली आहे?"
"काल जी ठरलीय तेवढीच द्या. ही घ्या कच्ची पावती!"
"एक सांगा, उद्या काही पैशाची अडचण आली आणि हा माल मोडायची पाळी आली तर.... कसे आहे, पावती असली ना आणि दुसऱ्या कोणत्याही दुकानात मोडायला गेलो ना तरीही घट ही ठरलेलीच असते हो."
"आमची तिरुपती ऑनलाइन सोने ही सेवा चोवीस तास सुरू असते. एक कॉल केला की, आमचा माणूस लगेच आपल्या घरी येईल. घट वगैरे न कापता शंभर टक्के रक्कम तुमच्या हातात देईल."
"हे घ्या. सहा लाख पस्तीस हजार पाचशे दहा रुपये. मोजून घ्या."
"ताई, हा विश्वासाचा व्यवहार आहे......"
"काकू, तुम्ही येथे सर्वात अनुभवी आहात. हे सोने जरा जास्तच चकाकते का हो? ते म्हणतात ना हो, 'चकाकते ते सोने.."
"चकाकते तेच सोने असते ताई! तो जमाना गेला. आता सोन्याला मुलामा दिला ना तर बघा कसे चकाकते ते. मला सांगा, तुमच्या हातातील पाटल्या..."
"अस्सल सोने आहे ते. आमच्या घरात परंतु, वारसा हक्काने आलेले शंभर नंबरी सोने आहे ते. असले शंभर नंबरी आता दिसणारही नाही. एकेका पाटलीचे वजन पाच-पाच तोळे आहे म्हटलं."
"ते दिसतेच आहे. ताई, अस्सल माल कुठेही लपून रहात नाही. एक काम करा, मला तुमची एक पाटली द्या. अहो, द्या. मी का पळून जाणार आहे?" त्या विक्रेत्याने गळ घातली आणि त्या बाईने हुरळून जात हातातली एक पाटली त्याला दिली. पाटलीला खालीवर बघत त्याने पिशवीतून एक ब्रश आणि एक बाटली काढली. बाटलीतील द्रवाचे दोन थेंब त्याने ब्रशवर टाकले. नंतर ब्रशने त्या पाटलीला हलकेच घासले. दुसऱ्या क्षणी ती पाटली अशी चमकू लागली की, ती चमक बघून बायकांचे डोळे दिपले.
"काकू, आता सांगा, चकाकते तेच सोने असते ना?"
"म...म...माझ्या सगळ्या पाटल्यांना अशीच चकाकी आणून द्या ना. किती पैसे..."
"अहो, सगळाच व्यवहार पैशात नाही तोलता येत हो. आणा...." असे म्हणत त्याने सर्वच पाटल्यांना काही क्षणातच चमकावून दिले.
"का हो, तुम्हाला आत्ता ऑर्डर दिली तर उद्यापर्यंत सारा माल आणून देता का?"
"ताई, ऑर्डर द्यायची गरज नाही. मी सर्व प्रकारचे, लहानमोठे दागिने सोबत घेऊनच आलोय. आमच्या कॅटलॉगमधील एकूण एक नग इथेच पाहायला नि आवडला तर खरेदी करता येईल. बोला. काय दाखवू?"
"पण पैशाची व्यवस्था? हे तर ऑफिसमध्ये आहेत. चेक दिला तर जीएसटी लागेल म्हणता..."
"ताई, चिंता सोडा. सध्या डिजिटल जमाना आहे. नो प्रॉब्लेम! शिवाय नगाला नग....एक्सचेंज... कॅशलेस व्यवहार! तुम्हाला ऑनलाइन ट्रान्सफर करता येतील...." म्हणत त्याने ती भलीमोठी पिशवी उघडली. त्यामधून एक एक दागिना काढून सोबतच्या ट्रे मध्ये ठेवला. देवाची आरती फिरावी तसा तो ट्रे बायकांमध्ये फिरत होता......
"अहो, आपले एटीएम कार्ड घरीच आहे ना? काही विशेष नाही. गल्लीत एक फिरतीवाला आलाय. त्याचेजवळ की, नाही एकापेक्षा एक सुंदर, मनमोहक तयार दागिने आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशातील मोठमोठ्या मंदिरांमध्ये लोकांनी दान केलेल्या सोन्यापासून बनवलेले नग आहेत. त्यानिमित्तानं देवाचा प्रसाद मिळतोय. तेव्हा घेऊ का? घेतेच आहे. तुम्ही घरी याल ना तेव्हा तुम्हाला माझी अस्सल खरेदी पाहून आश्चर्याचा धक्काच बसेल. तुम्हाला विचारुनच एवढा मोठ्ठा व्यवहार करतेय बरे. पुन्हा विचारले नाही असे म्हणू नका. अहो, सगळ्या बायका घेत आहेत. तुम्हाला बोलत बसले तर ना कसे होईल माहिती आहे का? तुम्ही कसे आठवडी बाजारात अंधार पडल्यावर जाता, भाज्या स्वस्त मिळतात म्हणून आणि मग किडक्या मिडक्या भाज्या घेऊन येता. तसे इथे सोन्याचे होऊ नये. आज जरा या ना गडे लवकर. केव्हा एकदा चमचम सोन्याची खरेदी तुम्हाला दाखवीन असे झाले आहे आणि हो आज की नाही बाहेरच जाऊ जेवायला. बाहेर कशाला? खुळीच आहे मी. तुम्ही दिवसभर बाहेर मरमर करता....तुम्ही घरी आलात ना की, छानपैकी तुमच्या आवडीचे जेवण घरीच बोलावू या....." अशा प्रकारची चर्चा अनेक बायका आपापल्या नवऱ्यांसोबत करत होत्या. एक स्त्री तिच्या पतीशी बोलताना म्हणाली,
"काय म्हणता, आज गुरू पुष्यामृत योग आहे. वा! आपल्या दुकानात तर गिऱ्हाईकांची झुंबड असेल ना ? का हो? सकाळपासून एकही गिऱ्हाईक फिरकले नाही. का? असे म्हणता? ऑनलाइन खरेदी करीत आहेत लोक. बरे झाले. तुम्हाला समजले ते. अहो, मी त्यासाठीच फोन केलाय, इथेही एक ऑनलाइन सोनार ...म्हणजे एजंट आला आहे. भारतातील अनेक मोठमोठ्या देवस्थानाला लोकांनी अर्पण केलेल्या सोन्यापासून बनवलेले दागिने आणलेत. तुम्ही करता तशी भेसळ नाही त्यात. शुद्ध सोन्यापासून बनवलेले दागिने आहेत. अहो, मी तुमचीच बायको आहे. इतर बायकांपेक्षा मला सोन्याची पारख शंभर टक्के जास्त आहे. मी काय म्हणते, महत्त्वाचे म्हणजे यातला एकही नमुना आपल्या दुकानात मी आजवर पाहिलाच नाही. एकदम न्यू ब्रांड आहे. असे करा ना, तुम्हाला तर दुकान सोडून येता येणार नाही. गिऱ्हाईक देवाचे रुप असते, ते कोणत्या रुपात केव्हा येईल ते सांगता येत नाही. एक काम करा ना, बाबूरावसोबत दहा लाख रूपये लगेच पाठवून द्या. तोपर्यंत मी माल निवडून ठेवते. आणि हो एक्सचेंज ऑफर असल्यामुळे मी आपले जुने सारे दागिने देऊन नवीन दागिने घेते. मी यासाठी म्हणतेय की, असे अस्सल सोने आपणासही मिळत नाही. त्यामुळे मी घेत असलेल्या सोन्यात बेमालूमपणे भेसळ करून विकताही येईल. नवीन व्हरायटी म्हटल्यावर बायकांच्या अमावस्येलाही उड्या पडतील. निघाला का बाबूराव? ठेवते."
"अहो, दादा, माझ्या घरी चला ना. बारा-पंधरा लाखाचे दागिने घेईन म्हणते."
"ताई, माझी अडचण समजून घ्या ना. प्रत्येकीच्या घरी जायचे म्हणजे किती वेळ जाईल? त्यापेक्षा इथेच पसंत करा. घरातून कार्ड किंवा पैसे घेऊन या...."
"अहो, वहिनी, मी तो चप्पलहार पसंत केलाय..."
"पसंतच केलाय ना?घेतला नाही ना? हा विकत घेतला मी. पसंत करणे आणि घेणे यात खूप फरक असतो म्हटलं."
"नाही. जमणार नाही. भाऊ, तो हार मलाच पाहिजे हं..."
"मी घेतला म्हणजे घेतला. वाटल्यास हजार, दोन हजार रुपये जास्त घ्या पण हा हार मी सोडणार नाही..."
"थांबा. थांबा. तुम्हाला दोघीनाही हीच चप्पल..... सॉरी! हाच चप्पलहार पाहिजे ना? हरकत नाही. माझ्याकडे अगदी अस्साच सेम टू सेम नग आहे...."
"नको. सेम टू सेम मुळीच नको. उद्या यांचा हार चोरीला गेला ना तर ह्या माझ्यावरच चोरीचा आळ घालतील.... "
"ए भवाने, जरा शुभ तर बोल....."
"असे करा. मला यापेक्षा वेगळ्या डिझाइनचा द्या. थोडा वजनदार असला तरीही चालेल."
"हां. ये हुई ना बात. हा घ्या. दुसरा चप्पलहार. त्यापेक्षा सुंदर, मनमोही...."
"का रे भाऊ, मी काय कवड्या मोजते काय? तिला माझ्यापेक्षा चांगला देतोस आणि मला...."
"ताई, हाही सुंदरच आहे. बोलायची भाषा असते. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पहिल्या नजरेत पसंतीला आलाय ना...पहला पहला प्यार..."
"हे बघा. मी हे सारे दागिने पसंत केले आहेत. बील करा...." एक स्त्री म्हणाली आणि लगेच त्याने काही क्षणात हिशोबाचा कागद त्यांच्या हातात देत म्हणाला,
"एकवीस लाख एकवीस हजार एकवीस रुपये... व्वा! काय शुभ आकडा आलाय. द्या ....."
"तुम्ही केलेल्या हिशेबाप्रमाणे पैसे देत आहे. काही कमी जास्त...."
"ताई, सोन्याच्या दुकानात आजपर्यंत कधी भाव केलात का? भावात घासघीस ही भाजीपाला, किराणा फार तर कपड्याच्या दुकानात करायची असते. तुम्हाला भावाची शंका येत आहे का? तर मग लावा टीव्ही. एका क्षणात सारे तुमच्यासमोर येईल. माधवीताई, प्लीज. एका मिनिटासाठी टीव्ही लावा....." तो माणूस सांगत असताना माधवीने टीव्ही लावला. त्याने सांगितलेली वाहिनी लावली.
"बघा. सोन्याचा बाजारभाव पस्तीस हजार रुपये तोळा आणि आम्ही लावलाय बत्तीस हजार! शिवाय दुकानात करणावळ, जीएसटी इत्यादी..."
" हो. हो. आमच्या दुकानात आम्ही मजुरी, जीएसटी सारे काही लावतो....आले का, बाबूराव? आणलीत का रक्कम?"
"होय. ताईसाहेब, हे पूर्ण पंधरा लाख रुपये आहेत. मालकांनी मला सांगितलय की, एकदा सोने बघून घ्या म्हणून...."
"काही नको. बाबूराव, मी सोन्यातला फरक ओळखू शकते. तुम्ही या. काळजी करू नका. अस्सल माल आहे..."
तितक्यात एक बाई तिथे धावतच आली. श्वास वर झालेल्या अवस्थेत म्हणाली,
"त..त..तुम्ही आहात ना इथे, मला तर बाई देवच पावला. अहो, झाले काय, चोराच्या भीतीने सारे दागिने लपवून ठेवावे लागतात. थोडेथोडके नाही तर चांगले वीस तोळ्यांचे आहेत. पाई-पाई करून कण-कण सोने जमवले आहे. छताकडे तोंड करून असलेल्या छताच्या पंख्याच्या टोपीमध्ये हा सारा ऐवज लपवला होता. तुमच्या एक्सचेंज ऑफरचा एवढा आनंद झाला म्हणता की, आनंदाच्या भरात सगळे दागिने कुठे ठेवलेत हेच विसरून गेले. सारे घर शोधले. धान्याचे डबे,पलंग-आलमारीचे चोर कप्पे, भिंतीवर लटकवलेल्या फोटोंच्या मागे पण कुठेच सापडत नव्हते. झाले. माल चोरीला गेला या विचाराने अशा थंडीतही अक्षरशः घामाने चिंब झाले. गर्मी होतेय म्हणून पंखा लावावा हा विचार मनात येताच पंखा सुरू करण्याचे बटण दाबले आणि खाडकन डोक्यात वीज शिरल्याप्रमाणे आठवले की, दागिने तर पंख्याच्या टोपीत आहेत. पण काढावे कसे? बँकचे लॉकर असो किंवा असा लपवून ठेवलेला ऐवज असो ते काढण्याचे काम ह्यांचे. हे तर ऑफिसमध्ये. शेवटी स्टूल घेतला आणि हिंमत करुन वर चढले. पण स्टूल लागला लखलख हलायला. शरीर लागले कापायला. भीतीने थरथर कापत शेवटी पंख्याला लटकावे......"
"म्हणजे फाशी घेत होतात..."
"थांबा हो. तर मी कुठे होते? पंख्याला लटकले होते. प्रयत्न करून शेवटी त्या टोपीत दडवलेले सारे दागिने काढले आणि पळतच आले. मामा, हे घ्या, दागिने. एक्सचेंज करून द्या..." म्हणत त्या स्त्रीने हातातले गाठोडे त्या माणसाजवळ दिले. त्याने ते सोडले. प्रत्येक दागिणा खाली वर, आजूबाजूला फिरवत बघितला आणि रागारागाने म्हणाला,
"ओ बाई, मुर्ख समजलात काय? सोने विकता-विकता आयुष्य गेले. एक ग्राम सोन्यापासून बनवलेले दागिने माझ्या माथी मारुन अस्सल सोन्याचे दागिने बळकावण्याचा विचार होता की काय? ताई, तुमचेही सोन्याचे दुकान आहे ना, बघा जरा हा नकली माल आहे की नाही ते?"
"अग बाई, हा तर आमच्याच दुकानातला माल आहे की. आम्ही 'एक ग्राम सोन्याचे दागिने तयार करून विकत असतो. तेवढीच गरिबागुरबाची सोन्याचे दागिने घालायची हौस भागते."
"बाई, मुकाट्याने इथून गाशा गुंडाळा. नाही तर मला पोलिसांची मदत घ्यावी लागेल...." तो माणूस तिला बजावत असताना ती बाई त्याच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने बघत निघून गेली..... तितक्यात दुसरी एक महिला डबडबलेल्या डोळ्यांनी तिथे आली आणि म्हणाली,
"दादा, हे तुमचे दागिने परत घ्या आणि मी दिलेला आमचा माल परत द्या....."
"काय झाले हो ताई?"
"नवऱ्याला फोन करून सांगितले तर ते म्हणाले की, आपले दागिने वडिलोपार्जित आहेत. ते बदलून घ्यायचे नाहीत."
"अहो, त्या जुन्या घडणावळ असलेल्या दागिन्यांच्या बदल्यात मी तुम्हाला किती आकर्षक आणि नव्या बनावटीचे दागिने दिले होते ...."
"होय हो. म्हणूनच तर मी घेतले होते. त्यांच्या लक्षात यावे म्हणून मी सारे फोटोही व्हाट्सएपवर टाकले होते परंतु ते ऐकायला तयारच नाहीत. ते म्हणाले की, जुने ते सोने. तुला जुने दागिने नको असतील तर माझ्या घरात राहायचे नाही."
"कसे आहे ताई, झालेला व्यवहार असा मोडता येत नाही हो."
"पण दादा, तुम्ही तरी समजून घ्या ना, माझ्या संसाराचा प्रश्न आहे हो." ती स्त्री काकुळतीने हात जोडत म्हणाली.
"ठीक आहे. दंड म्हणून दहा हजार रुपये भरा आणि तुमचा वाण सोडवून घ्या."
"जास्त होतात हो. पण नाइलाज आहे. अधूनमधून नवऱ्याने दिलेले शे-पाचशे आणि नवऱ्याच्या खिशातून गुपचूप काढून घेतलेले आहेत. हे घ्या......" म्हणत तिने हातातील पर्स उघडली आणि त्यातून चुरगळलेल्या, घडी पडलेल्या नोटा त्याच्या हातात दिल्या. पुन्हा दागिन्यांची देवाणघेवाण करून ती स्त्री तिथून बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ मोठी खरेदी करून बाहेर पडलेल्या महिलेचा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर नवऱ्याचे नाव पाहून तिने तो उचलला.
"झाली का ग खरेदी?" नवऱ्याने विचारले.
"होय हो. काय मस्त नवनवीन ब्रँड मिळाले ना की असा वाण आजवर कुणी पाहिलाच नाही. दुकानात जाऊनही असा दागिना मिळाला नसता...."
"तुला आवडले ना मग झाले. पण का ग पैसे कुठले दिले?"
"अहो, हे काय विचारणे झाले? न्हाणीघराच्या छतामध्ये जे नकली नोटांचे लॉकर आहे ना ...."
"अग, त्या खऱ्या, असली नोटा होत्या. संडासमध्ये खिडकीच्या बाजूला जो न दिसणारा कप्पा आहे ना त्यात नकली नोटा आहेत...."
"खरेच की हो, मला आत्ता लक्षात आले बघा. महत्त्वाचे म्हणजे तो माणूस कुणाच्याही नोटा मोजत नाही हे पाहून ना मी त्याला चक्क पन्नास हजार रुपये कमी दिले पण घोळ झालाच. अस्सल सोन्याचे, मनपसंत दागिने मिळाले या आनंदाच्या भरात की नाही मी ते असली नकली नोटांच्या जागा विसरूनच गेले बघा. पण जाऊ द्या ना. असली दिल्या असल्या तरी तुमचा कुठे घामाचा पैसा होता. 'पुणे लुटून साताऱ्याला दान करायच्या ऐवजी एखादे वेळी सातारा लुटून पुण्याला दान केले ' तर काही बिघडणार नाही. शेवटी नोटाच त्या. बाप रे! आपले बोलणे बायका कान देऊन ऐकत आहेत हो. ठेवते. घरी आल्यावर बोलू...." असे म्हणत ती स्त्री लगबगीने घराकडे निघाली.....
सायंकाळी कार्यालयातून घरी परतलेले माधुरीचे पती भाने दिवाणखान्यात बसून टीव्ही पाहात होते. सहज म्हणून त्यांनी स्थानिक बातम्यांची वाहिनी लावली आणि त्या वाहिनीवर चालू असलेली बातमी पाहून त्यांना फार मोठ्ठा धक्का बसला. बसल्या जागेवरूनच ते ओरडले,
"अग...अग,माधवी, लवकर ये." नवऱ्याचा घाबरलेला आवाज ऐकून माधवी धावतच बाहेर आली.
"क..क...काय झाले हो?"
"ब...बघ...ती बातमी ऐक....."
'शहरात कालपासून 'ऑनलाइन सोने' खरेदीची धूम चालू आहे. वीस-पंचवीस माणसांचा एक समूह शहरात घुसला असून शहरातील विविध भागात जाऊन देशातील मोठमोठ्या देवस्थानाकडे जमलेल्या सोन्यातून बनवलेले दागिने आहेत असे सांगून भोळ्या भाबड्या बायकांना फसवून पूर्ण अशुद्ध, बनावट सोने त्यांच्या गळ्यात घालण्याचे प्रकार चालू आहेत. अशा काही विक्रेत्यांना पोलिसांना अटक केली असून त्यांनी गंडवलेल्या घरांचा शोध घेऊन त्या घरांवर पोलीस धाडी टाकून त्यांनी घेतलेले सोने जप्त करणार आहेत. शिवाय त्या व्यवहारासाठी त्यांच्याजवळ तेवढी रक्कम किंवा एक्सचेंज केलेले सोने कुठून आले ही चौकशीही पोलीस करणार आहेत. चौकशीत आक्षेपार्ह काही आढळून आल्यास त्या खरेदीदारावरही पोलीस कडक कार्यवाही करणार आहेत. शहराच्या विविध भागातून अटक केलेले हेच ते संशयित गुन्हेगार.....विक्रेते!...." ती निवेदिका सांगत असताना टीव्हीवर जी माणसे पकडली होती ती दाखवत होते. ते पाहून माधवी धपकन सोफ्यावर बसली. घाबरलेल्या, श्वास कोंडलेल्या अवस्थेत ती म्हणाली,
"अ....अहो, हाच तो माणूस इथे .... म..म..मला सोने देऊन गेला..."
"काssय? "असे ओरडण्याऱ्या नि घामाने डबडबलेल्या भानेंच्या हातातील रिमोट दाणकन खाली पडला.......
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका फेज ०१
क्रांतिवीर नगर लेन ०२
संचेती शाळेजवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१