स्वराज्यसूर्य शिवराय - 8 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यसूर्य शिवराय - 8

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग आठवा

करुनी प्रण उभारले विजयी तोरण !

शिवराय, जिजाऊ आणि इतरांसोबत पुणे मुक्कामी परत आले तेच मुळी एका विचाराने, एका निश्चयाने आणि एका ध्येयाने प्रेरित होऊन! महाराष्ट्र देशी पसरलेला परकीय साम्राज्याचा अंधार नष्ट करण्याचा मानस घेऊन! काम अवघड होते. हाती सत्ता, फौज, शस्त्रास्त्रे, पैसा असे काहीही नव्हते. माता जगदंबेचा आशीर्वाद, आई-वडिलांचे आशिष, प्रेरणा आणि दादोजी कोंडदेव यांच्यासारखे मार्गदर्शक आणि जीवाला जीव देणारे प्रसंगी प्राणाची पर्वा करणारे शूरवीर मावळे..मित्र! पण या एवढ्या शिदोरीवर शत्रूंचा सामना करावा हे तितके सोपे नव्हते. शत्रू तरी एकटा होता का? मुळीच नाही. त्यावेळी महाराष्ट्र प्रांतावर एकाचवेळी मोघल, सिद्दी, आदिलशाहा, पोर्तुगीज,कुतुबशाही अशा अनेक सत्ता घोंघावत होत्या. पण जे एखाद्या ध्येयाने पेटून उठतात ते स्वतःच्या आशा-आकांक्षाच्या पूर्ततेसाठी जिद्दीने परिश्रम आणि निश्चित असे प्रयत्न करतात. शिवरायांचेही तसेच होते.

बंगळूरहून परतल्यावर राजे स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी आपल्या जहागीरीची, परिसराची पुन्हा नव्याने, बारकाईने माहिती मिळवली. त्यांनी अत्यंत परिश्रमाने मिळविलेल्या, मिळालेल्या माहितीचा अभ्यास, चिंतन, मनन सुरु केले. जिजाऊ, दादोजी यांच्यासोबत सातत्याने चर्चाही सुरू ठेवली. सोबतच ते स्वतःला एक सारखे बजावायचे आणि सोबतच ठरवलेल्या ध्येयाची आठवण करून देत म्हणायचे,'मला, या रयतेला ही जुलमी सत्ता नको आहे. मी नायनाट करेन या सत्तापिपासूंचा. मी या विषारी नागांच्या विळख्यातून या गोरगरीब जनतेची मुक्तता करेल. स्वराज्य व्हावे ही जगदंबेची इच्छा आहे. मातोश्री-पिताश्री यांची इच्छा आहे. या रयतेची इच्छा आहे....'

शिवराय केवळ मनात विचार करून स्वस्थ बसले नाहीत तर जहागीरीचा कारभार पाहताना, मावळप्रांतात हिंडताना त्यांनी अनेक मित्र जोडले. विविध क्षेत्रातील तरुणांना त्यांनी एकत्र आणले. पुण्याला पुन्हा उभारताना त्यांनी घेतलेले कष्ट, दिलेला आधार यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला होता, एक विश्वास निर्माण झाला होता. युवराज शिवाजी जे काही करत आहेत ते आपल्या हिताचे आहे. जनतेचा विकास व्हावा, रयतेचे भले व्हावे म्हणूनच हे मातापुत्र झटत आहेत याची खात्री पटल्यामुळे जहागीरीतील जनता, विशेषतः तरुणाई शिवबांचा शब्द वरचेवर झेलत होती. काही तरुण मंडळी तर शिवरायांसाठी काहीही करायला तयार होती. मावळप्रांतात फिरत असताना तरुण मुले शिवरायांना सामोरे जात. दुरूनच मुजरा करून काहीशा घाबरलेल्या अवस्थेत दूरच उभी राहत. त्यांनी केलेल्या मुजऱ्याला शिवराय हसून प्रतिसाद देत असत त्यामुळे हे तरुण मावळे हरखून जात, आनंदित होत असत. आमच्या मुजऱ्याला राजाने स्वीकारले, नुसते स्वीकारलेच नाहीतर हसून प्रतिउत्तर दिले ही बाब त्या अशिक्षित परंतु शरीरयष्टीने धष्टपुष्ट, ताकदवान असलेल्या मुलांच्या मनात शिवरायांबद्दल आदर, स्नेह वाढायला कारणीभूत ठरत असे. असा अनुभव पूर्वी कधी त्यांना आलेला नसायचा. त्यांच्या लेखी राजा किंवा त्याचा सरदार म्हणजे क्रुर, संतापी, दिसताक्षणी एकतर आरडाओरडा करणारा किंवा लाथाबुक्क्यांनी मारझोड करताना बंदुकीची गोळी घालणारा अशी एक घट्ट प्रतिमा तयार झाली होती परंतु शिवरायांनी त्या प्रतिमेला तडा दिला, छेद दिला. शिवराय एखाद्या लाजऱ्या बुजऱ्या पोराला जवळ बोलावत त्यावेळी त्या तरुण मावळ्याची छाती धडधडत असे. राजाने नेमके आपल्यालाच का बोलावले असेल, काही चुकले तर नाही ना अशा परिस्थितीत थरथर कापत तो तरुण पुढे येत असे परंतु शिवरायांच्या चेहऱ्यावरील हसू आणि त्यांनी आस्थेने केलेली चौकशी यामुळे त्या मावळ्याची भीती, धागधुग कुठल्या कुठे पळून जाई. शिवरायांचे वागणे पाहून तो मनाशीच म्हणे, 'अरे, हे कसे काय? राजा येतो काय, आपला कुर्निसात स्वीकारून चेहरा हसरा करतो काय, जवळ येऊन पाठीवर, खांद्यावर हात टाकतो काय, चौकशी करतो काय? सारेच कसे न्यारेच आहे. असा राजा तर यापूर्वी वागलाच नाही. शिव्या देणारा, मारझोड करणारा, जीव घेणारा, खंडणी मागणारा, प्रसंगी गोळ्या घालणारा हा राजा नाही. उलट आपल्यासाठी काहीतरी करणारा हा राजा आहे. या राजाला आपण मदत केली पाहिजे, या राजाच्या हाकेला दिली पाहिजे...' अशी एक भावना रयतेमध्ये सर्वदूर निर्माण होत होती. हा सारा वृत्तांत कर्णोपकर्णी दादोजी कोंडदेव यांच्या कानावर येत होता. अनेकदा त्यांना जनतेच्या या भावना प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्या. त्यांनी मोठ्या कौतुकाने ते अनुभव जिजाऊंपर्यंत पोहाचवले. ते ऐकून जिजाऊंनाही खूप आनंद झाला. स्वतःचे संस्कार, शिकवण अशी चांगल्या पद्धतीने उदयास येते आहे, शिवबा कल्याणकारी कामे करतो आहे हे ऐकून जिजाऊंचे डोळे आनंदाश्रूंनी भरत येत. शिवरायांनी चाणाक्ष नजरेने असे अनेक हिरे, रत्ने, मोती स्वराज्यासाठी पारखून घेतले होते, निवडून घेतले होते. हे मावळे घरचे फार श्रीमंत नव्हते. एक मात्र नक्की त्यांच्याजवळ श्रीमंती होती, ताकदीची, धडधाकट आणि कमावलेल्या शरीराची, मातीबद्दल असलेल्या निष्ठेची! गरीब शेतकऱ्यांची ही पोरं शिवबावर खूप विश्वास ठेवून होती. या साऱ्या मावळ्यांमध्ये, शिवरायांच्या मित्रांमध्ये येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेथे, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, त्र्यंबक डबीर, बापूजी मुदगल यांच्यासोबत नारोबा, चिमणाजी, बाळाजी ही तीन देशपांडे भावंडं सातत्याने शिवरायांच्या सोबत असायची. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयाच्या बाबतीत ही मुले शिवरायांच्या वयाची असली तरीही शिवरायांचा एक सवंगडी मात्र चक्क साठी ओलांडलेला होता. शिवरायांच्या या सहकाऱ्याचे नाव होते, बाजी पासलकर... कान्होजी जेधे यांचे सासरे! म्हणतात ना, निखळ मैत्रीच्या आड जातपात, गरीब-श्रीमंत, वय काहीही येत नाही. तसेच काहीसे या मैत्रत्वामध्ये पाहावयास मिळते. या मित्रमंडळीच्या माध्यमातून अनेक मावळे शिवरायांच्या जवळ येत होते. त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांचेच होऊन जात होते. हळूहळू लालमहालात या मावळ्यांचा वावर वाढला. महालातील शिस्त, संस्कार, कारभार सारे काही त्यांच्या अंगवळणी पडू लागले. एक दिशा त्यांना मिळू लागली. शिवबा कुणी साधासुधा माणूस नाही तो आपले कल्याण करण्यासाठी प्रत्यक्ष महादेवाने पाठविलेला अवतार आहे असे त्या मित्रांना वाटत होते. शिवरायांचे बोल ऐकून, त्यांचा निग्रह पाहून या मावळ्यांना बादशाह किंवा इतर दुश्मनांची भीती वाटत नव्हती उलट एक प्रकारचा तिटकारा निर्माण होत होता. हा दैवी अवतार आपल्यासाठी काहीतरी करतोय आपणही त्याला साथ दिली पाहिजे. काही झाले तरी ही शत्रूची माणसे इथून चालती झाली पाहिजे, त्यांच्या ऐवजी आपले राज्य व्हायला पाहिजे आणि हा आपल्यासाठी दिनरात्र झटणारा शिवबा आपला राजा झाला पाहिजे असेही विचार मावळ्यांच्या मनात रुंजी घालू लागले. शिवबाने सांगावे आणि क्षणाभरही विचार करता मावळ्यांनी तो शब्द वरचेवर झेलावा असे नेहमीच घडू लागले. शिवराय या मित्रांसोबत दरेखोरे, टेकड्या, गडकिल्ले अशा ठिकाणी रात्री-अपरात्री फिरू लागले. वेळ, तहानभूक, अंतर, थंडी, ऊन, पाऊस, वारा अशा गोष्टी गौण ठरु लागल्या. त्या मित्रांचा एकच ध्यास शिवबा आणि शिवबा! रानावनात हिंडणाऱ्या तरुणांकडून शिवरायांनी जहागीरीची खडानखडा अगदी चोरवाटा, भुयारे, शत्रुंजवळची फौज, दारूगोळा, शस्त्रास्त्रे यासह त्यांचे पहारे कुठे कुठे असतात ही सारी इत्थंभूत माहिती गोळा केली, समजून घेतली.

दादोजी कोंडदेव हे शिवरायांच्या नावाने जहागीरीची कारभार उत्तमरीत्या सांभाळत होते. कळत नकळत शिवरायांना मदत करत होते. जिजाऊही बारकाईने लक्ष ठेवून होत्या. स्वतः शहाजी राजे यांना या सर्व गोष्टींची माहिती जात होती. ते एक महत्त्वाचा सल्ला देत होते तो म्हणजे सावधगिरी! काय करायचे ते करा परंतु या कानाचे त्या कानाला कळू देऊ नका. भिंतीला कान असतात हे लक्षात असू द्या. तशातच शिवराय आणि दादोजी यांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्रपणे एक मुद्रा तयार करून घेतली .... राजमुद्रा! हे सारे करताना दादोजी आणि शिवराय यांना एका गोष्टीची कल्पना होती की, शिवरायांनी जहागीरीत जी काही घोडदौड सुरू केली आहे. ते सारे बादशहाच्या कानावर जाणार त्याच्या लेखी 'बंड' म्हणून या कामाची नोंद होणार तेंव्हा काय करावे हा विचारही झालाच असणार.... नक्कीच!

शिवरायांच्या मनात काहीतरी सलत होते, शिजत होते. आता टेहळणी, तयारी खूप झाली आता काहीतरी करावे, जनतेच्या मनातली चांगली भावना अजून दृढ होण्यासाठी, विश्वास मजबूत होण्यासाठी काहीतरी करावे या हेतूने शिवरायांनी आपले सर्व विश्वासू मावळे यांना पुण्याजवळ असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात नेले. सह्याद्रीच्या शिखरावर अत्यंत झाडीमध्ये हे शिवमंदिर होते. अतिशय प्राचीन, खूप उंच अशा शिवालयात शिवराय आपल्या जीवाभावाच्या मावळ्यांसह आले. शिवराय फक्त 'चला' असे म्हणाले आणि कुणीही काहीही विचारले नाही. कुठे, कशासाठी, का जायचे असे विचारता सर्व जण दौडत निघाले. शिवरायांच्या मनात काहीतरी चालले आहे, शिवराय अस्वस्थ दिसत आहेत एवढेच सारे जाणून होते. शिवरायांच्या मनाचा थांगपत्ता लागत नव्हता. रायरेश्वराच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीभोवती सारे जमले. शिवरायांनी अत्यंत भक्तीभावाने शिवशंकराचे दर्शन घेतले. अवतीभोवती असलेल्या मित्रांकडे शिवरायांनी पाहिले. मावळ्यांना जाणवले की, आज शिवबाचे डोळे वेगळ्याच तेजाने, आत्मविश्वासाने भरलेले आहेत. सवंगड्यांना जास्त वेळ ताटकळत ठेवता शिवराय म्हणाले,

"मित्रांनो, आज एका वेगळ्याच कारणास्तव आपण शंभोसमोर जमलो आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की, ही जी जहागीरी आहे ती बादशहाने दिलेली आहे. किती गंमत आहे ना, या जहागीरीतील गावे आपली, शेती आपली, कसतो आपण, पिकवतो आपण पण आपण पिकवलेल्या धान्यावर, दाण्यावर हक्क कुणाचा? आपला? नाही. मुळीच नाही. इथल्या प्रत्येक गोष्टीवर हक्क, मालकी त्या बादशहाची? कधी आदिलशाहा, कधी निजामशाह तर कधी कुणी. आज मिळालेल्या जहागीरीत आपण आनंदाने राहतो पण कधी बादशहाचा विचार बदलेल आणि कधी ही जहागीरी काढून घेईल सांगता येत नाही. मुळात अशा वतनदारीवर आपण संतुष्ट का राहावे? त्यांनी दिले तेवढेच पाणी आणि दिला तेवढा तुकडा खाऊन शांत बसावे का? या यवनांचा कोणताही भरवसा नाही. दुश्मनांचे अत्याचार वाढले की, आपण काय करतो, त्या जुलुमशाहीला विरोध करतो का? मुळीच नाही. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' असे म्हणत देवाची याचना करीत राहतो. अशा प्रार्थनेला तो देव पावतो का? नाही. त्यामुळे आपली गुलामगिरी नष्ट झाली का? झाली नाही. देवाची उपासना, प्रार्थना, भक्ती जरूर करावी. ती केलीच पाहिजे परंतु केवळ देवाकडे काही मागून देव पावणारा नाही. ईश्वर नक्की पावतो, तो धावून येतो पण केव्हा? ज्यावेळी आपण एखादी गोष्ट देवाकडे मागतो त्यावेळी ती वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रार्थनेला प्रयत्नांची जोड देतो त्यावेळी देव हमखास पावतो. देवाकडे प्रार्थना केली आता देव सारे काही देईल असे म्हणून हातावर हात देऊन बसून चालणार नाही. आळसाने केवळ धावा करून चालणार नाही. भरघोस प्रयत्न करायला हवेत. मित्रांनो, शेकडो वर्षांपासून आपल्या मातीवर कुणी ना कुणी परका येतो. राज्य करतो. भरमसाठ लुट करतो. आपला भयंकर छळ करतो. दुश्मनी दोन राजांची आणि बळी कोण जातो?तर आपला मराठी माणूस. त्या दोन परकियांसाठी लढणारे आपले मराठी सरदार, सैनिक एकत्र येऊन स्वराज्यासाठी का नाही लढत? दुसऱ्या राज्यांच्या सीमा वाढविण्यासाठी, असलेल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी का आपल्या मराठी माणसांचा बळी द्यावा लागतो? हा मराठी माणूस.... आपण जर एक झालो, एक होऊन लढलो तर अन्याय, जुलूम तर सोडा परंतु कुणाचीही आपल्याकडे, या भूमातेकडे वाकडा डोळा करून बघण्याची हिंमत होणार नाही. आपण कशातही कमी नाही आहोत. शूर आहोत, धाडसी आहोत, पराक्रमी आहोत, प्रामाणिक आहोत. कशाचीही कमतरता नाही. कमी आहे ती एकाच गोष्टीची आपण एक नाही आहोत. आपण विखुरलेले आहोत. कुणी आदिलशाहा, कुणी मुघल, कुणी निजामशाही यांच्याकडे इमानेइतबारे चाकरी बजावत आहेत. आपण देवाचा धावा करतो पण त्या देवाला काय हवे याचा कधी विचार केला का? प्रत्यक्ष शिवशंकराला, भवानीमातेला हे पारतंत्र्य नको आहे. एकूणएक देवतांना स्वराज्य हवे आहे. त्यांनाही मोकळा श्वास घ्यायचा आहे. बोला. कोण कोण या पारतंत्र्याच्या बेड्या फेकून द्यायला तयार आहे? स्वराज्य निर्माण करण्यासाठी, माझे राज्य म्हणविता येईल असे राज्य यावे यासाठी या...या...दुश्मनांना हाकलून देण्यासाठी कोण कोण स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे?...." बोलता बोलता शिवरायांचा आवाज चढला. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या तर मधूनच हात कमरेला लटकावलेल्या तलवारीवरुन फिरत होता. बोलता बोलता शिवराय थांबले. तिथे जमलेल्या साथीदारांवर त्यांनी एक नजर फिरवली. शिवरायांच्या शब्दांनी प्रेरित झालेले, उत्साहीत झालेले, रोमांचित झालेले मावळे मनोमन पेटून उठले. एक संकल्प सर्वांनी मनातल्या मनात केला. जमलेल्या मित्रांपैकी एक जण त्वेषाने म्हणाला,

"शिवराय, सांगा. तुमच्या मनात काय चालले आहे ते सांगा. आम्ही काय करावे ते सांगा. तुम्ही सांगाल ते करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. काय मर्दांनो, बरोबर बोलतोय ना मी?""होय. सांगा. राजे, सांगा. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही एका पायावर करु. गरज पडलीच तर जीव द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही." दुसरे सवंगडी उत्साहात म्हणाले. मावळ्यांचा तो उत्साह, तो जोम, तो आत्मविश्वास, निर्धार पाहून उत्साह दुणावलेले शिवराय म्हणाले,

"ठरले तर मग. आता आपले ध्येय एकच.... 'हिंदवी स्वराज्य!' आता ही परक्यांची गुलामगिरी, दुश्मनांचे राज्य उधळून लावायचे आणि आपले स्वतःचे राज्य स्थापन करायचे. उठा, तयार व्हा. या रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेऊया. स्वराज्य मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नांची शिकस्त करूया. बोला हरहर..."

"महादेव...." मावळ्यांनी भरभरून साथ दिली आणि एका वेगळ्याच उत्साहाने शिवराय आणि त्यांची फौज रायरेश्वराचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडली.

सवंगड्याच्या प्रतिसादाने भारावलेले शिवराय पुण्यात परतले. ते थेट माँसाहेबाच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांनी सारा वृत्तांत जिजाऊंच्या कानावर घातला. जिजाऊंचे मन उचंबळून आले. आनंदाश्रूंनी डोळे पाणावले. वर्षानुवर्षे पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती होणार, स्वातंत्र्याचा प्रकाश या प्रांतात पसरणार. मुलाची ती कर्तबगारी पाहून त्या मातेला धन्य वाटले असणार. जन्मदात्या वडिलांच्या, भावांच्या, दिरांच्या आणि असंख्य मराठी बांधवांना कठोरपणे मारणाऱ्या सलतनतीचा नायनाट करण्यासाठी मुलाने विडा उचललाय, तशी शपथ घेतलीय हे ऐकून त्या मातेचे ह्रदय भरून आले. त्यांनी शिवरायांच्या डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद दिला.…

रायरेश्वराचा आशीर्वाद मिळाला. जिजाऊंचा हात पाठीवरुन फिरला. मावळ्यांची साथ मिळाली. शिवरायांना फार मोठा हुरूप आला. शिवराय नव्या ताकदीने कामाला लागले. आदिलशाही दरबारी ही गोष्ट गेली परंतु त्यांनी या घटनेला विशेष महत्त्व दिले नाही. उलट ती बाब हसण्यावर नेताना शिवबाला वेड्यात काढले. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या उनाड, गावठी पोरांसोबत हिंडून शिवाजी रानोमाळ फिरतो हे शहाजी राजे आणि भोसले घराण्याच्या लौकिकाला साजेसे नाही अशी समजूत करून ते शांत राहिले. दुसरीकडे शिवराय अशा विचारात पडले की, अनेक दुश्मनांशी लढायचं म्हणजे शस्त्रे, सैन्य आणि भरपूर धन जवळ असणे गरजेचे आहे. धन उभे करायचे असेल तर शत्रूशी समोरासमोर लढून उपयोग नाही. त्यासाठी गनिमी काव्याने लढणे आवश्यक आहे. विचार करत असताना शिवरायांना एक नाव सुचले...किल्ले तोरणगड! मित्रांसोबत फिरताना ज्या ज्या भागाची, गडांची शिवरायांनी टेहळणी करून ठेवली होती त्यापैकी एक म्हणजे तोरणा किल्ला! पुणे जहागीरीतील परंतु स्वराज्यात नसलेला, कानद खोऱ्यात असलेला हा बळकट किल्ला शिवरायांनी स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी निवडला. गड हाती असेल तर सत्तेला एक वलय प्राप्त होते यादृष्टीने शिवरायांनी तोरणगडी विजयी पताका आणि भगवा ध्वज उभारण्याचे ठरविले. पुणे जहागीरीत कुणीच शत्रू नाही. शहाजी राजे भोसले हे आपले सरदार आहेत तेव्हा तोरणा गडावर कुणी हल्ला करणार नाही या विचाराने आदिलशाहाने तिथे फारसे सैन्य ठेवलेच नव्हते. पूर्णपणे गडाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले होते. हे सर्व शिवरायांनी हेरले. काही तरी ठरवले. स्वतः शिवराय आपल्या मावळ्यांसह तोरणगडावर गेले. फारसा प्रतिकार, लढाई होता तोरणा किल्ल्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. स्वराज्यात आलेला, शिवराय मावळ्यांनी जिंकलेला तो तोरणगड त्यावरील भगवा ध्वज पाहून सारेजण आनंदले. भवानीमातेचा जयजयकार झाला. हरहर महादेव ही घोषणा गड आणि परिसरात दुमदूमली. गडावर भक्कम पहारा बसवून शिवरायांनी गडावर असलेल्या तोरणजाई देवीचे दर्शन घेतले. हात जोडून प्रार्थना करताना म्हणाले,

"हे माते, तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्याच साक्षीने स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ केला आहे. असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू दे."

लगेच खास दूत लालमहालाच्या दिशेने रवाना झाला. त्याने तोरणगडी स्वराज्य तोरण उभारल्याची आनंदी बातमी जिजाऊ आणि दादोजींच्या कानावर घातली. जिजाऊ माँसाहेबाना प्रचंड आनंद झाला. त्यांनी लालमहालात येणाऱ्या शिवरायांचे आणि त्यांच्या शूर सहकाऱ्यांचे थाटामाटात स्वागत करण्याची तयारी केली. काही वेळाने शिवराय लालमहालात आगमन झाले. जिजाऊंनी पुढे होऊन सर्व शूरवीरांचे ओवाळून स्वागत केले. शिवरायांनी माँसाहेब आणि दादोजींना नमस्कार केला. परंतु अशा आनंदाच्या समयी दादोजी काहीसे गंभीर असलेले पाहून शिवरायांनी विचारले,

"काय झाले? आम्ही अयोग्य काही केले आहे?"

"नाही. शिवबा, तुम्ही अत्यंत योग्य केले आहे. भवानीमातेच्या आशीर्वादाने तुम्ही फार मोठी भरारी घेतली आहे पण राजे, थोडे सबुरीने घ्या. अजून आपण वयाने तसे लहान आहात. महाराज साहेबांनी आपली आणि माँसाहेबाच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. तुमच्या कामगिरीचा आम्हाला सदैव आनंदच होणार आहे."

"काळजी नसावी. आपल्या मार्गदर्शनानुसार आम्ही कार्य करणार आहोत."

शिवरायांच्या त्या पहिल्या दमदार विजयश्रीने लालमहालात आनंदी वातावरण पसरले होते. त्याच आनंदी वातावरणात सईबाईंनी केलेल्या गोडाच्या जेवणाचा आनंद घेऊन मावळे प्रफुल्लीत झाले.

लगोलग शिवरायांनी तोरणगडाची डागडुजी सुरु केली आणि आश्चर्य घडले. तोरणजाई माता पावली. राज्य उभे करायचे, ते चालवायचे म्हणजे भरपूर धन लागते हे जाणून माता भरभरून पावली. दुरुस्तीचे काम सुरु असताना कामगारांना एक हंडा दिसला. हंडा धनाने पूर्ण भरलेला होता. सर्वत्र आनंद पसरला. ज्याला समजले तो म्हणू लागला, आपल्या राजाला तोरणजाई माता प्रसन्न आहे म्हणूनच मातेने धनदौलत पाठवून आशीर्वाद दिला आहे. काहीही असले तरी स्वराज्याला हवे असलेले धन यानिमित्ताने मिळाले. शिवरायांचा उत्साह दुणावला. ते अधिक जोमाने कामाला लागले.

तोरणा स्वराज्यात आला. यशस्वी सुरुवात झाली. शिवरायांचा आत्मविश्वास दुणावला. तोरणगडापासून जवळ असलेल्या एका डोंगरावर आदिलशाहाने एक किल्ला बांधायला सुरुवात केली होती. परंतु अर्धवट बांधकाम झाले आणि आदिलशहाने बांधकाम थांबवले. शिवरायांच्या मनात विचार आला, हा अर्धवट बांधलेला किल्ला जिंकून त्याचे बांधकाम पूर्ण केले तर सुरक्षेच्या आणि इतर सर्वदृष्टीने तो किल्ला मजबूत, बळकट होईल. महत्त्वाचे म्हणजे स्वराज्यात एका बळकट किल्ल्याचा समावेश होईल. असा विचार करून शिवराय काही निवडक मावळ्यांना घेऊन त्या किल्ल्यावर पोहोचले. तिथे केवळ आठ-दहा आदिलशाही सैनिक होते. तेही पूर्ण निर्धास्त होते. तो फायदा उचलून शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले आणि भगवा फडकविला. पाठोपाठ त्या किल्ल्याचे संरक्षणाच्या बाजूने आणि इतर सर्व बाबींचा विचार करून त्या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. किल्ल्यावर बारा महाल, राजवाडा आणि राजगादी तयार झाली. त्या किल्ल्याला मोठ्या उत्साहाने, आनंदाने नाव दिले राजगड! याच राजगडाची निवड शिवरायांनी राजधानी म्हणून केली. सर्वच बाबतीत एक परिपूर्ण अशी राजधानी!

तशात एक अकल्पित, दुःखदायक घटना घडली. शहाजी राजे यांचे विश्वासू, जिजाऊंच्या पाठीशी भावाप्रमाणे सदैव उभे असलेले, शिवरायांचे मार्गदर्शक, वडिलकिच्या नात्याने शिवरायांना चार गोष्टी हक्काने सांगणारे, पुणे जहागीरीत 'सोन्याचा नांगर ' फिरवणारे अशी ख्याती प्राप्त असलेले, सज्जनासाठी सज्जन असणारे, दुर्जनांचा कर्दनकाळ असणारे पंत उर्फ दादोजी कोंडदेव हे या जगाचा निरोप घेऊन, सर्वांना दुःखाच्या महासागरात सोडून कायमचे निघून गेले. शिवरायांचा फार मोठा आधारवड कोसळला....…

नागेश सू. शेवाळकर