टोळी मुकादम Nagesh S Shewalkar द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

टोळी मुकादम

::::: टोळी मुकादम :::::
हातातल्या वर्तमानपत्रातवर फिरणारी शंकरची नजर एका बातमीवर स्थिरावली. बातमीचे शीर्षक आणि नंतर ती बातमी त्याने अधाशासारखी वाचून काढली. तो मनात म्हणाला,
'वॉव! हवे ते सापडले. 'मनी वसे, स्वप्नी दिसे ते प्रत्यक्षात असे !' याच बातमीची तर मी चातकासारखी वाट बघत होतो. ही बातमी अगोदर विठ्ठलला सांगितली पाहिजे...'असे पुटपुटत शंकरने विठ्ठलचा भ्रमणध्वनी लावला.
"बोला. शक शक बुम बुम, काय म्हणता?"
"माउली, ऐका ना, मला की नाही, हवे ते सापडले. ज्याची मी वाट पाहात होतो ना तशी...."
"काय? सापडली कुठे? कशी? काय नाव आहे रे तिचे? दिसायला सुंदर आहे ना?"
"व..व...विठू, असा कासावीस होऊ नकोस. पूर्णपणे न ऐकता असे इमले रचू नयेत रे. अरे, वर्तमानपत्रात बातमी आलीय की, टोळी मुकादमच्या जागा निघाल्या आहेत."
"टोळी मुकादम? ही रे कोणती पोस्ट?"
"अरे, मी तुला नेहमी म्हणतो ना की, मला भ्रमणध्वनीवर एक टोळधाड.... टोळी निर्माण करून त्या टोळीचा प्रमुख म्हणजे टोळी मुकादम व्हायचे आहे."
"तुलाझाल्यान म्हणायचे आहे का?"
"तेच ते. आपल्या मराठी माणसांची हीच समस्या आहे. मराठी बोला, मराठीचा वापर करा असे पोटतिडकीने म्हणायचे आणि स्वतःच इंग्रजीच्या पदराआड लपायचज. होय. ऍडमीन पदासाठी मुलांना मुलाखती आहेत."
"आश्चर्य आहे. त्या पदासाठी मुलाखत कशासाठी? ये पद तर तसे स्वयंनियुक्त आहे. अंगठा बहाद्दर पासून ते पंचवीसपेक्षा जास्त पदवी घेतलेला, आबालवृद्ध, स्त्री-पुरुष कुणीही ऍडमीन होऊ शकतो. तुला सांगू काय, मी परवाच एक बातमी वाचलीय...देश कोणता ते आठवत नाही परंतु त्या शहरात एक व्हाट्सएप ग्रुप सुरू झालाय. त्याचे सदस्य कोण आहेत तर चक्क आईच्या गर्भाशयात असणारी मुले.त्या समुहाचे नावच मुळी 'गर्भाशयातील मुले'असे आहे. ते जाऊ दे. या मुलखतीसाठी वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अनुभव अशा काही अटी तटी आहेत?"
"काही नाही. अगदी भ्रमणध्वनी नसला ना, तरी निवड झाल्यावर तेच देणार आहेत."
"मग तू घेणार का प्रशिक्षण आणि मोबाइल?"
"प्रशिक्षण घेईल पण भ्रमणध्वनी घेणार नाही. तुला माहिती आहे, माझा भ्रमणध्वनी किती महागडा आहे ते. हातात मोबाइल घेऊन बाहेर पडलो की, पोरींचे लक्ष माझ्याकडे आणि माझ्या मोबाइलवर जास्त असते. तू येशील का मुलाखतीसाठी?" शंकरने विचारले.
"कुणाच्या? मुलींच्या? किती जणी आहेत? मला काय वाटते, सर्वांना एकदाच भेटण्यापेक्षा एक-एक करून मुलाखत घेतली तर?"
"विठ्या, मी टोळी मुकादम या मुलाखतीसाठी म्हणतोय."
"नाही रे बुवा! ती कामगिरी मला झेपायची नाही. तुझी तुलाच लखलाभ. अरे, आजकाल काय कुणालाही ऍडमीन होते.तुला सांगू का, हे मोबाइल आणि व्हाट्सएपचे खूळ असेच राहिले ना तर आत्ता गर्भाशयातील मुलांनी तयार केलेल्या ग्रुपनंतर दुसरा एक समूह तयार होईल तोही आपल्या देशात आणि तो असेल नुकत्याच जन्मलेल्या मुलांचा...न्यू कमर्स व्हाट्सएप ग्रुप..."
"व्वा! माउली, व्वा! लै भारी विनोद मारलास की. अरे, मी जेव्हा टोळधाडीचा मुकादम होईल ना तेव्हा तुझा हा विनोद सर्व प्रथम माझ्या गटात पोस्ट करील."
"शंकरा, तू खरेच सिरीयस आहे का?"
"नाही बुवा. मला काय धाड भरलीय. सिरीयस व्हायला? मला कोणताही आजार नाही..." शंकर हसत हसत म्हणाला.
"शंक्या, ते सिरीयस नाही रे. ऍडमीन होण्यासाठी तू खरेच गंभीर आहेस का?"
"होय. ऑफकोर्स! आय वाँट टू बीकेम अ फंटास्टीक मुकादम."
"व्वा! आता कुठे गेला रे तुझा मराठीचा पुळका? तुला ते एवढे सोपे वाटते का? अरे, गटातील लोक बारा गावचे, बारा घरचे पाणी प्यायलेले असतात तर काय अनेक समुहांमध्ये परदेशातील भारतीय नागरिक आहेत.अरे, कुणी काहीही पोस्ट टाकतात. एखाद्या मजकुरासंदर्भात वाद माजला, कुणी तक्रार केली की, प्रमुखाला जबाबदार धरल्या जाते. तसे हे ऍडमीनही काही कमी नसतात. तू म्हणतोस त्याप्रमाणे मुकादम हे त्यांच्या हाताखालील मजुरांना जशी वागणूक देतात ना, अगदी तशीच वागणूक हे समूहप्रमुख देतात..."
"म्हणजे?" शंकरने विचारले.
"अरे, गटात कुणाला घ्यायचे, कुणाला काढून टाकायचे हे त्या ऍडमीनच्या मनावर. तुला माहिती आहे, मी अधूनमधून कविता करतो. त्यामुळे मला एका साहित्यिक समूहात सामावून घेतले तेही कुणाशी ओळख नसताना. त्या प्रमुखाला गुड मॉर्निंग, गुड नाइट, अभिनंदन, आभार व्यक्त करणारा मजकूर चालत नाही. असे कुणी काही टाकली की, आमचा समूह प्रमुख लगेच तंबी देतो. शिवाय हा प्रमुख दरवर्षी एक दिवाळी अंक प्रकाशित करतो. त्याच्या म्हणण्यानुसार तसा दिवाळी अंक इतर कुणी काढत नाही. त्याचा दिवाळी अंक एवढा वाचकप्रिय आहे म्हणे की,वाचकांच्या उड्या पडतात.
त्या अंकात आपले साहित्य प्रकाशित व्हावे म्हणून साहित्यिक नाना खटपटी करतात, आर्जव करयात. तर गतवर्षी या संपादकांनी एक नोंद व्हाट्सएपवर टाकून ज्यांचे साहित्य दिवाळी अंकासाठी अस्वीकृत ठरले, त्या सर्वांची नावे त्यात टाकली. त्यामुळे समूहावर असा वाद माजला ना की, विचारु नको. एका लेखिकेने तर माझे साहित्य सर्वोत्कृष्ट असताना, मला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळालेला असताना माझे साहित्य संपादकांनी नाकारल्याने चक्क आत्महत्त्येची धमकी दिली....."
"अरे, बाप रे! आत्महत्त्या केली की काय?"
"पोकळ धमकी रे. दुसऱ्या एका समूहातील एका स्त्रीने समूहावर छायाचित्रे टाकू नयेत अशी मागणी केली होती. कारण काय तर म्हणे ती पंचवीसपेक्षा अधिक गटांमध्ये आहे.रोज अशी बिनकामाची छायाचित्रे टाकली की, ती पाहण्यातच खूप वेळ जातो. मोबाइलची गॅलरी फुल्ल होते. मग ती गॅलरी धुऊन काढण्यासाठी भरपूर वेळ जातो, बॅटरी लवकर संपते. महिलांना इतरही खूप कामे असतात. भ्रमणध्वनीच्या चक्रव्यूहात सापडले की, इतर कामांकडे दुर्लक्ष होते. कामासाठी उशीर झाला की, नवऱ्याचा, सासूचा राग, संताप सहन करावा लागतो त्यामुळे कुणालाही छायाचित्रे टाकण्याची परवानगी देऊ नये. तुला आधी सांगितलेल्या किरकिऱ्या मुकादमाचे उदाहरण सांगतो. आमचा समूह लेखकांचा असल्यामुळे रोज कुणा ना कुणाची कथा, लेख, कविता, चारोळी, अभिप्राय किंवा मिळालेल्या पुरस्काराची बातमी वर्तमानपत्रात आली की मग ती व्यक्ती ते कात्रण मोठ्या आनंदाने समूहावर टाकते. पण ही गोष्ट समूहप्रमुखाला चालत नाही. तो लगेच तंबी देतो की, असे मजकूर समूहावर टाकू नयेत. वर्तमानपत्रात आलेली बातमी, साहित्य सारेच वाचतात. एवढे करून तो थांबत नाही...."
"मग? पोलिसात तक्रार करतो की काय?" शंकरने विचारले.
"तसे काही नाही करत. परंतु त्या सदस्याला ताबडतोब समूहातून काढून टाकतो. त्यातही गंमत अशी की, सकाळी डिलीट केलेल्या सदस्याला सायंकाळी आणि सायंकाळी काढून टाकलेल्या सभासदाला पुन्हा सकाळी गटामध्ये सामावून घेतो....."
"विठ्या, हा प्रकार म्हणजे जणू 'कोर्ट उठेपर्यंत शिक्षा' असाच आहे की."
"अगदी बरोबर!दोन-तीन वेळा काय झाले माहिती आहे, एखाद्या सदस्याला सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला डिलीट केल्याचा संदेश येतो न येतो तोच आठ एकतीसला त्याच सदस्याला पुन्हा समाविष्ट केले असल्याचा मजकूर येतो." विठ्ठल म्हणाला.
"भारीच आहे हं, तुझा मुकादम." शंकर म्हणाला.
"काल सकाळी त्याने एक पोस्ट टाकली, त्यानुसार गटातील प्रत्येकाने आपापल्या आधारकार्डचे छायाचित्र समूहावर टाकावे. समूहावर सदस्याने टाकलेले नाव आणि आधारकार्डावरील नाव एकच असले पाहिजे...."
"म्हणजे? दोन्ही नावे एक नसतात. माझे तर दोन्हीकडे एकच नाव आहे."
"कसे आहे, आजकाल ग्रुपवर अनेक व्यक्ती टोपणनावे किंवा आईने, बायकोने, मित्राने, मैत्रिणीने दिलेले लाडाचे नाव टाकू लागले आहेत. आमच्या समूहप्रमुखाला असली टोपणनावे, लाडाची नावे चालणार नाहीत. आधारवरील जे नाव तेच समूहावर.....नो चेंज! शिवाय प्रत्येकाने त्याचा आधार क्रमांक म्हणे समूहप्रमुखाच्या आधारसोबत लिंक करावा. त्यासाठी त्याने अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिली आहे. लिंक न केल्यास त्याला ग्रुपवर काढून टाकणार आहे...."
"कमाल आहे यार, तुझ्या टोळीचा मुकादम..."
"अरे, त्याने अजून एक फर्मान काढले आहे, तो म्हणतो, इतर कोणत्याही समूहावर अगोदर प्रकाशित झालेला मजकूर नंतर आपल्या ग्रुपवर टाकू नये, शेयर करु नये. हे असे करणे म्हणजे भिकाऱ्याला शिळे अन्न वाढल्याप्रमाणे आहे. कारण अगोदरच्या समूहामध्ये तो संदेश वाचून-वाचून चोथा झालेला असतो. तो म्हणतो, पहिली पोस्ट, पहिले वाचन म्हणजे जणू मधूचंद्र!"
"व्वाह! ही उपमा मात्र लै भारी! मधुचंद्र!"
"पुढे तो म्हणतो, एखादी पोस्ट भारीच चांगली असेल तर ती आपल्या गटात स्वतःच्या नावाने टाका. शिवाय सर्वप्रथम आपल्या समूहावर टाकलेला मजकूर इतर समूहांवर टाकायला हरकत नाही. असे करताना त्याच्या शीर्षकात, मजकुरात काही बदल करावेत. ज्याप्रमाणे स्त्रिया एकाच दिवशी दोन कार्यक्रमांना उपस्थित राहताना वेगवेगळा श्रुंगार करतात त्याप्रमाणे." विठ्ठल म्हणाला.
काही तरी आठवल्याप्रमाणे शंकर अचानक म्हणाला, "माउली, माझ्या एका गटात वेगळीच चर्चा रंगली आहे. त्या समूहात बायकाही भरपूर आहेत. प्रकरणाची सुरुवात करताना एका स्त्रीने अशी तक्रार केली की, कुणी तरी एक नवीन ग्रुप काढला आहे. मलाही त्यात समाविष्ट केले आहे. दोन-तीन दिवसांपासून त्या गटातील कुणीतरी माझ्या वैयक्तिक क्रमांकावर अश्लील संदेश आणि घाणेरडे छायाचित्रे पाठवत आहे."
"बाप रे बाप! मग काय केले?"
"त्या बाईंपासून स्फूर्ती घेऊन त्या गटातील अनेक स्त्रिया पुढे आल्या आणि त्यांनीही तशीच तक्रार केली. त्या सर्व चर्चेत एक गोष्ट पुढे आली की, कुण्यातरी माथेफिरू माणसाने स्वतःचा एक समूह बनवला असून वेगवेगळ्या समूहातील महिलांना त्या समूहात समाविष्ट केले आहे. पुढे जाऊन समूहातील महिलांना घाण संदेश आणि छायाचित्रे टाकत होता. काही महिलांनी त्याची तक्रार पोलिसात केली आहे."
"बरे झाले. फोडून काढायला पाहिजे अशा नराधमांना..."विठ्ठल रागाने म्हणाला.
"एक सांग, मुलाखतीसाठी जाताना विशेष काय तयारी करू?"
"विशेष काही नको. नेहमी जी करतोस तीच. महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाचे एक फार मोठे पोते सोबत घेऊन जा. कसे आहे, कोणत्याही परीक्षेच्या, मुलाखतीच्या तयारीसाठी वेगवेगळी पुस्तके असतात. त्यांचा अभ्यास करून सारे मुलाखतीसाठी जातात पण 'ऍडमीनसाठी मुलाखत' हा पहिलाच प्रयोग आहे. ना तर त्याचा अभ्यासक्रम आहे ना त्याची शिकवणी..."
"माउली, तू सांगत असताना मला एक सुचले, कुणीतरी शिक्षण मंत्र्यांना सुचवायला हवे की, शालेय स्तरावर 'टोळी मुकादम' हा अभ्यासक्रम लागू करावा...."
"थांब. मला एक उपाय सापडला आहे. अरे, मोबाइलवर 'गुगल' नावाचा एक गुरु आहे. हा गुगल म्हणजे जणू कल्पवृक्ष! हवे ते देणारा! तर अशा या कल्पवृक्षाकडे प्रार्थना केली ना तर समूह प्रमुखाबाबत बरेच काही माहिती मिळेल. त्या माहितीचा अभ्यास कर आणि मुलखातीला जा."
"क्या बात है! पावलास विठ्ठला, पावलास रे बाबा. अजून दोन दिवस हातात आहेत. मी गुगलवर शोधतो. तू ही शोध. उद्या संध्याकाळी आपण भेटू तुला सापडलेली माहिती दे. बाप रे! विठ्ठला, आपण फोनवर किती वेळ बोललोत रे. कृपा त्या मोबाइल कंपनीची ज्यांनी स्वस्तात सेवा उपलब्ध करून दिली बाबा."
"हो ना. ठीक आहे. उद्या भेटूया...." विठ्ठल म्हणाला. शंकर भ्रमणध्वनी बंद करून बाहेर आला. बैठकीत त्याचे आईबाबा बसले होते. शंकर म्हणाला,
"बाबा, मला पाच हजार रुपये पाहिजेत....."
"पाच हजार? कशासाठी?" बाबांनी विचारले
"उद्या माझी मुलाखत आहे. त्यासाठी नवीन कपडे...."
"अरे, परवाच दसऱ्याला तर नवा ड्रेस घेतला की..."
"आई, तो ड्रेस मुलाखतीसाठी चालत नाही."
"दसरा आणि मुलाखत दोन्हीकडे चालेल असा टू इन वन ड्रेस का नाही घेतला?" बाबांनी विचारले.
"बाबा, तसे नसते हो. तुम्ही देणार आहात की नाही?"
"एवढी भारीची कापडं घालून नोकरी मागायला गेला तर तुला कोण बेकार समजेल? हा श्रीमंत घरचा पोट्टा आहे असे समजून कुणी नोकरी देणार नाही...."
"बाबा, ते मलाही कळते हो. ड्रेस पाच हजाराचा घेणार नाही. दुसऱ्याही बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत." शंकर म्हणाला. शेवटी बाबांकडून पाच हजार रुपये घेऊन तो बाहेर पडला.....
बाजारात जाऊन शंकरने बरीच खरेदी केली. घरी येऊन हातपाय धुतले. एका खुर्चीत भ्रमणध्वनी ठेवला. घरात जाऊन पुजेच्या सामानाची जुळवाजुळव केली. बाहेर येऊन विधिवत भ्रमणध्वनीची पूजा केली. हार घातला. फुलवात आणि उदबत्तीने ओवाळले. पेढ्याचा नैवेद्य दाखवून मनोमन प्रार्थना केली. त्याची ती गडबड कौतुकाने पाहणाऱ्या आईने विचारले,
"शंकरा, नवा मोबाइल घेतलास का? चार तर महिने झाले ना, या भारीच्या मोबाइलला. दिसायला अजूनही नवाच आहे."
"आई, नवा नाही. तोच आहे ग. उद्या जी मुलाखत आहे ना, ती मोबाइल संदर्भात...."
"मोबाइल कंपनीत मुलाखत आहे? छानच की. पगारही भरपूर असेल. सगळं काही फुकटात असेल ना? फोन तर एकदम फ्री असणार. बरे होईल बाबा. आजकाल कसे झाले आहे, खायला पैसे कमी आणि मोबाईलला जास्त."
"आई, लगेच पैशाची चर्चा नको ग. आधी मुलाखत तर होऊ दे. मग काय ते बघू." शंकर म्हणाला. जेवण होताच शंकर खोलीत गेला. त्याने ताबडतोब गुगलवर 'admin' सर्च केले. काही वेळातच त्याच्या भ्रमणध्वनीवर आलेली माहिती वाचायला सुरुवात केली. अनेक मजेशीर, भन्नाट किस्से त्याला सापडत गेले. महत्त्वाची माहिती आणि अनेक विनोदी किस्से त्याने भ्रमणध्वनीत जतन करून ठेवले.....
दुसरे दिवशी सकाळी शंकर आणि विठ्ठल त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटले. चहा घेताना शंकर म्हणाला,"माउली, गुगलवर मुलाखतीच्या दृष्टीने फार काही हाती लागले नाही. परंतु जे सापडले ते भलतेच भन्नाट आहे."
"हो ना. समूहप्रमुखाच्या संदर्भात किती मजेदार विनोद सापडलेत. तुला एक किस्सा सांगतो, एका टोळी प्रमुखाने नियम केलाय म्हणे, समूहातील ज्या कुणास नोकरी-व्यवसाय वा अन्य कामासाठी बाहेर जायचे आहे, त्या प्रत्येकाने स्वतःच्या भ्रमणध्वनीवरून समूहात रोडमॅप टाकावा. दुर्दैवाने एखादा सदस्य संकटात सापडला तर समूहातील कुणी ना कुणी त्याच्या मदतीला जाऊ शकेल. दुसरे म्हणजे आज वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलण्याची वाइट सवय सर्वांनाच लागली आहे. जो सदस्य अशी कृती करताना दिसेल त्याला सावध करता येईल."
"विनोदाचा भाग सोडला तर ही खरेच कल्याणकारी योजना आहे. एका गटाच्या प्रमुखाने तर असा निर्णय घेतला म्हणे की, त्या समूहाचा आणि गटातील प्रत्येकाच्या भ्रमणध्वनीचा डी. पी. एकच असावा...ड्रेसकोडप्रमाणे! हा डी. पी. दररोज सकाळी स्वतः समूह प्रमुख बदलेल."
"मी वाचले ते असे की, एका टोळी नायकाने सुचवलेय की, ग्रुप सोडणाराने 'लेफ्ट' न होता 'राइट' बाजूने गट सोडावा. काय तर म्हणे राइट शुभ असते."
"खरेच एक एक भारी विनोद आहेत. एका टोळधाडीच्या नायकाने असा नियम केला आहे की, त्याच्या गटात अशाच सदस्यांना ठेवले जाइल ज्यांना दहावीत ऐंशी आणि बारावीत पंच्याहत्तर टक्के गुण असतील. कमी गुण धारकांना गटातून रिमूव केले जाइल. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या दोन्ही वर्षीच्या गुण पत्रिका गटात टाकाव्यात....."
"हे तर काहीच नाही. एका टोळीच्या मुखियाने तर त्याच्या व्हाट्सअप समूहात प्रवेश देण्यासाठी चक्क प्रवेश परीक्षा ठेवलीय."
"चांगले आहे. सदस्याला डिलीट करण्याच्या संदर्भात एक लै भारी पोस्ट वाचण्यात आलीय. त्यानुसार एका गटाच्या कर्णधाराने तंबी दिलीय की, आपल्या समूहात प्रत्येकाने एका कुटुंबात राहिल्याप्रमाणे राहावे. छोट्या छोट्या कारणामुळे समूह सोडू नये. कोणाला गटात घ्यावे आणि कुणाला गटातून काढून टाकायचे हा निर्णय मुकादमांनी राखून ठेवला आहे. एखाद्या सदस्याचे वर्तन, त्याने टाकलेली छायाचित्रे, मजकूर मुकादमाला आवडली नाही तर त्या सदस्याला दोन वेळा सूचना देण्यात येईल. तरीही त्याची वागणूक सुधारली नाही तर शेवटी तीन वेळा 'डिलीट! डिलीट!! डिलीट!!!' असे लिहून त्याला गटातून काढले जाईल. नंतर कुणाच्याही शिफारशीनुसार त्याला पुन्हा गटात घेतल्या जाणार नाही."
"मी वाचलेला संदेश तर फारच वेगळा आहे. एका गटातील काही व्यक्ती केवळ आणि केवळ महिलांनी टाकलेली छायाचित्रे आणि मजकुरास भरभरून प्रतिसाद देतात. कौतुकाचा वर्षाव करतात. त्या गटात तसे करता येणार नाही...."
"ही बाब सर्वच गटात आढळून येते. अरे, एका गटात मोजून सतराशे साठ सदस्य आहेत. एवढ्या सभासदांनी टाकलेले छायाचित्रे, मजकूर पाहून मत नोंदवण्यासाठी वेळ पुरत नाही. म्हणून त्या प्रमुखाने असे ठरवले की, ज्यांच्या भ्रमणध्वनीच्या क्रमांकाचा शेवटचा अंक सम म्हणजे '०,२,४,६..'
असा आहे त्यांनी ज्या दिनांकाच्या शेवटी सम अंक असेल त्याच दिवशी आपली छायाचित्रे, मजकूर आणि संदेश टाकावेत. उर्वरित सर्वांनी विषम अंकाच्या तारखांना आपापला सहभाग नोंदवावा. नियम मोडणारास गटातून कायमचे काढून टाकण्यात येईल..."
"एका ग्रुपवर तर मुकादम आणि सभासद यांच्यामध्ये जबरदस्त वाद रंगला. दोघांनीही अगदी खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांना शिव्या देणारा मजकूर सरळ समूहात टाकला. त्या प्रमुखाने त्या सदस्याची प्रोफाइल तपासली असता असे लक्षात आले की, तो माणूस गुंड प्रवृत्तीचा असून अनेकदा तुरूंगात राहून आला आहे."
"बाप रे! ती सारी 'गुंड' माहिती त्या गुंडाने प्रोफाइलमध्ये टाकली होती?"
"निर्लज्जपणा दुसरे काय? गटप्रमुखाने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठले आणि चक्क संरक्षण मागितले. त्याला संरक्षण मिळाले असले तरीही त्या गुंडाने त्रास देण्याचे सोडले नाही. तो सारखा त्याला धमक्या देत होता. त्याचा परिणाम असा झाला की आज तो समूहप्रमुख 'झेड' सुरक्षा व्यवस्थेत फिरतोय."
"व्वा! त्याची अनेक वर्षांपासून पंतप्रधान होऊन झेड सुरक्षेत फिरण्याची इच्छा झाली असेल. अशारीतीने ती इच्छा त्याने पूर्ण करवून घेतली असेल...." विठ्ठल बोलत असताना त्याच्या भ्रमणध्वनीवर एक संदेश प्राप्त झाला. तो वाचताना हसत हसत म्हणाला,
"अजून एक ऍडमीनच्या भरतीसाठी असलेल्या मुलाखतीचा संदेश आलाय..."
"अरे, मी म्हणतोय तीच असेल..."
"नाही. ती नाही रे. ही वेगळीच आहे. तू जाणार का?"
"उद्या नसेल तर नक्कीच जातो. पाहू तर खर दररोज अशा दोन संधी हातात असल्या म्हणजे आपल्याला आवडेल ती ऑफर स्वीकारता येईल."
"अरे, एक जण निघालाय मुलाखत द्यायला. "
"निघालाय? अशी किती दूरवर आहे?"
"थेट स्वर्गात आहे. जाशील?"
"जाईल की.... माउली, काहीही यार." हसत विठ्ठल म्हणाला.
"अरे, अजून एक संदेश आला आहे."
"आता काय नरकात आहे का मुलाखत?"
"नाही रे. समूहातील सदस्यांच्या तक्रारी, ,त्रासाला कंटाळून एका समूहप्रमुखाने....."
"आत्महत्या केली की काय?"
"तसे नाही रे. नेहमीच्या वादांमुळे येणाऱ्या टेंशनमधून मुक्ती मिळावी म्हणून त्याने दररोज बारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे."
"शंकर, उद्या तुझी गटप्रमुख म्हणून निवड झाली तर तुझ्याजवळ कोणत्या नवीन कल्पना आहेत."
"धन्यवाद! तू कल्पनेत का होईना माझी टोळा मुकादम म्हणून नेमणूक केलीस. माझ्या समूहातील सदस्यांकडून माझी अशी अपेक्षा असेल की, गटातील प्रत्येक सदस्याने दररोज किमान एक तरी विनोदी, उपहासात्मक, विडंबन असलेली पोस्ट टाकावी."
"पण त्यामध्ये एक धोका असतोच की. कुणाच्या वर्मावर घाव बसला तर..."
"बसू दे ना, त्यातही एक मजा असते. निखळ आनंद लुटण्यासाठी, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मजकूर टाकला ना तर त्याची मजा वेगळीच असते."
"व्वा! तू तर मस्त तयारी केली आहे. अजून काही अपेक्षा?"
"कोणताही मजकूर उगाचच आडवं पाडून ज्ञानामृत पाजणाऱ्या नसाव्यात. लहानपणी बाळाला त्याला आवडो अथवा न आवडो आडवे पाडून, प्रसंगी त्याचे हातपाय आवळून घुटी पाजल्या जाते ना तसा प्रकार नसावा. पुरुषांनी स्वतःची छायाचित्रे मुळीच टाकू नयेत तर त्याऐवजी एखाद्या सुंदर तरुणीचा आकर्षक फोटो टाकावा....."
"अच्छा! तुझ्या गटातील महिलांसाठी तुझ्या काय योजना असतील?"
"माझ्या गटात मी जास्तीत जास्त महिलांनाच आणि त्यातही पस्तीस वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांनाच गटात सामावून घेईल. या महिलांनी स्वतःचे मनमोही छायाचित्र दररोज समुहात टाकावे. गटातील तरुण-तरुणींनी लग्न करतेवेळी समुहातील मुला-मुलीचा प्राधान्याने विचार करावा. मी माझ्या गटातील सदस्यांसाठी 'गाऱ्हाणे' या शीर्षकाचे एक नवीन सदर सुरू करीन...."
"खास महिलांसाठी?" विठ्ठलने विचारले.
"तुला असे वाटते का, की गाऱ्हाणे केवळ महिलाच करतात. पुरुष याबाबतीत मागे राहात नाही बरे."
"पण त्यामुळे वादविवाद वाढतील त्याचे काय?"
"मी असा विचार करतोय की, अशी एक व्यवस्था करावी की, ज्या 'क्ष' व्यक्तीबद्दल गाऱ्हाणी होत असतील आणि ती व्यक्ती त्याच गटात असेल तर ती पोस्ट त्याच्यापर्यंत जाऊच नये. त्याला वगळून इतर सर्वांना वाचता यावी. त्या व्यक्तीबद्दल वाट्टेल ते लिहता यावे."
"व्वा! व्वा! खरेच तुझी जर ऍडमीन म्हणून निवड झाली ना, तर सर्वांपेक्षा वेगळा, क्रांतिकारी गट म्हणून तुझ्या व्हाट्सएप समूहाची सर्वत्र चर्चा होईल. शंकर, तुझ्याशी चर्चा केल्यानंतर मलाही उद्या मुलाखत द्यावी असे वाटू लागले आहे."
"अरे, मग विचार काय करतोस? चल. दोघेही मुलाखत देऊ या. ज्याचे नशीब जोरावर असेल त्याची निवड होईल. योगायोगाने दोघांचीही निवड झाली ना तर आपण दोघे मिळून आपापल्या टोळीमध्ये नवनवीन उपक्रम राबवू या आणि या भ्रमणध्वनीच्या युगात एक क्रांती घडवताना या व्यवस्थेला नवी
संजीवनी मिळेल."
"खरे म्हणतोस? ठीक आहे. जाऊ या दोघेही. ती जाहिरात तर बघू दे."
"जाहिरात नाही पण मोबाइलमध्ये इमेज आहे...." असे म्हणत शंकरने भ्रमणध्वनीत जतन केलेले छायाचित्र विठ्ठलला दाखवले. विठ्ठलने ते बारकाईने पाहिले. वाचले आणि जोरजोरात हसू लागला...
"काय झाले? का हसतो?" शंकरने विचारले.
"अरे, आपण या मुलाखतीसाठी नाही जाऊ शकत?"
"का? का नाही जाऊ शकत?"
"या जाहिरातीत असलेली अगदी शेवटची बारीक अक्षरातील ओळ तू वाचली नाही का?"
"नाही बुवा. काय लिहिले आहे तिथे?"
"यात असे लिहिले आहे की, अविवाहित असलेल्या युवकांनी या मुलाखतीच्या ठिकाणी चुकूनही फिरू नये. या मुलखातीसाठी केवळ अविवाहित, सुंदर तरुणी पात्र आहेत."
"व्वा! काय नशीब आहे यार! नोकरी नाही म्हणून छोकरी नाही आणि इथे छोकरी असाल तरच नोकरी मिळेल. चल. जाऊ दे..." असे म्हणत शंकर अत्यंत निराशपणे उठला आणि घराच्या दिशेने निघाला..........
नागेश सू. शेवाळकर
थेरगाव, पुणे ४११०३३