Kavale - 1 books and stories free download online pdf in Marathi

कावळे - 1

कावळे

पांडुरंग सदाशिव साने

१. बाळपणचा मित्र

मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ आवाज, त्याच्या पंखांचे फडफडणे, त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी वेळा पाहावयाचा. लहाणपणी, विशेषत: मला, जेवताना आई अंगणात घेऊन यायची. तिच्या हातात घास असायचा व भरवताना ती मला म्हणायची, “हा घे हां, हा काऊचा, हा चिऊचा, तो बघ काऊ. येरे येरे काऊ, माझा बाळ घास खाऊ.आणि मग घास घ्यायचा. मी राजा. आईच्या कडेवर बसून असा एक एक घास मी खेळत खेळत, चिमण्या-कावळे बघत बघत घ्यायचा. मध्येच कावळा उडून जाई. गेला काऊ. घे रे एवढा घास, घे हो.असे आई म्हणायची. आजूबाजूस कावळा दिसल्याशिवाय मी जेवायचा नाही. मी जरा मोठा झाल्यावर त्याला भाकरी फेकायचा व तो धिटुकला ती घ्यायचा. एक दिवस तर मी अंगणात भाकर घेऊन बसलो होतो, तो आपला आला आणि माझ्या हातातून घेऊन गेला भाकर! मी टाळ्या वाजवल्या. मला गंमतच वाटली. आई, काऊ आला व त्याने माझी भाकर नेलीन्. त्याला त्याची आई नाही का ग देत? त्याला माझी आवडते, माझ्या आईच्या हातची आवडते, होय?” असे मी आईला विचारायचा व पुन्हा अंगणात जाऊन काव काव काव, माझा तुकडा लावअसे म्हणायचा. परंतु तो उंच झाडावर बसे. मला वाटे, कावळा माझ्याजवळ येतो; मला का बरे नाही त्याच्याजवळ जाता येत. मी आईला विचारायचा, “आई, माझे ग कोठे आहेत पंख? माझे पंख कोणी तोडले? कावळ्याला उडता येते, आपल्याला का नाही ग येत?” आई हसे व म्हणे. देवाला राग आला व त्याने आपणा माणसांचे सारे पंख कापून टाकले. नाहीतर पूर्वी माणसांना येत असे उडता. रावण नव्हता का आकाशातून उडत आला?”

तो तर रथात बसून आला होता. त्याचा रथ जटायूने मोडला.मी म्हणे.

जा रे खेळायला बाहेरम्हणून आई मला बाहेर घालवी.

काही असो, परंतु लहाणपणापासून कावळ्याबद्दल मला प्रेम वाटे, स्नेह वाटे, आपलेपणा वाटे. मी मोठा होऊ लागलो. मला वाईट वाटे कावळ्याला सारे लोक नावे ठेवतात; त्याला अमंगळ म्हणतात, लबाड, दुष्ट म्हणतात, त्याला अधाशी म्हणतात, खादाड म्हणतात. सर्वभक्षकस्तु वायस:हा चरण रचून कोणी तरी कावळ्याची कायमची नालस्ती करुन ठेवली आहे. ज्या कोणी हा चरण लिहिला त्याला मी मनात शेकडो शिव्या दिल्या.

मला वाटे, हे कावळ्यांना कसे सहन होते? त्यांना हे माहीत आहे का? आम्ही मानवप्राणी कावळ्यांना किती हीन मानतो हे त्यांना ठाऊक आहे का? जर ठाऊक असेल तर ठाऊक असूनही ते मानवांशी इतक्या चांगुलपणाने का राहतात? कधी मनुष्याजवळ भांडत नाहीत, त्याला सोडून जात नाहीत. आपण विचारावे कावळ्यांना, असे मी मनात ठरवले.

मला आपली चिमण्या, कावळे, गायी, मांजरे, कुत्री, मुंग्या, मैना, पोपट यांची भाषा समजे. त्यांची भाषा समजण्यास सोपी आहे. संदर्भाप्रमाणे त्यांच्या ध्वनींना वेगवेगळे अर्थ असतात. मी थोडेसे संस्कृत इंग्रजी शिकलो, परंतु मग कंटाळलो. किती तरी शब्द त्या भाषांत आणि शब्दाशब्दासाठी किती त्यांच्यात भांडणे! शब्दांचे अर्थही त्यांचे निश्चित नाहीत. एकाच पुस्तकाचे अनेक अर्थ ते करतात. ज्या पुस्तकांचा अर्थ निश्चित नाही, ज्या शब्दांचा अर्थ नक्की नाही असे शब्द कोणी लिहावे तरी का? त्या शब्दांचा उपयोग करुन कशाला रचावी पुस्तके? त्या शब्दांचे अर्थ ठरवण्यासाठी कोश काढतात! मला कंटाळा आला त्या मानवी शब्दांचा, त्या लठ्ठ लठ्ठ कोशांचा! ते लठ्ठ कोश उशाला घ्यायला बरे, असे वाटे. मी इतर भाषांचा अभ्यास करण्याचे सोडून दिले. सर्व मानवांना व्यापून राहाणारी, अश्रू व हास्य यांची भाषा मी नीट शिकून ठेवली, पण त्यांतही भानगडी! कधी कोणाचे म्हणे नक्राश्रू असतात, तर कधी दु:खाश्रू ! कधी अपमानामुळे आलेले अश्रू, कधी आनंदाश्रू ! कोणी आनंदाने हसे, तर कोणी थट्टा करण्यासाठी हसे, कोणी मिस्किलपणे हसे. साधे हसणे व रडणे, पण त्याचाही मानवी अर्थ निश्चित नाही.

मला आपली पाखरे आवडत, तृणे-फुले आवडत, गायी-बैल आवडत. त्यांच्याजवळ मी जायचा, बोलायचा, खेळायचा. त्यामुळे मला त्यांची भाषा समजू लागली. कावळ्यांचीही भाषा मला समजू लागली. त्यांची सुख-दु:खे मला समजत. त्यांच्या, ‘काऽका काऽकाया आवाजातील आरोहावरोह मला ओळखता येत. एक दिवस एका कावळ्याजवळ मी सर्व चौकशी करायचे ठरवले. माणसाबद्दल त्याचे काय मत आहे, ते विचारून घ्यायचे मी ठरवले.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED