कावळे - 3 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कावळे - 3

कावळे

पांडुरंग सदाशिव साने

३. कावळ्यांची परिषद

आलास का कावळोबा, केव्हापासून मी तुझी वाटच पाहत होतो. आम्हा माणसांबद्दल तुम्हा पशुपक्ष्यांना काय वाटते, ते मला समजून घ्यायचे आहे. कावळ्यांची प्रचंड सभा भरवायचे ठरले म्हणून मागच्या वेळी तू सांगितले होतेस.मी विषयाला एकदम हात घालण्याच्या हेतूने दुस-या दिवशी जेवताना कावळ्याला बोलावून म्हणालो.त्या कावळ्याने आदल्या दिवसाप्रमाणेच आपली चोच घासून पुसून जरा साफ केली आणि तो म्हणाला, “नर्मदातीरी कबीर वडावर सभा भरवण्याचे आमचे ठरल्याचे मागेच मी तुला सांगितले होते. त्या सभेला दक्षिण हिंदुस्थानातला एक कावळा अध्यक्ष नेमला. वय झाले तरी त्याचा रंग कुळकुळीत काळा होता. वृद्ध असून तेजस्वी, तेजस्वी असून क्षमावान्; मोठा दूरदर्शी, धोरणी असा तो होता. अध्यक्षांच्या स्वागतासाठी आम्ही मिरवणूक काढली. त्याला हजारो कावळे आले. अध्यक्ष येताच हजारो कावळ्यांच्या तोंडून काऽका, काऽका!असे आनंदोद्गार बाहेर पडले. सर्व वड चकचकीत काळ्या रंगाने भरून गेला. स्वागताध्यक्ष भाषणात म्हणाले, “हजारो वर्षांनंतर आपण पुन्हा एकत्र जमलो आहोत. मानव उठल्याबसल्या सभा बोलावतात. सभा म्हणजे त्यांची फॅशनच झाली आहे. आज गंभीर प्रसंग म्हणून आपण जमलो आहोत, आज कावळा जागा झाला आहे. आपल्यातील तरुण वर्गाने नवीन झेंडा उभारला आहे. त्यांच्या हृदयाला अपमान झोंबत आहे. मानवपशूने चालवलेली निंदा आपण हजारो वर्षे सहन केली, याचे त्यांना वाईट वाटत आहे. चित्त जळत आहे. रक्त उसळत आहे. पंख फडफडत आहेत. चोच शिवशिवत आहे. पण आपले पूर्वज रागाने बडबडले नाहीत तर तेही मानधन होते. मानवांनी चालवलेल्या निंदेची त्यांनी उपेक्षा केली. मनात मत्सर ठेवला नाही. मानवाची सेवाच करीत राहिले. आजच्या पिढीला हे शल्य सलत असेल, पण आपण विचारपूर्वक पाऊल टाकावे. अशा वेळी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी थोर अध्यक्ष लाभले हे सुदैव. त्यांची फार स्तुती मी करीत नाही. शब्दावडंबर हा मानव-पशूचा धर्म आहे. प्रदर्शन करणे, दंभ मिरवणे, सोंगे आणणे या त्याच्याच कला. आपण जमलो आहोत त्या वृक्षाचा इतिहास फार उज्वल आहे. हजारो पक्ष्यांची पूर्वी येथे वसाहत होती. सारे प्रेमाने नांदत होते. अशा या पवित्र वडावर शिखरारूढ होण्याची मी अध्यक्षांना विनंती करतो.

स्वागताध्यक्षांच्या भाषणानंतर सभेस रीतसर सुरवात झाली. एक तरुण संघाचे उत्साही कार्यकर्ते प्रथम बोलावयास उठले. सर्वांनी पंख फडफडवले व त्यांचा जयजयकार केला. ते म्हणाले, “आजपर्यंत आपल्या जातीने कमाल सहनशीलता दाखवली. जगात जो जो तुम्ही मवाळ व्हाल, तो तो जग तुम्हांला दडपील. या माणसाने सा-या गरिबांची पायमल्ली चालवली आहे. तो कोकरांचा, कोंबड्यांचा बळी देतो, सिंह-वाघाचा देत नाही. मऊ लागले म्हणजे जग कोपराने खणू लागते. क्षमावृत्ती ही तरुणांना लाजिरवाणी. आपण काळे आहोत म्हणून आपली निंदा. आणि हिंदुस्थानातल्या मानवाने का काळ्या रंगाची निंदा करावी? सर्व रंगांच्या पलीकडे असणारे चैतन्य एक आहे, हे याच देशात ना सांगितले? आणि यांचा देव तरी पाहा, शालिग्राम तर काळा असतो. गंडकीची काळी शिळा. तिच्या सुंदर मूर्ती करतात. काळ्या संगमरवरात तोंडदेखील दिसते. यमुनेचे पाणी काळे आहे. मानव भराभर ग्रंथ लिहितो ती शाई काळीच. मेघाचा रंग काळा. काळी चंद्रकळा यांना आवडते, काळ्या फळ्यावर यांचे शिक्षण. कुणा धर्मोपदेशकांचे झगे काळे. काळी कपिला पवित्र. बुक्का काळा असतो. कस्तुरी काळी असते. काळे डोळे गहन आणि सुंदर असतात. सुंदर केसांचा रंग काळा असतो. शेतक-याची घोंगडी पांघरणारा कृष्ण काळा, रामही काळा. काळा रंग सुंदर आहे, पवित्र आहे, पण हा मानव आमच्या डोळ्यांची थट्टा करतो. एकडोळ्या म्हणतो, एक बुबुळ नाचवून आम्ही दोन बुबुळांचे काम करतो. बुबुळ एक असले, तरी नजर कशी तीक्ष्ण असते. एक बुबुळ नाचवून आपण ईश्वराची काटकसर करतो. माणसांची नाके बसकी, फताडी, फुगीर! त्यापेक्षा आपली चोच किती चांगली! या माणसांना समाजात वेगवेगळया भाषा, त्या आपल्या शब्दापेक्षा किती कर्कश! मानवांची रोजची भांडणे ऐकून आपले कान किटत चालले आहेत, मिरवणुकीत ओरडत आहेत, प्रेतयात्रेत हेल काढताहेत, क्रीडांगणावर आरोळ्या ठोकीत आहेत. नाना प्रकारचे विचित्र आवाज काढणारा हा प्राणी. पण लहानपणी हा जेवताना याची आई आम्हांसच बोलावते. गोष्टी आमच्या, गाणी आमची. पण हा उपकार स्मरत नाही. मोठेपणी हा कृतघ्न मनुष्य आम्हांसच दुष्ट म्हणतो. म्हणे कावळा लबाड, धूर्त! काय फसवले बा यांना आपण? केव्हा यांची कोठारे लुटली? केव्हा खोटीनाटी भांडणे लढलो? खोटे दस्तऐवज केले, दिलेली वचने मोडली, झालेले तह गुंडाळले? स्वत: लबाड म्हणून त्याला आपण लबाड दिसतो. तसे पाहिले तर आपल्यात केवढा बंधुभाव. शेजारी चिमण्या असोत, पोपट-मैना असोत, आम्ही कधी भांडत नाही. मनुष्य दुबळ्यांना चिरडतो, रडवतो, गांजतो. बायकांना छळतो. नोकरांना, मजुरांना गांजतो. आम्हांला का दुबळ्या चिमणीच्या थोबाडीत मारता नसती आली?

पण आपण एकमेकांना छळणार नाही. एकट्याने पोट भरणे आपल्याला आवडत नाही. आपण दुस-यांना हाक मारतो. स्वत:च्या सख्ख्या भावाशी लढणारा, स्वजातीशी भांडणारा, शेकडो भेदभाव पाडणारा हा द्विपाद बडबड्या पशू, रक्ताचा तहानलेला, चराचरांस लुबाडणारा हा लफंग्या, याचे पोट कधी भरत नाही, तृप्ती ज्याला माहीत नाही, आकाशातही जो उडायला येतो व आम्हांला त्रास देतो, पाण्यात माश्यांना त्रास देतो, जमिनीवर इतरांना हुसकून देतो, गोळ्या घालतो. असा जगघाण्या हा माणूस आणि ह्याने आमची बदनामी करावी?

याचे कवी ज्या कोकिळेची स्तुती करतात, तिला आम्ही पोसतो. ही भेदातीत निरपेक्ष दया व प्रेम. पण त्याबद्दल आमचे कौतुक करणे दूर राहिले. शिवाय मानव त्याबद्दल आम्हांला दुष्ट व लबाड म्हणतात. आम्ही किती अल्पसंतुष्ट! सडकेनासके खाऊन जगातील घाण दूर करतो. घरात उंदीर मेला, देतो हा मनुष्य फेकून. काही सडले कुजले की फेकतो हा बाहेर. त्याच्या उष्टेखळीजवळ, मोरीजवळ किती घाण. त्याचे उकिरडे जंतुकिड्यांनी बुजबुजलेले. ही सारी घाण आम्ही दूर करू पाहतो; तर उलट हा आम्हांलाच दोष देतो. याच्या गायी-गुरांच्या जखमा आम्ही स्वच्छ करतो. यांच्या गुरांचे आम्ही डॉक्टर, पण व्रणावर बसणारे,’ म्हणून हा आमचा उपहास करतो. मृतांचे आत्मे आमच्यामध्ये येऊन वास करतात, म्हणून रोज काकबळी द्यावा, असे ऋषींनी पूर्वी ठरवले, पण नव्या मानवाने पूर्वीच्या चांगल्या चालीरीती सोडून दिल्या. काकोपि जीवती चिरंच, बलिंच भुङ्क्तेअसे हा तुच्छचेने आपले वर्णन करतो. जणू याच्या काकबळीवरच आपण जगतो! पोट भरण्यासाठी का आम्ही ते दोन शीतकण खातो? पितरांच्यातर्फे आम्ही अन्नग्रहण करतो. तर हा हपापलेले समजतो आम्हांला! हा मनुष्यच चहाच्या पेल्यासाठी, विडीच्या थोटकासाठी, सुपारीच्या खांडासाठी वाटेल ते करील. या माणसांच्या तुरुंगांत सुशिक्षित देशभक्त तरुण आले. ते भाकरीच्या तुकड्यासाठी, डाळीच्या दाण्यासाठी कसे भांडत, ते आम्ही पाहिले आहे. जेलमधल्या पोपया चोरून खात. कधी शिपायाने पकडले तर त्याला लाच देत. तंबाकू, विडी, कांदा, मिरची, हरभ-याची डाळ, रताळी ह्या सगळ्यांचा तुरुंगात संग्रह करीत. बागेत गाजरे, रताळी, टमाटे, बीट दिसले की त्यांचा फन्ना पाडीत. भेंडी दिसते ना दिसते तोच त्यांच्या पोटात जाई. चुका, चाकवत, कोथिंबीर, चिंचेचा पाला सगळे यांच्या थाळीत जाई. आणि हा असा मानव कावळ्याला अधाशी म्हणतो! त्याच्यापेक्षा काटेरी पाला खाणारी शेळी बरी. निंबाची पिवळी रसरशीत फळे आपल्याला आवडतात; पण याचा त्या लिंबोळ्यांवरही डोळा.

तुळशीचे झाड पवित्र म्हणून त्याचा पाला खाईल. हरभरा तर पानांसकट कोंबील. वृक्ष, तृण, वनस्पती, पशू, पक्षी, मासे याने काय खायचे ठेवले आहे? हा बकरा खातो, बोकड खातो, कोंबडी खातो, बदके खातो, गाय खातो, बैल खातो, याला वाघाची चरबी, डुकरांचे मांदे, माशाचे तेल सारे पाहिजे! आहे तरी कसला ह्या बेट्याचा देह! पक्षी आनंदाने आकाशात फिरावयास जातो तर हा बाण मारतो, गोळी मारतो, छर्रे मारतो. गमतीसाठी हा शिकार करतो. मधमाश्यांनी श्रमाने मिळवलेला मध हा लुटतो. गाई-म्हशींचे दूध वासरांनाही न ठेवता हा घटाघटा पितो. इतके करून वर स्वत: देव म्हणून मिरवतो. वाहवा रे देव! असल्या देवाला चोचीने फाडून फाडून खावा, असे मला वाटते. सर्व मानवेतर प्राण्यांनी कट केला तर चटणी उडवू याची चटणी! कावळ्याने पुढारीपण घेऊन बंडाचे विचार फैलावले पाहिजेत. माणसाची ही प्राणघेणी संस्कृती, जगननाशक संस्कृती, खाबू पोटोबा संस्कृती, तिचा नायनाट करू. चला! एकच घोषणा करा व उडवा त्याची सत्ता! स्वतंत्र व्हा, स्वतंत्र व्हा.असे म्हणून हा तरुणांचा नेता खाली बसला. बहुतेकांचे विचार त्याने बोलून दाखवले होते.इतक्यात अध्यक्षांची परवानगी घेऊन तो पहा एक पोक्त कावळा उठला. तो म्हणाला, “कावळ्याचा रंग पूर्वी निळा होता. पण मागे एकदा मानवाचे पाप फार झाले. आपल्या पापांचा कलंक जर इतर कोणी घेईल तर आपण यापुढे पुण्यवान राहू, असा त्याने संकल्प केला. जसे जगाच्या कल्याणासाठी शंकर विष प्यायले त्याचप्रमाणे कावळ्यांनी मानवाच्या पापांचा स्वीकार केला. आकाशाच्या बाळाप्रमाणे निळे निळे दिसणारे कावळे तेव्हापासून काळे दिसू लागले! माणसाने आपले वचन पाळले नाही. तो एकसारखा पापांतच बुडत चालला आहे. मोकाट, स्वैर, स्वच्छंद, बेछूट वागत आहे. वागू दे. पण आपल्या काळ्या रंगाचा हा उज्ज्वल इतिहास सर्वांनी ध्यानी घ्यावा. जगाचे दु:ख दूर करणे हे आपले ध्येय, ते आपण विसरु नये. मानव बिघडला असला तरी आपण बिघडू नये. नाहीतर हळूहळू सारी दुनिया बिघडेल. एकटा मनुष्य बिघडला म्हणून काय झाले? मानवेतर सृष्टीचे निर्मळ जीवन सृष्टीला सांभाळील. आपापले स्वधर्म आपण चालू ठेवू. त्यांतच आपला विकास, आपला उद्घार!या प्रौढ काकाच्या भाषणानंतर निरनिराळ्या सूचना पुढे आल्या. कोणी म्हणाले, “आपण मानवाकडे आधी शिष्टाई करू. सूचनेशिवाय लढणे बरे नव्हे.” ‘सशस्त्र लढा की नि:शस्त्र असहकारहाही प्रश्न पुढे आला. कोणी म्हणाले, “त्यांना चोचीने फाडा.कोणी म्हणाले, “त्यांच्या घराभोवतीची सफाई आपण केली नाही की आपोआप तो निरनिराळ्या रोगांनी मरेल.दुसरे म्हणाले, “माणसांबरोबर घुबडाला शत्रू मानून त्याचाही नायनाट करावा.काही जहाल कावळे म्हणाले, “शिष्टाई शिष्टाजवळ करावी. दुष्टाजवळ कसली शिष्टाई! तो आपली टर उडवील. आपल्याला दगडाने मारील.काहींनी सूचना केली की ईश्वराच्या घरी जाऊन आपले गा-हाणे मांडावे.तेव्हा काही म्हणाले, “देवाच्या कानी कशाला घालायला हवे? त्याला सारे दिसते, समजते. त्या सर्वज्ञ सर्वव्यापी, परमेश्वराला सारे समजते. त्याला आपले दु:ख माहीत आहे. तो म्हणेल तुम्हांला मन, बुद्धी, शक्ती सारे दिले आहे.अखेर अध्यक्ष म्हणाले, “परमेश्वराला सर्व माहीत असले तरी आपण एकवार त्याच्याकडे गा-हाणे न्यावे. तो आपला पिता. इतके दिवस आपण त्याच्या नियमांप्रमाणे वागलो. पण आता हे जिणे असह्य झाले म्हणून त्या नियमाबाहेर वागावे लागेल, हे त्याच्या कानी घालावे. त्या विश्वंभराकडे आपल्यातील पाच सहा मंडळींचे शिष्टमंडळ पाठवावे. जरा वेळ लागला म्हणून काय बिघडले?” त्यांचे म्हणणे सर्वांना पटले.

***