Fulacha Prayog.. - 14 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 14

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

१४. मधुरीची भेट

माधव जे पेय प्यायला, त्याचा एक विशेष परिणाम होत असे. ते पेय प्यायल्यावर जी स्त्री प्रथम दिसेल तिच्यावर प्रेम जडायचे असे होत असे. माधव व सैतान जात होते. माधवाच्या मनात आज निराळयाच भावना उचंबळत होत्या. तो आज नवीन झाला होता.ती पाहा एक मुलगी देवळात जात आहे. हातात पूजेचे ताट आहे. तिच्या अंगावर अलंकार नाहीत. साधे पातळ आहे. गरिबाची आहे वाटते ती?माधवाने तिला पाहिले, त्याचे तिच्यावर प्रेम बसले. तो वेडा झाला. तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती मुलगी बावरली, घाबरली. ती लगबगीने जाऊ लागली. माधव तिच्या पाठीशी होताच. हातातील पूजेच ताट खाली पडले. माधव एकदम लघळपणे खाली वाकला. त्याने ते ताट उचलून तिच्या हातांत दिले. ती लाजली. रागावली.‘लाज नाही वाटत पाठोपाठ यायला? माणसे का कुत्री तुम्ही? हा काय चावटपणा? खबरदार पाठोपाठ याल तर. मनाची नाही तर निदान जनाची तरी. चहाटळ कुठला. मला नसते ताट उचलता आले? तुझ्यामुळे तर ते पडले.’ असे ती संतापाने म्हणाली.माधव थबकला. मुलगी निघून गेली. परंतु तिने मागे वळून पाहिले. तो पाठोपाठ येत आहे की काय हे का तिने पाहिले? ते पाहाणे प्रश्नार्थक होते की, इच्छार्थक होते? काय होता त्या पाहाण्याचा अर्थ?‘सैताना, ही मुलगी मला मिळाली पाहिजे. तिच्याशिवाय मी जगणार नाही. तिच्याशिवाय मला चैन पडणार नाही. कोणतीही युक्ती कर. वाटेल ते कारस्थान कर, परंतु मी मला हवी.’ माधव म्हणाला.‘घाबरु नकोस. तुझ्या इच्छा पुरविणारा मी परमेश्वर आहे. चल माझ्याबरोबर. तिकडे आपण गंमत करू.’ सैतानाने सांगितले.दोघे चालू लागले. थोडया वेळाने एका लहानशा घराजवळ सैतान थांबला.‘का थांबलाससा?’ माधवने विचारले.‘हे तिचे घर.’ सैतान हसून म्हणाला.‘मग?‘हा मोत्यांचा कंठा हया खिडीकीतून आत फेक.’ सैतानाने सांगितले. तो एक सुंदर हार होता. करवंदाएवढी मोती होती. सैतानाने तो माधवाच्या हातात दिला. माधवाने खिडकीतून तो आत फेकला.‘पुढे काय?’ त्याने विचारले.‘येथेच जरा थांबू. काय होते ते पाहू.’ सैतान म्हणाला.दोघे बाजूला उभे राहिले. काही वेळाने ती मुलगी आली. ती घरात गेली. ती आपल्या खोलीत शिरली. तो तेथे तो मोत्यांचा हार. त्या हाराकडे ती बघत राहीली. कशी टपोरी मोती, किती पाणीदार! तिने हळूच तो हार उचलला. तिने तो आपल्या गळयात घातला. तिने आरशात पाहिले. तिच्या गोर्‍या गोर्‍या गळयात तो खुलून दिसत होता; परंतु कोठून आला तो हार? आईला सांगितले पाहिजे.तिकडे त्या मुलीची आई काम करीत होती.

‘आई आई, हा बघ मोत्यांचा हार. माझ्या खोलीत होता. कोणी टाकला, कोठून आला? मी घेऊ का तो? हा बघ मी गळयात घातला आहे. छान दिसतो, नाही? माझ्या गळयात ना दूड ना एकदाणी. ओका & ओका दिसे गळा, नाही? आता कसा दिसतो बघ, बघ ना आई. तू हातात घेऊन बघ पुष्कळ असेल किंमत, नाही?’ मुलगी आनंदाने सांगत होती. आईने तो कंठा हातात घेतला. नीट पाहून ती म्हणाली,’ आपल्याला नको ग बाई हा कंठा. गरिबांना असले दागिने काय कामाचे? कोणी चोरीचा आळही घ्यायचे. आपण हा हार रामाच्या देवळात नेऊन देऊ. रामाला होईल. देवाच्या गळयात शोभेल.’‘देवाच्या गळयात तरी तो राहील का? रामाचे दागिने वेश्यांच्या अंगावर गेले, तसा हा हारही जाईल. रामाचा मालक नावाचा रामाचा मालक. जे रामाला दिले जाते, रामापुढे ठेवले जाते, ते त्याच्या प्रियकरणीकडे जाते. त्यापेक्षा माझ्या गळयात असला म्हणून काय बिघडले?’‘तुला कळत नाही. आपण चोरीची वस्तू कशी वापरायची? जी वस्तू आपली नाही ती वापरणे म्हणजे चोरी. आपण रामाला नेऊन देऊ. तो पुजारी मालक काहीही करो. त्याचे पाप त्याला.’‘परंतु त्याच्या पापाला आपण उत्तेजन देतो. आपणाला माहीत असून त्याच्या हातात संपत्ती देणे म्हणजे आपणही पापी.’‘तू फारच बोलायला शिकलीस. तुझी आई साधी-भोळी आहे. आपण श्रध्देने करावे. आपल्यापुरते पाहावे. जा, ती धुणी धूवून आण. तुला काम नको. नटायला मात्र हवे. राणीच्या पोटी का आली नाहीस? माझ्यासारखीच्या पोटी आलीस. आता कर काम. रडायला काय झाले?’ती मुलगी आपल्या खोलीत आली. ती रडत बसली. इतक्यात सैतान व माधव तिच्या खिडकीपाशी आले. सैतानानो आणखी एक हार माधवाच्या हाती दिला. त्याने तो खिडकीतून आत फेकला. त्या मुलीने तो हार पाहिला. तिने तो हातात घेतला. तिने गळयात घातला. पुन्हा तिने आरशात पाहिले.

‘किती छान दिसतो मला! कोणाजवळ आहेत असे हार? हा हार आता आईला नाही दाखवणार. लपवून ठेवीन. किती सुंदर हार! कोणाजवळ आहेत असे हार, कोणाजवळ आहे इतकी संपत्ती? कोण फेकते हे हार हया खिडकीतून?’ ती मुलगी स्वत:शी बोलत होती.‘माझ्याजवळ आहेत असे हार. मी फेकले ते. तुझ्यासाठी मी प्राणही फेकीन. मग हारांचे काय? तू माझ्यावर रागावून गेलीस; परंतु पुन्हा मागे वळू पाहिले होतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझी हो. तुला सोन्यामोत्यांनी मढवीन. तुला सुखी करीन. खरेच -’ माधव भावनावंश होऊन बोलत होता.

‘तुमचे प्रेम आहे माझ्यावर?’ तिने विचारले ‘हो’‘खरोखर?’‘खरोखर.’‘आता जा. आई येईल; परंतु पुन्हा कोठे भेटाल?’‘गावाबाहेरच्या बागेत. तेथे सायंकाळी ये. आपण बोलू. एके ठायी बसू. हात हातात घेऊ. खरेच ये. येईन म्हण. कबूल कर.’‘येईन. सायंकाळी येईन. माझी वाट पाहा. मला काम असते ते आटोपून येईन जरा उशीर झाला तर जाऊ नका. हिने फसवले असे म्हणू नका रागावू नका. तुमचे प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम रागावणार नाही. खरे ना?’‘हो, मी वाट बघेन. तुझ्याकडे डोळे लावून बसेन.’‘मी आता जाते. धुणी धुवायची आहेत.’‘आम्ही जातो.’ते दोघे निघून गेले, ती मुलगी निघून गेली. धुणी धुवायला गेली. हार लपवून ठेवून ती गेली. ती धुणी धूत होती. तिच्या मनात किती कल्पना येत होत्या. किती विचार उसळत होते. एकदाची झाली धुणी धुवून. ती धुणी लोकांकडची होती. त्यांच्याकडे जाऊन ती वाळत घालून ती घरी आली. पुन्हा तो हार गळयात घालून बसली.दुपार झाली. गिरणीचा भोंगा झाला. तिचा भाऊ गिरणीत कामगार होता. तो घरी आला. भाऊबहीण जेवायला बसली. आई वाढत होती. भाऊ झटपट जेवून गेला. त्याला वेळ कुठे होता! वेळेवर गेले पाहिजे. क्षणाचा उशीर झाला तर दंड असे. शिव्या खाव्या लागत.‘आई, भाऊचे लग्न कधी ग होणार?’ बहिणीने विचारले.‘देवाला माहीत. आधी तुझे हवे करायला. मग त्याचे. माझ्या डोळयादेखत एकदा तुमचा संसार सुरू झाला म्हणजे झाले. दुसरी माझी आता इच्छा नाही.मग डोळे मिटले तरी चालतील,’ आई म्हणाली.

जेवणे खाणे झाली. ती मुलगी पुन्हा गळयात तो हार घालून बसली. ‘किती ग सुंदर हार, कसा शोभतो माझ्या गळयाला! त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. खरेच का प्रेम असेल? प्रेम एकदम जडते म्हणतात. मी त्यांच्यावर रागावले; परंतु पुन्हा मीच त्यांच्याकडे वळून पाहिले. त्यांच्याजवळ हार असतील हे का मला माहीत होते? परंतु पाहिले खरे. माझे का त्यांच्यावर प्रेम आहे? गोड बोलतात, गोड दिसतात आणि श्रीमंत का आहेत ते? परंतु श्रीमंती काय करायची? प्रेमाची श्रीमंती आधी हवी. मला एक दोन दागिने आवडतात; परंतु ते न मिळाले म्हणून काय झाले? दागिन्यांशिवायही मी सुंदर दिसते. सौंदर्याचा दागिना देवाने मला दिला आहे! तेवढा पुरे, केव्हा होईल संध्याकाळ? अजून सावल्या तिथेच आहेत. सूर्य का आज आळसावला आहे ? जा रे सूर्या झपझप खाली.’ असे ती मनात म्हणत होती. कल्पनेच्या राज्यात, प्रेमाच्या राज्यात गेली होती. इतक्यात आईने दळायला हाक मारली. ती गेली. मायलेकी दळीत होत्या. पायली दीड पायली दळण होते. केव्हा संपणार दळण? हे हात का धुणी धुण्यासाठी, दळणकांडण करण्यासाठीच जन्मले आहेत?’ असे ती मुलगी मनात म्हणत होती.‘कंटाळलीस तर जा उठून. फुरंगटायला काय झाले? तिन्ही त्रिकाळ खायला मात्र हवं. जा हो. मी एकटी दळीन.’आई म्हणाली. ‘पण मी जाते ओढीत का नाही? आई, तू बोलतेस. भाऊ घरी आला म्हणजे तो बोलतो. मी तुम्हाला नकोशी का झाले आहे? का सारी मला बोलता? ती स्फुंदत म्हणाली. ‘नीट वागले म्हणजे कोणी बोलणार नाही. आता लहान नाहीस तू. दोन लेकरांची आई शोभशील. तरी पोरकटपणा जात नाही. असल्या खुळसंतानाला कोण करून घेईल बायको?’‘नाही कोणी पत्करले तर नाही. मी अशीच राहीन.‘म्हणे अशीच राहीन. लाज नाही वाटत? थोबाड फोडायला हवं.संपले एकदाचे दळण. सायंकाळ होत आली. ती मुलगी बाहेर पडली. ती त्या बागेत गेली. तिने इकडे तिकडे पाहिले. तो दूर गुलाबांच्या ताटव्याजवळ तो उभा होता. तिचा श्रीमंत प्रियकर तेथे होता. ती तिकडे निघाली. ती लाजत होती, भीत होती. ती उत्सुक होती, अधीर होती. मन धावत होते; परंतु पावले हळूहळू पडत होती.

सैतान दूर होता. माधव तेथे एकटाच होता. ती तेथे गेली. खाली बसली कोणी बोलेना. क्षणभर एकमेक एकमेकांकडे बघत. पुन्हा सारे शांत. ‘मी तुझी वाट बघत होतो.’‘मी घरी तुमची आठवण करीत होत्ये.’‘तुझ्यावर खरेच माझे प्रेम आहे.’

‘मला नाही खरे वाटत. तुम्ही श्रीमंत, मी गरीब. हे पाहा माझे हात. ओबडधोबड हात, धुणी धुवून, भांडी घासून, दळणकांडण करून हे हात ताठरले आहेत. हे हात मऊ नाहीत. घट्टे पडले आहेत माझ्या हातांना. असे हे हात तुम्ही आपल्या हातात घ्याल?’‘हे बघ घेतो. तुझ्या हातांसारखे सुंदर हात जगात नाहीत. तू माझी राणी, तू माझी प्रेमदेवता.’‘हे काय तुमच्या हातात आहे?’‘गुलाबाचे फूल.’‘मला द्या ते.’‘हे घे.’तिने त्या फुलाच्या पाकळया केल्या. नंतर त्या सार्‍या पाकळया आपल्या मुठीत धरुन तिने विचारले, ‘एकी का बेकी?’‘एकी,’ तो म्हणाला.‘या, आपण हया पाकळया मोजू.’ ती म्हणाली.दोघांनी पाकळया मोजल्या. त्या सम नाही निघाल्या.‘कोठे आहे एकी? बेकी तर निघाली!’ ती खिन्न होऊन म्हणाली.‘मग त्यात काय?’‘तुमचे प्रेम नाही म्हणून बेकी निघाली.’‘काही तरीच. तुम्ही बायका वेडया आहात. अशाने का प्रेम सिध्द होते?’‘मग कशाने?’‘प्रेमासाठी केलेल्या त्यागाने.’‘मी आता जाते. उशीर होईल. आई रागे भरेल.’‘थांब जरा. आली नाहीस तो निघालीस.’‘पुढे तुमचीच होणार आहे. जरा धीर धरा. जाऊ दे. सोडा हात. माझा ओबडधोबड हात.’‘तुझा फुलासारखा हात.’‘इश्श. काही तरीच. रात्र झाली. आता जाऊ दे मला.’ ती निघून गेली. माधव तेथेच होता. सैतान हळूच हसत तेथे आला.‘माझी आठवण तरी झाली का? प्रेमात अगदी दंगच!’ सैतानाने विचारले.‘तू दूर उभा राहात जा. लोकांना तुझी भीती वाटते.’‘आणि तुला?’‘मी जगात कोणाला भीत नाही.’

मधून मधून माधव व ती मुलगी हयांच्या भेटी होत. चोरून कोठे तरी जात. बोलत बसत. प्रेमाच्या गोष्टी होत. आज पुन्हा त्या बागेत दोघे बोलत होती.‘तुमच्या बरोबर तो कोण असतो?’‘माझा मित्र.’‘त्याची संगत सोडून द्या. त्याला बघताच हद्यात चर्र होते. माझी छाती धडधड करते. चांगला नाही तो माणूस. दृष्ट दिसतो. कपटी दिसतो त्याचे हसणे भेसूर वाटते. खरेच सांगते मी. त्याची संगत सोडा.’‘तुम्ही बायका भित्र्या. काय करणार आहे तो?’‘मी तुम्हाला एक विचारू?’‘एक का, दहा प्रश्न विचार.’‘तुम्ही कधी देवळात जाता का?‘मी कधी देवळात जात नाही.’‘का बरे? तुमचा देवावर विश्वास नाही?’‘देवळात जातो त्याचाच का फक्त विश्वास असतो? तू वेडी आहेस. मी हया विश्वमंदिरात देवाला बघतो. तो सर्वत्र आहे. ज्याने सूर्यचंद्र निर्माण केले, तो का फक्त देवळात आहे? तो अणुरेणूत आहे. तो चराचरात आहे. तो माझ्यात आहे. तो तुझ्यात आहे. तुझे व माझे डोळे भेटतात. हदयाच्या तारा छेडल्या जातात. कोण करतो हे सारे? हा सारा त्याचाच खेळ, त्याचीच लीला. तो परमेश्वर ओतप्रोत भरलेला आहे. ते चैतन्य सर्वत्र विलसत आहे. त्याला राम म्हणा, रहीम म्हणा; अल्ला म्हणा, प्रभू म्हणा, परमेश्वर म्हणा; नाव कोणतेही द्या. मुख्य गोष्ट ध्यानात घेतली म्हणजे झाले.’‘किती सुंदर बोलता तुम्ही! परंतु मला आपले वाटते की, देवळात जावे. आणि तुम्ही देवाधर्मासमक्ष लग्न कधी लावणार? आपण असेच किती दिवस राहायचे? ते बरे नाही दिसत. लोक नावे ठेवतील. आपण लवकर लग्न लावू असे कितीदा म्हणालेत; परंतु तुम्ही मनावर का बरे घेत नाही? तो दुष्ट मनुष्य मोडता घालीत असेल. होय ना? खरेच आपण लवकर लग्न लावू या. म्हणजे सारे बरे होईल. होय म्हणा.’

‘वेडी आहेस तू. तो पाहा सूर्य अस्तास जात आहे. आकाशात अग्नी पेटला आहे. त्या अग्नीसमोर आपण लग्न लावू. ये. हा पाहा वारा गुणगुण करतो आहे. वारा जणू विवाहमंत्र म्हणत आहे. ही पाहा फुले वरुन पडत आहेत. हया जणू अक्षता. त्या लहानशा मांडवातल्या लग्नापेक्षा विश्वाच्या विशाल मंडपात हे लग्न अधिक पवित्र नाही का?‘मला काही समजत नाही. मी वेडी आहे. तुमचे म्हणणे गोड वाटते, खरे वाटते; परंतु खात्री होत नाही.’ जुन्या कल्पना आपल्या मानगुटीस बसलेल्या असतात. खरेच, इतके दिवस आपण भेटत आहोत; परंतु माझे नाव मला माहीत नाही. काय तुझे नाव?;‘काय करायचे नावाशी?’‘नामरुप शेवटी मिथ्या आहे; परंतु व्यवहारासाठी त्याची जरुरी आहे.

सांग, तुझे नाव सांग.’‘आधी तुमचे सांगा.’‘हट्टी आहेस तू.’‘स्वभावच आहे तो आमचा. सांगा ना नाव.’‘माझे नाव माधव.’‘सुंदर नाव.’‘तुझे सांग.’

‘मधुरी’

‘खरोखर तू मधुर आहेस. त्रिभुवनातील सारी गोडी तुझ्यात ओतली गेली आहे. मधुरी. मधुर. गोड नाव.’‘जाते आता मी.’‘रोज जाते जाते म्हणतेस?’‘मग काय करु?’ लग्न लावा म्हणजे असे म्हणावे लागणार नाही.’‘मधुरी!’‘काय’

‘आज रात्री येशील? मग घरी परत जा. हळूच दार उघडून ये. दार उघडे राहील. येशील?’‘भाऊ कामावरून दमून येतो. तो एकदा पडला म्हणजे मेल्यासारखा पडतो; परंतु आई म्हातारी व दमेकरीण. तिला सारखा खोकला येतो. तिला नीज लागत नाही. जरा दार वाजले तरी जाग येते. कसे यायचे?’

‘तुझ्या आईसाठी मी औषध देईन’‘त्याने खोकला थांबेल? झोप लागेल?’‘अगदी गाढ झोप.’‘द्या तर ते औषध.’‘उद्या सायंकाळी देईन.’‘जाते हं मी. उद्या रात्री हं.’मधुरी निघुन गेली. सैतान विकट हास्य करीत पुढे आला.‘असा चावटपणा करशील तर बघ. हसायला काय झाले? प्रेम का उपहासाची वस्तू?’’ माधवाने रागाने विचारले.‘प्रेम म्हणजे विलास, प्रेम म्हणजे क्षणिक भोग.’ सैतान म्हणाला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED