“अयss निरमे, सरळ साळत जा... अन सुटलीकी घरला ये,त्या उंडगी बरोबर हुंदडत नको बसूस" डोक्यावरची चाऱ्याची पेंढ अंगणात टाकत निर्मलाच्या आईने तिला तंबी-वजा सूचना दिली.
"व्हय" पाठीवर दप्तर चढवत निर्मला बोलली. मग कमी ताकद असलेल्या डाव्या पायाच्या गुढग्यावर हात ठेऊन पायाला आधार देत निर्मला अंगणातून चालत बाहेर पडली.पक्षांच्या चिवचिवाटाने शिवार गजबजून गेलं होतं. पाना-फुलांवर दवाचे मोती झळाळले होते. नदीपलीकडच्या शाळेत जायला एकावेळी दोन माणसे जाऊ शकतील असा भिंती नसलेला जुना पूल होता. अख्ख गाव यापुलाचा वापर करत असे पण निर्मला यापुलावरून न जाता पाच कोसावर दोन गावांच्या वेशीवर बांधलेल्या नव्या सुरक्षित पुलावरून जात कारण मैत्रिणींच्या आश्वासनामूळे दोनवेळा ती यापुलावरून गेली आणि पाय घसरून पाण्यात पडली. कोणीतरी तिला पाण्यातून बाहेर काढले खरे पण तेव्हापासून तिने यापुलाचा धसकाच घेतला.
चालत-चालत निर्मला आता घरापासून बरीचशी लांब आली.
"भ्यावsss" पाठीमागून जोरात आवाज आला.
"शंकेssss घाबरावलंस बया मला"
“तूच बोल्लीस घराजवळ नग येवूस आय-बा खवळत्यालं, म्हणून झाडीत लपून तुझी वाटपहात व्हते" खट्याळपणे शकुंतला बोलली.दरवर्षी मागणी असेल त्या नव्या गावी जाऊन मजुरी करणारं शकुंतलाच कुटुंब तीन महिन्यापूर्वी यागावात मजुरीसाठी आलं होतं.
दोघी शाळेच्या वाटेने चालत निघाल्या. दररोजप्रमाणे ती वाट ‘सरळ’ शाळेकडे जाणारी न्हवती. शकुंतला जांभळाच्या झाल्यावर चढली आणि बरीचशी जांभळं तोडली.दोघी झाडाखाली बसल्या.
"घाई न्हाई दिसत तुला रोजवानी साळत जायची" निर्मलाला निवांत पाहून शकुंतलाने विचारले.
“आज पैला तास पी.टीचा हाय, सर मी पडल-झडल म्हणून मला मैदानात उतरू देत न्हाय, मला न्हाई जमणार ना बाकीच्यांसारखं धावपळ करायला" डाव्यापायकडे ईशारा करत निर्मला बोलली.
"जमवलं तर सगळं जमतंय बघ,तू सादे-सादे खेळ खेळायचे सुरवातीला मग हळू-हळू अवघडकड जायचं,पड-झड तर होतंच रहाती त्याला काय भ्यायचं" जांभळं खातं शकुंतला बोलली. मग निर्मलाला घेऊन नदीत उतरली.
"हे बघ.. हे बघ.. जमलंकी नाय आज" पोहत-पोहत शकुंतलाकडे येत अतिशय आनंदाने निर्मला बोलली.
"वाहगं माझी राणी जमायला लागलाय तुला आता" निर्मलाच्या तोंडावरून हात फिरवत शकुंतला बोलली.
"निर्मे आता..."
"काय गं"
"मला पकडायला ये"निर्मलाचा पाय खट्याळपणे ओढून तिला पाण्यातपाडून शकुंतला तिच्यापासून लांब जात बोलली.
"थांब-थांब बघतेच तुला " निर्मलाही तिला पकडायला धावली.दोघीही पाण्यात मनसोक्त खेळल्या मग अंगावरच कपडे वाळवून शाळेकडे निघाल्या.बघता-बघता वर्ष सरलं.शकुंतला दुसऱ्या गावी निघून गेली.शाळा पुन्हा सुरु झाली पण बरेच दिवस निर्मलाचं मन कशात रमत न्हवतं.मग त्यादिवशी शाळेत जाताना शकुंतलेच्या विचारात निर्मलाने जुन्यापुलावरून जायचे ठरवले.पाऊस पडत होता, सगळीकडे शेवाळं आलं होतं, भीतभीत निर्मलाने पुलावर पाऊल टाकलं. पण होऊ नये तेच झालं.चालता-चालता अचानक तिचा पाय घसरला शरीराचे वजन एका बाजूला पडल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती नदीच्या पाण्यात पडली.नाका-तोंडात पाणी गेले.काळजाची धडधड प्रचंड वेगाने वाढली. मग पाय हलवत तिने स्वतःला पाण्याच्या पातळीच्यावर आणले.जोरात श्वास घेतला आणि पोहत-पोहत येऊन किनाऱ्यावर बसली.काही क्षणांपूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जाता-जात नव्हता.अजूनही तिला धाप लागली होती.काळजाचा थरकाप उडवणारी ती गोष्टं पुन्हा घडली होती.यावेळीही न पडता ती पूल पार करू शकली नाही.तिला शकुंतलेसोबतची शेवटची भेट आठवली.
"चल येतेगं बाई" शेवटचं भेटायला आल्यावर शकुंतला बोलली होती.
"शंके मला भेटायला येशीलना गं परत.... मला विसरणार तर नाहीस ना" गळ्यातपडून निर्मला रडूलागली.
"तुला नाय विसरणार गं पोरी.... लय माया लावलीस तू भित्रा ससा हाईस तू माझा, माझी एक गोष्टं लक्षात ठेवशील ना “
“काय”
“तुला त्याजुन्या पुलावरून पडायची भीती वाटतीना तशी बऱ्याच गोष्टींची भीती वाटलं, तुला दोन प्रकारचे लोक भेटतील, येक जे तुला आश्वासन देतील नपाडता पुलापलीकडं नेण्याचं अन दुसरे तू पुलावरून पडशील म्हणून त्यावरून तुला नजाण्यास सांगणारे, तू पुलावरून पडू नाय हि दोघांचाही इच्छा असल, पण पुलावरून चालायचं धाडस करायला तू कमी पडू नगस,हा धाडस करताना कमी पडलीस तर चालल, हरायची तयारी ठिव आन हरल्यावर पुढं काय करायचं याचा आधीच इचार करून ठिव, पाण्यात पडायला भी पन पडल्यावर बाहेर येण्यासाठी आधीच पोहणं शीक,पूलापलीकडं जायचं असल तर परिणामांची तयारी करून त्या भीती वाटणाऱ्या पुलावर पाय ठिव"
“परिणामांची तयारी करून त्या भीती वाटणाऱ्या पुलावर पाय ठिव" हे शेवटचं वाक्य निर्मलाच्या मनात दिवसभर घुमत राहिलं. दुसऱ्यादिवशी ती शाळेत जायला निघाली. आज पुन्हा पाऊस पडत होता, सगळीकडे शेवाळं आलं होतं भीतभीत निर्मलाने पुलावर पाऊल टाकलं
©धनश्री-साळुंके