‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’
मध्यंतरी अक्षय कुमार चा पॅडमन चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार होता. आम्हांला सुध्दा चित्रपटाची उत्सुकता लागली होती.म्हणून पॅडमन बघायला जायचं असा विचार केला होता. काही दिवसांनी ऑफिस मध्ये काम करत असतांना माझी मैत्रीण माझ्या विंग ला आली. आणि तिने माझ्या दुसऱ्या मैत्रीण जवळ चित्रपट बघायला जायचा विषय काढला.मी उत्सुकतेणे विचारलं "कोणता मूवी बघायचा?" त्यावर तिने आजू बाजूचा कानोसा घेत माझ्याकडे बघून फक्त ओठांची चालचाल करत पॅडमन अस सांगितलं. तिचं तस वागणं बघून लगेच " अगं ज्या गोष्टीचा एवढा बाऊ करतय त्याच विषयावर मूवी येतंय,त्याच नाव घ्यायला एवढं काय?" थोडंस विस्कळीत अशी काहीतरी माझी प्रतिक्रिया त्यावर होती,पण मला जेवढं आणि जस बोलायचं होत ते मला तेव्हा एका वाक्यात सांगता आलं नाही.माझ्या बोलण्यावर तिला त्यातला मर्म कळालं आणि ती हसली.
पण हे नेमकं काय??
म्हणजे एकविसाव्या शतकात येऊनही आपण मासिक पाळी बद्दल बोलायला एवढं का न्यूनगंड बाळगतो? सर्वांना मासिक पाळी बद्दल कल्पना आहे मग त्यावर चर्चा करायला,त्याबाबद्दल योग्य माहिती देण्यासाठी,त्याबाबद्दल चे गैरसमज दूर करण्यासाठी यावर चर्चा का होत नाही? आणि या विषयावर मुलगा लिहत असेल किंवा मुलगी,समोर जरी कौतुक झालं तरी पाठीमागे हा काय विषय आहे का लिहायचा? फारच उघड आहे मुलगी/मुलगा. आणि अजून काही. खरं तर लिहतांना चीड आहे मनात, म्हणून तो राग लिहनातून स्पष्टही होईल. पण आज मला लिखाण म्हणून हे लिहायचे नाही तर पौराणिक आणि अध्यात्मिक गोष्टींचा वापर करून अजूनही स्त्रीला कमकुवत आणि दुय्यम वागणूक देणाऱ्या मानसिकतेला चपराक द्यायची आहे म्हणून हा लेख.
मासिक पाळीला रजस्वला असंही म्हणतात. ‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’ मुळात या दोन्ही संज्ञा स्त्रीच्या मातृत्वाशी संबंधित आहेत. ज्या गोष्टीच्या आधारे तिला मातृत्व प्रदान होते त्याच्याशी संबंधित अशा शारीरिक स्थितीकडे अतिशय स्पष्टपणे स्त्रीने व समाजाने सुध्दा बघायला हवं. कारण साक्षात परमेश्वराने जेव्हा मानवाच्या रूपात अवतार धारण केले, मग ते देवकीच्या पोटी ‘श्रीकृष्ण’ असो वा कौसल्येच्या पोटी ‘श्रीराम’ असो, त्यांना जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भाशयाची (कूस) गरज ही भासलीच ना! मग जी ‘स्थिती’ नवनिर्माणाशी, मातृत्वाशी संबंधित आहे ती ‘अपवित्र’ कशी काय असू शकते? आणि जे धार्मिक ग्रंथाचा आधार देतात त्यांनी हे जाणले पाहिजे की, हे ग्रंथ मानवानेच लिहिलेले आहेत! कदाचित त्या काळात स्त्रियांना आराम मिळण्यासाठी त्याची गरज भासली असेलही. पण आज काळ बदललेला आहे, या नियमातही बदल झाले पाहिजेत.स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संबंधातील पारंपरिक धार्मिक र्निबध, रूढी व अंधश्रद्धा या प्रश्नामागे जो सामाजिक शोषण व्यवस्थेचा व स्त्रियांवरील दडपशाहीचा इतिहास आहे तो लक्षात न घेतल्यामुळे कोटय़वधी निरक्षर व अज्ञानी महिलांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई नाहीच होणार पण पुढे हे नुकसान न होण्यासाठी आता पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे.
आता जे धार्मिक ग्रंथाच्या आधारे मासिक पाळीला अशुद्ध मानतात त्यांच्यासाठी.
रजस्वला म्हणजे नेमकं काय?
या विषयावर बोलताना देव धन्वंतरी यांनी लिहल आहे-
मासेनोपचितं काले धमनीभ्यां तदार्तवम्।
ईषत्कृष्ण विदग्धं च वायुर्योनिमुखं नयेत।।
( सुश्रुत शरीरस्थान अ.3 वाक्य 8)
अर्थात - स्त्री च्या शरीरामध्ये प्रत्येक महिन्याला एक आतर्व जमा होतो. याचा उपयोग गर्भधारणेसाठी होतो. नऊ महिने यावरच गर्भाचे पालन पोषण होते,पण इतर वेळी या आतर्वचा(रक्ताचा) उपयोग होत नाही म्हणून ते महिन्याच्या ठराविक दिवसामध्ये बाहेर पडतं. यालाच रजस्वला असं म्हणतात.
हि अगदी नैसर्गिक क्रिया आहे. जसं पचनसंस्था, श्वासोच्छ्वास ह्या जश्या आहेत तश्याच, मग पाळीला अशुद्ध मानण्याचे कारण काय?जेव्हा एखाद्या स्त्री ला बाळ होत तेव्हा कुणीच अस म्हणत नाही हे अशुद्ध रक्तपासून तयार झालेलं आहे म्हणून. तेव्हा तर त्या स्त्री ची ओटी भरल्या जाते, मग एकाच गोष्टी साठी एकाच स्त्री ला एवढी विसंगत वागणूक का? अजूनही बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना अतिशय शुद्र वागणूक दिली जाते.
गडचिरोली जिल्ह्यात गोंड आदिवासी आणि त्याच्या काही उपजातींमध्ये कुरम्या'सारखी प्रथा मात्र अद्याप टिकून आहे. कुरमा म्हणजे पालापाचोळ्याची वस्तीबाहेर बांधलेली झोपडी. मासिक पाळीच्या काळात प्रत्येक महिलेने या कुरम्यांत राहावे, अशी ही प्रथा व त्याचबरोबर दंडकही आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गोंड समाज आणि त्याच्या उपजाती असलेल्या माडियासारख्या जातींमध्ये वर्षानुवर्षे ही प्रथा आहे. काळानुसार तिच्यात थोडाफार बदल होत असला, तरी मूळ प्रथा कायम ठेवण्याकडे समाजाचा कल आहे. महिलेची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर चार-पाच दिवस तिला कुरम्यांत मुक्काम करण्यासाठी पाठवले जाते. या काळात ती कुटुंबातल्या कुणाला स्पर्श करत नाही. तसे झाल्यास तो विटाळ मानला जातो. या कालावधीत कुरम्यांत राहणाऱ्या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्य स्पर्श न करता बाहेरून अन्न-पाणी पुरवतात. या काळात तिचा व समूहाचा संपर्क तोडला जातो. पालापाचोळा पासून बनलेल्या या कुरम्यात थंडी आणि पावसापासून रक्षण करणे कठीण होते, पण आश्चर्याची बाब म्हणजे तिथल्या स्त्रियांना कुरम्यामध्ये राहण्यास तक्रार नाही, परंपरा म्हणून त्या विनातक्रार ते पाळतात.किंबहुना हा आपल्यावर अन्याय आहे हे त्यांच्या गावीही नाही हीच मोठी अडचण आहे.
याउलट अश्या रुढींचे समर्थन करणारे कुरमा म्हणजे विटाळ नव्हे, तर विहार आहे, असे विश्लेषण आधुनिक मंडळी करू लागली आहेत. कष्टापासून, नेहमीच्या रहाडग्यापासून ती निवांतपणे चार-सहा दिवस स्वतंत्र राहते. यात वाईट काय आहे, असे प्रतिप्रश्नही विचारले जातात. पण, मासिक पाळीचे वय संपल्यावर अशा आरामाची व्यवस्था महिलांसाठी आहे का, यावर कुणाकडेच उत्तर नसते.
हे तर अश्या समाजाबद्दल झालं जे शिक्षणापासून वंचित आहे, पण सुशिक्षित समाजात सुद्धा कमी अधिक प्रमाणात हे बंधन आहेच.आणि याला कारणीभूत जेवढे रूढी- कर्मकांड ,पुरुष आहेत तेवढ्याच स्त्रिया सुद्धा आहेत. देवधर्माच्या नावाखाली कित्येक स्त्रिया अगदी मनघडत नियम लावतात. आणि ते नियम पाळण्याची घरात सक्तीसुद्धा केली जाते. अगदी वन रुम किचन मध्ये सुद्धा हे विटाळ पाळले जातात.
काही रूढी स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने बनवल्या गेल्या होत्या आणि त्यामागचे शास्त्रशुद्ध कारण अगदी पटण्यासारखे आहे आणि त्याला माझे समर्थनही आहे,पण त्याचबरोबर तो काळ वेगळा होता आजचा वेगळा आहे, काळाबरोबर गरजा बदलतात हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.
आणि खरं परिवर्तनाची गरज स्त्रियांना आहे. मातृत्व हे जगातलं सगळ्यात मोठं वरदान आहे आणि मासिक पाळी हे त्यासाठीची साधना आहे,त्याला विटाळ बनवू नका. मासिक पाळी स्त्री ला पुर्णत्वास नेते, ती अशुद्ध असूच शकत नाही. अर्थातच हे परिवर्तन लगेच घडणार नाही, कारण वर्षानुवर्षे चालत येत असलेल्या या रुढींचे पगडाच तेवढा जास्त आहे. आणि मी सुद्धा त्याच समाज व्यवस्थेचा भाग आहे,पण आपण बदल घडवू शकतो. मला हे कळतंय तर मी मानसिकता बदलवत आहे, मासिक पाळीकडे बघण्याची.एक नवी प्रतिज्ञा घेऊया, मी मासिक पाळी मध्ये कुठल्याच स्त्री ला दुय्यम वागणूक देणार नाही, ती तशीच पवित्र स्त्री आहे कारण ती उद्याची माता आहे आता वेळ आहे नवीन समाज घडवण्याची ज्याची पुढची पायरी आहात तुम्ही....