ओळख
कैलास. ज्याच्या नशिबी दारिद्र आणि हालअपेष्ठा म्हणजे जणू पाचवीलाच पुंजलेली . जन्मला तेव्हा जन्मदातीने डोळे मिटले. आणि बायको गेली म्हणून बाप दारूच्या आहारी. त्याच नशेत घरातलं असलं नसलं दररोज वेशीवर निघायच. त्यामुळे घरची परिस्थिती अजूनच बिकट होत होती. आईविना असलेला पोर म्हणून ६ वर्ष्यापर्यंत मावशींनी वागवलं, पुढे तिची स्वतःची कुस फुलली आणि कैलास बापाकडे राहायला आला,त्याच घर म्हणजे १ खोली. त्याच्या एक कोपऱ्यात चूल होती,दुसऱ्या कोपऱ्यात एक पलंग, त्यावरच्या वाकळ अगदी मूळचा रंग सोडून सगळ्या एकरंगी काळपट झाल्या होत्या, घरात कोळींच्या जाळ्यांनी आणि उंदीरांनी हौदोस मांडला होता.बाकी इतर वस्तू म्हणजे नावालाच. अगदी रोजच्या वापरायला हि नुपूर यायची. खरं तर ६ वर्ष मावशीकडे राहून कैलास तेथे रुळाला होता "आइ मरो न मावशी जगो" असं म्हणतात पण कैलासच्या बाबतीत हेच घडलं होती.आईनंतर त्या लेकराला आईची माया देऊ शकणारी फक्त मावशी असते.मावशी कैलाश ला चांगलं जपायची.अतिशय नीटनेटके कपडे,व्यवस्थित वागणं-बोलणं,चांगल्या सवाई असे तिच्या परीने तिने सगळे संस्कार कैलास वर केले होते.मुळातच गौरवर्णीय,नाकी डोळी छान असलेला कैलास तश्या रुबाबात राजबिंडा च वाटायचं.पण त्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव होती. आपण मावशीकडे राहतो, वडील दारुडे आहेत.आणि कधीतरी आपल्याला वडिलांकडे जावं लागणार याची त्याला मनोमन कल्पना होती.
ज्या दिवशी कैलास मावशीला सोडून आला तेव्हा खूप रडला,मावशीलाही भरून आलं होत,पण परिस्थितीपुढे दोघेही हतबल होते.कुणाचीच आर्थिक परिस्थिती ऐवढी खंबीर नव्हती .जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना बघितलं त्याला त्यांची किंव आली.अगदी शून्यात हरवलेला माणूस.ज्याला जगाचं सोडा स्वतःचही भान नव्हतं. कपडे मळलेले,कुठे फाटलेले,केस विस्कटून तोंडाचा सतत येणार वास.आणि निरंतर सुरु राहणारी त्यांची बडबड.सोडायला आलेल्या मावशी आणि काकांनी त्यांना थोडं समजून सांगितलं.त्यांच्यावर कैलास ची जबाबदारी आहे, स्वतःसाठी नाहीतर त्याच्यासाठी तरी दारू सोडा ,त्याला चांगलं घडवा,शिकवा.हे दिवस पालटतील..पण व्यर्थ..सगळं उठल्या घड्यावर पाणी.
"झाल्या बरुबर माझ्या संगीला गिळलं यानं,अन याची खातिरदारी करू मी? आता माझ्या उरावर आलंय.." एवढेच शब्द त्याचा बाप कसबस बोलला आणि तिथेच पडला. मावशी च्या जीवाला आता घोर लागला.सहा वर्षाचं पोर म्हणजे कोवळंच ,कस ठेवायचं त्याला इथं?पण आपण पण आता २ लेकरांचा भर सहन करू शकत नाही,वरून सासू-नणंदेचे टोमणे.यांना पण नकोय आता कैलास घरी.अरे देवा काय करू? या सगळ्यात या पोराचा काय दोष? आधीच किती कमनशिबी आहे न वरून अश्या अवहेलना.'
पण देवालाच काळजी म्हणतात म्हणून कि काय कैलासची आजी तिथे होती. पण तिचंही आता वय झालं होत.पण तरीही अंग झिजवत राबराब राबत होती. शेवटी आई ची माया, कसही असलं तरी तिने तीच लेकरू पदरातच ठेवलं होत.कैलास च्या येण्याने फक्त त्या घरात तिलाच आनंद झाला होता.तिने मावशीला विश्वास दिला "आग पोरी, एवढे दिस सांभाळलंस आमच्या कैलास ला तुझे लै उपकार हाईत गं. तू नको काळजी करूस मी हाय नव्ह मी मोठा करीन याला.अजून हाडात जीव हाय माझ्या. "
आजीच्या बोलण्याने मावशीचा जीव भांड्यात पडला आणि कैलास ला आजीच्या हवाली करून ते निघून गेले.
नवीन परिसर ,नवीन वातावरणात जुळवून घ्यायला कैलास ला चांगलाच त्रास झाला,कारण दारुड्याचा पोरगा म्हणून त्याला कुणी मित्र बनवून घेत नव्हते, खेळायला मनाई करायचे. आधी कैलास हे सगळं आजीकडे सांगायचं पण ती तरी काय करणार बिचारी ! "तू आपल्या घरतच खेळत जा हा राजा" असं म्हणून प्रेमानी थोपटून द्यायची.कैलास पण मुकाट्याने ऐकायचा कारण दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हताच , काही दिवसात कैलास ची शाळा सुरु झाली आणि कैलास तिथे रमायला लागला.अगदी मन लावून अभ्यास करू लागला. हजरजवाबीपणा हे कैलास च वैशिष्ट. त्यामुळे तो सर्वच शिक्षकांचा लवकरच लाडका झाला.त्यातल्या मराठीच्या स्मिता देशमुख बाईंचा तो विशेष लाडका होता. लहान असून पण कैलास अगदी स्पष्ट मराठी बोलायचं कधी अळखळायचा नाही. आणि त्यांना स्वतःच मूल नसल्यामुळे तो आंनद त्या शाळेलत्या मुलांमध्ये शोधायच्या. कैलास च्या घरची परिस्थिती स्मिताबाईंना ठाऊक होती. कैलास ला आई नव्हती आणि स्मिताबाईंना मूल..त्यामुळे त्या कैलासाची जास्त काळजी घ्यायच्या.कैलास लहान असताना एकदा जत्रेमध्ये गेला होता,तेव्हा तिथे गोंदण करणारा होता. मावशीकडे हट्ट करून त्याने पण गोंदून घेतलं.पण तेव्हा मावशीने त्याच्या हातावर नाव गोंदवल होत"लक्ष " आणि लाख मोलाची शिकवण दिली होती "बाळा, तुला माहीत आहे आपली परिस्थिती काय आहे,पण कधी खचू नकोस.जसं एकलव्य प्रतिकूल परिस्थिती मध्ये स्वतः शिकला तूपण स्वतःच स्वतःला घडव.कधीही धैर्यावरचं लक्ष विचलित होऊ देऊ नको"कैलास ती शिकवण सतत आठवायचा. बघता बघता वर्ष लोटत होती.कैलास आता सहावी मध्ये गेला होता. त्याला लागणाऱ्या वह्या , पेन असं स्मिताबाई स्वतःहून द्यायच्या . पण स्वाभिमानी कैलास ला असं कुणाचं देणं नको असल्याचं .त्याला माहित होत कि बाईंचा त्याच्यावर जीव आहे पण तरीही विनाकष्ट त्याला काही नको होत. पण गरजही होती.त्याची अशी दुविधा बाईंनी ओळखली. एक दिवस त्यांनी कैलास ला घरी बोलावून घेतलं. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्या त्याला म्हटल्या," बाळा, मला माहित आहे तू खूप हुशार आहेस आणि स्वाभिमानी सुद्धा. तुला नको वाटत न असं माझं तुला मदत करणं"
"असं नाही बाई,पण सतत तुम्ही पण किती खर्च करणार नं?"
"अरे बाळा मी तुला आईसारखी आहे नं?मग आई नि दिलेली वस्तू मुलाला जड असते का?
"नाही बाई...पण..."
"मला माहिती आहे तुला असं नुसतंच माझी मदत नको आहे.तुला हे जड जात नं?मग तू एक काम कर रविवारी किंवा सुटीच्या दिवशी माझ्या बागेतली साफ सफाई करत जा.काम हि होईल आणि तुझ्या मनावर पण दडपण नसेल."
बाईंनी काढलेला हा तोडगा कैलास ला खूप आवडला.त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली.तो आनंदाने तयार झाला.त्यांनतर तो नं चुकता नेहमी बाईंच्या घरातल्या बागेची साफसफाई करायचा.त्याचबरोबर बाईंना कामात मदत करायचा. आणि त्याचबरोबर मन लावून अभ्यास करत होता.सतत वर्गात पहिला यायचा.त्यामुळे बाईंना त्याचा अभिमान कायम होता. बाईंनी त्याला महागातलं घड्याळ बक्षीस म्हणून दिलं. कैलास नेहमी ते घड्याळ लावायचा.
पण माणसाची वाईट वेळ कधी सांगून येत नाही म्हणतात तेच खरं.काळाच्या ओघात आजी ची साथ सुटली.बाईंची दूर दुसऱ्या शहरात बदली झाली..आजी गेल्यामुळे वडिलांवर कसलाच अंकुश नव्हता. कैलास स्वतः काम करून शिक्षण घेत होता आणि घर चालवत होता.पण त्याच्या वडिलांचे दारू पिणे वाढले होते,ते सतत कैलास जवळ पैशांची मागणी करायचे.कैलास त्यांना ओरडायचा तर ते त्याच्यावर हातही उगारायचे.असाच एक दिवस वडिलांनी कैलास कडे पैसे मागितले.त्याच दिवशी वाण्याचे पैसे चुकते केल्याने कैलासकडे काहीच पैसे नव्हते.तो अभ्यास करत बसला होता.त्याने सांगितलं"बाबा आज खरंच पैसे नाहीत हो, आजच थकलेलं बिल दिलं आहे वाण्याच" पण वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.कैलास त्याच्या कडे दुर्लक्ष करून अभ्यास करत होता.त्यामुळे त्याच्या वडिलांना राग आला त्यांनी कैलास च्या अंगावर धाव घेतली आणि हाताला येईल त्यांनी त्याला मारू लागले.कैलास ओरडत होता पण दारुड्या लोकांच्या मधात कुणी येत नाही आणि त्यात तर हे रोजचंच होत,सगळे फक्त हळहळ व्यक्त करत होते.पण आज नियती ला काही वेगळंच मंजूर होत,वडिलांचा राग एवढा विकोपाला गेला कि त्यांनी कैलास ला सरळ घराबाहेर काढलं. कैलास ही रोजच्या त्रासाला कंटाळला होता.त्यालाही राग येत होता.पण कर्तव्य आणि परिस्थिती म्हणून तो गप्प होता.पण आज तोही निघाला...पाय चालत होते..वाट ठाऊक नव्हती...नकळत त्याची पावले रेल्वे स्टेशन कडे वळली आणि तो समोरून येणाऱ्या ट्रेन मध्ये बसला...त्याने एक अनोळखी प्रवास करू केला होता.ट्रेन सोबत..ज्याची त्याला किंचितही कल्पना नव्हती.
ती रात्र त्याने ट्रेन च्या दरवाज्यात च बसून काढली.सकाळी कुठल्याश्या प्लॅटफॉम वर ट्रेन थांबली .कैलास तिथे उतरला.नवी जागा नवीन लोक त्याला असं बघायची सवयच नव्हती.कधी कुण्या गावाला जायला त्याला मिळालंच नव्हतं.तो घाबरला.आता पुढे काय करायचं.नोकरी करायची तर शिक्षण फक्त नववी. आणि काम तरी कोण देणार.तो प्लॅटफॉर्म वर नुसतं फिरत फिरत होता . पहिल्यांदा तो बाहेरचं जग अगदी जवळून बघत होता.यंत्रवत धावणारे लोक,त्यांचा पोशाख, नवीन नवीन मोबाईल सगळं अगदी हेवा वाटत होता.तेवढ्यात काही भिकारी मुले कैलास कडे "१ रुपया द्या नं"म्हणून पायाला चिटकली.अचानक अश्या वागण्याने कैलास पूर्ण घाबरला.त्याने असं कधीच बघितलं नव्हतं.त्याला त्या मुलांची दया आली पण तो तरी काय करणार.अचानक बापानी हाकलून दिलेला मुलगा.अंगावरच्या कपड्यानिशी आला होता.सोबत होत फक्त बाईंनी दिलेलं घड्याळ! त्याने कसतरी त्या मुलांपासून सुटका करून घेतली.आणि तो विचार करत चालू लागला. पुढच्या बाकावर त्याच्याच वयाची काही मूल बसलीय होती.दिसायला अगदी टवाळखोर दिसत होती.गळ्यात रुमाल बांधलेला,मळकट कपडे, शर्टाची ३ बटण उघडे,भाषा सुद्धा अशुद्ध.कैलास एकसारखा त्यांच्याकडे बघत होता, तेवढ्यात त्यातल्या एकाच लक्ष कैलास वर गेलं
"काय र ये ,काय बघतुस डोळे फाडून??
"काही नाही सहज"
"मग जा ना पुढं..इथं काय हुंगतुया ?"
कैलास काहीच नं बोलता समोर चालत गेला. सूर्य डोक्यावर आला होता.उकाडा प्रचंड जाणवत होता.पोटात कावळे ओरडत होते. कैलास हताश होऊनं एक कोपऱ्यात बसला होता. थोड्यावेळानी मघाची ती मुलं तिथून जात होती,त्यांचं लक्ष कैलास वर गेलं आणि त्याचबरोबर त्याच्या हातातल्या घड्याळावरही.त्या मुलांच्या टोळीचा एक प्रमुख होता.बबन .सगळे त्याला भाई म्हणत होते.,त्याला ते घड्याळ आवडलं होत. काही वेळानी कैलास बाथरूम कडे जायला निघाला तस या टोळींनी त्याला अचानक घेरलं आणि ते घड्याळ जबरदस्ती नि काढून घेतलं.७ ८ जनांसमोर कैलासचा निभाव लागला नाही.तो घड्याळ परत करण्यासाठी विनवू लागला."अहो दादा ऐका ना,ते घड्याळ खूप महत्वाचं अहो हो .प्लिज मला परत द्या"
"प्लिज.....आर इंग्रजी बोलतो कि हा तर..चल बाकी सगळे पैसे दे नाहीतर .."
असं म्हणून त्यांनी चाकू काढला.आता मात्र कैलास घाबरला.
"अहो पैसे नाहीत माझ्याकडे. घरातून हाकलून दिलंय मला तसाच आलोय मी.."
अगदी काकुळतीला येऊनं कैलास बोलला आणि त्याला अश्रू अनावर झाले.
त्याच रडणं बघून ती मुलं जरा थबकली.त्याना कैलास खोट बोलतंय असं वाटत नव्हत.कारण हा सकाळपासून प्लॅटफॉर्म वर फिरत होता.जवळ कुठली बॅगही नव्हती तर कुठल्या ट्रेन ची वाट पण बघत नव्हता.
बबनभाई नि त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला विचारलं
" आर ये बुसनाळ्या, असं रडतुस का? काय झालं ते सांग..अन समद खरं खरं सांगायचं "
पुन्हा चाकू दाखवत बबन बोलला.
त्यामुळे घाबरून कैलास नि त्याची लहानांपासूनची व्यथा त्यांना ऐकवली.तो शाळेत नेहमी प्रथम यायचा हे ऐकून ती मुलं अवाक झाली होती कारण ती कधी शाळेतच नव्हती गेली.कुणी अनाथ तर कुणी टाकून दिलेली असेच होते ते,स्वतःच वाढलेले,एकमेकांचे आधार बनून.
त्यांना कैलास वर दया आली.
"च्या आयला, आपण तर आपल्या आय न बाप दोघांचं बी थोबाड न्हय बघितलं, पण असलेल्या बापानं आता हाकलून दिलं ते बी एवढ्या गुणी पोराले!!! आन तू काऊन बे त्याचा हातचा मार खायचा?? द्यायची न लगावून उलट्या हाताची बेवड्याले" एवढा वेळ गप्प असलेला त्या टोळीतील गण्या बोलला आणि बाकी सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला.
"अरे कसेही असले तरी वडील आहेत ते माझे. वयाने आणि मानाने दोन्ही बाबतीत मोठे आहे" कैलास बोलला.
" आर पर बापच कर्तव्य काय असत का न्हई? कि तूच खाऊ घालशील त्याले न तो बसंन तुले लाथा हाणीत??"बबन भाई.
यावर मात्र कैलास गप्प झाला. उत्तर त्याच्याकडे हि नव्हतं. हे प्रश्न त्याला पहिल्यांदाच विचारत होत अस नव्हतं.शाळेतील मित्र त्याला हेच म्हणायचे नेहमी,पण कैलास ला ते पटत नव्हतं.
"बर मग आता काय करणार हाइस?"
गप्प झालेल्या कैलास च मौन यामुळे तुटलं. खरं तर हाच विचार तोही करत होता.
त्याच मौन बघून त्याना कळालं याचा सध्या कुठेच ठावठिकाणा नाही.
"चल भावा, आजपासून तू आमचा दोस्त, तू आजपासून आमच्याच सोबत राहायचं आणि आमचंच काम करायचं" बबन म्हटला.
"काय काम करता तुम्ही?" प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांनी विचारल.
"भीक नाही मागत ह आपण..." तेवढ्याच तोऱ्यात बबन बोलला.
त्यावर कैलास पुढे काही बोलण्याअगोदर गण्या म्हटला," ए तुला भूक बिक काय लागत नह्याय काय? चल जेवाया.टाईम झाला. चल आज तुला आमच्याकडून पार्टी."
सगळ्यांनी आनंदाने कैलास च्या पाठीवर थाप मारून त्याला जेवयला नेलं. स्टेशन बाहेरच्या बऱ्यापैकी असणाऱ्या हॉटेल मध्ये ते आले होते,कैलास पहिल्यांदा अस हॉटेल मध्ये आला होता आजपर्यंत हे सगळं बाहेरूनच बघत आला होता,मुळात हॉटेल मधलं खायला खिसा भरलेला लागतो,नेमकं तेच नव्हतं.
सगळयांनी हवं ते ते मागवलं ,कैलासलाही मागवायला सांगितल,पण तो संकोच करत होता,
"तुम्ही जे खाल तेच मला पण" अस तो म्हटल्यावर बाकीच्यांनी त्याच्यासाठी मागवलं,पोटात भूक असल्यामुळे आणि कधी अस पंचपक्वान्न न मिळाल्यामुळे कैलास अगदी अधाश्यासारखं खात होता.सगळे त्याला बघून हसले, आणि आपल्यातलाच एक म्हणून त्यांनी त्याला ग्रुप मध्ये सामावून घेतलं.
जेवण झाल्यावर ते त्याला एका पडक्या घरात घेवून गेले. स्टेशन ला लागूनच पण जरा दूर होत. घर खूप जून असावं,पूर्वीच्या काळातलं.पण सध्या अवस्था बिकट होती.बाहेरून तर त्या घरात कुणी राहत अस वाटत पण नव्हतं.मग हे का इथे राहतात,कोणत काम करत असतील असे अनेक प्रश्न कैलास ला पडले पण तो गप्प होता. आत मध्ये गेल्यावर सगळे निवांत बसले. आणि त्यानी बोलायला सुरवात केली,खरं तर ते उद्याच्या कामाची आखणी करत होते.
बबन-"तर गडेहो ५-७ दिवसाच्या सुट्टीनंतर आपल्याला पुन्हा आपल्या कामावर जायचं आहे,तर उद्याची आखणी अस आहे कि सम्या ट्रेन मध्ये असंन , तो पक्याले मॅसेज करन आणि पक्या आणि पिंट्या दोघ पुढच्या स्टेशन वर गण्या अन भुषण गर्दीत आणि शेवटी शाम्या आणि परदीप"
"यस बॉस " सगळे एक सुरात ओरडले. पण नेमकं काम कोणत ते अजूनही कैलास ला कळालं नव्हतं, त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी बबन ला विचारलं,
"मी कोणत काम करू?आणि हे सगळ म्हणजे कोणत काम करता तुम्ही"
बबन नुसताच हसला "तू फक्त उद्या बघायचं, ट्रेन मध्ये, त्यांनतर गर्दीत बाकी तुला आपोआप कळेल, आता झोप."
सगळे पटापट झोपले,कैलास विचार करत होता, जेवण चांगलं झाल्यामुळे थोड्यावेळात त्यालाही झोप लागली.
सकाळी सगळ्यांच्या आवाजाने त्याला जाग आली.सगळे आवरत होते. त्याला उठलेला बघून बबन त्याला म्हटलं
"उठ उठ आवर पटकन ,आपण तुझ्यासाठी कपडे घेऊ नवीन."
कैलास ला नवल वाटलं. वर्षातून एखादा ड्रेस आजी घेत होती आणि कधीकधी मावशी पाठवायची. बाकी तर कधी कुणी नवीन कपडे नव्हते घेतले.
"अरे तू का खर्च करणार?"
"आर मग काय एकच ड्रेस घालणार का रोज? सध्या हाय का पैसा तुहयकडं?"
"नाही" चेहरा पाडून कैलास बोलला.तो आवरून तयार झाला आणि ते कपडे आणायला गेले,बबन नि त्याला महागातले कपडे घेऊन दिले. त्यानंतर सगळ्यांनी जेवण केली आणि स्टेशन वर येऊन बसले.त्यांना 2 वाजताच्या ट्रेन ची वाट होती. ट्रेन आली, सम्या आणि कैलास दोघे ट्रेन मध्ये चढले. कैलास थोडा दूर बसला,दोघे एकमेकांना ओळखत नसल्यासारळे वागत होते .तस कैलास ला सांगण्यात आलं होत,आज त्याला सगळं काम बघायचं होत. ट्रेन सुरु झाली.नेहमीप्रमाणे भरपूर गर्दी होती. लहान मुलं, बाया-माणसं सगळ्यांची वर्दळ होती. काहीतरी बघून सम्या एका ठिकाणी बसला. थोडावेळानी त्याने आजूबाजूच्या लोकांसोबत बोलायला सुरवात केली. कुठे उतरणार आहे,कोण कोण सोबत आहे वैगरे.त्यानंतर त्यांनी मोबाईल मध्ये कुणाला तरी मॅसेज केला. आता मात्र सम्या एकदम व्यवस्थित बोलत होता. भाषा शुद्ध,राहणीमान निटनिटक. कैलास ला नवल वाटलं.
पुढे काय होत ते तो बघू लागला.
स्टेशन आलं,ट्रेन थांबली. ट्रेन च्या दरवाज्यात कोण गर्दी जमली.चढणारे उतरणारे यांचा एकच गोंधळ झाला होता. जनरल डबा असल्यामुळे हे खरं तर रोजचं होत. आणि याचाच फायदा गर्दी मध्ये असणाऱ्या गण्यानी घेतला.ज्या बाईशी सम्या एवढ्या वेळचा बोलत होता तिच्या गळ्यातली सोन्याची साखळी जोऱ्यात ओढण्यात आली, त्याला काप मारण्यात आला होता, तो काप थोडा तिच्या गळ्यालाही बसला होता, अचानक गळ्याला काय झालं म्हणून तिने गळ्याला हात लावला तर चैन चोरी गेल्याच लक्षात आलं आणि तिने आरडाओरड करायला सुरवात केली.पण तोपर्यंत अंधार पडला होता , गण्या आणि भूषण चैन घेऊन पळून गेले होते.कैलासला हे सगळं बघून धक्काच बसला.तो तसाच उभा होता. सम्या नि त्याला तिथून नेलं. पुढे ती चैन शाम आणि नंतर प्रदीप आणि शेवटी बबन अशी पळवण्यात आली. टप्प्या टप्प्यात चोरी करण्याची हि त्यांची शैली होती त्यामुळे त्यांना कुणी पकडू शकत नव्हत. अश्याप्रकारे कुठली अडचण न येता चैन बबनसोबत घरापर्यंत पोहचली.थोडावेळानी सगळे घरी जमा झाले.
"चला चांगली वजनी चैन आहे. 20-25ग्राम ची तर आहेच, मस्त पैसे होतील.मोहीम फत्ते झाली..." बबन चैन बघत खुशीत म्हटला.
"आर भाई या कैलास ला सांग, कव्हापासून डोकं खातोय माझं, हे चूक हाय चूक हाय करून" सम्या पुन्हा मूळ भाषेत येऊन बोलला.
"काय चूक हाय र??
" दादा अस चोरी करण चुकीचं नाही का?कुणाला त्रास देऊन...."कैलास
"काय चूक न्याय.मग आपल्या सारख्या पोरांनी करायचं काय? काम कोण देत न्याय का तर बालकामगार नको,आणि मिळालं तर कुत्रासारखं राबवतात,मोबदला बी देत नही नीट. भीक मागावी तर लाथाडून लावतात.आर म्या समद काम बघितलं, तुयापेक्षा अनुभव आहे मले दुनियेचा. बुटपालिस करायचं काम पण केलं पण पायांनी लोटतात. मग कोणाले आपली फिकीर न्हई तर दुसऱ्यांची कायजी करायचा ठेका आपण घेतला काय?आणि एवढा कायद्यानं रायणार तू.. तुले काय देल्ल बे कोण? तू बी आमच्याच सोबत हायस न आता? आणि शिक्षणाचं बोलशील तर कैक पडले हायत लै लै शिकून.ज्यायले शिफारशि शिवाय कुणी पुसत बी न्हई"
यावर काय बोलावं कैलास ला कळालं नाही.कुठेतरी त्याला बबन च बोलणं पटत होत.आणि तो ते अनुभवत पण होता. शेवटी परिस्थिती पुढे तो पण हतबल झाला,एकीकडे उपासमार होती तर दुसरीकडे हॉटेल च जेवण, बबन नि घेऊन दिलेले चकचकीत कपडे, कसलं टेन्शन नाही.आणि दुसरं म्हणजे उपाय पण नाही.शेवटी चुकीचा असला तरी त्याने पोटाची भूक शमवण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला.
तेव्हा बबन नि त्याला मिठी मारली आणि म्हटलं
" हे बघ भावा, इथून परतीचा मार्ग न्हय,आम्ही विश्वासानं तुले सगळं सांगितलं.आता बेमानी न्हय.या कामाचे काई वुसुल हाय अन ते समदयिले पाळावे लागतात.
१.आपल्या हिश्याच काम न चुकता करायचं.कोणतीच चूक न्हय.
२.आपलं कुणी ओळखीचं नातेवाईक असलं यात कुणी च न्हय, आहे ते फक्त शिकार.आणि शेवटचा न सर्वात महत्वाचं
३.बेमानी न्याय, आणि कुणी बेमानी केली तर तिथेच त्याला भोसकून काढल्या जाईल.जीव गमवायला लागल."
सर्व अटी मान्य करून कैलास नि मन डोलावली.
झालं... एक नवीन प्रवास सुरु झाला.नवा गडी नवा राज्य म्हणत प्रवाश्यांची माहिती काढण्याच काम कैलास कडे आलं.दिसायला चांगल्या घरचा, भाषा मुळातच मृदू आणि गोड शिवाय हुशार त्यामुळे त्याच्यावर कुणी संशय घेत नव्हतं. थोडेच दिवसात कैलास या कामात निपुण झाला.
जनरल डब्यातील किंवा स्लीपर कोच मधील दुपारी जाणारी ट्रेन पकडायची. श्रीमंत सोन्याची सावज पकडायची.कुठल्या स्टेशन ला उतरणार वैगरे माहिती काढायची आणि मेसेज करून आपल्या साथीदारांपर्यंत पोह्चवाची.नेहमीप्रमाणे गर्दी होणार.त्यात चैन ओढली जाणार पुढे टप्या टप्यानी ती घरी पोहचणार.ठरलेला सोनार जिथे ती विकल्या जायची.कामामध्ये आठ्वड्याभरच अंतर असायचं, स्टेशन बदलून बदलून काम व्हायचे.वेळप्रसंगी लाच पण दिल्या जायची.त्यामुळे बाहेरच्या लोकांपासून त्यांना धोका नव्हता..
पाहता पाहता वर्ष लोटून गेली होती.कैलास आता २२-२३ वर्षाचा एकदम रुबाबदार तरुण झाला होता. व्यवस्थित कपडे,डोळ्याला चष्मा अस त्याच राजबिंड रूप आता आणखीच खुलल होत.या कामात आता ते इतके गुंतले होते कि इतर कष्टाची कामे नको वाटत होती,हे जीवन जास्त सुखी वाटत होत.आठवड्यातून 1 दिवस काम बाकी आराम अस कुठल्याच कामात नव्हतं त्यामुळे इतर कामाचा विचारही त्यांना येत नव्हता.
असंच एक दिवस त्यांचा प्लॅन ठरला. नांदेड वरून येणाऱ्या ट्रेन वर प्लॅन फत्ते करायचं ठरलं. ट्रेन आली, कैलास ट्रेन मध्ये चढला आणि सावज शोधू लागला,अचानक त्याला एक मध्यमवयीन बाई दिसली.चेहरा ओळखीचा वाटत होता. आपसूकच तो तिथे गेला आणि बसला. त्यांनी जवळून बघितलं ती बाई स्मिताबाईंसारखीच दिसत होती. पण वयानुसार थोडं शरीर सुटलं होत.केसांना रंग लावला होता. हातात आणि गळ्यात सोन्याची चैन.गळ्यातल्या चैन वर लक्ष जाताच कैलास भानावर आला. त्याला त्याच काम आठवलं. त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला.काय करावं? हि बाई खरचं स्मिताबाई असेल का? त्यानी चौकशी करायला सुरवात केली.आवाज अजूनही अगदी तसाच मृदू होता. बोलण्या बोलण्यात कैलास नि त्यांची सगळी माहिती काढली आणि मेसेज करून साथीदारांना पोहचवली.पण आज कैलास घाबरत होता,त्याला जुनं सगळं आठवत होत,ह्या खरंच बाई असतील तर? अचानक कैलास ची नजर त्यांच्या हातातल्या पुस्तकावर गेली आणि त्यावरचं नाव वाचून तो गारच पडला"स्मिता देशमुख"
त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं.आपली ओळख सांगावी तर सध्या काय करतो याची त्याला लाज वाटली.आणि पुढे होणाऱ्या धोक्याची कल्पना बाईना दिली तर प्राण गमवावा लागेल कारण त्याच डब्यामध्ये एक साथीदार मागेच होता. भीतीने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.विचार करत असतानाच ट्रेन चा भोंगा वाजला,ट्रेन थांबली, कैलास ची धडधड वाढायला लागली,हात पाय गार पडायला लागले. शब्द बाहेर फुटत नव्हते, तो तसाच बसून होता,सगळे प्रवाशी दरवाज्यात गर्दी करून होते,त्यात बाईपण होत्या.ठरल्याप्रमाणे गर्दी झाली आणि अचानक एक काप बाईंच्या गळ्यावर बसला.चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. बाईंचा ती अवस्था बघून कैलास ला असंख्य इंगळ्या चावल्यासारखं वाटत होत.
"ज्या माउलीन आपल्याला आईच प्रेम दिल,शिकवलं तिच्याशीच अशी बेईमानी?देव तरी माफ करेल का? प्राण गेला तरी बेहत्तर पण बाईना त्यांची साखळी परत द्यायची.कदाचित आतापर्यंत च्या गुन्ह्याची हीच शिक्षा असेल." असा विचार करून कैलास सरळ धावत निघाला,इतर प्रवाशी तिथेच चोर शोधत होते,कुणी पोलिसांना बोलावत होते,पण कैलास ला नेमकं माहित होत चैन कुठे आहे. तो सरळ भूषण च्या जागेवर पोहचला,भूषण चैन घेऊन धावतच होता, वाऱ्याच्या गतीनं धावत कैलास त्याच्याकडे पोहचला आणि त्याने चैन हिसकावली. भूषण ला काय झालं कळलच नाही. कैलास चैन घेऊन स्टेशन कडे परत धावत होता.कामाचा नियम क्रमांक 2 आणि 3 चुकला होता,आणि आता प्राण गमवावेच लागणार होते कारण कुणा एकाची बेईमानी म्हणजे सगळ्यांना शिक्षा.भूषण नि कैलास ला पकडलं आणि चाकू काढून त्याच्या वर सपासप वर केले, कैलास नि त्याला पूर्ण शक्तीनिशी प्रतिकार केला आणि त्याला ढकलून तो स्टेशन वर पोहचला.तिथे बाई रडत एक बाकावर कपाळाला हात लावून बसल्या होत्या. कैलास जीव एकवटून धापा टाकत त्यांच्याजवळ आला,सर्वांगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, कपडे फाटून लालभडक झाले होते.प्राण कोणत्याही क्षणी जाणार होता. चैन घेऊन कैलास बाईंच्या पायापाशी पडला. हात वर करून त्याने ती चैन बाईंजवळ दिली.बाई कृतज्ञ होऊन त्याच्या कडे बघत होत्या,कोण हा मुलगा? काय अवस्था झाली याची, बाईंनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कैलास च डोकं मांडीवर घेतलं, त्या मदतीसाठी ओरडू लागल्या, आता त्यांनी अगदी निरखून कैलास चा चेहरा बघितला, त्यांची नजर कैलास च्या हातावरच्या घड्याळावर गेली आणि त्याचबरोबर त्यांना दिसलं ते गोंदण "लक्ष" तस त्यांनी एकच हंबरडा फोडला,"कैलासssssss"
ओळख पटली होती..कैलास नि समाधानाने डोळे मिटले.