शायर Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शायर

शायर

पन्नाशिचा एक शायर , अंगावर थोडी मळकटलेली कुर्ती , डाव्या खांद्यावर झोळी अडकवलेली , उजव्या हातात एक जाडसर पुस्तक घेवुन , डुलत डुलत लायब्ररी च्या पायर्या चढु लागला. लायब्ररी मध्ये पिन ड्राँप सायलेंन्स. लायब्ररीयन , एक २० वर्षाचा पार्ट टाईम जाँब करणारा काँलेज तरुण , पुस्तकांची माहिती कम्प्युटर मध्ये फिट करत बसलेला. तेवढयात त्याची नजर शायर वर पडली. तसा चाकांच्या खुर्चीला गरकन फिरवत तो टेबलजवळ आला. आणि दोन्ही हात टेबलवर ठेवत हसत म्हणाला ,

लायब्ररीयन - शायर साब आये है.. मतलब जरुर कुछ नया सुनने को मिलेगा .

तस शायरने बुक टेबलवर ठेवल आणि रागाने खाली वाकुन लायब्ररीयन ची काँलर पकडली आणि डोळ्यात डोळे घालून बोलु लागला.

शायर - पुस्तक घेताना काय म्हणालो होतो रे तुला ? असं पुस्तक दे जे वाचुन मी माझं दुःख विसरेन..

पण तु काय दिलं ? छावा...महाराज आणि सईबाई यांची ताटातुट वाचुन केवढ्या यातना झाल्या मला. मी माझ्या बायकोला विसरायच सोडुन शंभरवेळा जास्त आठवण आली तिची हे वाचुन.

शायरच्या बायकोच दिर्घ आजाराने निधन झाल आणि तिच्या उपचारासाठी पुरतील इतके पैसे तो आणु शकला नाही त्यामुळे त्याच मन त्याला खात राहतं. दुःख आणि गिल्ट त्याला सहन करण्या पलिकडच आहे. तेव्हापासून तो सतत चिडचिड करतो. आणि त्यात त्याला बायकोचे आवाजही ऐकु येतात... तेवढयात बायकोचा आवाज आला.

बायको - अहो... याआधी कमीत कमी दहावेळा छावा वाचुन रडला असाल तुम्ही.. आज का त्या पोराला रागावताय ? सोडा बघु त्याला..

हे ऐकताच त्याने काँलर सोडली. तसं इतकावेळ आ वासुन शायरकडे बघणारे लायब्ररीतील वाचक , पुन्हा पुस्तकात तोंड खुपसुन बसली. आणि थोडासा घाबरलेला लायब्ररीयन शर्ट निट करत खिन्न पणे म्हणाला ,

लायब्ररीयन - पुस्तकं दुःख विसरण्यासाठी नाही , व्यक्त करण्यासाठी असतात.

एवढ बोलुन टेबलच्या डाव्या बाजुला , आईच्या फ्रेम केलेल्या फोटोवर त्याने नजर वळवली. आणि बराचवेळ फोटोकडे भरल्या डोळ्याने पाहत राहिला. शायरला जे समजायच ते समजल. त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटु लागली. त्याने स्वतःच्या डाव्या हाताने त्याचा डावा खांदा मायेने थोपटला आणि उजव्या हाताने आशिर्वाद देत

शायर - गाँड ब्लेस माय सन... म्हणत गरकन वळला आणि जड अंतःकरणाने झपाझप पायर्या उतरु लागला. बाहेर पडताच त्याची नजर समोरच असलेल्या देशी दारुच्या दुकानावर पडली. आणि आपसुकच पावले दुकानाकडे वळली. दोनचार घोट घेतल्यावर शायर हसुन बोलला ,

शायर - क्यों भाई दुकान के लिए कोई और जगह नही मिली ? लायब्ररी के सामनेही..?

दुकानदार - क्या करे साहब...हमे तो बस बेचना आता है। हा मगर क्या खरिदना है ... ये तो आप पे डिपेन्ट करता है।

शायर - सच कहा.. " दोनो दर्द से लढना चाहते है..मगर उसने किताबे चुनी और मैने शराब..!" हा हा... लायब्ररीयन ला आठवत लाल बुंद डोळ्यांनी हसतच तो बाहेर पडला. थोडस हेलकावे खात चालु लागला.

केळीच्या गाड्या शेजारी एक माणुस पिऊन त्याच्या बायकोला मारत होता. काही लोक रोजचाच तमाशा काय बघायचा म्हणत दुर्लक्ष करुन निघुन जात होते. काही बघत मजा घेत होते. तेव्हा शायरला ते पाहुन वाटल मोठ्याने ओरडावं ,

शायर - साला बायकोला मारतो..नामर्द कुठला.. सोड तिला..अरे माणसं गेल्यावरच त्यांची किंमत कळते रे.

पण दुसर्याच क्षणाला त्याच मन त्याला म्हणत होतं ,

" जो स्वतःच्या बायकोला वाचवु शकला नाही , तो दुसर्याच्या बायकोला काय वाचवणार ? काही अधिकार नाही तुला.. बायकोच्या ईलाजाला पैसे भरु शकला नाहीस. कसला ढोंग्या आहेस रे तु.. आळशी एक नंबरचा.. खोटारडा..कामचुकार.. मनाला वाटत होता ना एका जाँब मध्ये नाही भागणार..अजुन काही तर कर.. पण नाही , किती तोर्याने म्हणायचास पैसा सर्वकाही नाही. मान्य रे.. पण पैसा ' खुपकाही ' असतो ना अशावेळी त्याच काय ?? कुणा कुणाचे तळवे चाटलेस शेवटी.. दिली का कुणी फुटकी कवडी, तुझ वागण बघुन ? तु फक्त आजपुरता विचार करायचास .. उद्याचे उद्या बघु..नडला रे स्वभाव नडला...हा हा ...

शायर मोठमोठाठ्याने हसु लागला. पण डोळे वाहत होते.. अनंत दुःख घेवुन. त्या नवरा बायकोच भांडण कधीच थांबल होत. लोक निघुन गेले होते पण येणारे जाणारे माञ शायरकडे वेडा म्हणुन हसत होते, कारण तो स्वतः शीच बोलत होता. तेवढयात बायकोचा प्रेमळ मायाळु हळुवार आवाज आला ,

बायको - नका हो स्वतः ला ञास करुन घेवु. खुप दिलतं तुम्ही मला. अजुनही चिरतरुण आहेत त्या प्रेमाने मंतरलेल्या राञी..आणि माझ्यासाठी लिहीलेल्या कविता..शायर्या.. केवढ समाधान आहे त्याच.

शायर - मी तेवढच देवु शकत होतो..आयुष्यभर काळी पोत घालुन फिरलीस..पार्वतीच्या लंकेसारखी. त्या काळ्या मन्यात एक पिवळा मनी वाढवु शकलो नाही गं. निष्कर्मी आहे मी... हा हा हा....

दुःखाची एक एक पोकळी गोळा करत,उन्हात पांढरे डोळे लाल करत, ठेचकाळत तो शायर घराकडे निघाला.अचानक तोल जावुन तो ठेचकाळला आणि पायाला लागलं.बाजुचा माणुस करड्या नजरेने जाता जाता बोलला," ये भाई संभलके चलो ना"

शायर -" जिनके नसीब में ठोकरे लिखी हो..वो चाहकर भी संभल नही सकते " मेरे दोस्त।

बायको - आई गं..केवढी जखम झालीये बघा अंगठा फुटलाय. उठा बरंं तुम्ही..कस वागता हो..

शायर - काळजावरील जखमा याहुन खोल आहेत गं..हा हा हा... आणि पुन्हा तो चालु लागला. रक्ताचे थेंब बराचवेळ त्याच्यासोबत रस्त्यावर चालत होते." वेळ आली की बर्याच गोष्टी सुकतात अगदी रक्ताचे डागही ". तो घराच्या गल्लीत आला. शेजार्यांच्या दारातुन प्रेतयाञा निघण्याच्या तयारीत होती.पुरुष मंडळी उभी होती. दारात बायका आक्रोश करत होत्या. शायर पाहुन स्वतःशिच बोलला ,

शायर - पांडुरंगा.. अजुन एक जीव सुटला. या संसाराच्या गाड्यातुन मुक्त झाला..अंतराळाच्या पोकळीत विसावायला... भाग्यवान आहेस..वेळेत मरण आल.नाहीतर आम्ही..मरणाच्या प्रतिक्षेत मरनासन्न यातनेच्या डोहात पोहतोय कधीपासून.. पण बहुदा त्या डोहाला किनारे बनवायचे विसरलाय विधाता..

त्याच हे पुटपुटण ऐकुन काही पुरुष मंडळी त्याच्याकडे बघु लागली. तेवढयात त्याची नजर मयताच्या दारावर गेली. त्यात एक छोटा 3 वर्षाचा मुलगा माञ पुर्ण हनुवटी , ओठ , नाकाला कोलगेट लावुन ब्रश करण्याचा प्रयत्न करत होता. पण तो ब्रश कमी आणि दाढी करणच जास्त वाटत होत. ते गोंडस पोर.. त्याच कोणीतरी मेलय अन याला दुःख सुख यातल काही कळत नाही. निरागस.. आपल्याच विश्वात मश्गुल.. कस सांगांव त्याला ? वेड गालावर ब्रश फिरवतयं. बाजुचा नळ वाहतोय आणि हा त्या पाण्यात मांडी घालुन बसलाय.. " बाळा या पाण्यासारख दुःख वाहशिल का रे मोठ्ठा झाल्यावर.. या मृताच्या आठवणींच ?" अशा कठिण परिस्थित प्रत्येकाला इतकच निरागस होता आल असत तर ?? हा हा ... कस शक्य आहे ? "

म्हणत शायर घराकडे वळला. दरवाजा उघडुन आत गेला. लाकडी आराम खुर्चीवर अंग टाकुन बसला.. डाव्या हाताने रेडिओ चालु केला.

" ज़िन्दगी कैसी है पहेली हाय..

कभी तो हँसाए, कभी ये रुलाये....

.........................

जिन्होंने सजाये यहाँ मेले, सुख-दुःख संग-संग झेले

वही चुनकर खामोशी, यूँ चले जाएँ अकेले कहाँ

ज़िन्दगी कैसी है पहेली..."

या ओळींसोबत डोळे झाकुन तो ढसाढसा पिऊ लागला. डोळ्यातला पाऊस अखंड कोसळत होता. तेवढ्यात बायकोचे कोमल हात गालावरील अश्रु पुसु लागले . कपाळावरुन मायेने हात फिरवु लागली. त्या हातांना घट्ट पकडुन ठेवाव कायमसाठी. तु कुठेही जायच नाही.. मला सोडुन बास्स. असा विचार करुन शायरने ते हात घट्ट पकडले आणि डोळे उघडले. ते बायकोचे हात नसुन त्या 3 वर्षाच्या छोट्या मुलाचे होते. शायर थोडा गोंधळला.

मुलगा - आजोबा.. उठा ना.. ते आपल्या आज्जीला खांद्यावर घिवुन चाललेत..थांबवा ना त्यांना..

भयाण शांतता... शायरच्या हृदयात आणि डोक्यात..शरिरात..सर्वञ . पुन्हा पापण्या हलल्याच नाहीत.