स्वराज्यसूर्य शिवराय - 2 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यसूर्य शिवराय - 2

॥॥ स्वराज्यसूर्य शिवराय॥॥

【भाग दोन】

भोसले घराणे

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विजयानंतर जुलमी हुकूमशाही राजवटी महाराष्ट्रात थैमान घालत होत्या. बरे, राजसत्ता तरी कुणाची एकाची होती काय? मुळीच नाही. एकापेक्षा एक क्रुर, सत्तापिपासू शत्रुच्या राजवटी जनतेला सळो की पळो करून सोडत होत्या. लोक त्रस्त झाले होते, रोजच्या मरणाला कंटाळले होते. या जुलमी सत्ताधीशांनी केवळ रयतेच्या नरडीचा घोट घेतला नाही तर देव आणि देऊळ यांना ही सोडले नाही. धार्मिक कार्य करणे अवघड होत गेले. काही प्रमाणात लोकांचा देवावरचा विश्वास उडाला. लोकांच्या मनावर या जुलुमांची एवढी भीती बसली की, लोक दहशतीमुळे हिंदू देवदेवतांची पूजा करायची सोडून मुस्लीम पीरांना नवस बोलू लागले. त्यांच्या दरबारी हजेरी लाऊ लागले. ज्यांच्याजवळ हिंमत होती, पैसा होता, हाताखाली सैन्य होते असे आप्त स्वकीय आपल्या माणसांचे रक्षण करायचे सोडून जबरदस्ती करणाऱ्या, लुट करणारांपुढे माना तुकवू लागले. त्यासाठी गरीब जनतेची लुट करायलाही ते मागे पुढे पाहात नव्हते. या सर्वांच्या आपापसातील लढाईमुळे जनता गुदमरून जात होती. या मोगलांचा सामना करण्यासाठी आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा ही सत्ताकेंद्रे अस्तित्वात आली. परंतु यांचा जोर, यांची शक्ती म्हणजे पुन्हा प्रामाणिक, इमानदार मराठी माणूस. लढाया यांच्यामध्ये होत असल्यातरी बळी जायची मराठी जनता. कुंकू पुसले जायचे मराठी माता-भगिनींचे. अनाथ व्हायची ती छोटी छोटी, निष्पाप मराठी बालके. परंतु याची खंत ना मुघलांना असे, ना सुलतानी राजांना आणि त्यांच्या स्वार्थासाठी लढणाऱ्या मराठी फौजेला. या परकियांना एक भीती होती ती अशी की,आज आपल्यासाठी लढणारा, प्रसंगी जीवाची बाजी लावणारा पराक्रमी मराठा सैनिक, सरदार उद्या आपल्या शत्रूच्या आश्रयाला जाऊ शकतो म्हणून त्यांनी एक नामी युक्ती योजिली. पराक्रमी मराठी वीराला त्याच्या कर्तृत्वानुसार, केलेल्या कामगिरीनुसार वतनदारी आणि मानाच्या पदव्या द्यायला सुरूवात केली. देशमुखी, सरदेशमुखी, पाटीलकी, सरपाटीलकी, देशपांडे, सरदेशपांडे, कुलकर्णी, जोशी, गुरव, महाजन, चौधरी अशी मानाची पदे बहाल करायला सुरुवात केली. यामागे स्वार्थी हेतू हा की, ही मंडळी कधीच आपल्याला सोडून जाऊ नये. पण दुर्दैवाने हा डाव मराठी वीरांच्या लक्षात आला नाही. उलट ते या पदव्यांमुळे भारावून गेले. या मानसन्मानाचा परिणाम असाही झाला की, या वतनदार, शाहीपदवी प्राप्त सरदारांची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. ते स्वतःच्या फायद्यासाठी पुन्हा जनतेला वेठीस धरू लागले. त्यांची आपापसातील भांडणे वाढली, हाडवैर वाढले. सुलतानाच्या, मोगलांच्या सेवेत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, वेरूळचे भोसले, जावळीचे मोरे असे पराक्रमी सरदार होते. या सरदारांमध्ये आणि मुसलमानी राजांमध्ये सततच्या होणाऱ्या युद्धामुळे हजारो मराठी तरुणांना सैन्यामध्ये नोकरी मिळाली. त्यांच्यामध्ये शौर्य, आत्मविश्वास, बळ निर्माण झाले...... वाईटातही चांगले म्हणतात ते असे.....

वेरुळ या गावची बाबाजी भोसले नावाने ओळखली जाणारी एक व्यक्ती होती. त्यांच्याकडे वेरूळसह आजूबाजूच्या सुमारे दहा गावांची पाटिलकी होती. ज्या गावांमध्ये भीमानदीतीरी असणारे देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरुळ, वावी, मुंगी, बनसेंद्रे ही गावे होती. त्याकाळी पाटील म्हणजे एक प्रकारे 'राजे'! महत्त्वाचे म्हणजे भोसले घराणे म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्रांचे वंशज असे त्याकाळी मानल्या जात असे. त्यामुळे ते पंचक्रोशीत जसे प्रसिद्ध होते तसाच त्यांचा आदरयुक्त दराराही होता. बाबाजी भोसले यांना दोन मुले होती. मालोजी आणि विठोजी अशी त्यांची नावे. या दोन्ही भावांची मने अतिशय संवेदनशील होती. आपल्या भोळ्याभाबड्या जनतेवर, माताभगीनी, बंधू, गरीब कास्तकार यांच्यावर दिवसाढवळ्या होणारे अत्याचार, जबरदस्ती पाहून त्यांना अतिशय दुःख होत होते. बाबाजींनी आपल्या दोन्ही मुलांना शेतीकाम शिकवताना तलवार चालविण्याचे अर्थात युद्धात तरबेज करण्याचेही शिक्षण दिले. या भावांची वृत्ती तशी धार्मिकही होती. वेरूळ लेणीजवळ असलेले अतिशय प्राचीन देवालय म्हणजे घृष्णेश्वराचे मंदिर. या मंदिराचे बांधकाम पुरातन काळात झालेले आहे. जेवढे प्राचीन तेवढेच ख्यातकीर्त! भारतीय संस्कृतीत बारा ज्योतिर्लिंगांना अतिशय महत्त्व प्राप्त आहे. याच बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळचे शिवलिंग...घृष्णेश्वराचे मंदिर! परंतु त्या काळातील एकूण राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळे या मंदिराकडे भक्तांचे तसे दुर्लक्ष झाले होते. बाबाजी भोसले यांच्यासारख्या व्यक्तींच्या मनात असूनही कुणी मंदिराकडे लक्ष देऊ शकतनव्हते कारण लक्ष दिले तर उगाच बादशाही मंडळीचा आणि त्यांच्या सरदारांचा राग ओढवून घेण्यासारखे. असे असले तरी बाबाजी भोसले यांचे थोरले सुपुत्र मालोजी मात्र नियमितपणे या महादेवाच्या दर्शनासाठी येत असत. अत्यंत प्रसन्न मनाने मालोजी या मंदिरात येऊन, दर्शन घेऊन जमेल तशी मंदिराची साफसफाई करीत असत. त्यांच्यासोबत त्यांचा लहानगा भाऊ विठोजीही येत असे. मंदिर आणि परिसराची झालेली दुरावस्था, आलेली अवकळा पाहून दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी येत असे. अत्यंत खेदाने, आत्यंतिक दुःखाने मालोजी म्हणत,

"अरेरे! शिवशंकरा, काय तुझी ही अवस्था? मी जर तुझी नीट काळजी घेत नसेल तर माझ्या भक्तीचा आणि पुरुषार्थाचा काय फायदा? या देवाचे, देवालयाचे, त्याच्या वसतिस्थानाचे रक्षण करण्यासाठी मी असमर्थ आहे. " दोन्ही भाऊ अशी नेहमीच चर्चा करीत असत. पण करावे काय हा प्रश्न त्यांना सतावत असे. त्याचे उत्तर त्यांना मिळत नसे. मालोजीराजे भोसले यांची वृत्ती धार्मिक होती. ते जसे घृष्णेश्वराचे भक्त होते तसेच ते शंभूभवानीचेही निस्सिम भक्त होते. सोमवारी ते कडक उपवास करीत असत. पूजा करून महादेवाला बेल वाहून तीर्थ घेतल्याशिवाय जेवण तर सोडा पण पाण्याचा थेंबही घेत नसत. सोबतच श्रीगोंदा येथे असलेल्या शेख महंमद यांच्यावर मालोजींची फार मोठी श्रद्धा होती. मालोजी शिखर शिंगणापूर येथे असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी जात असत. शिंगणापूरचा महादेव म्हणजे भोसले घराण्याचे कुलदैवत! पण या मंदिराची अवस्थाही घृष्णेश्वराच्या मंदिराप्रमाणेच झाली होती. ते पाहून मालोजींना खूप वाईट वाटत असे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना पिण्याचे पाणी मिळत नसे. भक्तांच्या तहानेने व्याकूळ झालेल्या चेहऱ्यांकडे पाहिले की, मालोजींना भडभडून येई. अशा ठिकाणच्या गैरसोयी आपण दूर कराव्यात असे त्यांना सारखे वाटत असे. परंतु तशी कामे करणे का सोपे होते? फार मोठी खर्चिक बाब होती ती. एवढा पैसा आणावा कुठून? या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने मालोजी परेशान, दुःखी होते.

एके दिवशी मालोजी आणि विठोजी हे दोघे भाऊ शेतामध्ये कुदळी मारून खणत असताना अचानक 'टणकन' असा आवाज आला. दोघांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले. तो आवाज साधासुधा नव्हता. त्यांची कुदळ एखाद्या धातूच्या भांड्यावर आदळली असल्याचा तो आवाज होता. दोघांनी मिळून ती जागा साफ केली. हलक्या हाताने खणून माती बाजूला केली आणि दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. एक हंडा आतमध्ये होता. हंड्यांची दिसणारी बाजू साफसूफ करून मोकळी करताच दिसणाऱ्या, लवलवणाऱ्या पिवळ्या धमक रंग ल्यालेल्या लक्ष्मीने त्यांना दर्शन दिले. अपार, फार मोठे धन त्यांना सापडले होते. दोन्ही भावांना अत्यानंद झाला. मालोजीचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तेवढे मोठे धन पाहून मालोजींच्या मनात काय विचार आला असेल. ते स्वतःशीच म्हणाले, 'शंकराची फार मोठी कृपा झाली आहे. हा दैवी संकेत आहे. हे धन मला देण्यामागे काहीतरी ईश्वरी इच्छा आहे. काय असेल? दुसरे काय असणार? घृष्णेश्वराच्या, शिंगणापूरच्या मंदिराचा जीर्णोध्दार ! ठरले या धनाचा उपयोग याच कामासाठी करायचा.' हा विचार म्हणजे जणू घृष्णेश्वराच्या मंदिरातील घंटा घणघणली जावी त्याप्रमाणे मालोजींच्या मनात एक एक विचार धडका मारत होते. हा निश्चय होतो न होतो तोच मालोजींना एक प्रश्न पडला की, एवढे मोठे धन ठेवावे कुठे? दुसऱ्याच क्षणी मालोजींच्या समोर एक नाव आले ते म्हणजे त्यांचा जीवलग मित्र शेषाप्पा नाईक यांचे. शेषाप्पा हे श्रीगोंदा येथे राहात होते. मालोजी आणि शेषाप्पा यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते. दाट मैत्रीचे होते. लगोलग मालोजींनी शेषाप्पाची भेट घेतली. सारे काही समजावून सांगितले. ते ऐकताच शेषाप्पानेही मोठ्या आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली. ती सारी धनदौलत शेषाप्पाच्या हाती सुपूर्त करून मालोजी वेरुळ मुक्कामी परतले. त्यांनी वेळ न गमावता घृष्णेश्वराच्या मंदिराचा कायापालट करण्याचे काम उत्साहाने सुरू केले. लागेल तशी थोडी थोडी रक्कम शेषाप्पा यांच्याकडून आणून त्यांनी जीर्णोध्दाराचे काम पूर्णत्वास नेले. ते काम , तो परिसर पाहून मनोमन आनंदलेल्या मालोजींनी तडक शिखर शिंगणापूर गाठले. डोंगरावर असलेला खडक फोडण्याचे काम सुरु केले. काही दिवसातच तिथे पाणी लागले आणि ते पाहून मालोजींचे डोळे पाझरू लागले. शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी डोंगर चढून आलेल्या भाविकांची तहान त्या चवदार पाण्याने भागू लागली आणि प्रत्येक जण मालोजी - विठोजी या बंधूंना भरभरून आशीर्वाद देऊ लागला. मालोजींनी यासोबत परिसरातील अनेक मंदिरांची डागडुजी केली. जमेल तशी इतर व्यवस्था केली. हे करत असताना मालोजींनी स्वतःच्या सैनिकी शिक्षणाकडेही लक्ष दिले. स्वतःची लष्करी शक्ती वाढावी म्हणून पंचक्रोशीतील तरुणांची हत्यारबंद फौज निर्माण करायला मागेपुढे पाहिले. त्यावेळी निजामशाहचे राज्य होते. मलिक अंबर हा त्याचा विश्वासू सरदार होता. तसे पाहिले तर निजाम राजवट असताना कुणी स्वतःची अशी फौज तयार करणे, लष्करी हालचाल करणे हा गुन्हा ठरण्याची शक्यता होती. ही सरळसरळ बंडखोरीची निशाणी होती. परंतु त्यावेळी निजाम एका वेगळ्याच संकटात होता. निजामशाहचा एक फार मोठा शत्रू अहमदनगरीवरील निजामाची सत्ता उलथवून स्वतःच्या घशात घालण्याचा डाव आखत होता. ही योजना निजामशाह आणि मलिक अंबर यांना समजली होती. त्यांनी स्वतःचा फौजफाटा वाढविण्याचा निर्णय घेतला. मलिक अंबरचे लक्ष मालोजी भोसले यांच्या स्वनिर्मित फौजेकडे गेले. त्यांना हवे ते अवचित गवसले होते. मालोजीसारखा तब्येतीने धिप्पाड, शूर असा सरदार आणि त्याचे तितकेच रांगडे सैन्य त्याला मिळावे अशी त्याची इच्छा होती. मलिकने हा हेतू निजामाच्या कानावर घातला. एरव्ही मालोजींचे कार्य पाहून निजाम संतापला असता, कदाचित त्याने मालोजीला पकडून कैदेत टाकले असते, कदाचित शिरच्छेद करण्याचे ही ठरवले असते परंतु परिस्थिती वेगळी होती. शत्रूशी लढण्यासाठी त्याला मालोजी आणि त्याच्या सहकाऱ्यांची मदत होणार होती हे ओळखून निजामाने सरळसरळ मालोजीला जहागीर देण्याचे ठरवले. मालोजी आणि विठोजी या दोघांनाही त्याने सन्मानाने दौलताबाद येथे बोलावून घेतले. दोघांचाही सत्कार करून मालोजीला पुणे आणि सुपे या दोन परगण्याची जहागीर दिली. निजामाच्या शब्दात सांगायचे तर मालोजी भोसले यांना पंचहजारी हा मान मिळाला होता. मिळालेल्या जहागिरीचा कायापालट करायचा, रयतेला सुखी करायचे हे ठरवून मालोजी कामाला लागले. शब्द खाली न जाऊ देणारा विठोजीसारखा पराक्रमी भाऊ सोबतीला होता. दोघांनी मिळून जनतेच्या हिताची अनेक कामे सुरु केली. मालोजींच्या या कार्यावर खुश होऊन मलिकने मालोजींच्या जहागिरीत अजून काही गावे आणि त्यांच्या दिमतीला काही हत्ती दिले.

मालोजीराजे तसे सांसारिक पुरुष होते. त्यांच्या पत्नीचे नाव उमाबाई. फलटणचे नाइक निंबाळकर हे फार मोठे शूर आणि श्रीमंत घराणे होते. उमाबाई निंबाळकर ह्या नाइक यांच्या कन्या. स्वभावाने धार्मिक, प्रेमळ, सोज्ज्वळ, उदार अशा उमाबाईंनी सासरी सर्वांची मने जिंकून घेतली होती. मालोजी आणि उमाबाई यांच्या संसारात एक कमी होती त्यांना मुलबाळ नव्हते. दोघेही देवाची आराधना करीत होते. नवस, व्रतवैकल्य करीत होते. घरी, गावात येणाऱ्या साधूसंतांची सेवा करीत होते. अहमदनगरच्या शहाशरीफ या पीरालाही नवस बोलण्यात आला की, 'आम्हाला पुत्र होऊ दे. तुझे नाव त्याला देईन.'मालोजी, उमाबाई यांची भक्ती, सेवा फळाला आली. उमाबाईंना मुलगा झाला. सर्वत्र आनंदाचे भरते आले. मुलाचे नाव शहाजी ठेवले. शहाजींच्या बाललीलेत दिवस कसे जात होते कळत नव्हते. शहाजी सर्वांचा लाडका होता. शहाजी दोन वर्षांचा झाला. मालोजी भोसले आणि उमाबाईंना दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफ असे ठेवण्यात आले. दुसरीकडे मालोजीराजे जहागिरीचे कामही अत्यंत चोखपणे, व्यवस्थितपणे पाहात होते. लोकोपयोगी कामे सातत्याने होत असल्यामुळे जनताही अत्यंत खुश होती. विशेष म्हणजे निजामशाहीसुद्धा मालोजीरावांवर अतिशय प्रसन्न होती. सारे काही अगदी व्यवस्थित, बिनचूक चालू असताना एकेदिवशी मालोजीराजे यांना महत्त्वाचा निरोप आला. एका स्वारीवर मालोजीराजेंनी तात्काळ जावे असा तो आदेश होता. निजामशाहचा आदेश म्हणजे नाही म्हणणे, चालढकल चालणारी नव्हती. शिवाय ती गोष्ट मालोजींच्या रक्तातही नव्हती. मालोजीराजे भोसले यांनी तात्काळ लढाईवर निघण्याची तयारी केली. फौजेला जमवले. स्वतःची सारी शस्त्रे घेतली. एका मोठ्या आत्मविश्वासाने, निग्रहाने, धडाडीने मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत दाखल झाले. असामान्य पराक्रम गाजवत असताना विठोजीचा राम, उमाबाईंचे सर्वस्व, शहाजी-शरीफ या बालकांचा तात, रयतेचा रखवालदार असणारे राजे मालोजी त्या युद्धात दुर्दैवाने मारले गेले. पुन्हा एकदा दोन सत्तापिपासू सुलतानांच्या महत्वाकांक्षेचा बळी ठरला एक खंदा, पराक्रमी, न्यायी, लोकप्रिय सरदार मालोजीराजे भोसले... मराठा वीर! हेच तर आम्हा मराठी माणसांचे दुर्दैव आहे, एक शाप आहे. मालोजीराजे यांच्या जाण्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण झाले. उमाबाईंचा आक्रोश ऐकवत नव्हता. त्या तशा परिस्थितीत उमाबाईंनी एक निर्णय घेतला... सती जाण्याचा! पतीसोबत या जगातून कायम निघून जाण्याचा. विठोजीला ही बातमी कळाली. त्यांनी उमाबाईंकडे धाव घेतली आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने ते म्हणाले,

"वहिनीसाहेब, हे काय ऐकतोय मी. राजे टाकून गेले हे सत्य आता स्वीकारले पाहिजे. आला जीव जाणार हे विधिलिखित का कुणाला चुकवता आले आहे? कितीही टाळायला पाहिले तरी मृत्यू हा येणारच. आपणही आम्हाला सोडून गेलात तर आम्ही पाहावे कुणाकडे? आमचा नाहीतर या दोन चिमुकल्यांचा विचार करा. अजून पुरती न उमललेली फुले आहेत ती. या जगी उगवू पाहणारे चंद्र सूर्य आहेत ते. त्यांच्यावर का म्हणून अन्याय करता? नाही. वहिनी, नाही. आम्ही तुम्हाला हा विचार करू देणार नाही....." शेवटी उमाबाईंनी विठोजीचे आर्जव ऐकले. त्यांनी स्वतःचा सती जाण्याचा बेत रद्द केला. दुःखात आनंद तो असा. मालोजी गेले याचे प्रचंड दुःख होते परंतु उमाबाईंनी माघार घेतली ही त्यातल्या त्यात समाधान देणारी बाब होती. दुःखी अंतःकरणाने मालोजीराजे यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मालोजीराजे यांच्यानंतर जहागीर कुणाला द्यावी हा एक फार मोठा प्रश्न होता. वारसा हक्काने त्या गादीवर शहाजीराजे बसायला हवे परंतु त्यावेळी शहाजींचे वय केवळ पाच वर्षांचे होते. हा बालक जहागिरीचा कारभार कसा काय पाहणार हा प्रश्न निजामशाहीला सतावत होता. मलिक अंबर याने निजामशाहला सुचविले की, जहागीर शहाजींच्या नावे करावी परंतु कारभार विठोजी भोसले यांचेकडे द्यावा. ही भोसले मंडळी कष्टाळू, सत्यवादी, पराक्रमी आहे. आजच्या स्थितीत आपण मालोजीच्या घराण्याकडून जहागीर काढून दुसऱ्या कुणाला दिली तर विठोजी नाराज होईल. कदाचित तो बंड करेल. त्याचे बंड आपणास परवडणारे नाही. शहाजी मोठे झाल्यानंतर त्यांची कामगिरी पाहून जहागिरीचा निर्णय घेता येईल. निजामशाहला मलिकचा सल्ला पटला त्याप्रमाणे त्याने विठोजी भोसले यांना त्यांच्या दोन्ही पुतण्यांसह दरबारी बोलावले. विठोजी, शहाजी आणि शरीफ शाही दरबारी आले. निजामशाहने स्वतः त्यांचे सांत्वन करून जहागिरीची कागदपत्रे आणि वस्त्रं देऊन विधिवत पुणे व सुपे जहागिरीचा कारभार शहाजीराजेंकडे सोपविला. पाच वर्षे वयाचे शहाजीराजे जहागिरीचे प्रमुख झाले असले तरीही कारभार स्वतः विठोजी भोसले पाहू लागले..…

शहाजीराजे मोठे होत होते. विठोजीकाकांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व बाबतीत तयार होत होते. शहाजीराजे बलदंड होते.पुष्ट खांदे, बळकट बाहू, रूंद छातीचे शहाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. शहाजीराजे तेरा वर्षांचे झाले तशी विठोजी आणि उमाबाईंच्या मनात त्यांचे लग्न करावे ही इच्छा निर्माण झाली. मालोजीराजे होते तेव्हा त्यांनी त्यांची एक सुप्त इच्छा उमाबाईंजवळ व्यक्त केली होती की, सिंदखेडराजा येथील निजामशाहीचे एक भारदस्त जहागीरदार लखुजी राजे जाधवराव यांच्या कन्येला सून करून घ्यावी. परंतु नियतीच्या मनात वेगळेच काही होते. मालोजीराजेंना स्वतःची इच्छा पूर्ण करता आली नाही. उमाबाईंनी ती इच्छा विठोजीरावांजवळ बोलून दाखविली. विठोजी भोसले यांनाही ती गोष्ट आवडली. विठोजीराव अत्यंत समाधानाने, आनंदाने, उत्साहाने पुढील तयारीला लागले...…

नागेश सू. शेवाळकर