परदेशी - अनिवासी Aniruddh Banhatti द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परदेशी - अनिवासी

अनिवासी

अनिरुद्ध बनहट्टी

‘कल्व्हर्ट टाउन’ मधल्या ‘हेलेना रो’ वसाहतीतल्या ‘टी-34-बॉनव्हिल’ या बैठ्या घरासमोर आपली इलेक्ट्रिक बाईक पार्क करून यू.एस.पोस्टस्च्या कार्ल बेनेटनं बेलचं बटण दाबलं.

रमेश कांबळे नं दार उघडलं.

“काल देखील मी येऊन गेलो.” कार्ल म्हणाला.

“हो,” रमेश म्हणाला, “तुम्ही दाराला लावलेल्या नोटनुसारच आज मुद्दाम घरी राहिलोय्!”

सही करून त्यानं पत्र घेतलं. त्याची बायको सुप्रिया नेने बोटाभोवती चावी फिरवत जिन्यानं खाली आली.

“कसलं पत्रं आलंय्?” सुप्रिया म्हणाली.

“घरून आलेलं दिसतंय!”

"मी निघते.”

जीन्स-टी शर्ट घातलेली सुप्रिया नेने-रमेश कांबळेची बायको लॅचचं दार लावून बाहेर पडली. दोघे एकाच आय.टी. कंपनीत काम करताना एकत्र आले, अन दोघांनी झटक्यात लग्न सुद्धा करून टाकलं!

“....कांबळे गुरुजी म्हणून लोकप्रिय झाले होते. थेपडे यांनी नगरपालिकेत चालवलेला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला.आपण स्वतः येऊन सर्व व्यवस्था लावावी. कळावे. आपला-बाविस्कर गुरुजी...”

सगळी पारोळ्याच्या गुंडांची टोळीच रमेशच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. . जायला 24 तासांपेक्षा थोडा जास्तच विमान प्रवास! पण तरी जायला पाहिजेच!

***

पारोळ्याला फक्त दोन हॉटेलं. रमेश जळगावला एक दिवस राहिला. भाड्याची कार घेऊन पारोळ्याला आला. बाविस्कर गुरुजी स्टँडच्या कोपर्‍यावर थांबलेले होते. लहानपणी रमेश पण त्यांच्या हाताखाली शिकलेला होता. त्यांना कारमध्ये घेतल्यावर ड्रायव्हरनं त्यांनी सांगितली तशी कळवून कार पोलिस स्टेशनपाशी आणली. पोलिस इन्स्पेक्टर खंडागळेनं एक लाल कापडानं तोंड बांधलेला तांब्याचा कलश टेबलावर आणून ठेवला.

“किती दिवस वाट पाहाणार? आम्ही अग्नी देऊन टाकला मग.” खंडागळे खरखरीत आवाजात म्हणाला.

“ प्लीज तुम्ही असं मृत व्यक्तीची खोटी बदनामी करायचं जाऊन!” काम करू नका.”

“केस खोटी नाही. केस खरीच आहे!”

बराच वाद घालून, पैसे ऑफर करून पण काही फायदा झाला नाही. उलट खंडागळे जेव्हा धमकावणीच्या स्वरात म्हणाला -

“साहेब, तुम्हाला अमेरिकेत परत जाणं कठीण होईल बरं का! मी तुमचा पासपोर्ट जप्त करू शकतो,” तेव्हा रमेश आपल्या वडिलांच्या अस्थींचा कलश घेऊन मुकाट्यानं निघाला.

रमेशनं भारत सोडून अमेरिकेत रहायचा निर्णय घेतला त्यावेळची परिस्थिती त्याला आठवली. बाबांनी नाराजी, आई तर त्याच्या लहानपणीच वारलेली. भारतात दीड वर्ष केलेल्या नोकरीचा क्लेषदायी अनुभव, अन त्या विरुद्ध अमेरिकेत मिळालेल्या पहिल्या नोकरीच्या सुखद अनुभव. त्यातच त्याच्या चुलतभावाचा झालेला खून! त्याला भारतात राहायला भीतीच वाटायची. अन् अमेरिकेतल्या नोकरीत सुप्रिया भेटल्यावर तर सगळं आयुष्य आखल्यासारखंच होतं.

बाविस्कर गुरुजींनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. आपल्या लहानपणापासूनच्या, जन्मापासूनच्या राहात्या घरासमोर उभं राहून तिकडे पाहाताना रमेशला अचानक असह्य उमाळा फुटला. त्याला गदगदून रडूच यायला लगालं. बाविस्कर गुरुजी त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. त्याचे हुंदके थांबले. तो रावळगावची बॉइल्ड शुगर टॉफी चघळत राहिला.

रमेशला त्याच्याच घरात प्रवेश नव्हता. लालभडक अक्षरात ‘निरपेक्ष’ ची पाटी घरावर होती. अंगणात मॅनहोलच्या झाकणांचे ढीग लावलेले होते. निदान पन्नास-साठ तरी मॅनहोल कव्हर्स असावेत. फटकापाशी पहार्‍याला एक पोलिस उभा होता.

“पोलिसांनीच त्यांच्या जीपमधून मॅनहोल कव्हर्स आणून अंगणात टाकलेत...” बाविस्कर गुरुजी सांगत होते.

शेवटी कार गुरुजींच्या घरी. तिथे गुरुजींच्या बायकोनं-सगळं गाव त्यांना मोठ्या वहिनी म्हणायचं- त्याला गरमगरम जेवण दिलं आणि ते चवदार जेवण जेवून तो सुखावला. आरामखुर्चीत पडल्या पडल्या पाच मिनिटं त्याचा डोळा लागतो न लागतो तोच बाजी कुसाळे म्हणून ‘निरपेक्ष’चा कार्यकर्ता त्याला भेटायला आला. मग कारनं बाजी कुसाळेच्या घरी. तिथे बाविस्कर गुरुजी आणि बाजीच्या सांगण्यानुसार काही पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रमेशनं सही करून दिल्या. ‘निरपेक्ष’चं ऑफिस असलेलं ते चार खोल्याचं बैठं घर - बाबांनी ते बांधायला अगदी जिवाचं रान केलेलं होतं - त्याच्यावरचा वारसा हक्क सोडून त्यानं ते पूर्णपणे ‘निरपेक्ष’ला देऊन टाकलं. मग शेवटी गाडी जळगावला त्याला सोडून निघून गेली.

बाजीला भेटल्यावर रमेशला जरा आशा वाटली होती. तरुण, उत्साही होता. पोलिस ‘निरपेक्ष’चं ऑफिस सील करायला आले तेव्हा एका मुख्य काँप्युटरचा सीपीयू त्यानं खिडकीतून मागे झाडीत ठेवला होता, आणि पोलिसाचं लक्ष नसताना रात्री घराच्या मागे जाऊन पळवून आणला होता. त्या सी.पी.यू. चा केसेसमध्ये-विशेषतः ‘निरपेक्ष’ या एन.जी.ओ. विरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या केसेसमध्ये खूप उपयोग होणार होता.

रमेशनं कलश टीपॉयवर ठेवला आणि पलंगावर पसरत टीव्हीवर रिमोट दाबला - ‘आदर्शची इमारतच काय ती आता हरवायची राहिलीय्!’- वार्ताहरीण सांगत होती- ‘कुठलातरी नवीन स्कॅम-त्यातल्या फाईल्स, कागदपत्रं एकेक करून अदृश्य होत होते.’

‘अस्थी उद्या नाशिकला गोदावरीला विसर्जित करून परवा एकदाचं पुन्हा विमानात बसून परत निघावं.’-

-एवढ्यात एका सहकार्‍याचा फोन आला. अपेक्षित होताच. वार्षिक स्वमूल्यांकन-‘अ‍ॅन्युअल सेल्फ अप्राइजल-’ सोडून तो आला होता. ते तो एक आठवडा उशीरा देणार होता. तर सहकार्‍याचा ‘शक्य तितक्या लौकर ये, सध्या इकॉनॉमिक क्रायसीसमध्ये-मंदीमध्ये-धोका पत्करू नकोस’- असा फोन होता, अन् तो फोन संपल्यावर लगेच सुप्रियाचा फोन आला आणि रमेशला तिचा आवाज ऐकताच एकदम खूपच बरं वाटलं. तिनं शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि आपल्या प्रॅक्टिकल बोलण्यानं त्याचं सांत्वन केलं. “शांतपणे सगळं कर आणि फालतू लीगल किंवा टेक्निकल बाबतीत न अडकता पट्कन परत ये”, म्हणून तिनं सांगितलं. सुप्रियाशी बोलणं झाल्यावर रमेशला स्वच्छ झाल्यासारखं वाटलं. भारतात परतल्यापासून पत्करलेलं एक प्रकारचं दबलेपण, धास्ती, आपली हिंमत मानवी क्रूरतेपुढे फार मर्यादित आहे अशी एक षंढत्वसदृश अपराधी जाणीव, अन्याय सहन करत असल्याचा अपराधीपणा-सगळं गळून पडलं आणि त्याला स्वतः विषयी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह वाटायला लागलं. आणि मग चोवीस तास विमानाचा प्रवास आणि भारत-अमेरिकेतील वेळाच्या फरकामुळे जाणवणारा जेट लॅग त्याच्यावर चालून आला आणि तो झोपेत सखोल बुडून गेला.त्याला लहानपणची खूप स्वप्न पडत राहिली.

***

रमेश कांबळे आपल्या वडिलांच्या अस्थी विसर्जित करून आला त्याला आता आठ वर्षे होऊन गेली होती. सध्या तो आणि त्याची बायको सुप्रिया दोघेही एका लहान आय.टी. कंपनीचे मालक होते. कल्व्हर्ट टाउन मधल्या श्रीमतं व वजनदार मंडळीत त्यांची गणना होऊ लागली होती. त्यांना एक मुलगा, एक मुलगी - अशी मुलं होती. दोघेही हुशार. शाळेत आणि आपल्या मित्रांमध्ये लोकप्रिय होती. कल्व्हर्ट टाउन मधल्या भारतीयांनी एक ‘इंडिया सेंटर’ स्थापन केलं होतं, तिथे दुसर्‍या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा व्हायचा होता. - स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण रमेशनं बाजूला ठेवलं. ‘आज चौदा ऑगस्टची संध्याकाळ’- त्यानं विचार केला आणि पत्रांच्या गठ्ठयातलं पुढचं पत्र उचललं. भारतातून आलेलं. पाकिटावर फ्रॉम-बाजी कुसाळे !

रमेशनं फोडून पत्र वाचलं. सर्व केसेस मध्ये आपण हरलो, ‘निरपेक्ष’ ची इमारत, तो प्लॉट सगळं विकून नगरपालिकेनं चोरीला गेलेल्या मॅनहोल्सची भरपाई केली. बाजीनं शेवटी क्षमा मागितली होती-

“तुमच्या वडिलांवर लावलेला खोटा कलंक मी मिटवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व!”

रमेश कांबळेनं एक उसासा सोडून पुढचं पत्र उचललं.

***

पंधरा ऑगस्ट. ‘कल्व्हर्ट टाउन’ मधल्या ‘इंडिया सेंटर’वर सगळे अनिवासी भारतीय एकत्र जमलेले. सकाळची वेळ. खरं तर बर्‍याच जणांना दृष्टीनं ही भली पहाटच होती ! पण सगळी तयारी अगदी जय्यत होती. प्रमुख पाहुणा म्हणून कल्व्हर्ट टाउनचा मेयर बॉब मॅक कॉर्मिकला बोलावलं होतं. त्यानं दोरी ओढताच झेंडा झर्रर्रकन वर गेला आणि बिनाधुराचे चायनीय क्रॅकर्स फुटून सगळ्यांच्या अंगावर रंगीबेरंगी तार्‍यांचा वर्षाव झाला. लहानपणापासूनच्या सवयीनुसार हातापायांचे स्नायू ताणून रमेश अटेंशन मध्ये तिरंग्याकडे पाहात होता. पण त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं अंगण दिसत होतं. अंगणात मॅनहोल कव्हर्सचे ढीग पडलेले. गेटपाशी पोलिस पहार्‍यासाठी उभा, आणि त्याला मात्र त्याच्या स्वतःच्या हक्काच्या राहत्या घरात प्रवेश नव्हता !