करुणादेवी - 8 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

करुणादेवी - 8

करुणादेवी

पांडुरंग सदाशिव साने

८. सचिंत शिरीष

शिरीषची सर्वत्र स्तुती होत होती. दुष्काळात त्याने फारच मेहनत घेतली. राजा यशोधराने खास दरबार भरवून शिरीषचा सन्मान केला. अधिकारी असावेत तर असे असावेत, राजा म्हणाला. आदित्यनारायण आता वृद्ध झाले होते. त्यांनी आता मंत्रीपद सोडण्याचे ठरविले. एके दिवशी ते राजाकडे गेले व प्रणाम करुन म्हणाले, ‘महाराज, आता काम होत नाही. नवीन तरुण मंडळीस वाव द्यावा. मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करावे.’‘आदित्यनारायण, तुम्ही पुष्कळ वर्षे सेवा केलीत. तुम्हाला आता विश्रांती हवी. मी तुम्हाला मुक्त करतो; परंतु आम्हाला वेळप्रसंगी पोक्त सल्लामसलत देत जा. तुम्ही अनुभवी थोर माणसे.’‘मी केव्हाही सेवेस सिद्धच आहे.’‘परंतु तुमची जागा कोणाला द्यावी ? शिरीषांना दिली तर बरे होईल का ?’‘महाराज, शिरीष माझे जावई. तेव्हा मी काय सांगू ? परंतु मी खरेच सांगतो, त्याच्यासारखा कर्तव्यदक्ष मंत्री मिळणार नाही. रात्रंदिवस ते प्रजेची चिंता वाहातात. दुष्काळात ते एकदाच खात. एकदा हेमाने घरात काही गोड केले; परंतु ते रागावले. त्यांनी स्पर्श केला नाही. ‘लोक अन्नान्न करुन मरत असता मी का गोड खात बसू ? आधी प्रजा पोटभर जेवू दे. मग मी जेवेन,’ असे ते म्हणाले. असा मंत्री कोठे मिळणार ?’‘खरेच आहे. शिरीष म्हणजे एक रत्न आहे. त्यांनाच मी मुख्य प्रधान करतो.’काही दिवसांनी शिरीषला पंतप्रधानकीची वस्त्रे मिळाली. मोठा सत्कार झाला. राजधानीतही अनेक ठिकाणी सत्कार झाले; परंतु शिरीषला त्याचे काही वाटले नाही. तो नेहमीप्रमाणे गंभीर व उदास असे.‘शिरीष, तुम्ही मुख्य मंत्री झालेत म्हणून सा-या जगाला आनंद होत आहे, परंतु तुम्ही का दुःखी ? तुम्ही माझ्याजवळ मोकळेपणाने वागत नाही. मी का वाईट आहे ? काय माझा अपराध ? सांगा ना !’‘काय सांगू हेमा! आईबापांची आठवण येते.’‘मग त्यांना तुम्ही येथे आणीत का नाही! त्यांना भेटायला का जात नाही? मी इतकी वर्षे सांगत आहे; परंतु तुमचा हट्ट कायम. येता भेटायला ? घेता रजा? आपण दोघे जाऊ.’

‘आईबाप आता भेटणार नाहीत.’‘कशावरुन ?’‘ते ह्या जगात नाहीत.’‘कोणी आणली ही दुष्ट वार्ता?’‘मला स्वप्न पडले. त्यात आईबाप दूर गेलेले मी पाहिले आणि अधिका-यांकडूनही खुलासा मागवून घेतला. माझे आईबाप मेले. अरेरे!’‘आपण त्यांच्या समाध्या बांधू.’‘त्यांना जिवंतपणी भेटलो नाही. आता मेल्यावर समाध्या काय कामाच्या ? आता अश्रूंची समाधी बांधीत जाईन.’‘शिरीष, तुम्ही आनंदी राहा. ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत त्यासाठी रडून काय उपयोग?’‘परंतु ज्या हातच्या असतात, त्या तरी माणसाने नकोत का करायला?’‘ते तुम्ही करीतच आहात. सा-या राज्याची चिंता वाहात आहात. फक्त माझी चिंता तुम्हाला नाही. सा-या जगाला तुम्ही सुखविता आणि हेमाला मात्र रडवता. शिरीष, अरे का? माझ्याजवळच तू उदासिन का होतोस?’‘वेड़ी आहेस तू. हसून दाखवू?’‘शिरीष, जीवन म्हणजे का नाटक?’‘थोडेसे नाटकच. आपापले शोक, पश्चात्ताप, दुःखे, सारे गिळून जगात वावरावे लागते. आपले खरे स्वरुप जगाला संपूर्णपणे दाखवता येत नसते. ते दाखवणे बरेही नव्हे. आपल्यालाही स्वतःचे संपूर्ण स्वरुप पाहायचा धीर होत नसतो. हे जग म्हणजे परमेश्वराचे मोठे नाटक. ह्या मोठ्या नाटकात आपण आपापली लहान लहान नाटके करीत असतो.’

‘शिरीष, तू आहेस मुख्य प्रधान. मला नाही समजत असली गूढे.’‘तू मुख्य प्रधानाची मुलगी आहेस. तू मागे एकदा मला अनुत्तीर्ण केले होते, तू माझ्यासाठीच देवीला नवस का केलास ते तुला सांगता आले नव्हते.’‘शिरीष, तुला मी एक विचारु?’‘विचार.’‘तू रागावशील.’‘हेमा, मी तुझ्यावर एकदाच रागावलो होतो. दुष्काळात खीर केलीस म्हणून. एरवी कधी रागावलो होतो का? खरे सांग. तू मात्र अनेकदा रागावली आहेस.’‘शिरीष, बायकांचा राग खरा का असतो? पुरुषांच्या रागाची जशी भीती वाटते, तशी बायकांच्या रागाची वाटते का? बरे, ते जाऊ दे. तुला एक विचारते हां.’‘विचार.’‘मला अद्याप मुलबाळ नाही. म्हणून का तू दुःखी आहेस? खरे सांग. होय ना? पण मी काय करु? शिरीष, तू दुसरे लग्न करतोस? मला वाईट नाही वाटणार. मी पाहू तुझ्यासाठी सुंदरशी मुलगी? हे काय? रागावलास?’‘काही तरी विचारतेस.’‘काही तरी नाही. पुत्र नसेल तर सदगती नाही. पितरांचा उद्घार होत नाही, कुळपरंपरा कोण चालवणार? तुमचे सेवाव्रत कोण चालवील? तुमचे गुण का तुमच्याबरोबर मरु देणार?’‘हेमा, मुले आपल्यासारखीच होतात असे थोडेच आहे? कैकयीच्या पोटी भरत येतो, हिरण्यकश्यपूला प्रल्हाद होतो. नेमानेमाच्या गोष्टी. आपले चारित्र्य आपल्या पाठीमागून राहील. आपले गुण राहातील. आपल्या कृती राहातील; दुस-यांच्या जीवनात त्यांचा उपयोग होईल. आपण पुत्ररुपाने जगतो त्यापेक्षाही अधिक आपण आपल्या सत्कृत्यांनी मरणोत्तर जगत असतो. तू उगीच मनात आणू नकोस वेडे वेडे आणि तुला एक सांगू का, मी माझ्या बाबांना उतारवायतच झालो; कदाचित देव अजूनही तुझ्या मांडीवर मूल देईल. कष्टी नको होऊ.’

‘शिरीष, तुला एक गोष्ट सांगू? ऐक. मधून मधून स्वप्नात मला बाळ दिसते. मी धावत त्याला उचलायला जाते इतक्यात एक सुंदर स्त्री तेथे येते व ती त्या बाळाला हात लावू देत नाही. ती स्वतःही ते उचलत नाही व मलाही उचलू देत नही. ते बाळ मग अदृश्य होते. कितीदा तरी असे स्वप्न पडते. काय रे ह्याचा अर्थ? मी एका भविष्यवेत्त्यास विचारले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला मूल होईल. शिरीष, आम्ही बायका हो. आम्हास आई होण्याहून अधिक आनंदाचे काय?’‘म्हणून तू माझे दुसरे लग्न लावीत होतीस वाटते? सवत आल्यावर मूल होईल ह्या आशेने माझे दुसरे लग्न. होय ना हेमा? इतकी तू शिकलेली, तरी या भविष्यवेत्त्या कुडबुड्यांच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवतेस?’‘शिरीष, कधी कधी गोष्टी होतातही ख-या. ह्या दृश्य जगाहून खरे जग अनंत आहे. अनंत शक्ती, अनंत जीव ह्या विश्वब्रह्मांडात स्थुल नि सूक्ष्म रुपाने हिंडत आहेत. सर्वांचा एकमेकांवर परिणाम होत आहे.’‘आता मात्र पांडित्य दाखवू लागलीस खरी. मला व्यवहारी माणसाला हे तुझे गहन गूढ काही समजत नाही.’‘शिरीष, जाऊ देत ही बोलणी. तू आनंदी राहा, हस, म्हणजे मी सुखी होईन, दुसरे काय सांगू?’असे दिवस जात होते. हेमा आपल्याकडून शिरीषला आनंद व्हावा म्हणून सारखी झटे. तिने एक सुंदर पक्षी पाळला. सोनेरी पिंज-यात तो असे. त्याला ताजी रसाळ फळे ती घाली. त्या पाखराला तिने बोलायला शिकविले. काय शिकविले?‘हसा हसा. रडू नका, रुसू नका, हसा; हसा. शिरीष, हस. हेमा, हस. सारी हसा. आनंदी राहा. देवाच्या राज्यात सुखी राहा.’शिरीष आला म्हणजे हेमा त्या पाखराला म्हणे, ‘पाखरा, पाखरा, बोल, बोल.’ की तो पाखरु बोलू लागे आणि शिरीषला खरेच हसू येई, हेमाही हसे.‘हेमा, तू सांगून कंटाळलीस म्हणून वाटते पाखराकडून मला सांगवतेस?’‘परंतु पाखराचे तू ऐकतोस. हसतोस. मी किती सांगितले तरी तू हसत नाहीस.’‘हेमा, पाखरु मला हसवते परंतु ते रडत असेल.’

‘का?’‘ते कैदी आहे. पिंज-यात आहे. ज्याने अनंत आकाशात उडावे त्याला ह्या एवढ्याशा पिंज-यात पंख फडफडावे लागतात. त्याच्या पंखांची शक्ती मेली असेल. आता सोडलेस तरी त्याला उडवणार नाही. फार तर खुंटीवर बसेल आणि पुन्हा पिंज-यात येईल. अरेरे!’‘परंतु येथे त्याला संरक्षण आहे. रानात हजारो शत्रू.’‘हेमा, परंतु बाहेर स्वातंत्र्य आहे. दुस-याच्या संरक्षणाखाली सुरक्षीत असे गुलाम म्हणून जगण्यापेक्षा ज्यात धोका आहे असे स्वातंत्र्य सहस्त्रपटींनी बरे. पाखरा, माझ्यासाठी तू बंधनात पडलास.’‘सोडू का ह्याला?’‘नको सोडू. इतर पक्षी त्याला मारतील. गुलामगिरीत जो जगला, गुलामगिरीत जो पेरू डाळिंबे खात बसला, तो त्या स्वतंत्र पक्ष्यांना आवडत नाही. त्याची अवलाद वाढू नये, त्याने गुलामगिरीचे जंतू आणू नयेत म्हणून ते त्याला ठार करतात. आता राहू दे पिंज-यात. एकदा गुलाम तो कायमचा गुलाम. पाखरा, डोके आपटून प्राण का नाही दिलास? अनशन व्रत का नाही घेतलेस? गुलाम म्हणून बंधनात जगण्यापेक्षा उपवास करुन मेला का नाहीस? तसा मरतास, तर हुतात्मा झाला असतास. लाखो स्वातंत्रप्रेमी विहंगांनी तुझी स्तुतिस्त्रोत्रे म्हटली असती. वृक्षवेलींनी तुझ्या मृत शरीरावर फुले उधळली असती; परंतु भुललास, गुलामगिरीच्या गोंडस वंचनेला भाळलास. आता पिंज-यातच बस. तेथेच नाच व खा.’‘शिरीष, तुझ्या सुखासाठी जे जे म्हणून मी करावे ते ते तुला त्रासदायकच वाटते.’‘हेमा, सुख हे स्वतःच्या जीवनातून शेवटी झ-याप्रमाणे बाहेर पडले पाहिजे. बाहेरची लिंपालिंपी काय कामाची? तू कष्टी नको होऊ. लवकरच आपण सुखी होऊ. अभ्रे नेहमी टिकत नाहीत. जातातच.’ऐके दिवशी शिरीष झोपला होता; परंतु झोपेत काही तरी बोलत होता. हेमा जागी झाली. ते बोलणे ती ऐकत होती. काय बोलत होता शिरीष?

‘करुणे, रडू नकोस. ये, इकडे ये, करुणे!’ पुन्हा शांत. ‘करुणा, केविलवाणी करुणा? अरेरे!’पुन्हा शांत. शिरीष एका कुशीवरुन दुस-या कुशीवर वळला. घोरु लागला. हेमा विचार करीत होती. करुणा? कोण ही करुणा ? ईश्वराची का करुणा ? कोणाची करुणा ? करुणा का कोणाचे नाव आहे ? कोणा स्त्रीचे ? हेमा अस्वस्थ झाली.दुस-या दिवशी फिरायला गेली असता दोघे त्या पूर्वीच्या वृक्षाखाली बसली.‘हेमा, येथे तू लपली होतीस.’‘आणि करुणा कोठे लपली आहे ?’‘देवाजवळ.’‘शिरीष, करुणा कोण ? तू काल झोपेत ‘करुणे, करुणे, ये, रडू नकोस,’ असे म्हणत होतास. ही कोण करुणा ? कोणाची ? काय पडले स्वप्न ? काय आहे हे सारे ?’‘हेमा, असंबद्ध स्वप्नात का काही अर्थ असतो ? पडलेल्या पा-याचे कण जुळवणे कठीण, त्याप्रमाणे भंगलेल्या स्वप्नातून अर्थ काढणे कठीण.’‘परंतु काही तरी अर्थ असतो. स्वप्न म्हणजे आपल्याच गतजीवनातील प्रसंगांचे चित्रण. आपल्याच दाबून ठेवलेल्या वृत्तीचे प्रगटीकरण. ज्या व्यक्तींना आपण बाहेर प्रगटपणे भेटू शकत नाही त्यांना स्वप्नात भेटतो. स्वप्न म्हणजे परिस्थितीवर विजय.’‘हेमा, लहानपणीचे स्वप्न मी पाहात होतो. आमच्या गावात एक मुलगी होती. तिचे नाव करुणा. तिचे आईबाप लहानपणीच वारले. ती दुःखीकष्टी असे. एकदा ती रडत होती. तिचे अश्रू मी पुसले होते. तिला खाऊ दिला होता. पुन्हा एकदा ती अशीच रडत जात होती; मी तिला हाका मारल्या. ती आली नाही. मोठी अभिमानी होती ती, जरी परकी होती. किती वर्षांची आठवण! आपल्या जीवनाच्या तळाशी अनेक गोष्टी जाऊन बसलेल्या असतात. कधी वादळ आले तर हा सर्व जीवनसागर बहुळला जातो. तळाशी बसलेले प्रकार वर येतात. वरचे प्रकार खाली जातात. मानवी जीवन म्हणजे चमत्कार आहे. हे मन म्हणजे महान विश्व आहे.’

‘करुणेचे पुढे काय झाले ?’‘कोणाला माहीत !’‘तिचे लग्न झाले ?’‘म्हणतात, झाले म्हणून.’‘शिरीष, तुला तिची काही माहिती नाही ?’‘आज तरी नाही. इतकी वर्षे मी राजधानीत आहे. आता लहानपणाच्या गोष्टींची कोण करतो आठवण ? हेमा, ते पाहा सुंदर ढग.’‘खरेच किती छान. एखादे वेळेस आकाशातील देखावे किती मनोहर दिसतात !’‘आपल्याही जीवनात एखादे वेळेस केवढी उदात्तता प्रगट होते, नाही ?’‘शिरीष, परंतु हे मनोरम देखावे काळ्या ढगांतून निर्माण झाले आहेत. भिंती खरवडल्या तर खाली क्षुद्र मातीच दिसते. वरुन झिलई, वरुन रंग, असे नाही ?’‘असा नाही ह्याचा अर्थ, ह्याचा अर्थ असा की, जे क्षुद्र आहे तेही सुंदर होईल. जे घाणेरडे आहे तेही मंगल होईल. सौंदर्याचे व मांगल्याचे कोंब अणुरेणूत आहेत. प्रत्येक परमाणू परमसौंदर्याने नटलेला आहे. त्या परमेश्वराची कला कणाकणांत खच्चून भरलेली आहे. केव्हा ना केव्हा ती प्रगट होतेच होते.’‘केव्हा होते प्रगट ?’‘प्रभूची करुणा होते तेव्हा !’‘शिरीष, प्रभूची करुणा तुझ्याकडे का नाही येत? तुला का नाही आनंदवीत ? तुझ्या रोमारोमांतून प्रसन्नता का नाही फुलवीत ? तुझ्या जीवनातील प्रभूची कला कधी फुलेल ? तू आनंदी कधी होशील ?’‘लवकरच होईन. लवकरच प्रभूच्या करुणेचा अमृतस्पर्श होईल व माझे जीवन शतरंगांनी खुलेल.’‘शिरीष, चल जाऊ. आकाशातील कला मावलू लागली. धर माझा हात. चल !’ हेमा म्हणाली.दोघे मुकी मुकी घरी गेली.