Kavale - 2 books and stories free download online pdf in Marathi

कावळे - 2

कावळे

पांडुरंग सदाशिव साने

२. कावळ्यांची कैफियत

मी एका शेतात गेलो. दुपारची वेळ होती. मी माझी भाकर घेऊनच शेतात गेलो. मी झाडाखाली भाकर खात बसलो. आधी चारी दिशांना मी भाकरीचे तुकडे फेकले. फेकले नाही, अर्पण केले! आजूबाजूला किड्या-मुंग्या असतील. अदृश्य योनीही असतील त्यांना नको का थोडेसे द्यायला. एकटे खाणे हे पाप. प्राचीन काळापासून वेद ओरडून सांगत आहे. केवलाघो भवती कैवलादि’ –‘जो केवळ एकटयाने खाईल तो पापरूप होईल.परंतु आज ऐकतो कोण? कावळे, चिमण्या, किडा-मुंगी, मांजर, कुत्रे यांनाही आपण जेवताना घास देणे हे तर दूरच राहिले; परंतु शेजारी भाऊ उपाशी असेल, घरातील गडीमाणसे उपाशी असतील इकडे तरी आपले लक्ष कोठे असते? थोर हिंदी संस्कृतीचे स्वरूप अजून आपल्या गळी उतरतच नाही. आपण सारे उदरंभर. आपलेच पोट भरणारे झालो आहोत.तुकडे अर्पण करून मी जेवू लागलो. मी कावळ्याला हाक मारली. मला सोबतीला येम्हणून बोलविले. काऽ काऽ काहाक मारली. फारसे कावळे आजूबाजूला नव्हते. तरी पण तो पहा, एक आला. भीत भीत आला. मी त्याच्या भाषेत बोलू लागलो. तो आनंदला. तुम्हाला येते आम्हा कावळ्यांची भाषा!तो आश्चर्याने म्हणाला.हो, मला येते तुमची भाषा. आणि मला पशुपक्ष्यांची भाषा आवडते.मी म्हणालो.आम्ही व आमची भाषा तुम्हांला आवडते? आम्ही तर नीच जातीचे, अति दुष्ट, आम्ही वाईट, लोभी, व्रणावर बसणारे! आम्हांला तर तुम्ही त्याज्य ठरवले आहे. तुम्ही मानवजातीचे असून अपवाद कसे? तुम्ही आमचा तिरस्कार नाही करीत?” त्या कावळ्याने विचारले.

नाही, लहानपणी तुमचे काळेभोर रूप पाहून मला आनंद वाटे. आई मला तुमचे रूप दाखवीत दाखवीत भरवी. म्हणून तर मी तुम्हांला जेवायला हाक मारली. लहाणपणाचे तुम्ही माझे मित्र. अगदी बाळपणापासूनचे मित्र. लहाणपणी आई मला अंगणात ठेवी. मी तुमच्याकडे पाहायचा. त्या चिमणुलीबाईकडे पाहायचा. मला तुला पुष्कळ विचारायचे आहे. विचारू? सांगशील गड्या?” मी विचारले.हो, मोठ्या आनंदाने. आम्ही तुमच्याशी बोलायला किती उत्सुक असतो. परंतु तुम्ही सारे आपल्याच मिजाशीत व ऐटीत. तुम्ही भाऊभाऊही एकमेकांजवळ नीट बोलत नाही, मग आमच्याजवळ कशाला बोलाल? आम्हांला वाटे, मानव हा किती विचित्र प्राणी आहे! त्याला स्वत:शिवाय जगात कोणी आवडत नाही, परंतु तुझ्यासारखे अपवाद आहेत म्हणायचे. ठीक, विचार. अगदी नि:संकोचपणे तुझ्या सा-या शंका विचार.कावळा म्हणाला.

त्याचे सुंदर मार्मिक भाषण ऐकून मला आश्चर्य वाटले. आम्ही मग एकमेकांशी अगदी मनमोकळेपणाने गोष्टी केल्या.का रे कावळोबा, तुम्हाला आमचा-मानवांचा राग नाही का येत? आम्ही तुम्हाला नाना नावे ठेवली, तुम्हांला हीन, नीच, पतित मानले, त्याचे तुम्हांला कधी वाईट नाही वाटले? ह्या गोष्टी तुम्हांला माहीत नाहीत का? तुमच्या कानावर आल्या असतील तर तुम्ही इतके शांत कसे? तुमच्यातही कोणी शांतीचा संदेश देणारे संत झाले का? तुम्ही माणसांच्या डोक्यावर चोंची का नाही मारल्यात? अंगणात छोटी मुले ठेवलेली असतात, त्यांचे डोळे का नाही फोडलेत? या मानवाने आज हजारो वर्षे तुमची नालस्ती चालवली आहे. तिचा सूड तुम्ही का नाही घेत? तुमच्या मनात कधीच असा विचार नाही आला का? तुम्ही का मानापमानाच्या पलीकडे गेला आहात? ‘हाथी चलत है अपनी गतमो कुतर भुकत वाको भुकवा देअसे का तुम्ही मनात म्हणून मानवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता? माझ्या मनात अशा नाना शंका येतात. त्या सा-यांचे तू निवारण कर.असे म्हणून मी थांबलो.कावळ्याने चोच एकदा घासून पुसून साफ केली. पंख जरा चोचीने खाजवले. इकडे आपले बुबुळ फिरवून जरा नीट न्याहाळून पाहिले आणि मग तो म्हणाला, “ऐक गड्या तुला, सारी हकीकत सांगतो. थोडक्यात सांगतो: कारण मला लौकर घरी परत गेले पाहिजे. दोन वृद्ध कावळे आजारी आहेत. त्यांच्या सेवेसाठी मला गेले पाहिजे. त्यांच्यासाठीच तू टाकलेला हा तुकडा मी नेईन. म्हणून मी तो खाल्ला नाही. तुला वाटायचे आपण एवढ्या प्रेमाने आपल्या घासातला घास याला दिला आणि हा खात कसा नाही? म्हणून आपले सांगून टाकले.

आता थोडा पूर्ववृत्तान्त तुला सांगतो. पूर्वीपासून आमची जात आपली अल्पसंतोषी; कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही. जे मिळेल ते आनंदाने खावे व सृष्टीत दोन दिवस आनंदाने नांदावे, अशी आमच्या जातीची वृत्ती. मनुष्याने आमच्या जातीविरूद्ध चालवलेली नालस्ती आमच्या कानांवर येत असे. मनुष्यप्राणी सर्वात श्रेष्ठ, तो देवाची प्रतिमा, ती भगवंताने निर्माण केलेली सर्वोत्तम कलाकृती. त्याला बुद्धी, हृदय, मन आहेत. त्याचा आकार सर्वांगसुंदर,- वगैरे मनुष्याची आत्मप्रौढी आम्ही ऐकत होतो व मनात हसत होतो! परंतु मनुष्याला वाटे की, इतरांची निंदा केल्याशिवाय स्वत:चे श्रेष्ठपण सिद्ध होत नाही. म्हणून मानव सर्व मानवेतर पशुपक्ष्यांची निंदा करू लागला. जो कोणी पशू, जो कोणी पक्षी थोडे त्याचे अनुकरण करील, त्याच्या इच्छेप्रमाणे वागेल, त्याची स्तुतीही करी. काही कवी वगैरे वेडे लोक त्यांच्यात झाले. त्यांनी पशुपक्ष्यांची, मानवेतर सृष्टीची रसाळ वर्णने केली. आमचे गुणगान गाइले, परंतु आमची बेअब्रू त्यांनी केली आहे. विशेषत: कावळ्याची फार बेअब्रू तुम्ही केलेली आहे. आम्ही हे सारे सहन करीत होतो, परंतु थोड्या वर्षांपूर्वी काही तरूण बहाद्दर मंडळी आमच्यांत निघाली. ते बंडाची भाषा बोलू लागले. मानवजातीविरुद्ध बंड करु या, असे ते म्हणू लागले. शेवटी सर्व कावळ्यांची एकदा एक प्रचंड सभा घ्यावयाचे आम्ही ठरवले.मग तुमचे हे संमेलन झाले का?” मी अत्यंत उत्सुकतेने विचारले. हो, हो झाले तर, त्याची हकिकत मी तुला पुढे सांगणारच आहे, पण आता मला उशीर होईल.असे म्हणून तो कावळा मला आश्वासन देऊन उडून गेला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED