पाठलाग – (भाग- ९) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठलाग – (भाग- ९)

दिपकने खिडकीतुन डोकावुन बाहेर पाहीले. समुद्रकिनारी शेकोटी पेटलेली दिसत होती. शेकोटी भोवती काही तरुण-तरुणी फेर धरुन नाचत होत्या. ठेका धरायला लावणार्‍या संगीताचे स्वर ऐकु येत होते.

दिपकने हॉटेलच्या अंतरंगातुन नजर फिरवली. अगदी चकाचक नसले तरी अगदीच शॅबी पण नव्हते. बसायची आसनं आरामदायक होती, दिव्यांची मांडणी आल्हाददायक होती, वॉलपेपर, टेक्श्चर पेंट, मॉडर्न आर्ट पेन्टींग्स वापरुन भिंती सजवलेल्या होत्या. कुठेही भडकपणा नव्हता, कुठेही दिखाऊ-वृत्ती नव्हती. एकुण वातावरण उत्साहवर्धक होते. थकुन आलेल्या कुठल्याही प्रवाश्याला इथेच रहावे असे वाटेल असेच सर्व काही होते.

दिपकची नजर फिरत फिरत लॉबीच्या समुद्राच्या बाजुला उघडणार्‍या दरवाज्याकडे गेली. तेथे साधारण एक तिशीतली तरुणी कमरेवर हात ठेवुन उभी होती. काळपट-लाल रंगाचा पायघोळ स्कर्ट, नाभीच्या थोड्यावर पर्यंत पांढर्‍या रंगाचा आणि केशरी, निळ्या, पिवळ्या रंगाच्या मोठ्या फुलांचा पॅटर्न असलेला शॉर्ट-शर्ट तिने घातला होता. डाव्या हाताचे मनगट रंगेबीरंगी लेसचे ब्रेसलेट्सने भरलेले होते. नाकात चमकत्या खड्याची नोज-रिंग, फिक्कट पर्पल रंगाने हायलाइट केलेल्या केसांच्या बट, निळसर छटा असलेले डोळे आणि साधारण साडे-पाच फुट उंच अशी ती तरुणी बघताच दिपकच्या हृदयाचा एक ठोका जणु चुकलाच…

दिपक तिच्याकडे पहातच राहीला. तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ होती. कुणीही तिच्याकडे क्षणार्धात आकृष्ट व्हावे असा तिचा कमनीय बांधा होता.

तिने एकवार दिपककडे बघीतले आणि ती कमरेला नाजुक झटके देत त्याच्यासमोरुन निघुन गेली. दिपक तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात राहीला. त्याची तंद्री भंगली ते थॉमसच्या येण्याने.

“जा, तु फ्रेश होऊन ये, मग आपण मस्त फिरुन येऊ, तुला मी हॉटेल दाखवतो. तो पर्यंत जेवण तयार होईल..”, थॉमस

दिपकने पुन्हा एकदा ती तरुणी ज्या दिशेने गेले होते पाहीले आणि मग निराश होऊन तो उठला.

बेसिनला गरम आणि गार पाण्याचे नळ होते. दिपकने कढत पाण्याने हात, पाय, तोंड धुतले. गरम पाण्याचा स्पर्श होताच त्याच्या शरीराचे आखडलेले स्नायु मोकळे झाले. सुगंधीत साबणाने तोंड धुतल्याने दिवसभराचा शिकवा कुठल्या्कुठे पळुन गेला.

बाथरुममधुन दिपक बाहेर आला तेंव्हा थॉमस त्याची वाट पहातच उभा होता. दिपकला त्याने एक राखाडी रंगाची शॉर्ट आणि निळ्या रंगाचा टी-शर्ट दिला. कपडे बदलल्यावर दिपकला जरा मोकळे मोकळे वाटले.

दिपकला घेउन तो समुद्र किनार्‍यावर आला. मधुनच येणारी वार्‍याची झुळुक आणि पायाल जाणवणार्‍या समुद्राच्या थंडगार वाळुचा स्पर्श मनाला सुखावणारा होता. थॉमसने त्याला बाहेरुन हॉटेलची माहीती सांगीतली. हॉटेलच्या दोन्ही बाजुला रहाण्याच्या खोल्या होत्या. उजव्या कोपर्‍यात स्वयंपाकघर होते. जेथुन दिपक आला होता तो भाग हॉटेलच्या लॉबीचा होता. तेथेच कडेला एक छोटेखानी पण सुसज्ज बार होता.

हॉटेलच्या दोन्ही बाजुने एक भला मोठ्ठा डोंगरकडा समुद्राच्या अंतरंगात आतपर्यंत गेला होता त्यामुळे थॉमस म्हणाला त्याप्रमाणे हा भाग खरंच प्रायव्हेट बीचसारखा झाला होता. ह्या बिचवर येण्याच्या एकच रस्ता होता आणि तो म्हणजे हॉटेलच्या लॉबीतुन. चंद्राचा प्रकाश समुद्रांच्या लाटांवर चमकत होता. समुद्राची पांढरीशुभ्र वाळु अधीकच रुपेरी भासत होती.

वाळुवर मध्यभागी शेकोटी पेटवुन हिप्पींचा एक ग्रुप आपल्याच मस्तीत गुंग होता. गिटार-बेंजो एकसुरात कुठलेसे गाणं वाजवत होते आणि बाकीचा घोळका त्याच्या तालावर थिरकत होता. अनेक तरुण-तरुणी आपल्या मित्र-मैत्रीणींच्या मांडीवर डोकं ठेवुन, कुणी एकमेकांच्या अलिंगनात तर कुणी कश्याचीही पर्वा न करता बेफिकीर होऊन लिप-लॉक किसींग मध्ये मग्न होते.

दिपक त्यांच्याकडे पहातोय हे पाहुन अभिमानाने थॉमस म्हणाला, “एकदम फ्रि कल्चर आहे इथे. इथं सहसा फॅमीलीज येत नाहीत. हिप्पी, परदेशी नागरीक, फुट-लुज ट्रॅव्हलर्स जास्ती येतात. एकदम तारुण्य सळसळतं इथं. त्यामुळे मस्त फ्रेश वाटतं. हे किसींग बिसींग तर कुछ नही.. उद्या सकाळी लवकर उठुन बघं, डोळे बाहेर येतील…” दिपकच्या पाठीवर थाप मारत थॉमस म्हणाला.

“हो खरंच एकदम फ्रेश वाटतं आहे इथं”, दिपक म्हणाला..
“मग! म्हणलं ना, तुम्हाला जंगलात राहुन कसं काय काम करता येतात? कंटाळत नाही का?”, थॉमस
“जंगलात??”, दिपक म्हणाला..
“हो मग? फॉरेस्ट ऑफीसर ना तुम्ही, तुम्हाला बाहेरच्या जगातली ही मजा काय कळनार..”, थॉमस म्हणाला

दिपक विसरुनच गेला होता की तो एक फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन थॉमसला भेटला होता.

“हो हो.. खरं आहे ते.. आम्हाला आपलं जिकडं बघावं तिकडं जंगल..” सावरत दिपक म्हणाला.

चालत चालत दोघं खुप दुरपर्यंत आले. अचानक थॉमसचे लक्ष हॉटलच्या लॉबीकडे गेले. तेथे एक तरुणी थॉमसला हात करत होती. थॉमसने हात हलवुन तिला इशारा केला आणि मग दिपकला म्हणाला, “चला जेवण तयार आहे, जेवुन घेऊ आणि मग सावकाशीत गप्पा मारत बसु.”

दिपकला सुध्दा कडकडुन भुक लागली. तो केंव्हाचा जेवायची वाट बघत होता. क्षणाचाही विलंब न करता तो माघारी वळला.


दोघंजणं हॉटेलमध्ये परतले. थॉमस दिपकला घेऊन कॅन्टीनमध्ये गेला. एका कोपर्‍यात मेणबत्या लावुन टेबल सजवले होते. टेबलाच्या मध्यभागी दोन टवटवीत गुलाबाच्या फुल ठेवली होती. झाकुन ठेवलेल्या भांड्यांमधुन सुग्रास भोजनाचा वास दरवळत होता.

दिपकला खुर्चीवर बसवुन थॉमस म्हणाला, “बसं, मी फिशकरीला खास थॉमस-कुक टच देऊन येतो. हा गेलो.. आणि हा आलो…” असं म्हणुन थॉमस स्वयंपाकघराच्या दिशेने निघुन गेला.

दिपकला तो खाण्याचा वास आता सहन होत नव्हता. कधी एकदा सगळी झाकणं उघडुन ताटात वाढतोय असं त्याला झालं होतं. त्याची प्रचंड चलबिचल चालु होती. शेवटी न रहावुन तो समोरच्या भांड्यावरचे झाकण उघडणार एव्हढ्यात त्याला पाठीमागे हालचाल जाणवली तसे त्याने मागे वळुन बघीतले.

मागे ती मगाशी हॉटेलच्या लॉबीत भेटलेली तरुणी होती. तिला बघताच दिपक सावरुन बसला.

ती तरुणी त्याच्या टेबलापाशी येऊन बसली. एक एक करत तिने भांड्यांवरील झाकणं काढुन ठेवली आणि तिन ताटांमध्ये वाढायला सुरुवात केली.

“थॉमस कधी कधी अती करतो. प्रचंड भुक लागलेली असते आणि ह्याचं मात्र खास टचं देणंच चालु असतं. प्रचंड चुझी आहे तो कुकींगच्या बाबतीत. एखादी गोष्ट करायचीच तर ती परफेक्टच झाली पाहीजे असं त्याचं म्हणणं असतं.”, अचानक ती तरुणी बोलली.

दिपक कसनुसं हसला, एव्हढ्यात थॉमस हातात एक गरम पातेलं घेऊन आलाच. त्याने ते पातेलं टेबलावर ठेवलं आणि म्हणाला, “ऐश करो.. अशी फिशकरी तु कध्धीच खाल्ली नसशील दावा आहे माझा..”, असं म्हणुन त्याने पातेल्याचे झाकणं उघडले तसा एक मसालेदार फिशकरीचा सुगंध दिपकच्या नाकात शिरला. त्याची भुक अधीकच चाळवली गेली.

थॉमस आणि त्या तरुणीने भराभर जिन्नस ताटामध्ये वाढले आणि दोघंही जेवायला बसले.

दिपकने बटर-रोटीचा एक तुकडा फिशकरीमध्ये बुडवुन तोंडात टाकला आणि अतीवसुखाने त्याने डोळे मिटुन घेतले. थॉमस अतीरेक करत नव्हता. खरंच ती फिशकरी आऊट ऑफ द वर्ल्ड होती.

“काय? कशी झालीय?”, थॉमसच्या आवाजाने दिपक भानावर आला.
“अरे जेवु देत तरी निट त्यांना आधी..”, ती तरुणी म्हणाली.

“मस्त.. खुपच छान.. खरंच अशी करी कध्धीच खाल्ली नव्हती”, दिपक म्हणाला..
“ओह.. बाय द वे.. ओळख करुन द्यायचीच राहीली”, थॉमस म्हणाला, “ही स्टेफनी..माझी बायको..”, त्या तरुणीकडे बघत तो म्हणाला.

दिपकला एक क्षण ठ्सकाच लागणार होता, पण मोठ्या मुश्कीलीने त्याने आवंढा गिळला.

ह्या असल्या गले्लठ्ठ, चिपचिप्या, ट्रक-ड्रायव्हर कम हॉटेलचालकाची बायको इतकी सुंदर?? दिपक विचारात बुडुन गेला.


थॉमसची फिशकरी तर अप्रतीम होतीच, पण एकुणच स्वयंपाक मस्तच झाला होता. खुssssप दिवसांनी असं जेवण दिपकच्या नशीबी आलं होतं आणि दिपकने त्याचा पुरेपुर आस्वाद घेतला होता. जेवताना अनेकदा त्याची नजर स्टेफनीकडे जात होती. एक-दोनदा त्यांची नकळत नजरानजर सुध्दा झाली तेंव्हा तर दिपकला मेल्याहुन मेल्यासारखे झालं होतं. शेवटी उरलेले जेवण त्याने खाली मान घालुनच संपवले.

जेवण उरकल्यावर थॉमस आणि दिपक खुर्च्या टाकुन समुद्रकिनारी बसले होते. मधुनच एखादी समुद्राची लाट त्यांच्या पायाला स्पर्श करुन माघारी जात होत्या. स्वयंपाकघरातले आवरल्यावर सपोर्ट-स्टाफला बाकीच्या सुचना देऊन स्टेफनी सुध्दा त्यांच्याबरोबर येऊन बसली.

“दिपक फॉरेस्ट ऑफीसर आहे..”, थॉमस स्टेफनीला म्हणाला, “..आणि दिपक स्टेफनी पोर्तुगलची नागरीक आहे. ८ वर्षांपुर्वी तिच्या मित्रांबरोबर इथे आली होती. आम्ही दोघ्ं इथे प्रेमात पडलो आणि मग स्टेफनी इथेच राहीली.

“फॉरेस्ट ऑफीसर? म्हणजे तुम्हाला वाघ किंवा इतर जंगली जनावरं नित्याचीच असतील नाही?”, स्टेफनीने दिपकला विचारले
“ओह नो.. नो.. मी साधाच फॉरेस्ट ऑफीसर आहे.. बेसिकली अनाधीकृत जंगलतोड, रानडुक्कर किंवा जंगली म्हशींची अवैध शिकार रोखण्याचे काम प्रामुख्याने माझ्याकडे असते….”, दिपक म्हणाला..
“ओह.. ओके…”, स्टेफनी..
“हम्म.. म्हणजे तसं कंटाळवाणंच काम आहे, ते काम सोडुन दुसरं एखादं, काहीतरी डॅशींग, काही तरी साहसी करण्याचा खरं तर माझा विचार आहे”, दिपक

तिघांच्या गप्पा चालु होत्या इतक्या दोन हिप्पी झोकांड्या खात त्यांच्या दिशेने आले.

“हे स्टेफनी.. गिव्ह अस टु टकीलाज..”, एक हिप्पी अडखळत म्हणाला..
“प्लिज गो टु बार मिस्टर…”, बारकडे बोट दाखवत स्टेफनी म्हणाली.. “जोसेफ इज देअर, आस्क हिम..”
“नो.. नो जोसेफ.. यु गिव्ह…”, स्टेफनी्शी लगट करत दुसरा हिप्पी म्हणाला…
“चार्ज अस मोर, इफ़ यु वॉन्ट.. बट यु कम विथ अस…”, पहीला म्हणाला..

दोघं जण तिच्या अधीकच जवळ आले तसं थॉमस उठुन उभा राहीला, पण तो काही बोलणार इतक्यात एकाने त्याला जोरात धक्का दिला, तसा थॉमस तोल जाऊन खाली पडला.

थॉमसला पडलेले पहाताच दिपक विजेच्या चपळाईने उठला. दोघेहीजण बेसावध होते. दिपकने उजव्या हाताची एक बुक्की दोघांच्या ही पोटात मारली. दोघंही जणांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. दिपकने त्यांना सावरायची संधी न देता खाली वाकलेल्या दोघांच्या तोंडावर आपल्या तळपायाने एक-एक लाथ लगावली. पायात बुट नसले तरी त्याचे तळपाय इतके राकट होते की दोघांच्याही तोंडावर झिणझीण्या आल्या.

फारसा प्रतिकार न करता दोघेहीजण पळुन गेले.

“यु टॉट देम लेसन दॅट दे विल रिमेंबर टिल द टाईम दे आर हिअर..”, स्टेफनी म्हणाली..

तो पर्यंत कपडे झटकत, थॉमस उठुन उभा राहीला होता. “गुड वन दिपक. मला वाटलं नव्हतं तु इतका स्ट्रॉंग असशील…”
“यु बेटर बी सेफ.. ह्या लोकांचा काही भरवसा नाही, परत येतील सुध्दा”, दिपक म्हणाला..
“नो नो.. दे वोंन्ट.. सहसा असं होतं नाही, पण कधी कधी असे प्रसंग उध्भवतात. मोकळी हवा, एकांत, शराब, शवाब.. आणि त्यात ही स्टेफनी.. आहेच अशी की लोकं घायाळ होतात…”, थॉमस म्हणाला.

काही वेळ शांततेत गेला आणि मग थॉमस म्हणाला, “दिपक तु इथेच आम्हाला जॉईन का नाही करत? तसेही आम्ही कुणाच्यातरी शोधात होतोच. अश्या आगाऊ लोकांना ताळ्यावर आणणारं कोण तरी पाहीजेच इथं..”

“म्हणजे बाऊन्सर? अरे माझी शरीरयष्टी बघ, शोभतो तरी का मी?”, दिपक हसत हसत म्हणाला
“नाही रे, अगदीच काही बाऊन्सर नाही. मी म्हणलं ना, नेहमीच इथे असे प्रॉब्लेम नाही होत, बट यु न्हेवर नो. अगदीच काही तुला पाहीजे तसं काम नाहीये पण तरीही… फॉरेस्ट ऑफीसरपेक्षा वाईट नाही. पगार तर देईनच मी, शिवाय रहायची आणि जेवायची सोय आहेच.. गिव्ह इट अ ट्राय. आवडलं तर बघ..आदरवाईज यु आर फ्रि बर्ड…”, थॉमस

दिपकला तसेही दुसरं काही काम नव्हतं. इथं फारसं काही न करता रहायची, जेवायची सोय होत होती. शिवाय, हे हॉटेल तसे जगापासुन थोडं दुरच होते. दिपकला निदान काही दिवस तरी लपुन रहायला जागा हवी होती, ति इथे त्याला मिळणार होती. शिवाय गाठीला काही पैसेही जमणार होते.

दिपकने थोडा विचार करुन आपला होकार कळवला.


जेंव्हा तिघांच्या गप्पा पुन्हा एकदा नेहमी सारख्या सुरु झाल्या होत्या, जेंव्हा दिपक नजर चोरुन हळुच स्टेफनीकडे बघत होता तेंव्हा एक निळ्या रंगाचा स्पायकर जिन्सचा शर्ट घातलेला, काळा गॉगल आणि हातात ब्रिफकेस घेतलेला इसम, एका मटणविक्रेत्याला दिपकचा फोटो दाखवुन काही प्रश्न विचारत होता.

सर्व प्रश्नांची उत्तर मिळाल्याचे समाधान झाल्यावर तो इसम माघारी वळला. त्याने हळुवारपणे खिश्यातुन एक ६” चाकु काढला आणि अचानक माघारी वळुन त्या मटणविक्रेत्याच्या गळ्यावरुन सपकन फिरवला आणि तेथुन बाहेर पडला.

तो मटणविक्रेता मेला का हे बघायची जरुरतच त्याला पडली नव्हती. त्याला त्याच्यावर पुर्ण विश्वास होता. हाती घेतलेले काम पुर्णत्वास न्हेणारा म्हणुन उगाचच तो माफीया डॉनचा आवडता जॉनी नव्हता…

पाठलाग केंव्हाच सुरु झाला होता……….

[क्रमशः]